आमचे नाना

३१ डिसेंबर २००५ च्या पहाटे १.३० वाजता नानांनी या जगाचा निरोप घेतला. वय ८९ वर्षे! म्हटले तर पिकले पान! खरे आहे. पण ते ज्या दिवशी गळून पडले तो दिवस तर इतर दिवसांसारखाच होता. सकाळचा चहा, जेवण, दुपारचा चहा, संध्याकाळचे थोडेसे खाणे इथवर तो रोजच्यासारखा होता आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक? मी सभेवरून आले आणि त्यांच्या खोलीतून कशाचा आवाज येतोय हे पाहिले तर नाना तक्यावरून कलंडले होते, बेशुद्ध होते. पुढची सर्व धावपळ केली. पण ह्यावेळी मात्र यश आले नाही. मागे काही वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला होता त्यावेळी खरे तर डॉक्टरांनीच ते चार-पाच दिवसांपेक्षा जास्त काळाचे सोबती नाही हे सांगितले होते. त्यावेळी ही घटना घडली असती तर मनाची थोडी तरी पूर्वतयारी होती. पण सुदैवाने नाना त्यातून बाहेर पडले. नंतरचे बोनस म्हणून मिळालेले आयुष्य त्यांनी इतके सार्थकी लावले की कोणीही व्यक्ती त्यापुढे नतमस्तक होईल. नानांनी किमान पाच/सहा, तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र ह्या विषयांवर पुस्तके लिहिली. पुस्तक तयार झाले की मला व बाळला एकेक प्रत भेट देत असत. आम्ही त्यांचे अभिनंदन करीत असू. बाळ गेल्यावर न चुकता ‘चि. सुनीतीस, सर्व शुभेच्छांसह, तुझा नाना’ लिहून पुस्तक भेट देत. शेकहॅण्ड केला की गोड, निर्व्याज हसत. नानांनी व्रत म्हणून मराठीतून तत्त्वज्ञानात्मक लिखाण केले. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजी ह्या भाषांच्या जोडीला जर्मनही अवगत होते. कांट, व्हिटगेन्ष्टाइन, फ्रेगं ह्यांचे लिखाण त्यांनी मूळ जर्मन भाषेतून अभ्यासले. त्यांची मराठी वाक्यरचना मात्र संस्कृतप्रचुर होती. कठीण वाटायची. काही वेळा शब्दांचा संधी न करता तोडून लिहिल्यास सोपे झाले असते असे वाटायचे. परंतु त्यांना ते मान्य नसायचे. त्यांचे म्हणणे असे की कधीतरी विद्यार्थ्यांना कठीण भाषेची सवय झालीच पाहिजे. ती हळूहळू होईल. प्रथम अवघड वाटेल पण नंतर पुन्हापुन्हा वाचन केल्यास त्याची सवय होईल. मी मनात म्हणत असे, “नाना, असे विद्यार्थी आज नाहीत. गाईडवरून अभ्यास करून पास होणारी आजची पिढी आहे.’

तत्त्वज्ञान हा नानांचा श्वास होता. सतत तत्त्वज्ञानात्मक लिखाणाचे वाचन/लेखन सुरू असायचे. तत्त्वज्ञानाची एकही शाखा अशी नाही की जिचे अध्ययन त्यांनी केले नव्हते. नीतिशास्त्र खास आवडीची शाखा! पण त्याच्या जोडीला सौंदर्यशास्त्र, विश्लेषक तत्त्वज्ञान ह्याही शाखा त्यांच्या आवडीच्या होत्या. तर्कशास्त्रही आवडीचा विषय! नागपूर विद्यापीठात त्यांच्याच पुढाकाराने तर्कशास्त्र अभ्यासक्रमात प्रविष्ट करण्यात आले होते.

नाना तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एक अजोड व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही क्षेत्रांतल्या मोठ्या व्यक्तींच्या सहवासात असणाऱ्या कुटुंबीयांच्या वाट्याला येणाऱ्या अनुभवांची जातकुळी वेगळी असते. त्याची इतरांना कल्पनाही येणार नाही. पण हेही खरे की ह्या महनीय व्यक्तींच्या निकटचे असल्याने जीवनाला जी समृद्धी येते तीही वेगळीच असते. नानांमुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील कितीतरी दिग्गज मंडळी आम्ही जवळून अनुभवली. प्रा.मे.पुं. रेगे, रा.भा. पाटणकर, डॉ. अंतरकर, के.ज. शहा, धर्मेंद्रकुमार, पी.के. सेन, प्रा. श्रीनिवास दीक्षित ही पटकरून आठवलेली काही नावे! नानांनी आजचा सुधारक सुरू केल्यावर तर साहित्याच्या वा इतर क्षेत्रातही स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या कितीतरी मंडळी नानांच्या भेटीला येत. डॉ. श्रीराम लागू, के.ज. पुरोहित, प्रतिभा रानडे, सरोजिनी वैद्य, अशोक केळकर, ग.प्र. प्रधान, प्रा. महेश एलकुंचवार, नानासाहेब शेवाळकर, ही काही उदाहरणादाखल नावे!

