पत्रसंवाद

वर्ष 14, अंक 4, हा जुलैचा अंक वाचला. त्यांतील दोन विषयांवर काही मते मांडत आहे.
1. गांधीजी व सावरकर यांच्या एकूण वैचारिकांची तुलना करणे योग्य होईल. अस्मृश्यता निवारण सोडल्यास हे दोघे मान्यवर पुढारी दोन विरुद्ध टोकाना उभे होते. गांधीजींचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण सुसंगत होती. शेतीप्रधान व खेडीप्रधान अशी उत्पादनाची रचना, सूतकताई व हाथविणाई असा खादी-उद्योगाचा पुरस्कार, नांगरासाठी सशक्त बैल, दुधासाठी सशक्त गायी असा गोरक्षण कार्यक्रम, वैयक्तिक आचरणांत ब्रह्मचर्य व अहिंसा यावर अतिरेकी भर, ही गांधींच्या वैचारिकेची मुख्य सूत्रे होती. सावरकर हे गिरण्यांचे कापड, आधुनिक(तम) तांत्रिकी, अतिरिक्त गोधनाची हिंसा, इत्यादीचा पुरस्कार करीत. राजकारणांत गांधी सविनय कायदेभंग, बहिष्कार व निःशस्त्र प्रतिकार हे कार्यक्रम ठेवत. सावरकर (माओ ची तुंगप्रमाणे) बंदुकांतून येणाऱ्या शक्तीचे प्रचारक होते. असहकार व सत्याग्रह यापेक्षा प्रतियोगी सहकाराला ते अधिक अनुकूल होते. हिंदु-मुसलमान ऐक्य टिळक-गांधीना महत्त्वाचे वाटे, तर सावरकरांचे सूत्र हिंदूंची पुरोगामी स्वातंत्र्य चळवळ मुसलमानांच्या अडवणुकीमुळे संथ होऊ नये हे होते. ब्रिटिशांच्या चिथावणीने हिंदुस्तानांतील मानवी समुदाय विस्कळीत आणि आपापसांत झगडणारे होतील, असा युसुफ मेहरअली, अच्युत पटवर्धन व अशोक मेहता यांनी युक्तिसंगत पक्ष मांडला होता. लहान ते सुंदर हे गांधीजींचे मत सावरकरांना मान्य नव्हते. हिंदी व उर्दू यांचे मिश्रण केलेली हिंदुस्तानी गांधीना हवी होती, तर सावरकरांना संस्कृतनिष्ठ हिंदी (तिच्या शुद्धीकरणाच्या ध्यासासकट) हवी होती. १९५० पर्यंत, हे दोघे पुढारी सोडून, राजकारणाचा प्रवास अन्य दिशेने होणार हे उघड झाले. १०० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतीय लोकशाहीला नवीन नीती व नवीन नेते शोधावे लागणारच. आंबेडकर, फुले, विनोबा व राष्ट्रपति कलाम यांच्याकडून स्फूर्ति मिळू शकेल. नथुरामाचे निमित्त करून शिळ्या कढीला ऊत आणणे प्रशंसनीय नाही. अर्थात् नाट्यप्रयोगावर बंदी नको.
2. वृद्ध व तरुण हा दोन पिढ्यांचा संघर्ष चटकन सुटणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. चिं. मो. पंडित यांचा लेख सुंदर आहे. वृद्धांनी आपली पथारी आवरती घ्यावी, आणि चंगळ करण्याऐवजी वैराग्य बाणवावे. अन्यथा पुरूचे तारुण्य खच्ची करणाऱ्या जर्जर ययातीसारखे ते बनतील. स्वेच्छामरणाप्रमाणे वार्धक्य हे वृत्तीतून काढून कृतीत उतरवता येईल का?
