पत्रसंवाद

सुधाकर देशमुख, कन्सल्टिंग सर्जन, देशमुख हॉस्पिटल, उदगीर, जि. लातूर–४१३५१७
सध्या इंग्रजी वाङ्मयामध्ये J. K. Rowlings ह्यांच्या पुस्तकांचा बोलबाला आहे. त्यांच्या कादंबऱ्यांचा नायक Harry Potter हा पा िचमेत आणि भारतातही (अर्थात इंग्रजीवाचकांत) लोकप्रिय होत आहे. दर महिन्याला प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकविक्रीच्या याद्यांत ह्या पुस्तकाची आघाडी गेली कित्येक महिने कायम आहे. Times of India सारख्या मान्यवर वृत्तपत्राच्या संपादकीयातही Harry Potter Phenomenon संबंधी लिहिले गेले आहे. जादूटोण्याच्या पार्श्वभूमीवर या कादंबऱ्यांचे लेखन आहे. ह्या पुस्तकांच्या वाचनानंतर माझ्या मनात दोन प्र न निर्माण झाले. पहिला असा की जादूटोण्यासारख्या अशास्त्रीय विषयावर मुलांकरिता लिहिलेले पुस्तक एवढे लोकप्रिय का व्हावे? बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी, अविवेक Unreason ह्यावर आधारित साहित्य विवेकवादाव्या शतकात इतके लोकप्रिय का होते? असाच प्र न Spiderman, Superman किंवा cartoon films किंवा इंग्रजी आणि हिंदी Action Films संबंधातही उपस्थित करता येईल. १७-१८ व्या शतकात बुद्धि-वादाचा उदय झाला (किंवा पुनःस्थापना झाली) आणि आपण १९-२० व्या शतकाला Age of Reason ही म्हणू शकू अशी परिस्थिती निर्माण झाली. तरीही २१ व्या शतकाच्या प्रारंभी अविवेक Unreason वर आधारित कलाकृतीच्या यशस्वितेचे गमक काय? दुसरा प्र न माझ्या मनात आला तो असा—- असे बालवाङ्मय मुलांना वाचावयास द्यावे काय? मुलाच्या ग्रहणशक्ती विकसित होणाऱ्या वयात अशा अशास्त्रीय गोष्टींचा त्यांच्या मनावर कोणता परिणाम होईल? पहिल्या प्र नासंबंधात मला सुचलेली उत्तरे अशी —-
१. मानवी देहात बुद्धीबरोबर मनही आहे आणि अविवेकाचा Unreason मनाशीच संबंध आहे. श्रद्धा ही मनाची भावना आहे आणि श्रद्धेचे आणि अविवेकाचे Unreason जवळचे नाते आहे. म्हणून बुद्धीच्या जोरावर (बुद्धिप्रामाण्यवादाने) मनातील श्रद्धा किंवा अविवेक ह्यांना घालविणे अवघडच दिसते.
२. मार्क्सच्या इतिहास आकलनाप्रमाणे (Thesis and antithesis) विवेकाचा जसा जोर वाढत गेला तसा त्याचा Antithesis म्हणून अविवेकाचा Unreason चा जोर वाढत जाणार. मध्ययुगीन अंधाऱ्या काळानंतर (Age of Unreason) जसे Age of Reason विवेकावादाचे युग आले तसे विवेकवादाच्या दोन शतकानंतर पुन्हा आपण अविवेकाच्या युगाकडे (Age of Unreason) वाटचाल करीत आहोत. Harry
Potter ची लोकप्रियता कदाचित त्याचीच पूर्वसूचना असेल.
३. विवेकवाद रुजविण्यात विवेकवादी कमी तर पडले नाहीत ना? व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या असंख्य घटनांचा अन्वयार्थ विवेकाने (बुद्धीने) लावणे अशक्य आहे निदान अवघड तरी आहे. हे लक्षात आल्यामुळेच माणसाच्या जीवनात श्रद्धेला स्थान आहे. परमेश्वराला स्थान आहे. हाच ह्या Unreason अविवेकाचा पाया आहे आणि ह्यामुळेच comic strips पासून ते हिंदी Action Film पर्यन्त अतयं आणि अमानवी, अमानुष शक्ति, दाखविण्याऱ्या कलाकृतीची लोकप्रियता वाढत आहे.
