पत्रसंवाद

एस. पी. देशपांडे
लेखांचे विषय जरी त्या-त्या विशेषज्ञांनी निवडले असले आणि जगदीशचंद्र बसूंच्या मुखपृष्ठावरील उताऱ्यावरून एकच सर्वसमावेशक विज्ञान असले तरी त्याच्या विविध उपांगांचा ह्या अंकात समावेश करण्याची घेतलेली खबरदारी स्पृहणीय आहे. ज्यांना पानपूरके म्हणतात ती किंवा ज्यांना अवतरणे किंवा चौकटी म्हटले आहे त्या, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि संशोधकांच्या विज्ञानविषयक निबंधांतून उद्बोधक विचार डोळसपणे निवडून मधून मधून अंकात पेरल्याने ह्या अंकाच्या गुणवत्तेला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.

एका अत्यंत महत्त्वाच्या विज्ञानशाखेची गैरहजेरी तीव्रतेने जाणवते, ती म्हणजे रसायनशास्त्र शाखेची. मानवी जीवनावर प्राचीन काळापासून परिणाम करणारा व त्याच्या साहाय्याने विज्ञानाच्या शाखोपशाखात भर टाकणारा, विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा औषधशास्त्रात रसायनशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व असताना, अशी महत्त्वाची शाखा कशी सुटली? त्यामुळेच कदाचित ज्याँमारी लेन या नोबेल विजेत्याने २००० च्या जानेवारीत पुण्यास भरलेल्या ‘भारतीय विज्ञान परिषदे’त केलेल्या भाषणातला, ‘कृत्रिमरीत्या अनेक भिन्न मार्गाने उत्क्रांती घडवून आणणे रसायनशास्त्राला शक्य आहे.’ हे रसायनशास्त्राची भलावण करणारे उद्गार उद्धृत करून दुधाची तहान ताकावर भागवली असावी.

बहुतेक लेखकांनी आपले विवेचन करताना बरीच उदाहरणे घेऊन विषय समजणे सुलभ केलेले आहे. नाही म्हणायला श्रीमती महाजनांच्या लेखात पहिल्या चौघींचे संशोधन मानवी जीवनावर दुष्परिणाम करणाऱ्या बाबींवर आधारलेले असून फक्त शेवटच्या लिन मार्गुलीस हिचेच तेवढे जीवशास्त्राशी संबंधित आहे. विज्ञानाच्या मुख्य प्रवाहात मारी क्यूरीचा अपवाद वगळता बाकी कुणी आघाडीच्या स्त्रीवैज्ञानिक झाल्याच नाहीत का? असा प्रश्न मनात येतो. मात्र युरोपात १८व्या शतकापासून महिला वैज्ञानिक व गणितींना जी सावत्रपणाची वागणूक दिली जात असे, त्यात श्रीमती महाजनाच्या लेखातल्या वैज्ञानिकांच्या कृतींची दखल घेतली गेल्याचे उल्लेख वाचून काहीसा फरक पडण्याचे जाणवते.

एक त्रुटी महाजनांच्या लेखातली दाखवायची म्हणजे पहिलीच स्त्री वैज्ञानिक (जी खऱ्या अर्थाने वैज्ञानिक नव्हतीच व तसा महाजनांचाही दावा नाही.) फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचे भारताच्या संदर्भात कँटोनमेंट बोर्डस् निर्माण करण्याचे जे योगदान आहे, त्याचा अनुल्लेख ! नाईटिंगेलच्या आरोग्यसुधारणा-कार्यामुळे इथल्या नेटिव्ह मंडळीत इतकी जागृती झाली की पटकी सारखी एखादी साथ आली की, पूर्वी जे लोक ‘देवाची करणी’ म्हणून नशीबाला दोष देत असत तेच आता (म्हणजे तेव्हा) नगरपालिकेच्या प्रमुखाकडे प्रतिबंधक उपायांसाठी धाव घेऊ लागले, अशी नोंद तिच्या कार्याबद्दल आढळते. मराठीत वैज्ञानिक लेखन करताना वापरलेले पारिभाषिक शब्द वाचकांना बोजड वाटणे स्वाभाविक असले तरी संक्षेपणवाद, साकल्यवाद, खोडताळावादं, गुणघात, अभ्युपगम, हे शब्द वाचताना अडखळल्यासारखे वाटते. मात्र कंसात मूळ इंग्लिश शब्द लिहिल्याने बोध होणे सुलभ जाते.

