पत्रसंवाद

एप्रिल 2003चा आजचा सुधारक वाचला. दि. 13.9 च्या आजचा सुधारक या अंकातील श्री. मधुकर देशपांडे यांचा ‘मी नथुराम बोलतोय’ हा लेख वाचून श्री. शांताराम कुळकर्णी, पुणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नथुराम नाटकाला सर्व प्रेक्षक नथुराम विचाराचे होते असे कळते आणि नथुराम संख्या आताच का वाढली असा प्र न श्री कुळकर्णी यांनी केला आहे. मला असे वाटते या नाटका-अगोदर ही नथुराम म्हणजे नथुराम विचार होतेच पण ते छुपे होते कारण उघडपणे उदात्तीकरण (त्या विचाराचे) करण्याची धास्ती वाटत होती. आता केन्द्र सरकारात नथुरामप्रणीत सरकार असल्यामुळे त्यांना उघडमाथ्याने प्रचार करण्याची संधी मिळत आहे आणि संख्या नथुरामधर्माची वाढत आहे, पण ती संधीसाधूंच्या रूपात. म.गांधीची विचारसरणी किंवा अहिंसावाद ही एक विचारसरणी आहे. माणसाने माणसाच्या माणुसकीच्या धर्माने वागावे, विचारसरणीचे आचरण करावे समजा आज शंकराचार्यांच्या अनुयायांनी त्यांचे अनुकरण करण्याचे ठरविले तर सर्वांना सुवर्ण सिंहासने करून घ्यावी लागतील. म. गांधीनी भारतात रामराज्य व्हावे असे सांगितले. रामाचे राज्य नव्हे. रामराज्य ही एक विचारसरणी आहे. रामाप्रमाणे आचरण करावयाचे म्हणजे कोण्या एका परिटाच्या सांगण्या-वरून रामाने सीतेचा त्याग केला. त्यानुसार आजकाल पुरुषांनी आपल्या बायकोचा त्याग करणे इष्ट आहे का? तेव्हा आचरण आणि विचारधारा यांतील फरक समजावून घ्यावा. आजकाल सगळेच हिंदू धर्मासाठी त्रिशूळ घेऊन दाढी वाढवून, जमले तर सिंहासनावर बसून साधू होऊ पाहात आहेत. भगवी वस्त्रे नेसत आहेत म्हणून ते संत नव्हेत, ते साधू आहेत. तेव्हा भारत देश हा संतांचा देश आहे. साधू महंताचा नाही आणि येथे दहशतवाद, नथुरामवृत्ती रुजणार नाही. येथे मानवतावादच रुजेल.
आजकाल जगात गांधी विचारसरणीचाच प्रसार आणि प्रचार मान्य होत आहे गांधीवादाला मरण नाही पण नथुरामवृत्ती ही घातक आहे आणि माणुसकीचा अंत नथुराम-वृत्तींतच जोपासला जाईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुजरात राज्य. लेखकाने म्हटले आहे की पुढारी सांगतात, ‘तुम लढो’. आजकाल नथुराम पुढारी असेच सांगतात, मारो, जलाओ, खून करो. म्हणजे परत सर्वसामान्य माणसेच बळी जातात आणि हे नथुराम स्वदेशीचा मंत्र जपत, विदेशी उपकरणांचा उपभोग घेतात. तेव्हा म. गांधीजी मरताना म्हणाले, ‘हे राम’ ‘हे नथुराम’ नव्हे. तेव्हा नाटककार, साहित्यिक यांनी कोणती मनोवृत्ती लक्षात घेऊन लेखन करावे हा ज्याचा त्याचा प्र न असला तरी बहिष्कार हे उत्तम औषध आहे ह्या भयंकर विनाशकारी रोगांवर आणि म्हणून गांधीवादच श्रेष्ठ आहे, अमर आहे.