४. मागील काही अंकांत The moral Animal या पुस्तक परीक्षणाच्या निमित्ताने उत्क्रांतीत एखादा जनुक प्रस्थापित होण्यास कित्येक पिढ्या जाव्या लागतात तेव्हाच तो गुण नैसर्गिक रीतीने संक्रमित होऊ शकतो. अशा स्वरूपाचा उल्लेख आहे. मानवाच्या पहिल्या पिढीपासून मानवाचा अमानवी शक्तीवर, यातुधर्मावर विश्वास असणे स्वाभाविक आहे. परमेश्वरावर, सैतानावर, जादूटोण्याचा विश्वास कित्येक पिढ्यांपासून असल्यामुळे तो जनुकीय रचनेत अंतर्भूत झाला आहे, म्हणजेच ही श्रद्धा किंवा हा अमानवीय गोष्टीवरचा विश्वास हा एकप्रकारे नैसर्गिक आहे. या उलट विवेकवादाचा इतिहास हा गेल्या दोन शतकांचा इतिहास आहे त्यामुळे विवेकवादा-वरचा विश्वास ही गोष्ट सांस्कृतिक रीतीने पुढील पिढीत संक्रमित होईल, नैसर्गिक-रीतीने नाही. या उलट unreason वरचा विश्वास हा नैसर्गिक असल्यामुळे व तो जनुकीय शास्त्राने संक्रमित झाल्यामुळे तो सर्वव्यापी—-सर्व खंडांत सर्व देशांत (पुढारलेल्या, मागासलेल्या) दिसतो. Harry Potter लोकप्रिय होण्याचे हे तर कारण नसेल?
उपस्थित केलेल्या पहिल्या प्र नांची मला सुचलेली उत्तरे मी दिली आहेत. यांपैकी कोणते बरोबर आहे? का सर्वच काही अंशाने बरोबर आहेत? की सर्वच चूक आहेत ह्याबद्दल माझी खात्रीही नाही आणि माझा अभ्यासपण नाही. दुसऱ्या प्र नासंबंधात तर अभ्यासाची शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र इ. अन्य शास्त्रांचा अभ्यास आवश्यक आहे. या विषयातील अधिकारी व्यक्तीच वरील दोन्ही प्र नांची उत्तरे देऊ शकतील किंवा त्यावर प्रकाश टाकू शकतील. या अपेक्षेने मी हे लिहीत आहे.
[१. बुद्धी आणि मन यांचा thesis and antithesis हा लावलेला अर्थ मला पटत नाही. त्या एकाच व्यवहाराच्या दोन पातळ्या आहेत, असे माझे मत आहे. वैज्ञानिक लेखनात त्याला बराच आधारही आहे.
२. “. . . घटनांचा अन्वयार्थ विवेकाने लावणे अशक्य आहे . . . (म्हणून) माणसाच्या जीवनात श्रद्धेला स्थान आहे”, या मांडणीतून असा सूर निघतो की श्रद्धा वापरून घटनांचा अर्थ लावता येतो. हे खरे आहे का? . . . पण एक मात्र पटले, की परमेश्वराचे स्थान हिंदी देमार चित्रपटांच्या पातळीवर मानावे.
३. नैसर्गिक’ ह्या शब्दाने काय सूचित करावयाचे आहे हे मुद्दा (४) मध्ये स्पष्ट नाही. विवेकवाद ‘अनैसर्गिक’ आहे असे कोणी (आजवर) म्हटल्याचे माझ्या पाहण्यात/ऐकण्यात नाही. आणि unreason हे नैसर्गिक आहे, हेही निराधार आहे.
४. पण हॅरी पॉटर ‘चमत्कारा’ची दखल घेतल्याबद्दल लेखकाचे आभार!
