पत्रसंवाद

मी एक सामान्य वाचक आहे. साहित्याशी माझा दूरान्वयानेही संबंध नाही. परंतु माझी पंधरा वर्षांनी मोठी असलेली बहीण एक ऑक्टोबर २००५ ला शंभर वर्षांची झाली असती त्यानिमित्ताने आजचा सुधारक ने एक विशेषांक काढला, कारण एके काळची ती सुप्रसिद्ध लेखिका होती. हा अंक वाचण्याची मला उत्सुकता होती.बाळुताईंची शंभरी! आज तिच्या साहित्याच्या क्षेत्रात (समाजशास्त्रात नव्हे) काय बदल झाले असतील हे जाणून घेण्याची इच्छा होती. सुदैवाने तीन उच्चशिक्षित मराठीच्या प्राध्यापिकांनी लेख लिहायचे कबूल केल्याचे ऐकले आणि माझी उत्सुकता वाढली. या तीनही प्राध्यापिकांचे लेख मी वाचले. ते वाचनीय आहेत. त्यात आणखी काही असते तरी ते मी एका बैठकीतच उत्साहाने वाचले असते. पुष्पाताई भाव्यांनी आपला लेख अतिशय मार्मिक व परिपक्व नजरेने उभा केला. डॉ. विद्युत भागवतांनी आपल्या लेखामागे कष्ट ओतले आहेत. परंतु दोन ठिकाणी तीन तीन पाने वाचकाचे पाय जमिनीवरून सुटून मूळ विषयाचा त्याचा आधार तुटतो. परंतु डॉ. भागवतांचा लेख नक्कीच वाचनीय वाटतो. सर्वांत प्रदीर्घ असूनही डॉ. इनामदार-सान्यांचा लेख नजरेत जास्त भरतो. डॉ. इनामदार साने (डॉ. इ. सा.) यांचा लेख मला आवडला, त्याला कारणे दोन : एक म्हणजे आजच्या काळातील (२१ वे शतक) एक प्राध्यापिका एखादा विषय वस्तुनिष्ठपणे कितपत हाताळते याची मला कल्पना आली. त्यांचा लेख आवडण्याचे दुसरे कारण बाळुताईविषयी अनेक व्यक्तिगत गोष्टी (मला माहीत नव्हत्या त्या) त्यांनी भरपूर प्रमाणात निवेदन केल्या नि त्यांच्या लेखाने माझे खूपच मनोरंजन झाले. परंतु बाळुताईच्या लिखाणातून तिचे व्यक्तिमत्त्व तिच्या बाही-बाहीवर सतत दिसते की काय हे डॉ. इ. सा. इतके पाहू लागल्या की तिच्या लिखाणापेक्षा तिच्या व्यक्तिगत आयुष्याला त्या अवाजवी महत्त्व देताहेत नि त्यांचा तोल जातो आहे असे मला वाटले.
आ.सु.ने एकविसाव्या शतकाच्या सुरुवातील बाळुताईंच्या लेखनाकडे लक्ष केन्द्रित केले तरी, माझ्या कल्पनेप्रमाणे या विषयाचे निमित्त करून आजचा सुधारक म्हटल्यावर सुधारणावादी गो. ग. आगरकर, बाळुताईच्या लेखन शिखराचा काळ व बाळुताईच्या जन्मशताब्दीचा काळ अशा दीर्घ कालगटाचे चित्र डोळ्यासमोर उभे करण्याची कल्पना असावी. ह्या शंभर वर्षांपेक्षाही दीर्घ काळात काही बदल झाले आहेत का ? साहित्यिकांचे स्थान, स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे समाजातले स्थान, त्याबद्दल होणारी चर्चा त्याचे विषय वगैरेंबद्दल काही म्हणण्यासारखे आहे का हे पाहण्यात मौज वाटेल. आगरकर स्त्रियांच्या प्रश्नावरही बोलत होते. त्यांची प्रेतयात्रा काढून त्यांच्या प्रेतावर अंड्यांची माळ, एका काखेत दारूची बाटली, दुसऱ्यामध्ये सुधारक वगैरेंनी शृंगारून प्रेत नाल्यात फेकून समाजसुधारणेचा संपर्क आम्हाला नको म्हणणाऱ्या समाजात बाळुताईसारखी एक सामान्य पण सुशिक्षित स्त्री प्रौढ स्त्रियांच्या मनःस्थितीबद्दल, त्यांच्यावर समाजात होणाऱ्या न्याय-अन्यायाबद्दल बोलू लागली व तिची प्रतिमा जाळण्याची भाषा झाली तेव्हा आगरकर स्वर्गातून म्हणाले असतील “आज तीस-चाळीस वर्षांतच एक बाईच शिकून दहा-बाराव्या वर्षी लग्न न करता समाजाच्या न्यायान्यायाबद्दल बोलते आहे. ही काय कमी प्रगती झाली ?”
