पत्रसंवाद

गांधींना छोटा करणारा नथुराम मोठा कसा?
एप्रिल 2003 चा आजचा सुधारक वाचला त्यातील शांताराम कुलकर्णी यांच्या पत्रावर माझ्या प्रतिक्रिया देत आहे.
‘महात्मा’ही गांधींना मिळालेली पदवी त्यांच्या महान कार्याविषयीची पोहोच पावती होती. ‘अहिंसा’, ‘सत्याग्रह’ यासारख्या प्रभावी हत्यारांनी, शांततामय मार्गांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अध्यात्माचा आधार घेऊन गांधींनी नैतिकतेतून सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार केले. म्हणूनच स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर हाच महात्मा स्वतंत्र भारताचा ‘राष्ट्रपिता’ झाला.
आपल्या पित्याविषयीसुद्धा वाईट विचार व्यक्त करताना मुलगा आपल्या घराण्याच्या संस्कृतीचा चांगल्या विवेकी जीवनमूल्यांचा विचार करतो. ‘पिता’ हा कुटुंबाचा पालक असतो, म्हणूनच कुटुंबीय त्याला गुणदोषासहित स्वीकारीत असतात. ‘वसुधैव कुटुंबकम्’। या हिंदूधर्मीयांच्या ‘सर्व विश्वच एक कुटुंब आहे’ या विराट धर्मसंकल्पनेच वारंवार कौतुक केले जाते. परंतु जगाच्या मानाने भारत हे एक छोटे कुटुंब मानले तर या छोट्या कुटुंबात (भारत देशात) भारतीय संस्कृतीने ‘महात्मा गांधींचे’ केवळ दोषच नथुरामाच्या चरित्रनाट्यातून ‘व्यक्ती-अभिव्यक्ती’ स्वातंत्र्य या गोंडस नावाखाली जाहीरपणे समाजापुढे दाखविले जाताना दिसत आहेत.
यातून एकच वाईट गोष्ट साध्य करावयाची आहे असे दिसून येते. ती म्हणजे अहिंसेवर हिंसेचा, नैतिकतेवर अनैतिकतेचा व अध्यात्मिकतेवर कडव्या हिंदुत्ववादाचा ‘विजय’ संपादन करण्यासाठी ‘नथुराम बोलतोय!’ सामान्य माणसाच्या भावना भडकवतोय. गांधीना छोटा करून नथुराम स्वतः मोठा होऊ पाहत आहे, म्हणूनच नथुरामचे बोलणे ऐकू नये, तर त्यावर बहिष्कार टाकावा. तेच योग्य होईल.
गांधींच्या विचारांना, गांधीवादाला छेद द्यावयाचा असेल तर तो अहिंसा, सत्या-ग्रह, आध्यात्मिक अधिष्ठान या वैचारिक पातळीवरूनच करावा लागेल. केवळ गांधी आणि गांधीवाद संपविण्यासाठी नथुरामला बोलू द्यायचे हे भारतीय नागरिकाने सहन करू नये. [बहिष्कार हवा, बंदी नको!—सं.]
विजय वर्षा, ‘चार्वाक’, अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा

तुम्ही 14.2 या अंकाच्या संपादकीयात म्हटल्याप्रमाणे न्या. कृष्ण अय्यर यांचे नाव वाचल्यानंतर ‘तो कृष्णा अयर ना? तो कम्युनिस्ट आहे’ हाच विचार माझ्या मनात आला. पण तुम्ही म्हणता त्या ‘जातीचा’ मी नाही. न्या. अय्यर व समितीतल्या इतर सभासदांना माझा विरोध नाही. पण न्या. अय्यर व समितीच्या इतर सभासदांनी ह्या समितीवर काम करण्याआधी आपल्याला समाजात किती क्रेडिबिलीटी आहे, ह्याचा विचार करायला हवा होता. नाहीपेक्षा तुम्ही म्हणता त्या ‘जातीचे’ लोक, हा कृष्ण अय्यर, तीस्ता सेटलवाड लोकांचा अहवाल पक्षपातीपणाचा आहे असे म्हणून त्या अहवालाची किंमत शून्यावर आणून ठेवतील.