गं. रा. पटवर्धन, 800, भांडारकर रोड, पुणे — 4

आजचा सुधारकचा 14:3 जून 2003 चा अंक वाचून काढला. मुद्रणावर तुमची नजर असल्यामुळे तें देखणे, नेटके व्हावें, मांडणी सुरेख असावी यात नवल नाही. पण काही मुद्रणदोष खटकले. ते आशयाला हानि पोचवणारे आहेत पण सामान्य मुद्रितशोधकाच्या नजरेतून सुटणारे आहेत. कदाचित् मुद्रण-प्रतीत सुद्धा ते राहून गेले असण्याची शक्यता आहे. आपल्या वाचकांप्रमाणे आपले लेखकही अ-सावध आहेत. एक ठळक उदाहरण म्हणजे संयोगिचिह्न (–) आणि वियोगिचिह्न (—-) यांमध्ये फरक न करणे. उदाहरणे:
88112 शहरांतून ही → शहरांतूनही 93 5 परातत्त्व → परतत्त्व 944 1 परभाषासापेक्ष → परिभाषासापेक्ष 10548 व्यवस्थांना → अव्यवस्थांना 1064 8 व्यवस्था → अवस्था 108 12 निर्णय सर्वोच्च → निर्णय उच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयात
अशा प्रकारच्या चुका संख्येने कमी असतात, त्या चुकांची ठेच लागून वाचक मनातल्या मनात तो मजकूर दुरुस्त करून वाचण्याची शक्यता कमी. पण त्या अबोध पातळीवर वैचारिक हानीला कारण होणाऱ्या आहेत. त्या कशा टाळता येतील? एक अनुभवी आणि विचारी मुद्रक म्हणून आपल्याला काही उपाय सुचतो का?
[डॉ. केळकरांनी केलेल्या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अश्या चुका खरो-खरच कुठेही घडायला नकोतच. त्या होतात याचे मुख्य कारण लेखक आणि मुद्रक ह्या दोघांच्या कार्यात एकसूत्रता नसते. मुद्रणानंतर आपले लेखन कसे दिसेल ह्याची लेखकांना कल्पना नसते. मुद्रितशोधनाच्या खुणा त्यांच्या परिचयाच्या नसतात हा एक भाग. मुद्रकां-कडूनसुद्धा पुष्कळ चुका होतात हा दुसरा. पुष्कळशा मुद्रकांकडे मुद्रितशोधकच नसतात. त्यामुळे ‘कॉपी होल्डर’ असण्याचा प्र नच नाही. मुद्रित वाचले गेले तरी ते घाईघाईने आणि/अथवा नको तेवढ्या आत्मविश्वासाने वाचले जाण्याचा संभव असतो. आणखी एक मुद्दा म्हणजे कम्प्यूटरवर काम करणारे नवीन लोक फार अर्ध्याकच्च्या तयारीने या क्षेत्रात उतरतात.
या सगळ्या अडचणींवर मात करायची असेल तर कोणत्याही हस्तलिखितावर मुद्रणपूर्व संस्कार घडवून त्याचे नीट संपादन करून ते मुद्रकाच्या स्वाधीन करायला हवे. गंभीर आणि गुंतागुंतीचा विषय असल्यास त्याचे मुद्रित स्वतः लेखकाने तपासून ‘पसार’ केल्याशिवाय न छापणे योग्य.
संयोगि-चिह्न आणि वियोगि-चिह्न, वियोगि-चिह्नामध्ये एक एम् डॅश (—) आणि दोन्ही बाजूला अंतर सोडलेला हाफ एम् (-) डॅश त्याचप्रमाणे उणे चिह्न ह्याचे पूर्वी स्वतंत्र खिळे मिळत असत. आज कम्प्यूटरवर हे सर्व बारकावे जाणणारा कारागीर दुर्लभ नव्हे तर अप्राप्यच आहे. ह्रस्व रु आणि दीर्घ रू ही अक्षरे विद्यार्थी पुन्हा पुन्हा शिकवूनही शिकत नाहीत. तेव्हा लेखक व मुद्रक ह्या दोघांचेही प्रबोधन घडविल्याशिवाय चांगले मुद्रण होणे दुष्कर आहे.
डॉ. केळकरांनी आपुलकीने दाखविलेल्या मुद्रणदोषांबद्दल आणि केलेल्या सूचनां-बद्दल आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत.
— दिवाकर मोहनी
अशोक रा. केळकर, 7 धनंजय, 759/83 भांडारकर रस्ता गल्ली 6 द्वारा, पुणे– 4

घोषणा : एक मानसिक विकृती?
कृण्वन्तु विश्वं आर्यम् ।
पृथ्वी निःक्षत्रिय करीन! दुनियेत एकही काफीर राहता कामा नये! जैविक रासायनिक अस्त्रे बाळगणाऱ्या हुकूमशहांनो, चालते व्हा! आम्हाला न रुचणारे पुस्तक, सिनेमा, नाटक, चित्र, खपवून घेतले जाणार नाही!
