स्त्री भ्रूणहत्याः कोल्हापुरातले वास्तव (भाग १)

[अमृता वाळिंबे यांनी मालतीबाई बेडेकर अभ्यासवृत्ती २००५-२००६ वापरून केलेले संशोधन आम्हाला प्राप्त झाले. त्याचा जुजबी संक्षेप करून आम्ही काही भागांमध्ये ते संशोधन प्रकाशित करीत आहोत. या प्रकारचे संशोधन महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकरिता व्हायला हवे.]

कोल्हापूर. अनेक अर्थांनी समृद्ध म्हणवला जाणारा महाराष्ट्रातला एक जिल्हा. सहकारी चळवळींचा भक्कम पाया, त्यातून आलेली आर्थिक सुबत्ता, लघुउद्योगाचे पसरलेले जाळे, शिक्षणासारख्या सामाजिक सोयी-सुविधा, आणि या साऱ्याच्या मुळाशी असलेला शाहू महाराजांपासून चालत आलेला सत्यशोधकी-पुरोगामी विचारांचा वारसा; अशी भरभक्कम पार्श्वभूमी या कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली आहे. पण इथल्या समृद्धीपल्याडचे भीषण वास्तवही आता समोर येऊ लागले आहे; ते स्त्रीभ्रूणहत्येच्या रूपाने. जनगणनेचे अहवाल पाहिले तर असे दिसते की, गेल्या काही वर्षांमध्ये अख्ख्या भारतातच मुलींचे प्रमाण कमीकमी होत चालले आहे. एकीकडे सरंजामी व्यवस्थेतली पुरुषप्रधान मानसिकता आणि दुसऱ्या बाजूला सोनोग्राफी मशीन्ससारखे आधुनिक भांडवली तंत्रज्ञान यांचा संगम होऊन स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढत असल्याचे भारतभरात दिसत आहे. यातूनच शून्य ते सहा वयोगटातल्या मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत प्रचंड घसरत चालले आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार भारतात दर हजार मुलांमागे ९४५ मुली होत्या. २००१ मध्ये हे प्रमाण ९२७ पर्यंत खाली घसरले. त्यातही पंजाब, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र अशा समृद्ध राज्यांमध्ये लोकसंख्येचा समतोल ढासळत चालल्याचे विशेषकरून नोंदवले गेले.

महाराष्ट्रात १९९१ च्या जनगणनेनुसार दरहजार मुलांमागे ० ते ६ या वयोगटात ९४६ मुली होत्या. २००१ मध्ये मात्र ते प्रमाण ९१७ पर्यंत खाली घसरल्याचे दिसून आले. महाराष्ट्रातल्या समृद्ध पट्ट्यात गर्भलिंगनिश्चितीचे आणि स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढत चालल्याचे या आकडेवारीने स्पष्ट केले. महाराष्ट्र शासनाने २००२ साली मानवविकास अहवाल प्रसिद्ध केला. त्यातही कोल्हापूरसारख्या प्रगत जिल्ह्यांसमोरचा गंभीर प्रश्न म्हणून स्त्रियांच्या घटत्या संख्येचा उल्लेख करण्यात आला. आजघडीला तर कोल्हापुरातले स्त्री-पुरुष प्रमाण धक्कादायक म्हणावे इतके कमी आहे. १९९१ साली ० ते ६ वयोगटात दरहजार मुलांमागे कोल्हापुरात ९३१ मुली होता. मधल्या दहा वर्षांत समतोल आणखी ढासळला. २००१ च्या जनगणनेत हे प्रमाण दरहजार मुलांमागे ८५९ इतके खाली आले. महाराष्ट्रातल्या कुठल्या तालुक्यांमध्ये स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न तीव्र होतो आहे, याचाही अभ्यास करण्यात आला. त्यातून नऊ तालुक्यांची नावे पुढे आली. या नऊ नावांमध्ये पन्हाळा, करवीर, कागल आणि राधानगरी या कोल्हापुरातल्या चार तालुक्यांचा समावेश आहे. १९९१ ते २००१ या दशकात कोल्हापुरातल्या या चार तालुक्यांमधले मुलींचे प्रमाण वेगाने घटल्याचे दिसून आले आहे. राधानगरीत दरहजारी मुलांमागे त्या वयोगटात १९९१ साली ९६० मुली होत्या. २००१ मध्ये ते प्रमाण दरहजारी ८५५ वर आले. कागल तालुक्यातले मुलींचे प्रमाण दहा वर्षांत दरहजारी ९२५ वरून ८१६ पर्यंत उतरले. पन्हाळा, करवीर तालुक्यांनी तर कळस गाठला. करवीरमध्ये १९९१ साली त्या वयोगटात ९०५ मुलींची दरहजार मुलांमागे नोंद झाली होती. पण २००१ च्या आकडेवारीत इथले दरहजार मुलांमागचे मुलींचे प्रमाण ८०३ पर्यंत खाली घसरले. पन्हाळा तालुक्यातले मुलींचे प्रमाण गेल्या दशकभरात ९३१ वरून थेट ७९५ वर उतरले. कोल्हापूर जिल्ह्याच्या समृद्धीत भर घालणाऱ्या या तालुक्यांनी स्त्रीभ्रूणहत्येतही आपापला वाटा उचलल्याचे स्पष्ट झाले. ते या आकडेवारीतून.