जसा सरकारांकडून माहिती मिळवण्याचा जनतेला अधिकार आहे तसाच अशा समित्यांकडून माहिती मिळवण्याचा अधिकार जनतेला आहे. समितीतल्या सभासदांची नावे वाचल्यानंतर मला प्र न पडला तो असा की ह्या समितीवर काम करायला कोणी गुजराथचा निवृत्त न्यायाधीश वा इतर सामाजिक कार्यकर्ते मिळाले नाहीत का? (हे प्र न मी त्या संस्थेला वेगळे पत्र लिहून विचारतो आहेच.) कोणी माजी (गुजराथेत काम केलला) पोलिस अधिकारी वा तिथल्या विश्वविद्यालयातला आजी वा माजी प्राध्यापक मिळाला नाही का? एका दृष्टीने हे सगळे ‘बाहेरचे’ लोक ठरतात. अर्थात ‘बाहेरचे’ व ‘आतले’ लोक असा फरक मी करणार नाही. पण शेवटी हा अहवाल, त्यात काढलेले निष्कर्ष व सूचना मुख्यत्वे गुजराथच्या जनतेकरता आहेत ना? त्या जनतेला ही समिती ‘आपल्या’ लोकांची आहे, असे वाटणार कसे? आणि त्या अहवालाचा फायदा काय? ‘आणखी एक अहवाल’ एवढेच त्याचे स्वरूप राहील, असे तुम्हाला वाटत नाही का?
‘इतिहास गेला खड्यात—खरा प्र न काय आहे?’ हे फोर्डचे वाक्य देऊन तुम्ही त्या विचाराशी तुमची (नंदा खरे) संमती दाखवली आहे. पण ज्या समितीच्या अहवालाची तुम्ही भलावण करता आहात, तो नुकताच घडलेला ‘इतिहास’च नाही आहे का? मग तुम्ही त्या अहवालाची चर्चा न करता, प्र न काय आहे, व तो सोडवायचा कसा? ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे होतेत.
खरी गोष्ट अशी आहे, की तुम्ही किंवा तुमचे विरोधक किंवा कुणीही इतिहासा-पासून दूर राहू शकत नाहीत. फोर्डची गोष्ट वेगळी. आजचे सगळे प्र न व त्यांची मुळे इतिहासात दडलेली आहेत. जर इतिहासच कळला नाही वा तो समजून घेतला नाही, तर कोणत्याही प्र नाचे उत्तर शोधणे अशक्य होईल किंवा चुकीचे उत्तर मिळण्याचा संभव राहील, हे नक्की!
गोध्रा-गुजरात ही कारण-परिणाम किंवा कारण-कार्य अशी जोडी आहे, हे तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. तुमच्या मते गोध्याला कारण आहे; व ते आहे अयोध्या, असे तुम्ही म्हणता पण ‘अयोध्या’ होऊन आता जवळ-जवळ दहा वर्ष झाली आहेत. जाळल्या गेलेल्या डब्यातल्या प्रवाशांचे वर्तन त्यांना जाळून टाकण्याइतके भयानक होते का? आणि तसे असले तरी त्यांना जाळून टाकण्याचा अधिकार गोध्याच्या लोकांना कुणी दिली? एकंदरच न्या. अय्यर वगैरे मंडळी गोध्याबाबत बोटचेपेपणाचे धोरण अवलंबत आहे, असा जनतेचा समज होत चालला आहे, किंवा झाला आहे. तो योग्य नाही. त्यामुळे विरोधकांचे फावते, हे लक्षात घ्यायला हवे.
बरे, तुम्ही कारण-परिणाम मीमांसा करताना गुजरातला कारण गोध्रा, गोध्याला कारण अयोध्या एवढे म्हणून थांबता का? अयोध्येला कारण काय? ह्या प्र नात तुम्ही जात नाही. अयोध्येला कारण आहे बाबराने रामजन्मभूमी मंदिर पाडून तिथे मशीद बांधली हे आहे. बाबराने मंदिर का पाडले? त्याला काय कारण होते? त्या प्र नात तुम्ही जाणार आहात की नाही. की तो प्र न ‘परिवारा’वर सोडून मोकळे होणार आहात?
पण अयोध्या प्र न फक्त ‘परिवारा’चा राहिलेला आहे, असे मला वाटत नाही. गेल्या पन्नास वर्षांत सर्वसामान्य हिंदू माणसाची मानसिकता बदलली आहे. मुस्लिम द्वेष, पाकिस्तानच्या अतिरेक्यांच्या कारवायांमुळे बळावतो आहे. त्यावर काहीतरी तोडगा काढायला हवा, हे न्या. अय्यर व मंडळीच्या लक्षात आले आहे का?
