पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, High Wycombe, Bucks, HP11 1SE, United Kingdom
आपला मेचा अंक मिळाला. मुखपृष्ठावरचा ‘धैर्य’ या मथळ्याखालचा मजकूर वाचून मनस्वी विषाद वाटला. वर्णन केलेली घटना निंद्य तर खरीच पण संपादकांनी असा मजकूर छापून काय साधले हे मात्र समजत नाही मला.
प्रथम मी हे मान्य करतो की १९ एप्रिलचा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक माझ्या वाचनात आलेला नाही. तरीही हे तर उघडच आहे— संपादकांनी त्या मूळ लेखांतल्या निवडक मजकुराचाच गोषवारा दिलेला आहे. माझी खात्री आहे की लोकांची माथी भडकवण्याच्या (mass hysteria) कृत्यातूनच त्या अबलेची हत्या झालेली असावी व, जाणून वा बुजून, निवडक/अर्धवट माहिती देऊन तुम्हीही तोच मार्ग आचरलेला आहे, नाही का? जमाव ‘संघ-परिवाराचा’च होता याबद्दल काय पुरावा उपलब्ध आहे/होता? मी कोणावरही प्रकारचे ताशेरे न झाडता आपणांस विनवतो की याबाबत आपण अधिक खुलासा कराल का?….
१. लेखाचा उरलेला भाग राज्य व केंद्र सरकारांच्या निष्क्रियतेवर होता.
२. माथी कोणी भडकवली याचे भरपूर पुरावे छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमे देत होती व आहेत. आता पोलिसांचेही निष्कर्ष तसेच संघ-परिवाराकडे बोट दाखवणारे आहेत. भारतातील वाचकांना व दूरदर्शनाच्या प्रेक्षकांना याची पुरेशी खात्री आहे.
३. आणि जर आपल्या मित्राला जीव वाचवताना मरण पावलेलीला ‘अबला’ म्हणायचे, तर कारवाई न करता दंगे होऊ देत राहणाऱ्यांना काय म्हणायचे? राजधर्मप्रतिपालक?
४. ‘मनस्वी विषाद’ मलाही वाटला—-चीडही आली. आणि म्हणूनच ढोबळ मानाने ‘सकारात्मक’ धोरणाला थोडी मुरड घालून एका राष्ट्रीय महत्त्वाच्या वृत्तपत्रातल्या लेखाचा भाग वापरला—-कधी आणि कशानेही न भडकणाऱ्या ‘माथ्यांना’ टोच मारावी, हा हेतू होता.
—- संपादक
वि. वा. ताम्हनकर, मिरज
मी आजच आपला मे २००२ चा अंक वाचला. अंक वाचून आपल्या सर्व लेखकांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली.
आपण आपल्या अंकात धर्माविषयी काही लक्षणे सांगितली आहेत. त्या लक्षणांचा साक्षात्कार तुम्हास कशावरून झाला? याचे काहीच उत्तर नाही. ‘धर्म’ याचा अर्थ तरी आपण जाणता का?
स्वतःला ज्ञान; अज्ञान, श्रद्धा इ. गोष्टींचे अनभिषिक्त भाष्यकार समजणारे द. रा. ताम्हनकर तर काहीही लिहीत सुटले आहेत. अहो, ताम्हनकर, एखाद्या आंधळ्याला जग दिसत नाही; हा जगाचा नव्हे तर त्या आंधळ्याचा दोष असतो हे तुम्हाला सांगावयास हवे काय?
हिंदू! एक शिवी! असे वाटणाऱ्या ढाकुलकरांनाही येथल्या हिंदू समाजाने सामावून घेऊन आपल्या सहिष्णुतेची परिसीमाच केली आहे असे आम्हाला वाटते. त्यांना एकच विनंती की मुस्लिम व ख्रि चन यांना ‘आपले’ मानणाऱ्या मुस्लिमांविषयी त्यांनी असे लिहून प्रसिद्ध करावे; आम्हाला खात्री आहे की दुसऱ्या दिवशी त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळालेली असेल!
