पत्रसंवाद

निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) — ४१० १०१
_ श्री. दिवाकर मोहनी यांनी आ.सु. डिसेंबर २००१ मध्ये ‘रोजगार आणि पैसा’ या लेखात देव आणि पैसा यांच्यातील साम्य शोधले आहे. असे करताना विश्वास आणि श्रद्धा यांमध्ये गल्लत झालेली दिसते.
एखाद्या गृहीतकावर आधारित अनुमाने खोटी ठरत असल्याचे दिसत असूनही त्या गृहीतकाला कवटाळून बसणे म्हणजे अंधश्रद्धा होय. देव मानणे या वर्गात येते. जोवर अनुमाने खोटी ठरत नाहीत तोवर ते गृहीतक खरे आहे असे मानून सावध व्यवहार करणे ही अंधश्रद्धा नाही. पैसा आहे असे गृहीत धरून केलेले आचरण जर अपेक्षित फल (Result) देत असेल तर, ‘तो कोठे आहे?’, इ. प्र नांची उत्तरे नकारार्थी मिळाली तरी ती अंधश्रद्धा ठरत नाही. मात्र एकदा एखाद्या बँकेच्या किंवा देशाच्या पैशातील खोटेपणा समजल्यावरही त्यावर विश्वास ठेवणे अंधश्रद्धा ठरेल. कृपया यावर टिप्पणी करावी.

भ. पां. पाटणकर, ३-४-२०८ काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
शिक्षण या महत्त्वाच्या विषयावर आ.सु. च्या डिसेंबर २००० च्या अंकापासून लिखाण येत आहे. ऑक्टोबर २००१ च्या अंकात मी NCERT ने प्रसिद्ध केलेल्या शालेय अभ्यासक्रमाच्या स्परेखेचा परिचय वाचकांना कस्न दिला. त्या स्परेखे पुरती मर्यादित अशी माझी प्रतिक्रियाही दिली त्या माझ्या प्रतिक्रियेवर संपादकांची प्रतिक्रिया, त्यावर माझी प्रतिक्रिया, पुन्हा संपादकांची प्रतिक्रिया असे हे प्रतिक्रियांचे सत्रच फार वाढले. अभ्यासक्रमाचे वय काय असावे यावर काही पर्यायी विचार पुढे आला नाही.
डिसेंबर अंकात संपादक Unlimited war ची भाषा बोलतात. आ.सु.चे मूळ युद्ध विवेकवादाचे साम्राज्य प्रस्थापित करण्याकरता व धर्माचा पूर्ण बीमोड करण्याकरता होते (आ.सु. मार्च ९८) ते युद्ध बरेच दिवस चालले. आता आ.सु.ला त्या युद्धाचा कंटाळा आलेला दिसतो. आता तत्त्वचर्चेपेक्षा उपयोजनावर भर वाढेल असा मजकूर देणे त्यांना निकडीचे वाटायला लागले आहे (जून २००१). मग Unlimited war कशाविरुद्ध आणि कोणाविरुद्ध ? सध्या तरी फार मोठ्या लढाया लढण्याऐवजी आ.सु. चुटपुट चकमकीतच व्यस्त आहे. त्यामुळेच “प्रतिक्रिया’ची मांदियाळी तयार होत आहे. मी असे सुचवतो की आ.सु. ने प्रतिक्रियात्मक टिप्पण्या फार न करता कोणत्यातरी निवडलेल्या विषयावर एक ठोस व युक्तियुक्त भूमिका मांडावी. उदा. ‘शालेय शिक्षणाचे स्वरूप काय असावे?’
सध्या ‘आम्हाला विचारत का नाहीत’ असा प्र न फक्त विचारला जातो (जुलै २००१) पण विचारले तर तुम्ही काय सांगणार आहात ते वाचकांना कळू द्या की. इतिहासाबद्दल लाज किंवा अभिमान यांना शिक्षणार्थी महत्त्व देत नाहीत हे माझे मत संपादकांनी खोडून काढले आहे. (डिसेंबर २००१) पण या दोन भावना समाजात प्रकर्षाने असतील तर शिक्षण व्यवस्थेत त्या कशा हाताळायच्या याचा विचार नको का व्हायला? ।
आणखी एक सूचना, ‘मी’ असा शब्दप्रयोग केल्यावर लेखकाने स्वतःचे नाव खाली घालावे. ‘संपादक’ हा हुद्दा घालू नये. आ.सु.च्या संपादकपदी कोणी एक व्यक्ती असल्याचे आ.सु.च्या अंकात लिहिलेले नसते.
[कार्यकारी संपादक ‘मी’ किंवा ‘आम्ही’ असे लिहितात. एकाजणाच्या ‘कार्य’ कालात वेगळ्याने संपादकीय लेखन केले तर नाव नोंदले जाते. —- संपादक]

