एड्सः एक साथ … लक्षवेधी

गोष्ट १९७९ च्या सुमाराची. अमेरिकेतली. न्यूयॉर्कमधल्या एका मोठ्या इस्पितळात रोज सकाळी सगळ्या डॉक्टरांची, प्रमुख नर्सेसची एक बैठक होत असे. इस्पितळातल्या सगळ्या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल तेव्हा चर्चा होई. लक्षणे, तपासण्याचे निकाल, निदान आणि उपचारांच्या योजना ह्यांचा आढावा घेतला जाई, आणि कार्यवाहीसाठी जबाबदाऱ्यांचे वाटप होई. ह्या बैठका रोजच्याच असत. त्यांची पद्धत ठरलेली, त्यामुळे बैठका चटपटीतपणे उरकत. प्रत्येकच रुग्णांबद्दल खूप चर्चा करायचे कारण नसते. काही विशेष आढळले, तरच त्यावर थोडीफार चर्चा व्हायची, आणि त्यातून कार्यवाहीच्या दिशा ठरत.

१९७९ च्या सुमाराला, ह्या चर्चा जरा लांबू लागल्या. काही रुग्ण बुचकळ्यात पाडणारे होते. त्यांचे निदान फारसे अवघड नव्हते, पण अनपेक्षित होते. माणसाच्या जातीला सतावणारे रोग पाहू गेले, तर कमी नाहीत. हजारो आहेत पण त्यात काही रोग सामान्यपणे नेहमीच दिसतात, तर काहींचे प्रमाण त्यापेक्षा कमी असते. वर्षाच्या विशिष्ट काळात उद्भवणारे काही रोग असतात. तर काही अगदी क्वचित दिसणारे.

वर्षभराकाठी क्वचित एखादा रोगी पहायला मिळावा, तोही वृद्ध, प्रतिकारशक्ती खूप कमी झालेल्या अवस्थेतला, अशा रोगांचे एका वेळी तीन-चार रुग्ण इस्पितळात दाखल झालेले होते. आश्चर्य म्हणजे ते वृद्धही नव्हते. प्रतिकारशक्ती कमी व्हावी असेही कारण त्यांच्याबाबतीत वरपांगी तरी दिसत नव्हते. असे का व्हावे, ह्याचा अंदाज येत नव्हता. तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांनी लक्ष घातले. आणखी काही तपासण्या केल्या. रुग्णाचे वर दिसणारे आजार बरे करणे फार कठीण नव्हते. पण असे व्हावेच का ? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा होता.

इतर रुग्णालयाशी संपर्क साधून बघितले. काहींना हे काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली होती. काहींनी एवढा विचारच केला नव्हता, पण त्यांच्याकडेही असेच घडत होते. योगायोगापेक्षा हे जरा जास्त होते. ह्याचा अर्थ सरळ होता, काहीतरी वेगळा प्रश्न समोर येत होता. ह्या प्रश्नाचे स्वरूप अधिक समजावून घ्यायला सुरुवात करायलाच हवी असा निर्णय झाला, सूचना गेल्या.

  • ह्या रुग्णांकडे विशेष लक्ष ठेवा.
  • त्यांच्या गतायुष्याबद्दल, आर्थिक स्थितीबद्दल, आणि लैंगिक सवयींबद्दल नोंद करा.
  • त्यांचे आजार वरपांगी बरे झाले, तरी त्यांना केव्हाही संपर्क करता यायला हवा, तशी सोय करा.

