पत्रसंवाद

नोव्हेंबर अंकाच्या संपादकीयात पृ. 293 वर; ‘धर्म या शब्दाचा अर्थ सदा-चरण व कर्तव्यभावना’ असा असेल तर; तुमचा धर्माला विरोध नाही. ते तुम्ही स्पष्ट केलेले आहे. ते वाचून आनंद वाटला.
धर्म या शब्दाचा आणखी एक अर्थ आहे; ‘स्वाभाविक नियम’ म्हणजे उतारा-कडे वाहणे हा पाण्याचा धर्म आहे. तर उष्णता हा अग्नीचा धर्म आहे. इत्यादि. आणखी ‘सहज स्वभाव’ असाही अर्थ होतो. उदाहरणार्थ; भुंकणे हा कुत्र्याचा धर्म आहे. नांगी मारणे हा विंचवाचा. माकड माकडचेष्टा करणारच. तो त्याचा धर्मच! धर्म वा शब्दाचा अर्थ संप्रदाय, पंथ असा केला जातो. तेव्हां प्र न निर्माण होतात. कोणता पंथ बरोबर? ते जो आचारधर्म सांगतात. त्यामागचा विचार काय? योग्य कर्तव्य कोणते? सदाचार कशाला म्हणायचे? ते ठरवायचे कोणी? व्यक्तिात जीवन आणि सामाजिक जीवन याची सांगड घालायची कशी?
आपले संत तुकोबा! विठ्ठल विठ्ठल करीत ते आकाशाएवढे झाले. भक्तिमार्गी वारकरी पंथाचा अंगीकार करून त्यांनी भागवतधर्माची ध्वजा खूप उंचावली. त्यांच्या गृहस्थधर्माचे काय? बायकोपोरांची अन्नान्नदशा होती. पतिपत्नी दोघेही शेवटपर्यंत एकमेकांशी झगडत राहिले. ‘जोडोनिया धन उत्तम वेव्हारें। उदास विचारें वेच करी।।’ असे तुकोबा सांगतात. पण तो उत्तम व्यवहार काही त्यांना जमला नाही. ते दिवाळखोरच ठरले! शिवाजी राजांनी पाठवलेले धनसुद्धा त्यांनी परत केले. तुकोबांचे सुख ‘नामात’ होते. पण कुटुंबाचे ‘धनात’ होते त्याचे काय? तुकोबा स्वतःच्या निष्ठेप्रमाणे वागले. कुटुंबीय त्यांच्याबरोबर नुसते फरफटले. त्याकाळी घटस्फोट प्रचलित असता तर? किंवा धन पत्नीच्या हवाली करून स्वतः तुकोबा रानावनात निरिच्छपणे ‘नामस्मरण’ करीत बसू शकले असते. पण सांगता येत नाही. तरीही बायको कडाडू शकत होती. ‘घरात चार कवड्या फेकल्या की संपले का सगळे कर्तव्य? मी एकटीने किती करायचे! विठ्ठल, विठ्ठल करीत बसायचे होते तर प्रपंच मांडलाच कशाला?’ कुणाचा धर्म काय हे ठरवायचे कसे? कोणी? तिकडे राजस्थानांत संत मीराबाई! तो उलटाच मामला! ती राजाची पट्टराणी! सुखात ऐश्वर्याचा उपभोग घ्यायचा; प्रजेचे रक्षण, पालन करण्यात राजाला मदत करू शकली असती. म्हटले तर ते तिचे कर्तव्य होते. घाट बांधणे, धर्मशाळा उघडणे अशी सत्कार्येही करू शकली असती. पुढे अहिल्याबाई होळकर तशा वागल्या होत्या. पण मीरेने वेगळाच रस्ता धरला. पायात घुगुरे बांधून ‘कृष्ण, कृष्ण’करीत ती भगव्या वस्त्रधारी गोसाव्यांमध्ये नाचू लागली. आपण विपरीत वागतो आहोत हे तिला कळत होते. ‘लोग कहे कुल नासी रे।’ हे तीच म्हणते. राज्याने, तिच्या नवऱ्यानेच तिला विषप्याला दिला म्हणे! काय करील बापडा? पट्टराणी चक्क गोसावड्यांमध्ये नाचत सुटली! त्यांचा आदरसत्कार करायला, पाद्यपूजा करायला, त्याने नको म्हटले नसते. घरांत देवदेव करीत बसली असती तरी सहन केले असते. पण हे काय?
