पत्रचर्चा

वाढते HIV/AIDS प्रमाण – लैंगिक शिक्षणाची गरज
आरोग्य विशेषांकात एड्स विषयाला दिलेला ‘वेटेज’ यावर टी. बी. खिलारे यांनी निराशा व्यक्त केली. प्रत्यक्षात HIV/AIDS वरील सत्य माहिती, आजची जागतिक स्थिती, भारतातील, महाराष्ट्रातील स्थिती ही लोकांपर्यंत सर्व माध्यमांतून येणे गरजेचे आहेच. जसे पल्स पोलिओ डोसविषयी सतत प्रचार करीत राहिल्याने ती मोहीम यशस्वी होत आहे. जागतिक अनुदान मिळते म्हणून काम करणाऱ्या असंख्य सामाजिक संस्था आहेत. याचा अर्थ सर्व संस्था प्रामाणिक व शास्त्रीय काम करीत आहेत व शिक्षण देत आहेत असे समजू नये. स्वतःची तुंबडी भरणाऱ्या काही संस्था व काही समाजसेवक आहेत. कोल्हापुरातील काही संस्था नुसत्या नावाच्याच आहेत. खुद्द त्यांतील काही कार्यकर्ते ‘लफडेबाज’ आहेत. HIV पेशंटची देखभाल न करता आम्ही गेली तीन वर्षे ती केली अशी खोटी माहिती फोटोट्रिकचा वापर करून मुख्य कार्यालयाला पाठविली जाते.
जगात रोज १६,००० लोक HIV बाधित होतात. त्यांतील ७००० लोक हे १०-२४ वर्षे वयोगटातील आहेत. मे २००५ पर्यंत महाराष्ट्रातील HIV/AIDS ची स्थिती अशी होती.
शहर/क्षेत्र एड्सग्रस्त पुरुष एड्सग्रस्त स्त्री मृत पुरुष मृत स्त्री
कोल्हापूर १११८ ५६२ ५२ १९
सांगली १८१८ ७८८ ३३१ १३०
मुंबई ९५९२ ३४४६ ७४४ २७९
महाराष्ट्रभर १९४८७ ७५११ १७१२ ६२८
(नोव्हेंबर २००५ पर्यंत UNAIDS / W.H.O. यांच्याकडून प्रकाशित झालेली आकडेवारी)
जगात ४ कोटी लोक HIV/AIDSग्रस्त आहेत. त्यांतील २३ लक्ष मुले आहेत. १.७५ कोटी स्त्रिया आहेत. २००५ मध्ये नवीन कवत ग्रस्त ३१ लक्ष, त्यांपैकी २७ लक्ष, प्रौढ आहेत. जगात १९८१ पासून जवळजवळ अडीच कोटी लोकांचा एड्सने मृत्यू झाला. गेले पाच वर्षे मी कामजीवन, शास्त्रीय लैंगिक शिक्षण, कवत/अखऊड याविषयी शास्त्रीय माहिती शाळा, महाविद्यालयांत व सामान्य जनतेसाठी व्याख्यानांतून देत आहे. अनुभव असा शिक्षकांना अजून समलिंगी संबंध, पोर्नोग्राफी, स्त्री-हस्तमैथुन, गुदमैथुन, कामजीवनातील विविधता, यांविषयी माहिती नाही. प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरे येतात. स्वतःच्या लिंगाविषयी, हस्तमैथुनाविषयी प्रचंड गैरसमज शिक्षकांच्यात आहेत. स्तनांच्या आकारांविषयी स्त्री-शिक्षिकांच्यात गैरसमज आहेतच. विशेष म्हणजे हे सर्व “किशोरावस्था व जीवनकौशल्य’ यांवरील शिबिराचा लाभ घेतलेले शिक्षक आहेत. क्वत/अखडची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वच थरांतून, प्रसारमाध्यमांतून शास्त्रीय लैंगिक शिक्षण, कामजीवनावरील माहिती ही लोकांपर्यंत पोहचायला हवी. प्रत्यक्षात काय घडते? १) टी.