— संपादक
भ. पां. पाटणकर, ३–४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
१. ऑक्टोबर २००१ च्या आ.सु.तील माझ्या शिक्षणविषयक लेखावरील प्रतिक्रियेत आणि संजीवनी कुळकर्णी व रमेश पानसे यांच्या लेखांत मला प्रचंड वैचारिक गोंधळ दिसतो.
२. पहिली गोष्ट अशी की ज्या सरकारी धोरणाची मी चर्चा केली आहे ती अजून अंमलात यायची आहे. तेव्हा ‘परिस्थिती बिकट आहे’ असा संपादकांचा वर्तमानकालीन प्रयोग त्या संदर्भात अप्रस्तुत आहे.
३. मला भगवीकरणाचा धोका का वाटत नाही ते माझ्या लेखाच्या दहाव्या परिच्छेदात स्पष्ट केले आहे. फक्त liberal education’ मध्ये भगवीकरणाचा धोका येऊ शकतो. गणित, रसायन, भौतिकी, जैविकी आणि संगणक शास्त्र या आजच्या लोकप्रिय विषयांमध्ये भगवीकरण करायला वावच कुठे आहे ? व्यवसाय-शिक्षणात तरी कुठे वाव आहे? शिवाय, भारतातली दोनतीन राज्ये सोडली तर इतरत्र कुठेही भगवी सत्ता नाही. मग ज्या ‘आदेशांची’ भीती विद्यागौरी खरे यांना वाटते ते आदेश या इतर राज्यात कोण देणार आहे ?
४. माझ्या आशावादाची इतर कारणेही आहेत.
५. सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे आजची मुले चौकस असतात. नुकतीच एक गंमत झाली. माझी एक चार वर्षांची नात आहे. तिला दोनच समारंभ माहिती—-एक म्हणजे ‘Happy birthday’ आणि दुसरा म्हणजे लग्न. नुकतेच तिच्या अवि-मामाचे लग्न ठरले. ते सोलापूरला व्हायचे आहे हेही माझ्या नातीला कळले. साखरपुडा हैदराबादला साजरा व्हायला लागला तेव्हा तिने विचारले आज काय आहे. तिला कोणीतरी सांगितले—-अवि-मामाचे लग्न. तिने चटकन म्हटले. “एका मामाला दोन मामी असतात का? (नाही!) मग?’ तेव्हा मुले जशी वळवावी तशी वळतील अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. उलट आजकालच्या मुलांना ‘वळण’ लागत नाही अशीच तक्रार आहे.
६. आजचे जे भगवे नेते आहेत ते ‘भगव्या’ शाळांतून शिकलेले नाहीत. ब्रिटिशांच्या शिक्षणपद्धतीतून शिकलेले आहेत. यावरून शाळांच्या बाहेरचा प्रभाव किती असतो ते दिसते. या भगव्या नेत्यांचा मध्यंतरी उदय झाला पण त्यांचा सूर्य आता ढळू लागला आहे. याचे कारणच हे की जनतेला ideology पेक्षा व्यावहारिक फायदा जास्त हवा आहे. १९९९ च्या राज्य निवडणुकांवर हिंदुत्ववादापेक्षा कांद्याच्या भावाचा परिणाम जास्त झाला म्हणतात (आणि याची दखल घेऊन अशोक देसाई यांनी सामान्य माणसाकरता लिहिलेल्या अर्थशास्त्रविषयक पुस्तकाला नावच दिले The Price of Onions). जिथे सर्व लोक व्यवहाराच्या मागे लागले आहेत तिथे भगवीकरणाचा धोका मला तरी फारसा दिसत नाही.
७. सरकारच्या शिक्षण-धोरणांत इतर काही दोष असल्याचे आ.सु.च्या संपादकांनी दाखवलेले नाही. त्यातले जे अ-विवाद्य भाग आहेत ते सफल होवोत असे म्हणणे cynical आहे असे संपादकांनी म्हणावे याचे मला आ चर्य वाटले. त्या शब्दाचा अर्थ त्यांनी पुन्हा एकदा शब्दकोशात पाहावा.
