पत्रसंवाद

श्री. केशवराव जोशी यांचे जाने २००३ च्या अंकातील पत्र वाचले. त्या अनुषंगाने —-
१. “सर्वसाधारणपणे सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्यापासून भारतात ख्रि चन जबरदस्तीने बाटवाबाटवी करीत आहेत’ असा ओरडा सुरू झाला चर्च व धर्मगुरूंवर हल्ले सुरू झाले,” हे श्री. जोशी यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आणि वस्तुस्थितीशी विसंगत आहे. अगदी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून हा ‘ओरडा’ सुरू आहे याचे असंख्य ऐतिहासिक, वृत्तपत्रीय व वाङ्मयीन संदर्भ उपलब्ध आहेत. ब्रिटिश राजवटीतील सभ्यतेच्या बुरख्याखालील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निर्बधांमुळे त्या ‘ओरड्याची’ तीव्रता ज्याच्या-त्याच्या मवाळ-जहाल धोरणानुसार कमी अधिक होती. ख्रि चनांवरचा हा आक्षेपच मूलतः चुकीचा होता/आहे असे आपले व्यक्तिात मत श्री. जोशी मांडू शकतात, पण हा ‘ओरडा’च नव्याने सुरू झाला हे म्हणणे चूक आहे.
आपल्या या विधानाच्या पुष्ट्यर्थ श्री. जोशी आपल्या पत्रात पुढचेच वाक्य लिहितात:- “ह्या धर्मांतराबद्दल स्वामी विवेकानंद, खंड ८, पान ३३० वर म्हणतात, ‘धर्मांतर धाकदपटशाने होते असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. धनिक आणि पुजारी ह्यांच्या जुलमापासून मुक्तता करून घेण्यासाठी लोक धर्मांतर करतात.” एकतर स्वामी विवेकानंदांचे हे विधान संदर्भ सोडून तुटकपणे विचारात घेता येणार नाही. दुसरे म्हणजे ते त्या संदर्भातील, त्या काळातील मत आहे हे ध्यानात घेतले पाहिजे आणि अगदी स्वामी विवेकानंदांचे मत असले तरी ते ‘त्यांचे’ मत आहे म्हणून जसेच्या तसे स्वीकारणे हे विवेकाला धरून होणार नाही. तिसरे आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या मताचे पुष्ट्यर्थ विवेकानंदांचे अवतरण अलगदपणे आणि चतुराईने वापरताना ते आपल्या म्हणण्याच्या विरुद्ध जाणारे आहे याचे भान श्री. जोशींना राहिलेले नाही. ‘धर्मांतर धाकदपटशाने होते हे म्हणणे मूर्खपणाचे आहे’ असे विवेकानंद म्हणतात. याचाच अर्थ हा आक्षेप त्या काळात इतरांनी घेतल्यामुळेच त्याच्या विरोधी त्याचा प्रतिवाद करणारे असे स्वतःचे मत मांडण्याची गरज विवेकानंदांना पडली. हा ‘ओरडा’ त्या काळी कोणी केला नसता तर हे मतप्रदर्शन विवेकानंदांनी कशाला केले असते? श्री. जोशी ‘ह्या धर्मांतराबद्दल’ अशी वाक्याची सुरुवात करतात हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे, ‘ह्या’ म्हणजे विवेकानंदांच्या काळापासून आजपर्यंतच्या धर्मांतराबद्दलचा काळ श्री. जोशी यांना अभिप्रेत आहे. त्यांचे एकंदरीतच ख्रिस्ती करत आले आहेत आणि करत आहेत त्या धर्मांतराबद्दलचे हे मत आहे, हे उघड आहे. ही ‘ओरड’ पूर्वी नव्हती आणि सोनियांच्या राजकारणप्रवेशानंतर सुरू झाली असे श्री. जोशी यांचे मत वास्तवाशी फारकत घेणारे आहे. श्री. जोशींच्या पहिल्या व दुसऱ्या वाक्याची सलगता बघता व त्यांच्या plain reading वरून ‘सोनियांचा राजकारण-प्रवेश—-followed by जबरदस्ती बाबतचा ओरडा—-coupled with चर्चवरील हल्ले’असा क्रम श्री. जोशीना अभिप्रेत आहे असे दिसत नाही तर ‘ओरड्या’ पासूनच सर्व सोनियांच्या राजकारणप्रवेशानंतरचे आहे असेच श्री. जोशींना अभिप्रेत आहे हे स्पष्ट आहे. असा क्रमच आपल्याला अभिप्रेत आहे असे श्री. जोशींनी नंतर म्हणू नये म्हणून आधीच हा सूक्ष्म फरक स्पष्ट केला आहे. वाक्यरचनेवरून असा क्रम अभिप्रेत असल्याचे दिसत नाही, अन्यथा तशी सुस्पष्टता अपेक्षित आहे. श्री. जोशी संदिग्ध भाषा वापरत नाहीत असा अनुभव आहे. अर्थात अशी राजकारणी कोलांटी उडी ते मारणार नाहीत अशी खात्री आहे.
