काही दिवसांपूर्वी दूरदर्शनवर ‘उंबरठा’ हा सिनेमा पुन्हा पाहिला. २०/२५ वर्षांपूर्वी तो जेव्हा प्रथम प्रदर्शित झाला तेव्हाही पाहिला होता आणि त्यावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चर्चेचा कार्यक्रमही आयोजित केला होता. आजही तो चित्रपट माझ्या मनात तीच अस्वस्थता, तेवढ्याच तीव्रतेने निर्माण करून गेला. या अस्वस्थतेत वाचकांनाही सहभागी करून घ्यावे असे वाटले म्हणून ही प्रश्नावली.
१. महाजन कुटुंबाच्या घरातील एकंदर वातावरणात समाजकार्य करणाऱ्या सासूची एकाधिकारशाही दिसते. ती मोठी सून स्वीकारते परंतु धाकट्या सुनेला – सुलभाला, जिला स्वकर्तृत्त्वाचे भान आहे, स्वीकारणे जड जाते. त्यात तिचे काय चुकले? तिची त्या वातावरणात होणारी घुसमट कोणी का समजून घेत नाही ? आपण करीत असलेल्या कामालाच तिने हातभार लावावा ही सासूची हट्टी भूमिका का म्हणून?
२. सुलभाची एका जवळपास असणाऱ्या गावातील महिलाश्रमाच्या अधी-क्षिकेच्या पदासाठी निवड होते. घर, विशेषतः नवरा व मुलगी सोडून जाणे तिला जड जाते. परंतु करिअर करायचे तर त्यासाठी थोडा त्यागही करावा लागणार म्हणून ती तयार असते. परंतु जेव्हा ती नवऱ्याला – सुभाषला – अशी नोकरी चालून आली आहे हे सांगते तेव्हा तो ‘तू जाणार नाहीस’ हे बजावतो. का? पुरुषी अहंकार? नवऱ्याची पूर्ण सत्ता बायकोच्या प्रत्येक गोष्टीवर? तिला स्वतंत्र अस्तित्व नाही? स्वतंत्र विश्व नाही?
३. सुलभा अधीक्षकेच्या पदावर रुजू होते. हळूहळू तेथील समस्या सोड-विण्याचा जिवापाड, तन्मयतेने प्रयत्न करते. परंतु एका मागून एक संकटे कोसळतात. राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप, संचालक मंडळातील व्यक्तींच व्यक्तींचा हस्तक्षेप संचालक मंडळातील व्यक्तींची दिखाऊ तकलाद बेगडी समाजसेवा. इ. इ.
सुलभाला हे सर्व अपरिचित का वाटावे? ती मुंबईहून समाजकार्याची पदवी घेऊन आलेली आहे, प्रौढ आहे, समाज, त्याचे प्रश्न, सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, त्यांचा मनमानी कारभार, त्यांतील व्यक्तींचे ढोंग ह्याबद्दल ती अनभिज्ञ कशी? ही सर्व संकटे येणारच हे खरे तर तिने गृहीतच धरायला नको का?
४. आश्रम, त्यातील स्त्रियांचे बहुरंगी प्रश्न, त्यांची गुंतागुंत, ती सुटूच नयेत, त्यांचे भांडवल करून स्वतःचा मोठेपणा मिरविणारी संचालक मंडळातील मंडळी, राजकारणी व्यक्ती इ. इ. हे सर्व दूर करणे शक्य नाही, तरीही ‘मी खचणार नाही’ हा सुलभाने व्यक्त केलेला निर्धार, तो जरी तिच्या कणखरपणाबद्दल बोलत असला तरी तिला नोकरीत अपयशच आले नाही का?
५. आश्रमात असताना ती घरी फोन करून चौकशी करते, सुभाष तिला भेटायला आश्रमात येतो, परंतु तिची आश्रमातील व्यस्तता पाहून चार दिवसांचा मुक्काम दोन दिवसांत गुंडाळून परत जातो.
पुरुषाची एखाद्या कामातील व्यस्तता स्त्री समजू शकते किंबहुना त्याला साथ देते, मग स्त्रीची गुंतवणूक, व्यस्तता पुरुषाने समजून घ्यायला काय हरकत आहे?
६. सुलभा घरापासून दूर राहिल्याने सुभाष एका स्त्रीमध्ये गुंततो, सुलभा नोकरी सोडून घरी परत आल्यावर तो तिला तशी कल्पना देतो आणि हे तिने समजून घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. का? हीच गोष्ट सुलभाच्या हातून घडली असती तर? सुभाषने तिला समजून घेतले असते?
त्या ठिकाणी ‘अर्थ’ सिनेमाची आठवण होते. नायक आपला सुखी संसार मोडून, दुसरा मांडतो. परंतु दुसरी जेव्हा ठोकरते तेव्हा पहिल्या पत्नीकडे परत येतो. ती त्याला एकच प्रश्न विचारत, ‘मी हे केले असते तर तू माझा स्वीकार केला असतास का?’ त्यावर त्याचे उत्तर ‘नाही’, ते ऐकून ती घराचे दार बंद करते.
७. शेवटचा प्रश्न सिनेमाला दिलेल्या शीर्षकाविषयी. काय सुचवायचे आहे ह्या शीर्षकातून? त्यातील कथानकातून? स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडला तर काय होते? तिने कोंडमारा झाला तरी घरातच राहावे? उंबरठा ओलांडूच नये? बाहेरचे जग पाहूच नये? याऐवजी एकदा ठेच लागली तरी हरकत नाही, परंतु तिला पुन्हा उभारी का दिली नाही? पुन्हा घर सोडावे लागते ते का? स्वकर्तृत्वावरील तिचा ठाम विश्वास हे जसे महत्त्वाचे कारण आहे तसेच घराने, विशेषतः नवऱ्याने नाकारले हेही नाही का? असो.
कर्मयोग, प्लॉट नं. ४, बलराज मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२