गुजरात पूर्वनियोजित होते, तसेच गोध्रा पण पूर्वनियोजित होते की काय? ह्याचा समितीने विचार केला आहे ? गुजरात दंगलीत मध्यमवर्गाच्या स्त्रियांनीही भाग घेतला होता, हे कशाचे लक्षण आहे? ह्यावर उपाय व्हायला हवा. न्या. कृष्ण अय्यर ह्यांच्या समितीने तसा विचार केला असेल असे वाटत नाही. गुजरातची सगळी जबाबदारी परिवारावर व मोदी सरकारवर टाकून ते मोकळे होतील. अर्थात तुम्ही पुढल्या अंकातून समितीच्या अहवालाचे काही भाग देणार आहातच. त्यावरून काही गोष्टी कळतीलच.
[1. उच्च व सर्वोच्च न्यायालयांतील न्यायाधीश पक्षपातीपणा करतील, तेही लाभहानीच्या शक्यता नसलेल्या स्थितीत(!) हे ‘मानूनच’ चालायचे का? त्यांनी ‘अमक्याचा विचार केला होता का?’ किंवा ‘तमक्याचे निष्कर्ष बोटचेपेपणाचे आहेत’ वगैरे सुचवाय च्याही आधी अहवालाचा सारांश पाहावा, फार शंका वाटल्यास मूळ अहवाल पाहावा, हे बरे.
___2. ‘निष्कर्ष व सूचना मुख्यत्वे गुजरातच्या जनतेकरता’ नसून संपूर्ण भारता-साठी आहेत. आणि निःपक्षपाती चौकशी घटनेच्या दूरच्या लोकांनी करणेच बरे. आजच (30/05/03) टाईम्स ऑफ इंडियात “वडोदऱ्यातील वकील दंगलग्रस्त साक्षीदार जिवाच्या भीतीने ‘उलटत आहेत’, अशी तक्रार करतात,” अशी बातमी आहे.
3. इतिहास म्हणजे किस्से-कहाण्याच फक्त नाही. सामाजिक आर्थिक-राजकीय अशा चित्रांची पातळी इतिहासाने उदाहरणांमधून गाठायला हवी. बाबर-औरंगजेबांच्या जिझीयाला त्रिशूळदीक्षेचे उत्तर, हा अगम्य ‘उशीर’ म्हणजे इतिहास नव्हे. विषय निघालाच म्हणून सांगतो—-1857 च्या काळाबद्दलचे अनुभव सांगणारे वरसईकर गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ हे पुस्तक बाबरी मशिदीजवळ रामजन्म झाला, हे शंकास्पद ठरवते. तसा उतारा आ.सु.च्या मुखपृष्ठावर मागेच दिला होता.
4. इथे प्रयत्न आहे तो ‘सत्ताधारी सरकार आपल्या प्रजेपैकी एका घटकातर्फे दुसऱ्या घटकाविरुद्धची हिंसा करत आहे का, आणि करत असल्यास तशा स्थिती कशा टाळाव्या किंवा हाताळाव्या,’ हा आहे. त्याबाबतचा एक प्रयत्न वाचकांपुढे मांडणे, ही ‘भलावण’ नव्हे.
5. पण या लेखमालेवर यापेक्षाही चढ्या सुरात टीका होईल—-तिची दखल घेणे किंवा न घेणे हा हक्क मात्र संपादकाचाच आहे. —- संपादक
फिरोझ रानडे, बी-10 मेदिनी, विलेपार्ले पूर्व, मुंबई — 400 099

आ.सु. एप्रिल 2003 च्या अंकात श्री. दिलीप दीक्षित यांनी ‘. . . गाय कापून खाण्याचे स्पष्ट उल्लेख कोठे आहेत’ असे विचारले आहे. विस्तारभयास्तव थोडक्यात दिले आहे. इतर जिज्ञासूंनी शोधून तपासावे. ऋग्वेद 10/86/-13 व 10/28-3 मध्ये गाय, घोडे, बैल, डुकरे, व म्हशींच्या मांसाच्या भक्षणाची विधाने आहेत. 10/86-14 मध्ये इंद्र स्वतःसाठी वीस बैल मारण्याकरिता सांगतो. 6/17/11 मध्ये एकेका यज्ञात शेकडो म्हशी कापल्या जात असल्याचे उल्लेख आहे. 10/91-14 मध्ये घोडे, गायी, बैल, म्हशी बळी दिल्या जात असे.10/89-14 अनुसार जागोजागी कसाई घरे होती. 1/19-10 अनुसार सोमरस ठेवण्याकरिता कातड्याच्या पिशव्या वापरणे नित्याचेच होते. ब्राह्मण ग्रंथात, ऐतरेय ब्राह्मण 2/6-6 मध्ये गायी, बैल, इत्यादींना कसे मारायचे याचे निर्देश दिले आहे तसेच कोणाला कोणता मांसखंड अर्पण करावा याचे नियम दिले आहेत—-उदा. जबड्याची दोन्ही हाडे व जीभ प्रस्तोता नामक पुरोहितास, छातीचा भाग उद्गात्याला . . . वगैरे.