प्रकाश बुरटे, डी-८४/८५२ एम्.आय.जी. कॉलनी, बांद्रा पूर्व, मुंबई- ४०००५१
विज्ञानाचे स्वरूप आणि स्थिती अशा विषयावर ८०-९० पानांत नेटका अंक प्रसिद्ध करणे, हे आह्वान छान पेलले आहे. अनेक लेखांत तत्त्वज्ञानाचा सहज स्पर्श होत असल्याने त्या त्या क्षेत्रांची परिभाषा वापरणे स्वाभाविक आहे. अशा परिभाषेमुळे कधी कधी लिखाण बोजड होते. परंतु या अंकात तसे जाणवत नाही. ही एक सुखद घटना आहे. अशा प्रयत्नांतूनच भाषेचे सामर्थ्य जाणवते आणि वाढते देखील. या अंगाने पाहता हेमचंद्र प्रधान आणि मिलिंद वाटवे यांचे लेख अप्रतिम वठले आहेत.

आता थोडा वेगळा सूर लावतोय. संपादकीय टिपणातील एक मुद्दा (पृष्ठ 366, खालून दुसरा परिच्छेद) विज्ञान संक्षेपणवादी आहे आणि त्यामुळे जीवनाचे ‘संपूर्ण दर्शन’ घडविण्यास अपुरे आहे. ही साकल्यवादी टीका बरीच जुनी आहे. न्यूटनीय यांत्रिकवादाच्या समोर ती बरीचशी खरी ही होती. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीसच न्यूटनीय यांत्रिकवाद संपुष्टात आला. आता संक्षेपणवाद विरुद्ध साकल्यवाद असे (निदान) विज्ञानात तरी परस्परविरोधी द्वंद्व नसून दोहोचे एक प्रकारे संश्लेषण झालेले आहे.

‘ हे जे संश्लेषण झालेले आहे त्यामुळे जीवनाचे ‘संपूर्ण दर्शन’ घडविण्यास आता विज्ञान समर्थ आहे, असे वरील परिच्छेदातून ध्वनित होते. परंतु कितीही प्रगती झाली, तरी विज्ञान हे मानवी समाजाच्या अनेक क्षेत्रांपैकी केवळ एक क्षेत्र आहे. ते जीवनाचा केवळ एक भाग आहे, परिणामी, संपूर्ण जीवनाचा अर्थ कवेत घ्यायला अथवा जीवन ‘दर्शन’ घडवायला जीवनाचा एक भाग समर्थ होणे अवघड आहे; कारण, जीवनाचा कोणताही एक विभाग संपूर्णाएवढा होणे, हा विरोधाभास आहे. परंतु विज्ञानप्रेमींच्या बाबतीत ही बाब नजरेआड होणे सोपे असते. तसे झाल्याने विज्ञानाचे श्रेष्ठत्व मनावर इतके बिंबते, की बाकी जीवन सहज नजरेआड होते, याची अनेक उदाहरणे आजूबाजूला आहेत. या अंकातीलच उदाहरण द्यायचे तर ते वि. दा. सावरकरांच्या ‘तर्कशुद्ध’ विचारांचे देता येईल. मनुष्याचा देव ‘तर्कशुद्ध’पणे नाकारणारे सावरकर अनेकांना ‘विज्ञानवादी’ वाटतात. म्हणून त्यांची अवतरणे उद्धृत (पृष्ठ ४१६) केली जातात. परंतु याच सावरकरांची ‘तर्कशुद्ध ‘ता जन्मभू, कर्मभू आणि पुण्यभूमार्गे मुस्लिमधर्मीयांचा द्वेष पसरविते. आपण सावरकरांची मानसिकता तुकड्यातुकड्यांनी स्पष्ट करतो.विज्ञानवादी सावरकर आणि राजकारणी सावरकर वेगळे आहेत असे ठासून सांगतो. याउलट, असे ‘तर्कशुद्ध’ नसणारे ‘आतला आवाज’ ऐकणारे महात्मा गांधी वैज्ञानिकांच्या नजरेत कधीच विज्ञानवादी नसतात. तसा गांधीजींचाही दावा नाही. परंतु ते द्वेषाला नाकारतात. माणुसकी जपतात. तेव्हाही गांधींची मानसिकता आपण तुकड्यातुकड्यांनी स्पष्ट करतो.

