आरोग्य आणि आहार

तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता, सारे आहारावरच अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त होणे हे आहाराच्याच आधीन आहेत. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील. आणि कितीही औषधे घेतली पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग नीट होणार नाही.

कोणताही रोग एका रात्रीत उपटत नाही त्याच्या मुळाशी बऱ्याच वेळपर्यंत होत राहिलेली अन्नघटकांची कमतरता असते. आहार योग्य असेल तर आजारपण येणारच नाही असे नाही, परंतु त्याचे प्रमाण व तीव्रता कमी राहील. आजारातून बरे व्हायचे असेल तर मुळात प्रकृती चांगली हवी. ही चांगली प्रकृती चांगल्या आहारावरच अवलंबून असते. औषधे ही रोगांच्या उपायासाठी तर सत्त्वयुक्त, संतुलित आहार हा आरोग्याच्या रक्षणासाठी असतो.

सध्या एकूण जनतेचे स्वास्थ्यच बिघडले आहे याचे कारण आहारातील चुका आज जे अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध, तेले आपल्यापर्यन्त पोचते, ते निकृष्ट दर्जाचे आहे. कीटकनाशके, जंतुनाशके, रासायनिक खतांचा अतोनात वापर, सर्वप्रकारचे वाढते प्रदषण आणि धकाधकीचे तणावपर्ण जीवन. या मोठ्या सामाजिक प्रश्नांवर तर आपण मात करू शकत नाही. पण आरोग्य आहाराद्वारे चांगले ठेवणे आणि आपली रोगप्रतिकारशक्ति वाढवणे हे तर आपल्या हाती आहे ना!

आपल्या आहाराचे प्रमाण हवामान, वय शारीरिक कष्ट आणि लिंग यावर अवलंबून असते. हवामान थंड असेल तर अधिक खाणे जरूरीचे. लहानपणी, वाढीच्या वयात अधिक, तर पुढे कमी आहार हवा. शेतकरी, कामगार, खेळाडूंनी जास्त तर बैठे काम करणाऱ्यांनी कमी आहार घ्यावा. किशोरवयीन मुलींना, स्त्रियांना, गरोदरपणी, बाळंतपणात, नोकरी करणाऱ्या स्त्रीला कायम प्रोटीन्स, कॅल्शियम, लोहाने भरपूर अशा सत्त्वयुक्त संतुलित आहाराची गरज असते. साठीनंतर आहाराचे प्रमाण निम्मे करायला हवे. शरीराच्या वाढीसाठी, होणारी झीज भरून काढण्यासाठी, शक्तीसाठी आहाराची गरज असते. हा आहार नैसर्गिक असावा. तो कारखान्यात यंत्रांनी तयार केलेला नसावा.

जो आहार आपल्याला शारीरिक मानसिक, बौद्धिक व रोगप्रतिकारक शक्ती; चपलता, स्मरणशक्ती, सौंदर्य, व्यक्तिमत्त्व, दीर्घायुष्य देतो, तोच सकस आणि योग्य आहार होय. आजचा आपला आहार या गोष्टी द्यायला असमर्थ आहे. कारण रोग्यांची आणि रोगांचीही संख्या वाढताना दिसत आहे. आपल्या देशात १२-१५% मधुमेहाने पछाडलेले १५-२०%, रक्तदाबाचा विकार असलेले १०-१५%, किडनीच्या व्याधींनी ग्रस्त, लठ्ठपणा असह्य झालेले, तर हृद्रोगाचे शिकार झालेले भरपूर लोक आढळतात. कित्येकदा तर अगदी लहान वयातही असे रोग झालेले दिसतात. या रोगांना चयापचयाच्या अडथळ्यांमुळे निर्माण झालेल्या पेशींच्या ह्रासामुळे उद्भवणारे रोग म्हणतात. औषधशास्त्रातील प्रगती, डॉक्टरी उपाय, नवे शोध, नवी उपकरणे यामुळे माणसाचे सरासरी आयुष्यमान तर वाढले आहे; पण ही लोकसंख्या सुदृढ, सशक्त, निरोगी नसून वर सांगितलेल्या बऱ्या न होणाऱ्या रोगांनी पछाडलेल्या व्यक्तींची आहे. अशी लोकसंख्या म्हणजे राष्ट्रावर बोझा आहे.

वय, वजन, उंची यांचे अंदाज आरोग्याच्या दृष्टिकोनातून बांधलेले आहेत. योग्य वजन आणि उंची हे आरोग्याचे लक्षण आहे. पुरेसे व योग्य खायला न मिळणे किंवा पुरेसे पण अयोग्य खाणे हे वजनाचा अंदाज चुकवितात. आज ज्यांना खायला मिळत नाही तिथे आणि जास्त खायला मिळते तिथेही कुपोषणच आहे. याचे खरे कारण म्हणजे जनतेचे आहारविषयक अज्ञान!