शतपथ ब्राह्मण3/4/1/2 अनुसार अतिथीसाठी मोठा बैल मारावा. तैत्तरीय ब्राह्मण 2/7/11/1 अनुसार अगस्त नाभा नामक यज्ञकर्त्याने शंभर बैलांचे बळी दिले होते. शतपथ ब्राह्मण 3/1/2/21 मध्ये याज्ञवल्क्य ऋषींनी निर्देश दिले आहेत की मांस बैलाचे असो की गाईचे, नरम मांसच खाल्ले पाहिजे. तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथात कामेष्टि यज्ञात विष्णू, इंद्र, पूषन्, रुद्र इत्यादी देवतांसाठी कशा प्रकारचे गाई-बैल बळी द्यावे याचे नियम दिले आहेत. वैदिक काळात यज्ञस्थल म्हणजे कसाईखानाच होता. ब्राह्मणपुरोहितच हत्या करणारे, वाटप करणारे व खाणारे होते. यजमान व त्याच्या भार्यांस काही हिस्सा (शेपटाकडील भाग वगैरे) मिळत असे पण सामान्य लोकांना खाऊन उरलेली हाडे कदाचित मिळत असावी अशी वर्णने आढळतात. आरण्यके, सूत्र ग्रंथ, उपनिषदातही मांसभक्षणाचे पुरावे मिळतात. गोमांस-गोचर्माला विशेष महत्त्व आहे. ते पवित्र आणि शुभ आहे.
अद्वैतवादाचे स्रष्टा आद्य शंकराचार्य बृहदारण्यक उपनिषदावर भाष्य करताना म्हणतात (6/4/18 य इच्छेत् पुत्रो मे . . . जनयित्वा औक्षेणवा ऽऽर्षमेण वा!!)
जर कोणाला आपल्यास विद्वान, पंडित, सर्व वेदांचे अध्ययन करून 125 वर्ष आयूचा पुत्र व्हावा अशी इच्छा असेल तर त्याने पत्नीस सांडाच्या किंवा बैलाच्या मांसाचा तूपमिश्रित ओदन (मांसभाताचा पुलाव) शिजवून खाऊ घालावा . . . मांस वयस्कर बैलाचे असल्यास उत्तम असते.
मनुस्मृतीत मांसभक्षणाचे समर्थन-(अध्याय 5 लोक 56 अनुसार, न मांस भक्षणे दोषः . . . महाफलो) मांसभक्षण, मद्यप्राशन, मैथुनकर्म यात कोणत्याही प्रकारचे पाप, दोष, अपराध नाही. कारण ह्या जिवाच्या स्वाभाविक प्रवृत्ती आणि क्रिया आहेत. (5/35 नियुक्तिस्तु यथान्यायं. . . . संभवाने कविंशतिम्) नियुक्त (श्राद्ध तसेच मधुपर्क) कर्मात जो मनुष्य मांस खाणार नाही तो मृत्यूनंतर 21 जन्म पशुयोनीत भ्रमण करीत राहील. 5/41 अनुसार मधुपर्क, यज्ञ, श्राद्धपिंड प्रसंगी तसेच देवकार्यात पशुहत्या करावी. 3/271 अनुसार गोमांस व दूध किंवा दुधापासून निर्माण झालेले पदार्थ पितरांना तर्पण केल्यास ते वर्षभर तृप्त राहतात. इतर 5/27, 5/30, 5/32, 3/3, 11/44 अनुसार धर्मकार्यात ब्राह्मण पुरोहितांनी मांस भक्षण केलेच पाहिजे, अशी बंधने आहेत. वशिष्ठ स्मृतीत अध्याय 4 पाहावा. त्यानुसार, घरी ब्राह्मण किंवा राजा अतिथी आल्यास त्यांच्यासाठी मोठा बैल सांड किंवा बकरा कापावा. यालाच गोमधुपर्क म्हणतात. साधारण अतिथी असल्यास दूध, तूप, दही असे साधे मधुपर्क-पूजन असे.