१) भारतातील ‘पुढारलेली-मागास’ राज्ये
(० ते ६ वयोगटातील दरहजारी मुलग्यांमागचे मुलींचे प्रमाण)

राज्य

१९९१

२००१

फरक

पंजाब ८७५ ७९३ ८२
हरियाणा ८७९ ८२० ५९
गुजरात ९२८ ८७८ ५०
महाराष्ट्र ९४६ ९१७ २९

२) महाराष्ट्रातील ‘पुढारलेले-मागास’ जिल्हे

जिल्हा

१९९१

२००१

फरक

सांगली ९२४ ८५० ७४
कोल्हापूर ९३१ ८५९ ७२
अहमदनगर ९४९ ८९० ५९
जळगाव ९२५ ८६७ ५८
सातारा ९४१ ८८४ ५७
औरंगाबाद ९३३ ८८४ ४९

३) कोल्हापुरातील ‘पुढारलेले-मागास’ तालुके

तालुका

१९९१

२००१

करवीर ९०५ ८०३
पन्हाळा ९३१ ७७५
कागल ९२५ ८१६
राधानगरी ९६० ८५५

(संदर्भः जनगणना आकडेवारी १९९१ आणि २००१)

कोल्हापुरातल्या या वस्तुस्थितीने स्त्रीभ्रूणहत्येचे अक्राळविक्राळ स्वरूप आपल्यापुढे ठेवले आहे. स्त्रीभ्रूणहत्येच्या मुद्द्याशी आपले लक्ष वेधले आहे ज्याच्याशी अनेक गंभीर सामाजिक प्रश्न जोडलेले आहेत. समाजातल्या मोठ्या वर्गाला मुली जन्माला येऊ नयेत असे का वाटते? समाजाची अवस्था बदलली, स्थित्यंतरे झाली, तरी मानसिकता का बदलत नाही? सरंजामी व्यवस्थेतली गुलामगिरी शोषणाची मानसिकता आणि भांडवली व्यवस्थेतली वस्तूकरणातून शोषणाची मानसिकता, त्यातून प्राप्त होणारे दुय्यम स्थान, याचा स्त्रीभ्रूणहत्येशी नेमका कसा संबंध आहे? अशा प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे आहे. हे शोधताना स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्यासाठी काय करता येईल, याचाही विचार करणे महत्त्वाचे ठरणार आहे. नेमक्या याच अनुषंगाने ‘मुलगी झाली हो…’ हा अहवाल तयार करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रातिनिधिक अभ्यास करून स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाचे कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न या अहवालाद्वारे करण्यात आला आहे.

