कामव्यवहाराची उत्क्रांती

स्त्री आणि पुरुष जेव्हा जोडीदार निवडतात तेव्हा ते कोणते डावपेच आखतात? स्त्रियांना कोणते पुरुष हवे असतात? पुरुष स्त्रियांना कोणत्या निकषांवर निवडतात? एकत्र राहण्यासाठी आणि वेगळे होण्यासाठी दोघेही विविध क्लृप्त्या कश्या योजतात? स्त्री पुरुष फक्त मित्र म्हणून राहू शकतात काय? अशा बहुविध प्रश्नांची वैज्ञानिक उत्तरे शोधणारे एक सुंदर व विचार करायला लावणारे पुस्तक आहे. ‘द इव्होल्यूशन ऑफ डिझायर-स्ट्रॅटजीज ऑफ ह्यूमन मेटिंग’. हे पुस्तक लिहिण्यासाठी पुस्तकाचे लेखक डेव्हिड बस यांना सखोल संशोधन करावे लागले आहे. ते युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये मानसविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. जगातील ३७ संस्कृती (भारतातील गुजरातमधील खेडी व बंगलोर-अहमदाबाद ही शहरे) आणि सुमारे दहा हजार लोकांचे सर्वेक्षण व संशोधन हा पुस्तकाचा आधार आहे. सुमारे पाच वर्षे चाललेल्या संशोधनाचे फलित म्हणजे हे पुस्तक.

उत्क्रांति-मानसविज्ञान (Evolutionary Psychology) या मानसविज्ञानाच्या उपशाखेचा पाया या पुस्तकास आहे. पुरुष आणि स्त्री यांची जोडीदार-निवड आणि लैंगिक व्यवहाराची मानसिकता कशी उत्क्रांत होत गेली हे या पुस्तकांतून साधार दाखविले आहे. सुमारे बारा प्रकरणे असलेल्या या पुस्तकात प्रत्येक पानावर वैज्ञानिक तथ्ये मांडण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे दर्शन घडते.

डार्विनच्या लैंगिक निवडीच्या सिद्धान्ताने ‘जोडीदार-निवडीच्या वर्तनाची मुळे’ या पहिल्या प्रकरणास सुरुवात होते. मानवांतील जोडीदार निवडीची क्रिया ही चांगली नाही असे सुरुवातीलाच लेखकाने स्पष्टपणे नोंदविले आहे. स्त्री आणि पुरुष कामक्रियेसाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचे हनन करतात, एकमेकांना फसवितात, आणि काही वेळा जोडीदाराचाच विध्वंस करतात, हा निष्कर्ष वेदनादायक असला तरी सत्य आहे. मानवाबरोबर इतर प्राण्यांतही हे आढळते. उदा. एकपत्नीव्रती वागणारी काही जातीची कबुतरे जर वांझ जोडीदार असेल तर सरळ दुसऱ्या जोडीदाराबरोबर जुगतात. स्त्री आणि पुरुष यांतील संघर्ष लग्न झाल्यावरही चालूच राहतो. विवाहित स्त्रिया सतत तक्रार करतात की नवऱ्याच्या भावना ओसरलेल्या आहेत, त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण बनत चालले आहे, आणि तो स्वतःस शहाणा समजत आहे. नवरे तक्रार करतात की बायको ‘मूडी’ बनली आहे, लैंगिक संबंधास प्रतिबंध करू लागली आहे आणि खूपच अवलंबून राहू लागली आहे. जगभरात एकपत्नीकत्व, बहुपतिकत्व आणि बहुपत्नीकत्वाच्या अनेक संस्कृती आहेत. मात्र बहुपत्नीक संस्कृतीतील पालक मुलांवर स्त्रीनिवडीसाठी खूपच दबाव आणतात. एकपत्नीक संस्कृतीत हे कमी आढळते.