अगदी वेदकाळापासून अशा घोषणा दिल्या जात आहेत. ह्या घोषणांच्या पूर्तीसाठी प्रचंड रक्तपात होत आले! फलश्रुति काय? तर जीवितहानी, वित्तहानी, शस्त्रहानी आणि सर्वांत महत्त्वाची म्हणजे शांततेची हानी! शांततेच्या काळातच विद्या आणि कला निर्माण होतात आणि बहरतात. त्यांचीही हानी!
अशी सर्वंकष हानी झाली तरी विश्व आर्यमय झाले नाही. पृथ्वी निःक्षत्रिय झाली नाही, दुनियेत काफीर राहत आहेत, नव नवीन अस्त्रे आणि नवे हुकूमशहा निर्माण होतात, आणि न रुचणारी पुस्तके, सिनेमा, नाटके, चित्रे खपवून घेतली जातात!
घोषणाकार ही चिरंजीव नसतो म्हणून बरे. एखादी घोषणा प्रसवण्यामागे कीर्ती, अर्थप्राप्ती, सत्ता, धार्मिक लाभ आणि अहंकारतृप्ती इ. कारणे दिसतात. घोषणा-कारांना अनुयायी मिळतात किंवा मिळविले जातात. भावनिक मदिरा पाजून अनुया यांची माथी भडकविली जातात. मदिरेचा कैफ सातआठ तासांत उतरतो, भावनिक मदिरेचा कैफ कडक.
ह्या सर्वांचे कारण ‘असहिष्णुता’ असे दिले जाते. हिंदूधर्माने जगाला सहिष्णुता शिकवली याचा अभिमान बाळगणारे, जेव्हा स्वतःच असहिष्णु होतात, तेव्हा काय म्हणावे? “मंदिर-वहीं बनाएंगे”.– दुसरी पवित्र जागा नाही काय?
परकीय सत्तेच्या विरोधात कायदा-मोडणे हे देशभक्तीचे द्योतक मानले जाई; पण आज स्वराज्यांत कायदा-मोडणे म्हणजे लोकसेवा, आणि लोकशाहीचे रक्षण असे काही नेतेमंडळी मानतात. “बाबारे, आपण जरा शांतपणे बसून नीट विचार करू या’ असे कुणी सहिष्णु म्हणाला तर त्याची अवहेलना होते. ‘थंडत्व म्हणजे षंढत्व’ अशा थाटाची नवीन समीकरणे आज सर्हास मांडली जातात. इतिहासातून माणूस काही शिकत नसावा असे दिसते.
सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा का चद् दुःखभाग्भवेत् ही प्रार्थना म्हणून ठीक, परंतु असे घडणे सृष्टिनियमांत बसत नसावे. नाहीतर नवीन घोषणाबाज होता आले नसते.
माणसाने, माणसासाठी, माणसाकरवी दिलेल्या घोषणा माणसाच्याच हानीसाठी ठरतात याचा विचार-पंढत्वाचा दोष पत्करून –कोण करणार? मला वाटते, मानवजात नामशेष होईपर्यंत हे असेच चालणार!
द. रा. ताम्हनकर, 675, गव्हे, दापोली, रत्नागिरी — 415 712

आजचा सुधारक चा जून 2003 च्या अंकात ‘मानवतेविरुद्ध गुन्हा’ या लेखाचा पहिला भाग प्रसिद्ध झाला आहे. त्यावर लेखकाचे नाव नाही यावरून तो संपादकांनी लिहिलेला असावा. या लेखाचा आधार ‘क्राइम अगेन्स्ट ह्युमॅनिटी’ या द्विखंडात्मक पुस्तकाचा आहे. गोध्रा जळितानंतर सेक्युलर पक्षांनी जे अशासकीय ट्रायब्युनल बनवण्यात आले त्याचा हा अहवाल आहे. पण दुर्दैवाने हा अहवाल तटस्थ आणि त्रयस्थ भूमिकेतून लिहिला गेला नाही असे जाणवले. दुसरे असे की तो फार घाईत बनवण्यात आला, कारण ट्रायब्युनलने काढलेल्या निष्कर्षांना छेद देणारे पुरावे पुढील चौकशीतून पुढे येत आहेत. नव्हे, या लेखात उल्लेखिलेल्या दोन बाबींवरून निघणारे अनुमान प्रतिपादनाच्या विरोधात जाणारे आहे.