ह्यामधून काही लक्षवेधी गोष्टी समोर आल्या. त्यातले बहुतांशी रुग्ण समलिंगी संबंध ठेवणारे पुरुष होते. आणि काहीतरी अगम्य कारणाने त्यांच्या पांढऱ्या पेशीतला एक महत्त्वाचा उपप्रकार बराच घटला होता, त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते, म्हणून ह्या रोगाचे पहिले बारसे झाले. ‘समलिंगी पुरुषांमध्ये प्रतिकारशक्ती कमी करणारा रोग.’ ह्या रोगाचे कारण असलेला विषाणूही मग ध्यानी आला. एकाच वेळी फ्रान्समध्ये आणि अमेरिकेत, अनुक्रमे लू मॉटॅग्नर आणि रॉबर्ट गॅलो ह्या दोन शास्त्रज्ञांनी ह्या विषाणूंचा शोध जाहीर केला. दोघांनीही एकमेकांवर चोरीचा आरोप केला. पण न्याय्य बाजू कोणती हे आंतरराष्ट्रीय न्यायालयालाही ठरवता आले नाही. अखेर दोघांनाही निम्मे निम्मे श्रेय देऊन प्रश्न मिटवण्यात आला. एव्हाना, फक्त समलिंगी पुरुषांमध्येच नाही तर भिन्नलिंगीमध्येही, स्त्रियांमध्येही हा रोग पसरू शकतो, इतकेच नव्हे तर गर्भवती मातेतून बाळाकडेही पोचू शकतो हे ध्यानी येत होते. म्हणून ह्या विषाणूला ‘मानवी शरीरात प्रतिकारशक्तीचा ऱ्हास करणारा विषाणू’ असे नाव देण्यात आले.

ह्याचा खरा अर्थ ‘बाहेरून आलेल्या कारणामुळे प्रतिकारशक्ती नष्ट होऊन जे अनेक आजार होतात, त्यांच्या लक्षणांचा समूह’. ही लक्षणे स्थानानुसार, परिस्थितीनसार बदलतातदेखील. म्हणजे अमेरिकेत, फ्रान्समध्ये किंवा आफ्रिकेत किंवा भारतात ही लक्षणे वेगवेगळी दिसतात. त्या त्या भागात बहुतांशाने दिसणारे आजार तिथल्या लोकांना जास्त सतावतात.

ह्या रोगाची चाहूल प्रथम अमेरिकेसारख्या श्रीमंत राष्ट्रामध्ये लागली, हे फार बरे झाले. एच.आय.व्ही. एड्स ची साथ एव्हाना जगातल्या सगळ्या देशात पोहोचलेली आहे. पण जर ती सुरुवातीच्या काळात श्रीमंत देशात नसती पोहोचली तर गरीब देशातली माणसे भुकेने, विविध आजारांनी मरतच असतात. त्यात हे काही वेगळे घडतंय हे लक्षात यायला फारच वेळ गेला असता. तोपर्यंत बरेच काही होऊन बसले असते.

आजही विकसित मानल्या गेलेल्या, म्हणजे मुख्यतः श्रीमंत राष्ट्रांमध्ये नव्या लागणीचे प्रमाण कमी झाले आहे. आता होणाऱ्या नव्या लागणींपैकी ९०-९५% तिसऱ्या जगातल्या राष्ट्रांमध्येच होत आहेत. ह्यात आफ्रिकेचा क्रमांक आघाडीवर आहे, पण आपणही पाठोपाठ आहोतच. खरे म्हणजे आफ्रिकेच्या तुलनेत समाजातली लागणीची स्थिती आपल्याकडे फारच अल्प आहे. पण विशाल लोकसंख्येमुळे हे अल्प प्रमाणही मोठी संख्या निर्माण करते. जगातील एकूण एच.आय.व्ही. बाधितांपैकी दहा टक्के आपले आहेत. जगात सुमारे ५ ते ६ कोटी बाधित आहेत असे जैवसंख्याशास्त्राने वर्तवले आहे.

एच.आय.व्ही. बाधित व्यक्तीच्या शरीरातून शरीरस्रावांच्या अदलाबदलीतून दुसऱ्या शरीरात पोहोचतो. अशी अदलाबदल फक्त रक्त आणि लैंगिक स्रावांचीच खऱ्या अर्थाने घडते, आणि त्यातूनच रोगाची लागण संभवते. नव्या सजीव रचना शरीरात आल्यावर ते शरीर ‘ही कोण नवी वस्तू ?’ असे म्हणून आपला विरोध दर्शविणाऱ्या प्रतिपिंडांची निर्मिती करते. पण हा विरोध ह्यापलिकडे काही घडवत नाही. एच.आय.व्ही. स्वतःची प्रजा वाढवून प्रतिकारशक्ती घटवायला सुरुवात करतो. पण ह्या कामाला त्याला चांगली ७-८ वर्षही लागतात. कधीकधी तर त्याहूनही जास्त. ह्या प्रतिपिंडाच्या अस्तित्वाचा फायदा आपण तपासणी करताना घेतो. प्रत्यक्ष विषाणू तपासण्यापेक्षा प्रतिपिंडे शोधणे सोपे आणि स्वस्त पडते.