८. संजीवनी कुळकर्णी यांच्या लेखाचा focus च चुकीचा आहे. सामान्य लोकांना व्यावहारिक उपयोगाचे शिक्षण हवे आहे. ग्रीक भाषेत ज्यांना scole म्हणतात (म्हणजे कष्ट न करता जगू शकणारे, सवड असणारे) त्यांच्या ‘schools’ मध्ये अभिमान व त्याची उलट बाजू लज्जा यांना स्थान असेल. रोजगार धुंडणाऱ्यांना इतिहासाचा अभिमान किंवा लज्जा जोपासायला सवड नसते. आजच्या समाजात व आजच्या समाजव्यवस्थेत त्यांना स्थान मिळाले की त्यांना पुरे आहे.
९. तेव्हा सरकारी धोरणातील भगवीकरणाच्या भागाला, कायद्यात ज्याला obiter dictum म्हणतात त्यापेक्षा काही जास्त स्थान मिळण्याची शक्यता नाही. त्यातला जो चांगला भाग आहे तो यशस्वी होवो असे पुन्हा एकदा म्हणतो.
१०. रमेश पानसे म्हणतात की आपण सरकारी शिक्षणापेक्षा अधिक चांगल्या त-हेचे शिक्षण देऊ शकतो असा आत्मविश्वास समाजाने गमावला आहे. आता याला कोण काय करणार! पण अशा परिस्थितीतही नवीन प्रकारच्या शिक्षणसंस्था चालवणारे पुष्कळ लोक आहेत. “May they prosper and may their tribe increase” अशी एक पुराणकालीन शुभेच्छा व्यक्त करून हे निवेदन संपवतो.

जी. ए. शारगंपाणी, ३९१, शिवाजीनगर, पुणे — ४११ ००४
श्री. मोहनींचे खादीच्या अर्थकारणावरचे सहा लेख (नोव्हेंबर २००१ सकट) वाचनात आले. फार पूर्वी लिओ हुबरमनचे मॅन्स वर्ल्डली गुड़स हे पुस्तक वाचले होते. त्याच्या सोदाहरण, प्रासादिक आणि ऐसपैस शैलीचे स्मरण मोहनींचे लेख वाचताना झाले. पण क्रमशः प्रसिद्ध होणाऱ्या लेखनात युक्तिवादाची सलगता हरवते (आणि ऐसपेस शैलीमुळेही ती वाचकांच्या नजरेतून निसटते.) यावर उपाय म्हणजे दूरदर्शनवरील धारावाहिकांची ‘पूर्वसूत्र’ मांडण्याची युक्ती वापरणे! स्वतःसाठी नोंदलेले असे पूर्वसूत्र येथे मोहनींच्या प्रतिक्रियेसाठी नोंदत आहे.
१. भारतातील परस्परावलंबी बलुतेदारीची पद्धत मोडून इंग्रजांनी नाणे-व्यवहार रूढ केला. त्यामुळे भारतीय लाचार परावलंबित्वात अडकले. यातून सुटण्या-साठी गांधींनी सुचवलेला मार्ग म्हणजे टोकाचे स्वावलंबन आणि याचे प्रतीक म्हणजे खादी. ही खादीसुद्धा ‘पेहरेल तोच कातेल, कातेल त्याने पेहरावे’ ह्या विशेषणाची! सुरवातीला समता, ग्रामस्वराज्य वगैरेंचे प्रतीक असलेली खादी केवळ भारतासारख्या दरिद्री व शेतकरी समाजातच थोडीफार रुजू शकली. पण ह्यातही गांधींचा करिश्मा हाच महत्त्वाचा भाग असावा कारण जगातील इतर गरीब आणि कृषिप्रधान देशांमध्ये खादीला प्रतीकमूल्यही मिळाले नाही. भारतातही हे प्रतीकमूल्य अल्पजीवी ठरून केवळ उपचार उरला.