मीरेचा, तुकोबांचा धर्म काय? त्यांचे कर्तव्य काय? हे ठरवायचे कोणी? त्यांनी की दुसऱ्यांनी? का एखाद्या धर्मग्रंथाने? त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आहे की नाही? ते काही दुसऱ्याला त्रास देत होते का? कुणावर हल्ला करीत होते का? ते त्यांच्या निष्ठेप्रमाणे वागले. त्यांना नामात, भक्तीत आनंद वाटला. त्यांनी तो उपभोगला. प्रेमवीर नाही सगळ्या जगाला धाब्यावर बसवून प्रेमाचा आनंत उपभोगीत?
संतांना बाजूला ठेवू. क्रांतिकारक, समाज-कार्यकर्ते आपापल्या रस्त्यांनी जातात. घरच्यांना त्यांत रस असतोच असे नाही. कित्येकदा असा माणूस घरच्यांना ताप होऊन बसतो. काही परखड माणसे अख्ख्या समाजाला तापदायक वाटतात. जग त्यांना वाळीत टाकते, कधी अवहेलना करते. कधी फासावरही चढवते; व नंतर त्याचे गुणगान करते. सत्याचा विजय होतो. पण सत्यवादी मरतो. व्यक्तिस्वातंत्र्य व सामाजिक संबंध बांधायचे कोणत्या आधारावर? बरोबर का चूक ते ठरवायचे कसे? कोणी?
मला वाटते; मानवी जीवनाच्या अशा गुंतागुंतीच्या प्र नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांतून निरनिराळे पंथ निर्माण होतात. ज्याचे म्हणणे बहुतांना मान्य होते तो पंथनिर्माता ठरतो. पण कुणाचेच म्हणणे अंतिम सत्य ठरू शकणार नाही. मग त्या वाटेला जायचेच कशाला? तर निरुपायाने! [.. . किंवा स्वतःचा मार्ग शोधायचा. — सं.]
हवेच्या पोकळीतून, नादांतून संगीत निर्माण केले जाते तेव्हा षड्ज (सा) हा कुठला तरी आधाराचा स्वर तुलनेसाठी नकळत मनात बाळगलेला असतोच. आधारस्वरा-शिवाय संगीत नाही. गणितात शून्य हा आधार. तिथून पुढे अधिक, उणे, वर्ग, घनमूळ, अनंत असे गणन चालू होते. गणिती विश्व उदयाला येते, आकार घेते. अर्थव्यवहारांमध्ये; तेजी-मंदी चालते. त्यामुळे द्रव्यनिधींची मूल्ये बदलतात. द्रव्याची खरी किंमत अखेर मानवी मनावर, समाजाचा विशिष्ट चलनावर असलेल्या विश्वासावर अवलंबून असते. कधी त्या विश्वासाला धक्का बसतो. फसगत होते. तरी आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी आपल्याला पैशाचा आधार घ्यावाच लागतो. त्याला इलाज काय? हा मानवी जीवनाचाच अपुरेपणा आहे.
धर्मपंथ आपापल्या परीने प्रयत्न करतात. त्यात फसगत होईलही. पण म्हणून धर्मपंथच सोडा असे नाही आपल्याला म्हणता येणार. पैसा बेभवरवशी असून स्वीकारतो ना आपण?
[पैसाही सोडा, असे मोहनी म्हणत आहेत; तेव्हा धर्मपंथ सोडा हे तरी आम्ही म्हणणारच.
