पत्रसंवाद

जे. के. रोलिंग या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या हॅरी पॉटर नायक असणाऱ्या कादंबऱ्यांनी सध्या जगातील बालमनाचा पगडा घेतला आहे. लेखिकेला मिळालेले हे यश कौतुकास्पद आहे यात शंकाच नाही पण ज्या मुलाची मातृभाषा व संस्कार भारतीय आहेत त्यांनीही या पुस्तकासाठी रांगा लावाव्यात असे या पुस्तकात काय विशेष आहे या कुतूहलाने त्यातील एका भागाचे मराठी भाषांतर ‘हॅरी पॉटर आणि गुपितांचे दालन’ वाचून मोठी निराशा पदरी पडली. केवळ एवढेच नव्हे तर अशी पुस्तके आपल्या पाल्यांना वाचायला देण्यापूर्वी जागरूक पालकांनी ती स्वतः वाचून त्या वाचनाचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा असे वाटते. (हा लेख लिहीत असतानाच ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस्ती शाळेत हॅरी पॉटरच्या पुस्तकावर बंदी अशी बातमी वाचली.)
या पुस्तकाचा मुख्य विषय जादूनगरी असे लेखिकेने कल्पिल्यामुळे निरनिराळ्या तर्कहीन व असंबद्ध घटनांची मालिका गुंफण्यात आली आहे. एकीकडे विज्ञाननिष्ठ समाज बनविण्यासाठी मुलांवर लहानपणापासूनच देव, भुते, मृत्यूनंतरचे मृतात्म्यांचे अस्तित्व, पिशाच्च, हडळ या कल्पनांचे संस्कार व्हावयास नकोत असे आपण म्हणतो तर या पुस्तकाचा मुख्य गाभाच या कल्पनांवर आधारित आहे. बरे जादूवरच यापूर्वी रम्य कल्पनाविलास करणारी पुस्तके इंग्रजी व भारतीय भाषांत लिहिली गेली आहेत पण हॅरी पॉटर वरील कथेतील वातावरण पहिल्या पानापासून शेवटपर्यंत भेसूर आणि किळसवाणे ठेवण्यात आले आहे. त्यातील पात्रे संडासात राहतात. अगदी चक्क संडासच्या यू बेंडमध्ये, सडके मासे, ज्यावर चिलटे भणभणत आहेत असे मटण. बरशी लागलेले चीज असे खाद्यपदार्थ खातात. अर्थात ती सुदैवाने भुते असतात. त्या पात्रांना सारख्या उलट्या होतात व त्या उलटीतून काय बाहेर पडावे ते मी सांगण्याऐवजी हे पुस्तकातले वाक्यच वाचा. त्याऐवजी त्याला एक मोठ्ठा ढेकर आला आणि त्याच्या तोंडातून असंख्य गिळगिळीत गोगलगायी बदाबदा त्याच्या पुढ्यात कोसळल्या. हे गोगलगायीचे ढेकर पुस्तकात इतक्या वेळा येतात की माझ्यासारख्या वाचकास खरोखरच उलटी होते की काय असे वाटू लागते. आणि असे ढेकर येणारे पात्र भूत नसते तर तो प्रत्यक्ष कथानकाचा मित्र रॉन आहे. या पुस्तकातील बहुतेक पात्रांचे पोषाख गबाळे, घाणेरडे व स्वरूपेही डुकारासारखी वा तत्सम आहेत. या जादूनगरीत ग्नोम नावाचे प्राणी आहेत. लेखिकेने दिलेल्या तळटीपेवरून हे मुलांच्या गोष्टीतील काल्पनिक प्राणी असून ते जमिनीखाली राहतात व धनाची राखण करतात. पण अशा प्राण्यांना गरागरा फिरवून फेकून देण्याचा उद्योग मुलांना का करावा लागतो कळत नाही. या नगरीतील मॅनड्रेक नावाची वनस्पती—-तिचे वर्णन वाचा–ट्रेमध्ये हिरवट जांभळ्या रंगाची छोटीछोटी झुबकेदार रोपे शेकड्याने वाढत मुळे असायला हवीत त्या जागी एक इवलेसे चिखलात माखलेले आणि अत्यंत विद्रूप बाळ होते काय या वर्णनाने अंगावर शहारे आले की नाही. पुढे तर हे मॅनड्रेक्स म्हणजेच ही बाळे कापून शिजवून जादूचे रसायन तयार करण्याचा उल्लेख आहे. अशा प्रकारची किळसवाणी वर्णने जागोजागी आहेत. थोडक्यात स्वा. सावरकरांच्या जे जे उत्तम उदात्त. . . या ओळीतील सर्व विशेषणे विरुद्धार्थी करून जे जे अभद्र भयाण विद्रूप अतिगलिच्छ ते ते असे यातील पात्रे व प्रसंगांचे वर्णन करता येईल.