स्त्रीभ्रूणहत्याः डॉक्टरी व्यवसायाशी नाळ
स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न डॉक्टरी व्यवसायाशी अगदी थेटपणे जोडलेला आहे. भारतातले काही डॉक्टर ‘कार्यकर्ते’ बनून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातले काही जण आपापल्या परीने अभ्यास करीत आहेत. मांडणी करीत आहेत. काही खुलेपणाने संघर्ष छेडीत आहेत. या प्रश्नासंदर्भातली त्यांची निरीक्षणे, मते समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे. डॉ. पुनीत बेदी (दिल्ली): गर्भलिंगचिकित्सा हा दिल्लीमधला एक अत्यंत सुसंघटित आणि थोडा थोडका नव्हे तर वर्षाला तब्बल पाचशे कोटी रुपयांचा व्यवसाय बनला आहे आणि आजवर (२००३ पर्यंत) एकाही डॉक्टरवर कारवाई करण्यात आलेली नाही. खरेतर, शंभरातले नव्वद डॉक्टर चांगले असतात. जेमतेम दहा वाईट असतात. पण नव्वद डॉक्टर दहांच्या विरुद्ध कधी बोलत नाहीत. भूमिका घेत नाहीत. आवाज उठवत नाहीत. हीच खरी वाईट गोष्ट आहे. गर्भलिंगनिदानासारख्या गोष्टी करण्यामागे डॉक्टरांची पैशाची हाव कारणीभूत आहे. या गोष्टी झटपट पैसे मिळवून देणाऱ्या आहेत. एरवी पॅक्टिस चांगली चालणे वेळ खाते. अलीकडच्या काळात डॉक्टरांना तेवढे थांबायचे नसते. आपण काय करतो आहोत, याचे पूर्ण भान त्यांना असते. खरेतर म्हणूनच त्यांना बदलणे कठीण आहे. गर्भलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरांबाबत, स्त्रीभ्रूणहत्येत सहभागी होणाऱ्या डॉक्टरांबाबत कठोर कारवाई व्हायला हवी. डॉक्टरांच्या संस्थांनी जागल्याची भूमिका घ्यायला हवी. पण तसे होत नाही. उलट अपराध्यालाच संरक्षण दिले जाते. याला काय म्हणायचे ? (डॉ. पुनीत बेदी हे दिल्लीतले एक स्त्रीरोग व प्रसूतिरोगतज्ज्ञ आहेत. व्यावसायिक निष्ठा जपणारे डॉक्टर अशी त्यांची ख्याती आहे. गर्भलिंगचिकित्सा आणि स्त्रीगर्भहत्येच्या विरोधात ते हिरिरीने काम करत आहेत. पण याचा परिणाम म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञांच्या संघटनेतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली.) डॉ. कामाक्षी भाटे (मुंबई): पूर्वी अल्ट्रासाउंड मशीन्स नव्हती. तेव्हा अनेक ठिकाणी ॲम्निओसेंटेसिस म्हणजे गर्भजलपरीक्षण करून गर्भाचे लिंग ओळखत. या गोष्टीला मोठा विरोध झाला. पण त्यावेळी डॉक्टरांची एक लॉबी खूपच प्रभावशाली होती. या लॉबीने गर्भजलपरीक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली. “या वेड्या स्त्रीमुक्तीवाल्यांना काही कळत नाही. तुम्हाला वास्तव माहीत नाही.

‘हे सांगण्याचे आणि त्यानसार निवड करण्याचे स्वातंत्र्य स्त्रीला हवे.’ असे त्यांचे म्हणणे होते. हे म्हणणे खोडून काढावे लागले. दरम्यान लोकसंख्यातज्ज्ञांनीही मुलींची संख्या कमी होणे हे समाजाच्या दृष्टीने कसे घातक आहे हे दाखवून दिले होते. पुढे गर्भजलचिकित्सेविरुद्ध कायदा झाला. मग गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानतंत्राविषयीचाही कायदा आला. कायदा झाल्यावर सगळे सुरळीत होईल, असे मानले जात होते. पण तसे दिसत नाही. लोकांची इच्छा आणि डॉक्टरांना पैसे कमवण्याची संधी अशा दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. (डॉ. कामाक्षी भाटे या मुंबईतल्या स्त्रीरोगतज्ज्ञ. ‘फोरम फॉर विमेन्स हेल्थ’ या गटाच्या सदस्या. गर्भजलचिकित्से-विरोधातल्या चळवळीत यांचा सहभाग होता.)