— संपादक]
रवींद्र द. खडपेकर, पाटीलवाडी, ठाणे

“हे चित्र पहा आणि ते चित्र पहा”
दि. 13/9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा “मी नथूराम गोडसे बोलतोय’ हा लेख, वाचला. श्री. देशपांडे यांच्या विचारात व इतर वाचकांच्या विचारात काही भेद असू शकेल, हे गृहीत धरून सांगावेसे वाटते की श्री. देशपांडे यांचा लेख काही कारणामुळे अपुरा वाटतो. श्री. देशपांडे यांनी विचार अभिव्यक्ति स्वातंत्र्याबद्दल जे लिहिले आहे ते पूर्णतः मान्य केलेच पाहिजे.
‘सर्व प्रेक्षक बहुधा नथूरामभक्त्व होते’ असे श्री. देशपांडे यांना जाणवले आहे. हे वाक्य कोणाला अतिव्याप्त वाटेल तरीही प्र न पडतो की गेल्या पन्नास वर्षांत नथूरामभक्तांची संख्या एवढी का वाढली? का वाढावी? कोणत्या तरी एका धर्माचा-संप्रदायाचा–पंथाचा प्रभाव समाजातील प्रत्येक व्यक्तीवर असतो. अगदी धर्म/पंथ न मानणारे लोकही ‘निरीश्वरवादी’ पंथाचे म्हणता येतील. पंथ शब्द रुचत नसेल तर ‘मताचे’ असे म्हणावे. उदाहरणे व ती धार्मिक घ्यायची तर शंकराचार्य, गौतमबुद्ध, महावीर, नानक, येशू ख्रिस्त, महंमद या मंडळीच्या अनुयायांची घेता येतील. त्या त्या व्यक्तींचे विचार शिरोधार्य मानणारे व सोईनुसार त्याप्रमाणे आचरण करणारे लोक सर्वत्र आहेत. हा वारसा ते पिढ्यानपिढ्या चालवत आले व पुढेही चालवत राहतील. मुख्य प्र न असा आहे की, गांधींचा वारसा चालवणारे कोणी आहेत का? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, सत्याग्रह, दारूबंदी, या गोष्टीसाठी गांधींनी जन्मभर आग्रह धरला होता. त्यासाठी उभे आयुष्य वेचले. त्याप्रमाणे स्वतः आचरणही केले. ते कोणाला टोकाचे, कर्मठपणाचे वा अगदी अव्यवहार्य वाटतही असेल, पण गांधी स्वतःशी प्रामाणिक होते. तत्त्वाला मुरड घालणे त्याना माहीत नव्हते. या मार्गाने जाणारा कोणी महात्मा, गांधींचा एखादातरी सच्छिष्य आज पहायला तरी मिळतो का? गांधींच्या नावाचा उठसूठ जप करणारे उपदेश करताना वा व्याख्याने झोडताना ‘राजकारणी वाक्ये’ वापरतात. “गांधींच्या मार्गाने जाण्यातच समाजाचे कल्याण आहे. त्यामुळेच तुमचे व या देशाचे भले होईल.” वगैरे वगैरे. ते कधीही “जाऊ या” म्हणत नाहीत. दुसऱ्यांना ‘जा’ म्हणतात. ‘तुम लढो, हम कपडे सम्हालते हैं’ या वृत्तीचा हा उपदेश कोण ऐकून घेईल? “देशासाठी त्याग करायला तयार राहा’ हे आणखी एक लोकप्रिय वाक्य. स्वतः काय व कोणता त्याग केला याचा हिशेब कधीच मांडला वा सांगितला जात नाही. गांधींचे एकतरी तत्त्व आज आचरणात आणले जात आहे का? नथूरामने गांधींचा खून एक वेळाच केला. गांधीप्रेमी (गांधीवादी म्हणत नाही.) लोक गेली पन्नास वर्षे त्यांचा खून दररोज पाडत आहेत. अशा स्थितीत त्या आततायी नथूरामच्या भक्तांची संख्या वाढेल नाही तर काय होईल? नथुरामभक्तांच्या संख्येपेक्षा “गांधीच्या खुन्यांची संख्या आज जास्त भरेल.