आता आपण विसाव्या शतकाच्या पूर्वार्ध व एकविसाव्या शतकाचा पूर्वार्ध या कथापटाकडे बघू. बाळूताईचे लिखाण, त्याचे वास्तव, त्या वेळच्या समाजाची लेखिकेकडे पाहण्याची दृष्टी व त्यावेळचे टीकाकार आज एखाद्या एकविसाव्या शतकातील उच्चशिक्षित स्त्रीला कसे वाटतात हे वाचकाला जाणून घ्यायला आवडले असते. त्या वेळी बाळूताईची प्रतिमा जाळण्याची भाषा करणारे आजही बाळूताईत ‘ती’ स्त्री दिसते का पाहतील का? त्या वेळी फूत्कार करणारी सपीण म्हणून बाळूताईचे वर्णन केले गेल्यावर ते आज कसे दिसते ? बाळूताईच्या व्यक्तिमत्त्वात सर्पिणीची गुंफण पाहावी असे आजही वाटते का ? माझ्या कल्पनेप्रमाणे डॉ. इ.सा. ना तसे २००० सालानंतरही वाटत असावे. गेल्या पाऊणशे वर्षांत माझ्या मते अफाट प्रगती झाली आहे. एक उच्चशिक्षित प्राध्यापिका बाळूताईला सपीण म्हटल्यावर ‘ही शिवी’ देणाऱ्या माणसाकडे अवाक् होऊन पाहील. ज्याला शिवी दिली त्याकडे न पाहता जो शिवी देणारा आहे त्याच्या कपड्यांत गुरफटलेली ती शिवी बघण्याची खटपट करील. त्या टीकाकारात ‘सर्प’ दिसतो का पाहील.
माझ्या कल्पनेप्रमाणे स्त्रीच्या कर्तृत्वाच्या जगात आज बराच फरक पडलेला आहे. व्यापारउद्योगधंद्याचे विश्व, माहिती तंत्रज्ञान, यासारख्या आधुनिक क्षेत्रात कार्यरत राहून नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी स्वकर्तृत्वाने जबाबदारीचे पद पेलत व्यवसायानिमित्ते देशोदेशीचा प्रवास करण्याच्या माध्यमातून ती जागतिक स्पर्धेत उतरते आहे असे वाटते. पण हे सारे मूठभर स्त्रियांसाठी! बाकीचा सारा समाज वेगळा दिसतो का ? बाळूताईच्या लिखाणाच्या बहराच्या काळात १९२७ च्या सुमारास मिस मेयो या परदेशी स्त्रीने भारतातील स्त्रियांच्या परिस्थितीवर मदर इंडिया हे पुस्तक लिहून प्रकाश टाकला. त्यावर लाला लजपतरायांनी अनहॅपी इंडिया नावाचा उत्कृष्ट ग्रंथ लिहन व यंग इंडिया मध्ये म. गांधींनी चारएक लेख लिहन झाकाझाक केली तरी तिच्या लेखनात बरेच तथ्य होते, असे आजही वाटते. आज भारतीय स्त्रीबद्दल लिहिणारी एखादी भारतीय किंवा परदेशी मेयो आहे का? किंवा विभावरी शिरूरकरांसारखी एखादी (किंवा कदाचित आजच्या वातावरणात खंडीनीही (२०) मोजता येतील अशा) लेखिका आहे का ? शिरूरकरांची आजची आवृत्ती स्त्रीप्रश्नाबद्दल काय म्हणते ? की शिरूरकरांची विचारसरणी किंवा स्त्रियांचे प्रश्न हे आता इतिहासजमा होऊन नवे काही समाजात आले आहे? साहित्यात त्याचे प्रतिबिंब दिसते का? ह्याची उत्तरे साहित्यिकच देऊ शकतील व त्याबद्दल बाळताईच्या जन्मशताब्दीनिमित्त वाचण्याची माझी इच्छा व अपेक्षा होती.