नाना मितभाषी होते. उगाच कोणी गप्पा मारायला आलेले किंवा फोनवर दीर्घवेळ बोलणे त्यांना आवडत नसे. तत्त्वज्ञानाविषयी मात्र बोलण्याचा त्यांना कंटाळा नव्हता. माझ्या प्रबंधाच्या वेळी मी रोज त्यांच्या घरी ठरविलेल्या वेळेत वाचन करायला जात असे. कठोर मेहनत घ्यायला लावीत असत. एखाद्या पुस्तकाचे एखादेच प्रकरण कामाचे असायचे पण त्यासाठी पूर्ण पुस्तक वाचायला लावीत असत. जे समजले नाही ते स्वच्छ शब्दांत समजावून सांगत. मला नानांजवळ शिकता आले ह्याचे खूप समाधान आहे.

जी काही चार-पाच पावले तत्त्वज्ञानाच्या वाटेने टाकली त्यातल्या ठळक टप्यांचे नाना साक्षीदार होते ह्याचा आनंद वाटतो. जी विद्यापीठातील प्राध्यापकाची जागा त्यांच्यासारख्या योग्य व्यक्तीलाच मिळायला हवी होती ती केव्हातरी मला मिळालेली त्यांनी पाहिले,
रेगे सरांवर संपादित केलेली पुस्तके त्यांनी पाहिली, त्यासाठी प्रस्तावना, लेखही लिहून दिले आणि फ्रेगं ह्या तत्त्वज्ञावरील पुस्तक तर आमची संयुक्त निर्मिती आहे. त्यात फ्रेगंच्या तत्त्वज्ञानाची ओळख पहिल्या भागात आहे तर दुसऱ्या भागात फ्रेगंच्या तीन महत्त्वाच्या निबंधांचा नानांनी केलेला अनुवाद आहे. मी त्यांना पाटीवर लिहून दाखवले, ‘तुम्ही केलेल्या अनुवादामुळे ह्या पुस्तकाला ‘वजन’ आले.’ त्यांनी वाचले आणि नेहमीप्रमाणे हसले.

‘कालनिर्णय’ वरील रेगे सरांचे ईश्वरविषयक लेख वाचून मी खूप बेचैन झाले होते. तीन/चार महिने मी तेच ते छोटेखानी लेख पुन्हा पुन्हा वाचीत होते. काय लिहावे? कसे लिहावे? सुचतच नव्हते. अन् अचानक ठरविले की लेखाचे स्वरूप हे प्रश्न उपस्थित करण्याच्या स्वरूपाचे ठेवावे आणि मग ‘प्रा. रेगे आणि ईश्वर’ हा लेख सिद्ध झाला. नानांना माझी ही चलबिचल, ताण समजत होते. लेख त्यांना वाचायला दिल्यावर आजही मला आठवत आहे, नाना उस्फूर्तपणे म्हणाले, ‘छान लिहिलास, मी विचार करीत होतो, तू रेगे सरांच्या लेखांवर काय लिहिशील?’

आणखी एक आनंदाची घटना मला आठवतेय. आजच्या सुधारक चे अभ्यासमंडळ होते. दर महिन्याला प्रत्येकाने एकेका पुस्तकाचा परिचय करून द्यायचा. नानांच्या तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या ह्या पुस्तकाचा परिचय/परीक्षण मी खुद्द त्यांच्याच उपस्थितीत केले. मनावर प्रचंड दडपण होते. पण मी स्वतःला लोटूनच दिले होते. घरी येताना कौतुकाने म्हणाले, ‘तुझ्या Concepts स्पष्ट आहेत.’ नानांसारख्या तत्त्वज्ञाकडून वेळोवेळी मिळालेली ही शाबासकी माझ्या जीवनाचा अमोल ठेवा आहे.