ही तुकड्यातुकड्यांची स्पष्टीकरणे टाळायची असतील, तर विज्ञान हा जीवनाचा केवळ एक भाग आहे, तो संपूर्ण जीवनाची कधीच बरोबरी करू शकणार नाही आणि संपूर्ण ‘जीवन दर्शन’ देखील घडवू शकणार नाही. हे सत्य आपण पचविले पाहिजे. या भागाचा जीवनाच्या इतर भागांशी संबंध जोडून जीवनाकडे एकात्मतेने पाहिले पाहिजे. यात विज्ञानाने माणसाच्या विस्तारलेल्या कक्षांना कुठेही धक्का पोहोचत नाही. हेही पक्के लक्षात ठेवले पाहिजे.

विज्ञान, उत्क्रांती, इतिहास (देशप्रेमातील देश) तत्त्वज्ञान, अशा क्षेत्रांविषयी लिहिताना अजाणतेपणे त्यांना मानवी मनाची वैशिष्ट्ये चिकटतात, कधी चिकटवली जातात. परिणामी, या क्षेत्रांना स्वतःचे हेतू, उद्दिष्टे प्राप्त करून दिली जातात. थोडक्यात, त्यावर केवळ सजीवतेचेच नव्हे, तर उत्क्रांत मानवी प्रज्ञेचे आरोपण होते. असे अनेकदा झालेले दिसते. मला ते सतत खटकते, अशा काही जागा अनवधानाने या अंकात देखील आहेत, म्हणून आधी या मुद्द्यांची सविस्तर मांडणी करतो आणि सरते शेवटी त्यांचा उल्लेख करतो.

हा तर केवळ लेखनशैलीचा भाग आहे, असे बचावाचे विधान वरील मुद्द्याच्या संदर्भात केले जाते. येथे लेखनशैलीच्या बचावाचा मुद्दाच नाही. कारण या शैलीतून मानव आणि ही क्षेत्रे यांचे संबंध मानवी कक्षेबाहेरील नियमांबरहुकूम घडतात, अशी कल्पना रुजायला मदत होते, त्यामुळे कधी फारसे बिघडत नाही. परंतु जेव्हा मानवी सर्जनशीलतेतून तयार झालेली ही क्षेत्रे मानवी मनावर हुकमत गाजवू लागतात तेव्हा बरेच बिघडते. मानवानेच तयार केलेली यंत्रे मानवांवर कारखान्यात हुकमत गाजवू लागतात, त्यानेच जन्माला घातलेली ईश्वरी कल्पना किंवा धर्मकल्पना माणसांच्या मनावर राज्य करते, तसे काहीसे होऊ शकते. त्यामुळे ही शक्यता मुळातच खुडायची असेल, तर निर्जीव विज्ञानाला किंवा इतर अशा कोणत्याच गोष्टींना मानवी हेतू, मने, वगैरे चिकटवू नयेत (देशाला ‘भारतमाता’ वगैरे म्हणू नये, या चालीवर.)

याच्याशी निगडित प्रश्न येथे विचारात घेतला पाहिजे. तो म्हणजे, विज्ञानाला देखील मानवी प्रज्ञाच जन्माला घातले आणि विज्ञानात संशोधन करणाऱ्या मंडळींना हेतू, उद्दिष्टे, स्वार्थ, देशप्रेम, … असे नाना विकार असतातच. जर विज्ञान निर्माण करणारी माणसे या विकारांपासून मुक्त नसतील, तर विज्ञान तरी कसे मुक्त राहील? दुसऱ्या शब्दांत विज्ञानाला मानवाच्या मनातले हेतू असणे स्वाभाविक आहे. ते चांगल्या शैलीतून वाचकांपर्यंत पोहचण्यात काय वावगे आहे? प्रश्न बरोबर आहे. परंतु वास्तवात विज्ञानाचा विकास कोणा एका व्यक्तीमुळे होत नसतो. प्रत्येक संशोधनाची चिकित्सा लिंग, धर्म, देश, भाषा, वर्ण यांच्या भिंती ओलांडून होत असते. त्यामुळे विज्ञान व्यक्तिगत मूल्यव्यवस्था ओलांडते. याला कधी वेळ लागतो. परंतु ही प्रक्रिया अटळ असते. म्हणूनच विज्ञानात संशोधन करणाऱ्या मंडळींचे हेतू, उद्दिष्टे, स्वार्थ, देशप्रेम, असे नाना विकार विज्ञानातून दिसेनासे होतात. विज्ञानातून असे विकार बाजूला सारले गेले, तरी तंत्रज्ञानातून ते दूर होतातच असे नाही. म्हणून तंत्रज्ञान अमेरिकन, भारतीय, मराठी, जपानी, पुरुषसत्ताक, स्वार्थी, युद्धखोर, शांतताप्रिय,… असू शकते. तसे ते अनेकदा असतेदेखील. परंतु विज्ञान आणि तंत्रज्ञानात फरक करायला आपण शिकले पाहिजे.

