पत्रसंवाद

सप्टेंबर व ऑक्टोबरच्या अंकांवरील माझ्या प्रतिक्रियांची भेळ खाली सादर करत आहे.
विवेकवाद : दि. य. देशपांडे यांनी ‘अनुभवावर आधारलेले सत्य आणि वैध अनुमानाने जाणलेले सत्य’ अशी दोन प्रकारची सत्ये सांगितली आहेत. आकलनाने जाणलेले सत्य हा एक तिसरा प्रकार दिसतो. नवीन ज्ञान तार्किक पद्धतीने उत्पन्न होत नसून ते आकलन पद्धतीने जन्म घेते असे म्हणणाऱ्यांचा एक पक्ष आहे. त्यात आइनस्टाइनही येतात. याविषयी बरीच चर्चा “INTUITION – The Immer Story (Ed. Floyd & Avidson)” या ग्रंथात आहे. रामनुजन या प्रसिद्ध भारतीय गणितज्ञाविषयी त्याच्या मार्गदर्शकांनी म्हटले आहे, रामानुजन् यांना गणितातील नवनवीन सत्यांचे आकलन होत असे पण ती सत्ये तार्किक पद्धतीने सिद्ध करण्याची कला त्यांना अवगत नव्हती. तार्किक पद्धतीविषयी प्रा. टेलरही थोडे नाराज आहेत. ते म्हणतात : “Modern reason tends to be understood no longer substantively but procedurally.”
शिक्षण: Electronic माध्यमांद्वारा शिक्षण देण्याने फारसे विशेष काही साधत नाही असा तज्ज्ञांचा अभिप्राय श्री संगवई (अंक १३.६) यांनी उद्धृत केला आहे तो एका दृष्टीने प्रसार-माध्यमाद्वारा शिक्षण या कल्पनेला पोषक आहे. कप अर्धा भरलेला की अर्धा रिकामा असा हा प्र न आहे. विशेष काही साधले जात नाही याचाच अर्थ असा होतो की जवळपास बरोबरीने साधले जाते. बाजारू T.V. चे दुष्परिणाम होतात म्हणून शैक्षणिक T.V. चा उपयोग होणार नाही असे म्हणता येत नाही. शिक्षणशास्त्राच्या मूळ सिद्धान्तांना धरूनच या साधनांचा उपयोग केला पाहिजे व तसेच शिक्षणतज्ज्ञांचेही मत आहे. Teaching and Learning Online (Ed : John Stephenson) या ग्रंथात सुरुवातीलाच म्हटले आहे की “Online education has to be based on pedagogic fundamentals.” प्रत्यक्षात मी बरेच वर्षांपूर्वी T.V. वर Binomlal Theorum वर एक पाठ ऐकला होता तो मला खूपच आवडला होता. संगवईंच्या लेखात अनेक मूल्यवान वाक्ये आहेत, त्यांच्याशी मी सहमत आहे. ती वाक्ये अशी : (१) सध्याच्या दृकश्राव्य माध्यमांच्या माऱ्यामुळे अनेक प्रकारची “न खरीदता येणारी श्रीमंती आपण गमावतो”, “कोणत्याही विषयाचे सपाटीकरण व Trivialisation होत जाते. (२) आपले आतून तयार होत जाणे, लख्ख आकलन व अभिव्यक्ती असणे . . . ती क्षमता वाढणे आणि हे सर्व कशासाठी याचे भान असणे, ही प्रगती, हे ज्ञान, हे शिक्षण आहे.” ही सगळी मोलाची वाक्ये आहेत. पारंपारिक शिक्षणात तरी इतके उच्च आदर्श किती पाळले जातात हा प्र नच आहे. प्रसारमाध्यमातून दिलेल्या शिक्षणाकडून इतकी उच्च अपेक्षा खात्रीने करता येत नाही. पण शिक्षणाची गुणवत्ता राखणे जितके महत्त्वाचे आहे तितकाच शिक्षणाचा प्रसारही महत्त्वाचा आहे. त्या प्रसारासाठी, पारंपारिक शिक्षणपद्धतीच्या जोडीला Distant Education ची पद्धतही रूढ झाली आहे. ती रद्द करावी असे कोणी म्हटलेले नाही. त्या क्षेत्रात संगणक–महाजालामार्फत किंवा प्रसारमाध्यमांमार्फत शिक्षण द्यायला खात्रीने वाव आहे. उत्क्रान्ती, धर्म, संस्कृती वगैरे : आज काय करायला हवे हे ठरवण्याकरता इतिहासात जायची गरज नसते. तेव्हा रामचंद्र गुहा, माधव गाडगीळ आणि सुभाष आठले यांनी उत्क्रान्तीच्या इतिहासाचा जो आढावा घेतला आहे त्यात मी शिरू इच्छीत नाही. हिंदू समाजाची सध्या जी अवनत स्थिती आहे तिच्यातून वर कसे यायचे याचा हिंदुत्ववाद्यांनी विचार केलेला नाही अशी माझी पूर्वीपासून तक्रार आहे व तसे उत्तर मी स्वतंत्रपणे उषा गडकरी यांना पाठवले आहे. मुस्लिम तुष्टीकरण हे एक टोक असेल तर “We and our nationhood defined’ या एकेकाळी हिंदुत्ववाद्यांनी प्रसृत केलेल्या अनौरस पुस्तका-पासून ते नरेंद्र मोदींपर्यंत चालत आलेला मुस्लिमद्वेष हे दुसरे टोक आहे असेही त्यांना लिहिले आहे.