गोध्रा स्टेशनमास्तरची पत्नी त्या स्टेशनात गाडीत चढली आणि जळून मेली असे लेखात म्हटले आहे. स्टेशनमास्तरने आपल्या पत्नीला गाडीत चढू दिले म्हणजेच गोध्रा स्टेशनच्या प्लॅटफार्मवर गंभीर स्वरूपाची मारहाणीची, बाचाबाचीची घटना घडली नसावी. नंतरच्या चौकशीत स्टेशनमास्तरने तसे निवेदन दिले आहे. समजा, स्टेशनमास्तर खोटे बोलला हे गृहीत धरले तरी स्टेशनात गाडी किती वेळ थांबली असेल? हल्ल्याच्या जागेपर्यंत पोचायला गाडीला किती वेळ लागला असेल? पंधरा ते वीस मिनिटे. एवढ्या वेळात स्टेशनातून मोबाईल वापरला तरी बातमी पोहचून हजार-दोन हजाराचा जमाव गोळा करणे शक्य आहे का? तरीही तो पूर्वनियोजित कट नव्हता असे म्हणता येईल? गाडी एका विशिष्ट जागी थांबली ती जागा लेखक म्हणतो तशी सपाट नसून दोन्ही बाजूंनी सात-आठ फूट उंच होती असे दिसून आल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्या घटनेशी संबंधित तीन व्यक्ती अटकेत आहेत. हबीब उर्फ बादशाह बिन यामीन, मौलाना हुसेन उमरजी आणि दि. 1 जूनला अटक करण्यात आलेला शोएब युसूफ कलंदर ह्यांच्याकडून अधिक माहिती हळूहळू उजेडात येत आहे.
गोध्यात यापूर्वी हिंदू-मुसलमानाचे दोन दंगे (1965 व 1980) झाल्याचा उल्लेख लेखातच आहे. 1993 साली दंगा झाला होता का याचा शोध घ्यावा लागेल. (1999 साली अहमदाबादेत दंगा झाला होता.) कदाचित त्यावेळी आपण बाबरी पतनाचा सूड घेऊ शकलो नाही म्हणून कारसेवकांचा सूड घेण्याची कल्पना मौलवीच्या डोक्यात आली असणे अशक्य नाही. तरीही ही घटना पूर्वीनियोजित किंवा एखाद्या मोठ्या कटाचा भाग नाही असे विधान लेखक करतो. त्याला पुरावा काय? तर जिल्हाधिकाऱ्याचे वक्तव्य :- ‘घटना पूर्वनियोजित नव्हती तर तो एक अपघात होता’ हे करण्यामागील हेतू प्रक्षोभ निर्माण होऊ नये, शांतताभंग होऊ नये यासाठी असावा हा साधा तर्क आहे. तो काही पुरावा नव्हे. मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि प्रधानमंत्री यांची वक्तव्ये याच हेतूने केलेली होती हे सामान्य नागरिकालाही कळू शकेल. अडवाणींना तर जणू भविष्यवाणीच केली. त्यानंतर अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याने हे सिद्धच झाले, म्हणजेच मानवतेवर उभयपक्षी आघात झाला.
मानवतेची संकल्पना युरोपातून गेल्या दोन-तीन शतकांत पुढे आली. तरीही विसाव्या शतकातील दोन महायुद्धे युरोप अमेरिकेतूनच लढवली गेली. हिरोशिमा व नागासाकीवर विनाशकारी बाँबहल्ला करताना मानवतेची जाणीव झाली होती? सूड किंवा बदला घेताना मानवतेची जाणीव लुप्त झालेली असते. त्यामुळे गोध्राकांडानंतर उफाळलेल्या दंगलीचा विचार पक्षाच्या वा धर्माच्या दृष्टिकोनातून कितपत समर्थनीय आहे? पण आमच्या सेक्युलरवादी पुढाऱ्यांना, त्यांच्या अनुयायांना एकांगी, एकतर्फीच नव्हे तर पक्षपाती भूमिकांना नीरक्षीरविवेक सुचतच नाही. असो.
[1) ‘मानवेविरुद्ध गुन्हा’ ही लेखमाला म्हणजे केवळ ‘क्राईम अगेन्स्ट ह्यूमॅनिटी’ चे संक्षिप्त भाषांतर आहे, त्यामुळे लेखक संपादकावरची आगपाखड पूर्णपणे अनाठायी आहे. )
2) गाडी थांबवण्याची जागा •12-15 फूट उंच भरावावर होती,’ असे लिहिले असताना लोही लिहितात, ‘लेखक म्हणतो तशी सपाट नसून’!