या संदर्भात कुणी मॅनहॅटन प्रकल्पाचा दाखला देऊन असे जरूर म्हणू शकेल, की अणुबाँबच्या प्रकल्पातून किती तरी नव्या मूलतत्त्वांचा शोध लागला आहे. तसेच, क्लोनिंगचे तंत्र विकसित करण्याच्या प्रयत्नांमुळे जीवशास्त्रातील काही विवाद्य मुद्दे स्पष्ट झाले आहेत. यातून विज्ञान-तंत्रज्ञानाचे नाते किती घट्ट आहे हे ध्यानात येऊ शकेल. दुसऱ्या शब्दात विज्ञान-तंत्रज्ञान ही जुळी भावंडे आहेत. एवढेच नव्हे तर काही हातांनी (तंत्रज्ञान) केल्याशिवाय वैचारिक बदलांचा मार्ग दृष्टिपथात येत नसतो. अशा स्थितीत तंत्रज्ञानाच्या विकारांची विज्ञानाला लागण होणार नाही, असे कशाच्या आधारावर म्हणता येईल?

हा मुद्दा देखील बिनतोड आहे. तंत्रज्ञानातील गुप्तता हे त्याला विकार चिकटण्याचे मुख्य कारण आहे. ही गुप्तता केवळ शस्त्रास्त्रांच्या बाबतींतच असते असे नाही. अगदी साबण करण्याचे तंत्रज्ञानदेखील अनेक कंपन्या गुप्त ठेवायची पराकाष्ठा करतात. जेव्हा तंत्रज्ञानातील गुप्तता विज्ञानाचा भाग बनते, तेव्हा हे विकार विज्ञानालाही जडतातच. परंतु, या गुप्ततेविरुद्ध विज्ञानाच्या प्रगतीसाठी बंडे होतात. कधी ती ‘इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा’ या चालीवर तंत्रज्ञानाविरुद्धही दंड थोपटतात. म्हणूनच नील्स बोहर, ओपनहायमर, यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप होतात. खरे तर, गुप्ततेपासून विज्ञान मुक्त करण्याची जबाबदारी सर्व विज्ञानप्रेमींची आहेत. ती पार पाडण्यासाठी जीवनाच्या इतर क्षेत्रांकडून ऊर्जा घेणे क्रमप्राप्त आहे. (कारण शेवटी विज्ञान हा जीवनाचा केवळ एक भाग आहे. जीवन त्याच्या कोणत्याही एका किंवा अनेक भागांपेक्षा विशाल असते. म्हणजे आपण पुन्हा सावरकर आणि गांधी यांच्यातील फरकांकडे येतो.)

तर सांगायचा मुद्दा म्हणजे मानवी (आणि हो, वैज्ञानिकांचेही!) विकार विज्ञानाला चिकटवणे कटाक्षाने टाळले पाहिजे. इतरांची मते उद्धृत करतानादेखील उद्धृतांमध्ये असा भाग असेल, तर त्यावर टिप्पणी केलीच पाहिजे.