सरस्वती देव, 168, वैद्यवाडी, खोली नं 1, ठाकुरद्वार रोड, मुंबई — 400 002

आ.सु. फेब्रुवारी 2003 (अंक 13/11) मधील ‘उत्क्रांती आणि परोपकार’ हे आपले संपादकीय वाचले. “उत्क्रांती म्हणजे प्रगती नव्हे, ते केवळ बदलत्या परिस्थितीशी जुळत्या होत जाणाऱ्या क्षमतांचे चित्र आहे” हे आपण लिहिले आहे. परंतु बदल एवढ्या–पुरताच मर्यादित असता तर पृथ्वीवर वनस्पती इ. स्वतःचे अन्न बनविणाऱ्या यंत्रणा, गुरे माकडे इ. शाकाहारी; वाघ इ. मांसाहारी; गिधाडे, तरस इ. मृतोपजीवी अशा सृष्टीमधील फक्त संतुलन दिसले असते. चतुष्पाद प्राण्यांच्या सृष्टीमध्ये द्विपाद प्राणी अस्तित्वात येणे, तळहातामध्ये अंगठ्याच्या रचनेत बदल होणे, अशा अनेक बाबी ‘बदलत्या परिस्थितीशी जुळत्या होत जाणाऱ्या क्षमतांचे चित्र’ यांच्या पलिकडे आहेत. सोप्या रचना आणि प्रक्रिया (Anatomy, Physiology) असणाऱ्या जीवशास्त्रीय दृष्ट्या ‘खालच्या’ पातळीवरील यंत्रणांच्या जागी गुंतागुंतीच्या रचना आणि प्रक्रिया असणाऱ्या ‘वरच्या’ दर्जाच्या यंत्रणा अस्तित्वात आल्या. ही प्रगतीसुद्धा आहे.1 परिस्थितीतून हळूहळू होणाऱ्या, तुटपुंज्या आणि बिनभरवशाच्या प्रगतीवर प्रवाहपतिताप्रमाणे विसंबून न राहता, यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही मानव (इतर प्राण्यांप्रमाणेच) करतो. मानवेतर निसर्गात होणाऱ्या सर्व घटना सर्वोत्तम आणि मानवाने घडविलेले बदल कमअस्सल असे समजणे चूक आहे.2 मानवा-पाशी हेतु आणि योजना यांची क्षमता आहे (असे किमान मानवाला तरी वाटते). त्यामुळे त्यांचा वापर, गैरवापर किंवा अभाव यांची मानवावर जबाबदारी येते. इतर निसर्गातील घटनांमागे (मानवाच्या दृष्टीतून) यांचा (हेतु आणि योजना ह्यांच्या क्षमतेचा) अभाव असतो. मानवास योग्य वाटणारी मूल्ये मानवेतर निसर्गात असोत अथवा नसोत, मानवेतर निसर्गाचा विचार न करता ती वृद्धिंगत केली पाहिजेत. माणसाची एखादी कृति योग्य किंवा अयोग्य? हे ठरविण्यासाठी मानवेतर निसर्गाचे मानदंड लावणे चूक आहे.
विज्ञानाच्या पद्धती ठामपणे वापरून समाजापुढील प्र न सोडविता येतात या तुमच्या मताशी मी संपूर्ण सहमत आहे. ‘विज्ञाना’चीसुद्धा व्याप्ति फार मोठी आहे. विज्ञानामध्ये नैसर्गिक भागाबरोबरच सामाजिक विज्ञानाचासुद्धा अंतर्भाव होतो. नीतिमत्ता, वर्तणूक यांचा विचारसुद्धा वैज्ञानिक पद्धतीच्या आधारेच करावयास हवा. ‘केवळ मानवेतर निसर्गात चालू आहेत म्हणून नीतिमूल्ये योग्य आहेत’ हा विचार (नैसर्गिक + सामाजिक) विज्ञानविरोधी आहे. वि वाची रचना मानवकेंद्रित नाही.3