मी आजच्या तथाकथित कर्तृत्ववान स्त्रीचे वर्णन केले ती स्त्री एकविसाव्या शतकातील. पाऊणशे वर्षांपूर्वी नवीनच उच्च शिक्षण घेऊन लग्न न करता किंवा लग्न करून बाह्य जगात वावरून न्याय-अन्याय पाहू लागली ती स्त्री विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील. (यात मी शिरूरकरांच्या काळच्या स्त्रिया टाकते) या पूर्वार्धातील स्त्रीची एकविसाव्या शतकातील आवृत्ती कशी वाटते हे मी पाहू इच्छिते. त्यांच्यात भयंकर फरक पडलेला आहे. साहित्यिक स्त्रिया किंवा पुरुष त्यावेळी उच्चतम वर्गातील समजत. आज त्यांचे ते स्थान ढळलेले आहे. हरतहेच्या क्षेत्रात स्त्रिया पुरुषी-व्यवसायात आघाडी घेत असल्याने आपल्याकडे लक्ष वेधून घेताहेत. उदाहरणार्थ जुनी तथाकथित उच्चतम स्त्री ही बराच रिकामा वेळ हाताशी असलेली दिसते तर तिची नवी आवृत्ती खरोखरीच अत्यंत अवघड कष्टाच्या परिस्थितीतून जाते आहे. तिला विचार करायला वेळ नाही की संसार करायला! मुलाबाळांचा विचार किंवा संसाराचा ताल-ठेका सांभाळायचा विचार ती करूच शकत नाही. मुलाबाळांसहित संसाराच्या रामरगाड्यात राहणे तिला कठीण आहे. त्यामुळेच समाजात अविवाहितांचे प्रमाण वाढते आहे. पंरतु स्त्री-पुरुषातील आकर्षण नष्ट होणे शक्य नसल्याने संसाराचे नवे रूप आकार घेत आहे. त्यात दोन त-हेचे प्रवाह रुजत आहेत.
एक प्रवाह एकाच घरामध्ये स्त्री-पुरुष स्पर्धेला जागा देतो आहे. स्पर्धेने संसारात बेरंग, बेताल, बेछूटपणा येऊन संसार बदसुरी होऊ शकतो. त्यात संसार कोसळण्याची शक्यता राहते. संसार सुरळीत चालायला कोणाला तरी नमते घ्यावे लागते. स्त्रीने, विशेषतः नेहमीच माघार घ्यावी लागली तर ‘ये रे माझ्या मागल्या परिस्थिती येत समाज जुन्याच धारेला राहतो. याउलट पुरुषाने समोपचाराने उमदेपणाने घेतले तर पुरुषप्रधान संस्कृतीचे नवे मृदू रूप घेऊन संसार मृदुमुलायम बनतो. हा झाला दुसरा प्रवाह ! यात पुरुष आणखीच शोभून दिसतो. हा दुसरा प्रवाह जागृत झाला, तो केवळ उच्चतम वर्गात न राहता झिरपून खालच्याही वर्गात त्याचे पडसाद उमटले, तर समाज प्रगतिपथावर असल्याचे सुख लागेल. स्त्रियांना एक त-हेची मुक्ती मिळाल्याचे समाधान लाभेल.
