भारताचे मानसिक आरोग्य: आज आणि उद्या

भारतात जन्मलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या मनोरोग-तज्ज्ञाच्या भूमिकेत एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तो असा की एका सर्वसाधारण भारतीयाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या परदेशी बांधवांपासून कोणत्या दृष्टीने भिन्न असते व ह्या विशिष्ट ‘भारतीय व्यक्तिमत्त्वाचा’ परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर व मानसिक रोगांवर कशा प्रकारे पडतो? आपली ‘भारतीयता’ आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेते किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

“निरोगी मानसिकता” म्हणजे काय ? निरोगी मानसिकता म्हणजे नेमके काय व आपल्या भारतीय विचारसरणीचा त्यावर काय प्रभाव पडतो हे सर्वप्रथम आपण समजायचा प्रयत्न करू या.

मानसशास्त्रीय विश्लेषणानुसार निरोगी मानसिकतेचे खालीलप्रमाणे दहा पैलू आहेत.
१. पुरेसा आत्मसन्मान.
२. इतरांवर विश्वास टाकणे.
३. इतरांवर प्रेम करण्याची व प्रेम ग्रहण करण्याची क्षमता.
४. टिकाऊ भावनात्मक नाती जोपासणे.
५. सखोल भावना अनुभवायची क्षमता.
६. स्वतःला व इतरांना माफ करायची क्षमता.
७. आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये आवश्यक असे बदल घडवून आणणे.
८. अनुभवातून शिकून वर्तणूक बदलणे.
९. अनिश्चितता सहन करणे व योग्य धोका पत्करणे.
१०. सकारात्मक कल्पनेत विचार करायची क्षमता.

अशी निरोगी मानसिकता घडविण्यात भारतीयत्वाचा काय प्रभाव पडतो हे पाहण्यापूर्वी आपण ह्यावर थोडा विचार करू या की व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कोणकोणते घटक कार्यरत असतात. हे घटक खालीलप्रमाणे:

आनुवंशिकताः आपल्या स्वभावातला काही भाग आपल्या आई-वडिलांकडून आपल्याला आनुवंशिक घटकांपासून (genes) मिळतो. ह्यावर भोवतालच्या वातावरणाचा परिणाम नसतो. अंतर्मुखी वा बहिर्मुखीपण हे ह्याचे एक उदाहरण.

बालपणातील अनुभवः जन्मल्यापासून पौगंडावस्थेपर्यंत आलेले अनुभव बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपला स्वभाव घडवतात. आपल्यासमोर वर्षानुवर्षे माता-पित्यांची आदर्श वर्तणूक व त्यांचा आपल्याशी साधलेला सुसंवाद हे व्यक्तिमत्त्वाला एक सकारात्मक स्वरूप देतात, हे सर्वविदित आहे.

मोठ्यांकडून मिळालेले प्रोत्साहनः लहानपणी आपल्या ज्या शब्दांना वा कृतीला प्रोत्साहन (पाठ थोपटून किंवा स्तुती करून) मिळते, ती वर्तणूक प्रबळ होत जाते. पालकांद्वारे चांगल्या कृतीकडे दुर्लक्ष केले गेल्याने ती कृती लुप्त होण्याची शक्यता असते.

लोकसाहित्याचा परिणाम: समाजातील भूतकाळातील किंवा काही प्रमाणात वर्तमानातील थोर पुरुष व त्यांनी प्रतिपादित केलेले सिद्धान्त जे आपण शालेय पुस्तकांतून किंवा चारही दिशांमधून ग्रहण करतो, ते थोड्या प्रमाणात आपल्याला दिशा दाखवितात. भारतात महात्मा गांधी, बाबा आमटे, मदर टेरेसा ही अश्या थोर व्यक्तींची काही उदाहरणे.

कोणत्याही समाजातील विचारसरणी पालकांच्या, शिक्षकांच्या व इतर प्रौढ व्यक्तींच्या माध्यमातून मुलामध्ये अवतरते व त्याच्या दृष्टिकोणाचा भाग बनते. आपल्या भारतीय संस्कृतीमधील काही हवीशी वाटणारी मूल्ये, उदा. सहिष्णुता, दया, इतर जनमानसांसोबत बांधिलकी वगैरे आपल्या पालकांमधून आपल्यात येतात. ही मूल्ये बऱ्याच प्रमाणात वरील उल्लेखित निरोगी व्यक्तिमत्त्वांचा भाग बनतात. ह्यालाच ‘संस्कार’ म्हणता येईल.

