‘देहभान’: एका आदिम सत्याचा पुनरुच्चार

अभिराम भडकमकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित देहभान नाटक पाहिले. नीना कुलकर्णी आणि डॉ. गिरीश ओक यांच्यासारख्या ज्येष्ठ रंगकमींनी त्यात भूमिका केलेल्या आहेत. इतर सहकलाकारांनी त्यांना दिलेली साथही उल्लेखनीय आहे. नाटक दोन पातळ्यांवर घडतंय. एका महाविद्यालयाच्या शतकपूर्तीनिमित्त होणाऱ्या स्नेह-संमेलनात उत्कृष्ट नाटक सादर केले जावे ह्या हेतूने ‘देहभान’ या कादंबरीवर आधारित नाटक सादर करण्याचा धाडसी निर्णय दिग्दर्शिका प्राचार्यांच्या संमतीने घेते. नाटकातच नाटक घडतं आहे. बहुतेक प्रमुख पात्रे दुहेरी भूमिका करताहेत. प्राचार्या दमयंती आणि विकास केंद्रातील मावशी ह्या भूमिका नीना कुळकर्णी ह्यांनी समर्थ अभिनयाने साकार केल्या आहेत. दोन्ही भूमिका पूर्णपणे वेगळ्या! एक अतिशय खंबीर, स्वकर्तृत्वाचा रास्त अभिमान असणारी तर दुसरी असहाय, परावलंबी! दोन्ही पात्रांचा वयोगट वेगळा, हालचाली वेगळ्या! परंतु त्या अतिशय ताकदीने त्यांनी सांभाळल्या आहेत. मास्तर आणि चित्रकार पद्मनाभ ह्या भूमिका डॉ. गिरीश ओक ह्यांनी केल्या आहेत. दिग्दर्शिका साधना आणि कार्यकर्ती वसुधा, महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि विकास केंद्राचे प्रमुख दादासाहेब, महाविद्यालयीन तरुण किरण आणि संस्थेतील कार्यकर्ता गोपाळ इ. इ. भूमिका त्या त्या कलाकारांनी मन लावून केल्या आहेत.