या जादूनगरीत टपालाच्या पाकिटातून ते जादूच्या सहाय्याने जोरदार आवाजात भाषण करणारे संदेश पाठवू शकतात, पण टपाल मात्र घुबडे पोचवतात. जादूने गाडी उडू शकते पण लेखिकेला वाटते तेव्हा ती गरम होऊन बंद पडते. पण ती (म्हणजे गाडी, लेखिका नव्हे) तशीच भटकत राहते आणि नेमकी, नायक संकटात सापडतो तेथे, कशी काय येऊन त्याला त्या संकटातून सोडवते? एकदा जादू म्हटले की काहीही लिहायची परवानगी. ते तर्काच्या कसोटीवर उतरणे मुळीच आवश्यक नाही असा लेखिकेचा समज दिसतो. तिच्या सुदैवाने तिला वाचकही ते मान्य करणारे भेटत आहेत. या जादूनगरीच्या शाळेतील मुलांसाठी लेखिकेने शोधून काढलेला क्विडिच हा खेळही खरोखरच चक्रम माणसाने शोधलेलाच वाटतो. अर्थात या बाबतीत मतभेद होऊ शकतो.
येथे प्र न असा आहे की मराठीत गोट्या, चिंगी, फास्टर फेणे, असे बालवाङ्मय किंवा किशोरवाङ्मय म्हणता येईल असे बाबासाहेब पुरंदरे, गोनीदांच्या शिवचरित्रमाला, महाभारतकथा उपलब्ध असताना केवळ नाविन्याच्या नावाखाली असे सडके लेखन मुलांना वाचायला द्यायचे का हा प्र न काहीसा, उत्तमोत्तम भारतीय खाद्यपदार्थ मिळत असताना आपल्या पाल्याला पिझ्झा किंवा बर्गर खायला द्यायचा का, अशा स्वरूपाचा आहे. एकवेळ या खाद्यपदार्थांनी पोट तितके बिघडणार नाही, जितके या सडक्या वाङ्मयाच्या वाचनाने डोके बिघडेल. शिवाय बिघडलेले पोट एकवेळ रेचक देऊन ताळ्यावर येईल पण बिघडलेले मन? त्याचे काय?
श्याम कुलकर्णी, डी ५४ सुंदर गार्डन माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे — ४११ ०५१ हॅरी पॉटरचे मायाजाल

आजचा सुधारक एप्रिल २००३ पान १९-२० व २१ वर ‘स्त्रियांची संख्या’ या मथळ्याचा माझा एक लेख आला आहे. ह्याचा शेवट संपादकीय टीप अशी आहे. ‘हे विवेकी असण्याचा आव आणणारे, कर्मठ पुरुषसत्ताक दृष्टिकोन मांडणारे लिखाण आहे. स्त्रिया दुर्बल हे चुकीचे सूत्र वारंवार जपत आपले पूर्वग्रह मांडणारे लेखन. सुधारणा शक्यच नाही हे गृहीत तत्त्व आहे इथे. पण या निमित्ताने वाचकांना लिहायची खुमखुमी यावी म्हणून हे प्रकाशित करीत आहे.’