‘स्त्रियांना काय हवे असते?’ या दुसऱ्या प्रकरणात स्त्रिया पुरुषनिवडीसाठी कोणते निकष लावतात त्याची माहिती आहे. प्रथमस्थानी आहे आर्थिक क्षमता. जमीन-जुमला असलेला आणि खर्च करणारा पुरुष पसंतीस उतरतो. जगातील सर्व धर्म-वंशातील, एकत्र राहण्याच्या विविध प्रथेच्या गटांतील, अगदी समाजवादी-कम्युनिस्ट राष्ट्रांतीलही स्त्रियांनी ‘आर्थिक क्षमतेस’ प्रथम पसंती दिलेली आहे. उत्क्रांतीतील पूर्वजस्त्रिया नऊ महिन्यांचे गर्भारपण, दुग्धन, संगोपन आणि घर चालविणे याकरिता लागणाऱ्या साधन संपत्तीसाठी पसंती देत असत. दुसरी पसंती आहे पुरुषाच्या सामाजिक दर्जास. सर्वोच्च सामाजिक दर्जाविषयी हेन्री किसिंजरांचे एक वाक्य आहे ‘सत्ता ही जास्त सामर्थ्यवान कामोत्तेजक गोष्ट आहे.’ अमेरिकेतील स्त्रिया शिक्षण आणि व्यावसायिक पदव्या यांना जास्त महत्त्व देतात, कारण त्यावरच सामाजिक दर्जा ठरतो. यात अशी क्रमवारी येते डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इ. आपल्यापेक्षा वयाने मोठा पुरुष, महत्त्वाकांक्षी आणि उद्योगी पुरुष, भावनिक स्थिरता देणारा व स्त्रीवर अवलंबून राहणारा पुरुष, बुद्धिमान पुरुष, स्वतःच्या मतांशी मिळता-जुळता असणारा पुरुष, दणकट व बलदंड पुरुष, निरोगी पुरुष, प्रेम करणारा आणि वचन पाळणारा पुरुष, या पुढील क्रमवार पसंत्या असतात. ही पसंती काळजी, संगोपन आणि संरक्षण यासाठी आढळते.

‘पुरुषांना वेगळेच हवे असते’ या तिसऱ्या प्रकरणात पुरुषांचे जोडीदाराचे निकष स्त्रीपेक्षा कसे भिन्न असतात याचे विवेचन आहे. पुरुषांची प्रथम पसंती असते तरुण वयाला. नायजेरियाचे पुरुष सरासरीने १७ वर्षे वयाची स्त्री निवडतात तर कॅनडाचे १९ वर्षांची. जास्तीत जास्त १० वर्षांनी लहान असलेल्या स्त्रियांना पसंती दिली जाते. शरीरसौंदर्य हा दुसरा निकष आहे. मोठे ओठ, नितळ आणि मुलायम त्वचा, पाणीदार डोळे, चकाकणारे केस, रेखीव स्नायू, प्रमाणबद्ध चेहरा आणि शरीर हे घटक पुरुष पुनरुत्पादनक्षमतेशी जोडतात. शरीरबांधा हा तिसरा घटक होय. पुष्ट स्तन, धडधाकट शरीरयष्टी इ. बहुसंख्य अमेरिकन पुरुषांना सडपातळऐवजी धडधाकट शरीरयष्टी आवडते. अमेरिकन स्त्रियांची मात्र ही गैरसमजूत आहे की सडपातळ राहणे म्हणजेच सौंदर्य. समलिंगी पुरुष व स्त्रियांत सामान्य स्त्री-पुरुषांसारख्याच पसंती आढळतात. ‘शुद्ध’ स्त्रिया किंवा कुमारिका स्त्रिया आणि प्रामाणिक स्त्रिया या आहेत पुढच्या पसंत्या. मात्र गेल्या वीस वर्षांत पुरुषांचा ‘कौमार्या’चा आग्रह खूपच कमी होत गेला आहे.

