‘मित्र’ च्या निमित्ताने

काही दिवसांपूर्वी ‘मित्र’ या सुयोग निर्मित नाटकाचा प्रयोग पाहण्याचा योग आला. नाटकाविषयी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली परीक्षणे वाचली होती. तेव्हाच हे नाटक बघायचे असे ठरविले होते. आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. लागूंची भूमिका! इतर नाटकांप्रमाणेच ह्याही नाटकात डॉक्टरांनी अभिनयाची जी उंची गाठली आहे ती अवाक् करणारी आहे. सतत आपण काहीतरी अद्भुत अनुभवीत आहोत ही भावना मनात येत होती. त्यांना साथ देणाऱ्या होत्या ज्येष्ठ रंगकर्मी ज्योती चांदेकर! दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक डोळे भरून पाहत होते.

नाटकाचे सादरीकरणही वेगळ्या प्रकारे केले गेले. पार्श्वभूमी म्हणून कथा-नायकाला – दादासाहेब पुरोहितांना – अर्धांगवायूचा झटका, तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे जी जखम होते त्यावर उपचार करायला म्हणून दवाखान्यात ठेवलेले असते. तो प्रसंग दाखवून नंतर श्रेय-नामावली सांगण्यात आली. रंगमंच-व्यवस्था, प्रकाश-योजना, संगीत इत्यादी घटकांविषयी मी पूर्णपणे अनभिज्ञ असल्यामुळे त्याविषयी काहीही लिहिणे गैर आहे. पण एक सुजाण वाचक आणि प्रेक्षक या नात्याने नाटकाच्या संहितेतील कच्चे दुवे मात्र सतत खटकत होते. कथानकाच्या अंगाने नाटकाचा विचार करताना मी कमालीची अस्वस्थ झाले.

नाटकाची सुरुवात दादासाहेब पुरोहित ह्यांच्या दलितांविषयीच्या तिरकस, तिखट, जिव्हारी लागेल अशा बोलण्याने होते. उपचार करणारे डॉक्टर राखीव वर्गातील नाहीत ना ही शंका आणि ते तसे नाहीत ह्याची खातरजमा ते करून घेतात. दलितांविषयीची चीड का, तर त्यांनी दादासाहेबांवर अकारण हल्ला केला असतो म्हणून! केवळ ह्या एका घटनेवरून सबंध दलितसमाजाविषयी एकदम टोकाची घेतलेली भूमिका न समजण्या सारखी आहे. दादासाहेबांचे व्यक्तिमत्त्व पूर्ण संहितेत एक ताठ मानेने जगलेली, स्वकष्टाने मोठी झालेली व्यक्ती असे आहे. दलितांविषयीच्या तीव्र रागाचे कारण कुठेतरी भूतकाळात असले पाहिजे व हा हल्ला ही घटना तो व्यक्त करायला निमित्तमात्र ठरली असावी असे म्हटले तर तसा कुठेच संदर्भ येत नाही. हा राग, हा द्वेष, ही चीड का? केवळ एका घटनेमुळे ? बरे, सवर्णदेखील त्यांच्या देवतांची विटबंना केली असताना भोसकाभोसकी करतात ह्याचे भान दादासाहेबांना आहे. मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला म्हणून दलितांनी केलेले आंदोलन, निषेध हे त्यांना का समजू नये? त्यांच्यावर अकारण हल्ला एका माथेफिरूने केला हे चुकलेच, पण त्यावर एवढी तीव्र प्रतिक्रिया?

कालांतराने त्यांचा राग निवळतो तो त्यांची सर्वार्थाने देखभाल करणाऱ्या प्रशिक्षित नर्सच्या (सावित्रीबाई रूपवते) वागणुकीमुळे! सुरुवातीला, दलित असलेल्या ह्या प्रशिक्षित नर्सच्या नेमणुकीला असलेली विरोधाची धार नंतर बोथट होते. दोघेही समदुःखी, (दादासाहेबांनी पत्नी निवर्तलेली तर नर्सचे यजमान!). एकमेकांचे भूतकाळात रमणे, भूतकाळातल्या आठवणी ह्यात दोघेही गुंतून जातात.
आता नर्स दलित! परंतु दादासाहेबांच्या तिखट बोलण्यावर काहीही प्रतिक्रिया नोंदवत नाही. (फक्त एकदाच ‘ब्राह्मण आहात ना? मग उजव्या हाताने जेवा’ असा टोमणा मारताना दिसते. ब्राह्मण आणि उजव्या हाताने काम करणे यांचा अन्योन्य संबंध आहे का? ब्राह्मण व्यक्ती डावखोरी असत नाही का? त्यामुळे हाही वार फार गंभीर वाटत नाही.) नाटक आज लिहिलेले आहे. त्याला वर्तमान सामाजिक परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे दलित नर्सचा सोशिकपणा वास्तव वाटत नाही. आज तर ‘जात’ हा मुद्दा अतिशयच नाजुक झालेला आहे. म्हणूनच नर्सचे प्रतिक्रिया व्यक्त न करणे हे अशक्य वाटते (केव्हातरी दादासाहेब त्यांना हिटलर म्हणतात तेव्हा ‘तुमची उपमा चुकली. आम्ही अन्याय सहन केला’ हे त्या म्हणतात.) नर्सला त्यांच्या बोलण्याने वाईट वाटले आहे. एकदा केव्हातरी आपण दलित म्हणून आपल्याला अमेरिकेला नेणार नाही ह्याचा धमकी म्हणून पुरोहितांनी केलेल्या उपयोगाने त्यांना वाईट वाटते व त्या रडतात. आपला माणूस म्हणून, स्त्री म्हणून विचार केला नाही ह्याचे दुःख त्यांना होते.

