पत्रसंवाद

चिं. मो. पंडित, ६ सुरुचि, संत जनाबाई पथ, विलेपार्ले (पूर्व) मुंबई — ४०० ०५७
नुकतीच एका तरुण कार्यकर्त्याने अशी खंत व्यक्त केली की सामाजिक कार्य करताना त्याला सततच त्याची विश्वासार्हता सिद्ध करावी लागते. म्हणजे असे की समजा ‘नामांतराचा’ प्र न असेल किंवा ‘आरक्षणाचा’ प्र न असेल तर तो मांडत असलेल्या विचारावर त्याच्या ‘ब्राह्मण्याचा’ अजिबात प्रभाव नसून त्याचे विचार तर्काधिष्ठित सम न्यायतत्त्वावर मांडलेले आहेत हे त्याला आधी सिद्ध करावे लागते. वर्षांनुवर्षे ज्यांच्या बरोबर तो काम करतो त्यांचीही अशी धारणा पाहून मन फार उद्विग्न होते. विविध राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांचीपण या बाबतीतील फरफट आपण प्रत्यही पाहत असतोच. समंजस विवेकवादी मुसलमान नागरिकांचेही हे शल्य आहेच. पदोपदी, वर्षानुवर्षे त्यांनी आधी आपल्या देशभक्तीचा दाखला सादर करायचा हे फार क्लेशकारक आहे. एका अर्थाने ही दलितांच्या किंवा हिंदूंच्या मानसिक न्यूनगंडाची आणि अपराधी मानसिकतेची परिणती आहे. शिवाय यात कायमस्वरूपी छुप्या, दुय्यम नागरिकत्वाचाही प्र न आहे. सुदृढ सामाजिक मानसिकतेचे हे लक्षण नव्हे.
आपण ‘जाती’ समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत नसून त्यांचा राजकीय सौदेबाजीसाठी कायमस्वरूपी उपयोग करू पाहत आहोत. धार्मिक भावनांचाही तसाच उपयोग करू पाहत आहोत. जोपर्यंत फक्त विवेकनिष्ठ इहवादच राज्यव्यवहाराचे अधि-ष्ठान होणार नाही तोपर्यंत लोकशाही, समाजवाद, मानवीहक्क, समता, स्वातंत्र्य, विश्वबंधुत्व, नागरी समाज ही तत्त्वे व्यवहारात उतरणे अशक्य आहे. ही एकसमयावच्छेदे एकत्रच नांदू शकतात, वेगवेगळी नाही. शासनाबाहेरील सर्व संस्थात्मक जीवनातही (Civil Society) याच विचारसरणीचे अधिष्ठान आवश्यक आहे. काहीही ठोस गाभा नसलेला भोंगळ ‘सर्वधर्मसमभाव’ एरवी गोंधळ घालतच राहील.

राजीव व निखिल जोशी, तत्त्वबोध, हायवे चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड)–४१० १०१
आजचा सुधारकच्या जुलै-ऑगस्ट २००२ च्या जोड अंकातील डॉ. अनंत फडके यांचा सामाजिक पैलूंना महत्त्व देण्याचा, व्यसनाला बळी पडलेल्यांबद्दल आस्था ठेवण्याचा आग्रह स्तुत्य आहे. परिस्थितीच्या रेट्याखाली मनोवृत्तीची जडणघडण होते हे डॉ. फडके यांना ज्ञात आहेच. लहान मूल स्वतःच्या आजाराला जबाबदार नाही हे शाखांनासुद्धा अशी जाण असते. मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्यानंतर आहार आणि जीवनशैली यांची दखल घेणे अपरिहार्य झाले आहे. फक्त आरोग्य-शिक्षणाचा प्र न चिंताजनक नसून, शालेय (Formal) तसेच घरापासून सर्व स्तरावरील होणारे अनौपचारिक (Informal) शिक्षण (मनोवृत्तीची जडणघडण) ही समस्यासुद्धा गंभीर आहे. यासंबंधाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, पुणे — ४११०२९ या संस्थेच्या ‘शिक्षण आणि समाज’ या मासिकात माझा (राजीव जोशी) लेख प्रसिद्ध झाला आहे. मात्र डॉ. फडके यांचा वैकल्पिक उपचारपद्धती (alternative medicine) विषयीचा, सर्वांना सांभाळून घेणारा दृष्टिकोण खटकला.
होमिओपॅथीच्या अगदी विरुद्ध म्हणून होमिओपॅथीच्या पुरस्कर्त्यांनी अॅलोपॅथी हे नाव प्रसृत केले. अॅलोपॅथी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या उपचारपद्धतीचे खरे नाव मॉडर्न मेडिसिन असे आहे. रोगाच्या परिणामांच्या विरुद्ध परिणाम घडविणारे (रोगाचे कारण न शोधता) उपचार करणे म्हणजे अॅलोपॅथी होय. मॉडर्न मेडिसिन अॅलोपॅथीपेक्षा भिन्न आहे. मॉडर्न मेडिसिनचा एक भाग symptomatic treatment आहे. उदा. ताप आल्यावर डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे, जुलाब झाल्यावर क्षारसंजीवनी देणे, बेगॉन प्यायल्यावर अॅट्रोपिन देणे, इ. त्यामुळे ‘मॉडर्न मेडिसिन हे फक्त अॅलोपॅथीच आहे’, असा गैरसमज होतो. मॉडर्न मेडिसिनमध्ये कारणांचाही शोध घेतला जातो.