डॉ. नीलम सिंग (लखनौ): गर्भलिंगनिदानाच्या विरोधात लखनौच्या डॉ. नीलम सिंग सक्रिय आहेत त्यांच्या मते, पहिली मुलगी झाली तर पेशन्ट ती स्वीकारतात. पण दुसऱ्यावेळी मात्र बहुतेकांना मुलगाच हवा असतो. अशावेळी निदानचाचणी करून घेणे त्यांना चुकीचे वाटत नाही. नीलम सिंग सांगतात की, “१९९१ ते १९९५ या काळात डॉक्टर म्हणून पेशन्टच्या आग्रहावरून स्त्रीगर्भ असलेले गर्भपात मी केले. त्यावेळी अशा गोष्टी करणे हा अत्यंत तांत्रिक भाग वाटायचा. मी जागरूक नव्हते. पुरेशी संवेदनशीलही नव्हते. त्यावेळी कायदाही नव्हता. पण एकदा स्त्रीभ्रूणहत्येमागची भयानकता लक्षात आल्यावर मात्र मी हे गर्भपात करणे पूर्णपणे थांबवले. गर्भलिंगनिदानाच्या विरोधात जाणीवजागृती करण्यासाठी ‘वात्सल्य’ नावाची संस्था काढली. ‘वात्सल्य’च्या कामामुळे लखनौमध्ये साठ सोनोग्राफी केंद्रांपैकी दोनच गर्भलिंगनिदान करतात (२००३ साल), अशी माहिती माझ्यापाशी आहे. आजही रोज एकदोन पेशन्ट चाचणीविषयी चौकशी करायला येतात. पण याबाबतीत कौन्सेलिंगचा उपयोग होतो असा माझा अनुभव आहे. माझ्या माहितीनुसार, मधल्या काळात एका फार्मसीने चायनीज कँलेंडरे वाटली होती. गर्भधारणेपूर्वी काय केले असता ‘मुलगा’ होतो याची तंत्रे त्यात होती, असे सांगतात. त्या कॅलेंडरची पेशन्ट आवर्जून चौकशी करतात, हेही आपण लक्षात घ्यायला हवे.” ‘मुलगाच हवा’ हा आग्रह किती प्रबळ आहे, हे यातून स्पष्ट होते.

डॉ. हेमा दिवाकरः या बंगळूरमधल्या कार्यकर्त्या डॉक्टर. त्यांच्या म्हणण्यानुसार लोक कायद्याला घाबरत नाहीत. आपल्याकडे राजकीय इच्छाशक्तीही प्रबळ नाही. त्यामुळे हे दोन्ही घटक बाजूला ठेवून डॉक्टरांना काय करता येईल, हे प्राधान्याने पाहायला हवे. ‘मी गर्भलिंगनिदान किंवा स्त्रीगर्भपात करत नाही.’ असे सांगून पेशन्टला हाकलून देणे एवढे पुरेसे ठरणार नाही. कारण ‘इथे नाही, तर तिथे’ या न्यायाने दुसऱ्या डॉक्टरकडे पेशन्ट जाणारच असतो. म्हणूनच गर्भलिंगनिदानाच्या चौकशीसाठी आलेल्या पेशन्टशी बोलणे महत्त्वाचे आहे. कौन्सेलिंग करणे, पटवून देणे हे महत्त्वाचे आहे. पटवून देणे ही अत्यंत अवघड व वेळखाऊ बाब आहे हे खरे; पण ती करायला हवी. ते करताना शास्त्रीय सत्य आणि भावनिक आवाहन या दोन्हींचा मेळ घालायला हवा. भावनिक पातळीवर बाईला गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकवणे, केवळ मुलगी आहे म्हणून गर्भपात करून घेणे म्हणजे ठरवून एखादा जीव मारण्यासारखे आहे, हे सांगणे, अशा गोष्टींचा उपयोग होऊ शकतो. फक्त या गोष्टी करण्याची इच्छा, आंच असायला हवी. तीच कमी पडते आहे.