आज अस्तित्वात असलेल्या भांडवलशाहीचे अनेक दोष अनेकांनी दाखवले आहेत पण पर्यायी समाजव्यवस्था कशी असू शकते ते अजून कोणी स्पष्टपणे दाखवलेले नाही, तेव्हा नवी समाजव्यवस्था फार हळूहळूच येईल. “slow is beautiful’ (आ.सु. ९/२००२, पृ. २०८) हे तत्त्व इथे मान्य होईल का? भांडवलशाहीला उचलून धरणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यांना शक्ति मिळते व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्त्वातून. प्रसारमाध्यमांचा मारा दुहेरी पद्धतीने पोसला जातो. एकतर प्रसार करण्याचे स्वातंत्र्य आणि दुसरे म्हणजे त्या प्रसारमाध्यमाला आसरा देणाऱ्याचे स्वातंत्र्य. T.V. किती बघायचा संगणक महाजालात किती अडकायचे याविषयीच काय पण दारू किती प्यावी, तंबाखू किती ओढावी किंवा मादक द्रव्ये किती टोचून घ्यावी याबद्दल व्यक्तिस्वातंत्र्यवादी म्हणतात की आमच्या हिताचे काय ते आम्हाला ठरवू द्या. इतरांचा चोंबडेपणा कशाला हवा! आपली मते मांडण्याचे स्वातंत्र्य आपल्यालाही आहे म्हणून ते मांडायचे एवढेच.
भ. पां. पाटणकर, ३-४-२०८ काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७

आ.सु.मध्ये एप्रिल २००२ पासून माधव गाडगीळ आणि रामचंद्र गुहा यांच्या ‘धिस फिशर्ड लँड’ या पुस्तकाचा संक्षेप क्रमशः प्रसिद्ध होतो आहे. त्यात मांडलेले खालील विचार पटत नाहीत.
(१) “संकलकांकडे संयमी, काटकसरी वृत्ती असते.” जून २००२.
(२) “निसर्गपूजक मनोवृत्ती हिशोबी, विवेकी असते.” मे २००२.
(३) “पर्यावरणाला स्थैर्य देण्यात वैज्ञानिक दृष्टिकोनापेक्षा निसर्गपूजक मनोवृत्ती अधिक कार्यक्षम आहे.” मे २००२ + जून २००२
(४) “यहुदी, ख्रिस्ती, इस्लामी धर्म गुराखी संस्कृतीतून आलेले असल्यामुळे वाईट आहेत.’ मे २००२.
(५) “पर्यावरणवादी जीवनशैली चांगली आहे.” सप्टेंबर २००२. न पटण्याची कारणे : १. या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठी मला मूळ लेखातसुद्धा पुरावा सापडला.
(अ) ऑक्टोबर २००२ अनुसार दहा हजार वर्षांपूर्वी बबून माकड, हिप्पो (मॅमथ आणि सेबर टूथ वाघसुद्धा) इ. प्राणी मानवाने संपवले. मानव तेव्हा संकलक अवस्थेतच होता, तरीसुद्धा संसाधनांबाबत ‘संयमी, काटकसरी, विवेकी’ इ. वृत्ती नव्हती.
(ब) एप्रिल २००२ च्या लेखांकामध्ये गढवालच्या गोपेश्वर गावाचा उल्लेख आहे. वस्तू गोळा करणारे लोक राई आणि आजूबाजूच्या भागात संकलकांसारखे वागतात. तरीही पारंपारिक बंधने फक्त राईपुरतीच पाळली जातात, आणि इतर सर्व संसाधनांचा बिनदिक्कतपणे नाश केला जातो. त्यावरून असे सिद्ध होते की परंपरेचा वापर लुटूपुटूची, भ्रामक बंधने घालून दिशाभूल करण्यापुरताच केला जातो. यात काटकसर किंवा संयमापेक्षा चटावरील श्राद्ध करण्याची वृत्ती दिसते. परंपरेमधून पळवाटा काढल्या जातात. आर्थिक सामाजिक हितसंबंधावर परंपरा नियंत्रण ठेवू शकत नाहीत.
(क) माझ्या मते संकलक समाजाची अहिंसा ही जेत्याची अहिंसा नसून जिताची अहिंसा असते. निसर्गाचे शोषण करण्याची त्यांना क्षमताच नसते. काटकसर करणे हा अगतिकतेचा भाग असतो.
(ड) उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर झाला पाहिजे याबाबत दुमत नाही. परंतु मानवाच्या (आणि मानवाच्या हितासाठी उपलब्ध संसाधनांच्या) दीर्घकालीन रक्षणासाठी उपलब्ध संसाधनांचा वापर उपलब्ध ज्ञानाच्या मर्यादेत ‘योग्य’ आहे किंवा कसे? ह्याचा निर्णय वैज्ञानिक आणि विवेकी मनोवृत्तीतूनच करता येतो. किंबहुना कोणतीही चर्चा वैज्ञानिक आणि विवेकी भूमिकेतूनच करता येते.
२. पूजा करण्यात अज्ञानावर आधारित भीती असते. झाड, राई, तळे किंवा अग्नि, वरुण, इंद्र या साऱ्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्यांची पूजा करीत. हा हिशोब चुकीचा आणि अविवेकी असल्याचे मी सांगण्याची गरज नाही. त्यातून नेहमीच पर्यावरण-रक्षण निष्पन्न होईल अशी अपेक्षा विवेकी लोकांनी ठेवणे चूक आहे. निसर्गात आपोआप निर्माण होणाऱ्या वस्तू (अत्यल्प प्रमाणात) गोळा करून जेवढे जमेल त्यावर गुजराण करणे आज शक्य नाही.
३. या विधानाचा प्रतिवाद करण्यासाठीसुद्धा मला मूळ लेखातसुद्धा पुरावा सापडला.
(अ) मे २००२ मधील लेखांकात निसर्गपूजक विचारप्रणालीने मांडलेले, पर्यावरणाचे संरक्षण आणि पुनर्नूतनीकरण करणारे निर्बंध नमूद केलेले आहेत. ते निर्बंध नमूद करण्यामागे ते निर्बंध विवेकी असल्याचे प्रमाणपत्र मिळवण्याचा लेखकांचा हेतू आहे. याचाच अर्थ लेखकांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून असे निर्बंध योग्य असल्याची खात्री करून घेण्याची आवश्यकता वाटते. असे असताना लेखकांनी “वैज्ञानिक निर्बंध फसतात’ या विधानाने दिशाभूल करणे अयोग्य आहे.
