स्त्री-आरोग्य

“In nature there are neither rewards nor punishments, there are consequences.” Robert Ingersoll (निसर्गात कुणाला बक्षिसही नाही किंवा शिक्षाही नाही. निसर्गात फक्त परिणाम असतात. रॉबर्ट इंगरसॉल)

बाह्य रुग्ण विभागात (ओ.पी.डी.त) एक बाई रुग्ण खूप आरडाओरडा करीत होती म्हणून मी पहायला गेले. चौथ्यांदा गर्भ राहिला होता, ५-६ महिने झाले होते. पहिल्या तीनही मुली होत्या. तिला तपासून शांत करण्याचा प्रयत्न केला. नंतर समजले की आता जर मुलगा नाही झाला तर तिची धडगत नव्हती. सासू-नवऱ्याने दम भरला होता. त्यामुळे मनातून प्रचंड भ्यालेल्या या बाई विचित्र वागत होत्या. २-३ दिवस मी तिची समजूत काढली. तिच्या नवऱ्याला व सासूला मुलगा व मुलगी जन्माला येताना गर्भाचे लिंग कसे ठरते याची सविस्तर चित्रे काढून, फोटो दाखवून माहिती दिली. आपल्या हातात जे नसते, त्यावर दुःख करू नका हेही सांगितले. त्याऐवजी या बाळंतपणानंतर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया करून घ्या म्हणजे या बाईची प्रकृती नीट राहील हेही सांगितले.

५-६ दिवसांनी दवाखान्यातून सुटी करायची वेळ आली. पुन्हा एकदा सर्व समजावून गोळ्या औषधे देऊन टॉनिकही दिले. पुन्हा १५ दिवसांनी यायला सांगून मी हुश्श करते, तोच ती बाई परत रडत रडत माझ्याजवळ आली. काय झाले? “डॉक्टरीणबाई तुम्ही पण माझ्या सासू नवऱ्याबरोबर सामील आहात का?”
“काय झाले ?” मी. “तुम्ही मला दिलेल्या टॉनिकने मला पुन्हा मुलगीच होणार ना!’ Rubraplex!!

मी कपाळावर हात मारला. माझ्या लक्षात आले Rubraple मधला x पाहून ती चवताळली होती. शेवटी ते टॉनिक ठेवून बाटलीवर कुठेही न लिहिलेले टॉनिक शोधून मी तिला पाठवले. भयगंडाचा हा किती खोल परिणाम!

स्त्री आणि पुरुष या माणसांच्या ठळक दोन आवश्यक जाती आहेत. त्यांच्या संख्येचा समतोल नैसर्गिकरीत्या राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये मनुष्यप्राणी ढवळाढवळ करत असतो. पुरुषप्रधान समाजात, वंशाचा दिवा-कुलदीपक ‘मुलगा’ म्हणून तो प्रत्येकालाच हवा असतो. आणि त्यामुळे आजही मुलगी झाली की नाराजीने नाक मुरडले जाते. वैद्यकशास्त्राच्या प्रगतीमुळे आता जन्माआधी गर्भाचे लिंग कळू शकते. गर्भपात (Female Foeticide) सर्रास केले जातात. त्यामुळे गर्भाचे लिंग मुलीचे असल्यास गर्भपात केल्यामुळे सध्याचे जन्माचे प्रमाण सारखे न राहता ते १००० पुरुषामागेः ९२० स्त्रिया च्या सरासरीइतके झाले आहे. प्रत्येक प्रांतातले आकडे वेगवेगळे आहेत. जिथे स्त्रीबाळाच्या जन्माआधीच तिला मारले जाऊ शकते तिथे जन्मल्यानंतर त्रास सोसणे येणारच. त्यात विशेष नवल नाही. ही मुलगीच पुढे स्त्री होते आणि विविध पातळ्यांवर तिच्या आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात.