शास्त्रीय सिद्धान्तांची पडताळणी करणाऱ्या, निरीक्षण-सिद्धान्त-प्रयोग-निष्कर्ष-वापर-नवे निरीक्षण, या मार्गाने जाणाऱ्या मॉडर्न मेडिसिनला कोणतेही alternative medicine पर्याय ठरू शकत नाही. ‘आमच्या नियमांमध्ये बसणारे प्रयोग तुम्ही करून तुमची माहिती खरी ठरली तरच तुमचे निष्कर्ष ग्राह्य ठरतील’ अशी अट घालणाऱ्या मॉडर्न मेडिसिनने आजवर फॉक्सग्लोव्ह (डिजिटॉक्सिन), सिंकोना (क्विनीन), सर्पगंधा (रिसीन), सदाफुली (व्हिनक्रिस्टीन) यांसारख्या वनस्पतीवगैरेपासून बनवलेली शेकडो औषधे alternative medicine मधून घेतली आहेत. अॅक्युप्रेशरचे वेदनाशामक प्रभाव-देखील मान्य केलेले आहेत. अशा उपचारपद्धती आता शास्त्रशुद्ध स्वरूपात वापरल्या जात असल्याने त्यांचे श्रेय मॉडर्न मेडिसिनलाच दिले पाहिजे. मात्र याचाच अर्थ असा की alternative medicine चे शास्त्रशुद्ध नसलेले भाग चूक आहेत. Burden of proof मात्र जबाबदारी आहे.
कोणत्याही एका ‘पॅथी’ ची भलावण न करता ‘डोळस, शास्त्रीय’ दृष्टिकोण ठेवण्याचा डॉ. फडके यांचा आग्रहही स्तुत्य आहे. परंतु “. . . इतर पॅथीच्या उपचाराने बरे झाल्याचे ‘अनुभव वारंवार’ येतात”. हे प्रमाणपत्र शास्त्रीय नाही. ‘अनुभव’ आणि ‘प्रयोगाचे निष्कर्ष’ यात महदंतर आहे. त्रिदोष हा भारतीय पद्धतीचा अन्वयार्थ, ग्रीक पद्धतीतील ‘phlegm, yellow bile, black bile, blood’, चीनमधील ‘yang – yin’, किंवा अभिनिवेश ठेवणे चुकीचे आहे. शास्त्रीय निकषांवर उतरणारे कोणतेही अन्वेषण/उपचार स्वीकारार्ह आहेत. शास्त्रीय औषधाला आणि उपचारपद्धतीला विरोध केलाच पाहिजे. ‘चोरी करू नये’ हे तत्त्व महत्त्वाचे आहे. त्याचा उगम वेद, बायबल, की कुराण, याबाबतचा अभि-निवेश अनावश्यक आहे. ‘गणपतीची मूर्ती दूध पिते’ ही अफवा Electronic Media वापरणाऱ्या ‘उच्चशिक्षितांनी’, ‘जितं मया’ या अभिनिवेशाने पसरविली. फक्त काही औषधेच शास्त्रशुद्ध (तीही by chance) असलेल्या alternative medicine ला संपूर्ण स्वीकृती देणे चूक आहे.
होमिओपॅथीविषयी झालेल्या संशोधनात आजवर तरी होमिओपॅथी खोटी पडल्याची समग्र माहिती आ.सु.च्या जुलै १९९२ अंकात आहे. (१) व्याधी वाढवली की बरी होते आणि (२) औषध विरल (dilute) केले की अधिक परिणामकारक होते, अशी गृहीतके असणारी होमिओपॅथी अतार्किकसुद्धा आहे. मॉडर्न मेडिसिनमध्ये कारणांचाही शोध घेतला जातो. केवळ इतकेच नसून ‘ज्ञात झालेल्या’ कारणांपलिकडे नवीन कारण असण्याची शक्यतासुद्धा ध्यानात ठेवली जाते. त्रिदोष (आयुर्वेद), . . . भूतपिशाच्च (पंचविद्या) या ‘ज्ञात’ कारणमीमांसेपलिकडील नवीन कारणांचा alternative medicine मध्ये शोध घेतला जात नाही. आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी इ. उपचारपद्धती ग्रंथाधिष्ठित असल्यामुळे अपरिवर्तनीय आहेत. त्यांत संशोधन अशक्य आहे. सर्वधर्मसमभाववाल्यांनी, सर्वांना सांभाळून घेणारा दृष्टिकोण स्वीकारून धर्मनिरपेक्षतेची कशी वाट लावली ते सर्वज्ञात आहेत. (प्रार्थनेविषयीचा लेख खूप चांगला आहे.)