(ब) अधिक कार्यक्षम समाज कमी संसाधनांमध्ये अधिक उत्पादन करू शकतो. कमी जमिनीत शेती करू शकत नसणारे समाज भटकी शेती करतात. त्यांच्या गरजा लोकसंख्येच्या मानाने असायला हव्या त्याहूनही कमी असल्यामुळे त्यांच्याकडून निसर्गाला धक्का बसत नाही हे खरे असले तरी ती आदर्श स्थिती नाही. प्रत्येक सजीव आजूबाजूच्या निसर्गावर ताबा मिळवण्यास बघतो. त्यात चूक किंवा वाईट काही नाही. प्रवाहपतित होऊन उत्क्रांतीच्या Survival of the fittest (बळी तो कान पिळी) या तत्त्वाला चालू देऊन नामशेष (किंवा नावही न उरलेल्या) सजीवांच्या यादीत स्वतःचे नाव जाऊ देणे मूर्खपणा आहे. स्वतःचा fitness दाखवलाच पाहिजे. उलट यशस्वी परोपजीवींची वैशिष्ट्ये आत्मसात करणाराच उच्च म्हटला जातो. यशस्वी परोपजीवी त्याच्या यजमानाला जास्तीत जास्त काळ जिवंत ठेवतो. त्याच्यावर प्रेम करत नाही. ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या कटु वास्तवाला सामोरे जाणे आवश्यक आहे.
(क) “वैज्ञानिक माहिती परिपूर्ण नसते”, “सजीव सृष्टीच्या अपार गुंतागुंतीत ढवळाढवळ करण्याची आणि तरीही संसाधने टिकवण्याची क्षमता विज्ञानात नाही, मात्र संकलक समाजांमध्ये तशी क्षमता आहे.” ही वाक्ये अर्धसत्य आहेत. आदिवासींची माहिती (वैज्ञानिक माहितीपेक्षाही) मर्यादित असल्याचे मे २००२ च्या लेखांकात दिले आहे. वाढलेल्या गरजा (संख्यात्मक आणि गुणात्मक) हे ध्येय (लाजिरवाणे नव्हे!) नि चत केल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जंगलांचे शोषण/दोहन करणे हाच प्राप्त परिस्थितीत सर्वोत्तम (त्याला necessary evil म्हणा) पर्याय उरतो. तसेच “ढीगभर अभ्यासापेक्षा अपुऱ्या माहितीवरील . . . वि लेषणे विषयांना जास्त पुढे नेतात”, हे मार्कब्लॉक यांचे मत लेखकद्वयांनीच नमूद केले आहे. तेव्हा फक्त वैज्ञानिक ‘अपुरेपणाबाबत’ बोटे मोडावयाची गरज नाही. ४. हे अर्धसत्य आणि दिशाभूल करणारे आहे. ऑक्टोबर २००२ च्या लेखांकात नमूद केलेल्या खांडववन जाळण्याच्या कथेवरून त्या काळातील शेतकरी समाजव्यवस्थाच दिसते. एकूण लेखावरून शेतकरी समाज पर्यावरणासाठी गुराखी समाजापेक्षा अधिक वाईट असतो. म्हणजे भूक्षेत्राचे वाळवंटीकरण (हा लेखकांचा शब्दप्रयोग आहे) करण्यास कृष्ण, अर्जुन, ब्राह्मण, ऋषि आणि किंबहुना सर्वच हिंदू धर्माचाही विरोध नाही. त्यामुळे त्यांच्यात आणि “जिवंत रचनांना पावित्र्य बहाल न करणाऱ्या (गुराखी समाजातील) यहुदी. ख्रिस्ती आणि इस्लामी” (मे २००२) धर्म यांच्यात फरक नाही. ईशान्येकडील समाज ख्रिस्ती झाले किंवा कृष्णाचे अनुयायी झाले काय, मनोवृत्तीत फरक संभवत नाही.
५. (अ) पर्यावरणवादी जीवनशैली जैविक विविधतेच्या साठ्याचा (हा लेखकांचा शब्दप्रयोग आहे) उपयोग स्पष्ट करत नाही. जैविक विविधतेमुळे अन्नसाखळी मजबूत बनते. त्यामुळे पर्यावरणातील, प्रचलित विज्ञानाला अज्ञात घटकांवर होणारे, औद्योगिक समाजाचे दुष्परिणाम माणसापर्यंत पोचत नाहीत. जैविक विविधता ही काही शोकेसमध्ये ठेवण्याची गोष्ट नव्हे. त्याचा मानवाला फायदा व्हावा म्हणूनच त्याचे पोषण केले पाहिजे. हे सारे वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच शक्य आहे.
(ब) मे २००२ अनुसार लेखकद्वयांच्यामते पा चात्त्य देशांमध्ये तर यहुदी, ख्रि चन आणि इस्लामी या गुराखी, (= क्र. २ ची समाजव्यवस्था) लुटारू धर्मांची परंपरा आहे. मग पा चात्त्य पर्यावरणवादी जीवनशैली (= क्र. ५ ची समाजव्यवस्था) सप्टेंबर २००२ मध्ये कोणत्या परंपरेबद्दल अभिमानी आहे?