ह्या माहितीचा धागा जर आपण लेखाच्या सुरुवातीच्या प्रसंगाशी जोडला, तर आपल्याला जाणवेल की १९७९ साली दिसलेले पहिले रुग्ण त्याआधी साताठ वर्षे म्हणजे १९७२ पासून ह्या रोगाची बाधा रक्तात हिंडवत होते. नकळत स्रोतांच्या अदलाबदलीतून पसरवतही होते.

बरे तर बरे, हा विषाणू तसा नाजूक आहे, उघड्या हवेत, उष्णतेत तो टिकत नाही, शिवाय अगदी लैंगिक संबंधातूनही तो पसरण्याची शक्यता एखादा टक्काच आहे. अगदी बाटलीभर बाधित रक्तच भरले गेले तर लागण होण्याची बरीचशी खात्री. तीही १००% नाही, थोडी कमीच असते. बाधित मातेच्या उदरात, तिच्या रक्तावर वाढणाऱ्या बाळालाही एच.आय.व्ही.ची बाधा सरासरी २५-३० टक्क्यांइतकीच आहे. तिथे इंजेक्शनच्या सुईच्या टोकावरून किंवा पोकळ भागात राहून गेलेल्या रक्ताच्या चुकार थेंबांमधून कितीशी लागण होण्याची शक्यता असणार, तर अगदीच थोडी. हजारात ३ ते ४, फारतर. गंमत म्हणजे ह्या चार मार्गाशिवाय तो आणखी कसाही पसरूच शकत नाही. ही फार फायद्याची गोष्ट आहे. हा विषाणू जरा दणकट, आणि पसरापसरीत तरबेज असता तर ? यूँ होता, तो कैसा होता!

असो. हे सांगण्याचे कारण असे की पसरायला वेळ मिळूनसुद्धा एच.आय.व्ही. भराभरा पसरला नाही. तसा हळूहळूच पसरत राहिला.

आंतरराष्ट्रीय आवकजावकीचे एकंदर प्रमाण पाहता आपल्या देशात यायला त्याला फार वेळ लागणार नव्हता. तो येणारच होता, पसरणारच होता. हे समजायला समाज-आरोग्य-तज्ज्ञांचीही खरे म्हणजे गरज नाही. कुणीही समजदार माणूस हे ओळखू शकेल. पण आपल्या देशात तसे झाले नाही. १९-२-८३ पासून जगभर ह्या साथीबद्दल घनघोर चर्चा, बैठका, परिषदा, संशोधने सगळे सुरू होते तरी एक पत्नीव्रती रामाचा आदर्श ठेवणाऱ्या भारतीय समाजाला ही साथ गाठूच शकणार नाही, असे तेव्हा निर्णयकर्त्यांसह बहुसंख्यांचं मत होतं. काहीच लोक तेव्हाही ह्या मताला विरोध करत होते, पण त्यांचा आवाज ऐकूही न जाण्याइतका तुलनेने कमी होता.

खरे पाहता लिंगसांसर्गिक रोगांचे प्रमाण २ ते ३% इतके होते, तिथे एच.आय.व्ही. नेच काय पाप केलेले असणार! असो, व्हायचे ते झालेच. १९८९ साली देशातच लागण झालेली पहिली बाधित स्त्री ‘सापडली’. ही शरीरविक्रय करणारी स्त्री होती. मग विषाणूंचा विचार सोडून जणू ह्या स्त्रियांनाच रोगाचे कारण मानण्यात आले. आणि त्या व्यवसायाला माध्यम. मग, मलेरियाचा जंतू जसा डासांच्या माध्यमातून आपल्या शरीरात पोचतो, तसे एड्स आजार शरीरविक्रयाच्याच माध्यमातून पोचणार असे मानले गेले. म्हणजे लागण झालेला पुरुष हा ‘तसले नाद’ असलेला, आणि बाई तर स्वतःच शरीर विक्रय करणारी ठरली. वाचकांना माझी भाषा कदाचित लेखणीला धार लावून लिहिलेली वाटेल, पण १९८९ नंतर मुंबईतल्या शरीरविक्रयी स्त्रियांची सक्तीने तपासणी करून त्यातल्या बाधित स्त्रियांना खास गाडी करून मूळ गावी धाडून देण्यात आले होते आणि ह्यामुळे मुंबई स्वच्छ झाली असेही मानले होते. हे कळल्यापासून मला लोकशाही न्याय, समता हे शब्द उच्चारण्याचा तरी आपल्याला अधिकार आहे का, असा प्रश्न पडतो.