श्याम कुळकर्णी, D 5/4 सुंदर गार्डन, माणिकबाग, सिंहगड रस्ता, पुणे — ४११ ०५१
श्री. सुभाष आठले यांच्या ‘भारतीय संस्कृती आणि स्टेमसेल्स्’ ह्या लेखातील निष्कर्ष अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत असे वाटते.
१. मानवी समुदायाच्या प्रथमावस्थेत कुटुंब स्वयंपूर्ण म्हणजे सर्व क्षमता (शेती, सुतारकाम, गंवडीकाम, लोहारकाम) असणारे असावे, हा श्री. आठले यांचा अंदाजच आहे निरीक्षण नाही. या अंदाजानुसारसुद्धा प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीत या सर्व क्षमता असतील असे नाही. कुटुंबाच्या वस्त्या, गावे असे मोठे घटक बनले तेव्हा त्यातील प्रत्येक व्यक्तीत सर्व क्षमता नसणारच. काही विशिष्ट व्यक्तींत विशिष्ट क्षमता असल्यामुळे त्यांनी तो व्यवसाय निवडला. या प्रकारे विशेषीकरण सर्वत्रच झाले. भारतातच झाले असे नाही. श्री. आठले यांच्या मते या प्रकारचे विशेषीकरण इतर संस्कृतीत झाले तरी त्यांनी आपल्या बाकीच्या क्षमता शाबूत ठेवल्या आहेत. पण भारतीयांनी मात्र त्या गमावल्या. पहिल्या निष्कर्षाच्या पुष्टीसाठी त्यांनी अमेरिकन शेतकरी व चर्चिल यांची उदाहरणे दिली आहेत. माझ्या या लेखासोबत वेगळी वीस भारतीय नामवंत व काही सामान्य व्यक्ती व त्यांच्या विविध क्षमतांची यादी श्री. आठले यांच्या संदर्भासाठी जोडली आहे. ही यादी आठल्यांकडे पाठवली आहे. —- संपादक] प्रत्यक्षात आजचा सुधारकचे विशेषांक काढता येतील एवढी नावे मी देऊ शकेन; ही फक्त वानगीदाखल. ती यादी देण्याचा उद्देश भारतीय व्यक्तींनीही आपल्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर क्षमता गमावल्या नाहीत हे दाखवणे हा आहे. गेली काही शतके ज्यांचे आयुष्य मेलेली ढोरे ओढण्यातच गेले त्या समाजातील कित्येक व्यक्ती आज वैद्यकीय, अभियांत्रिकी, शैक्षणिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रांत अभिमानास्पद कामगिरी बजावताना आढळतात हे क्षमता शाबूत असण्याचेच लक्षण नाही का?
२. लेखाच्या पान नं. २३१ वर भारतीय संस्कृतीमुळे भारतीय नागरिक आपल्या सुप्त-दृश्य क्षमता गमावतात असे श्री. आठले म्हणतात पण २३३ पानावर मात्र आजही भारतात जन्मणाऱ्या मुलांमध्ये सर्व क्षमता असतात पण भारतीय संस्कृती-मुळे त्यांच्या बहुतेक क्षमतांचे खच्चीकरण होते म्हणजे इतकी वर्षे बलुतेदारी वगैरेमुळे त्या क्षमता पूर्णपणे नष्ट झाल्या नाहीत तर! आता तर बलुतेदारी जवळजवळ नामशेषच झाली आहे. राजकारण्यांनी त्यांच्या सोयीसाठी जात व धर्माचा आधार घेतला तरी कुणीही एखादा व्यवसाय तुच्छ समजत नाही. माझ्या माहितीनुसार बरीचशी ब्यूटी पार्लर्स (म्हणजे पूर्वीचे हेअर कटिंग सलूनच म्हणा ना) उच्चवर्णीय स्त्रियाच चालवतात. माझे बरेच मागासवर्गीय मित्र बिल्डरच्या व्यवसायात आहेत तसेच उच्चवर्णीय पण त्या व्यवसायात आहेत.
३. श्री. आठले यांच्या मते आत्यंतिक विशेषीकरण हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्षात आत्यंतिक विशेषीकरण अमेरिकेतच झाले आहे. हेन्री फोर्डच्या कारखान्यात १९१० च्या सुमारास assembly line ची कल्पना मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी वापरण्यात आली. त्यामुळे पूर्वी एक कामगार यंत्राचा एक भाग बनवीत असे त्याऐवजी उत्पादनक्रियेचे अतिशय छोटे शेकडो भाग करून एक कामगार फक्त ‘बोल्ट भोकात घालणे’, दुसरा ‘नुसता नट जागेवर ठेवणे’, तिसरा ‘तो नट आवळणे’ अशा क्रिया करतात. याला आत्यंतिक विशेषीकरण म्हणतात. त्यामुळे प्रत्येक कामगारास आपण काय करत आहोत याचे भानच रहात नाही. याचे मार्मिक विडंबन चार्ली चॅप्लिनच्या Modern Times या चित्रपटात आहे.