आगरकरांचे जे अवतरण श्री. जोशी यांनी दिले आहे त्यातील विचारांशी मी व्यक्तिशः पूर्णपणे सहमत आहे. हा विचार आणि त्याचे विवेचन हा पूर्णपणे स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. माझा आक्षेप आहे तो सोईपुरते विवेकानंदांचे अवतरण वापरण्याला. आगरकरांच्या या विचाराशी पूर्णपणे विरोधी अशी धर्माच्या अस्तित्वाचा, गरजेचा व पालनाचा पुरस्कार करणारी अनेक विधाने विवेकानंदांच्या साहित्यात सापडतात. ती श्री. जोशी स्वीकारणार आहेत का? सोईपुरते धर्मवाद्यांनी विवेकानंदांना वापरणे आणि जोशींनी त्यांना वापरणे यात तत्त्वतः काहीच फरक दिसत नाही आणि दोन्हीही सारखेच चूक आहे सारखेच मतलबीपणाचे आहे. जाता जाता हेही नमूद करणे उचित ठरेल की जबरदस्ती, प्रलोभने इ. अनिष्ट मार्गांनी धर्मांतरे केल्याचा आरोप ख्रि चन धर्मगुरूंवर भारताबाहेरही अनेक देशांत अनेक वर्षांपासून होत आला आहे आणि त्याचा सोनियांच्या भारतातील राजकारण प्रवेशाशी काहीच संबंध नाही.
२. श्री. जोशींनी आपल्या पत्रात जी आकडेवारी सादर केली आहे त्या अनुषंगाने माझे अनुभव व निरीक्षण नोंदवीत आहे ते असे:
(अ) स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या टप्प्यात सरकारी नोकऱ्या व शिक्षणक्षेत्र यातील आरक्षणांचा लाभ हिंदू धर्मातील मागास जातींनीच घेतला. बहुतांश धर्मांतरित ख्रि चन हे पूर्वाश्रमीचे मागासवर्गीय हिंदू आहेत. आपण धर्मांतरित ख्रि चन आहोत हे उघडे झाल्यास राखीव जागांच्या सवलतींना वंचित होऊ, पात्र ठरणार नाही या धारणेमुळे अशा बहुतांश धर्मांतरित ख्रि चनांनी सरकार दरबारी कागदोपत्री आपली मूळची हिंदू धर्म-जात नोंदवायची व प्रत्यक्ष वैयक्तिक आचरणात ख्रिस्ती धर्माचे पालन करायचे असे दुहेरी धोरण ठेवल्याने शासकीय खानेसुमारीत त्यांनी आपली नोंद ख्रि चन म्हणून केली नाही. निराधार व अगतिक अवस्थेतील शासकीय सेवेतील अशा एका धर्मांतरित महिलेला या प्रकाराची वरिष्ठांकडे तक्रार करून अडचणीत आणण्याची धमकी देऊन (ब्लॅकमेल करून) तिच्या कडून उच्चवर्णीय हिंदू सहकर्मचाऱ्याने वारंवार पैसे उकळल्याचे एक प्रकरणही माझ्या पाहण्यात आहे.