संकलक, गुराखी, शेतकरी, भांडवलदार, वसाहतवादी, किंवा हिंदू, यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मांचे अनुयायी आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी तेवढ्याच क्रौर्याने वागतात. भारतातील अतिविकेंद्रित अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हितसंबंधीयांना सर्वसाधारणतः अत्याचार करण्याची गरजच भासली नाही. कारण प्रचंड राजकीय उलथापालथ झाली तरीसुद्धा गावगाड्याची अर्थव्यवस्था अबाधित राहत असे. पण गावगाड्याच्या अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न करणाऱ्या बौद्ध-विहारांवर हल्ले झाले. वेद/मंत्र नुसते ऐकणाऱ्या शूद्रांच्या कानात शिशाचा रस ओतला जाई. नामांतर प्रकरणी मराठवाडा आणि इतरत्र दलितांवर अत्याचार करण्यात ‘सहिष्णु’ हिंदू धर्मातील सवर्णांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आढळतात. “यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मांमध्ये जिवंत रचनांना पावित्र्य बहाल केले जात नाही’, अशी टीका करणाऱ्यांनी माणसांना जिवंत जाळणाऱ्यांवर अधिक प्रखर टीका करावी. हिंदू, यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लामी धर्मांमध्ये फरक करणे किंवा असा आभाससुद्धा होऊ नये म्हणून पुरेशी खबरदारी न घेणे चूक आहे. आजच्या Surcharged atmosphere मध्ये विचारवंतांनी आपली जबाबदारी नीट पार पाडावी.
[या पत्राची प्रत डॉ. माधव गाडगिळांकडे प्रतिक्रियेसाठी पाठवली आहे. पण इथे हेही नोंदायला हवे की निखिल जोशी अवतरणचिन्हांमध्ये जी वाक्ये घालतात, ती मूळ लेखांमध्ये नाहीत, तर जोशींनी केलेल्या गोषवाऱ्यासारखी आहेत—-आणि असे करण्यातील ‘अन्याय’ आणि धोके समजून घ्यायला हवे! —- संपादक]
आ.सु. सप्टें. २००२ च्या अंकातील श्रीधर दामोदर मेहेंदळे यांच्या पत्रातील एक आक्षेपार्ह वाक्य माझ्या पहाण्यातून निसटले होते.
‘मानवाच्या पाहण्याचा electron beam वर परिणाम होतो असे ‘नेचर’मध्ये छापले आहे.’ या मेहेंदळेच्या विधानाला माझे प्रथमदर्शनी ४ आक्षेप आहेत. (१) पाहणे ही Input क्रिया आहे. पाहताना डोळ्यात प्रकाश शिरतो—-बाहेर पडत नाही. (२) डोळ्याला electron दिसत नाही. यात resolution आणि तरंगलांबी या दोन अडचणी असतात. (३) कोणीही पाहत नसताना electron beam कशी वागते तेच जर मानवाला अगम्य असेल तर, ‘पाहण्याने त्यात काय बदलले?’ हा प्र न निरर्थक आहे. (४) पाहणे या क्रियेचा शब्दशः अर्थ घेतला नाही तर मात्र मेहेंदळेंनी नमूद केलेली घटना हायझेनबर्गचे अनि िचतता तत्त्व (uncertainty principle) म्हणून ओळखली जाते. त्यात काहीही आधिभौतिक नाही.
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) ४१० १०१

सर्वसाधारणपणे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यापासून, “भारतात ख्रि चन जबरदस्तीने बाटवाबाटवी करीत आहेत”, असा ओरडा सुरू झाला आणि चर्च व धर्मगुरूंवर हल्ले सुरू झाले. ह्या धर्मांतराबद्दल स्वामी विवेकानंद, खंड ८, पान ३३० वर म्हणतात, “धर्मांतर धाकदपटशाने होते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. धनिक आणि पुजारी ह्यांच्या जुलूमापासून मुक्तता करून घेण्यासाठी लोक धर्मांतर करतात.’ मी स्वतः आगरकरवादी आहे. आगरकर म्हणतात, “मी कसे वागावे हे सांगण्याचा अधिकार पूर्वीच्या धर्मसंस्थापकांना कोणी दिला? एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे म्हणजे एका जोखडातून दुसऱ्या जोखडात जाण्यासारखे आहे.”
टाईम्स ०४–०२–१९९९ अनुसार नि चनांची लोकसंख्या गेल्या ५० वर्षांत वाढलेली नाही. तसेच त्यांनी दंगे केल्याचेही पुरावे नाहीत. उलटपक्षी १९९१ जनगणने-नुसार २.५३ करोडवरून त्यांची लोकसंख्या २.०६ करोड झाली आहे. बौद्ध आणि ख्रि चन धर्मात हिंसा सांगितलेली नाही. इंग्लंडमध्ये कोणताही राजा पहिल्या राजाला मारून गादीवर आलेला नाही. ख्रि चन लोक धार्मिक कारणांसाठी वेळ घालवीत नाहीत. [हे विवाद्य आहे —- संपादक] जगातले वैज्ञानिक शोध बहुतांशी ख्रि चनांनीच लावले आहेत. वाचकांनी हा सर्व विचार आणि आकडेवारी ध्यानात ठेवावी.
केशवराव जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) ४१० १०१

आपल्या नोव्हें. २००२ च्या अंकातील श्री. मधुकर कांबळे यांचा लेख वाचला. त्यांतील “दलित/आदिवासी यांना हिंदू मदरशामध्ये शिक्षण’ या मथळ्याखालील मजकुराबद्दलच मी माझी मते येथे व्यक्त करीत आहे. श्री. कांबळे यांनी दलित/आदिवासी यांच्या जिहादी शिक्षण देण्यासंबंधांत ‘विद्याभारती’ या संस्थेचा उल्लेख केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे ‘विद्याभारती’ही खास दलित/आदिवासींसाठी आणि तेही हिंदू जिहादी शिक्षण देण्यासाठी काम करते हे खरे नाही. केवळ आदिवासी मुलामुलींचे शिक्षण आणि त्यांना वनवासी म्हणणे यांच्या उल्लेखावरून श्री कांबळे यांना वनवासी कल्याण आश्रमाबद्दल लिहायचे असावे असे वाटते. मी स्वतः व. क. आ. या संस्थेचा एक कार्यकर्ता म्हणून गेली काही वर्षे काम करीत आहे. म्हणून खालील मुद्द्यांवर खुलासा करीत आहे.