४. विशेषीकरण हे नेहमीच हानिकारक असते असे नाही. कौशल्याच्या अत्युच्चीकरणासाठी ते आवश्यकच आहे. उदा. डॉ. नीतू मांडके यांनी हृदय शस्त्रक्रिया एवढ्याच आपल्या वैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित न करता आपल्या इतर क्षमतांचा -हास होऊ नये म्हणून स्वतःचा पोहण्याचा तलाव बांधणे किंवा बूट दुरुस्त करणे यात वेळ घालवला तर त्यांच्या बऱ्याच पेशंटना आपल्या हृदयाच्या पेशींच्या स्पंदनाची क्षमता गमवावी लागेल.
५. भारतीय माणसाला नेहमीच्या ८-१० वृक्षांपलीकडे इतर झाडांची नावे माहीत नसणार, श्रीकृष्ण सांगतो ते चूक आहे असे श्री. ना. ग. गोऱ्यांवाचून कुणी सांगितले नाही हे श्री. आठले यांचे निष्कर्ष नसून अंदाजच आहेत. कारण मला स्वतःला, माझ्या कुटुंबातील माझी बायको, आई व वडील (गेले विचारे!) व माझ्या अनेक मित्रांना अनेक झाडांची नावेच काय इतरही बऱ्याच गोष्टी माहीत आहेत व आम्ही सुंदर बागा घराभोवती फुलवल्या आहेत. श्रीकृष्ण तरी व्यक्ती आहे. शिवाय हे फक्त मराठी भाषकांचे! इतर किती भाषेतील साहित्य श्री. आठले यांनी वाचले आहे?
६. मूलतः स्टेम सेल्स व कोणतीही संस्कृती ही तुलनाच अप्रस्तुत आहे. कारण स्टेम सेलमध्ये फक्त मूळ वृक्ष निर्माण करण्याची क्षमता असते. आंब्याच्या स्टेमसेलपासून वडाचा, पिंपळाचा वा चिंचेचा वृक्ष होत नाही. मात्र चांभाराचा मुलगा रेल्वेमंत्री, ब्राह्मणाचा मुलगा मुख्य सेनाधिकारी क्षत्रियाचा मुलगा संगणकतज्ञ, शेतकऱ्याचा मुलगा क्षेपणास्त्रतज्ञ व पुढे देशाचा राष्ट्रपती बनू शकतो व हे भारतात होत आहे. वाटत नाही, मात्र या मानसिकतेस आजची शिक्षणपद्धती जबाबदार आहे. ही शिक्षणपद्धती लॉर्ड मेकॉले या ब्रिटिश माणसाने सुरू केली व तिच्या सुधारणेच्या नावाखाली अधिक खेळखंडोबा करण्याचे काम आजच्या शिक्षण-महर्षीनी केले आहे. दोघांनाही भारतीय संस्कृतीशी काही देणेघेणे नाही. त्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षार्थी बनला. मी स्वतः शिक्षणक्षेत्रात काम केल्यामुळे बहुतांश विद्यार्थी केवळ परीक्षे-साठी व परीक्षेपुरताच अभ्यास कसा करतात हे अनुभवले आहे. पण त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या सर्व क्षमता गमावलेल्या आहेत असे नाही. अभियांत्रिकी क्षेत्रात असूनही या विद्यार्थ्यात उत्तम गायक, नट, लेखक, वक्ते असे अनेक विद्यार्थी मी पाहिले. आजचा सुधारकला परिचित प्रा. शेषराव मोरे हे माझ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी एक हे अभिमानाने सांगावेसे वाटते.

राज्यश्री क्षीरसागर, फ्लॅट क्र. ६, सुरेन्द्र अपार्टमेंट, प्लॉट ३, नीलकमल सोसायटी, विठ्ठलमंदिराजवळ, कर्वेनगर, पुणे — ४११ ०५२
धर्मातीत होण्याबाबतचा श्री. रमेश पानसे यांचा ‘पावसानंतरचे ऊन’ (सप्टेंबर २००२) हा लेख वाचला. ललित लेख म्हणून तो उत्कृष्ट आहे; पण त्यात काही तात्त्विक गोंधळ आहे असे वाटते. देव व धर्म या संकल्पनेची बाजू घेण्याच्या उद्दिष्टाने नव्हे, पण काही मुद्द्यांचे, विधानांचे, संकल्पनांचे स्पष्टीकरण व्हावे या भूमिकेतून काही विचार मांडले आहेत. श्री. पानसे यांनी आवश्यक ते स्पष्टीकरण द्यावे अशी विनंती व अपेक्षा आहे. “वादे वादे जायते तत्त्वबोधः” यासाठी हा खटाटोप.