श्री. देशपांड्यांनी भविष्यकाळात घडतील अशा काही संभाव्य गोष्टी लिहिल्या आहेत. उदा. रस्त्याला नथूरामचे नाव देणे इ. कदाचित् तसे होईलही. कोणी सांगावे? आज जे झाले आहे आणि होत आहे ते होईल असे पन्नास वर्षापूर्वी कोणाला तरी वाटले होते का? जे झाले त्याबद्दल वाटणारी देशपांड्यांची विषष्णता समजण्यासारखी आहे. पण का झाले याच्या कारणांची चिकित्सा केली तर, प्रदीप दळवी, विनय आपटे, शरद पोंक्षे, आणि टाळ्या वाजवणारे प्रेक्षक यांच्यापेक्षा दुसऱ्याच लोकांना जबाबदार धरावे लागेल. ही कोण मंडळी आहेत?
नाटकाच्या लेखनाबद्दल वा सादरीकरणाबद्दल काही लिहावे असे वाटत नाही. कारण श्री. देशपांडे, सद्यःस्थिती व भविष्यकाळ याकडेच अधिक प्रमाणात पहात आहेत. त्यांची कारणे सांगत नाहीत. ‘गोडसे’ आडनाव बदलून घेतले नाही तर जगणे कठीण होईल असे वाटण्याचा एक काळ होता. आजचा काळ काय सांगतो? या आडनावाची भक्तमंडळी वाढली आहेत. या वस्तुस्थितीचा विचार कोणी करणार आहे का? फक्त नाटककार आणि प्रेक्षक यांनाच दोष देणार आहेत?
याच अंकात श्री. श्रीराम केळकर त्यांच्या लेखात —- ‘Look at this picture and that’ हे वाक्य कोणाचे आहे ते आठवत नाही असे म्हणतात. आमच्या माहिती-प्रमाणे ते शेक्सपीयरच्या हॅम्लेटमधले वाक्य आहे. हॅम्लेटने ते आपल्या आईला म्हटलेले आहे. मृत वडिलांचे एक चित्र व खुनी काकांचे दुसरे चित्र. 1948 ची स्थिति आणि आज ‘नथुराम’ नाटकाच्या वेळी दिसणारे दृश्य! हेच म्हणावे लागेल की —- Look at that picture and this!! ‘हे चित्र पहा, आणि ते चित्र पहा.’
शांताराम कुलकर्णी, 10 साई वैष्णव सोसायटी, कार्तिकीनगर–हिंगणेखुर्द, पुणे — 51

महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रभागी गणेशाची स्थापना रविवार दि. 16 फेब्रु. 2003 च्या महाराष्ट्र टाइम्सच्या मुखपृष्ठावर “आधी वंदू तुज मोरया’ हे गणेश प्रतिष्ठापनेचे समर्थन करणारे संपादकीय कवन व कथन छापून संपादकांनी “धार्मिक अतिरेक’ करण्याचा प्रयत्न केला असे वाटते. धार्मिक अतिरेक्यांच्या रांगेत आता मातब्बर वर्तमानपत्राचे संपादकसुद्धा हक्क सांगताहेत ही बाब चिंतनीय आहे.
धर्माभिमानी भिन्नधर्मीय जनता एकमेकांच्या विरुद्ध उभी ठाकून प्राण पणाला लावून आजही लढत आहे. या संघर्षांची व लढायांची प्रेरके स्वार्थ, सत्ता, अकारण भीती व अहंकार हीच आहेत, त्यामुळे सर्व प्रकारचे अनाचार करूनही देवाविषयी श्रद्धा असलेला माणूस यांत्रिकपणे देव देव करीत असतो. बहुतेक सर्व समाजात ही कौटुंबिक व पारंपरिक यांत्रिकता आढळून येते, ही दांभिकता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. परंपरेच्या ओझ्याखाली देवामुळे शांती व समाधान प्राप्त होते हा भ्रामक समज मेंदूत घट्ट रुतून बसला आहे. वास्तविक बहुतेक देव संघर्षाचे, गोंधळाचे व अराजकतेचे प्रतीक झाले आहेत, हे वर्तमान पत्रातील बातम्यांवरून लक्षात यावे.