माझ्या परदेशातील भेटींमध्ये मला बरेचदा पाश्चात्त्य व्यक्तिमत्त्वाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली आहे. त्यात मला असे जाणवले आहे की निरोगी मानसिकतेचे काही गुण, उदा. दुसऱ्यावर सहजतेने विश्वास टाकणे, इतरांवर प्रेम करण्याची क्षमता, भावनात्मक नाती प्रदीर्घ काळापर्यंत जोपासणे, व माफी द्यायची क्षमता हे गुण भारतीय व्यक्तिमत्त्वात जास्त प्रमाणात आढळतात.

अध्यात्माचा प्रतिबंधक परिणामः
आपण आता थोडे मानसिक रोगांकडे वळू या. मानसिक रोग उद्भवण्याच्या कारणांकडे पाहता असे लक्षात येते की ह्यामागे खालीलप्रमाणे घटक कारणीभूत असतात.
१. आनुवंशिकता २. व्यक्तिमत्त्व व विचारसरणी ३. भोवतालातील ताण तणाव

जर आपल्या जीवनात भोवतालातील ताणतणावांचे प्रमाण आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे गेले तर मानसिक रोगाला सुरुवात होऊ शकते. ह्याचे थोडे विश्लेषण केल्यास असे लक्षात येईल की ताणतणावांचा परिणाम आपल्या विचारसरणीच्या माध्यमातूनच होत असतो. जर आपण तणावाच्या एखाद्या स्रोताला (उदा. एखादे दुखणे) “अरे बापरे, मी तर आता कामातून गेलो” ह्या दृष्टीने पाहिले तर त्या विचाराचा आपल्या शरीरावर व मनावर नकारात्मक परिणाम होणार. पण तणावाचा तोच स्रोत असताना जर मी स्वतःशी म्हटले की “हे माझ्या भाग्यातच आहे व हे मला स्वीकारावे लागेल’, किंवा “जे होते ते चांगल्यासाठीच होते”, तर त्या तणावाची बोच माझ्या मनाला कमी होणार. ह्याचाच अर्थ असा की त्यापासून मानसिक रोग उद्भवायची शक्यता कमी होणार. तर ह्या आपल्या विशिष्टरूपेण भारतीय आध्यात्मिक दृष्टिकोणाचा मनोरोगांवर प्रतिबंधक प्रभाव आहे हे स्पष्ट होते.

भारतीय कुटुंबपद्धतीचा सकारात्मक प्रभावः
माझी पहिली परदेशयात्रा इंग्लंडला १९८६ साली घडली. तेथे मला ही गोष्ट अत्यंत प्रकर्षाने जाणवली की आपल्याकडील नात्यांमधील ओढ पाश्चात्त्य देशांपेक्षा बरीच जास्त आहे. पाश्चात्त्य संस्कृती “व्यक्तिप्रधान” आहे तर आपली संस्कृती “कुटुंबप्रधान”. तेथे प्रियकर प्रेयसीचे नाते व आई-मुलाचे नाते सोडले तर इतर नात्यांमधील ओढ आपल्यापेक्षा बऱ्याच कमी प्रमाणात आढळते. पौगंडावस्था संपायच्या आधीच मुले आर्थिकदृष्ट्या व काही प्रमाणात भावनिकदृष्ट्या स्वतंत्र होतात. कुटुंबातील एकमेकांवर अवलंबन आपल्याकडे प्रदीर्घकाळ चालते. एकमेकांना नैतिक आधार देणे, निरनिराळ्या प्रकारचे साहाय्य देणे वेळोवेळी योग्य सल्ला देणे व सल्ला घेणे इत्यादी. ही आपल्या कुटुंबपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत, मग एखादे कुटुंब विभक्त असो किंवा संयुक्त असो. “नातेवाईकांचा आधार” हा प्रत्यय म्हणजे आपल्या भारतीयांसाठी एक अत्यंत गर्वाचा विषय आहे.

ह्या आधारामुळे भारतीय व्यक्तीला निरनिराळ्या ताणतणावांना तोंड देणे निश्चितच सोपे जाते. जेथे पाश्चात्त्य व्यक्ती जवळपास निराधार “एकटे जीवन’ जगत असते, तेथेच भारतीय व्यक्ती आपल्या कुटुंबाच्या उबदार आधारामुळे सुरक्षित असते. “मला काहीही समस्या असल्यास माझे नातेवाईक माझ्या पाठीशी आहेत” ही सुरक्षितता सदैव आपल्या मनात असते व ह्या सुरक्षिततेच्या भावनेमुळे निश्चितच मानसिक समस्या विकोपाला जाणे टळते. भारतीय

मानसिक रोगांचे प्रमाणः
भारतात केलेल्या नवीनतम सर्वेक्षणांमध्ये असे आढळून येते की येथे निरनिराळ्या मानसिक रोगांचे प्रमाण निराळे आहे. त्याची अमेरिकेतील रोगांच्या प्रमाणांशी तुलना खालीलप्रमाणे आहे.