डॉ. सतीश अग्निहोत्रीः यांनी ‘शून्य ते सहा वयोगटातल्या मुला-मुलींचे प्रमाण’ या विषयाचा अभ्यास केला आहे. आपली निरीक्षणे मांडताना ते म्हणतात भारतातल्या एकंदर आकडेवारीतून असे दिसते, की समृद्धी वाढते तसे मुलींचे प्रमाण कमीकमी होत जाते. महाराष्ट्रात ‘पश्चिम महाराष्ट्र’ हा समृद्ध आणि पुढारलेला विकसित प्रदेश मानला जातो. नेमक्या याच भागात मुलींचे प्रमाण घसरत चालल्याचे दिसून येते. समृद्धी वाढते तरी विचारांची श्रीमंती त्यात येत नाही. उलट रानटीपणा व क्रौर्य ह्यांतच भर पडते, हेच यावरून दिसून येते. पूर्वी हा रानटीपणा खुलेपणाने चालायचा. मुलगी जन्माला आली म्हटल्यावर तिची आबाळ केली जायची. तिचे हाल केले जायचे. प्रसंगी तिला मारून टाकले जायचे. आजही तेच चालले आहे. फक्त पद्ध आहे. फक्त पद्धती बदलल्या आहेत. तत्रज्ञान चा आधार घेऊन सारे केले जाते आहे. त्यामुळे आजचे क्रौर्य हायटेक पॉश चकचकीत आणि छुपे आहे. (स्त्रीभ्रूणहत्येच्या समस्येविषयी २००३ साली दिल्लीमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आलेली ही सर्व मते पत्रकार संध्या टांकसाळे यांनी आपल्या लेखात नोंदवली आहेत. संदर्भ : आपल्याला मुली हव्यात की नकोत, सा. सकाळ, १ मार्च २००३)