ह्यापेक्षा देशातल्या रक्तसाठ्यात एचआयव्ही शिरलेला नाही ना, एवढे तर तपासता आले असते. रक्त अशा प्रकारे तपासले जाण्याचा निर्णय १९८९-९० साली आला आणि सुमारे १९९१ पासून त्याची कार्यवाही सुरू झाली.

पहिली सापडलेली स्त्री शरीरविक्रयी होती, असे का घडले असेल ? कोणतीही साथ पसरत असताना त्या त्या रोगाच्या प्रसाराच्या मार्गाच्या दृष्टीने जास्त जोखमीची वागणूक जिथे जास्त, तिथे धोका जास्त असणार, तिथे जास्त पसरणार. साधे उदाहरण उवांचे घेऊ. उवांच्या स्वच्छंद हिंडण्यासाठी लांब केस सोयीस्कर, आणि एकमेकींच्या डोक्याला डोके लावून सहज जवळीकीनी वागणे शाळकरी वयात जास्त घडते, असे मानले तर शाळेच्या वर्गात एकीच्या डोक्यात कुठूनतरी उवा आल्या की पुढे वर्गभर त्यांचा प्रसार होताना दिसतो. मग ह्या शाळकरी मुलीने घरी येऊन आईला मिठी मारली, कुशीत झोपली की लांब केसांच्या आईकडे ही लागण जाते, आणि पुढे कदाचित आईकडून बाबाकडेही. पण तिथे बरेचदा लांब केस नसतात. क्वचित टक्कल असते, त्यामुळे उवांना तिथे पुरेसा थारा मिळत नाही. म्हणून हा कमी जोखमीचा गट मानता येईल.

अनेक साथींच्या प्रसारात असे जास्त जोखमीचे समाजगट, कमी जोखमीचे समाजगट आणि ह्यांना जोडणारे साकव गट दिसतात.

अशाच प्रकारे एच.आय.व्ही.च्या साथीतल्या जास्त जोखमीच्या गटात असतात शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया. म्हणून ह्यांना साथीचा पहिला टप्पा मानतात. अर्थात ह्या टप्प्याकडे कुठूनतरी लागण आलेलीच असते. त्यानंतरचा साकव गट असतो त्यांच्याकडे येणारे गि-हाईक. हा साथीचा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा कमी जोखीम गट म्हणजे ह्या पुरुषांच्या घरच्या स्त्रिया. त्यांच्या बायका.

ह्या तिसऱ्या टप्यानंतचा चौथा टप्पा म्हणून बाधित गर्भवतीकडून तिच्या बाळाला होणारी लागण मानली जाते. त्यामुळे जेव्हा बालकांमध्ये एच.आय.व्ही. दिसायला लागला, तेव्हा आता साथ चौथ्या टप्प्यावर पोचली असे म्हटले जाते. ह्यात शरीरविक्रयाच्या व्यवसायी स्त्रीच्या बाळालाही लागण होऊ शकते तेव्हा त्यादृष्टीने चौथा टप्पा आधीच सुरू झालेला आहे. पण त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. ती मुळातच समाजाला नकोशीच मुले असतात.

आज भारतातल्या सर्व राज्यांमध्ये ही एच.आय.व्ही.ची साथ पोचलेली आहे, पण काही राज्यांमध्ये प्रमाण जास्त आहे. तिसऱ्या टप्प्यावरची साथ-गर्भवती स्त्रियांमध्ये बाधितांचे प्रमाण तपासून बघता येते. हे प्रमाण जेव्हा एक टक्क्याहून जास्त होते तेव्हा त्या राज्याला किंवा विभागाला जास्त लागणीचा भाग म्हणतात.

