पत्रसंवाद

जॉर्ज ऑर्वेलच्या -1984′ या उपहासगर्भ पुस्तकातील शासनाची एक घोषणा ‘इग्नोरन्स इज स्ट्रेंग्थ’ ही आहे. या पुस्तकातल्यासारख्या शासनाविषयी घृणा बनविण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले. देवरायांच्या समर्थकांनाही ही घोषणा आवडत नसावी या गृहीतकावर पुढील लिखाण आहे.
औषधशास्त्रात प्लॅसिबो ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. खोट्या समजुतीचा सुद्धा औषधासारखा परिणाम घडत असेल तर त्यास प्लॅसिबो परिणाम म्हणतात. मात्र प्लॅसिबो परिणाम केवळ खऱ्या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठीच वापरला जातो. रोग निवारण्यासाठी प्लॅसिबोचे बुजगावणे वापरले जात नाही. फसवणूक करून लोकांवर अगदी त्यांच्या भल्यासाठीसुद्धा राज्य करू नये असा टूमन शो किंवा मेट्रिक्स या चित्रपटांचा विषय आहे. या कथांच्या नायकांना सत्याची कल्पना आल्यावर ते बंड करतात आणि व्यवस्थेवर मात करतात. तुम्ही सर्वांना सर्वकाळ फसवू शकत नाही.
त्याचप्रमाणे देवाच्या भीतीखाली लोक देवरायांचे संरक्षण करीत असतील तरी ते स्पृहणीय नाही. सत्यावर आधारित निष्कर्षांपेक्षा चुकीच्या माहितीवर आधारित निष्कर्ष शासकाला घातक ठरण्याची शक्यता अधिक असते. मूर्ख गुलामापेक्षा बुद्धिमान शत्रू अधिक परवडतो अशा अर्थाच्या कथा पंचतंत्रात आहेत. तशाच अर्थाची अजूनही उदाहरणे अशी : ऑलिंपिकची सुरुवात झाली तेव्हा विजेत्याला राजा बनवून जुन्या राजाला मारून टाकत. किंवा काही आफ्रिकन जमातींच्या श्रद्धेप्रमाणे बुद्धिमान माणसाचा मेंदू खाल्ला की अक्कल वाढते. ते त्यांच्यापैकी सर्वांत बुद्धिमान माणसाला खातात. या बाबी सुसंस्कृत समाजाला अमान्य आहेत. त्यांच्यावर उपाय अज्ञान घालवणे आहे.
म्हणूनच गुलामांचे सुलतान बनण्यापेक्षा लोकांना इच्छित नसेल तरी जबरदस्तीने विचाराचे स्वातंत्र्य देणे योग्य आहे. योग्य शिक्षण आणि इंधन दिले तर अनावश्यक लाकूडतोड होणारच नाही पण समजा थोडी (किंवा खूप) लाकूडतोड झाली तर चालेल
पण त्रिशूळ तरी वाटले जाणार नाहीत.
[शेवटच्या परिच्छेदाचा अर्थ कळला नाही. पण शिक्षण आणि ऊर्जेवरचा आग्रह पटला.
— संपादक
जूनच्या अंकात मानवेतर सजीवांच्या हक्कांविषयी चर्चा आहे.
यावर माझे मत मांडण्यासाठी मला उष्मागतिकीच्या दुसऱ्या नियमाची मदत घ्यावी लागेल. त्यानुसार, ‘कोणत्याही घटनेमध्ये, त्यात सामील सर्व घटकांची एकूण एन्ट्रॉपी वाढते किंवा तशीच राहते मात्र कमी होऊ शकत नाही.’ एन्ट्रॉपी म्हणजे अव्यवस्था होय. उदा. जेव्हा मी ग्लुकोज आणि ऑक्सिजनचे पाणी आणि कार्बनडायऑक्साईड मध्ये रूपांतर करतो तेव्हा पाणी आणि कार्बनडायऑक्साईडची एकत्रित एन्ट्रॉपी ही ग्लुकोज आणि ऑक्सिजनच्या एकत्रित एन्ट्रॉपीपेक्षा अधिक असते. कारण माझ्या शरीरातील एन्ट्रॉपी मी त्यात घालतो. मी आ. सु. वाचून माझ्या मेंदूत माहिती भरतो ती माहिती म्हणजे अव्यवस्थेचा नाश होय. त्यासाठी मला एन्ट्रॉपी दान करावी लागते. एन्ट्रॉपीचा ग्राहक म्हणजे माझे अन्न होय. त्यातून सुव्यवस्थेचे ग्रहण करताना माझ्या
अन्नातील सुव्यवस्थेचा काही भाग ऊष्म्याच्या रूपाने वातावरणात जातो आणि नष्ट होतो. ऊष्मा एन्ट्रॉपीचे द्योतक आहे.