‘विटीदांडूच्या खेळात – – – शहांनी बुत्ता तर दिला आहे – कोणाचे दांडू शिवशिवतात, पाहू – संपादक’
मला लेखनाची फारशी सवय नसल्याने, वरील संपादकीय वाचून सुरुवातीलाच माझा ‘प्रथमग्रासे मक्षिकापातः’ झाला. पण अधिक विचार केल्यावर माझा आनंद व उत्सुकता वाढीस लागली. कारण निदान या निमित्ताने तरी कोणाचे दांडू शिवशिवतील व मला, माझ्या विचाराला प्रतिकूल – क्वचित अनुकूल विचार वाचावयास मिळतील व या विचाराला तोंड फुटेल अशी आशा निर्माण झाली.
प्रथम मी हा लेख बऱ्याच विस्ताराने लिहिला होता. नंतर मला वाटू लागले की एवढ्या विस्ताराने लिहिल्यास कोणी ते वाचावयाचे कष्टही घेणार नाही. म्हणून मी त्यात बरीच काटछाट करून माझे एक विद्वान, विवेकी व आजचा सुधारक या पत्रकाशी संबंधित स्नेही यांना तो वाचावयास दिला. त्यांनी ‘हे वेगळे विचार माझ्या लक्षातही आले नव्हते’ असे म्हणून सदर लेख ‘आजचा सुधारक’कडे पाठवावयास सांगितले. मी लेख पाठविल्यावर बऱ्याच दिवसांनी तो छापून आला. लेखाच्या शेवटी लिहिलेले संपादकीय वाचन त्यावर परत काहीतरी सविस्तर लिहावे असे वाटले. परंत माझ्या स्नेह्यांनी सबरीचा सल्ला दिला. माझ्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून इतर काय लिहितात ते पहा व नंतर त्यावर उत्तर म्हणून लिहा, असे त्यांनी सांगितल्याने मी थोडी वाट पाहावयाचे ठरवले. परंतु २-३ महिने थांबूनही कोणीही, त्यावर काहीही लिहावयास तयार नाही असे दिसले. संपादकांना तर माझा लेख कर्मठ माणसाने लिहिला आहे असे दिसले. पण इतरांनाही त्यावर काहीही लिहावयाचे नाही? अनुकूल नकोच, निदान प्रतिकूल तरी ! कदाचित असेही असावे —- माझा लेख पटत तर नाही, मनात कोठेतरी खटकतोय नक्की, परंतु त्यातील विचार-वस्तुस्थिती खोडून तर काढता येत नाही. संपादकांनी तरी स्त्रिया सबल होणे कसे शक्य आहे हे निदान थोड्या विस्ताराने लिहावयास हवे होते. इतर कोणाचे दांडू शिवशिवत नाहीत असे दिसून आल्यावर तरी निदान त्यांनी पुढील एखाद्या लेखात आपले दांडू कसे शिवशिवतात हे निदान थोडक्यात तरी दाखवावयाचे होते.
‘स्त्रियांची संख्या’ (हा मथळा संपादकानी लिहिला आहे) हा लेख छापून येण्याअगोदर ता. ६.३.०३ रोजीच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘घटता स्त्रीजन्मदर-सामाजिक समस्येत आणखी भर’ या शीर्षकाचा एक लेख छापून आला होता. मी तो लेख अगदी काळजीपूर्वक वाचला. परंतु घटत्या स्त्रीजन्मदरामुळे कोठल्या समस्येत भर पडली आहे याचा उल्लेख कोठेही आढळला नाही.
रविवार ता. २९.६.०३ रोजी संध्याकाळी ६ ते ६.३० च्या, बहुतेक अल्फा टीव्ही वरील ‘संवाद’ या कार्यक्रमात रीमा लागू (सिनेनटी) या एक कार्यक्रम घेत होत्या. विषय होता ‘एड्स’. स्त्रियांना हा रोग होण्याचे प्रमुख कारण, जे संवादात भाग घेणाऱ्या सर्व स्त्रियांनी सांगितले ते असे होते. नोकरीनिमित्त १५-१५ दिवस फिरतीवर जाणाऱ्या पुरुषांना प्रथम हा रोग होतो. व नंतर विरोध करणे शक्य नसल्याने स्त्रियांना होतो. पुरुषांनीही, त्यांपैकी काही डॉक्टर्स होते, ही गोष्ट सत्य असल्याचे सांगितले. संवादात भाग घेणारे सर्व स्त्री पुरुष मध्यमवर्गीय सुशिक्षित दिसत होते. माझा मुद्दा एकच—-स्त्री ही दुर्बल आहे. हे एक मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्री-पुरुषांचे प्रातिनिधिक उदाहरण झाले.