व. क. आश्रम महाराष्ट्रांत गेली २०-२२ वर्षे कार्यरत आहे व. क. आ. आश्रमशाळा चालवीत नाही. तर शिक्षणसाह्याचा एक भाग म्हणून १८–१९ वर्षे वसतीगृहे चालवीत आहे. त्याद्वारे दरवर्षी ८०० ते ९०० अंतर्भागांतील वनवासी मुले मुली येथे राहून स्थानिक (सरकारी किंवा खाजगी) शाळांतून शिक्षण घेतात. व. क. आ. च्या महाराष्ट्रांत फक्त दोन आश्रमशाळा आहेत. त्याही सरकारी किंवा स्थानिक आग्रहामुळे! तेव्हा शाळांतून जिहादी शिक्षण देण्याचा प्र नच उद्भवत नाही. या वसतीगृहातील दिनक्रम पाहिला तर तेथील शिस्त, स्वच्छता, व्यायाम, अभ्यास, भारतातील थोर प्रसिद्ध व्यक्तींची माहिती देणे इ. संस्कारक्षम वातावरणाची कोणीही प्रशंसा करील. येथे शस्त्रशिक्षण, हिंसा, निंदा अशा गोष्टींना थाराही नाही. उलट संपर्क, समन्वय, संस्कार, प्रेम यांवरच भर दिला जातो. श्री. कांबळे लिहितात त्याप्रमाणे संस्कृती, देशाभिमान यांवर भर असतो व भिंतीवर हिंदू वीरांच्या व महनीय व्यक्तींच्या तसबिरी असतात; त्यांना फुलांच्या माळा घालतात हे सर्व खरे! पण यांत गैर काय आहे? डॉ. हेडगावारांसारख्या महान देशभक्ताची आणि वंदनीय पुरुषाची तसबीर लावून त्याला हार घालणे श्री. कांबळे यांना निषिद्ध का वाटावे? ते केवळ हिंदू आहेत म्हणून? तसे असेल तर ते स्वतः सेक्युलर नाहीत आणि लोकशाहीही मानत नाहीत असेच म्हटले पाहिजे. शालेय शिक्षणांत साहाय्य हा व. क. आ. च्या वनवासींच्या विकास-कार्याचा एक भाग आहे. कारण त्याशिवाय शेतीशिक्षण, बचतयोजना, खेलकूद, वैद्यकीय सेवा असे विविधांगी प्रकल्प चालू आहेतच.
आता वनवासी शब्दाविषयी! आदिवासी म्हणजे मूलानिवासी (Tribal किंवा Aboriginals). ब्रिटिश कालापासून त्यांना हीन संबोधून तो एक फूट पाडण्याचा प्रयत्न होता. जसे शहरवासी वा ग्रामवासी असे राहण्याच्या स्थानावरून संबोधतात तसेच जंगलात राहाणारे वनवासी! एरवी त्यांच्यात व अन्य समाजांत काही फरक नाही. म्हणून एकत्वाच्या व प्रेमाच्या भावनेने त्यांना व. क. आ. ने प्रथमपासूनच (म्हणजे १९५२ मध्ये मध्यप्रदेशात काम सुरू झाल्यापासून) वनवासी म्हणून जवळ केले. एकाद्या उपेक्षित गटासाठी कर्तव्यभावनेने आणि प्रेमाने काम करावयाचे म्हटले म्हणजे दूरत्वाचे सर्व संदर्भ पूर्णपणे मिटवले जाणे आवश्यक आहे असे मला वाटते. वनवासी म्हणण्यामागे एवढा सरळ सोपा अर्थ आहे.
आता आदिवासींना ते हिंदूच आहेत असे शिकवण्याच्या कांबळे यांच्या आक्षेपा-विषयी! भारतातल्या अनेक समाज-घटकांची वा समूहांची आपापली स्नाथिक जीवन-पद्धती, पूजापद्धती, उत्सव, नृत्ये, चित्रकला, संगीत या विषयांत वैशिष्ट्ये असतात. तशीच वनवासींच्या विविध जनजातींचीही वैशिष्ट्ये आहेत. या सर्वांचा व. क. आश्रम नेहमीच आदर करीत असतो व त्यांना ते संचित राखण्यासाठी प्रोत्साहनही देत असतो. वनवासी हे प्रकृतिपूजक आहेत. हिंदूमध्येही प्रकृतिपूजा अन्य पूजाव्यवहाराप्रमाणे आचरली जाते. वृक्ष, पशुपक्षी, सूर्य चंद्र, डोंगरनद्या असे अनेक पूजा-सणवारांचे विषय समान आहेत. त्यामुळे अनेक वनवासी समूहांना जवळीक, आपुलकी वाटते. अशा वेळी अनेकांना हिंदू म्हणून घेणे आवडते व ते स्वतः होऊनच विधिपूर्वक हिंदू होण्यासाठी पुढे येतात. हे त्यांचे एक प्रकारे स्वगृही येणेच असते. अन्यथा लालूच दाखवून वा बळाने आदिवासी समाजाचे धर्मातर करण्याचा प्रयोग आज भारतांत (विशेषतः पूर्वांचलात) शतकानुशतके चालू आहेच. त्याला कायद्याने काही राज्यात बंदीही आहे. तेव्हा त्याची याच्याशी तुलना करणे निव्वळ खोडसाळपणाचे आहे.
‘न्यूयॉर्क टाईम्स’ मध्ये आलेल्या लेखाच्या आधारे मतप्रदर्शन वा शेरेबाजी करण्याऐवजी श्री कांबळे यांनी स्वतः या विषयांत (आदिवासी विकास) विकासकार्य करणाऱ्या संस्थांचे कार्य सकारात्मक दृष्टीने आणि पूर्वग्रह न ठेवता पाहावे. ते जोपर्यंत देशविघातक नाही तोवर लोकशाहीवर विश्वास ठेवून त्याकडे सहिष्णुतेने पाहावे. व. क.