डॉ. आसावरी संतः या बेळगावमधल्या पॅथॉलॉजिस्ट. यांनी ‘परिवर्तन’ या चळवळीच्या माध्यमातून स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न लावून धरण्याचा प्रयत्न चालवला आहे. या प्रयत्नाबद्दल त्या सांगतात स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न एकूण आपल्या देशभरात वाढतो आहे, हे ठाऊक होते. पण आमची अशी समजूत होती की, कर्नाटक-महाराष्ट्रासारखी पुढारलेली राज्ये यापासून दूर आहेत. इथेही असेल हा प्रश्न, पण असला तरी अगदी फुटकळ स्वरूपात, असे आम्हाला वाटत होते. पण जेव्हा २००१ च्या जनगणनेचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की, आज बेळगाव जिल्हा स्त्रीभ्रूणहत्येच्या बाबतीत कर्नाटकात अग्रस्थानी आहे. मग ‘परिवर्तन’ने पुढाकार घेऊन बेळगावात स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाबाबत पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचे शिबिर घेतले. वेगवेगळ्या संस्था, संघटना, डॉक्टर, वकील यांनाही त्यात सामावून घेतले. मग महिला मंडळे, युवक मंडळे व महाविद्यालयांशी संपर्क साधून तिथेही शिबिरे घेतली. डॉक्टरांची कार्यशाळा घेतली. त्यात बरीच खवळाखवळी झाली. ‘कुणी अॅलोपथी डॉक्टर हे करत नाहीत.’ ‘सेन्ससची आकडेवारी बोगस आहे,’ ‘पालकच आमच्याकडे आग्रह धरतात. म्हणतात, ‘आम्हाला बाळाचे कपडे शिवायचे आहेत. म्हणून मुलगा की मुलगी ते सांगा.’ मग आम्ही तरी काय करणार ? अशी विधाने डॉक्टरांनी केली. त्यातून चर्चा व वादही झाले. मग आम्ही स्त्रीभ्रूणहत्येत आघाडीवर असणाऱ्या डॉक्टरांवर खटले दाखल करण्यापासून जनजागृती मोहीम राबवण्यापर्यंतचा अजेंडा तयार केला. स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न फक्त वैयक्तिक किंवा कौटुंबिक नाही; तर तो व्यापक सामाजिक आणि राजकीय प्रश्न आहे. म्हणून तो घराघरापर्यंत न्यायला हवा, असे ‘परिवर्तन’ला वाटते. म्हणून आम्ही ‘बालिका जन्मोत्सव’ साजरा केला. मुलगा झाला की आपण जसा आनंद साजरा करतो, तसा मुलगी झाल्यावरही करायला हवा, असा सकारात्मक संदेश त्यातून दिला. वेगवेगळ्या चळवळीतले, संघटनांमधले कार्यकर्ते, शासकीय, निमशासकीय, बिगरशासकीय संस्था, महिला मंडळ, युवामंडळ, वकील आणि डॉक्टर मिळून ग्रामीण-शहरी भागातले दहा हजार स्त्रीपुरुष त्यावेळी स्त्रीभ्रूणहत्येच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाला छेद देता येऊ शकतो, याची जाणीव यातून बळकट झाली. डॉ. आसावरी संत ‘परिवर्तन’च्या स्त्रीभ्रूणहत्याविरोधी कार्यक्रमात सक्रिय झाल्यानंतर ‘या भानगडीत तू पडू नकोस’ असे सांगणारे फोन त्यांना आले. दबाव-दडपणयुक्त सल्ले मिळाले. तरी, या कार्यक्रमाला त्यांचा सहभाग कायम राहिला. (संदर्भ : प्रवास परिवर्तनाचा, अमृता वाळिंबे, साधना दिवाळी अंक २००५)
स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाबाबत ‘सतर्क’ असलेल्या डॉक्टरांची ही काही उदाहरणे. हे डॉक्टर आपापल्या पातळीवर अभ्यास करताना, चर्चासत्रांमध्ये त्याविषयी मांडणी करताना, कधी रस्त्यावर उतरून संघर्षाचा पवित्रा घेताना दिसतात. खरेतर, स्त्रीभ्रूणहत्येच्या प्रश्नाच्या भीषणतेपुढे त्यांचे प्रयत्न आजघडीला तोकडे पडत आहेत. पण किमान मत मांडण्याचे, जाहीर भूमिका घेण्याचे धाडस तरी हे डॉक्टर दाखवत आहेत.

पण कोल्हापुरात मात्र डॉक्टरांच्या पातळीवर सामसूम जाणवते. स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न कोल्हापुरात बोकाळतो आहे, तरी याबाबत इथली डॉक्टरमंडळी भूमिका घेताना दिसत नाहीत. कोल्हापुरातल्या मुलींच्या घटत्या प्रमाणाविषयी वृत्तपत्रात ठळक बातम्या छापून येतात, लेखमाला चालवल्या जातात. पण हा प्रश्न आपल्या व्यवसायाशी व एकंदरीनेच आपल्या जगण्याशी संबंधित आहे, असे वाटून इथल्या एकाही डॉक्टरने स्त्रीभ्रूणहत्येविषयी खुलेपणाने बोलण्याचे धाडस दाखवलेले नाही. ‘कशाला उगाच ?’ ही धारणा त्यामागे दिसते. खाजगीत मात्र स्त्रीभ्रूणहत्या व डॉक्टरी व्यवसायाशी निगडित अनेक बाबी बोलल्या जातात. चर्चिल्या जातात. त्यातून काही मुद्दे पुढे येतात.