त्यामुळे अशा बुद्धीच्या आणि कलेच्या जागृत देवाची वर्तमानपत्रांसारख्या लोकोपयोगी “चतुर्थ सत्तेच्या” अग्रस्थानी गणेशास स्थापित करणे हे ओघाने आलेच. त्यात कसली आली अंधश्रद्धा? भारतात आजही जवळ जवळ 40% जनता दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत आहे. 65% स्त्रिया व 55% पुरुष निरक्षर आहेत. बुद्धीची देवता असलेल्या गणेश भक्तीची ही पावतीच असावी, आपल्या माणसांनी गणेशाची हजार रूपके—-प्रतीके निर्माण करून प्रचंड श्रद्धा जोपासली, व कलेचे शिखर गाठले. एवढेच नव्हे तर गणेशाला चन्द्र–तारे–सूर्य असे पर्यन्त पुरून उरेल इतके दूधही पाजून आम्ही आमची श्रद्धा जगाच्या काना-कोपऱ्यात पसरविली. आमच्या विकासाच्या प्रत्येक घटकात “श्रद्धा-युक्त भ्रष्टाचार” संपृक्तपणे ओतला गेला असल्याने आमची बुद्धी व कला गणेशकृपेने उत्तरोत्तर वृद्धिंगत होईल यात शंकाच नाही.
भारतात सर्वत्र देवी-देवतांची, देवळांची व धर्माची चलती असताना व 99% भारतीय लोक पूजा–पाठ, भजन–कीर्तन व धार्मिकतेत श्रद्धेने गढून गेले असतानासुद्धा या देशात संख्येने जगात सर्वात अधिक क्षयरोगी, आंधळे व अपंग कुष्ठरोगी, आणि आताच्या ताज्या जागतिक आरोग्यसंघटनेच्या पाहणी अहवालाप्रमाणे सर्वांत अधिक २मधुमेही व हृद्रोगी असावेत, हेच काय ते श्रद्धेचे फलित. अशा आजारी भारतास देवामुळे खऱ्या अर्थाने शांती व समाधान लाभेल काय? संपादक महोदयांनी याचा शोध घेतल्यास उपकारच होतील.
[श्री. हुमण्यांनी म. टा. च्या संपादकांना पाठवलेल्या विस्तृत पत्राचा हा थोडासा भाग.]
श. वि. हुमणे, 12 राजीव स.गृ.नि.सं. मर्यादित, बान्द्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई — 400 051

उपयोगितावादावरची आपली टिप्पणी वाचल्यावर मनात उद्भवलेली ही तात्कालिक प्रतिक्रिया.
आपल्या लेखानंतर लगेचच श्री. जयंत फाळके यांचा ‘ऐलतीर-पैलतीर’ हा लेख आहे. उपयोगितावादाची भलावण करणाऱ्या आपल्या तर्काला उभा छेद देणारी माहिती सदर लेखात आहे असे मला वाटते.
जमल्यास या विषयावर अधिक लिहिण्याची इच्छा आहे. तूर्तास इतकेच. [अधिक तपशीलवार लेखाच्या प्रतीक्षेत . . . .
—- संपादक
प्रभाकर कळंबकर, पांडव कपेलाच्या मागे, आके, आल्त–मडगाव–गोवा — 403 601

आपल्या आ.सु.च्या 13.9 (डिसेंबर — 2002) च्या अंकात “साधुत्व व तव्यत्व’ किंवा चांगले/वाईट, असा मानसिक प्रतिभाव देणारा गुण याची मीमांसा बघितली. चांगले वाईट ही मानवाधिष्ठित विशेषणे आहेत. ती अनुभूतिसापेक्ष आहेत—-निसर्गात विशेषण नाही. सर्व गोष्टी कालक्रमाने घडत असतात. निसर्गनिर्मित घटनेला चांगले/वाईट अशी विशेषणे लागतच नाहीत—-एक इंग्रजी म्हण अशी आहे—-“Nothing is said to be good or bad, > we are either used to it or not.” अति प्रमाणात केलेले ‘पिष्ट पेषण’ हे विचारग्राह्यतेच्या दृष्टीने सार्थक आहे काय, याचा विचार व्हावा. अति सर्वत्र वर्जयेत्!