वरती आजच्या स्त्रीबद्दल लिहिले तेच साहित्यक्षेत्रातल्या पुरुषाचेही झाले आहे. त्याचे उच्चतम मानले गेलेले स्थान आज बाजूला सारले गेले आहे. उद्योगधंदे, व्यापार, माहिती तंत्रज्ञान यानी घेतलेली आघाडी भारतातील पुरुषांनाही जगाच्या नकाशावर स्थान देत असल्याने, भारतातील उच्चतम वर्गातील पुरुष या बारीकसारीक समाजबदलाच्या किंवा स्त्रीपुरुषांच्या प्रश्नांत रमणारा राहिला नाही. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ‘सकच्छ’ की ‘विकच्छ’ साडी नेसावी अशा प्रश्नातही समाज लक्ष घालीत असे तसे आज राहिलेले नाही. समाज आज बरेच काही पेलू शकणारा$ $tole-rant आहे. त्याचबरोबर साहित्यिक, लेखक या मनोरंजन करणाऱ्यांपेक्षा टाटा, मित्तल, नारायणमूर्ती, अंबानींच्या छोट्यामोठ्या आवृत्ती समाजाचे लक्ष वेधून घेताहेत, आणि समाजसुधारणा त्यांच्या किंवा स्त्रियांच्या आड येते की नाही हे बघण्यापेक्षा ‘इन्फ्रास्ट्रक्टर’ उद्योगधंद्याच्या आड येते का हे पाहण्यात हा वर्ग व्यग्र आहे. अर्थात हा सारा बदल झाला असला तरी तो मूठभर लोकांपुरता आहे. समाजाचा मोठा हिस्सा अजून जुन्या गर्तेतून बाहेर आला नसला तरी सुदैवाने तो trend setter नाही. (मात्र हा भारतीय संस्कृतीचा खालचा खडक आहे. त्यात काही झिरपत नाही. कायदेकानूंची अंमलबजावणी करणे शासनांना जमत नसल्याने तो जसा होता तसाच राहण्याची भीती आहे. त्या संस्कृतीचे वर्णन करायला डॉ. आंबेडकरांसारखा बुद्धिवान माणूस हवा. उिपींशिपी शीशालश्रू झालरींशी १९४८, पाने ३८-३२ ) आगरकरांना तो कितपत मान्य असता ? तो वेगळाच आहे व त्यामागचे कर्ते करविते वेगळे आहेत.
पूर्वी बोलताना मराठी भाषिक फक्त मराठी भाषकांकरिता बोलत. आज ते चालण्यासारखे राहिले नाही. आजच्या समाजाला अख्ख्या भारतीय समाजपुरुषाकडे पाहिल्याशिवाय कोठल्याही प्रश्नाचा विचार अपुरा राहिला असे वाटते. अशी दृष्टी येण्यासाठी लागणारी साधनसामुग्री २१ व्या शतकात बरीच उपलब्ध आहे.
* बाळूताई ही जरी जुन्या पठडीतील असली तरी तिच्याकडे या स्पर्धेचे उदाहरण म्हणून मी बोट दाखविले असते. वयाच्या १७ व्या वर्षी ग्रॅज्युएट होणाऱ्या, वीसबाविसाव्या वर्षी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत धिटाईने त्या काळात व्याख्यान देणाऱ्या बाळूताईला आजकालच्या ‘नटनट्यांइतकी’ लोकप्रियता होती. तिच्या विवाहानंतर ही लोकप्रियता तिच्या पतिराजांना सोसली नाही. ते बुद्धिवान, अफाट वाचक असले तरी उमदे-उदार नसल्याने ‘बाळूताईचा नवरा म्हणून ओळखले जाणे त्यांना पचले नाही. त्यांचे असे मूल्यमापन मी वस्तुनिष्ठपणे करू इच्छिते.
कुमुदिनी दांडेकर, ऋणानुबंध, ऑफ भांडारकर रोड, एरंडवन, पुणे ४११ ००४.