आता कनिष्ठ वर्गातले पाहू:- एक घरकाम करणारी मोलकरीण. पदरी ५ मुले. माझ्या सुनेने एकदा सुचवले. ‘बाई ऑपरेशन करून घेतले तर पुढे मुलेही होत नाहीत आणि वर सरकार ५०० रुपये देते!’ बाईचे उत्तर – “मी मस्त सांगितलं. पण नवरा म्हणतो, “तुला थोडंच मुलांना पोसावं लागतंय. मी हाय ना खंबीर.” पण त्याचा खंबीरपणा फक्त बोलण्यापुरताच. हाय हमाल. दारू पितो. दुसरी बाई पण आहे. केव्हातरी मजा मारायला व मुलं काढायला तेवढा येतो. (हे तिचे चिडीचे उद्गार) मुलांना मलाच सांभाळावं लागतंय.’ थोडीशी आमची व बरीचशी त्या बाईने खटपट करून तिच्या ३ मुलांना, बालसुधारगृह अशा ठिकाणी ठेवले आहे.
अशासारखी बरीच प्रातिनिधिक उदाहरणे, डोळे उघडे ठेऊन पाहणाऱ्यास सभोवार दिसत असतात. (खंबीर स्त्रियांची उदाहरणेही दिसतात पण फार कमी. अपवादात्मक)
आणखी बरेच लिहिणार आहे. पण अगोदर स्त्रिया दुर्बल’ या आजच्या सुधारकच्या संपादकांना चुकीचे सूत्र वाटणाऱ्या विषयाचा उहापोह करतो. स्त्री दुर्बल असण्याचे महत्त्वाचे, कदाचित एकमेव कारण निसर्गाने तिच्यावर लादलेले गरोदरपण-गर्भारपण, नंतर बाळंतपण, मुलांचे संगोपन वगैरे. मुलांबाबत वाटणाऱ्या आत्यंतिक प्रेमामुळे नंतर ती आपोआपच घरी राहणे पसंत करते. नंतर स्वाभाविकच स्वैपाकघरातील कामे तिच्या वाट्याला येतात. काही स्त्रियांना बऱ्याच वेळा मुलांच्या संगोपनासाठी आपल्या करियरवर पाणी सोडावे लागते.
पुढील तुलना थोडी-बरीच लक्षात घ्यावी
१. पुरुष स्त्रीवर बलात्कार करू शकतो.
२. कुमारी स्त्रीवर बलात्कार झाल्यास पुढच्या अनेक संकटाना तोंड द्यावे लागण्याची शक्यता जास्त.
३. बलात्कारित स्त्री विवाहित असेल तर तुलनेने संकटे कमी. पण संकटे आहेतच. उघड झाल्यास तिला नवऱ्याने सोडून दिले जाण्याची शक्यता. ४. विवाहित स्त्रीस रखेल-यार ठेवणे कितपत शक्य?
१. स्त्री पुरुषावर बलात्कार करू शकत नाही.
२. कोठलाही पुरुष बलात्कार करूनही नामानिराळा राहू शकण्याची शक्यता जास्त.
३. विवाहित पुरुषाने जरी इतर स्त्रीवर बलात्कार केला तरी, व तो उघड झाला तरी त्याची पत्नी त्याला सोडून जाईल हे अगदी दुर्मिळ.
४. लग्न होऊनसुद्धा पुरुष उघडपणे रखेली-रखेल्या ठेवतो.
तुलना फार वाढवत नाही.