अतुल सोनक, १३१, अभ्यंकर नगर, नागपूर — ४४० ०१०
“नास्तिकांपेक्षा आस्तिकच पापाचरण अधिक करतात आणि ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे असे म्हणण्यास हरकत नसावी.” हे आपले विधान (नव्हेंबर २००१ ‘आस्तिकांविरुद्धची आघाडी कशासाठी?’) बरोबर आहे. आपल्या धर्मग्रंथांत, पुराणांत पापक्षालनासाठी निरनिराळे मार्ग सांगितले आहेत. त्यांचाच आधार घेऊन पाप करायला काहीही हरकत नाही असे प्रत्येकाला वाटत असावे. सीतेला बळजबरीने पळवून नेऊन अशोकवनात डांबून ठेवणाऱ्या रावणाला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो आणि आधुनिक रावणांनाही शिक्षा होतेच असे नाही. प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदारसुद्धा खरे सांगायला धजत नाहीत. किंवा न्यायालयामध्ये चक्क देवाची शपथ घेऊन खोटे बोलतात. या अशा पाखंडी आस्तिकांमुळे भ्रष्टाचरण, पापाचरण बोकाळत असते.
देव-देव, धर्म-धर्म केल्यामुळेच सामाजिक नीतिमत्ता वाढीस लागते. या म्हणण्याला कुठलाही आधार नाही. उलट देवळातील मूर्ती, दागिने, भाविकांची पादत्राणे आणि पैशाची पाकिटे चोरीला जाणे, मंदिरव्यवस्थापनाला किंवा पुजाऱ्याला देणगी (लाच) देऊन दर्शन लवकर होणे, देवाला आपापल्या परीने नैवेद्य दाखवून, देणगी देऊन, पुजाऱ्याला दक्षिणा देऊन स्वतःसाठी, परिवारासाठी काहीतरी मागणे, इथ-पासूनच भ्रष्टाचाराला सुरवात होते. सामान्य जनतेची लुबाडणूक करायची आणि त्यातून मिळवलेल्या पैशाची मंदिराला देणगी द्यायची किंवा एखादा सत्संग आयोजित करायचा आणि स्वतः दानशूर म्हणून मिरवायचे. पण अशा लोकांचे काहीच कधीच वाकडे होत नाही. त्यामुळे पापाचरणी, भ्रष्टाचारी लोकांना लगाम कोण घालणार, हा फारच मोठा प्र न आहे.
आपण फक्त हिंदूंच्याच आस्तिक्याबद्दल आक्षेप घेतला आहे. पण माझ्या मते मुसलमान आणि ख्रि चन किंवा ज्यू आणि इतरही जे जे देव, धर्म मानणारे अन्यधर्मीय लोक असतील ते सर्वच समाजहिताविषयी उदासीन आणि इतरांच्या दुःखाविषयी संवेदनाशून्य असतात. ‘सगळे बघायची जबाबदारी देवाची, मला काय त्याचे’ असा एकूण समाजाचा सूर असतो. माणसाला भासणारी देवाची गरज निरपेक्ष नाहीच, हे खरेच आहे. स्वार्थाशिवाय माणूस काहीच बघत नसतो. परंतु परमेश्वर, ईश्वर, देव किंवा अवतार कोणतीही न दिसणारी शक्ती आस्तिकांच्या मते जर अस्तित्वात आहे तर
त्यांच्या अपेक्षा का पूर्ण होत नाहीत? आणि अपेक्षा पूर्ण होत नसूनही, निरुपयोगी देवाच्या मागे बहुसंख्य लोक का लागतात, हाही प्र नच आहे. ‘तुम्ही काहीही म्हणा हो, पण काही ना काही तरी असलेच पाहिजे, जे आपल्या समजण्याच्या पलिकडे आहे’ असे म्हणणारेच लोक देवावर सर्वस्व सोपवून वाट्टेल तसे जगायला मोकळे होतात, असे माझे मत आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *