पत्रसंवाद

केशवराव जोशी, तत्त्वबोध, हायवे क्र. ३५, नेरळ — ४१० १०१
मध्यंतरी मी नेरळच्या चौकात दहावीच्या प्र नपत्रिकेतील उतारा लावला होता. लगेचच भा.ज.पा.च्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा नेऊन मला दंड- प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४९ प्रमाणे नोटिस द्यावयास लावली. सदरहू नोटिसीत ‘बोर्ड लावून लोकांच्या भावना भडकावून जातीय व धार्मिक तणाव निर्माण झाला’; असे । म्हटले आहे.
वास्तविक सदरहू उताऱ्यात ‘दगडाच्या मूर्तीपुढे मोदक, लाडू, लोणी हे न ठेवता ते गरिबाला द्या’ असा उपदेश होता. असाच उपदेश तुकाराम, रामदास आणि एकनाथ यांनीसुद्धा केला आहे. तसेच चार्वाक, आगरकर, राजवाडे, सावरकर, पु. ल. देशपांडे, प्रबोधनकार ठाकरे यांनी निरीश्वरवादी विचार मांडले आहेत. हे विचार मी लोकांपुढे मांडावयाचे की नाही? आज झुंडशाहीमुळे माझ्यावर नोटिस बजावली तशीच ती एखाद्या संपादकाविरुद्धसुद्धा बजावली जाईल.
Diabetes Care — Advantages of Natural Insulin by Prof. Artur Teusecher, Switzerland; Page # 4, Natural Insulin is obtained from beef or pork since 1921 असे लिहिले आहे. गेल्या ८० वर्षांत ही गोष्ट एकाही डॉक्टरने जे जैन साधू, हिंदू भटजी किंवा मुसलमान मुल्ला Insulin घेतात; त्यांना उघड केलेली नाही. त्यांचा क्षोभ होईल म्हणून मी ही गोष्ट उघड करायची की नाही? समाजधुरीणांनी नक्की ठरवावे की, ज्ञान श्रेष्ठ की झुंडीच्या भावना श्रेष्ठ?

सुधाकर देशमुख, देशमुख हॉस्पिटल, उदगीर, जि. लातूर — ४१३ ५१७
शिक्षणाच्या हेतूवरचा आपला अंक आवडला. अभ्यागत संपादकांचे अभिनंदन.
शिक्षणाचे दोन हेतू महत्त्वाचे. पहिला, मनाचे उन्नयन करणारे, माणसाला सुसंस्कृत करणारे शिक्षण (ह्याला आपण उदारमतवादी शिक्षण म्हणू या) आणि दुसरा, उपयुक्ततावादी शिक्षण. इंग्रजांनी कारकून निर्माण करणारी उपयुक्ततावादी शिक्षणप्रणाली देशात रुजवली असा आरोप त्यांच्यावर केला जातो. तथापि इंग्रजांनी सुरुवात केलेल्या शिक्षणप्रणालीत उदारमतवादी शिक्षणाचा घटकही उपयुक्ततावादी घटकाइतकाच प्रबळ होता हे रा. भा. पाटणकर ह्यांनी आपल्या ‘अपूर्ण क्रांती’ ह्या पुस्तकात सप्रमाण दर्शवले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र ह्या दोन्ही घटकांचे समप्रमाण ठेवणे शासनाला जमले नाही. दारिद्र्यनिर्मूलन, बेकारी निर्मूलन आणि एकूणच आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने उपयुक्ततावादी घटकावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. ते योग्यही होते. विज्ञान, तंत्रज्ञान ह्यांच्या शिक्षणावर अधिक भर दिला गेला. उपयोजित विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याचे आर्थिक प्रगतीकरिता महत्त्व होते व आहे. विज्ञान तंत्रज्ञानातील पदवीधारकांची संख्या आपल्याकडे लक्षणीय आहे आणि जगात त्या शिक्षणात संख्येने आपला क्रमांक बराच वर आहे. पण हे करत असताना शिक्षणातील धुरीणांचा, शिक्षकांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असा ग्रह झाला की विज्ञान आले की सर्व काही आले, बाकी विषयांकडे विशेषतः मानव्य शाखेच्या Humanities विषयांकडे, भाषाविषयाकडे लक्ष देण्याची जरूरी नाही. भाषाविषय, अभिजात कला आणि इतिहास, भूगोल, तत्त्वज्ञान इ. मानव्य शाखेतील विषय पूर्ण दुर्लक्षिले गेले. बाँश विज्ञान-पदवीधरांना मातृभाषेसकट कोणतीही भाषा संज्ञापनाकरिता (communication) धड येत नाही हे सत्य आहे. मी पालक होतो तेव्हा मला कॉलेजकडून येणारी पत्रे (इंजिनियरींग, मेडिकल कॉलेजसकट), किंवा माझे कनिष्ठ सहकारी लिहितात ती पत्रे किंवा नोटिसा ही भाषाशिक्षणाच्या दुर्लक्षाच्या परिणामाची उत्कृष्ट उदाहरणे आहेत. मी ज्या कनिष्ठ सहकाऱ्यांचा वर उल्लेख केला ते आपल्या विषयात पारंगत आहेत, त्यांच्या विषयात निष्णात आहेत. भाषाशिक्षणाचे महत्त्व फक्त संज्ञापनेपुरतेच मर्यादित नाही. भाषाशिक्षण आणि कमी अधिक प्रमाणात सर्व मानव्य-शाखेतील विषय हे मूल्य शिक्षणात, संस्कृतीच्या वहनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मूल्यहीन, संस्काररहित पिढी तयार होत आहे आणि त्यात सुधारणा व्हावी म्हणून मूल्यशिक्षणाचा तास ठेवावा अशी हास्यास्पद सूचना मध्यंतरी आली होती. निष्णात असलेले माझे कनिष्ठ सहकारी समाजात वावरताना पैसा आणि मजा (fun) ही दोनच मूल्ये बाळगताना दिसतात. सामाजिक कर्तव्ये किंवा जाण अभावानेच दिसते. तत्त्वज्ञान हा विज्ञानाच्या इतकाच महत्त्वाचा विषय कित्येक विद्यापीठांतून शिकवलाही जात नाही. नृत्य, नाट्य, चित्रकला ह्यांचे आस्वादनपण जुजबी केले जाते. शिवत्व आणि सौंदर्य विज्ञानातून शिकता येत नाही. आपल्याकडे विज्ञानात पारंगत असलेली पिढी मूल्यरहित, संस्कारहीन असण्याच्या अनेक कारणांपैकी शिक्षणातील उदारमतवादी घटक आणि उपयुक्ततावादी घटक ह्यांच्यात असलेले असंतुलन हे आहे असे मला वाटते.
शैक्षणिक स्वायत्तता आपल्याकडे नावालाच आहे. विद्यापीठे स्वायत्त आहेत ती कोणत्या अर्थाने ते शासनच जाणो. पण आपल्याकडे असलेला स्वायत्ततेचा अभाव हे आपलेच वैशिष्ट्य आहे असे मात्र नाही. अमेरिका आणि ईजिप्त ह्या दोन देशांशी शैक्षणिक बाबतीत निकटचा संबंध आपला आला आणि दोन्ही देशांत शासनाचा हस्तक्षेप सारखाच आहे असा निर्वाळा Orientalism चे लेखक आणि प्रसिद्ध विचारवंत एडवर्ड सैद ह्यांनी दिला आहे. रसेल ज्याला व्यक्तिनिष्ठ शिक्षण म्हणतात ते मूलतः उदारमतवादी शिक्षण असते आणि नागरिकनिष्ठ शिक्षण हे उपयुक्ततावादी असते असे मला वाटते. शासन आणि धर्म ह्या शिक्षणात रस घेणाऱ्या संस्थांना आपले ऐकणारे अनुयायी तयार करावयाचे असतात. त्यांना माणसाला स्वतंत्र विचार करावयास शिकवणारे शिक्षण नको असते. त्या दृष्टीने मूलतत्त्ववादी आणि शासन ह्यांची रास एकच असते. शासन आणि मूलतत्त्ववाद एक झाले तर शिक्षणाच्या भगवीकरणासारखे प्र न निर्माण होतात.
शिक्षणसुधारणेचा विचार करताना उदारमतवादी घटक आणि उपयुक्ततावादी घटक ह्यांच्या शिक्षणातील संतुलनाचा विचार होणे अगत्याचे आहे असे मला वाटते. संदर्भ —-
१.रा. भा. पाटणकर–अपूर्ण क्रांती–मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९९९.
२.Identity, Authority, and Freedom : The Potentate and the traveler-essay in Reflections in Exile by Edward Said – Penguin Pub. First pub. in 2001.
Orientalism ह्या पुस्तकाचे लेखक म्हणून सैद प्रसिद्ध आहेत. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे दिलेले व्याख्यान.