२. बाह्य ऊर्जा न वापरता स्वावलंबनाने जगायचे माणसाने ठरवले तर अन्न-वस्त्र-निवारा (अवनि) ह्या मूलभूत गरजा त्याला जेमतेमच पुया करता येतील. बाह्य ऊर्जा, जिला विनोबा ‘अपरिमित अग्निप्रयोग’ म्हणतात, ती वापरायला अनेकांच्या अनेक कौशल्याचे परस्परावलंबन आणि निरनिराळ्या काळांमध्ये प्राप्त केलेल्या ज्ञानाचा वापर होण्याची नितांत गरज असते. अशी ऊर्जा वापरणे संघटित उद्योगांनाच जमू शकते, सुट्या स्वावलंबी खेड्यांना नाही. पण जेव्हा अशी ‘बाह्य ऊर्जा — संघटित उद्योग’ जोडी उद्भवते तेव्हा वस्तूंच्या उत्पादनात विविधता, त्यांच्या प्रतींमध्ये सुधारणा इत्यादी अनेक बाबी उपजतात. कमी श्रमांत जास्त वस्तू, त्याही विविध प्रकारच्या आणि चांगल्या प्रतीच्या, हे माणसांना नेहेमीच मोहविते. मुळात विविध वस्तू बनविण्याची विविध कौशल्ये शिकणे आणि वापरणे हेही माणसांना मोहविते. जेमतेम निर्वाहाच्या स्वावलंबनात अशी कामेच उपलब्ध नसतात. ह्या सगळ्या व्यवहारात एकसुरी काम टाळण्याची प्रवृत्ती महत्त्वाची आहे, पण परिणाम मात्र ‘चंगळवादी वृत्ती’ असा शिक्का बसणे हा होतो.
३. म्हणजे जगात कोठेही बाह्य ऊर्जा वापस्न वस्तूंचे उत्पादन होऊ लागले की इतर जगही त्या खूप प्रमाणात उत्पन्न होणाऱ्या, चांगल्या प्रतीच्या वैविध्य-पूर्ण उत्पादनांकडे आकृष्ट होते कारण त्यात निवडीची मजाही मिळते. बाह्य ऊर्जा वापरण्याने कमी श्रमतासांत जास्त वस्तू उत्पादित होतात आणि उपभोगास उपलब्ध होतात. श्रीमंती, सुबत्ता हे सारे कमी श्रम—-जास्त उपभोग ह्या गुणोत्तराचे वर्णन असते. त्यात पैसे हा घटक आणण्याने केवळ दिशाभूल होते. पण जर उत्पादन—-उपभोग ह्या व्यवहारात समाजातील वेगवेगळे घटक भाग घेत असतील तर शोषण करणारे आणि शोषित असे संबंध अटळपणे घडतात. यावर उपाय म्हणजे परस्परा-वलंबनाची व्याप्ती वाढवणे आणि आपण एकमेकांवर अवलंबून आहोत ह्याची समज वाढवणे.
४. थोडक्यात म्हणजे —-
स्वावलंबन = समता, अहंकार आणि परिघाबाहेर असलेल्यांबद्दल परकेपणाचा भाव. परावलंबन = लाचारी, परात्मभाव (alienation)
परस्परावलंबन = समजूतदार कृतज्ञ भावातून वाढती सुबत्ता. ५. रोजगारविषयक लेख पूर्ण नसल्याने (नोव्हेंबर २००१, खादी आणि रोजगार) त्याची चर्चा केलेली नाही.