आ. मध्ये शस्त्र-शिक्षण, हिंसा, द्वेष, दंगली करणे या विषयांत कोणतेही शिक्षण दिले जात नाही.
एकाद्या कलापूर्ण चित्रावर रेघोट्या मारणे जेवढे सोपे तेवढेच उत्तम चित्र काढणे व त्यांत रंग भरणे अवघड असते. व. क. आ. चा प्रसार १९५२ पासून सर्व राज्यांत झाला आहे त्याचे कारण तो सकारात्मक प्रेमावर आधारित आहे. द्वेषावर नव्हे!
गजानन केळकर, 17, Prafulla, 14 G Pasta Rd, Dadar, Mumbai – 400 014

मी आ.सु.चा नियमित वाचक आहे. आजपर्यंत त्यातील विचारांकडे दुर्लक्षच केले पण आता जाणवते की त्यातील अनेक आग्रह हे दुराग्रहाच्या पातळीवर पोहोचले आहेत म्हणून नोव्हेंबर २००२ च्या अंकाचे परीक्षण पाठवित आहे. या संपादकीयात आ.सू.ची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातील पहिले प्रमेय भारतातील धर्मांतर हे खालच्या जातींनी स्वखुशीने केले असे आहे. ह्या विधानास इतिहासात आधार नाही. सीरीयन ख्रि चन व ज्यू इ.स.च्या सुरुवातीला भारतात आले. त्यांना कोणीही त्रास दिला नाही. पोर्तुगिजांनी ख्रिस्ती धर्म इन्क्विझिशन सारख्या क्रूर कृत्यांनी वाढविला. अमेरिकेतही तेच केले. सिंधपासून केरळापर्यंत मुसलमानी अत्याचारानेच धर्मांतर झाले, तेही सर्व जातींचे झाले हे सत्य आहे. खालच्या जातीच फक्त मुसलमान झाल्या असत्या तर किती महारांनी किंवा तत्सम जातींनी धर्मांतर केले ते सांगावे. सत्याचा अपलाप करू नये. आणि धर्म बदलून जात जाते हे कोणी सांगितले? मुसलमानांत व ख्रिस्त्यांमध्येही जातिभेद आहेत.
कोणच्याच धर्माची गृहीतके तपासून बघता येत नाहीत हे म्हणणेही बरोबर नाही. ख्रिस्ताला न मानणारे नरकात जातील हे वचन प्रसिद्ध आहे. इस्लाम न मानणाऱ्यांविरुद्ध जिहाद करा, त्यांना ठार करा हे आदेश प्रसिद्धच आहेत. या दोन्ही धर्माची मूळ गृहीतकेच चुकीची व समाजविघातक होती व आहेत. तुम्ही मात्र या शिकवणुकीकडे काणाडोळा करून केवळ हिंदूनाच झोडपण्यात धन्यता मानत आहात.
हिंदुत्वाचा अभिमान बाळगल्यामुळे दंग्यांना सुरुवात होते हे विधानही चौकशी कमिशनचे अहवाल वाचल्यानंतर टिकणारे नाही. दंग्याला सुरुवात जिहादी वृत्तीतून होते हे सत्य आहे. अशी चुकीची व असत्य गृहीतके आ.सु.च्या सर्वच लेखात आढळतात. त्याचे कारण रा. सुधाकर देशमुखांच्या प्रत्रसंवादात सापडते. (पृ. ३१८). विज्ञानाच्या अभ्यासामुळे लॉजिकची भरपूर कसरत होते. परंतु कलाशाखेने लॉजिककडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या लिखाणात शब्दांचा फुलोरा असला तरी तर्कशून्य व दुर्बोध विचार बऱ्याच प्रमाणात दिसतात. त्याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
गुहा गाडगीळांनी जातिव्यवस्थेमुळे निसर्गाचे संयमी दोहन कसे होते त्याचे उत्तम उदाहरण दिले आहे. तरीपण जाती नष्ट व्हाव्यात हा तुमचा धोशा कायम आहे. आज पर्यावरणाची समस्या नाही का? अशीच विसंगती कांबळ्यांच्या लिखाणात आहे. मदरसे जिहादचा प्रसार कसा करतात त्याचे वर्णन करून लगेच विद्याभारती तेच करते असे ते ठोकून देतात. पुरावा काहीच नाही. न्यूयार्क टाइम्सात लिहिले. म्हणून तुम्ही पुरावा न मागताच छापावे. बराकंची व्यापारी गणिते चांगली सोडवली आहेत पण तीच पद्धत वापरून बंद गिरण्या चालू करण्याचा विचारच नाही.
मुस्लिम समाजात पुरोगामी विचार रुजतच नाहीत ही गेल्या शंभर वर्षाची वस्तुस्थिती आहे. त्याला संघ कसा जबाबदार? आवट्यांजवळ काही पुरावा आहे. DNA चा शोध १९८५ चा. त्यावर संशोधन चालू आहे. त्या आधीच भारतीयांत युरोपीय गुणसूत्रे आवट्यांना कुठे आढळली? युरोप तरी एकसंध आहे का? नॉर्डिक, स्लाव्ह, रोमन, ग्रीक वेगवेगळे नाहीत का?
फिरोझ रानडे संघाला आव्हान देतात. ठाकरेंना का नाही? त्यांच्यावर खटला का नाही भरत? ब्रिटिश काळातील सैन्याचा पोशाख संघाने स्वीकारला हेही त्यांना माहीत नाही. संपूर्ण वंदेमातरम् संघपरिवारच म्हणतो हे ठाऊक नाही.
सत्य पुरावे, माहीत नसताना सर्वच लेखक ठोकून विधाने करतात, तुम्ही छापता, सगळ्याचा लसावि एकच, हिदुद्वेष. तथास्तु.