वनस्पती खाण्यापेक्षा अन्नसाखळीतल्या जितक्या उच्च प्राण्याला मी खातो तितके मी वातावरणात अधिक एन्ट्रॉपी वाया घालवतो हे मला मान्य आहे. तरीही ते अर्धसत्य आहे. सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर येते म्हणजे सुव्यवस्था येते. जर ती वनस्पतींनी किंवा प्रकाशविद्युतघटांनी पकडली तरच टिकते अन्यथा ती नष्ट होते आणि त्याचे उष्म्यात-एन्ट्रॉपीत रूपांतर होते. शाकाहाराच्या पुरस्कर्त्यांना जर एन्ट्रॉपीची वाढ कमी व्हावी असे वाटत असेल तर त्यांना सूर्यऊर्जा परावर्तित करण्याचा मार्ग शोधावा लागेल. जोवर पृथ्वीची उष्णता कमी होण्याचा मार्ग सापडत नाही तोवर थेट वनस्पती खाऊन जगण्याऱ्या समाजासाठी म्हणून इतर उच्च सजीवांची पैदास थांबविण्याचा पर्याय एन्ट्रॉपीची वाढ थोपविण्यासाठी उपयोगाचा नाही. जर सूर्यप्रकाश जमिनीवर पडून होणारी एन्ट्रॉपी तयार होऊ नये म्हणून वनस्पतींची संख्या वाढवली तर अशा वातावरणात CO2 ची कमतरता जाणवेल आणि वनस्पतींची उपासमार होईल. हा वनस्पतींवरील अन्याय आहे.
जगदीशचंद्र बोसांच्या प्रयोगातून वनस्पतींनासुद्धा भावना असतात असे सिद्ध झाल्याचे समजते. मात्र मला त्याची काहीच माहिती नाही. माशी किंवा बेडूक यांना खाणाऱ्या पिचर किंवा घटपर्णी इ. वनस्पतींच्या उदाहरणावरून सिद्ध होते की उत्क्रांतीतील जवळचे-दूरचे प्राणी किंवा गुणसूत्रांची समानता इ. घटक शोषणाची उतरंड ठरविण्यासाठी उपयोगी नाहीत. इतकेच कशाला एक टॉक्सोप्लास्मा गोंडाय सारखा परजीवी सुद्धा उंदरासारखा उच्च प्राण्याचा बळी घेतो असे आ. सु.मध्ये आले होते.
जटिल रेणूंच्या स्वरूपात व्यक्त करता येणाऱ्या चेतना, पीडा, दुःख इ. रासायनिक प्रक्रिया इतरांच्यातही होऊ नयेत याची काळजी घेण्याची काय गरज आहे हा प्र न आहे. मी अशा प्रक्रिया माझ्यासारख्या इतर शक्तिशाली सजीवांत घडवत नाही कारण परिस्थिती कधीही पालटू शकते आणि माझ्या शरीराची रचना अशा प्रक्रिया स्वतःसाठी टाळण्याची आहे.
मानवाने मानवाचे शोषण करू नये कारण साधर्म्य असल्यामुळे परिस्थिती कधीही पालटू शकते. नवजात अर्भकाला जगवून भविष्यात अधिक फायदा होतो. तसा इमानी कुत्र्यामुळे होत नाही. अर्थात पाण्यात बुडणाऱ्या माकडिणीसारखा अपवादात्मक परिस्थितीत काहीही करावे लागू शकते. स्वतःचा एकूण फायदा महत्तम करणे हेच जीवनाचे ध्येय असू शकते. जशास तसे या लेखात हेच सांगितले आहे. अॅनिमल फार्म या कादंबरीतल्यासारखे बंड वास्तवातील प्राणी करीत नाहीत म्हणून त्यांचे शोषण करायचे असते. अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च, अजापुत्रं बलिं दद्यात् देवो दुर्बलघातकः या सुभाषितात हेच सांगितले आहे. त्यात अनैसर्गिक, अननुकरणीय काही नाही. ते अपरिहार्य आहे. एन्ट्रॉपी कोणाच्या ना कोणाच्या गळ्यात मारायचीच असते. भक्ष्य जितके तुच्छ, दुर्बल तितके चांगले. प्रकाशविद्युत्घटाने सौरऊर्जा पकडून पाणी आणि कार्बनडायऑक्साईड यांचे रूपांतर ग्लुकोज आणि ऑक्सिजन यांमध्ये करता येईल अशी तंत्रज्ञानाची प्रगती आज नाही. आपण भूतदया दाखविली तर परग्रहवासीय आपल्याशी चांगले वागतील ही अपेक्षा चूक आहे. स्टीफन हॉकिंगच्या मते परग्रहवासीयांची वागणूक ई. टी. या चित्रपटासारखी प्रेमळ नसून इण्डिपेण्डन्स डे सारखी आक्रमक असेल. कदाचित हे आपल्या आक्रमक संस्कृतीचे अनुमान असेल.