१. लेखाच्या सुरुवातीलाच ‘माणसाच्या मुलावर धर्म लादला जातो’ आणि “प्राण्यांना धर्म नसतो; त्यांना निसर्गदत्त ‘स्व-धर्म’ असतो’, असे विधान आहे. याबाबतीत असे म्हणावेसे वाटते की प्राण्यांना जसा शरीरपातळीवर शरीर-धर्माच्या पलीकडचा विचार केला; म्हणूनच माणसाने मानसिक पातळीवरील ‘स्व-धर्म’ निर्माण केला. हा वागणुकीशी संबंधित आहे; ‘धर्म लादण्याशी’ संबंधित नाही. ‘धर्म’ म्हणजे नेमके काय अभिप्रेत आहे? ‘धर्म’ ही संकल्पना येथे स्पष्ट होण्याची गरज आहे. माझ्या मते केवळ एक विशिष्ट उपासनापद्धती स्वीकारणे वा ‘देव मानणे किंवा देव आहे’, असे म्हणणे, म्हणजे, ‘धर्म’ नव्हे. माणसाचा, मानवाचा ‘मानसिक स्व-धर्म’ म्हणजे “आपल्या कर्तव्यांचा विसर न पडू देता तारतम्याने बुद्धीचा उपयोग करून वागणे”. दुसऱ्या व्यक्तीचे, समाजाचे नुकसान न करता जगणे. या अर्थाने पित्याने ‘पित्याचा’, आईने ‘आईपणाचा’, मुलाने ‘मुलाचा’, शिक्षकाने ‘शिक्षका’चा; थोडक्यात, प्रत्येकाने आपले कर्तव्य नीट पार पाडण्याचा ‘धर्म’ पाळणे असे अपेक्षित आहे. “आजच्या काळात निसर्गाचा समतोल सांभाळून, पर्यावरणीय नुकसान न करता जगणे; हा देखील माणसाचा ‘धर्म’ असू शकतो, आहे.”
२. श्री. पानसे असे म्हणतात की, “देवाच्या संकल्पनेभोवतीच प्रामुख्याने धर्माची संकल्पना बांधली गेली आहे’. कोणत्याही धर्माचा विचार हा या संकल्पनेतून उगम पावलेला दिसत नाही. उदाहरणार्थ येशू ख्रिस्ताने माणसाच्या वागणुकीवर भर दिला आहे. गौतम बुद्धाने तर मूर्तिपूजा कधीच महत्त्वाची मानली नाही. उलट मानवी वर्तन, त्यातून निर्माण होणारे दुःख, करुणा यांचा विचार करूनच त्याने लोकांना ‘वागण्याबाबत’ उपदेश केला. हिंदू धर्माने देखील आचार-विचारांचाच विचार केला आहे.
• कन्फ्यूशियसने व मोहम्मद पैगंबराने देखील वर्तनावर भर दिला आहे.
म्हणजे आजच्या आधुनिक भाषेत धर्माचा उगम हा ‘Behavioural Science’ मधून झाला असावा असे म्हणता येईल, असे वाटते.
३. आता माणसाने नीट वागावे, त्यासाठी कुणाचा तरी आदर्श असावा म्हणून देवाची रूपे त्यात जोडली गेली असतीलही. अर्थात देव व मूर्तिरूप देव वगैरे वादांमध्ये जाण्याचे येथे प्रयोजन नाही, ते अपेक्षितही नाही. पण निसर्गक्रम चालविणारी काहीतरी वैज्ञानिक, परावैज्ञानिक शक्ती किंवा तत्त्व; ज्याचे माणसाच्या बुद्धीला आकलन झालेले नाही त्या शक्तीला (देव किंवा ईश्वर या शब्दांवर आक्षेप असेल तर त्या शक्तीला, वैज्ञानिक सत्याला) दुसरेही नाव देता येईल. त्याला ‘निसर्गतत्त्व’ किंवा Law of Nature असेही म्हणता येईल, पण हे वैज्ञानिक सत्य नाकारता येणार नाही. ही विज्ञानाची संकल्पना ज्या धर्मात नाकारली जाईल तो धर्म कदाचित टिकणारही नाही.
४. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्त, बुद्ध यांना लोकांनी देव मानायला सुरुवात केली. त्यांनी समाजाला सन्मार्गावर नेले म्हणून समाजाने त्यांना Supreme authority म्हणून देव केले असावे. देव म्हणजे ‘सत्प्रवृत्ती’ असाही अर्थ लावता येतो.
५. तसेच “देव रुजला म्हणून धर्म समाजात दाखल झाला’ हेही विधान वरील विवेचनानंतर योग्य वाटत नाही. उलट धर्म (वागणूक या अर्थानेच) रुजावा म्हणून देवाची संकल्पना पुढे ठेवण्यात आली असावी. ती ज्यांना पटत नाही त्यांना ती स्वतःपुरती तरी मोडीत काढण्याचा पूर्ण अधिकार असावा व आहे. (मलाही मूर्तीपूजा पटत नाही व मी ती करीत नाही.)
६. “आई-बापांचा धर्म मुलांवर लादला जातो’ असे श्री. पानसे म्हणतात. पण त्यांनी हे लक्षात घेतलेले दिसत नाही की हा ‘धर्म’ (जो श्री. पानसे यांना अपेक्षित असावा, तो) नाकारण्याचाही अधिकार माणसाला आहे. आता श्री. पानसे यांना (आई वडिलांकडून) हिंदू धर्म जन्माने मिळाला. त्यांनी तो नाकारण्याचाच प्रयत्न ‘धर्मातीत’ होण्याच्या संकल्पनेतून केला नाही काय? हिंदू धर्मात देवाचे अस्तित्व नाकारणारा चार्वाक झाला आणि गौतम बुद्धानेही तेच केले. आधुनिक काळातही धर्म नाकारणारे (उपासना-पद्धती या अर्थाने) अनेक जण होऊन गेले. राजा राममोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, व इतर अनेकांनी धर्मात सुधारणा घडवून आणल्या हा इतिहास फार जुना नाही. म्हणजे धर्म हा बदलता आहे. त्या त्या काळाप्रमाणे वागणे हेही धर्मात अपेक्षित आहे. शाश्वत मूल्ये वगळता अनेक प्रगतिशील सुधारणा धर्मात घडवून आणल्या गेल्या आहेत व जात आहेत.