जीन्स निवडले जाण्याच्या प्रक्रियेबाबत आपण लिहिता “एखादे अपत्य स्वतःचा बळी जाऊ देते,” आणि पुढे असेही लिहिता की, “ही क्रिया राजीखुशीने (इ.) होत नाही”. यामध्ये परस्परविरोध आहे. कीड पडली, गुर गवत खाऊ लागली की वनस्पती विषारी वायु सोडतात (किंवा या विषारी वायूपासून वाचण्यासाठी गुरे खाण्याची जागा बदलत राहतात) या मागे (स्व) अर्थ किंवा हेतु, तसेच आपण लिहिता त्याप्रमाणे या क्रियामागे (मानवी अर्थाने) कोणतीही जाणीव इत्यादीसुद्धा नसतात. ‘जीन्स आणि त्यांच्या क्षमता’ यांची पुरेशी व्याप्ति लक्षात घेतली जात नाही. जीन्सचे सर्व गुणधर्म व्यक्त होतीलच असे नाही. परिस्थितीनुसार काही किंवा सर्व गुणधर्म व्यक्त होऊ न देणे, तसेच प्रतिक्षिप्त क्रिया शिकणे (Conditioned Reflex) आणि परिस्थितीनुरूप त्या करणे, हेसुद्धा जीन्सच्या क्षमतेत येते. जन्मापासूनच्या होणाऱ्या सामाजिक प्रक्रियांमधून शिकलेल्या प्रतिक्षिप्त क्रियांमध्ये खाणे-पिणे, लिहिणे-बोलणे इत्यादी शारीरिक क्षमता तसेच आचरण, नीतिमत्ता इत्यादी सामाजिक क्षमता यांचा अंतर्भाव होतो. परिस्थितीकडून सातत्याने मिळणाऱ्या संवेदना (Stimuli) अनुरूप व्यक्त होण्याच्या जीन्सच्या क्षमतेवरच माणसाची प्रत्येक कृती अवलंबून असते. DNA ची रचना, त्यानुसार होणारी संप्ररके (Enzymes) रचनेपुरतीच ‘जीन्स आणि त्यांच्या क्षमता’ सीमित नसून, सामाजिक प्रक्रियांमध्ये व्यक्त होणारी यंत्रणा अशी व्याप्ति आहे.
[1. अंक (14.2) मधील 49 पानावरचे टायपिका पाकोळीचे उदाहरण उत्क्रान्ती म्हणजे प्रगती नव्हे हे दाखवायला पुरेसे आहे. तरीही पूरक ‘वाचन’ सुचवतो—-रिचर्ड डॉकिन्सची द सेल्फिश जीन, द ब्लाइंड वॉचमेकर व इतर पुस्तके; स्टीफन जे गुल्डचे ‘वंडरफुल लाइफ’, व इतर पुस्तके; जरासेच कालबाह्य म्हणून जॉन मेनार्ड स्मिथचे ‘थिअरी ऑफ इव्होल्यूशन’.
2. असे मी कुठे सुचवलेले देखील नाही!
3. वरीलप्रमाणेच.
4. माझ्या मांडणीच्या आंशिक विस्ताराबद्दल धन्यवाद!
मागे खाजगी पत्रातून केलेली विनंती जाहीरपणे करतो—-केवळ प्रतिक्रियात्मक न लिहिता वेगळेही लिहावे.
— संपादक
राजीव जोशी, ‘तत्वबोध’, हायवे, चेनाक्याजवळ, नेरळ, (रायगड) — 410 101

माझ्या वाचनात ऑक्टोबर व नव्हेंबर 2002 चे अंक आले. ह्या मासिकाबाबत आतापर्यंत मी अनभिज्ञ होतो. दोन्हींतील लेखांबद्दल —-
जाती आणि निसर्गाचे दोहन (धिस फिशर्ड लँड–6) ह्या लेखाचा शेवट असा केला आहे की जगभर जुन्या जीवनशैलीच्या विनाशातूनच नव्या जीवनशैली प्रस्थापित झाल्या. भारतात मात्र जुन्या जीवनशैलींना सामावून घेत आणि जातिव्यवस्थेत स्थान देत शेती स्थिरावली. एकेश्वरी धर्मामध्ये शक्य नसलेली ही घटना समावेशक हिंदू धर्मात घडली. भूतकाळात हे हिंदूंचे सहिष्णू रूप दिसत असे आता ते बदलत आहे. हेच मी निसर्गाव्यतिरिक्त दुसऱ्या संदर्भात लिहीत आहे.