व्ही. वरील HIV/AIDS विषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसारित होणाऱ्या सर्व जाहिराती ‘चुकलेल्या’ आहेत. त्यात भरीस भर “Key-Clinic’ची जाहिरात चुकली आहे. जाहिरातीला पुरस्कार मिळावा हा उद्देश न ठेवता जाहिरात पाहणाऱ्या भारतातील जनतेची ‘बौद्धिक पातळी’ लक्षात घेऊन जाहिरात तयार करणे गरजेचे आहे. नेमके तेच घडत नाही. २) वृत्तपत्रे हे दोनतीन रुपयांत सामान्य जनतेपर्यंत पोहचणारे स्वस्तांत मस्त माध्यम. त्यामुळे वृत्तपत्रातील प्रकाशित होणाऱ्या जाहिरातींचा, लेखांचा प्रभाव संख्येने खूप लोकांवर होतो. दररोज खोट्या जाहिरातींतून पुरुष वाचकांमध्ये हस्तमैथुन, लिंगाची लांबी, स्वप्नातील वीर्यपतन, क्वत/अखउड, कर्करोग, स्तनांची वृद्धी याविषयी प्रचंड गैरसमज पसरत आहेत. ह्या जाहिरातीविषयी संपादकांस व जाहिरात-विभागास माहीत नसते असे नव्हे. फक्त या जाहिरातीतून पैसे मिळतात म्हणून जाहिरात स्वीकारली जाते. प्रत्यक्षात ‘वृत्तपत्रविद्या’च्या अभ्यासक्रमात ‘चौसष्ट रोग व त्यांच्या बरे करण्याच्या फसव्या दाव्यांविषयीची जाहिरात प्रकाशित करणे हा गुन्हा आहे’ असा उल्लेख आहे. प्रत्यक्ष काय चालले? खोट्या जाहिरातदारांना लोकांना लुटण्यासाठी जाहिरात देणे गरजेचे असते. त्यामुळे एक जाहिरातदार अनेक वृत्तपत्रांतून एकाचवेळी जाहिरात देत असतो. जाहिरात विभागाला त्यांच्याकडे जाण्याची गरज नसते. हा पैसा वेगळ्या जाहिरातींतून मिळवता येऊ शकतो परंतु जाहिरात-विभागाची स्थिती ही खूप खाऊन सुस्त झालेल्या अजगरासारखी झाली आहे. मासिके, पाक्षिके, साप्ताहिके ह्यांची हीच स्थिती आहे. ३) मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या काही मासिकांनी तर ‘कामजीवन विशेषांक’ काढण्याचा सपाटाच लावला आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी एक ‘छोटी पुस्तिका’ मोफत दिली जाते. वाचकांना संभ्रमात पाडणारी वाक्ये या पुस्तकात असतात. काही गोंधळ
(१) HIV बाधित व्यक्तीने वीर्यदान, रक्तदान करू नये’ असे वाक्य योग्य आहे. निरोगी व्यक्तीने वीर्यदान, रक्तदान केले तर कोणताच धोका नाही. फक्त रक्तदान करताना सर्व निर्जंतुक उपकरणे वापरावीत.
(२) “एडस् झाल्याची शंका वाटल्यास मार्गदर्शन घ्या.’ प्रत्यक्षात कवत बाधा झाल्यानंतर मार्गदर्शन घ्यावे. कवत बाधित होऊन अखउडमध्ये रूपांतर होण्यास २ महिने ते सात वर्षे एवढा कालावधी लाग शकतो.
(३)आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याआधी जोडीदार व स्वतः HIV/AIDS बाधित नसावे हे महत्त्वाचे. वाचकांना वाटते स्वतःच्या पत्नीशी संभोग केला तर कवत होत नाही. ‘निरोगी जोडीदाराशी’ शब्दप्रयोग फार महत्त्वाचा.
(४)समलिंगी संभोगी व्यक्तीची वारंवार एडस्ची तपासणी केली जावी ही मागणी अमानवीपणाचा दाखलाच आहे. मुळात विरुद्धलिंगी, समलिंगी कोणत्याही दूषित, असुरक्षित संभोगातून क्वत पसरतो. गरज आहे फक्त त्यांतील एक व्यक्ती प्रथम HIV बाधित असावी, समलिंगी ‘गुदमैथुनच’ करतात ही आणखी एक ‘थाप’.