आपला संपूर्ण अंक हिंदू समाज, धर्म, संघटना, श्रद्धा यांच्या निंदानालस्तीसाठीच वाहिलेला आहे. अशा गोष्टींना येथला समाज किंमत देत नाही. सबब आपण आपली बुद्धी (!), पैसा श्रम वाया घालवू नये. यापुढचा उरलासुरला आयुष्याचा काळ रामनामात घालवल्यास आपले सर्व अपराध राम पोटात घालून आपणास सद्गती देईल. तरी आपला नालायकपणा आता थांबवल्यास ठीक!
भ. पां. पाटणकर, ३–४–२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७ १. ललिता गंडभीर यांनी माझ्या मार्च च्या पत्रावर जूनमध्ये जी प्रतिक्रिया दिली त्यावरून असा भास होतो की आम्हा दोघांच्या मनांत खूप विरोध आहे. पण बारकाईने पाहिले तर मतैक्य बरेच आहे असे दिसते.
२. मी मार्चमध्ये जी चार विधाने केली होती ती आदर्श कुटुंबाचे चित्र म्हणून. असे चित्र आपल्याजवळ आधी हवे. पिळवणूक व अन्याय आदर्शात बसत नाहीतच.
३. तेव्हा पा चात्त्य स्त्रियांच्या ज्या तीन मागण्या ललिताबाईंनी नोंदल्या आहेत त्या मला पूर्णपणे मान्य आहेत. त्यांचे स्वतःचे हेही म्हणणे मला मान्य आहे की “स्त्रियांच्या पिळवणुकीवर आधारित (सध्याची) यंत्रणा बदलली पाहिजे.”
४. मतभेद निर्माण होतो तो त्यांच्या या वाक्यामुळे : (जाने. पृ. ३६४)
“आपल्या मुलांचे संगोपन कुणी करावे हा मातेचा निर्णय आहे. आपल्या मुलांसाठी काय इष्ट आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त मातेचा आहे… तीच मुलांच्या हिताचा विचार करू शकते.” या वाक्यात जे व्यक्त होते (आपल्या मुलांचे हे शब्द धरून) त्याला माझा नक्कीच विरोध आहे. पण जून मध्ये त्या म्हणतात, (जाने. मध्येही त्यांचे तसे एक वाक्य आहे)
“आई-वडील या दोघांनी ही जबाबदारी घेतली तर तो हक्क त्या दोघांचाही होईल.”
इथे अर्धा मतभेद मिटला. राहिला मतभेद, “तीच मुलांच्या हिताचा विचार करू शकते’ या विधानात गर्भित असलेल्या पात्रतेचा.
ललिताबाईच म्हणतात की (जून पृ. ११८)
“केवळ स्त्री म्हणून मुलांचे संगोपन करावे लागते आहे, म्हणून वैतागलेल्या माता व अत्यंत प्रेमाने मुलांना संभाळणारे वडील व पुरुष मी पाहिले आहेत. माझ्या मते संगोपन करणाऱ्यांची एक वेगळीच जात असते. त्याचा लिंगाशी संबंध नाही. म्हणजेच पुष्कळसे स्त्रीपुरुष मुलांचे संगोपन करायला अपात्र असतात. मी असे म्हणतो की मुलांच्या हिताचा विचार करायलाही पुष्कळसे स्त्रीपुरुष अपात्र असतात. तेव्हा संगोपनाचे काम करणाऱ्याला अधिकार या सूत्राऐवजी पात्रता असेल त्याला अधिकार (लिंगभेद न करता) असा आदर्श ठेवणे जास्त योग्य होईल.