तामिळनाडू, महाराष्ट्र, आन्ध्र, कर्नाटक, मणीपूर आणि नागालँड ही सहा राज्ये अशा प्रकारे ‘जास्त लागणीची’ मानली गेली आहेत. इतर राज्यांमध्ये साथ कमी का फोफावली ? असा एक साहजिक प्रश्न इथे मनात येतो. ह्याचे संपूर्ण उत्तर जरी समजलेले नसले, तरी काही अंदाज बांधलेले आहे.
१) ही सहा राज्ये जात्यात आहेत, तर इतर सुपात. मुद्दा फक्त काळाचा आहे. २) कदाचित काही जनुकीय कारणे ह्यामागे असू शकतील, त्यासाठी संशोधन व्हायला हवे. इत्यादी.

तर ही परिस्थिती पाहताना दोन गोष्टींचा विचार करावा लागतो. १) ह्या साथीमुळे इतर काही परिणाम समाजावर, आरोग्य व्यवस्थेवर होतील का, आणि त्यांना कोणते उत्तर शोधता येईल. २) ह्या साथीला थोपवण्यासाठी काय करता येईल.

आरोग्यव्यवस्थेवर, समाजावर एच.आय.व्ही.च्या साथीने अनेक परिणाम केले आहेत. एच.आय.व्ही.मुळे प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने इतर अनेक रोगांना नव्याने आमंत्रण मिळते. क्षयरोगासारख्या साथीला आळा घालण्यासाठी आपल्या देशात अनेक प्रयत्न झाले. त्यांना काही प्रमाणात यशही मिळत होते. हे यश ही नवी साथ काढून घेते आहे. एच.आय.व्ही. बाधितांपैकी साठ टक्के लोकांमध्ये कधी ना कधी क्षयरोग बळावतो.

बालमृत्यूचे प्रमाण आपण कमी करत आणले आहे. साथीच्या चौथ्या टप्प्याने हे यशही कमी होण्याची शक्यता आहे.

अधूनमधून येत राहणाऱ्या जुलाब, विषमज्वर, मलेरिया, इ. अनेक साथीचा काळ वाढून त्या रेंगाळत राहण्याची शक्यता ह्या साथीसोबतीने येते. ही साथ विशेषत्वाने तरुण समाजात पसरणारी असल्याने आणि उपलब्ध उपचार सर्वत्र मिळत नसल्याने ‘मरणाचे वय’ लवकर येण्याची शक्यता वाढते. आपली आरोग्यव्यवस्था एरवीच आपल्या आकारमानाच्या,लोकसंख्येच्या तुलनेत बरीच अपुरी आहे, ह्या नव्या प्रश्नाने तिच्यावर अनन्वित बोजा पडतो आहे.

दुसरा मुद्दा साथीला थोपवण्याचा. कोणत्याही साथीला थोपवत असताना सामान्यपणे तीन प्रकारे प्रयत्न करतात.

१) साथ वाढवणारी किंवा जंतूंच्या प्रसाराला कारणीभूत असणारी व्यवस्था बदलून, अधिक सुरक्षित व्यवस्था आणणे. म्हणजे जुलाबाच्या साथीला रोखण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा किंवा ते शक्य नसेल तर निदान पाणी उकळून पिण्याची सूचना देणे आवश्यक आहे.
२) साथ ज्यांच्यापर्यंत आता पोचलेली आहे, त्यांच्यामध्ये आजार वाढू नये म्हणून उपचार तसेच शक्य असेल तर रोगाचा समूळ नष्ट करणारी औषधे देणे, इतर आवश्यक सेवा पुरवणे.
३) शक्य असेल तर लसीकरण करून रोगाची शक्यता कमी करणे.

ह्या तीन मुद्द्यांशिवाय जनजागरणाचाही मुद्दा असतोच. साथीचा फेरा पुन्हा पडू नये, ह्या दृष्टीने समाजाची साथ मिळण्यासाठी प्रयत्न करणे.