(५)समलिंगी संबंध टाळावाः मुळात भारतामध्ये साडेपाच कोटी समलिंगी आहेत. सर्वच HIV बाधित आहेत किंवा होतील का ?
समलिंगी आकर्षण (कायमस्वरूपी), ही विकृती नाही.
(६)मुखमैथुन, गुदमैथुन टाळावेः कामजीवनातील या दोनही विविधता आहेत. निरोगी पतिपत्नींच्या संमतीने हे होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. वाईट वाटते म्हणून कोणी करण्याचे थांबणार नाही. शिवाय या दोन्हींचा उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्रात आहे. मुखमैथुनाला वात्स्यायन ‘औपरोष्ठिक’ (Auporosthik) म्हणतो. विविध कंडोम कंपन्यांनी वेगवेगळ्या ‘चवीचे’ कंडोम हे कशासाठी काढलेत ? त्यांचा वापर साहजिकच मुखमैथुनासाठी होतो. कामशास्त्रानुसार स्त्रीची भगशिश्निका पुरुषाने मुखाने उद्दीपित केली तर तिला ‘कामपूर्ती’ १००% मिळते. त्याचबरोबर “G-spot’ चेतविणे हा भाग आहे.
एक लक्षात येते की लेखक अभ्यासू नाहीत, सत्याची पडताळणी न करता ही वाक्ये छापली आहेत. ‘मोघम’ शब्दप्रयोग कधीही करू नये. नाहीतर वाचकांच्यात गोंधळ होतो.
मी आजपर्यंत अडीच हजार पेशंट्स पाहिले. त्यांत कामजीवनातील स्त्री-पुरुषांच्या समस्या, लैंगिक विकृती, मानसिक विकृती, लैंगिक जीवनातील प्रत्येकाच्या चुकीच्या अपेक्षा, कवत/अखऊड बाधित व्यक्ती, त्या आजाराची भीती यांचा समावेश आहे. या अनुभवातून मी या निर्णयापर्यंत आलो की शास्त्रीय लैंगिक शिक्षणात स्त्री-पुरुष हस्तमैथुनावर जास्त भर द्यावा लागेल. काही प्रगत देशांत ‘हस्तमैथुन दिवस’ (masturabation day) पाळला जातो. वृत्तपत्रातील खोट्या जाहिरातींवर पूर्णपणे बंदी आज आणली नाही तर हे भोंदूगिरी करणारे लोक उद्या समाजाच्या डोक्यावर बसून मिरी वाटल्यशिवाय राहणार नाहीत. एकपत्नीव्रत, एकपतिकत्व, आपली संस्कृती श्रेष्ठ, अशा ‘गाजराच्या पुंग्या’ वाजवायचे बंद करावे. पूजाअर्चा करणारा, स्त्रीचा शौकीन असलेला कोकणातला ढेरपोट्या भट माझ्याकडे उपचारासाठी आहे. HIV/AIDS जनजागृती, लैंगिक शिक्षण अशा महत्त्वाच्या व गंभीर विषयावर राजकारणी व्यक्ती, खेळाडू, चित्रपट कलाकार अशा ‘अनावश्यक’ पात्रांचा वापर नको. अशा कार्यक्रमात वेळकाढूपणा, व ‘त्यांना’ पाहण्याचाच प्रकार जास्त होतो. हा माझा अनुभव आहे. जागतिक अखऊड दिन साजरा करताना मानवी साखळी निर्माण करून ‘बातमी’ करण्यापेक्षा त्या ‘साखळीतील’ ‘मानवांना’ याचे शिक्षण किती आहे ते तपासा…. म्हणजे ‘जोर का झटका धीरे से लगेगा।’
छोट्या जाहिरातीतील भोंदूगिरीवर कारवाई करण्यासाठी कोणत्या संस्था कार्यरत असतील तर त्यांचा पत्ता आ.सु.ने द्यावा. माझ्याशी संपर्क करावा.