मानवाची पचनसंस्था शाकाहारींसारखी नसल्याचा व्यावहारिक युक्तिवाद इतका सर्वज्ञात आहे की त्याविषयी लिहिण्याची गरजच नाही.
निखिल जोशी, ‘तत्त्वबोध’, हायवे, चेकनाक्याजवळ, नेरळ (रायगड) — 410 101

नैतिक कर्तव्याची कल्पना कायद्याद्वारा निषिद्ध किंवा आदिष्ट कार्यावरून झाली हा दि.य.देशपांडे यांचा कयास पटायला कठीण आहे. आजच्या काळी नैतिक कर्तव्याची कल्पना कायद्याने आदिष्ट कर्तव्यापेक्षा श्रेष्ठ मानली जाते आणि नैतिक कर्तव्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून कायदे तयार होतात. हिंदू कायद्यातील सुधारणा समाजाच्या बदलत्या आदर्शामुळे झाल्या. मौलाना आझाद म्हणतात की कुराणाने एखादी गोष्ट आदिष्ट केली आहे म्हणून ती चांगली आहे असे नाही, ती चांगली आहे म्हणून कुराणाने ती आदिष्ट केली आहे.
बहुमताला जे पटते ते चांगले अशीही व्याख्या करता येत नाही. जे चांगले असेल त्याला बहुतेक लोक मान डोलावतात असे म्हणणे जास्त बरोबर आहे. चांगले/वाईट या कायद्यावर किंवा बहुमतावर न आधारलेल्या स्वतंत्र कल्पना आहेत. त्या सिद्ध कशा करायच्या या प्र नाला निर्विवाद उत्तर अजून कोणाला सापडलेले नाही.
गुजरातमध्ये मुसलमानांविरुद्ध जे हत्याकांड आणि अत्याचार झाले ते भीषण होते हे आता सगळ्यांना कळून चुकले आहे. “अशा स्थिती कशा टाळाव्या वा हाताळाव्या’ हा खरा प्र न आहे असे संपादक म्हणतात ते बरोबर आहे. हा प्र न केवळ मध्यमवर्गात चर्चा करून सुटणारा नाही कारण मध्यमवर्गच पुष्कळसा या विखाराने पछाडलेला आहे. ज्यांना रोजी-रोटी करता रोज कष्ट करायचे असतात त्यांच्या संघटनेद्वाराच या विकृत मध्यम-वर्गावर राजकीय दडपण ठेवता येईल. निधर्मी राजकीय पक्षांनी त्याकरता एकत्र येण्याची गरज आहे. दुर्दैवाने, जातीय विखाराने ग्रासलेला मध्यमवर्गाचा भाग ज्या हिरिरीने आपल्या उद्दिष्टांमागे लागलेला आहे ती हिरिरी बाकीच्या बुद्धिजीवी वर्गात दिसत नाही. हा वर्ग सत्ताधाऱ्यांचे व एकंदर राजकारणाचे वाभाडे काढण्यातच गर्क असतो. हा निधर्मी वर्ग जातीयतेशी टक्कर देऊ शकेल असे दिसत नाही.
“संपूर्ण विश्वातील निसर्ग एकसंध असून त्याचे निर्णय स्थानीय असू शकत नाहीत” या श्री निखिल जोशी यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. ‘लो स्टेशनरी’ समाजाचा आदर्शही पटतो.
चिं. मो. पंडित यांची स्वतःबद्दलची कथा हृदयंगम आणि आदर्श आहे. त्यांना अभिवादन.
भ. पां. पाटणकर, 3-4-208, काचीगुडा, हैदराबाद — 500 027

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.