‘कॅज्युअल सेक्स’ (प्रासंगिक कामक्रिया) या प्रकरणात स्त्रिया अशा कामसंबंधांना कसे धुडकावतात याचे सर्वेक्षण आहे. मात्र पुरुषांचे अशा कामसंबंधांचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांच्या वृषणाच्या आकाराशी आणि शुक्राणूंच्या संख्येशी हे संबंध कसे निगडित असतात ते वाचण्याजोगे आहे. नवऱ्याव्यतिरिक्त प्रियकरांकडून गर्भार राहण्याची शक्यता तुलनेत जास्त असते असा धक्कादायक निष्कर्षही ‘ऑरगॅझम’द्वारे मांडला गेला. राष्ट्राध्यक्ष केल्व्हीन कूलिज यांचा एक किस्सा नमूद करून ‘कूलिज इफेक्ट’ दिला आहे. तो म्हणजे, प्रासंगिक कामक्रियेमागे अनेकानेक स्त्रियांचा संपर्क कारणीभूत ठरतो. आधुनिक स्त्रिया प्रासंगिक कामक्रियेत का गुंततात त्याची कारणे देऊन सर्वांत जास्त हानी त्यांचीच कशी होते हे दिले आहे.

जोडीदारास आकर्षून घेण्यासाठी कोणकोणत्या क्लृप्त्या स्त्री-पुरुष वापरतात ते ‘अट्रॅक्टिंग पार्टनर’ या प्रकरणात येते. आपण खूप प्रामाणिक आहोत, विनम्र आहोत असे वरवर दाखवून पुरुष स्त्रियांना आकृष्ट करतात. मुले आवडतात व त्यांच्या संगोपनात रस आहे असे दाखविण्याचीही क्लृप्ती योजिली जाते. पुरुषांच्या निवडीवर स्त्रियांच्या क्लृप्त्या अवलंबून असतात. शरीर आकर्षक बनविताना त्या सौंदर्यप्रसाधनांना कशा बळी पडतात, याचे विस्मयकारक विवेचन आहे. आपण ‘शुद्ध’ आहेत आणि आपली स्पर्धक कशी ‘वाईट चालीची’ आहे ही क्लृप्ती स्त्रिया सर्रास वापरतात.

“एकत्र राहताना…’ या प्रकरणात राहण्यात कोणते अडथळे येतात ते दिले आहे. जोडीदाराच्या विवाहबाह्य संबंधांचा स्त्री-पुरुष दोघांनाही मत्सर असतो. पण पुरुष जास्त हिंसाचार करतात. सुदान, युगांडा व भारत या देशांत सर्वांत जास्त खून या कारणाने होतात. आपला पार्टनर एकनिष्ठ आहे की नाही हे तपासण्यासाठी १०४ प्रकारच्या क्लृप्त्या  वापरल्या जातात असे लेखकास आढळते. दुसऱ्या पुरुषांपासून बचाव करण्यासाठी भारतात स्त्रीस घराबाहेर पडू दिले जात नसे तर अरबी देशांत तिला पडद्यात ठेवले जाते.

‘लैंगिक संघर्ष’ या प्रकरणात कामव्यवहारातला संघर्ष कसा उद्भवतो हे सांगितले आहे. संकेतखुणांचा चुकीचा अर्थ, एकमेकांच्या कामक्षमतेची चुकीची मोजमापे, सेक्सचा हत्यार म्हणून वापर, भावनिक अप्रामाणिकपणा, वेळ आणि पैसा खर्च न करणे, फसवणूक इत्यादींमधून कामसंघर्ष उभा राहतो. निंदा-शिवीगाळ, लैंगिक छळ व बलात्कार ही स्त्री-पुरुष संबंधातील आणि जोडीदारी निभावतानाची सर्वांत काळी बाजू होय. बलात्कार हे शस्त्र म्हणून कसे वापरले जाते हे लेखकाने अनेक उदाहरणांनी दाखविले आहे.