५. स्त्रीने एकतर्फी निर्णय घ्यावा का या मुद्द्यावरसुद्धा ललिताबाईंचे आदर्श-कुटुंब आणि माझे आदर्श-कुटुंब एकच आहे. “पती व पत्नी हसतखेळत एकमेकांना मदत करतात’ असे त्यांचे आदर्श चित्र आहे. अशा आदर्श कुटुंबात एकतर्फी निर्णय कुणाचाच नसावा हे माझे म्हणणे ललिताबाईंना पटेल असे वाटते. पण स्त्रीबद्दल “कुणी न्याय्य निर्णय घेईल याची मला खात्री नाही” अशी भूमिका घेऊन (जून पृ. १०१) त्या म्हणतात ‘स्त्रियांना त्यांच्या जीवनाचे निर्णय घेऊ देत, ते एकतर्फी असले तरी चालतील’ आणि असे निर्णय घेऊ न दिल्यास “आम्ही घटस्फोट घेणार.” (मी दोन निराळ्या ठिकाणची वाक्ये एकत्र केली आहेत. त्याचे काही अर्थ विपर्यास होत असेल तर ललिताबाईंनी खुलासा करावा). अशी टोकाची भूमिका घेऊन त्या संवादाचा मार्गच बंद करतात. मी काय म्हणणार, “उत्तम, Good Bye” (माझी पत्नी वगळून इतरांना!)
६. (आता मी कोणाकरता लिहितो आहे कोण जाणे, पण) मला ही टोकाची भूमिका अनावश्यक वाटते आणि अव्यवहार्य ही. (१) अनावश्यक एवढ्याकरता की संवादाने जितक्या गोष्टी साधू शकतात तितक्या घटस्फोटाच्या धाकाने साधू शकणार नाहीत. पा चात्त्य स्त्रियांनी घटस्फोटाचे साधन वापरून कौटुंबिक सुख मिळवले आहे का? मला तरी तसे दिसत नाही. (२) अव्यवहार्य अशा दृष्टीने की करीअर करणाऱ्या स्त्रियांना (ज्यांचीच फक्त बाजू ललिताबाईंनी प्रामुख्याने मांडली आहे) अशी टोकाची भूमिका निभावण्याची शक्ती असेल, इतर अनेक पात्रताही त्यांच्याजवळ असतील, पण भारतातील नव्वद टक्के स्त्रियांजवळ ती क्षमता व पात्रता नाही. मी ‘घराबाहेर’ या
नाटकाचा दाखला देतो. अत्र्यांचे हे नाटक इब्सेनच्या Doll’s House वर बेतलेले. ना. सी. फडके यांनी नागपूरलाच दिलेल्या व्याख्यानात या नाटकावर टीका केली की : हे काय, Nora जिथे नवऱ्याच्या घराचे दार धाडकन ढकलून देऊन बाहेरच्या जगात पदार्पण करते तिथे अत्र्यांची निर्मला नवऱ्याचे घर तर सोडते पण दुसऱ्या एका घरात आश्रय घेते (‘आत’ या अक्षरांवर फडक्यांनीच जोर दिला होता. अत्र्यांनी नंतर उत्तर दिले की भारतीय स्त्रीच्या मर्यादा जाणून मी नाटक लिहिले.
७. ही झाली भारतीय मध्यम वर्गाची कहाणी. साठ-पासष्ट टक्के भारतीय स्त्रिया खेड्यापाड्यांतून राहतात. ‘बोमिलर’ या अमेरिकन बाईने त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष राहून मग असा अभिप्राय दिला आहे की त्या स्त्रियांचे जीवन जर सुधारायचे असेल तर घरच्या चुलींकरता जळण, घरवापराकरता पाणी आणि गुरांकरता चारा मिळवण्याकरता त्यांना जे कष्ट पडतात ते कमी करणे सर्वांत महत्त्वाचे आहे.
८. सारांश प्रत्येक ठिकाणी आदर्शाना काही व्यावहारिक मर्यादा असतात. टोकाची भूमिका घेऊन त्या तोडता येत नाहीत. मला वाटते की स्त्रियांचे जीवन सुधारण्याकरता दुसरे मार्ग शोधता येतील. ललिताबाई म्हणतात मुलांचे संगोपन करू शकणाऱ्यांची जातच वेगळी. हसत खेळत एकमेकांना मदत करत जगू शकणाऱ्यांची सुद्धा जातच वेगळी असेही म्हणता येईल. अशी माणसे शोधून काढून आपण त्यांच्यापासून काही शिकू शकलो तर ते जास्त फायद्याचे होईल.
शोभा रेळेकर, बि. क्र. ४, फ्लॅट क्र. ४, आनंदनगर पार्क, पौड रस्ता, पुणे –४११०२९

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.