एच.आय.व्ही.-एड्सच्या साथीचा विचार करताना ह्यामध्ये अनेक बंधने संभवतात. पहिली गोष्ट म्हणजे, शरीरातील विषाणूंना समूळ नष्ट करणारी औषधे, आणि लस ह्या दोनही गोष्टी अद्याप संशोधनाच्याच पातळीवर आहेत. इतकेच नाही तर त्या संशोधनांनाही नजरेच्या टप्प्यात यश अद्याप दिसलेले नाही. जंतुप्रसाराला कारणीभूत व्यवस्था बदलताना आपण ह्या प्रसाराचे जे चार मार्ग आहेत तेच कसे थांबवू शकतो, ह्याचा विचार करू. लागणीची सर्वोच्च शक्यता असलेला रक्त भरण्याचा मार्ग थांबवणे तुलनेने सोपे. अतिशय सतर्क जबाबदारीने रक्तपेढ्यांनी रक्ततपासणी केली तरी हे साधू शकते. रक्तदात्यांसाठी त्यासोबतीने समुपदेशनाची सोय ठेवली. माहिती देणाऱ्या, पण पहाव्याशा वाटणाऱ्या चित्रपट्टिका दाखवल्या, तरीही भागेल आणि आजही ह्यातल्या किमान गोष्टी होत आहेतही, त्यामुळे रक्तसंक्रमणातून होणारी लागण बरीच आटोक्यात आली आहे.

जंतुप्रसाराची शक्यता १% इतकीच म्हणजे तुलनेने कमी असली तरी आजवरच्या प्रसारातला सर्वाधिक वाटा आहे तो लैंगिक मार्गाने होणाऱ्या प्रसाराचा. साधे तर्कशास्त्र लावले तरी ह्या प्रश्नाचे उत्तर लागण झालेल्या व्यक्तीशी संबंध न ठेवण्यापर्यंत जाते. मुद्दा हे कसे कळणार, एवढाच असतो. ह्यासाठी खरेखुरे दोन स्पष्ट मार्ग आहेत. आपल्याला माहीत असो नसो, निरोध वापरला की झाले. आणि दुसरा विश्वासाच्या जोडीदारासोबतच संबंध ठेवण्याचा. दोन्ही मार्गांना मर्यादाही आहेत. प्रत्येकवेळी निरोध वापरणे अनेक कारणांनी शक्य नसते. निरोध ही वस्तू फाटू शकते. निरोध वापरण्या न वापरण्यावर स्त्रियांचे नियंत्रण असू शकत नाही. त्यामुळे यौन संबंध जबजब कंडोम तबतब असे म्हणून हा प्रश्न संपत नाही. विश्वासाचे नाते ही तर मुळीच सोपी गोष्ट नाही. लग्नाचे संबंध हे विश्वासाचे असतात, असेही नाही. त्यामुळे ह्या दोन्ही मार्गांचा शक्य तेवढा आणि शक्य तिथे वापर करावा येवढेच आपण म्हणू शकतो.

धारदार उपकरणे, सुया वगैरेंमधून लागणीची शक्यता मुळांत अगदी नगण्य असते. वापरापूर्वी उपकरणे, सुया निर्जंतूक करणे ही प्राथमिक दक्षता घेतली तरी पुरे. आरोग्यसेवा देणाऱ्यांना स्वतःला अपघाताने अशी लागण होईल अशी फार भीती वाटते, पण त्यातही तथ्य फारच थोडे आहे. अशा प्रसंगी ज्या दक्षता घ्याव्या लागतात, त्या एच.आय.व्ही.च्या साथीपूर्वीपासूनच वापरात आहेत. त्यांना सार्वत्रिक दक्षता असेच म्हणतात. त्याउप्पर अपघाताने सुई किंवा उपकरण सेवा देणाऱ्याच्या हातात घुसलेच आणि रुग्णाला लागण असल्यामुळे तशी धास्ती वाटलीच, तर ती धास्ती कमी करणारीही औषधे उपलब्ध आहेत. आईकडून बाळाला होऊ शकणारी लागण हा एक विचित्र प्रश्न. कारण ह्या मार्गाने होणाऱ्या लागणीची जराही शंका आईला नसली तर ती त्यावर नियंत्रणही ठेवू शकत नाही. पण आजच्या काळात प्रत्येक गर्भवतीची एच.आय.व्ही.साठी तपासणी करून जर लागण असल्याचे समजले तर तिच्या हाती पर्याय राहू शकतात.