नी. र. व-हाडपांडे यांच्या पत्राला उत्तर देताना शेवटच्या परिच्छेदात (आसु ऑक्टो.२००५, पृ.३४७) आपण एक अक्षम्य अपराध केला आहे. एखाद्या लेखाची ‘लायकी’ (योग्य शब्द ‘दर्जा’, ‘पात्रता’ असा एखादा वापरता आला असता.) पाहून त्याचा स्वीकार करणे वा न करणे हा संपादकाचा अधिकारच असतो आणि तो सर्वमान्य असतो. तो जाहीर करण्याची गरज नसते. हे एक..
दुसरे, एका विशिष्ट लेखनावर टीका करताना तुझा लेख ‘लायकी’चा नाही असे त्या लेखकाला सांगणे हा त्याचा घोर अपमान आहे. संपादक आणि आसु या दोघांनाही हे शोभा देणारे नाही.
आता ‘लायकी’विषयी. व-हाडपांडे यांनी योग्य प्रश्न विचारला आहे : “काय हिरावले गेल्यामुळे कामगाराचे शोषण होते?” मुळात प्रश्न शोषण या संकल्पनेच्या व्याख्येचा आहे. उलट खांदेवाले यांच्या लिखाणात शोषण, दारिद्र्य आणि विषमता या तीन भिन्न संकल्पनांची मला गल्लत दिसते. शोषण या संकल्पनेवर चिकित्सक लेख लिहिण्याचा मी विचार करीत होतो. आता लिहू की नको, असा प्रश्न मनात निर्माण झाला आहे. लेखकांविषयी हीच दृष्टी संपादकांची असेल तर परिस्थिती भयानकच आहे असे म्हणावे लागेल.
स. ह. देशपांडे, सी-२८, गंगाविष्णू संकुल, कर्वेनगर, पुणे ४११०५२.

खांदेवाले म्हणतात की, “पाटणकरांच्या विचारांची काही दिशा असेलच तर ती भांडवलशाहीची आहे असा तर्क करता येतो.” होय, त्यांच्या परिभाषेत समाजवाद म्हणजे (उत्पादन-)साधने व प्रक्रिया ह्यांवर समाजाची मालकी व नियंत्रण असणे. मी सामाजिक नियंत्रणाची गरज मान्य केलेलीच आहे, पण सामाजिक मालकी ला पाठिंबा देत नाही. तेव्हा मी भांडवलशाही आहे.
खांदेवाले सरकारची मालकी अशी परिभाषा न वापरता समाजाची मालकी अशी परिभाषा वापरता. रशियाने सरकारी मालकीचा प्रयोग केला, तो फसला. समाजाची मालकी ही काय पर्यायी कल्पना आहे ते माझ्या वाचनात आलेले नाही. या कल्पनेचे स्वरूप काय आहे, या व्रताचे फळ कोणाला काय मिळाले आहे हे कळले तर आमचे ज्ञान वाढेल. चर्चार्थी (वादार्थी नव्हे) वाचकांना काही मुद्दे मिळतील.
“भांडवली व्यवस्थेतील प्रामुख्याने शोषक-शोषित हे वर्गीय संबंध अधोरेखित केल्याशिवाय हा समाज समजावून घेणे शक्य नाही’ असे ते म्हणतात. मी अगदी उलट म्हणतो. ते असे की या संबंधांच्या मर्यादेत अडकून पडाल तर समाजाचे व त्याच्या व्यवहाराचे आकलन नीट होणार नाही. त्यांनी धीरूभाई अंबानी या भांडवलशहाला शोषकांच्या यादीत समाविष्ट केलेले नाही. शिवाय, भारतीय अर्थव्यवस्थेचा किती भाग भांडवलशाही चौकटीत बसतो? जिथे वर्ग-संघर्षाचा उपयोग करता येईल असा भाग फक्त दहा टक्के लोकसंख्येचा आहे. पाश्चात्त्य देशांतसुद्धा आज झीश्रशीरीळरी हा गट फार छोटा झाला आहे. तेव्हा वर्गसंघर्ष ही कल्पनाच मुळी जुनाट झाली आहे. मी हे मुद्दे पूर्वीच मांडले आहेत. पुनरुक्ती करावी लागते कारण या वास्तवतेची दखलच खांदेवाले घेत नाहीत. पश्चिम बंगालच्या कम्युनिस्ट मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की आजचे वास्तव लक्षात घेता आपल्याला आपल्या जुन्या तात्त्विक चौकटीच्या बाहेर पडायला पाहिजे. त्यांच्या म्हणण्याची तरी दखल खांदेवाले घेतील का?