सकस, समतोल आहार हे शब्द आजकाल फार वापरले जातात, परंतु सकस म्हणजे नेमके काय हे मात्र माहीत नसते. मोघमपणे काही सांगितले जाते, पण सकस आहाराला शास्त्राचा पाया आहे. त्यावर दरवर्षी ६०००-७००० शास्त्रीय शोध प्रसिद्ध केले जातात. हे शोध जगभर अनेक वैद्यकीय महाविद्यालयातून, विश्वविद्यालयातून, प्रयोगशाळांतून होतात. ते मुख्यत्वे आहारातील ४०-५० अन्नघटकांवर होतात. हे घटक म्हणजे १० आवश्यक अमायनो ॲसिड्स् (प्रोटीन्स), १५ जीवनसत्त्वे, १४ क्षार आणि १ आवश्यक स्निग्ध पदार्थ (फॅटी ॲसिड). यापासून आपल्या शरीरात जवळ जवळ १०,००० तरी निरनिराळे घटक तयार होतात, ज्यांपैकी बरीचशी एपूाशी आहेत, ज्यांच्यामुळेच शरीरातील पेशींचे कार्य व्यवस्थित चालू राहते. या ४० अन्नघटकांपैकी एखादा घटक जरी कमी पडला तरी १०,००० घटकांचे काम नीट होणार नाही. व पेशींचे आरोग्य धोक्यात येईल. या पेशींपासूनच शरीरातले अवयव आणि शरीर तयार होते. पेशी म्हणजे सूक्ष्म असा शरीराचा भाग. त्यात सूक्ष्म फरक पडला तर चटकन जाणवतही नाही, परंतु त्याची गोळाबेरीज शरीरात होऊ लागते. हीच रोगांची किंवा विकारांची सुरुवात. एकदा रोग झाल्यावर औषध योजनाच हवी, परंतु रोग होऊच न देण्याकरता ४० अन्नघटकांचा आहार कायम घेणे महत्त्वाचे. बरेचदा डोकेदुखी, पाठदुखी, पोटदुखी, पायदुखी, सर्दी, खोकला, ताप, पाळीचा त्रास, पांढरे पाणी जाणे, यासारख्या छोट्यामोठ्या कुरबुरी या आहार सुधारल्याने ठीक होतात. पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रोगाची उत्पत्ती मनुष्याच्या उत्पत्तीपासून आजतागायत मानवी शरीर, त्यातील अवयव त्याचे कार्य जसे होते तसेच आहे, पण माणसाच्या आहारविहारात मात्र गेल्या शेपन्नास वर्षांत फार वेगाने बदल झाले आहेत. मनुष्याची ताकद कमी होते आहे, कारण आपला आजचा आहार कृत्रिम आणि निःसत्व आहे.

पेशींचे अस्तित्व प्रोटीन्सवर अवलंबून असते. प्रोटीन्सचे कार्य उत्तम तऱ्हेनी होण्यासाठी जीवनसत्त्वे आणि क्षार यांची गरज असते. पेशींच्या एकंदर घडणीसाठी स्निग्ध पदार्थांची तसेच कार्बोहायड्रेटस्ची गरज असते. पण जीवनसत्त्वे आणि क्षारांशिवाय तेही काम करू शकणार नाहीत आणि या सर्वांना स्वयंचलित करण्यासाठी प्राणवायू हवा. पाण्याशिवाय पेशींचे अस्तित्त्व शक्य होत नाही. म्हणजेच प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स्, फॅटस्, व्हिटॅमिन्स, क्षार (मिनरल्स), पाणी आणि प्राणवायू हे सगळे घटक मिळाल्याशिवाय पेशींचे अस्तित्वच टिकू शकत नाही. ह्या घटकांचेच ४० पोटघटक आहेत. नव्या पेशींची निर्मिती, जुन्या पेशी मृत झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा नव्या पेशी निर्माण करणे, हे चक्र अव्याहत चालू राहण्यासाठी अन्नातून सतत हे अन्नघटक शरीराला मिळायलाच हवेत. हे सर्व एका टीमप्रमाणे आपल्या शरीरात काम करतात.