७. “धर्मकारणासाठी फार मोठा जागतिक वेळ, पैसा विनाकारण खर्च होतो आहे” या मताशी मी सहमत आहे.
८. श्री. पानसे म्हणतात की, “धर्मकल्पनेशी जखडलेल्या अवस्थेत माणसाची स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्तीच लोप पावू लागते”. असे असते तर गौतम बुद्ध, येशू ख्रिस्त, सॉक्रेटीस आणि भास्कराचार्यांपासून अनेक शास्त्रज्ञ व विद्वान पृथ्वीवर निर्माणच झाले नसते. जे. कृष्णमूर्ति, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, स्वा. सावरकर अशा अनेक विद्वानांनी आपापल्या परीने वैचारिक सुधारणा घडवून आणल्या नाहीत काय? आज भारताचे राष्ट्रपती झालेले आणि विज्ञानयुगाचे खंदे समर्थक असलेले प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हेही स्वतंत्रपणे विचार करूनच घडले नाहीत काय? (श्री. कलाम हे ‘जीवन-व्यवहार’ शिकविणारी गीता वाचतात असे वाचण्यात आले आहे.) हो, एक मात्र खरे आहे की ‘धर्म म्हणजे काय?’ हे या व्यक्तींना कळले असावे म्हणूनच त्यांनी आपली बुद्धी वापरण्याचा ‘माणसाचा धर्म’ पाळला.
९. ‘धर्मातीत’ होणे म्हणजे नेमके काय करणे श्री. पानसे यांना अपेक्षित आहे?
धर्मातीत होणे म्हणजे . . .
धर्मांचे अस्तित्व कुणीतरी कायम ठेवावे पण इतरांनी ते नाकारावे असे अपेक्षित आहे का? ‘धर्म’ ही संकल्पना फक्त उपासना-पद्धती, कर्मकांड या अर्थाने नाकारणे, म्हणजे धर्मातीत होणे का? ‘धर्म’ म्हणजेच जीवनव्यवहार असाही अर्थ आहे. मग हा व्यवहार नाकारायचा आणि मग ‘धर्मातीत’ व्हायचे का? धर्माचा माणसाच्या बुद्धिविकासाशी, मानसिक शांततेशी, आरोग्याशी असलेला संबंध नाकारणे असेही यात अपेक्षित आहे का? ‘धर्मातीत’ समाजासाठी, जगासाठी सर्वच धर्माच्या लोकांना ‘धर्मातीत’ असावे लागेल. ते शक्यतेच्या कोटीत आहे का?
• मानसशास्त्र’ हे मेंदूच्या विचारप्रक्रियेचा उलगडा करणारे शास्त्र असेल व त्याला खरोखरीच Biological वैज्ञानिक पाया असेल तर त्याच मानस-शास्त्राच्या अभ्यासातून धर्मविषयक सर्व संकल्पना नाकारणे व्यवहार्य आहे काय? अशा ‘धर्मातीत’ अवस्थेत माणसाचे मन कसे वागेल? त्यातून काही सामाजिक प्र न निर्माण होऊ शकतील का?
१०. “धर्मातीत समाजाच्या संस्थापनेसाठी आपण प्रस्थान ठेवू या’ असे श्री. पानसे म्हणतात. मुळात धर्माची व्याख्या “समाजाला धारण करतो तो धर्म” अशी आहे. म्हणजे “आज जातिभेद न मानणे, न करणे हा देखील ‘धर्म’च आहे’. धर्म हा तत्कालीन समाजाचा प्रवाह आहे, एक घटक आहे, एक रूप आहे. समाजाचे बदलते नीतिनियम, परंपरा यांना धारण करणारा धर्म नाकारणे म्हणजे अंदाधुंद समाजव्यवस्था स्वीकारायची काय? काही शाश्वत, सनातन मूल्ये वगळता समाजाच्या रूढी, परंपरा, आचार-विचार इ. जसे बदलतात तसतसे धर्माचे स्वरूप बदलत जाते. कालौघात न बदलणारे धर्माचे प्रवाह टिकणार नाहीत.
सरतेशेवटी श्री. पानसे यांनी
‘धर्म’ म्हणजे नेमके काय? धर्माची व्याख्या कोणती? ती कशीकशी बदलली आहे? धर्माचे विविध भाग वा घटक कोणते? समाज व धर्म यांचा परस्परसंबंध कसा होता? आहे? व असावा? धर्मातीत होणे म्हणजे समाजाने, समाजासाठी केलेले सामाजिक नीतिनियम नाकारणे काय? धर्मातीत समाज म्हणजे नेमके काय? अशा मूलभूत प्र नांची उकल करावी अशी विनंती आहे.