3) कलेक्टर-प्रधानमंत्री यांची वक्तव्ये जर ‘सत्य’ नसून ‘प्रक्षोभ निर्माण होऊ नये म्हणून’ केलेली असतील, तर तोगडिया मोदींच्या वक्तव्यांचे काय?
4) दोषारोपण-शाबासकी हे लेखमालेचे हेतूच नव्हेत. समाजातल्या हिंसेला सामोरे जाताना शासनाने समाजाने कोणती पथ्ये पाळावी याचा एका उदाहरणातून केलेला तपास, येवढेच (!) या लेखमालेचे उद्दिष्ट आहे. पण लोहींची असुरक्षिततेची भावना इतकी तीव्र झालेली दिसते की त्यांना वाचणेही अवघड झाले आहे, मग नीरक्षीरविवेक तर दूरच. माफ करावे, पण चुकीचे वाचून टीका करणे गैरच आहे.
— संपादक
म. ना. लोही, 29, मंदाकिनी अपार्टमेंट, अत्रे लेआऊट, नागपूर — 440 022

आपल्या मुलांच्या बोकांडी बसलेली इंग्रजी भाषा काही टळत नाही हे समजून मी एक सूचना करीत आहे, ती अशी : इंग्रजी शिकवावी पण ती इंग्रजी माध्यमांतून शिकवू नये. मातृभाषा माध्यमांतून ती परकी भाषा म्हणून शिकविण्यात यावी.
इंग्लंड-अमेरिकेमधल्या सगळ्या साक्षरांना चांगली म्हणजे शुद्ध इंग्रजीभाषा (ती मातृभाषा असून) फारतर चारपांच टक्के लोकांना बऱ्यापैकी लिहितां येत असेल. त्यांपैकी पुष्कळांना फक्त एकच भाषा शिकावी लागत असेल तरी. महाराष्ट्रात तर सध्या पहिल्या वर्गापासूनच एक अत्यन्त परकी भाषा मुलांवर लादली जात आहे. परिणाम एकच होणार असून त्या नवीन धोरणामुळे बहुतांश मुलांचा भाषाविषयच कच्चा राहणार आहे. लहान वयामध्ये सगळ्याच मुलांना एकापेक्षा जास्त भाषा चांगल्या प्रकारे शिकतां येतात हा समज प्रयोग करून खोडून काढण्याची गरज आहे. फार तर पांच टक्के विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त भाषा येऊ शकतील आणि आपल्या स्वतःच्या भाषेवर प्रभुत्व फारतर दहा टक्के लोकांना येईल म्हणजे महाराष्ट्रांत अंदाजें एक कोटी लोकांना. हेही अशक्यच आहे. आपल्या महाराष्ट्रांत पांच लाख लोकांना आपले सगळे विचार आणि भावभावना स्पष्टपणे बिनचूक भाषेत लिहून मांडतां आले तर वाहवा!
तरी कोणत्या मुलांना भाषेचे — अभिव्यक्तीचें — अंग स्वाभाविकपणे आहे त्यांना हुडकून काढून त्यांना ती भाषा पद्धतशीरपणे शिकवावी आणि हे काम वयाच्या चौदा वर्षांनंतर करावें — आणि आपली स्वतःची किंवा परकी भाषा शिकवितांना ती परक्या भाषेसारखी शिकवावी असें ह्याविषयी मला मनापासून वाटते. कोणी शिक्षणशास्त्रज्ञ ह्याविषयी आपले मत देतील काय?
एक पथ्य आणखी पाळावे लागेल. 90 टक्के लोकांच्या आटोक्यात आपली भाषा यावी ह्या हेतूने तिचे लेखननियम आणखी शिथिल करण्याचा मोह राज्यकर्त्यांना पडण्याचा संभव आहे. तसे त्यांनी करू नये. लेखननियम कितीही सोपे केले तरी ती त्यांना येणार नाही हे उमजून असावें.
दुसरा मुद्दा गृहपाठाचा आहे. पण त्याविषयी पुन्हां कधीतरी!
नारो दाजीबा, ए-303, सनराइज अपार्टमेंटस, राजहंस कॉम्प्लेक्स के पीछे, छरवाडा रोड, वापी, गुजरात — 396191

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.