पहिली महत्त्वाची गोष्टी म्हणजे स्त्रीभ्रूणहत्येच्या व्यवहारात ‘चूक’ कोण डॉक्टर की पेशन्ट हे कसे ठरवायचे, असा प्रश्न इथे काही जणांना पडतो. त्यांच्या दृष्टीने पेशन्ट मागतो, डॉक्टर देतो असा हा व्यवहार आहे. ‘मुलगाच हवा असणे’ ही इथल्या पेशन्टच्या मनातली तीव्र इच्छा आहे. त्यासाठी काहीही करायला तो तयार आहे. ‘मुलगा होणे’ हातात नाही; पण ‘मुलगी पाडणे’ मात्र हातात आहे. याबदल्यात पैसे मोजायला पेशन्ट तयार आहे. रिस्क घ्यायला, शारीरिक त्रास सोसायलाही तयार आहे. आपल्याला हवे ते करून मिळणे, ही पेशन्टची इच्छा आहे. ‘पेशन्टची इच्छा पूर्ण करून पैसे मिळवणे’ ही डॉक्टरची इच्छा आहे. पेशन्ट आणि डॉक्टर यांच्यातला सरळ आणि फायद्याचा हा व्यवहार आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्येचा व्यवहार छुपेपणाने आणि सामंजस्याने होणे शक्य होते आहे. पेशन्टकडून मागणी न येणे किंवा डॉक्टरांनी नैतिकतेस धरून व्यवसाय करणे, यांपैकी एकजरी गोष्ट घडली तरी हा सामंजस्यपूर्ण पण अमानवी व्यवहार थांबू शकतो असे मत कोल्हापुरातले काही विचारी डॉक्टर मांडतात. ‘इथे गर्भलिंगनिदान चाचणी केली जात नाही.’ असा बोर्ड लावूनही काही डॉक्टर सरेआम गर्भलिंगनिदान करतात व स्त्रीभ्रूणहत्येतही सहभागी होतात हे कोल्हापुरात उघड गुपित आहे. तीन-साडेतीन महिने होत आले की सोनोग्राफी केली जाते. त्याआधारे गर्भ मुलाचा आहे की मुलीचा हे डॉक्टर सांगतात. पण त्याबाबत सर्वसाधारणपणे सांकेतिक भाषेचा वापर केला जातो. ‘बालाजीच्या मदिरात जाऊन या’ असे म्हटले तर मुलगा, ‘मीनाक्षी मंदिरात जाऊन या’ असे म्हटले तर मलगी हा एक प्रकार. दुसरा प्रकार सोमवारी या’ असे म्हटले तर मुलगा आणि ‘शुक्रवारी या’ असे म्हटले तर मुलगी. (कारण सोमवार हा शंकराचा वार आणि शुक्रवार हा महालक्ष्मीचा वार.) तिसरा प्रकार म्हणजे ‘महालक्ष्मी प्रसन्न आहे तुमच्यावर’ असे डॉक्टरने सांगितले की पेशन्ट समजतात ‘मुलगी आहे.’ आणि डॉक्टर जर म्हणाले की, ‘शंकर पावला तुम्हाला’ तर पेशन्ट समजतात मुलगा आहे. अशा विविध सांकेतिक शब्दांचा वापर करून गर्भलिंगनिदानाचा व्यवहार होतो.