वाल्मीकि रामायणात राम, लक्ष्मण, सीता मांसभक्षण, मद्यप्राशन करीत असल्याचे सूचित केले आहे. (पाहा, अयोध्याकांड 55/20, 52/58/59 उत्तर कांड 42/18 ते 21) महाकवि भवभूतीच्या ‘रामचरित’ संस्कृत नाटकात वाल्मीकि ऋषि वशिष्ठ मुनीच्या
आगमना-प्रीत्यर्थ गोमधुपर्कपूजन करतात. त्या आतिथ्यात कल्याणी नावाच्या वासराला वशिष्ठांनी खाल्ल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.
महाभारतात वनपर्व अ. 208 लोक 8/9, द्रोणपर्व अ. 67 लोक 12/16 मध्ये अवंतीचा राजा रंतिदेव दररोज हजारो गोहत्या करून ब्राह्मण महात्मा अतिथींना भोजनदान करीत असे. परंतु श्रीकृष्णाने मात्र गोहत्येचा निषेध केला आहे. (उद्धव गीता चाळावी) श्रीकृष्ण अनार्य (असुरकुळ) इंद्रविरोधी होता. गोसंरक्षणाकरिता त्याने ‘गोवर्धन’ (गोसंवर्धन) पूजा आरंभ केली होती. त्यामुळेच आर्यसमाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती महाभारतकाळाला वैदिक युगाचा अंतिम चरण मानतात. सनातनी ब्राह्मण महाभारताला कलियुगाचा प्रथम चरण मानतात. कारण त्याच काळापासून (जैन बुद्ध काळापासून) आर्यब्राह्मणांचे पवित्र अतिप्रिय खाद्य (गोमांस) हळूहळू बंद झाले (त्यांच्या मूलभूमीत पा चात्त्यराष्ट्रात सुरू आहे.) गोहत्याबंदीवाल्यांनी वरील संदर्भातील अर्थ नाकारून दाखवावे. केवळ राजकारणी खेळी खेळू नये.
नाना ढाकुलकर, 174, तारांगण, विवेकानंदनगर, नागपूर — 440 015 गोमांस भक्षणाचे प्राचीन संदर्भ

“निसर्गसंपत्तीचे पालन, संरक्षण, वापर इ. करण्याचा हक्क पारंपरिक आणि भौगैलिकदृष्ट्या नजिकच्या समाजांना द्यावा.” असे मत ‘धिस फिशर्ड लँड’ च्या लेखांकात व्यक्त होते आहे. (चुकत माकत शिकणाऱ्या) विज्ञानापेक्षा पारंपारिक ज्ञान श्रेष्ठ असणे, पारंपारिक समाजाला निसर्गाविषयी आपुलकी असणे, स्वतः घातलेले निर्बध लोक पाळतात आणि (बाहेरच्यांचा हस्तक्षेप नसतानाही) लोक एकजुटीने वागतात ही गृहीतके इ. आधारावर हे मत आहे.
वरीलपैकी पहिल्या तीन कारणांचा प्रतिवाद जानेवारी 2003 च्या अंकात आलेला आहे. प्रतिवाद करण्यासाठी अधिक माहिती पुढील लेखांकांतही आहे. उदा. फेब्रुवारी 2003 च्या अंकात नीलगिरीच्या झाडांमुळे पर्यावरणाचा होणारा हास मोजण्यासाठी परिसरशास्त्राचा वापर केला गेला आहे. असे असताना, ‘शेकडो वृक्षजाती आणि हजारो सूक्ष्मजीवांच्या दाट विणीच्या जाळ्यात जगणाऱ्या वनांविषयी आणि सभोवतालच्या समाजजीवनाविषयी विज्ञान अनभिज्ञ आहे म्हणून वनांना (आणि सभोवतालच्या समाजांना) स्वतःच्या मार्गाने वाढू द्यावे’ हा आग्रह चूक आहे. वनांची मानवी हस्तक्षेपाशिवाय होणारी वाढ मानवी (प्रत्यक्ष त्याचप्रमाणे अप्रत्यक्ष, तात्कालिक तसेच दूरगामी) फायद्यासाठी सर्वोत्तम असण्याची अपेक्षा करणेच चूक आहे. अशी अपेक्षा करणे म्हणजे “जग मानव केंद्रित बनलेले असून तारे, ग्रह मानवाला कालमापन करता यावे म्हणून पृथ्वीभोवती फिरतात’ असे म्हणण्यासारखे आहे. अर्थात हा हस्तक्षेप वैज्ञानिक कसोट्यांवर उतरणारा हवा. गुरेचराई किंवा झूम शेतीचा हस्तक्षेप अनिश्चित, अनियंत्रित असतो. परंपरागत व्यवस्था वैज्ञानिक असेलच असे नाही. कोणतीही व्यवस्था वैज्ञानिक आहे किंवा नाही याची पुन्हा पुन्हा तपासणी झाली पाहिजे.