समजा तिला तो गर्भ वाढवायचा असेल तरीही लागणीची शक्यता अगदी नाममात्र उरेल अशी उत्तम औषधे आज उपलब्ध आहेत. काही दक्षता, काही निर्णय आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली औषधांचा वापर ही ह्या प्रश्नाची गुरुकिल्ली आज उपलब्ध आहे. समाजातला प्रसार रोखण्याचे हे मार्ग आहेत, तसेच बाधित व्यक्तीच्या शरीरातील विषाणूंची वाढ रोखणारी औषधेही आहेत. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आलेल्या संधीसाधू आजारांनाही औषधे आहेत.

म्हणजे आपण ठरवले तर हा एच.आय.व्ही.चा प्रश्न आटोक्यात आणू शकतो. पण असे घडत मात्र अद्याप नाही. भारतातली साथ सुरू होऊन वीस वर्षे झाली, तरीही म्हणावा तितका यशाचा प्रसाद हाती पडलेला नाही. ह्याचे पहिले अपश्रेय मायबाप सरकारडे जाते. त्यांनी प्रथम दुर्लक्ष केले, नंतर चुका केल्या. ह्या प्रश्नाचा आवाका इतर क्षेत्रांना दिला नाही, त्यामुळे त्यांनीही चुकांमध्ये भर घातली. उदा. न्यायसंस्थेने काही विचित्र, भयंकर निर्णय दिले. हा सगळा स्वतंत्र लेखाचा विषय आहे, पण आजही ह्या परिस्थितीत अत्यंत हळू बदल होतोय. अद्याप गर्भवती स्त्रियांसाठीचे कार्यक्रम गावपातळीपर्यंत पोचलेले नाहीत. शरीरातल्या विषाणूंची वाढ रोखणारी औषधे आहेत, पण ती गरजूंपर्यंत पोचत नाहीत.

दुसरा भाग माध्यमांच्या पारड्यात जातो. प्रत्येक गोष्ट सनसनाटी करण्याच्या नादात त्यांनी अनेक गैर गोष्टी केल्या. एड्सचे नाते वेश्याव्यवसायाशी, आणि लग्नबाह्य संबंधांशी जोडले. त्यामुळे समाजमनात एच.आय.व्ही. हा अनीतीचा परिणाम असे समीकरण रुजले. आजही एच.आय.व्ही.च्या प्रसाराचे मार्ग कोणते असे विचारले की एक उत्तर अनैतिक संबंधातून असे येते. गंमत म्हणून सांगते. मी आत्ता करत असलेल्या एका प्रकल्पात ५५० बाधित गर्भवती स्त्रिया आहेत. ह्यातल्या ९०% स्त्रियांना पतीकडून लागण झाली, हे पतीच्या रोगपातळीवरूनही कळते. ह्या स्त्रिया शरीरविक्रयीही नाहीत, आणि त्यांनी समाजदृष्टीने अनैतिक कृतीही केलेली नाही. पण त्यांना आपल्या लागणीबद्दल इतर आजारांबद्दल बोलता यावे तसे सहज बोलता येणार नाही. त्या आजार लपवण्याचा प्रयत्न करणार, त्यांना उपचारही शोधण्याची मोकळीक मिळणार नाही. एच.आय.व्ही.च्या खऱ्या खोट्या धास्तीनेही जेव्हा लोक घाबरतात, तेव्हा मृत्यूच्या भीतीपेक्षाही जास्त समाज नाकारेल ही असते. काही मग घाबरून मृत्यू जवळ करतात. माध्यमे मग ही बातमीही सनसनाटीपणे प्रसिद्ध करतात.

समाजमनात ह्या आजाराबद्दल घृणेची भावना आहे. हा आजार गरीब-अशिक्षित आणि त्यामुळे असंस्कृत ठरवलेल्यांना होतो असाही समज आहे. प्रत्यक्षात असे दिसत नाही. तेही साहजिकच आहे. कारण एच.आय.व्ही.ला रस्ता मिळाला, तर तो दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. धर्म, शिक्षण, लग्न अशा निकषांना तेथे काहीच स्थान नाही.