या गुंतागुंतीच्या गोष्टी सांगायचे कारण म्हणजे अशा काही जागा अनवधानाने या अंकात आहेत. खाली काही अशी काळजी घेण्याचे राहून गेलेल्या जागा नोंदल्या आहेतः पृष्ठ ३७३, खालून ७ वी ओळ : ‘त्यांच्या मते विज्ञानाचे उद्दिष्ट मानवाची स्थिती सुधारणे हे आहे.’ • पृष्ठ ३९२, वरून ६ वी ओळ : ‘… आत्मसंतुष्टता विज्ञानाला पुन्हा नको आहे. ‘ •पृष्ठ ४२२, पहिला परिच्छेद : विज्ञान न्यूट्रल आहे, यासाठी ही वाक्ये आली आहेत. या मताला छेद देणारी चौकट पान क्र. ४३७ वर आहे. • पृष्ठ ४२५, खालून २ री ओळ : ‘ प्रत्येक ज्ञानशाखेने स्वतःचे साम्राज्य उभारले आहे.’ हा मुद्दा लेखनशैलीचा आहे, असे जरूर म्हणता येते. परंतु ते सर्वच ठिकाणी लागू पडणारे विधान आहे. अंक वाचून मलाही प्रतिक्रिया द्यावी असे आपणहून वाटले म्हणून हे सविस्तर पत्र. चांगला अंक काढल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून अभिनंदन! नंदा खरे, नागपूर.