बाहेरच्यांशी एकजुटीने भांडणाऱ्या समाजाला सर्वाधिकार देऊन बाहेरचा हस्तक्षेप दूर केला की अंतर्गत फूट पडते ही शक्यता लक्षात घेतली गेलेली नाही. क्र. 1 आणि क्र.2 यांच्यात हक्कांसाठी नेहमीच स्पर्धा असते. क्र. 1 ला काढून टाकले तर क्र. 2 आणि 3 मध्ये अशी स्पर्धा सुरू होते. “आम्ही 105 आहोत.” हे वाक्य याचीच साक्ष देते. कोणत्याही एका पातळीवर फाटाफूट होणारच. ती जितकी वरील पातळीवर असेल तितके नियंत्रण ठेवणे सोपे आणि न्याय होण्याची शक्यता असते. तसेच खासगी किंवा सरकारी अशी केंद्रीय मक्तेदारी काढून टाकली तर स्थानिक पातळीवर जमीनदार इ. बलिष्ठ हितसंबंधी निसर्गाचे हक्क नियंत्रित करील आणि तथाकथित पारंपरिक ज्ञान असणाऱ्या सामान्य गावकऱ्यांकडे काहीच उरणार नाही. स्थानिक पातळीवरील निसर्ग ही संकल्पनाच आता मोडीत निघालेली आहे.
“टोकियोत फुलपाखराने पंख फडफडवले तर न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये पाऊस पडू शकतो” (युनिव्हर्स इन अ नटशेल स्टीफन हॉकिंग). अर्थात पुन्हा एकदा पंख फडफडवले तर अमेरिकेत दुष्काळही पडू शकतो. केऑस–गोंधळासारख्या अशा भाकित करण्यास संपूर्णपणे अशक्य घटनांचाही विज्ञान अभ्यास करते. वायु, द्रव इ. पदार्थांच्या आचरणाचे नियंत्रण शक्य नसते. आसाममध्ये किती लाकूडतोड करावी, हवेत अमेरिकेने किती क्लोरोफ्लुरोकार्बन सोडावा इत्यादींविषयीचा निर्णय माझ्या आयुष्यावर परिणाम करणार असून त्यात माझे मत व्यक्त करण्यासाठी केंद्रीय नियंत्रण आवश्यक आहे. संपूर्ण विश्वातील निसर्ग एकसंध असून त्याचे निर्णय स्थानिक असू शकत नाहीत.
लोकसंख्येच्या पुनरुत्पादनाच्या पाच अवस्था बॅक्टेरियापासून ते माणसापर्यंत सर्व सजीवांमध्ये आढळतात. 1. हाय स्टेशनरी —- जन्म आणि मृत्यू यांची मोठी संख्या : 1920 पूर्वीचा भारत, 2. अर्ली एक्सपांडिंग —- कमी मृत्युदर : 1920 नंतरचा भारत, 3. लेट एक्सपांडिंग—-कमी जन्मदर आणि अजून कमी मृत्युदरः स्वातंत्र्योत्तर भारत, 4. लो स्टेशनरी —- कमी जन्म आणि मृत्युदर : बहुतेक पा चात्त्य देश,
5. डिक्लायनिंग —- कमी मृत्युदर आणि खूप कमी जन्मदर : स्वीडन.
‘धिस फिशर्ड लँड’ मध्ये सुचविलेली जीवनशैली पाळायची ठरवली तर हाय स्टेशनरी अवस्थेत राहावे लागेल. हे स्पृहणीय नाही. लो स्टेशनरी अवस्था आदर्श मानली जाते.
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे चेकनाक्याजवळ, नेरळ, रायगड — 410101

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.