संपादकीय आगामी विशेषांकांबद्दल

आपला येता (जानेवारी—फेब्रुवारी २००४) अंक हा आधुनिक विज्ञानाचे स्वरूप या विषयावरचा विशेष जोडअंक असेल. त्यानंतरचा अंक मार्चचा असेल.
या विशेषांकाचे संपादक चिंतामणी देशमुख व्ही. जे. टी. आय. मध्ये तीस वर्षे भौतिकीचे अध्यापन करून स्वेच्छानिवृत्त झाले आहेत. डॉ. होमी भाभा आणि दामोदर धर्मानंद कोसंबी यांची चरित्रे, देवांसि जिवें मारिलें (सहलेखक) ही विज्ञान-कादंबरी आणि कोलाहल, अपूर्णमित आणि स्वयंसंघटन (भाषांतरित), ही त्यांची ग्रंथसंपदा आहे. लोक-विज्ञान संघटना आणि विज्ञान ग्रंथालीतही ते कार्यरत असतात. विषय मोठा आणि महत्त्वाचा आहे. लेखही एका जोडअंकात सामावून घेता न येण्याइतके आहेत. हे लिखाण पुढेही काही अंकांमधून येत राहील. नंतर संपूर्ण लिखाणाचे पुस्तक काढायचाही विचार करता येईल. वाचकांच्या सूचनांच्या प्रतीक्षेत असूच. शहरीकरणाभोवती बेतलेला एक विशेषांक २००४ च्या मध्यावर काढायची इच्छा आहे. त्याच्या संपादक सुलक्षणा महाजन असतील. स्वयंसेवी (गैरसरकारी पक्रा) संस्थांवर एक विशेषांक २००४ च्या अखेरीस काढायची इच्छा आहे. त्याचे संपादक तारक काटे व श्रीकांत करंजेकर हे असतील.
या विशेषांकांसाठी लिहिण्याची इच्छा दर्शविणारी पत्रे येत असतात, व अशा लिखाणाचे नेहमीच स्वागत होते. पण अतिथि संपादकांच्या (खरे तर नेहमीच्या संपादका-च्याही!) मनात अंकांचा काही आकृतिबंध असतो. कधीकधी लेख विषयानुरूप असूनही या आकृतिबंधात बसत नाहीत. अशावेळी ते लेख योग्य वाटल्यास नेहमीच्या अंकांमध्ये प्रकाशित होतात. ही शक्यता इच्छुक लेखकांनी ध्यानात ठेवावी, कारण विशेषांक नेहमीच्या अंकांपेक्षा बरेच सुघड असतात, व असायलाच हवेत.
गेले काही दिवस अंकासाठी मजकूर उपलब्ध होण्याचे प्रमाण वाढते आहे, हे सुचिन्ह समजायला हवे. खास ‘आसु’ साठी लिहिलेल्या लेखांव्यतिरिक्त महत्त्वाचे वाटलेले, इतरत्र प्रकाशित झालेले लेखनही छापले जात असते, आणि ह्या प्रकारच्या लिखाणाचीही मला तरी आवश्यकता वाटते. पण यामुळे बरेचदा पृष्ठमर्यादेमुळे लिखाण मिळणे आणि प्रकाशित होणे यामध्ये बराच काळ जातो. काही अंक ४० ऐवजी ४८ पानांचे करून हे आटोक्यात ठेवता येत होते. आजवर आम्ही अशा ‘मोठ्या’ अंकानंतरचा अंक ‘लहान’ करून वर्षाभरात ४८० पाने मजकूर पुरवत असू. यापुढे मात्र काही अंक मोठे झाले तरी पुढचे अंक लहान न करण्यासारखी स्थिती येत आहे. याचाच भाग म्हणून लेखक-पत्रलेखकांना मोजके, नेमके व थोडक्यात लिहिण्याची विनंती करत आहे, कारण संपादकीय कात्री लागलेली कोणत्याच लेखकाला आवडत नाही—-जरी तिचा वापर अपरिहार्य असला, तरीही ! —- नंदा खरे