(ब) मोठ्या मागासवर्गीय कुटुंबातील एक-दोघांनी मोठ्या शहरात वगैरे स्थलांतरित झाल्यानंतर धर्मांतर केले तरी त्यांना मूळच्या कुटुंबाशी व सग्या-सोययांशी संबंध ठेवणे अनेक कारणांस्तव आवश्यक असे. आपल्या मुला मुलींची लग्नाची सोयरीक मूळच्या गावी मूळच्या नातेवाईकांच्या कुटुंबातच बघावी लागे. त्या नातेवाईकांनाही आपआपल्या जातीचा अभिमान असे व ते ख्रिस्त्याशी सोयरीक करायला तयार नसत. त्यामुळे नातेसंबंधात सोयरीक जुळण्यात अडथळा येऊ नये या हेतूनेही असेच ‘दुहेरी’ धोरण अवलंबिले जाई. आता धर्मांतरितांची संख्या पुरेशी वाढल्याने व ज्याला-त्याला आपआपल्या पोटजातीतील धर्मांतरित मिळू लागल्याने हा प्र न सुटू लागला आहे. तरीही सर्वच धर्मांतरित ख्रि चन आपआपल्या पूर्वाश्रमीच्या पोटजातीतच आजही सोयरीक करतात.
(क) बऱ्याच मागासवर्गीयांच्या मालकीच्या वतनी किंवा अन्य स्वरूपाच्या जमिनी, घरजागा गावाकडे असत. धर्मांतरामुळे यातील वाटा हातचा जाऊ नये याकरिताही धर्मांतर उघड न करण्याची उदाहरणे आहेत. थोडीशी असली तरी वाडवडिलार्जित अशी जमीन, घरजागा यामध्ये वाटा मिळावी अशी भावनिक गुंतवणूकही असे. बाप मेल्यावर धर्मांतरित मुलाने ‘डुई केली’ (डोक्यावरील केस इतर भावांप्रमाणे भादरले) म्हणून, त्याने तो ही हक्क गमावला आहे, या कारणावरून त्याच्या हिंदू राहिलेल्या सख्ख्या भावांनी त्याला मारहाण करून हाकलून दिल्याचे प्रकारही मी पाहिले आहेत. अशा कारणांनीही धर्मांतर लपविले जाई.
(ड) धर्मांतरित हा मूळचा अशिक्षित, अडाणी असल्याने व कडव्या धर्माभिमानाचे प्रदर्शन हा ख्रिस्ती धर्माचा गाभा नसल्याने खानेसुमारीत आवर्जून धर्माची नोंद केली जात नसे. सर्वसामान्यपणे जातीनिहाय वस्त्या असल्याने धर्मांतरित व हिंदू असे, मूळची जात एकच असलेले लोक, एकाच वस्तीत राहात असत व असतात. खानेसुमारीची प्रत्यक्ष चौकशी होत असताना सर्वजण हजर असतातच असे नाही. त्यामुळे वस्तीवरून नाव-आडनाव (हे ही सहसा
बदलले जात नाही) यावरून खानेसुमारी करणारा कर्मचारी स्वतःच धर्मांतरित व्यक्तीचा मूळचा धर्म व जातच कागदोपत्री नोंदवून टाकतो असे दिसून आले आहे.
आता धर्माची नोंद जागरूकपणे करण्याचे प्रमाण वाढू लागले असा अंदाज आहे. ‘मंडल’ नंतर राखीव जागा या सर्वच धर्मांतील मागासवर्गीयांना उपलब्ध आहेत हे स्पष्ट झाल्यानंतर ती अडचण दूर झाली आहे. कालांतराने शिक्षण, आर्थिक स्थैर्य, त्यामुळे नव्याने लाभलेली सामाजिक प्रतिष्ठा अशा कारणांमुळे आपण धर्मांतरित ख्रिस्ती आहोत हे सांगण्याकडे व नोंदविण्याकडे कल वाढला आहे.
थोडेसे विषयांतर : भारतीय मुस्लिमांमध्येही जाति-भेद मानतात परंतु सर्वच जाती स्वतःलाच उच्च व खानदानी समजतात. ‘मंडल’ नंतर मात्र आपल्या मूळच्या मागास जातीचे प्रमाणपत्र मिळवून राखीव जागांचे लाभ घेण्याचे प्रकार सुरू झाल्याचे दिसते. लोकप्रतिनिधींच्या राखीव जागा व त्या अनुषंगाने खोटी जातप्रमाणपत्रे सादर करून लाभ घेण्याचे हिंदू धर्मीयांचे तमाशे आता रोजच वाचायला मिळत आहेत.