आज अमेरिकेत ५० टक्के मुले त्यांच्या दोन्ही पालकांबरोबर राहत नाहीत. ‘ब्रेकिंग अप’ प्रकरणात जोडीदाराने वेगळे होण्याची किंवा घटस्फोटामागील कारणे दिली आहेत व्यभिचार, वंध्यत्व, कामव्यवहारास नकार, आर्थिक मदतीस नकार, क्रूरता. मात्र पुरुषाचा व्यभिचार खपवून घेतला जातो, पण स्त्रीचा नाही हे जगभरातील ५५ संस्कृतींत आढळले आहे. जोडीदाराशी आयुष्यभर जुळवून घेत राहणे किती अवघड आहे हे ‘कालौघातील बदल’ या प्रकरणात येते. स्त्रीचे वाढते वय स्त्रीस त्रासदायक ठरते. वाढत्या वयाबरोबर कामेच्छा व प्रामाणिकपणा कमी झाला आहे असे दोघेही परस्परांवर आरोप करतात. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे वाढतात. स्त्री-पुरुषांच्या संख्येचे प्रमाण असमान बनल्यास अनेक स्त्रिया ‘विवाह बाजारा’तून बाहेर फेकल्या जातात, यास ‘मॅरेज स्क्वीझ’ म्हणतात. यातूनच कामव्यवहारांचा असमतोल कसा निर्माण होतो ते वाचण्यासारखे आहे.

स्त्रीवादी चळवळींनी दिलेली पुरुषसत्ताकतेमागील कारणे उत्क्रांतिमानस-विज्ञानांच्या कारणांहून वेगळी पडतात. ते कसे हे ‘हार्मनी बिट्वीन द सेक्सेस’ या प्रकरणात येते. स्त्रियांच्या लैंगिक व जोडीदार निवडीच्यामागे काही सुप्त डावपेच असतात. ही सुप्तता शुक्राणू धरून ठेवणे व अत्युच्च कामक्षण (Orgasm) यातून कशी दिसते हे “स्त्रियांच्या कामक्रियांचे सुप्त डावपेच’ या प्रकरणात येते. स्त्रिया लफडी का करतात, त्यांचा ऋतुस्राव त्यांच्या कामडावपेचांवर परिणाम करतो काय, इ. अनेक मनोरंजक गोष्टींचा यात समावेश आहे. जोडीदार-निवडीतील अनेक कोडी आजही सुटलेली नाहीत. उदा. समलिंगीयता का उद्भवते? जोडीदाराचीच ‘शिकार’ का केली जाते? बलात्कारामागील कारणे जैविक असतात काय? अशी अनेक कोडी शेवटच्या प्रकरणात येतात.

दैनंदिन जीवनात रोज अनुभवाला येणारे आणि आपणांस कोड्यात टाकणारे आपल्या जोडीदाराविषयीचे आणि स्त्री-पुरुष संबंधांचे प्रश्न अनेक असतात. अशा बहुतांश प्रश्नांचे निरसन करण्यात हे पुस्तक यशस्वी ठरले आहे. स्त्री-पुरुष संबंधांविषयीचे काही धक्कादायक निष्कर्षही मांडले आहेत. विज्ञानात निष्कर्षांना महत्त्व दिले जाते, मग भले ते निष्कर्ष प्रचलित कल्पना नाकारणारे असोत. स्त्री-पुरुष नात्याबद्दल असे निष्कर्ष सांगणे धाडसाचे असते. या पुस्तकाने ते निडरपणे मांडले आहे. उत्क्रांति-मानसविज्ञान या नव्या शाखेचे स्वागत तर करावयासच हवे कारण पारंपरिक समजुतींना छेद देऊन नवी दृष्टी देण्याची क्षमता त्यात आहे.

चार्वाक, २६०/१-६, जुना कुपवाड रोड, सांगली ४१६ ४१६.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.