जी समावेशकता हिंदू धर्मात घडली ती शक, हूण, मोंगोल व ग्रीक ह्यांच्या-पुरतीच घडू शकली असे दिसते. आता त्या जातीचे, नावाचे कोणी भारतात नाहीत. पण मुसलमानांना व ख्रि चनांना हिंदू धर्म सामावून घेऊ शकला नाही. ह्याची कारणे अनेक असतील पण त्यातील एक आत्यंतिक कडवा मूलतत्त्ववाद व आत्मप्रौढी हे असावे. सहिष्णु रूप भूतकाळात दिसत होते, पण त्याचा अतिरेक झाला व एका गालावर थप्पड मिळाल्यास दुसरा गाल पुढे कर, ह्या तत्त्वज्ञानामुळे सगळेच चुकत गेले. ह्याऐवजी अंक थप्पड मिळाली तर समोरच्याच्या दोन्ही गालांवर एक एक थप्पड मारा असे झाले असते तर दोन्ही धर्मांच्या बाबतीत समावेशकता घडली असती बावळटांच्या कळपात कोण कशाला येईल? आता प्रतिक्रिया सर्वत्र दिसते आहे. किती दिवस आगळीक सहन करणार? व अरेरावी तर मुळीच सहन केली जाणार नाही. जर विसाव्या शतकाच्या सुरवातीसच हे घडले असते तर हिंदुस्थानाचे विभाजन झाले नसते. हिंदूला एका मानसिक गुलामगिरीत ढकलले, हे करणारे हिंदूच व आतासुद्धा हिंदू मिलिटन्सी विरुद्ध आरडा ओरडा करणारे हेसुद्धा हिंदूच परस्पर-कैवाऱ्यांकडून काम होत असेल तर आगळीक करणारा कशाला काही बोलेल?
Every action has got reaction पण आपल्या मानसिक गुलामगिरीमुळे ही रिअॅक्शन आधी घटना जुनी झाल्यावर व्हायची पण आता तसे नाही. Fundamentalist Mititancy ला विरोध, जरूर पडल्यास थोडे मागासलेपणाकडे जाऊन त्यांच्या मानसिकतेप्रमाणेच स्वतःला तयार करून परिणामकारक उत्तर आपण देऊ शकू. संस्कृतीचे गोडवे गायला आपण शिल्लकतर रहायला पाहिजे ना? तसे कणखर नेतृत्व भारतात तयार होऊ शकले नाही किंवा होऊ दिले नाही. त्याला उपेक्षित करून हनन करण्यात आले. त्याला बुवाबाजीच्या मागे लागलेले लोकच (Mass) जबाबदार आहेत. आता त्याच्या विपरीत घटना घडत आहेत. ह्याला ऐतिहासिक घटनाच म्हणावे लागेल. नाहीतर हिंदू म्हणवून घेतले तर “जोशी काय म्हणतील” हे तत्त्वज्ञान आपल्याच लोकांनी आपल्यात भिनवले होते की आपल्याला असे म्हणणे पाप वाटायला लागले होते. भीरुता होतीच, कारण संघटनेचे बळ पाठीशी नव्हते, आधार नव्हता. ‘गर्व से कहो हम हिन्दू हैं’ ही तशी एक पुळचट घोषणा आहे पण सुरुवात करून द्यायला ठीक आहे. पण ह्याच्या पुढे ‘गर्व से कहो हम प्रतिकार करनेवाले हिंदू हैं, न कि मार खाने वाले” अशी घोषणा द्यायला पाहिजे. अरेरावीला व सहन करायला एक सीमा असते व त्याचा प्रतिकार हे सर्व आवश्यकतेनुसार घडत आहे. कालाय तस्मै नमः हेच खरे. जाता जाता : मधुकर कांबळे यांची व्यथा
वरील संदर्भात अयोग्यच आहे. दलित, वनवासी, किंवा आदिवासी यांना या सर्वसमावेशक बुद्धीने आपल्यात एक करून घेण्याचा हा प्रयत्न स्तुत्यच आहे. ही जागृती आपल्या देशाला उपयोगीच पडणारी आहे. सारखे मनुवादावर घसरणाऱ्या लोकांना हे उत्तरच आहे. ह्या कामाचा गवगवा न करता आसाम व पूर्वेतील राज्यांपासून प िचमेकडील डोंगरजंगलापर्यंत हे काम चालू आहे. सवर्ण हिंदू समाजाने काहीही केले तरी काहींचे फक्त condition केल्यासारखे पोट दुखते व देशासाठी त्याचे होणारे फायदे लक्षात न घेता फक्त धोपटत राहायचे. 1948-49 मध्ये गोध्रा येथे पिंपुटकरांवर गोळ्या झाडल्या गेल्या तेव्हा आगळीक करण्याचे ठरलेलेच होते. तेव्हा मुसलमानांच्या अरेरावीपीडित शेकडो आदिवासी उट्टे काढण्यासाठी आले. तेव्हा कांबळे यांनी उल्लेखिलेल्या शाळा नव्हत्या ना? हा उद्रेक असतो जो नैसर्गिक असतो.