उदा. कॅल्शियम हा दातांसाठी, हाडांसाठी स्नायूंसाठी हवा हे खरे, पण त्याचे काम पूर्ण होण्यासाठी जोडीला प्रोटीन्स, जठराग्नी, अ, ड, जीवनसत्त्वे हवीत. म्हणून नुसते कॅल्शियमच्या गोळ्या खाऊन काम होणार नाही. याचाच अर्थ सर्व आहारघटक एकमेकांच्या सहाय्याने काम करतात, एका टीमप्रमाणे! ही पोषकतत्त्वे आपल्याला धान्ये, डाळी, कडधान्ये, भाज्या, फळे, दूध, तेल, तूप आणि तेलबियातून मिळतात. पण आजच्या ब्रेड, टोस्ट, बिस्किट, बर्गर, पावभाजी, पिझ्झाच्या जमान्यात डाळी आणि कडधान्याचा कमी वापर होतो. रोगप्रतिकारशक्ती नष्ट होते. प्रोटीन्स असली तरी दुय्यम दर्जाची ; स्निग्ध पदार्थ असतात, पण अनैसर्गिक स्वरूपाचे (रिफाईन्ड तेले), आणि कार्बोहायड्रेटस पण रिफाईन्ड म्हणजे अनैसर्गिकच. या मुख्य तीन अन्नघटकांच्या अनैसर्गिक स्वरूपामुळे बहुतेक जीवनसत्त्वांची, क्षारांची शरीराला कमतरता उत्पन्न होते. अशा तऱ्हेने कुपोषण झाल्याने वयोवर्धनाची मर्यादा अधिकजवळ येते.

म्हणून उत्तम दर्जाच्या प्रोटीन्ससाठी योग्य संयोगाचीही आवश्यकता असते. घट्ट वरण भात, भाकरी पिठले, उसळ पोळी, वरण पोळी, जोडीला भाजी अथवा मोडाची कडधान्ये, शेंगदाण्याचा वापर इ. यांपासून ऊर्जा निर्माण करण्यासाठीसुद्धा प्रोटीन्सची गरज असते. थकवा येणे, तोंड येणे, वारंवार पचनावर परिणाम होणे. जंतूची लागण होणे असे ठळक त्रास हे कार्बोहायड्रेट्स किंवा पिष्टमय पदार्थ अनैसर्गिक स्वरूपात खाण्यामुळे संभवतात. नैसर्गिक स्वरूपात तेल तूप आहारात असल्यास शरीराला लायनोलेईक ॲसिड आणि ई जीवनसत्त्वाचा फायदा मिळतो. तेलबिया आणि त्यातून फक्त गाळून घेतलेले तेल यात हे घटक असतात. हे प्रत्येक पेशीवरील आवरणात असतात. पेशी सुरक्षित ठेवतात. पुन्हा पुन्हा तळलेले तेल, धूर करून तापवलेले तेल, वनस्पती घी, मार्गारीन, सर्व त-हेची रिफाईन्ड तेले खाऊन शरीरात तेलाच्या घटकांची कमतरता होते. पेशींचे कुपोषण होते. यामुळे पेशींचा ह्रास होणाऱ्या रोगांची, म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर यासारख्या रोगांची शक्यता वाढते. तेलाच्या जोडीला थोडेसे साजुक तूप वरून घेण्यासाठी वापरावे.

स्वयंपाकाचा विचारही पेशींच्याच संदर्भात करायला हवा. स्वयंपाक म्हणजे खाद्य पदार्थांच्या नैसर्गिक स्वरूपावर कमीतकमी संस्कार करून त्यांना चविष्ट बनवणे. खाता येतील तेवढे पदार्थ त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात खायला हवेत. ज्या खाद्यपदार्थात जीवन असते तेच आपल्या जीवनाला जीवन देते. दिवसभराचा आहार ४ वेळेत विभागूनच घ्यायला हवा. खाण्याच्या वेळाही तेवढ्याच महत्त्वाच्या. सकाळचा नाश्ता घेणे आवश्यक आहे (९ वाजेपर्यंत), दुपारचे भोजन (१२ ते २), संध्याकाळी (५ ते ६) हलकी न्याहरी तर रात्रीचे जेवण (८ ते ९). रात्रीच्या जेवणात आणि झोपण्यात दोनेक तासांचे अंतर हवे. झोपताना दूध घेणे चांगले. सकाळी ओला नाश्ता, ज्यात नाश्त्याचेच पारंपरिक पदार्थ असावे. तर संध्याकाळी कोरडा नाश्ता घ्यावा, ज्यात चिवडा, सत्तू, मुरमुरे, फुटाणे वगैरे असावे. दुपारच्या जेवणात वरण, भात, भाजी, पोळी, दही, कोशिंबीर, फळ, अशा ७ गोष्टी तर रात्री फळ व दही सोडून ५ गोष्टी असल्या की संपूर्ण संतुलित आहार होतो. विविधतेमळेच सर्व अन्नघटक प्राप्त होऊ शकतात. अन्न ताजे असल्यास उत्तम. सकाळचे र दिवशी नको. आहारात कोशिंबिरी, ताक, दही, चटण्या भरपूर असाव्यात. नेहमी असा आहार हवा व सणासुदीला थोडे गोड, थोडे तळलेले चालेल (महिन्यातून एकदाच). भाज्या फळे धान्ये कडधान्यात चोथा (Fiber) हा महत्त्वाचा घटक असतो. आतड्यातील मल, शरीरातील कोलेस्टेरॉल काढण्यासाठी तो आवश्यक असतो. बऱ्याच रोगांचे मूळ कारण अपचन! म्हणून रोजच्या आहारात ज्वारी, नाचणी, सोजी, पालेभाज्या, फळे, सलाद, अंकुरित कडधान्ये, ओवा, शोप भरपूर असावे. शक्यतोवर भाज्या-फळांची साले काढू नयेत. फळे ही नाश्ता व दुपारच्या भोजनानंतर खावीत. जेवताना पाणी पिऊ नये.