दादासाहेबांना दोन मुले! एक अविवाहित मुलगा जो बंगलोरला असतो व मुलगी परदेशात. जावई, मुले आपल्या कुटुंबात खूष! दादासाहेबांवरील हल्ला अन् त्यातच अर्धांगवायूच्या झटक्याने आलेल्या परावलंबित्वावर तोडगा म्हणून त्यांची रवानगी वृद्धा श्रमात करण्याचा विचार बहीणभाऊ करतात. (तोही दादासाहेबांच्या हट्टी स्वभावामुळे), दादासाहेबांच्या त्यांच्याबरोबर न जाण्याच्या हट्टामुळे. त्यांना तो पर्याय स्वीकारार्ह वाटतो. पण हे ऐकून दादासाहेब मात्र कमालीचे विकल होतात. का? आजच्या परिस्थितीत आपल्या मुलांना तसा निर्णय घेण्यास आपणच बाध्य करीत असू तर त्यांत खचण्यासारखे काही आहे का? शेवटपर्यंत ताठ मानेने, स्वतंत्रपणे जगायचे तर हा मार्ग, पर्याय दादासाहेबांना जास्त स्वागतार्ह वाटायला ह विचलित हो न नाही.

अन् सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दादासाहेब आणि नर्स ह्यांच्यातील मैत्रीचे नाते हळूहळू खुलवीत असताना दादासाहेब नर्सला विवाहाविषयी का विचारतात? दोघांची मैत्री इतकी सुंदर असताना हा प्रश्न विचारून ती पूर्णपणे दादासाहेबांच्या बाजूने (व्यापक अर्थाने पुरुषाच्या बाजूने) शारीरिक पातळीवर का आणून ठेवली? मैत्री हे नाते – मग ते पुरुष आणि स्त्री ह्यांच्यातील असो, दोन पुरुषांमधील असो वा दोन स्त्रियांमधील – विलक्षण सुंदर आहे. प्रत्येकाला आपल्या मनातले, अगदी तळमनातले देखील कोणाजवळ तरी बोलावेसे वाटते, सांगावेसे वाटते. त्यासाठी मित्रासारखे दुसरे ठिकाण नाही. हे नाते अगदी निरपेक्ष आहे, त्यात देवघेव नाही, श्रेष्ठ कनिष्ठतेचा भाव नाही, राग लोभ असले तरी क्षणिक! परस्परांना समजून घेणे एवढेच त्यात असते. बस्! अशी तार कोणाशी जुळेलच असे नाही पण जुळली तर मात्र हे नाते स्वर्गीय आनंद देणारेच असणार! दादासाहेब आणि नर्स ह्यांच्यातले नाते असेच होते. परंतु त्याचे पावित्र्य, उंची नर्सच्या बाजूने (व्यापक अर्थाने स्त्रीच्या बाजूने) कायम राहिली ह्याचा आनंद झाला (दादासाहेबांनी विवाहाविषयी विचारल्यावर त्यांच्यावर प्रेम असले तरी नर्स नकार देते.) परंतु पुरुषाचा स्त्रीकडे पाहण्याचा शरीरनिष्ठ दृष्टिकोन मात्र अधोरेखित होतो.

पूर्ण नाटक पाहत असताना ह्यातून लेखकाला काय अधोरेखांकित करायचे आहे हेच कळत नाही. सवर्ण/दलित संघर्ष? दादासाहेब पुरोहितांचे एकटेपण? स्वाभिमानाने जगणाऱ्या मिसेस रूपवतेंचा जीवनप्रवास? एकत्र कुटुंबपद्धती मोडकळीला आल्याने विभक्त कुटुंबात निर्माण होणाऱ्या समस्या? की दादासाहेब आणि मिसेस रूपवतेंची मैत्री? नाटकाला दिलेल्या शीर्षकावरून मला असे वाटते की हे लेखकाला अभिप्रेत असावे. पण इथेही या मैत्रीला शारीरिक पातळीवर आणून त्या नात्याचा निर्मलपणा, मांगल्य नष्ट केले त्याचे काय? त्यापेक्षा दादासाहेबांनी विवाहाविषयी प्रश्न न विचारता मिसेस रूपवतेंना निरोप देणे मनाला जास्त पटले असते.

मला तर हे नाटक म्हणजे एका ताठ मानेने, स्वाभिमानाने, स्वतंत्रपणे जगणाऱ्या कर्तृत्ववान स्त्रीचा जीवनप्रवास वाटते. तिच्या व्यवसायाच्या निमित्ताने अपघाताने दादासाहेब पुरोहित पेशंट म्हणून येतात, दोन प्रवाह काही काळ एकमेकांमध्ये मिसळल्या सारखे वाटतात परंतु नंतर ते स्वतंत्रपणे आपला मार्ग आक्रमितात. असो. तरीही नाटक प्रत्येकाने पहावेच ते डॉ. लागूंच्या अभिनयसामर्थ्याला सलाम करण्यासाठी.

कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर – ४४० ०१२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.