[स्वतःला हिंदू, मुस्लिम, दलित, सवर्ण, अशा झेंड्याखाली उभे करूनच ‘गर्व’ वाटावा, हे मला काहीसे केविलवाणे वाटते. ‘समावेशकता'(तिचा नेमका अर्थही चर्चिला जायला हवा) नेहमीच सर्व माणसांना लागू व्हावी, हा उपयोगितावादी दृष्टिकोन. त्या-ऐवजी अमक्याने तमक्याला समाविष्ट करून घेणे, हे आति गर्विष्ठापणाचे आणि आढ्यताखोर-पणाचेच लक्षण नाही का? —- संपादक]
काशिनाथ विष्णु साठे, 1891 सदाशिव पेठ, नातूबाग, पुणे — 411 030

मार्च 2003 च्या अंकातील “बेरोजगार” ह्या शीर्षकाखालचा लेख वाचला. विषय जवळचा वाटला, करिता परत वाचला. त्याचा वृत्तांत देण्याचा हा प्रयत्न. याच्या उत्तरातून विषय जास्त स्पष्ट व्हावा. पैशाचे सोंग आणता येत नाही, हे व्यक्तीने म्हणणे आणि राष्ट्रीय सरकारने अगर राज्य सरकारने म्हणणे यांत फार अंतर आहे हा मुद्दा योग्य आहे. असे म्हणताना व्यक्तीच्या उत्पन्नाच्या मर्यादा अल्प असतात.
1. हे म्हणताना ‘आपल्या’ मुलांना काही स्वीकार संकेत देण्याचा ‘उद्देश’ असतो. मात्र सार्वभौम सरकारांना असे म्हणून राष्ट्रीय विकासाची जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. कारण पैसा उभारण्याचे वा निर्माण करण्याचे अनंत मार्ग शासनापुढे उपलब्ध असतात. शासनाने लोकांना सतत उद्योगाला प्रोत्साहित केले पाहिजे.
जी सरकारे आपल्या खर्चात काडीचीही कपात करत नाहीत, त्यांना हे म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही. प्रशासनात विकास-योजनांच्या खर्चाच्या किती टक्के खर्च नोकर-वर्गावर व्हावा याला बंधन आहे. मात्र किती संसद सदस्य अगर विधिमंडळ सदस्य-संख्येच्या किती मंत्री असावेत याला व त्यावर होणाऱ्या खर्चाला मर्यादा नसावी? लोकसभा, विधानसभा काही काम न होता, संस्थगित होतात. मात्र त्या दिवसाचे वेतन, भत्ते दिले जातात. असो —-
2. बेरोजगारीचा मुद्दा बलुतेदारी व जातीयतेशी जोडण्यात आला आहे. या पद्धती सुरू झाल्या त्या काळचा विचार करता लौकिक शिक्षणाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे अन्न-वस्त्र-निवाऱ्याची नि िचती देण्याच्या उद्देशाने त्या पद्धती सुरू झाल्या असाव्यात. आतासारखी तंत्रनिकेतने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या सोई असत्या तर सर्वच चित्र निराळे दिसले असते. तरीदेखील पारंपारिक ‘उद्योग व्यवसायात हे कौशल्य लवकर’ प्राप्त होते. ते केवळ पुस्तकी शिक्षणातून होणार नाही.