ती स्वतःकडे दुर्लक्ष करते स्वतःकडे कमीपणा घेत राहते. पती पत्नीकडे दुर्लक्ष करतो. सासू सुनेकडे दुर्लक्ष करते कधी छळतेही. आणि या सर्वांमुळे तिची रोगप्रतिकारक्षमता पुरुषांपेक्षा चांगली असूनही तिचे आरोग्य खालावते. तिला आहारातील असमतोल, उपासतापास करण्याची प्रवृत्ती, शिळे खाण्याची बुद्धी, उरले-सुरले संपवण्याची जबाबदारी या सर्वांमुळे रक्तक्षय(अनिमिआ) होण्याचे प्रमाण वाढीस लागते. सोबत दर महिन्याच्या पाळीबरोबर कमी होणारे रक्त भरून येण्याऐवजी ते अधिकाधिक कमी होऊ लागते. मध्ये होणारी बाळंतपणे ते आणखी कमी करतात. सर्रास सहजपणे गर्भपात करून घेणे हे कुटुंबनियोजनाच्या ऑपरेशनपेक्षा अनेकदा नियोजनाचे साधन म्हणून वापरले जाते. यामुळे रक्तक्षयाबरोबर गर्भाशयाला आतून इन्फेक्शन होणे, पांढरा स्त्राव जाणे हे प्रश्न वाढत जातात व संकोचापायी वेळेवर उपाय होण्याऐवजी स्त्री अधिकच दुबळी होऊ लागते. विकोपाला दुखणे गेल्यावर मग उपाय होणेही कठीण असते.

मनुष्याला होणारी दुखणी, रोग आजार, हे तर स्त्रियांना होतातच. त्याचबरोबर स्त्री असल्यामुळे होणारे गर्भाशयाचे रोग, बाळंतपणामुळे होणारे अनेक शारीरिक व मानसिक त्रास, भावनिक कष्ट, गर्भपातामध्ये व बाळंतपणात अतिरक्तस्राव होऊन क्वचित होणारे मृत्यू हेही तिला भोगावे लागतात. मुले झाली तर हे त्रास, मुले न होणारीला वांझ म्हणून भोगावे लागणारे विविध मानसिक, शारीरिक व सामाजिक त्रास सहन करावे लागतात.

कुटुंबनियोजनाचे विविध प्रकारही सहसा तिलाच सहन करावे लागतात. चॉईस, माला-डी किंवा तत्सम गोळ्या घेण्यामुळे कुटुंबनियोजन होते. परन्तु या गोळ्यांनी कित्येकांना अपायही होऊ शकतात याबद्दलची परिपूर्ण माहिती नसताना अनेक वर्षे गोळ्या घेण्यात येतात. तांबी, कॉपर टी’ बसवून घेणे तिलाच सहन करावे लागते. झो-शीर सारखे इंजेक्शनचे प्रयोगही तिच्यावरच केले जातात. कुटुंबनियोजनाचे ऑपरेशनही बहुधा स्त्रीच करून घेते. त्यामुळे त्यातून होणारी Complications ही तिलाच सहन करावी लागतात.

स्तनांचे विविध रोग व स्तनांचा कॅन्सरही स्त्री असल्यामुळे तिचाच. ७० टक्के स्त्रिया इतक्या उशीरा दवाखान्यात येतात की उपाय करण्याची संधी गेलेली असते, त्यामुळे उपाय करूनही बरे होण्याची शक्यताच नसते. त्यामुळे त्या मृत्युमुखी पडतात. पहिल्या स्टेजमध्ये किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये दाखवायला येणाऱ्या स्त्रिया कमीच असतात. शिक्षण असूनही त्याचा फायदा करून घेणाऱ्या, सजग असणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण कमीच असते.

स्वतःच स्वतःच्या स्तनांची जर नियमित तपासणी केली (डॉक्टरांकडून शिकून) तर ९०% स्तनांचे कॅन्सर पहिल्या अवस्थेतच स्त्रीच्या ध्यानात येऊ शकतात व वेळेवर उपचार केल्यास ती पूर्णपणे बरी होऊ शकते. ९ ऑक्टोबर हा ‘जागतिक स्तनकर्करोग जागृती दिवस’ म्हणून (International Breast Cancer Awareness Day) पाळला जातो. त्यानिमित्ताने गेल्या ४ ५ वर्षांमध्ये बऱ्याच स्त्रियांना जरूर ते शिक्षण देता येऊ शकले. दवाखान्यात येणाऱ्या बहुतांशी स्त्रिया काहीना काही कारणाने उशीरा दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या अवस्थेत पोचतात. घरची अडचण, मुलांची परीक्षा, नवी नोकरी, मुलीचे लग्न, पैशाची सोय किंवा पतीचा कमी धोकादायी असलेला आजार उदा. हर्निया किंवा हायड्रोसील या मागे ४-५ महिने गाठ तशीच ठेवून वाढत जाते. मग भीत-भीत दवाखान्यात येऊन मनात असलेल्या रोगाचे तिसऱ्या-चौथ्या अवस्थेतल्या कर्करोगाचे निदान पक्के झाल्यावर रडणारी अशी स्त्री पाहिल्यावर दया येत नाही तर तिची कीव करावीशी वाटते. उपाय केले तरी वर्षभरात खेळ संपतो. भारतातली अमेरिकन स्त्री हाताला गाठ लागल्यावर दुसऱ्या दिवशी येऊन ती काढून घेते आणि निदान पक्के झाल्यावर धीटपणाने त्याला सामोरी जाते, पूर्णपणे बरीही होते. मी तिला शतधा नमस्कार करते. ज्याला आपण शास्त्रीय दृष्टिकोण म्हणतो तो आपल्या माणसांमध्ये क्वचितच दिसतो.