नानांची आणि रेगे सरांची मैत्री ही दोन मतभिन्नता असणाऱ्या व्यक्ती एकमेकांशी किती आदराने वागू शकतात ह्याचा आदर्श नमुना होती. रेगे सर श्रद्धाळू वृत्तीचे होते तर नाना पक्के विवेकवादी. परंतु नानांना रेगे सरांबद्दल अतिशय आदर, प्रेम आणि जिव्हाळा नांच्या घरी ते आनंदाने राहात असत. नानांना पक्षाघाताचा अटॅक आला त्यावेळी रेगे सर मुंबईहून सकाळच्या विमानाने आले, जवळ जवळ सबंध दिवस दवाखान्यात घालविला, नाना तर बेशुद्धावस्थेत होते, त्यांना सर आल्याचे कळलेच नव्हते. सर शांतपणे नानांच्या पलंगासमोरील बाकावर बसून राहिले, मनातल्या मनात किती आठवणी दाटल्या असतील हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होते. जातांना आमच्या पाठीवर हात ठेवला व रात्रीच्या विमानाने मुंबईला रवाना झाले.

नाना आणि बाळ ह्यांच्यात सेवाभाव ओतप्रोत भरलेला होता. नानांनी आई/वडील, वहिनी (त्यांच्या पत्नी) ह्यांची केलेली सेवा मी स्वतः पाहिलेली आहे. आई पक्षाघाताने अंथरुणाला खिळली तेव्हा नाईलाजाने बाळला शांतिनिकेतहून बोलावून घेतले. नानांचाच सेवेचा कित्ता बाळने गिरविला. माझ्यात जर काही कणभर सेवाभाव आला असेल तर ह्याचे पूर्ण श्रेय नाना आणि बाळ ह्यांना आहे.

नाना आणि बाळ हे दोघे नात्याने भाऊ होते पण वयातील अंतर हे वडील आणि मुलात असावे एवढे होते. दोन्ही भावांचे एकमेकांवरील प्रेम हे अतुलनीय होते. नाना बाळचा श्वास होते. त्याचे एकही वाक्य ‘नाना म्हणाला’ खेरीज सुरू होत नसे. तो नानांना ‘ए नाना’ हाक मारायचा. काहींनी त्याला ‘अहो’ म्हणून हाक मारावे असे सुचविलेही. पण बाळचा एकच युक्तिवाद! ‘तो माझा भाऊ आहे, मी त्याला ‘ए नाना’च हाक मारीन.’ नानांनी तर बाळचे पुत्रवत् केले. वयाच्या सोळाव्या वर्षी तो त्यांच्याजवळ राहायला, शिकायला आला ते साठाव्या वर्षी जगाचा निरोप घेईस्तोवर त्यांच्याजवळ होता. मला तर खूपदा माझ्यापेक्षा नानांचीच काळजी वाटायची. नाना मूकपणे दुःख गिळत होते.

नाना प्रसिद्धीपासून दूर होते. ज्या कामावर निष्ठा आहे ते करीत राहणे हा त्यांचा स्वभाव होता. समाजानेही त्यांची फारशी दखल घेतली नाही. अपवाद फक्त त्यांना मिळालेला ‘आगरकर पुरस्कार’ आणि आजचा सुधारक ला महाराष्ट्र फाऊंडेशनचा मिळालेला पुरस्कार! तत्त्वज्ञानात्मक कामगिरीच्या संदर्भात मात्र ते उपेक्षितच राहिले. ह्याची त्यांना जराही खंत नव्हती. त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या आम्हालाच हे वाटायचे, जाणवायचे. माझ्या मनात नेहमी प्रश्न येतो ‘खरंच समाजाला विचारवंतांची गरज आहे का?’

नानांना पक्षाघाताचा अटॅक आला त्यावेळी आम्ही त्यांना हॉस्पिटलमधून सरळ आमच्या घरी घेऊन आलोत. त्याचवर्षी आमचा मुलगा नोकरीनिमित्ताने मुंबईला गेला होता. त्याची खोली नानांची झाली. मी, बाळ आणि नाना ह्यांचे त्रिकूट होते. एकमेकांशी असणाऱ्या नात्यापेक्षा आमच्यात असणारे मैत्रीचे नाते अधिक घट्ट होते. आम्ही तिघे आणि आमची ‘चिकू’ (कुत्रा) असे चौघेजण गाडीने निरुद्देश भटकायला जात असू. सोबत ब्रेड/बटर, पाणी असायचे, जेथे थांबावेसे वाटले तेथे थांबायचे, गाडीतून खाली उतरायचे, थोडा वेळ घालवून ब्रेड/बटर खायचे व घरी यायचे! हा नेम बाळच्या दुखण्याचे निदान होईपर्यंत कितीतरी दिवस अखंडपणे सुरू होता. आज बाळ नाही, “चिकू’ नाही अन् आता ह्या दोघांच्या पाठोपाठ नानाही अनंताच्या प्रवासाला निघून गेले. मी रांगेत उभी आहे….

कर्मयोग, धंतोली, नागपूर ४४० ०१२.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.