श्रीराम गजानन केळकर, 4 वसंत नगर को-ऑ. हा. सोसा., भैरवनाथ रोड, मणिनगर, अहमदाबाद — 380 008

जनुके, सध्याचे टेलीफोनवरील TRAI चे अतिक्रमण मध्यम वर्गातील उत्पन्नाची disparity हे विषय सुचवावे वाटतात. लेखांचा पूर्ण झाल्यावर व्यापारी वनिकी पुस्तकरूपाने प्रकाशन करावे व नवा पायंडा पाडावा. श्री. दिवाकर मोहनी यांच्या (फिरून एकदा रोजगार!)च्या प्रतिपादनांवर मतभेद असू शकतात.
गोपाळ ल . फाटक, 5-2-10712, J. Nehru Road, Hyderabad – 500 095

श्री. दिवाकर मोहनी यांनी आजचा सुधारक मासिकाच्या मार्च 2003 अंकात ‘रोजगार’ या विषयावर टिपण दिले आहे. त्यांचे कळीचे वाक्य असे आहे.
‘आपल्यापाशी पैसा नाही म्हणून आपणाला हे करता येत नाही हा भ्रम आहे.’ चलन विषयक धोरण हे आपण ठरवतो. त्याला रोजगारनिर्मितीस अनुकूल वळण देता येते असा अर्थ त्यांना अभिप्रेत दिसतो.
या मांडणीला भरपूर पाठबळ देणारे विवेचन पुढील पुस्तकात मी वाचले. नाव —- The Future of Money : Creating New Wealth, Work and
a Wiser World लेखक —- Bernard Lietaer प्रकाशक —- Random House वर्ष —- 2001 किंमत —- 10 पौंड
या लेखकाच्या मांडणीनुसार, युरोप व अमेरिकेत बेरोजगारीवर उपाय म्हणून पर्यायी चलन व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयोग वारंवार झाले आहेत. 1929 च्या मंदी-नंतरही ते झाले आणि गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये सुद्धा होत आहेत. असंग्रही वृत्ती जोपासणे हे अशा व्यवस्थांच्या यशाचे गमक असते. या चलनावर व्याज मिळत नाही. उलट चलन वापरण्यासाठी काही आकार घेतला जातो. अशा एका प्रयोगाची थोडक्यात माहिती पाहू या.
पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी आणि ऑस्ट्रिया या देशांची अवस्था केविलवाणी झाली होती. मंदी बेरोजगारी यामुळे समाजाला जणू पक्षाघात झाला होता. या संकटातून मार्ग काढण्यासाठी ऑस्ट्रियातील वर्गेल या गावाच्या नगराध्यक्षाने नवे चलन प्रसृत केले. 4500 वस्तीच्या या गावात 1500 लोक बेरोजगार होते. 200 कुटुंबाना खायला नव्हते. पण करण्यासारखी कामे अनेक होती. नव्हता तो पैसा. नगरपालिकेचा उपलब्ध 40,000 शिलिंगचा निधी म्हणजे नव्या चलनाची ‘गॅरेन्टी’. त्या पाठबळावर नव्या एक, पाच व दहा शिलिंगच्या चिठ्या वापरण्यात आल्या. त्यांच्यावर दर महिन्याला 1% कर पडे. म्हणून लोक पैसा जवळ न ठेवता वापरून टाकत. यामुळे व्यवहार वाढले. चलनावरील करातून गरिबांसाठी ‘लंगर’ सारखे अन्नछत्र चालवण्यात आले. नवे चलन (एकूण 40,000 शिलिंग) वाटले कसे? पालिकेच्या कामांचे पैसे नव्या चलनात दिले. प्रयोग संपवून ‘चट्टा-मट्टा’ करण्याचे वेळी नव्या चलनाऐवजी जुने मिळू शकेल हा भरवसा सर्वांना होता.