साम्यवादी देशही आज ‘धर्मातीत’ होऊ शकलेले नाहीत हे सत्य आहे. तसेच आणखीही एक छोटीशी बाब अशी की धर्माला फेकून देण्याचे, नाकारण्याचे प्रयत्न अनेकांनी यापूर्वीही केले आहेत. पण परिणाम मात्र असा दिसतो की धर्मापासून जितके दूर पळावे तितकाच तो समाजात अधिक रुजतो आहे.

जनमेजय डंके, अपर्णा, तिडके कॉलनी, नाशिक — २
सप्टेंबर महिन्याचा अंक मिळाला, तो वाचला. त्यातील लेख वाचून ज्ञानात भर तर पडलीच पण लेखकांच्या वैचारिक परिपक्वतेची जाणीव झाली. तरीही मनाला अनेक प्र न पडतात. ‘पावसानंतरचे ऊन’ हा रमेश पानशांचा लेख आवडला. धर्म असलेल्या जीवनाकडून धर्म नसलेल्या जीवनाकडे सारा समाज नेला पाहिजे हे पटते, पण धर्म नसलेल्या किंवा आ.सु.च्या लोकांची समाजाविषयीची संकल्पना माझ्या नेत्रपटलासमोर येत नाही. धर्म नसावा या मताचा मीपण आहे. पण या सर्व विचारांवर आधारित समाजाचे चित्र मला स्पष्ट होत नाही. असे अनेक लहान-मोठे प्र न मला सतत पडतात.

अनंत बेडेकर, ४७, शांतिसागर सोसा., भारतनगर, मिरज — ४१६ ४१०
‘विवेकवाद’ या विषयावर श्री. दि. य. देशपांडे यांचे आ.सु.च्या सप्टेंबर २००२ च्या अंकात (पहिला लेख) व ऑक्टोबर २००२ च्या अंकात (दुसरा लेख) जे लेख प्रसिद्ध झाले आहेत त्या संदर्भात हे पत्र.
पहिल्या लेखात विवेकवादाचे स्वरूप सांगणारे वाक्य असे —- “विवेकवादाचा गाभा म्हणजे आपण केव्हाही सत्य विधानांचाच स्वीकार करावा. ज्याची सत्यता किंवा असत्यता आपल्याला माहीत नाही असे विधान सत्य म्हणून वापरणे निषिद्ध आहे. जे सत्य आहे की असत्य आहे हे आपल्याला माहीत नाही त्या विधानाचा स्वीकार किंवा त्याग दोन्ही चूक आहेत. अशा विधानाविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल कोणतेही मत बनविणे विवेकविरोधी होईल.”
दुसऱ्या लेखातील याच संदर्भातील वाक्य (सुरुवातीचेच वाक्य) असे —- “विवेकवादाचा अर्थ, गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे त्याचा प्रधान अर्थ, कोणतेही विधान निर्णायक पुराव्यावाचून खरे न मानणे, आणि पुराव्याच्या प्रमाणात त्याच्यावर विश्वास ठेवणे. निर्णायक पुरावा असेल तर विधान पूर्णपणे स्वीकारणे आणि नसेल तर जो पुरावा असेल त्याच्या प्रमाणात स्वीकारणे.” चुकीचा आहे, हे वर नमूद दोन्ही वाक्ये काळजीपूर्वक पाहिल्यास स्पष्ट होईल. दोन्ही वाक्ये भिन्न आहेत, काहीशी परस्परविरोधीही आहेत. पहिले संपूर्ण वाक्य पाहता ‘पूर्णांशाने सत्य असेल असे विधानच स्वीकारणे हेच विवेक वादाला धरून होईल’ असा विचार श्री. देशपांडे यांना मांडावयाचा आहे असे स्पष्ट होते. म्हणजेच ज्याचा निर्णायक, निर्विवाद पुरावा आहे तेच सत्य; त्या सत्याचाच स्वीकार आणि अखेर या स्वीकारासह किंवा स्वीकारानंतर त्यावर विश्वास असा क्रम निर्माण होतो. परंतु क्र. २ च्या वाक्याचा उत्तरार्ध पाहाता ‘पुराव्याच्या प्रमाणात स्वीकार पुराव्याच्या प्रमाणात विश्वास’ असा विचार मांडला आहे. क्र. २ च्या वाक्यातील हा भाग क्र. १ च्या वाक्याशी पूर्णपणे विसंगत आहे. एकदा ‘पूर्ण सत्याचाच स्वीकार करावा’ असे म्हटल्यावर ‘कमी प्रमाणात पुरावा असेल तर कमी प्रमाणात स्वीकार’ संभवतच नाही. ज्या विधानाच्या सत्यतेकरिता निर्णायक, शंभर टक्के, पुरावा असतो ते विधान सर्वांना सारखेच लागू व बंधनकारक असते. परंतु कमी-जास्त प्रमाणातील पुरावा ग्राह्य धरून त्या त्या प्रमाणात ते विधान दोन व्यक्तींना कमी-अधिक प्रतीचा (quality) व व्याप्तीचा (quantity) वाटेल व त्यानुसार त्याच्या स्वीकारार्हतेचे व विश्वासार्हतेचे प्रमाण त्यांच्या-त्यांच्या पुरते भिन्न राहील. ही सापेक्षता विवेकवादाला मान्य असेल तर क्र. १ चे लेखातील सुरुवातीस नमूद केलेले वाक्य गैरलागू ठरते. या संदर्भात अधिक भाष्य होण्याची आवश्यकता आहे.
