अभयप्रतिज्ञा

आजचा सुधारक हे मासिक गेली बारा वर्षे नागपूरहून अत्यंत निष्ठेने प्रसिद्ध केले जात आहे. ‘विवेकवादा’ला– – रॅशनॅलिझम’ला—वाहिलेले मासिक असे या मासिकाचे वर्णन करता येईल.
आजचा सुधारकच्या फेब्रुवारीच्या अंकात ‘माझी प्रतिज्ञा’ या नावाचा अभय विष्णुकांत वैद्य यांनी एक लेख लिहिलेला आहे. १ डिसेंबर १९९८ रोजी केलेली ही ‘भीष्मप्रतिज्ञा’ वाचून मी थक्क झालो. त्यांच्या ‘प्रतिज्ञे’चे पहिले वाक्य असे आहे–खालील अटींचे पालन झाले नाही तर अभय वैद्य त्या लग्नावर बहिष्कार
टाकेल:
(१) पत्रिका न बघता लग्न ठरलेले असावे. (२) मूहूर्त न बघता लग्नाचा दिवस ठरलेला असावा.
अशी एकापाठोपाठ एक कलमं त्यांनी नमूद केलेली आहेत. हुंडा घेतलेला नसावा, रुखवतासकट सारा खर्च वधू वर पक्षांनी समसमान वाटून घेतलेला असावा, अनिष्ट, अन्याय्य धार्मिक विधी असू नयेत, भोजन-समारंभात आग्रह नसावा, मुलीने लग्न झाल्यावर गुलामगिरीची खूण असलेले मंगळसूत्र घालू नये, रोषणाई, वरात नको, निमंत्रणपत्रिका नकोत, भावी दांपत्याने एक किंवा दोनापेक्षा जास्त मुले होऊ देणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे, वधूचे नाव, मधले नाव, आडनाव लग्नापूर्वीचेच राहिले पाहिजे… अटीच अटी. (अभय वैद्य आमच्या लग्नाला हजर राहू शकले असते, पण ‘नावा’च्या कलमाने घोटाळा केला. त्यामुळे आमच्यावरही त्यांचा ‘बहिष्कार’ आलाच असता. ती एक अट आम्ही पाळलेली नाही.)
मुंज, भूमिपूजन, वास्तुशांत, सत्यनारायण, पूजा, साखरपुडा, बारसे, वाढदिवस, मृत्यूनंतरचे दिवस . . . इ. विधींना अभय वैद्य उपस्थित राहण्याचा प्र नच उद्भवत नाही, असे त्यांनी पुढे नमूद केलेले आहे. हे झाले समारंभाबाबत. पुढे वाचा —-
खालील अटीचे पालन झाले नाही तर अभय वैद्य त्या मृत व्यक्तीच्या अंत्ययात्रेवर/अंत्यविधीवर बहिष्कार टाकेल–मग अटी. नेत्रदान झालेले असावे, देहदान, ते नाही तर विद्युत्दाहिनीत/डिझेल दाहिनीत देह जाळला पाहिजे, भटजी नको, नंतरचे विधी नकोत…
या सगळ्या अटी-तटी पाहिल्यानंतर एकच गोष्ट लक्षात येते आणि ती म्हणजे अभय वैद्य हे कुठल्याच लग्नाला हजर राहू शकणार नाहीत. कुणी मेले तरी ते त्याच्या नातेवाईकांना भेटू शकणार नाहीत. त्यांचे सांत्वन करू शकणार नाहीत. लोकांच्या अत्यंत आनंदाच्या किंवा दुःखाच्या प्रसंगी उग्र दुर्वासाप्रमाणे ‘बहिष्कारा’चे हत्यार परजून स्वतःच्या ‘सुधारकी’ तत्त्वाचे पालन केल्याच्या आनंदात मग्न राहणार. पूर्वीचे सनातनी ब्राह्मण जरा खुट्ट झाले की बहिष्काराचे हत्यार उगारायचे. त्याचेच हे ‘सुधारकी’ स्प म्हणता येईल. विशेषतः या लेखातील ‘खालील अटींचे पालन झाले नाही तर अभय वैद्य बहिष्कार घालतील’ हे वाक्यच उग्र अहंकाराचे दर्शन घडवते. ____ पंचविशीत मी ‘सत्यनारायणाला जाणार नाही’ अशी प्रतिज्ञा केली होती. शेजारच्या कुटुंबातले लोक दरवर्षी न चुकता सत्यनारायणाला बोलवायचे. तीन वर्षे अभय वैद्यांच्या थाटात आणि ताठ्यात ‘मी सत्यनारायणाला जात नाही’ असे त्यांना ठणकावून सांगितले. एकदा मला जबरदस्त फ्लू झाला. अंथरुणावस्न उठताही येईना. शेजारच्या कुटुंबातल्या माणसांनी डॉक्टरला बोलाव, गरम पाणी आणून दे, चहा दे, गरम जेवण दे असे सारे अत्यंत प्रेमाने केले. एकटे राहत असताना—-आणि आजार-पणात एकटेपणाची तीव्रता आणखी जाणवत असताना—-त्यांच्या या प्रेमामुळे माझे डोळे डबडबून आले. त्यानंतर मी माझी बहिष्काराची ‘अभयप्रतिज्ञा’ विसरून त्यांच्या-कडल्या सत्यनारायणाला जाऊ लागलो. लक्षात आले सत्यनारायण ही फारच ‘छोटी’ गोष्ट होती. अभय वैद्यांचा बुद्धिप्रामाण्यवाद, त्यांची सुधारणावादी मूल्यांबद्दलची कळकळ मी समजू शकतो. परंतु समाजव्यवहाराला बरेच पदर असतात. याची जाण त्यांच्या ‘प्रतिज्ञे’त कुठे दिसत नाही. चुकत माकत जगणाऱ्या समाजाबद्दलचे प्रेमही त्यात दिसत नाही. त्यांच्या या तर्ककर्कश्श प्रतिज्ञेपेक्षा ‘मरणा तोरणाला हजर असावे’ यातले ‘पारंपरिक शहाणपण’ मला अधिक लोभसवाणे वाटते. ते शहाणपण मानवी जिव्हाळ्याने करुणेने ओतप्रोत भरलेले आहे.
(लोकसत्ता, नागपूर, गुस्वार, २१ फेब्रुवारी २००२ यामधून प्रस्तुत)