फिरोझ रानडे, B-10, Medini Niketan, Vile Parle East, Mumbai – 400 099
आपल्या लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात श्रीमती उषाबाई म्हणतात, (सप्टें. २००२) “. . . अयोध्येत बाबरी ढाचा . . . किमान १०,००० कारसेवकांच्या संयमाचा बांध फुटण्यात झाली.” हे त्यांचे म्हणणे योग्य वाटते. वेळकाढूपणा झाला तर बांध फुटणारच. पण मग असा प्र न उद्भवतो की त्या १०,००० पैकी एक जण पण पुढे येऊन छातीठोकपणे, “हो, ती मशीद होती, बाबराने बांधली होती, आणि म्हणून ती मी पाडली!” असे का म्हणला नाही? मुसलमानांनी, अगदी बाबराने वा औरंगजेबाने एखादे मंदिर पाडले आणि तिथे एखादी मशीद बांधली तर तशा अर्थाचा संगमरवरी फलक लावत. ‘बाबरी ढाचा’ ह्या त्यांच्या शब्दप्रयोगाला काही अर्थ आहे असे वाटत नाही. ‘बाबरी ढाचा’, ‘औरंगजेब ढाचा’ हे शब्द कसे वाटतात? भा.ज.प. चे सर्व उच्च पुढारी एके काळचे संघाचे स्वयंसेवक. त्यांतल्या एकालाही तो ‘ढाचा’ पाडला गेल्याबद्दलची जबाबदारी घ्यावीशी वाटली नाही? असो.
श्रीमती गडकरींनी संघाच्या जमातवादाने प्रथम आक्रमण केलेले नाही वा विशिष्ट लोकांना अगदी निवडून मारले आहे, असे कधी झाले नाही, असे म्हटले आहे ते अगदी योग्यच आहे. पण एखाद्या संघटनेने काय केले नाही, तितकेच काय केले आहे, हे पण महत्त्वाचे असते. आज संघ स्थापन होऊन जवळ-जवळ पंच्याहत्तर वर्ष होत आली आहेत. काही महिन्यांपूर्वी संघाच्या एका उच्च पदाधिकाऱ्याने ‘आतापर्यन्त आमचे फक्त १० टक्के काम झाले आहे’ असे म्हटले होते. ह्या हिशोबाने १०० टक्के काम व्हायला ७५० वर्ष लागतील. तोपर्यन्त जग कुठल्याकुठे गेले असेल?
हिंदूंची संघटना करण्याकरता संघाने पोशाख कोणता निवडला? तर काळे बूट, खाकी अर्धी चड्डी, पांढरा हार्ट व डोक्यावर काळी टोपी असा! भारतातल्या कोणत्या हिंदू समाजाचा असा पोशाख होता वा आहे? असल्या पोशाखातले स्वयंसेवक हिन्दु-समाजात मिसळणार कसे? आणि त्यांचे संघटनेत काय करणार आणि त्यांच्यात हिंदुसंस्कृती रुजवणार कशी?
जे वन्दे मातरम् म्हणत म्हणत कितीतरी क्रान्तिकारक फासावर गेले, हजारोंच्या संख्येने लोकांनी लाठ्या खाल्या व गोळ्या झेलल्या, ते वन्दे मातरम् संघशाखेवर कधीही म्हटले जात नाही. गुलामगिरीच्या काळात इंग्रज सरकारचा रोष होईल म्हणून कदाचित म्हटले जात नसेल पण आता स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षानंतरसुद्धा संघशाखांवर ‘वन्दे मातरम्’ का म्हटले जाऊ नये? असा प्र न पडतो.
तसेच नागपूरला संघ-मुख्यालयावर सध्याचे सरसंघचालक येईपर्यंत आपला राष्ट्रध्वज लावला जात नसे, तो का? तुम्ही सत्तेवर आल्यावर जरूर तो बदला. पण जो-पर्यन्त तिरंगा राष्ट्रध्वज आहे, तोपर्यन्त त्याचा मान ठेवायला नको का?
संघ एक सांस्कृतिक संघटना आहे. मग संघाचे मुख्य कार्यवाह श्री. वैद्य जम्मू मध्ये निवडणुका लढवण्याची भाषा व तीही भा.ज.पा. विरुद्ध, कशी करू शकतात? लिहिण्यासारखे पुष्कळ आहे पण इथेच थांबतो.

सत्यरंजन साठे, अ-५, श्री राहुल सहकारी गृहरचना संस्था, ८३/१० एरंडवणे, पुणे — ४
माझ्या ‘संघाचा फतवा’ या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवर उत्तर देताना प्रा. उषा गडकरी यांच्या लेखात “त्यांना या जगातून नष्ट करा” असा जो मजकूर होता तो त्यांचे स्वतःचे मत नसून कुराणातील आयतांमधील वचन आहे असे त्यांचे म्हणणे आहे हे माझ्या निदर्शनास त्यांनी आणून दिले. माझ्या परिशीलनात ती चूक झाली असावी. त्यामुळे माझ्या उत्तरातला त्या संदर्भातील मजकूर रद्द समजावा. माझ्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. अर्थात त्यामुळे माझ्या उत्तराच्या एकंदर आशयामध्ये फरक पडत नाही.
[या विषयावरील पत्रव्यवहाराला काही काळ ‘विराम’ देत आहोत. — संपादक

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.