आकडेवारी तयार करण्याच्या पद्धतीतील त्रुटी, शास्त्रशुद्धतेचा अभाव, या बाबींचा परिणामही निष्कर्षांच्या अचूकतेवर होतो. जोशी टाईम्स चा आणि खानेसुमारीचा हवाला देतात म्हणून वरील अनुभवावर आधारित निरीक्षणे नमूद केली आहेत. अशा आकडेवारीवर विसंबण्यापूर्वी स्वतः वस्तुस्थिती (निदान सकृतदर्शनी तरी) न्याहाळणे आवश्यक व योग्य ठरेल. गुजरात निवडणूक निकालांचे मान्यवर वाहिन्यांचे अंदाज व पाहण्या हे ताजे उदाहरण आहे. जाने. २००३ च्या अंकातीलच ‘धर्म आणि लोकसंख्या’ हा कुमुदिनी दांडेकर यांचा लेख या संदर्भातील अनेक प्र नांना जन्म देतो आणि त्या लेखात अखेरीस त्यांनी नमूद केलेला अनुभव व व्यक्त केलेली शंका जोशींच्या मतांच्या संदर्भात विचारात घेण्यासारखी आहे.
३. श्री. जोशींच्या पत्रातील इतर विधानांबाबत थोडक्यात:
(अ) ‘बौद्ध व ख्रि चन धर्मात हिंसा सांगितलेली नाही’ परंतु मांसाहार नाकारलेला नाही. हिंसा अन्य प्रमुख अशा कोणत्याच धर्मात सांगितलेली नाही. मुस्लिम धर्माचा विचार स्वतंत्रपणे करावा लागेल. ख्रिस्ती धर्मीयांनी केलेली धार्मिक युद्धे व हिंसा यांची इतिहासात नोंद आहे.
(ब) ‘इंग्लंडमध्ये कोणताही राजा पहिल्या राजाला मारून गादीवर आलेला नाही’ हे खरे आहे. परंतु गेल्या अनेक पिढ्यांपासून इंग्लंडचा राजा नामधारी असून प्रत्यक्ष राज्यकारभार लोकप्रतिनिधीच्या हातात आहे. राजाला अधिकार केवळ प्रथेपुरते आहेत. राजघराण्यात मालमत्तेत वाटा व आनुषंगिक सुखे सर्वांनाच मुबलक मिळतात. आधीच्याला मारून ‘गादीवर’ येण्याने पुढच्याला काहीच लाभ मिळण्यासारखी स्थिती नाही. उलट न्यायालयीन निर्णयांमुळे व लोकांच्या दबावामुळे मिळणारे लाभ जातील, अशी कारणमीमांसा या संदर्भात विचारात घ्यावी लागेल.
(क) ‘ख्रि चन लोक धार्मिक कारणांसाठी वेळ घालवत नाहीत’ हे विधान चूक आहे. सर्व जगात विविध देशांत ख्रि चन सण, समारंभ, स्थानिक जत्रा-उत्सव या सर्व धार्मिक आधार असलेल्या गोष्टींत वेळ घालवतात. भारतात तर स्थानिक जत्रा, वस्ती-निहाय भजनी-मंडळे, नित्य, साप्ताहिक व सणावाराच्या निमित्ताने भजन-पूजन हे बघायला मिळते. अनेकांची भजन-अभंगांची पुस्तके आहेत. जात-पात आहे. दुर्दैवाने हिंदु धर्मां तील कोणतीही अनिष्ट रूढी, परंपरा, चालरीत वगैरे काहीही भारतीय ख्रि चनांनी सोडलेले नाही. भारताबाहेरही जात-पात वगळता हेच दोष आणि भरपूर अंधश्रद्धा ख्रि चनांच्यात आहेत.
(ड) ‘वैज्ञानिक शोध बहुतांशी ख्रि चनांनी लावले’ हे खरे आहे. ज्यू ही मोठ्या संख्येने आहेत. पण याचा विचार देश-निहायही करावा लागेल. याचे श्रेय ‘ख्रि चन’ असण्याला एकदम देऊन टाकता येणार नाही.