मानसिक रोग भारतात टक्केवारी अमेरिकेत टक्केवारी
एकूण रोगाचे प्रमाण ७.३ २०
ग्रामीण विभागात
शहरी विभागात
स्किझोफ्रेनिया ०.२
डिप्रेशन १.२ ४.३
मद्याचे व्यसन ०.६ ८.८
न्यूरोसिस १३

भारतीय मानसिक रोगांचे एकूण प्रमाण शहरी विभागात, स्त्रियांमध्ये, ३५ ते ४४ ह्या वयोगटात व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ लोकांमध्ये जास्त आढळते.
ह्या आकड्यांवरून हे लक्षात येते की जवळपास सर्वच मानसिक रोगांचे प्रमाण अमेरिकेच्या तुलनेत भारतात कमी आहे. इतर पाश्चात्त्य देशांमधील आकडे अमेरिकेच्या नजीक आहेत. डिप्रेशन, व्यसनाधीनता व न्यूरोसिसचा उद्गम बऱ्याच प्रमाणात ताण-तणावांशी संबंधित असतो व ह्या सर्व रोगांचे भारतातील कमी प्रमाण पाश्चात्त्य देशांपेक्षा आपल्या येथील समाजात असलेल्या कमी तणावाचे प्रतिबिंब आहे असे म्हणायला हरकत नाही.

भारतीय मानसिक रोगांचे सुधार अनुमानः
सध्या संपूर्ण विश्वात ह्या तथ्याला स्वीकृती मिळालेली आहे की भारतात मानसिक रोगांचे ‘सुधार अनुमान’ (सुधार व्हायची शक्यता) उर्वरित जगापेक्षा जास्त चांगले आहे. अर्थात् स्किझोफ्रेनियासारखा गंभीर मानसिक रोग एका भारतीयाला झाल्यास त्याची सुधार व्हायची शक्यता त्याच्या पाश्चात्त्य बांधवापेक्षा जास्त आहे. आपल्या देशात ह्या रोगाची तीव्रतासुद्धा पाश्चात्त्य देशांपेक्षा कमी प्रमाणाची असते.

१९७३ मध्ये जागतिक स्वास्थ्य संघटनेने ‘इंटरनॅशनल पायलट स्टडी ऑफ स्किझोफ्रेनिया’ नावाच्या एका आंतरराष्ट्रीय अनुसंधानाचा अहवाल प्रकाशित केला. ह्या अनुसंधानात नऊ देशांचा समावेश होता, व भारत त्यांपैकी एक होता. ह्या अभ्यासात असे लक्षात आले की इतर आठ देशांपेक्षा भारतात ह्या रोगाने पीडित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचे प्रमाण सर्वाधिक होते. उपचाराच्या ५ वर्षांनंतर भारतात ४२% रुग्ण पूर्णपणे बरे झालेले होते तर डेन्मार्क व इंग्लंडमधील ही टक्केवारी क्रमशः फक्त ६% व ५% होती. तज्ज्ञांचे असे मत आहे की भारतातील मनोरोगांच्या जास्त चांगल्या सधाराला कारणीभत आहेत आपल्या येथील जास्त सशक्त कुटुंबपद्धती, आपली कृषिप्रधान अर्थव्यवस्था, व आपला अधिक आधारदायी परिवेश. पाश्चात्त्य देशांत अनेकदा मनोरोग झाल्यावर तेथील एकेकटे राहणारे किंवा विभक्त कुटुंबात राहणारे रुग्ण अक्षरशः ‘रस्त्यावर येतात’. पण आपल्या देशातील संयुक्त कुटुंबपद्धती वा भावनिकदृष्ट्या सशक्त कौटुंबिक संबंधामुळे मनोरुग्णाला जास्ती चांगला भावनिक, भौतिक व आर्थिक आधार मिळतो. ह्यामुळे तणावांचा स्तर कमी होतो व त्यांतून रोगापासून जास्ती चांगल्याप्रकारे मुक्त होण्याची शक्यता असते. न्यूयॉर्कमध्ये एकटा राहणाऱ्या जॉनला जेव्हा स्किझोफ्रेनिया होतो तेव्हा त्याच्यावर अक्षरशः भिकारी होण्याची पाळी येऊ शकते. ह्या तुलनेत जेव्हा बुटीबोरीतील संयुक्त कुटुंबात राहणाऱ्या गोंद्याला जेव्हा हा रोग होतो तेव्हापण त्याचे वडील त्याला त्याच्या ६ भावांसोबत रोज शेतावर नेतात. रुग्णावस्थेतसुद्धा तो तेथे बसल्या बसल्या दगड फेकून कावळ्यांना हाकलत बसतो व एका अल्पप्रमाणात का होईना, तो त्याच्या कुटुंबातील एका उत्पादक व्यक्तीची भूमिका साकारत असतो.