असे सांगतात की, कोल्हापुरात दोन प्रकारचे डॉक्टर या व्यवहारांमध्ये सामील आहेत. यातला पहिला प्रकार म्हणजे फक्त गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्या करणे हाच ज्यांचा मुख्य व्यवसाय आहे असे डॉक्टर. अशा डॉक्टरांकडे फक्त कोल्हापूरजवळच्या खेड्यापाड्यांतूनच नाही तर म्हैसूर-बंगलोरहूनही पेशन्ट फक्त या कारणासाठी येतात, असे बोलले जाते. यांचे दवाखाने मोठे होतात, चकचकीत होतात आणि यांच्याकडे नेहमी पेशन्टची वाढती रीघ दिसते, असेही ऐकायला मिळते. ‘कोल्हापूर हा स्त्रीभ्रूणहत्येसाठीचा कत्तलखाना’ बनतोय तो अशा डॉक्टरांमुळे असेही मत खाजगीत काहीजण नोंदवत आहेत.
स्त्रीभ्रूणहत्याविषयी व्यवहारात सामील होणाऱ्या डॉक्टरांचा आणखी एक प्रकार कोल्हापुरात आहे. हे डॉक्टर सरेआम गर्भलिंगनिदान व स्त्रीगर्भहत्या करत नाहीत. पण वर्षानुवर्षांच्या संपर्कामुळे अनेक कुटुंबे या डॉक्टरांशी जोडली गेलेली असतात. या कुटुंबांसाठी हे डॉक्टर म्हणजे ‘फॅमिली डॉक्टर’ बनलेले असतात. मग यांपैकी कुणी गळ घातली तर डॉक्टरांना ‘नाही’ म्हणता येत नाही. कारण त्यामुळे एक पेशन्ट नाही तर सगळे कुटुंब दुरावण्याचा संभव असतो. आर्थिक नुकसानीची शक्यता असते. “बरे, आमच्याकडे नाही तर दुसरीकडे कुठेतरी हा पेशन्ट सोनोग्राफी करून घेणारच असतो. मग आम्ही न केल्याने काय मोठासा फरक पडणार?’ अशी मल्लीनाथी हे डॉक्टर करत असतात. या दोन्ही प्रकारच्या डॉक्टरांची इतर डॉक्टरांसोबत ऊठ-बस असते. पण चांगल्या/नैतिक/व्यावसायिक निष्ठा बाळगणाऱ्या डॉक्टरांचा प्रभाव ‘या’ डॉक्टरांवर पडताना दिसत नाही. चांगले/नैतिक/व्यावसायिक निष्ठेने व्यवहार करणारे डॉक्टर ‘या’ डॉक्टरांविरोधात बोलताना दिसत नाहीत. उलट, कोल्हापुरातल्या काही डॉक्टरांच्या पत्नींनीही गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्या करून घेतल्याचे इथे बोलले जाते.
खाजगीत असे सांगतात की, मेडिकल असोसिएशन आणि कायदा या दोन्ही गोष्टी स्त्रीभ्रूणहत्येबाबत कुठल्याही प्रकारचा अंकुश ठेवू शकत नाहीत. असोसिएशनच्या चर्चासत्रात स्त्रीभ्रूणहत्येविषयी पेपर वाचले जातात. पण ते अहवालात नोंद करण्यापुरते असते. मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून एखाद्या डॉक्टरवर दबाव येऊन तो स्त्रीभ्रूणहत्या करणे बंद करेल, वगैरे केवळ अशक्य आहे. कारण प्रश्न हितसंबंधांचा आहे. पूर्वी वाटत होते कायदा झाला की सगळे थांबेल, पण कोल्हापुरात तर असे दिसते की, कायदा झाल्यानंतर या व्यवहारातली ‘रिस्क’ वाढली. त्यामुळे गर्भलिंगनिदान व स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या डॉक्टरांनी फी वाढवली. कायद्याची पायमल्ली चोरीछुपे पण अधिक जोरदारपणे होऊ लागली. खरेतर, प्रत्येक सोनोग्राफी मशीनची नोंदणी असणे अत्यावश्यक आहे. या मशीनद्वारे कधी, कुणाची, कशासाठी सोनोग्राफी केली गेली, पेशन्टची त्यास संमती होती का याबाबतची माहिती विशिष्ट फॉर्ममध्ये भरून दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संबंधित अधिकाऱ्याकडे सादर करणे, हे डॉक्टरांवर बंधनकारक आहे. पण मशीन नोंदणी व फॉर्म सादरीकरणाबाबतच्या अनेक गोष्टी विविध मार्गांनी ‘मॅनेज’ केल्या जात असल्याचे कोल्हापुरात खाजगीत समजते. स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी जो ‘सेल’ इथल्या शासकीय रुग्णालयात कार्यान्वित आहे, त्यावरही विसंबून राहण्यात अर्थ नाही असे मत कोल्हापुरातले डॉक्टर आणि कार्यकर्ते अगदी स्पष्टपणे नोंदवतात. (अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.