पत्रसंवाद

भ. पां. पाटणकर, ३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
(क) जानेवारी २००२ अंकातील दोन लेख एकत्र वाचले की एक विनोदी निष्कर्ष निघतो. पुरुष अजून पुरुषप्रधान भूतकाळात राहत असल्यामुळे पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे असे ललिता गंडभीर म्हणतात. आशा ब्रह्म यांच्या मते आपल्या जैविक प्रवृत्ती आणि (उपरी?) नैतिक ध्येये यांच्यातील विरोधामुळे समस्या निर्माण होतात. एक मत दुसऱ्या मतावर कलमख्याने लावले की असा निष्कर्ष निघतो की पुरुष भूतकालीन जैविक प्रेरणांच्या समाधानावरच खूष आहे आणि स्त्रिया (उपरी) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत. शिवाय पुरुषांनी स्त्रियांना त्यांच्या जीवनाबद्दलचे निर्णय घेऊ द्यावेत असे त्या आवाहन करताहेत म्हणजेच उदार बुद्धी दाखवण्याचे म्हणजेच (उपरी) नैतिक मूल्ये स्वीकारायला सांगत आहेत! पुरुषांवर ही मूल्ये लादत आहेत. वस्तुतः दोन्ही लेखिकांना कुटुंबव्यवस्था टिकायला हवी आहे असे दिसते. या व्यवस्थेत अपत्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे. माता-पिता-मुले या सगळ्यांच्याच हिताच्या दृष्टीने मी पुढील propositions मांडतो.
(१) स्त्रीपुरुषांच्या नैसर्गिक जैविक भूमिका लक्षात घेतल्या तर बालकांच्या नैसर्गिक गरजांकडे लक्ष देण्याचे काम स्त्रियांकडे येते.
(२) ते काम त्यांनी केले म्हणजे लगेच मुलांसाठी इष्ट काय हे ठरवण्याचा हक्क सर्वस्वी त्यांचा होत नाही.
(३) मुलांच्या संगोपनाच्या नैसर्गिक व (कृत्रिम) सांस्कृतिक अशा दोन्ही बाजू आई-वडील यांनी जोडीने सांभाळाव्या. परंपरेपासून हे दूर हटणे कृत्रिम असेल, पण त्यातून अकृत्रिम आनंद मिळतो.
(४) “स्त्रियांना त्यांच्या जीवनाचे निर्णय घेऊ देत’ या म्हणण्यात एक-तर्फी निर्णय असेल तर तो मला मान्य नाही. कुटुंब-व्यवस्थेत एकतर्फी निर्णय कोणाचाच नसावा.
(ख) दिवाकर मोहनी यांच्या लेखातील “कोणी काम करीत असो की नसो. प्रत्येकाला रोटी, कपडा, मकान मिळावयाला पाहिजे’ या वाक्याचा पहिला भाग “कोणाला काम मिळो वा न मिळो” असा ठेवला तर ते वाक्य जास्त स्वीकार्य होईल. तोही आदर्श गाठणे जवळपास अशक्य आहे. हा भाग वेगळा.

रमेश पानसे, सुगंध, विजयानगर कॉलनी, २११८ सदाशिव पेठ, पुणे — ४११०३०
डिसेंबर २००१ च्या अंकात, श्री. भ. पां. पाटणकर यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात, ते माझ्या ऑक्टोबर २००१ मधील लेखाच्या संदर्भात, लिहितात, . . . यांच्या लेखात मला प्रचंड वैचारिक गोंधळ दिसतो. मात्र त्यांच्या संपूर्ण प्रतिक्रियेत ते हा ‘प्रचंड वैचारिक गोंधळ’ स्पष्टच करीत नाहीत; त्यांच्या लेखनाच्या अखेरच्या पाच ओळी माझ्या लेखनाच्या संदर्भात आहेत. त्यातही याचे स्पष्टीकरण नाही. मग उगीचच टीकात्मक विधान का? आणि दुसऱ्याचा ‘वैचारिक गोंधळ’ हा नेहमीच ‘प्रचंड’ असतो, नाही का? तो इतका प्रचंड असतो की तो दाखवला नाही तरी चालतो.

देवदत्त दाभोलकर, ४३, गुरुकृपा कॉलनी, गोडोली, सातारा शहर — ४१५ ००१
‘धर्मप्राय’ Worship’ (इतर मुद्दे आ.सु. विचारात घेईल यात बसत असल्यास)
(१) रसेलचा ‘A Free Man’s Worship’ हा निबंध प्रसिद्ध आहे. यातील •Worship’ मध्ये ‘धर्मप्राय’ता आहे का? (२) रसेलचे एक विधान; Beyond all reason I am firmly convinced that humanity will survive असे स्मरते. ‘Beyond all reason’ हा श्रद्धेचाच एक प्रकार नव्हे का? अशा श्रद्धेचा आंतरिक आशय ‘धर्मप्राय’ आहे की धर्मातीत तर्कपूत आहे ?

शा. ल. मंजुरे, तुलसी अपार्टमेन्टस्, दुसरा मजला, ५२, आनंद रोड, मालाड (प.), मुंबई — ४०० ०६४
आ.सु.च्या जानेवारी–२००२ च्या अंकातील ‘पत्रसंवाद’ या सदरांतील श्री. दिनकर गांगल यांच्या पत्रांवर जी टिप्पणी आपण दिली आहे ती काहीशी उद्धटपणाची आहे असे वाटते. या टिप्पणीमुळे श्री. गांगल यांच्या म्हणण्याला पुष्टीच मिळाली आहे.
[एका जुन्या वाचकाला लेखक होण्यासाठी केलेले. आवाहन कोणाला उद्धट-पणाचे वाटल्यास क्षमा मागतो. — संपादक]

श्रीराम गजानन केळकर, ४, वसंत नगर, को.ऑ.हा.सो.ली, भैरव नाथ रोड, मणी नगर, अहमदाबाद — ३८० ००८
माझा मते आपले मासिक “विचारवंतांचे Coffee House” अशा स्वरूपाचे आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.