गं. रा. पटवर्धन, पुणे — ४
माझ्या मूळ लेखात व्यापारी कालचक्रांच्या संशोधकांची तीन नावे दिली आहेत (पहा छापील पृष्ठ २५८, किंवा भाग १ परिच्छेद दोनचा शेवट) त्यातील तिसरे नाव कोंद्रातीफ नको; रिगलमन (Riggleman) हवे. अमेरिकन संघराज्यातील बांधकाम उद्योगातील कालचक्रावर त्यांनी १९३४ मध्ये निबंध लिहिला. त्यांच्या मते १८३० ते १९३४ काळात सहा व्यापारी कालचक्रे दिसतात. इतर विकसित (युरोपीय) राष्ट्रांत अशी स्पष्ट कालचक्रे गृह-बांधकाम उद्योगात कुणी दाखवली नसावी. श्री. कोंद्रातिफ हे लेखातील भाग २ मधील दीर्घकालिक कल शोधत होते. त्यांचा निबंध १९२६ मध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचप्रमाणे वेस्ले मिचेल यांनी पण या विषयावर १९२७ मध्ये लिहिलेल्या पुस्तकांत चर्चा केली आहे. तसेच रॉस्टॉव्ह यांनी ब्रिटिशांच्या १९ व्या शतकांतील अनुभवांवर १९४८ मध्ये एक पुस्तक लिहिले आहे.
[श्री पटवर्धनांनी आपल्या ऑक्टो. २००१ (१२.७) मधील लेखाला पुरवणी म्हणून हा मजकूर पाठवला.
— संपादक
दीपरत्न रा. राऊत, मु. पो. नेरी, तह. चिमूर, जिल्हा चंद्रपूर (म. रा.) — ४४२९०४
सर्वसामान्य नवविवाहित जोडप्यांनी पुढील आयुष्यात कसे वागावे यासंबंधी मला काही सूत्रे सुचली आहेत. यात काही नावीन्य नसले तरीही ती महत्त्वाची आहेत असे मला वाटते. आ.सु. मध्ये छापण्यायोग्य असल्यास जरूर छापा. सूत्रे याप्रमाणे—
सार्वजनिक ठिकाणी दोघांनीही एकमेकांचा पाणउतारा करू नये.
1. लग्न झाल्यानंतर ‘कुछ हम बदले, कुछ तुम बदलो’ अशी वृत्ती ठेवावी.
2. दोघांनीही कोणत्याही बाबतीतला ‘अती’ पणा टाळावा.
3. ‘घर दोघांचेही असते, दोघांनीही सावरायचे असते.
4. एकाने विस्कटले तर दुसऱ्याने आवरायचे असते’ हे काव्य सदेदित ध्यानी ठेवावे.
5. दोघांपैकी कोणी कितीही भांडले तरी रात्रीपर्यंत दोघांनीही एकत्र यावे.
6. दोघांचाही एकमेकांवरचा राग हा लट का असेल तर तो प्रेममूलकच असतो हे लक्षात ठेवावे.
7. पुरुष तापलेला असेल तर स्त्रीने शांत रहावे, स्त्री तापलेली असेल तर पुरुषाने शांत रहावे. दोघांनीही स्वतःमधला कोणत्याही स्वरूपातला अहंपणा टाळावा.
8. दोघांनीही दोघांकडील कोणतेही नातेसंबंध तुटू देऊ नये. त्यासाठी आपले हृदय मोकळे ठेवावे.
9. दोघांनीही स्वतःचा स्वभावात पारदर्शीपणा व मनमोकळेपणा ठेवावा.
10. कोणत्याही स्वरूपाच्या अडचणीच्या वेळी दोघांनीही एकमेकांशी मनमोकळी व फलदायक (Fruitful) चर्चा करावी.
11. दोघांनीही आपले आयुष्य जिंदादिलीने जगावे. कुढत जगू नये.
12. दोघांनीही घरात घरातील व्यक्तीप्रमाणे वागावे. ऑफीसात हुद्द्यानुसार वागतो त्याप्रमाणे वागू नये.
13. दोघांनीही खऱ्या अर्थाने आपल्या मर्यादा सांभाळून एकमेकांचा आदर करावा.
दोघांनीही कोणत्याही स्वख्यातल्या अंधश्रद्धेला थारा देऊ नये. विवेकी विचार करावा. प्रस्तुत सूत्रे ही व्यवहाराचा विचार करून लिहिलेली आहेत. [‘तत्त्वे’ व्यवहारात कशा रूपात अवतरतात याचे उदाहरण म्हणून हे पत्र.]
— संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.