हा प्रयोग जुलै 1932 ते नोव्हेंबर 1933 इतके दिवस चालला. त्याचे यश पाहून इतर गावे अनुकरण करू लागली. पण अखेर सरकारने पर्यायी चलन-व्यवस्थेचे प्रयोग बेकायदा ठरवून बंद पाडले. पण पुन्हापुन्हा पर्यायी चलने डोके वर काढतात.
वीस वर्षांपूर्वी कॅनडामध्ये मच्छीमारीचा धंदा बसला. त्यावर अवलंबून असलेल्या अॅटलांटिक किनाऱ्यावरील समाजगटांमध्ये 30-40% इतकी बेरोजगारी ठिय्या देऊन बसली. त्यावेळी Local Exchange Trading System (LETS) ही सहकारी व्यवस्था आकाराला आली. सदस्य होण्यासाठी प्रवेश फी आणि वार्षिक वर्गणी द्यायची व खाते उघडायचे. सदस्यांपैकी कोणाला काय हवे वा काय विकायचे आहे याची यादी केंद्राजवळ असते ती बघायची. देणीघेणी ही अंशतः रोख पैशात व अंशतः पर्यायी चलनात करायची. प्रत्येक व्यवहाराची नोंद केंद्रामध्ये करायची. प्रत्येक सदस्य पर्यायी चलनात कोणाचे किती देणे लागतो याची माहिती केंद्रातून सर्वांना देत राहायचे. उधारी वाढली तर त्या सदस्यावर दबाव आणून ती घटवायची. असा सगळा व्यवहार असतो. एक कॉम्प्यूटर ही एक गोष्ट जवळ असली तर कोणत्याही सहकारी गटाला हा उपक्रम सुरू करता येतो. असे प्रयोग भारतातही होण्यास हरकत नसावी.
अनिल गोरे, 40 एम्प्रेस गार्डन व्ह्यू सोसायटी, सुपारी बागेजवळ, पुणे — 411 001

मार्च 2003 च्या आपल्या अंकात श्री रा. रा. केशवराव जोशी यांचे गाय व बैल कापण्याच्या विषयावर एक पत्र आहे. पत्रात आता उल्लेख आहे की “वि. म. दांडेकरांनी . . . म्हटले आहे की” वेदामध्ये गाय कापण्याचे उल्लेख आहेत. गाय कापून खात होते असा अर्थ अभिप्रेत असावा पण अर्थात एका वाक्यावरून अर्थ स्पष्ट होणे अवघड आहे. वेदकालीन समाजात गाय कापून खात असत अशा अर्थाचे उल्लेख सरसकट सापडतात. हल्ली काही पाठ्यपुस्तके बदलण्याच्या संदर्भात उल्लेखांचे प्रमाण वाढले आहे. यासंबंधी सत्य परिस्थिती काय आहे यासंबंधी मला कुतूहल आहे.
वेदांची संख्या चार आहे. प्रत्येक वेदाचे संहिता, ब्राह्मण व उपनिषदे असे भाग आहेत. वेदकाळातील सर्वसामान्य चालीरीतींचा उल्लेख त्या साहित्यात आहे. हे उल्लेख पुरेसे स्पष्ट आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर वेदकाळी सोमरस पीत असत काय यासंबंधी दुमत होणार नाही. कारण अनेक स्पष्ट उल्लेख आहेत. तसेच जेवणामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असे याचेही स्पष्ट उल्लेख आहेत.
आता प्र न असा आहे की गाय कापून खाण्यासंबंधी स्पष्ट उल्लेख कोठे आहे? किती वेळा आहे? जर स्पष्ट उल्लेख नसला तर अस्पष्ट उल्लेख कोठे आहे काय? किती वेळा आहे? मी हे पत्र कोणाला आव्हान म्हणून लिहीत नाही. परंतु या अर्थाचा कोणताही स्पष्ट किंवा अस्पष्ट उल्लेख वर उल्लेखिलेल्या साहित्यात मला सापडला नाही. श्री. रा. रा. केशवराव जोशी किंवा अन्य कोणी वाचक यावर प्रकाश टाकू शकतील काय?
दिलीप दीक्षित, 4-11/167, शासकीय वसाहत, बांद्रा पूर्व, मुंबई — 51

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.