‘विज्ञान कसे असावे’, या ऐवजी ‘विज्ञान कसे घडते’ याचा अभ्यास करून थॉमस कूनने आपली ‘वैज्ञानिक क्रांतीची’ संकल्पना मांडली. विज्ञान काही गूढ यंत्रणेने ‘वरून खाली’ पाहिल्यासारखे वाटत होते, ते आता जमिनीवर आले. त्याच क्षणी अनेकांच्या मनात अनेक प्रश्नही उभे झाले. मुळात कून म्हणाला काय, तर- एखाद्या क्षेत्रात वैज्ञानिक काही निरीक्षणे करू लागतात. यातून काही नियमितता तर दिसतात, पण त्यांना सुसंगती देणारा पॅराडाईम मात्र घडत नाही. ही झाली ‘विज्ञानपूर्व’ स्थिती. मग पॅराडईम (रूपसरणी, सिद्धांतावली, आलोक) घडतो आणि रुजतो. पॅराडाईमला सबल करणारे विज्ञान घडू लागते. हे झाले ‘प्रसामान्य’ विज्ञान: पण काही प्रश्नांना पॅराडाईम उत्तरे देऊ शकत नाही. काही निरीक्षणे पॅराडाईमशी ‘असंगत’ असतात. अखेर एक नवा पॅराडाईम घडतो, आणि रुजतो. हा झाला ‘पॅराडाइम शिफ्ट’, उर्फ ‘वैज्ञानिक क्रांती’. हे चक्र सुरू राहते. नव्या जुन्या पॅराडाईम्सची ‘प्रमाणे’ वेगवेगळी असतात, त्यामुळे एकाच्या भाषेत दुसऱ्याबद्दल बोलताच येत नाही. ही झाली त्या दोन पॅराडाईम्समधली असंयोज्यता. या असंयोज्यतेमुळे कोणताच पॅराडाईम ‘वैध’ आहे की नाही ते ठरवता येत नाही; आणि एक सापेक्षी, रिलेटिव्हिस्टिक भाव उपजतो. आता या मांडणी बाबत मला पडलेले काही प्रश्न नोंदतो, त्यांचे निराकरण होईल अशा आशेने.
(१) जुन्या पॅराडाईमने स्पष्ट होणारे सर्व निसर्गव्यवहार सामावून घेऊन, वर जुन्यातून उत्तरे न मिळणारे काही प्रश्न सोडवून आणि जुन्या काही असंगतींना सुसंगत करूनच नवा पॅराडाईम रुजतो अशी माझी समजूत आहे. जसे- न्यूटनीय पॅराडाईममध्ये प्रकाशकिरण ‘वाकत’ नाहीत व बुधाची कक्षा स्वतः ही फिरत नाही. प्रत्यक्षात मात्र किरण जड वस्तूंजवळून जाताना वाकतात आणि बुधाची कक्षा ठरीव नियमांप्रमाणे बदलते. सापेक्षतावादाने न्यूटनीय पॅराडाईम ज्या गोष्टीचे स्पष्टीकरण देत होता त्यांचे तर स्पष्टीकरण दिलेच, आणि वर प्रकाशकिरण वाकणे व बुधाची कक्षा Precess होणे यांचेही स्पष्टीकरण दिले. न्यूटनऐवजी सापेक्षतावाद मान्य झाला, कारण तो जास्त नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरण देऊ शकला. पॅराडाईमच्या वैधतेची तपासणी निसर्गातील व्यवहारांशी ताडून होते, रिचर्ड फाईनमन म्हणतो, “What is neccessary for the very exitence of science and what the characteristics of nature are, are not to be determined by propous preconditions; They are determined always by the material with which we work, by nature herself.” (द् कॅरॅक्टर ऑफ फिजिकल लॉ) बरे प्रकाशकिरणांचा सरळपणा-वाकडे- पणा किंवा लंबगोल कक्षेचे ‘भिरभिरणे’ (precessions) या कल्पनांबाबत न्यूटनीय आणि सापेक्षतावादी समजुतींमध्ये असंयुज्यताही मला दिसत नाही.
(२) जसे विज्ञानात पॅराडाईम्स असतात, तसे विज्ञानाकडे पाहण्यातही पॅराडाईम्स मानावे का? उद्गमनवाद (बेकन) खोडताळावाद (पॉपर), वैज्ञानिक क्रांती (कून), यांना पॅराडाईम्सचा दर्जा द्यावा का? ते असंयुज्य आहेत, आणि त्यांच्यात वैध-अवैध ठरवायचे निकषही नाहीत. अशा स्थितीत एखादी व्यक्ती, एखादा समाज, आपल्याला सोईस्कर असे तंत्रज्ञान, त्याला जन्म देणारा वैज्ञानिक पॅराडाईम आणि त्याची पाठराखण करणारे तत्त्वज्ञान, सारेच निवडू शकतो का? हे ‘कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या’ स्वातंत्र्य सांस्कृतिक सापेक्षी भावाने (कल्चरल रिलेटिव्हिझम) मान्य ठरायला हवे का? अर्थातच या मुद्द्यांमध्ये नवे काही नाही. असंयुज्यता-सापेक्षी दृष्टिकोन यांच्यावरील वाद हे कूनच्या संकल्पनेच्या प्रतिवादातले ‘मोठे’ क्षेत्र आहे. इतर काही बाबी कूनचा चरित्रकार स्टीव्ह फुलर (थॉमस कून : अ फिलॉसॉफिकल हिस्ट्री ऑफ अवर टाईम्स) नोंदतो.
(३) कूनच्या ग्रंथाचा काळ आहे दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्धाचा. एकीकडे हिरोशिमा नागासाकीमुळे वैज्ञानिकांच्या मनात ‘पापाची’ भावना उपजली होती. अनेक अणुबाँब शास्त्रज्ञ ‘शांततेसाठी अणूं’ कडे वळत होते. पण त्याचवेळी अमेरिकेला युद्धतंत्रज्ञानासाठी वैज्ञानिकांची गरज भासत होती. आयझेनहॉवरने ज्याला ‘मिलिटरी- इंडस्ट्रियल काँप्लेक्स’ म्हटले ती ‘रचना’, मॅकार्थी या सीनेटरने छुप्या ‘कॉमीं’ना शोधून काढण्यासाठी चालवलेले ‘अभियान’, यातून अमेरिकेच्या साम्राज्यवादी गरजाही व्यक्त होत होत्या. विज्ञान हे काही तरी ‘दूषित’ प्रकरण नसून इतर ज्ञानशाखांसारखेच आहे, हे ठसवण्याची गरज हार्वर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष जेम्स बी. कॉनँट याने हेरली, आणि ‘अ जनरल एज्युकेशन इन सायन्स’ नावाचा अभ्यासक्रम घडवला गेला. कूनही हार्वर्डचाच. त्याची मांडणी विज्ञानाची वैशिष्ट्ये दडवण्याच्या या कार्यक्रमाला उपयोगीच होती. हेमचंद्र प्रधानही त्यांच्या ‘विज्ञान ही चीज काय आहे?’ या लेखाच्या उत्तरार्धात (पृ. ४५५) हे नोंदतात ‘विज्ञान हे अन्य प्रकारच्या ज्ञानापेक्षा श्रेष्ठ नाही. एखाद्या समुदायाने, जमातीने परस्परसंमतीने आपल्याला आवश्यक आणि पुरेसे सुसंगत नियम बनवून त्यांचे आदानप्रदान केले, ‘ज्ञानव्यवहार’ केला, तर तो विज्ञानाइतकाच ग्राह्य धरायला हवा.’