सर्व्हिक्सचा कर्करोग (गर्भाशयाच्या तोंडाचा) आपल्या देशातील स्त्रियांमध्ये सर्वांत जास्त प्रमाणात आढळतो. त्याबद्दल स्वतःच्या तपासण्या झअझ डाशरी नेमाने करून घेणाऱ्या स्त्रिया विरळाच. स्वतःच्या वेशभूषेकडे आणि सौंदर्याकडे विशेष लक्ष देणाऱ्या मुली आणि स्त्रिया मेकअप करून जरी चांगल्या दिसत असल्या तरी कितीतरी आरोग्यदष्ट्या निरोगी, निकोप नसतात. लांब नखे अस्वच्छतेला उपीराळपरींळेप ला निमंत्रण देतात. जंतांच्या वाढीला निमंत्रण देतात. भिवया उपटणे, निरनिराळे लेप ठिकठिकाणी लावणे, केसांना रंगरंगोटी करणे याने होणाऱ्या ॲलर्जीना तोंड देतात. दःखी होतात. वजन कमी ठेवण्यासाठी कमी खाण्यात आहाराचा समतोल बिघडतो. व्हिटॅमिनच्या कमतरता. प्रथिनांच्या कमतरता वाढत जातात. निसर्गाने दिलेली प्रतिकारशक्ती अशा त-हेने स्वतःहून कमी केली जाते. आधुनिकतेच्या युगात बोटॉक्सची इंजेक्शने घेऊन चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करून तरुण दिसणे किंवा लायपोसक्शन करून हवे तसे शरीराचे मोजमाप करून घेण्यात शास्त्रीय दृष्टिकोनातून आरोग्याकडे बघणे कोण शिकणार ?

आजही आफ्रिकेत मुलींचे circumcision किंवा गुप्तांगाला चिरे देऊन शिवणे चालू आहे. अत्यंत अघोरी व क्रूर व मनुष्यसमाजाला लांच्छनास्पद कृत्य रूढींप्रमाणे चालू आहे. त्यात अनेक मुली, स्त्रिया मृत्युमुखी पडतात. जगल्या तरी जन्मभर दुःखाने पीडित राहतात.

इथियोपियात तर फिस्टूला हॉस्पिटल बांधण्यात येत आहेत. रोग कुठे उपचार कुठे ? लहान वयात लग्न, बाळंतपण सीझेरियनची किंवा फोरसेपची सोय नसली दवाखानाच नसला तर अडलेली स्त्री कधीतरी सुटते. मरते. समजा वाचली तर तिला रक्तस्राव होऊन रक्तक्षय होतो. किंवा खूप वेळ अर्भकाचे डोके – मूत्राशयावर किंवा गुदमार्गावर दबल्यामुळे – अनैसर्गिक मार्ग तयार होतात. (फिस्टूला). लघवीचा नवीन मार्ग तयार झाला की योनिमार्गातून लघवी होऊ लागते. तिच्या बाहेर येण्यावर शरीराचा ताबा नियंत्रण नसते. कारण तो अनैसर्गिक मार्ग. मग सतत थेंब-थेंब लघवी गळत राहते. अशा स्त्रीला नवरा घरातून हाकलून देतो. तोच प्रकार गदद्वाराशी योनिमार्गाचा अनैसर्गिक मार्ग तयार झाला तर मलविसर्जनही केव्हाही नियंत्रणाशिवाय होते. अशा अनेक ‘टाकलेल्या’ हाकललेल्या स्त्रिया पाहिल्यावर त्यांच्यासाठी फिस्टुला हॉस्पिटले बांधण्यात आली. याने नवे फिस्टुला तयार होणे थांबतील?

“नरेंचि केला हीन किती नर ?”

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.