राहुल पाटील (लैंगिक समस्यातज्ज्ञ), ‘आकांक्षा’ प्लॉट नं. १, न्यू मोटे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर. मो. ९८२२५३४७५४, फोन ०२३१-२३२३२६८, ई-मेल : drahul2000@yahoo.com

“The bourgeoisie, wherever it has got the upper hand, has put an end to all feudal, patriarchal, idyllic relations. It has pitilessly torn asunder the motley feudal ties that bound man to his ‘natural superiors’, and has left remaining no other nexus between man and man than naked self-interest, than callous ‘cash payment. It has drowned the most heavenly extacies of religious fervour, of chivalrous enthusiasm, of philistine sentimentalism in the icy water of egotistical calculation.”
(“भांडवलशाहीने जेथेजेथे वर्चस्व मिळविले आहे तेथेतेथे सर्व प्रकारच्या सरंजामदारी, पितृसत्ताक आणि स्वप्नाळू संबंधांचा विनाश घडवून आणला आहे. माणसाला त्याच्या ‘जन्मजात वरिष्ठां’शी जखडून ठेवणारे अनेक प्रकारचे बंध तिने निर्दयपणे तोडून टाकले आहेत आणि नागडा स्वार्थ, भावनाशून्य ‘रोखभाई ठोक व्यवहार’ यांखेरीज दुसरे कोणतेही नाते माणसांमाणसांमध्ये शिल्लक ठेवलेले नाही. पैशाच्या स्वार्थी आकडेमोडीच्या थंड पाण्यात तिने धार्मिक उन्माद, सरंजामशाहीतल्या मानसन्मानाच्या कल्पना, अडाणी भावव्याकुळता या सर्व गोष्टी बुडवून टाकल्या आहेत.’)
मार्क्स आणि एंगल्स यांनी लिहिलेल्या ‘कम्यूनिस्ट मॅनिफेस्टो’मधील (१८५०) वरील उताऱ्यात रंगविलेले भांडवलशाहीचे चित्र तिच्यावर टीका करणारे असले तरी त्यात तिच्या सामाजिक प्रगतिशीलतेचे सूचन दडलेले आहे.
एक सामाजिक-आर्थिक रचना म्हणून भांडवलशाही ही जातिसंस्थेच्या विरोधी टोकावर उभी आहे (किंवा होती). भांडवलशाहीत व्यवसाय निवडण्याची मुभा असते; उलट जातिसंस्थेत आनुवंशिकतेने प्राप्त झालेला व्यवसाय बदलण्यावर बंदी असते. व्यवसाय-स्वातंत्र्य हा व्यक्तिस्वातंत्र्याचाच एक अंश आहे ; जातिसंस्थेत व्यक्तिस्वातंत्र्यावर अनेक मर्यादा येतात. जातिसंस्थेत कोणत्याही परिस्थितीत ‘जात सांभाळणे’ हा मुख्य उद्देश असतो तर भांडवलशाहीत त्याची जागा स्वार्थप्रेरणा घेते. या स्वार्थप्रेरणेचा आविष्कार उपभोक्त्याच्या बाबतीत ‘खर्च केलेल्या पैशातून अधिकात अधिक समाधान’ या स्वरूपात दिसून येतो तर उत्पादकाच्या बाबतीत ‘अधिकात अधिक नफा’ या रूपात प्रकट होतो. याच प्रवृत्तीला मार्क्स आणि एंगल्स यांनी ‘नागडा स्वार्थ’ म्हटले आहे.
उत्पादकाचा हेतू जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा असेल तर तो साहजिकच प्रत्येक उत्पादनसाधन अशा रीतीने निवडील की ज्यामुळे त्याच्या नफ्यात भर पडेल. तेव्हा कामावर माणसे नेमतानासुद्धा तो ती अशा रीतीने निवडेल की त्यांच्या कामामुळे नफ्यात भर पडली पाहिजे. याचा अर्थ असा की कामावर नेमलेल्या व्यक्तीचे कुळ, जात, धर्म, वंश, लिंग इत्यादी काय आहे याचा विचार तो करणार नाही. (वरच्या उताऱ्यातील ‘दुसरा कोणताही बंध… शिल्लक ठेवलेला नाही’.) त्याच्या दृष्टीने ‘कार्यक्षमता’ हाच निवडीचा निकष राहील. माणसाची प्रतिष्ठा त्याच्या गुणावरून ठरेल, त्याच्या सामाजिक दर्जावरून किंवा इतर वैशिष्ट्यावरून ठरणार नाही. या घटनेचा अर्थ फार व्यापक आणि मूलगामी आहे ; तो ‘मूल्यबदला’च्या स्वरूपाचा आहे. जिथे जिथे भांडवलशाहीचा वरचष्मा झाला त्यात्या ठिकाणी हे मूल्य-परिवर्तन कसे झाले हेच शिरोभागी दिलेल्या उताऱ्यात सांगितले आहे.