आजही शिक्षण सार्वत्रिक झाले असले तरी एक तर ते सामान्यांच्या आर्थिक कुवतीबाहेरच आहे. म्हणूनच डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, वकिलाचा वकील, मुलकी अधि-काऱ्याचा मुलगा प्रशासकीय सेवतील उच्च पदे प्राप्त करू शकतो. अर्थात या ठिकाणी बौद्धिक वारसा आणि आर्थिक सम्पन्नता ह्या दोन्हींची सांगड लागतेच. मात्र राजकीय क्षेत्रात बाजी मारणारा बाप त्या क्षेत्रात पदाधिकारी असला की भागते. ‘सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते’ तेव्हा फारसा फरक लवकर पडेल असे वाटत नाही.
3. राहणीमान —- राहणीमान वाढण्याचे परिणाम प्रत्येकाच्या घरात अत्याधुनिक सोईसुविधा, विजेची उपकरणे, दूरध्वनि, संगणक, घर, गाडी इ. प्राप्त झाल्या म्हणजे राहणीमान उंचावले’ असे म्हणावे का असा आपला प्र न पण कोणते परिमाण वापरणार? अर्थात हे मान्य या सुविधा सेवा प्राप्त करण्याची ‘अर्थशक्ति वाढली पाहिजे व ती विशिष्ट वर्गाचीच फक्त नको तर प्रत्येक समाजघटकाला ती घेण्याची क्षमता आली पाहिजे. हे तत्त्व मान्य व्हायला हरकत नाही. परंतु याकरिता उत्पादनवाढ, त्यात सर्वांचा सहभाग आणि लोकसंख्यावाढीवर मर्यादा नक्कीच आवश्यक आहेत. परंतु जोवर यावर योग्य नियंत्रण, म्हणजेच शिक्षण-उद्योग-जीवनातील निरनिराळ्या क्षेत्रांची ओळख होणे गरजेचे आहे. अन्यथा फक्त श्रमिक, मजूर आणि झोपडपट्ट्याच वाढत राहणार. कारण आम्हाला घरकामा-साठी गडी, मोलकरीण मिळण्याकरता हा वर्ग फार मोठा होऊ नये हीच आमची मनोवृत्ती.
शिक्षकापेक्षा विद्यार्थी हुशार होण्याचे प्रयत्न जोपर्यंत शिक्षकाकडूनच होणार नाही तोवर खुरटी प्रजा निर्माण होणार. ही परिस्थिती बदलण्याकरता, प्रत्येक समाज-घटकाने असा विचार केला पाहिजे. मला स्वत:करता कपड्याचे जोड असावेत, मला व माझ्या कुटुंबास राहायला एक घर पुरेसे आहे. वर्षभर पुरेल इतकेच अन्नधान्य मी साठवीन. तसेच मिळकतीतला काही भाग मी समाजाकरता वेगळा ठेवीन इ. ही यादी खूप वाढू शकेल. परंतु मला वाटते हे स्वप्नरंजनच ठरेल. कारण वास्तवात स्वदेशीवर भाषण देण्याऱ्याच्या अंगावर भारी सूट असतो, गाडी असते. दोनचार घरे-बंगले असतात, मुले परदेशात शिकत असतात. अगर नोकरीत असतात, बाप कम्युनिस्ट लीडर असतो.
सगळीकडे हेच चित्र आहे. माझ्या पाहण्यात फक्त जॉर्ज फर्नांडिस हे एकमेव मंत्री कायम साध्या वेशात दिसतात. आणि दुसरे श्री राम नाईक.
असे सगळे असताना सुधारणेकरता सर्वंकष ठोक कार्यक्रम सर्व समाजाचा विचार करून राबवावा लागेल. अन्यथा शिक्षणाचा व विद्यार्थ्यांचा विचार दरवर्षी मार्च ते जून होत असतो, रकाने भरभरून सूचना, परिसंवाद तज्ज्ञांचे होतात. आणि शाळा कॉलेजेस सुरू होतात ती जुन्या पठडीतल्याप्रमाणे. असे व्हायला नको.