`ह्या दूषणांमुळे बाधित लोक जगण्याची आशा सोडतात, साहाय्य मिळवण्याचाही प्रयत्न करत नाहीत. ह्या विषयाचे कुणी तज्ज्ञ तुम्हाला माहीत आहेत का?’ असा एरवी मधुमेह, कॅन्सर वगैरेंमध्ये सहज विचारावा तो प्रश्नही विचारू धजत नाहीत. आडून आडून चौकशी करायची. वर्तमानपत्रातल्या जाहिराती बघायच्या. समाजाच्या ह्या असुरक्षित वागण्याचा नेमका फायदा काही भोंदू उठवतात. ‘आम्ही एच.आय.व्ही. बरा करतो’ अशी जाहिरात करतात. (खरे म्हणजे कुणाही वैद्यकशास्त्र-तज्ज्ञाला स्वतःची अशी जाहिरात करायला कायद्याने बंदी आहे.) मग ह्या जाहिरातींना लोक फसतात. कारण त्यांना दुसरा कुठला पर्यायच दिसत नसतो.

एच.आय.व्ही.-एड्स ह्या रोगाला मोठी सामाजिक बाजू आहे आणि वैद्यकीय उपचारांसोबत तीही ध्यानी ठेवावी लागणार आहे. त्याचबरोबर तो वैद्यकीय प्रश्न असल्यामुळे वैद्यकशास्त्र-तज्ज्ञांच्या मतांना, वागणुकीला आणि उपचारकौशल्याला इथे फार महत्त्व आहे.

आणि त्या भागात कमतरताही फार मोठी आहे. एकतर ही साथ फारच नवी असल्याने वीस वर्षांपूर्वी शिक्षण घेतलेल्यांना त्या साथीबद्दल माहिती देण्याची जबाबदारी शिक्षणव्यवस्थेने घेतलेली नाही. माहीत नसलेली गोष्ट जाणून घेण्याइतका वेळ नाही. मग अामुा माहितीवर भलतेच सल्लेही दिले जातात. चुकीची औषधे दिली जातात, मृत्युपत्र करा आता, असे म्हटले जाते, गर्भवती बाधित मातेचा गर्भ तिच्या मनाविरुद्ध अक्षरशः बळजबरीने पाडला जातो. कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रियाही करून टाकली जाते. हेही बरे म्हणायची पाळी येते, कारण दवाखान्यात शिरलेल्या रुग्णाला तो बाधित आहे हे कळल्यावर शिवीगाळ, धक्के मारूनसुद्धा बाहेर काढले जाते. उपचार दिले जात नाहीत. अगदी अर्ध्या बाळंतपणात अडकलेल्या बाईलाही हॉस्पिटलमध्ये शिरू दिले जात नाही.

अशा अनेक कारणांनी शक्य असूनही एच.आय.व्ही. च्या साथीचे आह्वान आपण अद्याप पुरेसे पेलू शकलेलो नाही. ह्याखेरीज गरिबी, धकाधकीची जीवनपद्धती, पुरुषप्रधानताः शिक्षणाचा अभाव, आह्वानाच्या तुलनेत अशक्त आरोग्यव्यवस्था अशा कारणांनीही आपापले मापटे प्रश्नाला गंभीर करण्यासाठी ओतलेलं आहेच.

लेखाच्या शेवटच्या परिच्छेदाशी येताना काही सूचना मांडते. मानव जात एच.आय.व्ही.ला हार जाणार नाही हे निश्चितच पण तरीही आपले प्रयत्न वेगवान झाले नाहीत, तर न भरून येण्याजोगी हानी मात्र पदरात पडेल, आणि तीही दुर्दैवाने तिसऱ्या जगाच्या. आणि एच.आय.व्ही. हे काही शेवटचे संकट नाही. यानंतरही अशाच प्रकारचे नवे रोग येणे अगदी शक्य आहे, हे आपण सर्वांनी ध्यानी धरले पाहिजे. कायद्याने, घृणेने, वेगळे काढून जगातली कुठलीही साथ आटोक्यात आलेली नाही. ह्यासाठी एच.आय.व्ही. एड्स ह्या प्रश्नाचा मोकळेपणाने विचार करून सजग सक्षमपणे तोंड द्यायची तयारी असली तर एक कणभराचा अशक्त विषाणू आपण सहज हरवू शकू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.