डाळी अन्नधान्ये यांना भाजण्याने, भिजवण्याने, मोड आणण्याने त्यातील पोषक तत्त्वांची वाढ होते. भाज्या कमीत कमी वेळात कमीत कमी पाण्यात शिजवाव्या. कोशिंबिरी, भाज्यात विविध बियांच्या कुटाचा वापर करावा. हातसडीचे, करडे किंवा कमी पॉलिशचे तांदूळ वापरावे. कणीक चाळ नये, गह घेऊन त्यात १/१० सोयाबीन, १/१० नाचणी घालून दळून आणावे. कच्चे सोयाबीन कधीच खाऊ नये. रात्रभर भिजवून, वाळवून, भाजूनच गव्हात टाकावे. साखर वर्ण्य केल्यास उत्तम. त्याऐवजी गूळ (थोडा) किंवा खजूर वापरावा. सक्यामेव्याची पावडर करून ती मुलांना दधातून बोर्नव्हिटा, कॉम्प्लानऐवजी द्यावी. मुलांना खाऊ म्हणून खजूर, अंजीर, जर्दाळू, द्यावे टॉफी, चॉकलेट, कॅडबरी मुळीच देऊ नये. बाजारचे पदार्थ व रेडिमेड पदार्थ शक्यतोवर टाळावे. पंधरा दिवसातून एकदा लहान मुलांकरता व तीस दिवसांतून एकदा मोठ्यांकरता चालतील. जेवणात ओल्या नारळाचा वापर चालतो. खोबरे टाळावे. मधल्या वेळात दूध, चहाबरोबर चकल्या, लाडू, शेव, फरसाण यांऐवजी चणे, मुरमुरे, शेंगदाणे, लाह्या, पॉपकॉर्न, बटाटे, रताळी, भुट्टे, शिंगाडे, पोह्यांचे पदार्थ, सत्तू, नाचणी यांचा उपयोग करावा. एकांगी पिठांऐवजी मिश्रपिठांचा वापर करावा. रोजच आपल्याला षड्रस्युक्त आहार आवश्यक आहे. गोड, तिखट, खारट, आंबट, तुरट आणि कडू. तुरट पदार्थ कमी असतात पण थोडे तरी रोज खावे. उदा. आवळा, करवंद, सुपारी, जेष्ठमध, कवठ, चिचबिलाई, काही फळे इ. या रसाने यकृत कार्यक्षम राहते. कडू रसाकरता रोज वरणात शिजवताना मेथीदाणा घालावा. रोज एकतरी लिंबू खावेच, तसेच कॅल्शियमकरता भरपूर दही, ताक, घ्यावे आणि भातात शिजवताना चिमूटभर खायचा चुना घालावा.

भाज्या शिजवताना लोखंडी कढई वापरावी,अॅल्युमिनीयम हिंडालियम, नॉनस्टिकच्या भांड्यांपेक्षा पितळेची भांडी, मातीची भांडी चांगली. बिडाचा, लोखंडाचा तवा वापरावा. तळलेले पदार्थ, मिठाई, गोडाचे पदार्थ, प्रक्रिया केलेले रिफाईन्ड, प्रिझर्व्हेटिव्हज् रंग घातलेले पदार्थ टाळावे.

वाढत्या वयात, उतारवयात निर्माण होणाऱ्या बहुतेक सर्व विकारांचे मूळ गर्भावस्थेत, शैशवावस्थेत आणि वयात येण्याच्या अवस्थेत झालेल्या कुपोषणात आढळते. जन्मतःकमी वजन असणाऱ्या मुलांनाही पुढे कॅन्सर, हृदयविकार मधुमेह, उच्च रक्तदाब हे विकार संभवतात. म्हणजेच मातेचे सुपोषण आवश्यक. आपले शरीर हे असंख्य पेशींपासून बनलेले आहे. त्याची उत्पत्ती, वाढ आणि तंदुरुस्ती ही योग्य आहारावरच निर्भर आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.