नैराश्यग्रस्तता आघाडी घेत आहे !

जागतिकीकरणाबरोबर माणूस बदलतो आहे. नातेसंबंध बदलत आहेत. माणूस जास्त आत्मकेंद्री होतो आहे. हिशोबी होतो आहे. पैसा खूप मिळतोय पण त्याचबरोबर वेळेचा बळी – सामाजिकीकरणाचा बळी व माणुसकीचाही बळी जातो आहे. कामाचे तास वाटेल तसे वाढताहेत. आरामाला वेळ नाही. खुल्या बाजारपद्धतीमुळे वाढती स्पर्धा, विदेशी उत्पादनाची आयात, यामुळे वाढती महागाई होणार. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढते आहे. मुलांना लहान वयात जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागते आहे. त्यामुळे ताण वाढताहेत. त्याचबरोबर निराशाही वाढते आहे. आत्मकेंद्री विचार करण्याची पद्धत, वाढत्या गरजा, छानछोकी-मौजमजा यांच्याशी संबंधित. यातून ताण-तणाव वाढायलाच मदत होते. विभक्त कुटुंबांमुळे विनासायास, सर्व मूलभूत गरजांसोबत चैनीच्या व विलासाच्या सोयीदेखील लवकर मिळतात. काहीही मिळवण्यासाठी संयम, वाट पाहाणे, प्रयत्न करणे, किंवा जे आहे त्यात समाधान मानणे हे क्वचितच शिकवले जाते. मनात येईल तेव्हा मनात येईल ते मिळणे ही सवय लागते आहे लहानांना. मोबाईल, वाहन, महागडे कपडे, वस्तू. सोबत गरज पडल्यास शिक्षणासाठी भली मोठी देणगी या गोष्टी मुलांना तरुणांना सहजच वाटतात. त्यामुळे कशाचीच किंमत वाटत नाही. त्यातून गैरफायदा घेणे किंवा गैरवापर करणे याची सुरुवात होते. हे सर्व होताना कुठेही अपयश आले, नकार मिळाला किंवा अपेक्षित गोष्ट झाली नाही तर लगेच ताणानंतर येणारी निराशा-हताश-मनस्कता यात बुडून जातात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतात. स्वतःच्या लायकीची किंवा कुवतीची वस्तुनिष्ठ कल्पनाच त्यांना येत नाही. आत्मपरीक्षण करण्याची गरज इथे फार असते. मूलभूत बाबी आणि सुखसोयींची व्यवस्था करण्याची जबाबदारी जेव्हा पूर्णपणे स्वतःवर येते आणि सत्य परिस्थितीची जाण यायला लागते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. झटपट पैसा झटपट यश आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी यात ढासळणारी मूल्ये व नीतिमत्ता समाजाला नीतिहीनतेकडे नेते. अनेक अनावश्यक अपेक्षा आणि बंधने स्वतःवर लादून घेऊन तरुण पिढी स्वतःची फरफट करून घेत आहे. या परिस्थितीत बदल न झाल्यास तरुण पिढी व त्यायोगे समाजाचे भवितव्य कठीण दिसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.