पुन्हा क्र. १ च्या वाक्याकडे पाहू. ‘ज्याची सत्यता किंवा असत्यता आपल्याला माहीत नाही असे विधान सत्य म्हणून वापरणे, त्याचा स्वीकार किंवा त्याग करणे, त्याविषयी अनुकूल किंवा प्रतिकूल असे कोणतेही मत बनविणे हे स्पष्टीकरण होणे आवश्यक आहे. याच विषयाच्या थोडे अधिक खोलात जाऊन विवेकवादाची व्याप्तीही स्पष्ट व्हावी. तसेच विवेकवादाला काही मर्यादा आहेत काय व असल्यास त्यांचे स्वरूप या वरही भाष्य व्हावे. अर्थात येथे श्री. देशपांडे यांनी विशद केलेला विवेक शब्दाचा ‘कठोर’ अर्थच अभिप्रेत आहे. अन्यथा विवेकवादाचा आग्रह न धरणारेही त्यांच्या त्यांच्या परीने व मते विवेकाच्या आधारेच वागत असतात आणि त्याअर्थी विवेकवादीच असतात! ‘विसंगति’ दाखवून देणारे उत्तरही दिले ही आनंदाची गोष्ट आहे. त्याबद्दल धन्यवाद .
माझ्या पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे कोणतेही वाक्य निर्णायक पुराव्यावाचून सत्य मानणे चूक आहे. पण या बाबतीत अडचण अशी आहे की गणित आणि तर्कशास्त्र यांतील वाक्ये सोडून अन्य कोणत्याही वाक्याला निर्णायक पुरावा असत नाही. गणित तर्कशास्त्र यांतील वाक्ये केवळ व्याघातनियमाने सत्य किंवा असत्य ठरतात. पण मग इतर वाक्यांच्या सत्यासत्यतेची अवस्था काय आहे? ही वाक्ये म्हणजे आनुभविक (emperical) वाक्ये. ती आपल्याला उद्गमनाने (by induction) प्राप्त झालेली असतात आणि त्या सर्वांत आधारवाक्यांत न सांगितलेली गोष्ट निष्कर्षात असते. म्हणजे ती आधारात समाविष्ट नसलेला निष्कर्ष काढतात. (काहीवरून सर्व अर्थात् मी फक्त सार्विक (universal) वाक्यांचा विचार करतो आहे.) उद्गमनाने मिळालेली वाक्ये अंशतः निराधार असतात; म्हणून ती सत्य आहेत असे आपण म्हणू शकत नाही. ती फार तर संभाव्य (probable) असतात. होईल. आपला ज्ञानविषयक व्यवहार पूर्णपणे भ्रामक आहे असे मानावे लागेल. परंतु ‘सत्य’ या शब्दाचा एक व्यापक अर्थही आहे. तो म्हणजे बहुधा सत्य, जे बहुधा सत्य असावे असे वाक्य, निःसंदेह सत्य नसलेले, पण बहुधा सत्य असणारे. म्हणून आनुभविक वाक्ये निःसंदेह अर्थाने सत्य मानता न आली तरी संभाव्य अर्थाने कमी अधिक सत्य मानावीत. ती सत्य असण्याचा संभव आहे, असे तार्किकांचे मत आहे. म्हणजे माझ्या दोन लेखांतील मतांत विसंगति नाही.
आता आपला दुसरा मुद्दा. पुराव्याच्या प्रमाणात सत्य मानायचे असे असेल तर सर्वच बाबी व्यक्तिसापेक्ष होतात. पण ते बरोबर नाही. सत्य असणे आणि सत्य असू शकणे यांतील भेद लक्षात घ्यावा. सत्य असणे आणि असत्य असणे हे वाक्यांचे विषयि-निरपेक्ष गुण आहेत. कोणतेहि वाक्य एक तर सत्य असते किंवा असत्य असते. पण कमी अधिक सत्य मानणे ही गोष्ट निर्णयसापेक्ष आहे. ते आपल्या प्रत्येकाला उपलब्ध असलेल्या पुराव्यावर अवलंबिणारे आहे. त्यामुळे एखादे वाक्य एक मनुष्य सत्य मानतो आणि दुसरा ते असत्य आहे असे म्हणतो. म्हणजे सत्य मानणे हे व्यक्तिसापेक्ष आहे. श्री. बेडेकरजी आपत्ती दाखवितात ती केवळ आनुभविक वाक्यांच्या अर्थाच्या व्यक्तिसापेक्षतेमुळे उद्भवते असे म्हणतात ती तर आजही आहेच.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.