इतिहासात उद्योजकांनी संघटित होऊन व सत्ताधाऱ्यांशी हातमिळवणी करून कामगारांचे व शेतकऱ्यांचे दमन केल्याचे दाखले आहेत. अगदी चौदाव्या शतकापासून. त्याविरुद्ध बंडे झाली, (उदा. English Peasant Revolt 1381 d Florence Woolworkers’ Revolt, 1378.) पण हे आणि अठराव्या शतकापर्यंतचे दाखले लोकशाहीच्या उदयापूर्वीचे आहेत. त्यावेळच्या बऱ्याचशा विचारवंतांना घरीश्र Popper याने ‘Enemies of the Open Society असे बिरुद लावले आहे. मार्क्सलाही त्याने तेच बिरुद लावले आहे. लोकशाहीचा उदय झाल्यावर झीश्रशीरीळरी या लहानशा गटाच्या हितापेक्षा त्यांच्यासकट सर्वच सत्ताहीन, धनहीन गटांचा उत्कर्ष हे समाजकारणाचे ध्येय बनले आहे. संपन्न पाश्चात्त्य राष्ट्रांत वर एक झीं – खपीळरश्र डेलळशी तयार होत आहे तिथे वर्गसंघर्षाचे महत्त्व आणखीच कमी झाले आहे.
आजचे बहुमान्य तत्त्वज्ञान असे आहे की संपत्तीच्या उत्पादनाचे काम खाजगी उद्योगाद्वारे व व्यापाराच्या वाढीनेच चांगले होते. उद्योजक हे कर्तबगार लोक असतात, त्यांच्या मार्गात खोडे घालून समाजाची संपत्ती वाढणार नाही. त्यांना जी मोकळीक मिळेल त्यातून ते स्वतःचा फायदा करून घेणारच. त्यातून विषमतासुद्धा वाढणारच. ही विषमता कमी करण्याचे तीन मार्ग उपलब्ध आहेत.
१) उद्योजकांवर काही किमान बंधने टाकणे. उदा. किमान वेतन, कामगार कल्याण, स्त्रीकामगारांचे विशेष हक्क याविषयी कायदे करून ते अंमलात आणणे.
२) समाजाच्या समाईक उपयोगाच्या साधनांवर सरकारने जास्त खर्च करणे (उदाहरणार्थ : दळणवळण, शिक्षण, स्वास्थ्यसेवा वगैरे.)
३) मागासवर्गांसाठी निरनिराळ्या प्रकारची अनुदाने देणे.
यातील उपाय क्र.२ व ३ हे सरकारच्या आर्थिक व प्राशासनिक साधनांवर अवलंबून राहतील असे १९४८ च्या मानवाधिकार घोषणेच्या कलम २२ मध्ये स्पष्टपणे म्हटले आहे. आज गरिबीवर उपाय म्हणजे संपत्तीचे उत्पादन वाढवणे, प्राथमिक गरजांच्या वस्तूंचे उत्पादन जास्त वाढवणे, कारण त्या वस्तूंच्या उपलब्धतेनेच सामान्यांचा जीवनस्तर सुधारणार आहे. या ज्यादा उत्पादनांमुळे सरकारची आर्थिक क्षमता वाढेल. राहील प्रश्न तो प्राशासनिक क्षमता वाढवण्याचा. हा प्रश्न एकंदर जनतेच्याच जाणतेपणावर व बांधिलकीवर अवलंबून आहे. जनतेला प्रशासनकार्यात सामील करून घेतल्यानेच ही क्षमता वाढेल. या सर्व मुद्द्यांवर आज सर्वत्र चर्चा सुरू आहे. धोरणाचा मुख्य गाभा बहुतेक सर्वांनाच मान्य आहे. तपशिलाबाबत चर्चा होत राहते. काही ठोस पर्याय सुचवायचा असेल तर तो सुचवला जावा. माझ्या विचारांना काही दिशा नाही, ते अगम्य आहेत असे ‘उत्तर’ दिले की वाद संपत नाही.