या तुलनेत पहिले कलम महत्त्वाचे —- निसर्गानेच निर्माण केले आहे! कलम नं. २ हा काहीसा कलम १ चा परिणाम व पुरुषाने स्त्रीवर्गावर लादलेली बंधने याचा मिश्र परिणाम आहे. पुढची कलमे बवंशी पुरुष वर्गाने स्त्रीवर्गावर लादलेली आहेत. सर्व कलमांच्या मुळाशी स्त्री गरोदर राहण्याचा धोका हे निसर्गाने लादलेले महत्त्वाचे कारण आहे. स्त्री सबल होण्यासाठी निसर्गच बदलावा लागेल. कदाचित, वैज्ञानिकांनी जर हा निसर्गच बदलला तर कोण जाणे.
आता थोडे भ्रूणहत्येसंबंधी —- मुलीच्या कौमार्यावस्थेत तिला गर्भधारणा झाली असेल तर, किंवा कोणत्याही कारणाने तिला नको असलेली गर्भधारणा झाली असेल तर भ्रूणहत्या करण्यास —- गर्भपात करण्यास तिला परवानगी आहे. फक्त गर्भात मुलगी आहे का याची तपासणी करणे व तसे असल्यास निव्वळ त्या कारणासाठी गर्भपात यास परवानगी नाही. यावरून असे दिसते की गर्भपात करण्यास कायद्याने परवानगी आहे. फक्त ती मुलगी आहे, निव्वळ या कारणासाठी गर्भपात करण्यास परवानगी नाही.
रनाची चिंता राहणार नाही
मुलींची संख्या —- हुंडाविरोधी कायदा कितीही कडक केला तरी हुंडा घेणारे, हुंड्यासाठी वधूपक्षास नाडणारे समाजात राहणारच. मुलींचा गरजूपणा कमी होणे ही एकच गोष्ट त्यांना या संकटातून सोडवू शकेल आणि यासाठी त्यांची संख्या निदान इतपत तरी कमी व्हावयास पाहिजे की त्यांच्यासाठी भरपूर चांगले, त्यांना शोभेसे लग्नाळू मुलगे समाजात असतील. किंबहुना असे मुलगे २-३ टक्के जास्तच असतील. मुलांना, त्यांना शोभेशा मुली थोड्या कमीच असती हुंडा मागतो म्हणून एका मुलास नकार दिला तर बिन हुंड्याचे त्यांना शोभेसे लग्नाळू मुलगे समाजात असतील. लग्न झाल्यावरही पुरुषाने लग्न झालेल्या आपल्या पत्नीस घटस्फोट दिल्यास त्याला दुसऱ्या मुली न मिळाल्याने, पहिल्या पत्नीस घटस्फोट देताना दहा वेळा विचार करावा लागेल. चुकून एखादीस घटस्फोट मिळालाच तर अनेक गरजू तिला शोभेसे मुलगे तयार असतील. अर्थशास्त्राचा एक नियम आहे. आवश्यक वस्तू बाजारात कमी असतील तर त्यांचा भाव वाढतो. लोक त्या काळजीपूर्वक वापरतात. याच न्यायाने मुली कमी असतील तर त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल.
स्त्री सबल होणे जरूर आहे हे मलाही मान्य आहे. कारण दुर्बलावरच नेहमी अन्याय, अत्याचार होतात. तिला सबल होण्यास मदत करणे हे सर्वांचे, मुख्यतः सुरुवातीस आईवडिलांचे कर्तव्य आहे. तिला लहान वयातच, सुरुवातीपासूनच केवळ घरकामात न गुंतवता भरपूर खेळू देणे व शक्य तेवढे शिक्षण देणे —- शालेय व व्यावहारिकसुद्धा —- हे आईवडिलांचे प्रथम कर्तव्य. यामुळे ती काही प्रमाणात तरी मानिसक दृष्ट्या खंबीर होईल. पुरुषाइतके सबळ होणे केवळ निसर्गच करू जाणे.
रामचंद्र गणपतराव शहा, ‘रत्नाकर’ २५० बी/३९ नागाळा पश्चिम, कोल्हापूर–४

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.