[फडक्यांची विधाने त्यांना वाटतात तेवढी ‘निर्विवाद’ सत्ये नाहीत. पण एकदा का लसावि काढला की इतरांचे ते ‘ठोकून देणे’ आणि आपले ते सत्य, असा भावच शिल्लक राहतो. मग पर्यावरणाचा प्र न सोडवायला जाती टिकवायचा मोह होतो! हे विवेक थांबल्याचे लक्षण नव्हे काय? – संपादक
पु. नी. फडके, S-15, Bharatnagar, Nagpur – 440 001

डिसेंबर २००२ च्या अंकात श्री. दि. य. देशपांडे यांनी श्री अनंत बेडेकर याच्या पत्राला उत्तर देताना गणित शास्त्र आणि तर्कशास्त्र या विषयांच्या प्रकृतीबाबत जे विधान केले आहे. त्या संदर्भात या पत्राचे प्रयोजन. श्री. देशपांडे यांनी केलेले विधान असे.
“गणित आणि तर्कशास्त्र यातील वाक्ये सोडून अन्य कोणत्याही वाक्याला निर्णायक पुरावा असत नाही. गणित, तर्कशास्त्र यातील वाक्ये केवळ व्याघात नियमाने सत्य किंवा असत्य ठरतात.”
वरील वाक्यातील केवळ ह्या शब्दाच्या वापरावर माझा आक्षेप आहे. केवळ ह्या शब्दामुळे गणित आणि तर्कशास्त्र यांतील वाक्यांची सत्यासत्यता ठरवण्यासाठी व्याघात नियमाव्यतिरिक्त इतर कोणतीही पद्धत वापरात नाही असा होतो. माझी खात्री आहे की श्री दि.य. देशपांडे यांना हा अर्थ अभिप्रेत नसावा.
‘सत्य’, ‘असत्य’ निर्णायक आणि पुरावा या शब्दांच्या अर्थाविषयीच्या वादांत मी पडू इच्छित नाही. परंतु येथे ख्यातनाम इंग्लिश तत्त्ववेत्ता आणि गणिती बर्टरँड रसेल याच्या गणितशास्त्राच्या प्रकृतीविषयीच्या एका विधानाकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. ‘In mathematics we do not know what we are talking about nor whether what we are saying is true or false’ गणित हे आपल्याला सृष्टीविषयीच्या सत्यांचा बोध करून देणारे एक अत्यंत प्रभावशाली माध्यम आहे असा विश्वास यूरोपातील सर्वच विचारवंताना वाटत होता. यूरोपीय तत्त्ववेत्ता इम्यान्युएल कांट ह्याची खात्री होती की युक्लिडच्या भूमितीतील प्रमेये आपल्या सभोवतालच्या अवकाशाच्या गुणधर्मांचे हुबेहूब प्रतिबिंबन करतात. यूरोपीय विचारवंताच्या मानसावर कांटच्या तत्त्वज्ञानाचा इतका प्रचंड पगडा होता की कांटच्या मताला विरोध करण्याची कुणालाही हिंमत होत नसे. गॉस ह्या महान गणितीचीही कांटच्या मताच्या विरोधात असलेले भूमितिविषयातील मूलभूत संशोधन लोकांसमोर मांडण्याची हिंमत झाली नाही. जवळजवळ ३५ वर्षे गाँसने केलेल्या या संशोधनाविषयी जग अंधारात राहिले.
युक्लिडच्या भूमितीतील एक प्रमेय गृहीतक स्वरूपात असे मांडता येईल : प्रत्येक त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८०० (किंवा दोन काटकोन) असते.
वरील गृहीतकाची सत्यता नाकारल्यास निगमनाने कुठेतरी विसंगती निर्माण होणे आवश्यक ठरते. गंमत अशी की अशी विसंगती निर्माण होत नाहीच. याउलट वेगळेच गुणधर्म असलेल्या अवकाशाचे दर्शन घडत राहते.
वरील गृहीतकाची सत्यता नाकारली तर दोन नवीन विधानांना आपण गृहीतकांचा दर्जा देऊ शकतो.
१. प्रत्येक त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८०० पेक्षा कमी असते.
२. प्रत्येक त्रिकोणाच्या तीन कोनांची बेरीज १८० पेक्षा जास्त असते. गणिताने ह्या तीनही भूमितीत, अंतर्गत विसंगती संभवत नाही हे सिद्ध केले आहे.
मग प्र न असा पडतो की आपण ज्या वास्तव जगात राहतो त्या जगाचे सत्यदर्शन कोणत्या भूमितीमुळे होते. आणि गंमत ही की या तीनही संरचनांचा वास्तव जगात उपयोग होऊ शकतो.
आपल्या पारंपारिक तर्कशास्त्रात वाक्ये एक तर सत्य आहेत नाहीतर असत्य तरी आहेत. अशाच वाक्यांचा आपण विचार करतो. अशा तर्कशास्त्राला two valued logic म्हणतात. Fuzzy Logic मधील विधानात ह्या दोन व्यतिरिक्त वेगळ्या किमती अस-लेल्या वाक्यांचा विचार होतो. आणि उत्पादन-क्षेत्रात या तर्कशास्त्रामुळे क्रांती घडून येत आहे. असो.
वरील विवेचनावरून हे दिसून येईल की गणितामुळे आपल्याला अंतिम सत्याचा शोध लागू शकतो ह्या विश्वासाला एक जबरदस्त हादरा बसला आहे आणि विचारवंतांच्या गणिताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदला झाला आहे.