४. जोशींचे ‘विचार’ सरसकट हट्टाने खोडून काढायचे हा या पत्राचा हेतु नाही. परंतु ते काही विधाने धडाकेबाजपणे करतात आणि ‘वाचकांनी हा सर्व विचार आणि आकडेवारी ध्यानात ठेवावी’ असे ठामपणे सांगतात म्हणून त्यांच्याच सांगण्याप्रमाणे याबाबत ‘विचार’ करून माझी मते व्यक्त केली आहेत.
अनंत बेडेकर, कोसला, शांतिनगर सोसा., भारतनगर, मिरज

भास्कर सदाशिव फडणीस जानेवारी २००३ च्या पत्रात लिहितात की, “गॉस (आणि रीमान या)ची भूमिती युक्लिडच्या भूमितीइतकीच सत्य (अंतर्गत सुसंगत आणि वास्तव) आहे म्हणून ‘त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८०० असते’ हे वाक्य सत्यही आहे आणि असत्यही आहे.”
वरील विधान अर्धवट आणि दिशाभूल करणारे आहे कारण गुरुत्वाकर्षणबलाच्या अस्तित्वानुसार हे विधान सत्य किंवा असत्य ठरते. गुरुत्वाकर्षण नसताना केवळ युक्लिडची भूमितीच सत्य असते. गुरुत्वाकर्षण शक्तीजवळ केवळ रीमानची भूमितीच सत्य असते. गॉसची भूमिती ऋण गुरुत्वाकर्षणात सत्य ठरेल मात्र तसे अजून सापडले नाही. कांटचा गैरसमज होण्याचे कारण म्हणजे पृथ्वीचे क्षीण गुरुत्वाकर्षण अवकाशाला देत असलेली वक्रता तत्कालीन उपकरणांना जाणवणारी नव्हती. त्यात कल्पनाशक्तीची कमतरता हे कारण नव्हते.
निखिल जोशी, तत्त्वबोध, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — ४१० १०१

आ.सु.च्या जाने. २००३ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या माझ्या पत्राच्या संदर्भात श्री. निखिल जोशी ह्यांनी संपादकांना लिहिलेले पत्र मी काळजीपूर्वक वाचले. ह्या पत्राबाबत मी कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त कराव्यात हे माझे मलाच कळेनासे झाले आहे. प्रमेयरूपात मांडलेली गणितातील विधाने ही सदासत्य असतात असे सर्वसाधारणपणे मानले जाते. लोकांच्या गणिताकडे पाहण्याच्या ह्या दृष्टिकोनात बदल व्हावा यासाठी मी पत्र लिहिण्याचा खटाटोप केला.
युक्लिडीय भूमिती तसेच मी माझ्या पत्रात नमूद केलेल्या दोन न-युक्लिडीय भूमिती ह्या तीनही भूमितींत अंतर्गत सुसंगतता आहे हे सिद्ध झालेले आहे. माझ्या लिखाणातून हा अर्थ निघतो हे मला एकदम मान्य केले पाहिजे. पण ‘वास्तव’ हे विशेषण मी ह्या भूमितींना लावलेले नाही. त्याचप्रमाणे त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८०० असते हे वाक्य सत्यही आहे आणि असत्यही आहे असे मी लिहिल्याचे माझ्या पत्रात मला कुठेही आढळले नाही. ह्या तीन भूमितींची उभारणी परस्परविरोधी (विसंगत) गृहीतकांच्या आधारावर झालेली आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे असले तरी ह्या तीनही संरचनांचा वास्तव जगात उपयोग होतो. ह्यामुळे गणिताचा सत्यशोधनासाठी उपयोग होतो ह्या विश्वासाला प्रचंड हादरा बसला व विचारवंतांचा गणिताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला. तत्त्वज्ञ रसेल ह्यांनी गणिताबाबत केलेल्या विधानाकडे मी श्री. जोशी ह्यांचे लक्ष पुन्हा वेधू इच्छितो.
गणित ही अमूर्त संकल्पनांची एक सुंदर संरचना आहे असे असले तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ह्या संरचनेचा उपयोग होतो. ह्यातच गणिताची महती सामावली आहे. असो. इंडो अरेबिक अंक म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे असा जर अर्थ असेल तर श्री. जोशी ह्यांनी ताज्या कलमात केलेल्या सूचनेला माझा हुजोरा आहे.