दिगंबर वाळिंबे, पुणे — 51

पाळीव आणि पवित्र
19 व्या व 20 व्या शतकात गांधीजी राजकारण व समाजकारण अशा दोन्ही अंगांनी दूरगामी कार्यक्रम ठरवीत व त्याचा पाठपुरावा करीत. राजकारणात असहकार, सविनय कायदेभंग, सत्याग्रह (निःशस्त्र प्रतिकार) या नावांनी त्यांचे कार्यक्रम ओळखले जात. समाजकारणात अस्पृश्यतानिवारण, हिंदु-मुसलमान ऐक्य, नवे शिक्षण, उर्दू व हिंदी यांच्या मिश्रणाची हिंदुस्तानी भाषा, इत्यादी कार्यक्रम होते. अर्थकारणात सूतकताई व खादी, शेतीप्रधान व खेडीप्रधान उत्पादन, गोरक्षण, असे परस्परपोषक कार्यक्रम होते. एका त-हेच्या कार्यक्रमाला विधायक किंवा रचनात्मक म्हणण्याची चुकीची प्रथा होती. राजकारण, म्हणजे नागरिक व शासनसंस्था यांचे दैनंदिन संबंध, मग ते लोकशाहीचे असोत किंवा हुकुमशाही राजवटीचे. हे सुद्धा रचनात्मक कार्य असते आणि समाजकारण अर्थकारण यांच्याहून गौण किंवा पुढे ढकलण्याजोगे कार्य नसते. तांत्रिकीची प्रगति राज-कारण व समाजकारण यांच्याहून मूलभूत समजणे हेसुद्धा चुकीचे होय.
शेतीसाठी बैल व दुधासाठी गाई यांना पाळणे, म्हैस-रेडे पाळण्यापेक्षा फायद्याचे ठरते. भाकड जनावरे, नैसर्गिकरीत्या मेलेली जनावरे, यांचा कातडीसामानासाठी उपयोग होऊ शकतो. तेव्हा गोरक्षण हे गोभक्षणाहून श्रेयस्कर ठरते. इ.स.पूर्व काळात हिंदू गोभक्षण करत यावरून अर्वाचीन काळात गोभक्षण करावे वा करू नये असा निष्कर्ष काढता येत नाही. माणूस हादेखील एक उपयुक्त पशू आहे. पण म्हणून कौटुंबिक नात्यांमध्ये कामपूर्ति करणे भूतकाळात केव्हा तरी जरी होत असले तरी आता ते निषिद्ध मानणे नैतिक ठरू शकते. नरमांस-भक्षणाने प्रथिने मिळत असली म्हणून गुटगुटीत बालकांना ठार मारावे हे अनैतिक होय. डीन स्विफ्ट यांनी इंग्रजी सरकारांना आयरिश मुलांची शिकार करू द्यावी असे उपरोधाने लिहिले ते प्रसिद्धच आहे.
धर्मशास्त्राचा इतिहास लिहिणारे महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी शंख व लिखित या बंधूंनी रचलेल्या धर्मसूत्रांवर 1926 साली भांडारकर इन्स्टिट्यूटच्या वार्षिकात लेख प्रसिद्ध केला होता. 419 व्या सूत्रात कोणाकोणाचे मांस खाणे निषिद्ध आहे अशी 13 प्राण्यांची नांवे दिली आहेत. शेवटच्या 12 व 13 या क्रमांकावर गो व मानुष ही आहेत. त्या पापावर तोडगा म्हणून चान्द्रायण व्रत करण्यास सांगितले आहे.
विनोबा गोरक्षणावर खूप भर देत. त्यांच्या दृष्टीने गाय ही आईएवढी पवित्र होती. पवित्रता ही (अंध) श्रद्धा असली तरी दैनंदिन आचरण तिच्यामुळे सुलभ होते. जसे की गुरूवर (अंध)श्रद्धा ठेवली तर शास्त्रीय संगीत चांगल्या रीतीने मिळते. केवळ फायदातोटा पाहावयाच्या असल्यास ताया झिंकीन (Taya Zinkin) यांचे ए. डी. गोरवालांच्या Opinion मध्ये व अन्यत्र आलेले लेख पाहावे. परंतु एखाद्या घटक राज्यात गोरक्षणाचा कायदा काँग्रेस सरकारने केला तर ते सरकार गांधी-विनोबा यांच्या परंपरेला धरून होईल. या मुद्द्यावर इतर आणि वेगळी मतेही प्रसिद्ध होणार आहेत.
— संपादक
गं. रा. पटवर्धन, 800 भांडारकर रोड, पुणे — 411 004

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.