पूर्वीसारखे समाजप्रबोधनाचे एक माध्यम म्हणून नाटकाकडे आज फारच क्वचित पाहिले जाते. (काही नाटके ह्याला अपवाद आहेत.) निखळ करमणूक व्हावी, मनोरंजन व्हावे या हेतूने लेखक नाटक लिहितो व प्रेक्षकही नाटक पाहतो. ही तास दोन तास झालेली करमणूक आपल्या दैनंदिन व्यवहाराकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संजीवनी देते. ‘देहभान’ नाटक मात्र या रांगेत बसणारे नाही. व्यक्तीपेक्षा संस्था मोठी पण संस्थेपेक्षाही निसर्ग मोठा आहे आणि त्याच्या विरुद्ध जाण्याची गरज नाही ही भूमिका मास्तर संपूर्ण नाटकात वारंवार ठासून सांगण्याचा प्रयत्न करताहेत. स्त्री/पुरुष संबंध हा चिरंतन चिंतनाचा विषय आहे. स्त्री/पुरुषांना परस्परांविषयी वाटणारी ओढ स्वाभाविक आहे. ती नेहमीच शारीरिक असेल असे नाही. आपल्या मनातील कोणाला तरी सांगावे, कोणीतरी आपल्याला समजून घ्यावे असे प्रत्येकालाच वाटते. असे ठिकाण सापडले की मनाच्या तारा जुळतात, मैत्री होते. एकमेकांबद्दल अनामिक ओढ, हुरहुर वाटते. वसुधा आणि दमयंती यांना मास्तर आणि चित्रकार यांच्याविषयी वाटणारी ओढ ही ह्याच प्रकारची आहे. त्याला कुठेही शारीरिक वास नाही. तो येऊ नये म्हणून दोघेही खबरदारी घेताना आढळतात. त्या तुलनेत ‘विद्यावती’ धाडसी आहे. ती विवाहित आहे. परंतु तिचा नवरा हा ध्येयवादाने पछाडलेला असल्यामुळे एक पत्नी म्हणून ती दुर्लक्षित, उपक्षित आहे. ती गावातल्या पोस्टमास्तरबरोबर पळून जाते.
विद्यावतीसारखे पळून जाण्याचे धाडस नसलेल्या पण होणारी कुचंबणा बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा कितीतरी विवाहित स्त्रिया आज समाजात आहेत. आजन्म अविवाहित राहण्याची शपथ घेऊन समाजकार्यात स्वतःला झोकून देणाऱ्या वसुधासारख्या कार्यकर्त्या, आणि आपण ठरविलेल्या ध्येयाचा पाठपुरावा करताना स्वतःचा स्त्री म्हणून विचार न केलेल्या दमयंतीही समाजात आहेत. या सर्वांना अतिशय स्वच्छ, स्पष्ट विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या मास्तरांचा एकच प्रश्न आहे. हे सर्व कशासाठी? का म्हणून स्वतःची स्त्री म्हणून असणारी नैसर्गिक इच्छा मारून टाकायची? दडपून टाकायची? मास्तरची भूमिका अशी की स्त्री/पुरुषांना परस्परांबद्दल वाटणारे आकर्षण, ओढ ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. दोघांनीही परस्परांचा सन्मान राखला पाहिजे. तो राखून जर स्त्री/पुरुष एकत्र वावरत असतील, राहत असतील तर त्यात गैर काहीही नाही. या मैत्रीला कोणते तरी नाव दिलेच पाहिजे असे नाही. (मास्तर कुठेतरी र. धों. कर्त्यांची आठवण मनात जागी करतात.)

हा विचार, विचार ह्या पातळीवर अगदी आदर्श आहे. तो जर वास्तवात आणायचे म्हटले तर समाज एका विशिष्ट उंचीवर पोहचलेला असला पाहिजे. समाजात वावरणारे स्त्री/पुरुष दोघेही वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ, परिपक्व असायला हवेत. नाटकातील दमयंती व वसुधा तशा आहेत. मास्तर आणि चित्रकार हादेखील तेवढाच प्रगल्भ आहे. प्रश्न हा आहे की अशा व्यक्तींची समाजात संख्या किती? हाताची बोटेही जास्त होतील. बाकी सर्व समाज कसा आहे? वास्तव काय आहे? समाजात विद्यावती टीकेचा विषय होते. का? तिची घालमेल कोणालाच, खुद्द नवऱ्यालाही समजू नये? दमयंती आणि वसुधा ह्यांचे कौतुक केले जाते. पण त्यांनी आपल्या नैसर्गिक भावनांचे दमन केलेले असते. कशासाठी? यावर तोडगा कोणता? समाजाला काय भावेल? चार भिंतीच्या आड होणारी कुचंबणा सहन करायची? आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह न करता राहायचे? त्याने रुचिपालट म्हणून दुसऱ्या मुलीशी संबंध ठेवले तर ते वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून समजून घ्यायचे? पा चात्त्यांचे अनुकरण करायचे? की विवाहित पुरुषाचे परस्त्रीशी व विवाहित स्त्रीचे परपुरुषाशी असलेले संबंध समजून घ्यायचे? की कितीही सहन करावे लागले तरी आमची कुटुंबव्यवस्था (एकत्र किंवा विभक्त) किती चांगली आहे ह्याचे गोडवे गायचे? असो.

स्त्री/पुरुष संबंध हा प्रश्नच अतिशय जटिल आणि गुंतागुंतीचा आहे, 2+2= 4 असे एकच एक नि िचत उत्तर त्याला देता येत नाही. तसे शोधण्याचा प्रयत्नही करू नये.

कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर – ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.