श्री. जोशी ह्यांनी त्यांच्या पत्रात गुरुत्वाकर्षण बलाचा आणि वरील तीन भूमितींचा जो संबंध सांगितला आहे त्याबाबत मी कोणतेही विधान करू शकत नाही कारण तो माझा विषय नाही.
[चौदाव्या वर्षापासून आम्ही आंतरराष्ट्रीय ‘अंक’ वापरू लागत आहोत. निखिल जोशींच्या ‘अवतरणा’बद्दल मागेही एकदा लिहावे लागले आहे. —- संपादक]
भा. स. फडणीस, ९२, रामनगर, नागपूर — ४४० ०१०

आपल्या जाने. २००३ चे अंकातील प्रमोद सहस्रबुद्धे यांचा ‘भारत, एक उभरती सत्ता’ हा लेख वाचला. मला वाटते जोपर्यंत आपला Mind set आहे तसाच राहील तोपर्यंत भारत ‘उभरणे’ ह्या अवस्थेतून बाहेर पडूच शकणार नाही. जोपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांचा भोंगळवाद आणि फक्त स्वतःचे (म्हणजे व्यक्तिश: किंवा ‘जाती चे’) फायद्यापलिकडे पाहू न शकणे संपत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार. अमेरिके सारख्या सधन देशाने चार स्तुतीचे किंवा संपत्तीचे तुकडे आपल्या तोंडावर फेकले की आपण खुश! आपलेकडे माणुसकी भरपूर आहे. पण राष्ट्रनेत्यांना जरूरीचा असलेला ‘चालूपणा’ नाही. Killer Instinct नाही. उगाचच का एखादा पृथ्वीराज अनेक वेळेला पराभूत करून घोरीला सोडून देतो. आणि मग एकदाच घोरीच्या हातात सापडला की, मारला जातो! १९७१ च्या विजयाचा आपल्याला ह्याच भोंगळपणामुळे सर्व फायदा घेता आला नाही!
आपली लोकशाही देखील बेगडी आहे. प्रतिनिधी निवडले जातात तेदेखील जातीचा व धर्माचा आधार घेऊन. देशाचा विचार करतो कोण? जे काही केले जाते ते स्वतःच्या हितासाठी! मग ते लालडगलेवाले असोत किंवा अर्धीचड्डीवाले असोत. पण मी आशावादी आहे. बलशाली राष्ट्र व समाज घडायला शेकडो वर्षे लागतात. आपल्याला तर जेमतेम ५० वर्षे झाली आहेत.
श्री. गो. रानडे, १२१२/ब, आपटे रोड, पुणे — ४

. . . नाहीतर माणसे रोबोट बनतील
सुप्रीम कोर्टाचे माजी मुख्य न्यायाधीश व्यंकट चलय्या १–११–१९९४ रोजी म्हणाले, ‘जर नेत्याने समाजशास्त्राचा आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला नाही तर तो नेता समाजाचा शत्रू होतो.’ त्यानुसार तोगडिया आणि सुदर्शन हे समाजाचे शत्रू ठरतात. ते दोघेही गोहत्याबंदीचा आग्रह धरीत आहेत. स्वामी विवेकानंद, स्वा. सावरकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांचा भाकड गायी कापण्यास विरोध नव्हता. वि. म. दांडेकरांनी ‘द कॅटल इकॉनॉमी ऑफ इंडिया’ हे ८० पानांचे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘वेदामध्ये गाय कापण्याचे उल्लेख आहेत.’ दांडेकर पुढे लिहितात की, ‘आज शेतकऱ्याला भाकड गाई पोसणे परवडण्यासारखे नाही.’ भारतातून दीड लाख मे. टन मांस परदेशी जाते. तरीही आपले पशुधन ६ कोटींवरून ८ कोटींवर गेले आहे. १५–०१-१९९९ पासून गुजरात सरकारने बैल कापण्यावरची बंदी उठविली आहे. कोणत्याही गोष्टीचा सखोल अभ्यास न करता भावनांच्या आधारे विधाने करणे चालूच ठेवले, तर शास्त्रज्ञ कॅलहाउस यांनी म्हटल्याप्रमाणे ‘काही काळाने माणसे रोबोट बनतील.’
केशवराव जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, नेरळ, (रायगड) ४१० १०१

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.