माझ्या लिखाणात खांदेवाल्यांना विसंगती दिसत असेल, दिशाहीनता दिसत असेल, काही विधाने अगम्य वाटत असतील व त्यामुळे माझ्या अकलेविषयी व प्रामाणिकपणाविषयी शंका येत असेल तर येवो बापडी. भवभूती या कवीने अशा टीकाकारांना उत्तर दिले आहे. ….जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः उत्पत्स्यते हि कोऽपि
समानधर्मा कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ।।
मी कोणाच्या पसंतीसाठी लिहीत नाही. मला जे जाणवते व भावते ते लिहितो. मी अपेक्षा करतो ती वरील ठोस मुद्द्यांवरील चर्चेची. अधिकारवाणीची नव्हे.
[अमदाबादेतील गिरणी कामगारांपासून सुरू झालेली ही चर्चा आता उपरोध, हेत्वारोप, पुनरावृत्ती, अशा दलदलीत रुतत चालली आहे. गिरण्या बंद पडण्याबाबतच्या अंकाचे अतिथी संपादक श्रीनिवास खांदेवाले होते. कार्यकारी संपादकाचा अधिकार वापरून ही चर्चा मी (नंदा खरे) थांबवत आहे. पण काही मुद्दे सर्व चर्चा करणाऱ्यांपुढे मांडावेसे वाटले, ते असे
१) सरकारी आणि सामाजिक यातील फरक, नियंत्रण आणि मालकी यांतील सीमारेषा, यांबद्दल वेगळी परिभाषा वापरून केलेली चर्चा नोव्हेंबर ०५ च्या अंकाचा पूरक भाग असलेल्या मुंबईतील घरबांधणीबाबतच्या पुस्तिकेत सापडेल आणि ती तात्त्विक नसून व्यावहारिक आहे.
२) ढहश जशिप डेलळशीं रपव खी एपशाळशी चा परिचय करून देणारा लेख (किंवा लेखमाला) प्रकाशित करण्यास आजचा सुधारक तयार आहे.
३) वर्गसंघर्षाच्या संकल्पनेचा समाजव्यवहाराच्या आकलनासाठी वापर कालबाह्य झाला आहे, हे पटण्यासारखे नाही.
(क) वर्गसंघर्षात दहाच टक्के लोक गुंतले आहेत हे विधान करतानाच त्याहूनही कमी प्रमाण असलेल्या झीं-खपीळरश्र समाजांची साक्ष कशी काढता येईल?
(ख) उद्योजक आणि सत्ताधाऱ्यांच्या हातमिळवणीचे ‘मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स’ हे नामकरण आयसेनहॉवरने निवृत्त होताना केले. त्यावेळी अमेरिकेत लोकशाहीच होती. वर्गसंघर्ष लोकशाहीच्या उदयापूर्वीच महत्त्वाचा होता, हे पुराव्यावर टिकणारे नाही.
(ग) पाटणकर ‘आजचे बहुमान्य तत्त्वज्ञान’ विषमता कमी कशी करेल याचे तीन मार्ग सांगतात. त्यांपैकी उद्योजकांवर बंधने घालून त्यांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग ते सरकारच्या आर्थिक-प्राशासनिक क्षमतेपलिकडे नेऊन ठेवतात. तोंडदेखली बंधने आणि त्यांची अंमलबजावणी न होणे, यातून वर्गभावना दिसते असे मानता येईल.
वेगळ्या दिशेने, वेगळ्या पातळीवर ही चर्चा पुढे नेता येईल पत्रसंवादातून मात्र तसे करता येणार नाही.]
भ.पां.पाटणकर, ३-४-२०८ काचीगुडा, हैदराबाद ५०० ०२७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.