हे विवेचन इतके लांबवण्याचे प्रयोजन असे की गेल्या २०० ते ३०० वर्षांत विज्ञानात झालेल्या प्रचंड प्रगतीमुळे यूरोपीय जनमानसात वेळोवेळी परिवर्तने घडत गेली ह्या बदलापासून न-यूरोपीय देश मात्र दूर राहिले. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून मिळणारे फायदे स्वीकारीत आहोत. पण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा स्वीकार करण्यास भारतीय जनमानस तयार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन जनमानसात रूढ व्हावा यासाठी यूरोपीय शास्त्राज्ञांनी प्रचंड लढा दिला. प्रसंगी प्राणांची आहुतीही दिली. असे चित्र भारतात दिसत नाही. सर्वसाधारण भारतीय वैज्ञानिक विज्ञानाकडे करिअरच्या दृष्टिकोनातून पाहतो. पण हेही चित्र आता बदलू लागले आहे. नागपुरात नुकत्याच भरलेल्या बालविज्ञान चळवळ परिषदेकडे मी वाचकांचे लक्ष वेधू इच्छितो. या चळवळीला प्रचंड यश प्राप्त होवो ही सदिच्छा व्यक्त करून मी हे पत्र संपवितो.
भास्कर सदाशिव फडणीस, ९२, रामनगर, नागपूर — ४४० ०१०

अलीकडे थोड्याच दिवसांपूर्वी मी एक न्यूज वाचत होतो. त्या न्यूजमुळे मला एकदम उषा गडकरींच्या लेखाची याद आली.
पाकिस्तानातल्या मीरवाला ह्या नावाच्या गावातल्या एका अठरा वर्षांच्या मुलीवर गावातील चार जणांकडून बलात्कार करविण्यात आला; आणि विशेष म्हणजे त्या बलात्काराला त्या महिलेवरील अत्याचार मानले गेले नाही कारण ती गावातील जात पंचायतीने तिला सिजा सुनावली होती.
मीरवालामधल्या एका खालच्या समजल्या गेलेल्या जातीतल्या मुलाचे गावातल्याच वरच्या जातीतल्या मुलीशी संबंध आहेत असे गावकऱ्यांना समजले आणि हे जातीच्या अप-मानाचे प्रकरण जातपंचायतीपर्यंत आले. जातपंचायतीने ठरविले. की त्या मुलाने नैतिक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्याच्या वर्तनाने वरिष्ठ जातीच्या पावित्र्याला कलंक लागला आहे. हा कलंक धुऊन काढण्यासाठी जातपंचायतीने अपराधी मुलाच्या कुटुंबासमोर दोन पर्याय ठेवले. एक : मुलाच्या कुटुंबातील सर्व स्त्रियांवर बलात्कार किंवा त्याच्या मोठ्या बहिणींवर चौघांकडून बलात्कार. पंचायतीच्या निर्णयाची कार्रवाईसुद्धा करण्यात आली. जातपंचायतीतील एका सदस्याने आणि अन्य तीन जणांनी ती कार्रवाई पार पाडली. त्यावेळी समस्त गावकरी तेथे जातीनिशी हजर होते. बलात्कार करून झाल्यावर जिची सर्वांसमोर इज्जत लुटली तिला तशाच (विवस्त्र) अवस्थेत घरी जावयाला लावले. वगैरे.
वरील मामल्यात जो बलात्कार झाला तो त्या मुलाला सबक शिकविण्यासाठी झाला; तो जातपंचायतीने इन्साफ दिला; मुलाच्या बहिणीवर जो अत्याचार झाला तो पंचायतीने सही निर्णय दिला असे सर्व गावकऱ्यांना वाटले.
गावातल्या जातपंचायतीने केलेल्या कार्रवाईची पाकिस्तान मानवाधिकार आयोग ने दखल घेतली आणि ज्यांनी इन्साफ(!) दिला होता. त्यांना कडक सजा फर्मावली. इतकेच नाही तर ज्या नारीवर बलात्कार झाला होता तिची प्रशंसा केली. कारण की तिने हिंमत करून जातपंचायतविरुद्ध शिकायत केली होती. आता गोधराला काय झाले त्याचा विचार करू. गोधराला अंदाजन साठ लोकांना आगगाडीला आग लावून जाळून टाकले. त्या डब्यामध्ये बायकामुले वगैरे जे कोणकोण असतील त्यांचा ख्याल केला नाही. त्याची प्रतिक्रिया’ (reaction) म्हणून ‘आमच्या जातीचा अपमान झाला’ असा हिंदूंनी विचार केला आणि भलत्याच लोकांवर अत्याचार केले. काही मुसलमानांनी हिंदूंना मारून सर्व हिंदूंची छेडखानी केली त्या-बद्दल निराळ्याच मुसलमानांना–बायका पोरांनासुद्धा मोठ्या तादादमध्ये मारून टाकले. गुजरातच्या हिंदूंना वाटले की असे करताना आम्ही इन्साफच करीत आहोत. पण तो इन्साफ होता काय? अखेरीस इन्साफ–न्याय–म्हणजे काय? डॉ. गडकरी मीरवालामध्ये जे झाले त्याला इन्साफ म्हणतील काय?
प्रवीणभाई तोगडिया बिलकुल अडवानींच्या कदमावर कदम ठेवून राहिले आहेत. अडवानींना बाबरी मस्जिद पाडण्यात दिलचस्पी नव्हती. त्यांना तो मुद्दा घेऊन हिंदूंवर कसा अन्याय कांग्रेस करून राहिली आहे ते पब्लिकला दाखविण्यात दिलचस्पी होती. नरसिंहरावनी कल्याणसिंगचे सरकार न पाडता ‘बाबरी ढाचा’ पडू दिला त्यामुळे बीजेपीला आपली इज्जत सांभाळायची मुश्किल होऊन गेली. न्यायालयाला त्यांनी जो भरोसा दिला होता तो मोडण्याची त्यांची खरोखरच इच्छा नव्हती असा माझा ख्याल आहे. तसे आताच्या मामल्यात झाले नाही. सरकार तोगडियांच्या पक्षाचे होते. त्या कारणाने त्यांना यात्रा काढू दिली नाही. अर्धा दिवस जेलमध्ये ठेवून सोडून दिले. अगदी त्यांच्या मनाजोगे झाले.
नारायण गोविंद लघाटे, ४१७, गोपालगंज, सागर म. प्र. — ४७० ००१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.