म्हणजे वैज्ञानिकांमध्ये एकजूट असते. ती इतरांनीही अंगी बाणवली तर तेही ‘हम किसी से कम नहीं’ म्हणू शकतील ! निसर्गात आपल्या ‘नियमांची’ उदाहरणे दिसायला हवीत, नाहीतर ते नियम चुकीचे किंवा अपूर्ण मानायला हवेत – हे विज्ञानाचे अंगच कूनने मोडीत काढले.
(४) असंयुज्यतेतून येणारा सापेक्षी भाव फायराबेंडने आणखी गडद केला. ‘काहीही चालते’, अशा शब्दांत त्याने विज्ञानाची संभावना केली. हा सांस्कृतिक सापेक्षतावाद प्रत्यक्षात काय परिणाम घडवतो याबद्दल फुलर म्हणतो “परक्या संस्कृती समजून घेण्यासाठी सापेक्षी पद्धत वापरावी, इथपर्यंत ठीक-पण जेव्हा सांस्कृतिक फरकांना केवळ फरक म्हणून महत्त्व द्यायला सुरुवात होते, तेव्हा समस्या उद्भवतात. वरकरणी ही (सापेक्षी) विचारांची पद्धत उदारमतवादी, ‘जगा आणि जगू द्या’ अशी आहे. प्रत्यक्षात मात्र आपण आपल्या संस्कृतीत केंद्रस्थानी मानले जाणारे मापदंड इतरांना लावण्यापासून मुक्त होतो. इतर संस्कृती जबरदस्ती केल्याशिवाय बदलणार नाहीत, बदलू शकणार नाहीत, आडमुठ्या आहेत असे सारे म्हणताना आपल्या मनाचा उदार खुलेपणा कधी कसोटीवर घासलाच जात नाही.

भारतीयांना याची उदाहरणे शोधणे सोपे जावे,” ‘त्यांना’ शिक्षणाची गरज नसते” इथपासून मनुस्मृतीपर्यंत जाणारे ‘उदारमतवादी’ सगळे फरकांना फरक म्हणूनच महत्त्व देत असतात. तालिबान किंवा इराक किंवा गुजराती मुसलमानांशी चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण त्यांना ‘आपली’ मूल्ये समजणारच नाहीत, ही अखेर सापेक्षी वृत्तीची घसरणच असते!
(५) बरे, ज्या ‘समाजा’च्या तपासणीतून कूनची संकल्पना त्याने घडवली, त्या वैज्ञानिकांवर कूनचा परिणाम काय झाला. फुलर नोंदतो की कूनच्या प्रसिद्धीनंतर वैज्ञानिक विज्ञानाचा इतिहास लिहिणारे व विज्ञानाचे तत्त्वज्ञान मांडणारे यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले. ते थेटपणे ‘लोकप्रिय’ लिखाण करत सामान्य माणसांपुढे आपल्या संशोधनाची फलिते मांडू लागले. ते ना पॉझिटिव्हिस्टांकडून मान्यता मागतात, ना कूनवादी प्रमाणपत्राची अभिलाषा बाळगतात. ते थेट सामान्यांपुढे जातात. या वृत्तीला ‘धादांतवाद’ म्हणतात, ‘कॉमन सेन्स’ वाद. तो इतर साऱ्या जाड चष्म्यांच्या वादांपेक्षा पचायला हलका दिसतो!

भ. पां. पाटणकर, ३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद – ५०००२७
विज्ञान काय करू शकते हे ‘विज्ञानाच्या स्वरूपात’ बसते त्याचप्रमाणे विज्ञान काय करू शकत नाही हेही विज्ञानाचे स्वरूपच आहे. आजच एका पुस्तकातला एक उतारा वाचायला मिळाला. लेखक – F. Bent, C.U.P., 2001). “… the social sciences are strongest where natural sciences are weak- est; just as the social sciences have not contributed much to explana- tory and predictive theory, neither have natural science contributed to the reflective analysis and discussion of values and interests, which is the prerequisite for an enlightened political, economic, and cultural development in any society.” विज्ञानाचा अर्थ हाही एक महत्त्वाचा विषय आहे हे यावरून दिसून येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.