भारताचे मानसिक आरोग्यः उद्या
कोणत्याही जनसमूहाचे मानसिक आरोग्य बऱ्याच प्रमाणात तेथील भोवतालच्या ताणतणावांवर अवलंबून असते. ह्याचाच अर्थ असा की भारतात मानसिक आरोग्याची भविष्यातील दशा अंशतः येथील आपल्या तेव्हाच्या वातावरणावर अवलंबून राहणार. आपल्या अवस्थेला प्रभावित करणारे काही घटक माझ्या मते खालीलप्रमाणे राहणार वाढता भौतिकवादः सध्या भौतिकवाद वाढत आहे हे निर्विवाद आहे. घरोघरी संपन्नतेच्या सूचक असणाऱ्या वस्तू, उदा. गाडी, टी.व्ही., फ्रिज, म्युझिक सिस्टिम, डी.व्ही.डी. प्लेयर (यादी फार मोठी आहे व म्हणून अप्रकाशनीय आहे) इत्यादी किंवा इतर आहेत किंवा हव्याहव्याशा आहेत. ह्याव्यतिरिक्त वारंवार हॉटेलात जाणे, देशात वा परदेशात पर्यवेक्षण इत्यादींसाठी लागणारा पैसा जमविण्याचा तणाव हल्ली मध्यमवर्गीयांना भारी पडत आहे. अशा घटकांनी जर मनावर तणाव उत्पन्न केला नाही तरच आश्चर्य. वाढता व्यक्तिवादः पाश्चात्त्य देशांप्रमाणे भारतातसुद्धा व्यक्तिकेंद्रित अभिवृत्ती वाढत आहे व कुटुंबकेंद्रित प्रणाली हळूहळू कमी होत चालली आहे. आजच्या तरुणांमध्ये व्यक्तिस्वातंत्र्याचे महत्त्व, स्वतःचे ठाम दृष्टिकोण व ‘मी जगाला जिंकू शकतो’ ही विचारशैली बऱ्याच प्रमाणात आढळते. ह्या दृष्टिकोणात काही वाईट नाही. पण ह्यासोबत कुटुंबाचे विघटन व मोठ्यांचा आधार क्रमशः कमी घ्यायची प्रवृत्ती काही प्रमाणात चिंताजनक आहे. कठीण परिस्थितींमध्ये आपल्या आप्तजनांचा कमी होणारा आधार निश्चितच आधी उल्लेखल्याप्रमाणे मानसिक रोगांची तीव्रता वाढवू शकतो व त्यांचे सुधार-अनुमान बिघडवू शकतो.

धर्म व अध्यात्मः
उद्या वाढता भौतिकवाद व अध्यात्म ह्यांच्यात व्यस्त संबंध (inverse relationship) राहील. माझे हे निरीक्षण आहे की तरुण पिढीची धर्माकडील व अध्यात्माकडील ओढ हळूहळू कमी होत चालली आहे. टी.व्ही.चेच उदाहरण घेऊ या. काही वाहिन्या उदा. ‘साधना’, ‘आस्था’, “God Channel’ इत्यादी ‘वयस्कांसाठी’ व एम.टी.व्ही., इत्यादी तरुणांसाठी असे एक सर्वसाधारण वर्गीकरण आजच्या तरुण पिढीच्या मनात दिसते. स्वतंत्र दृष्टिकोणाच्या भाराखाली मूल्यांचा मुडदा पडत आहे.

एक आशेचा किरण मात्र दिसतो. जेव्हा एखादी भारतीय परंपरा परदेशात स्वीकारली जाते तेव्हा त्याला परत आपल्या डोक्यावर घेतले जाते. आपल्या अध्यात्माचा प्रवास आता परदेशांत पोहोचलेला आहे. युरोपात व अमेरिकेत भारतीय तत्त्वज्ञान व अध्यात्म लोकप्रिय होत आहे. भौतिकवादाच्या उथळपणाचा आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाचा शोध घ्यायची गरज पाश्चात्त्य देशांत जाणवत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या समोर येतात. म्हणून एक अशी आशा जागृत होते की आपलेच अध्यात्म परदेशाची वारी करून एक दिवशी आपल्याकडे परतणार व आपल्या जनसमूहाला पुन्हा एकदा आत्मिक शक्ती देणार.

सारांश असे म्हणता येईल भारतातील सशक्त कुटुंबपद्धती, नात्यांमधील प्रगाढ भावनिक संबंध, आपल्या तत्त्वज्ञानामधील सहिष्णुता व दैवी शक्तीवरील विश्वास हे घटक आपल्या मानसिकतेला एक महत्त्वाचा आधार देतात व मानसिक रोग झाल्यास त्यांचे स्वरूप व सुधार-अनुमान सुधरवतात.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.