‘गुण’ या शब्दाचा येथे अर्थ मर्यादित आहे. उत्पादकाच्या दृष्टीने आवश्यक ते शारीरिक किंवा बौद्धिक कौशल्य असा ‘गुण’चा अर्थ आहे. त्याला नैतिक अर्थ नाही. शिवाय केवळ आर्थिक व्यवहारांनी माणसे एकमेकांना जोडली जाणे, पैशावरून माणसाची किंमत ठरणे हे मूल्यही फार उच्च प्रतीचे आहे असे नाही. या दोन्ही बाबी लक्षात घेतल्या तरी एक गोष्ट उरते आणि ती महत्त्वाची आहे. कुळ, जात, पंथ, धर्म इत्यादी अविवेकी आधारांवर माणसाची प्रतिष्ठा ठरण्यापेक्षा, (मर्यादित अर्थाच्याही) ‘गुणा’वर, कौशल्यावर, कर्तृत्वावर ती ठरणे जास्त विवेकीपणाचे आहे. समाजरचना या प्रक्रियेतून पूर्वीपेक्षा जास्त विवेकाधिष्ठित होते हे कबूल करावेच लागेल.
भांडवलशाहीत जातिसंस्था राहील का?
जात हा निकष मागे पडून कार्यक्षमता हा निकष उत्पादकांनी (भांडवलशहांनी) अंगीकारला तर एकाच व्यवसायात अनेक जातींची माणसे एकत्र येतील. त्यांचे बोलण्याचे विषय एक होतील, एकमेकांशी अधिक सहवास घडेल, एकत्र सहली होतील, येणीजाणी वाढतील; थोडक्यात अभिसरण वाढेल. निरनिराळ्या जातींचे आचार-विचार एक होऊ लागतील; वेगळ्या शब्दांत हेच सांगायचे तर आज त्यांच्या परस्परांपासून भिन्न असणाऱ्या संस्कृती जवळ येतील. अशा वातावरणात तरुण स्त्रीपुरुषांचा परस्पर-परिचय होईल, प्रेमसंबंध जमतील आणि जातिविनाशाची निर्णायक खूण म्हणजे आंतरजातीय विवाह होतील. येथे मी कल्पनेला फारच सैल सोडले आहे असा काही वाचकांचा ग्रह होईल. पण अगदी मंद गतीने का होईना आपल्या डोळ्यांसमोर ही प्रक्रिया घडते आहे (आणि घडत आली आहे) असे मला वाटते. सत्तर वर्षांपूर्वी माझ्या थोरल्या भावाचा विवाह एका कोकणस्थ मुलीशी झाला. त्यामुळे घरात तट पडले. आणि सातारच्या ऐक्य वृत्तपत्रात ‘देशस्थ-कोकणस्थ विवाह’ या शीर्षकाने सनसनाटी म्हणावी अशी बातमी छापून आली. आज आमच्या विशाल कुटुंबात मराठा, मारवाडी, कोकणस्थ, क-हाडा, सिंधी सुना आणि दोन गुजराती व एक ख्रिश्चन जावई आहेत. कदाचित् अशी उदाहरणे आणखीही असतील. पूर्वी जातीचा व्यवसाय सोडणारी व्यक्ती वाळीत पडे (बहिष्कृत होई); हे धार्मिक किंवा रूढीचे बंधन आता जवळजवळ नाहीसे झाले आहे.
युरोपातही सामाजिक उच्चनीचतेचे स्तर होते. त्यांची संख्या मात्र कमी होती आणि त्यांना धार्मिक अधिष्ठान नव्हते. त्यामुळे युरोपमधले सामाजिक परिवर्तन ज्या वेगाने झाले त्या वेगाने आपल्याकडे होईल असे नाही. हा वेग वाढविण्यासाठी सर्व प्रकारच्या कौशल्यांचे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत आणि त्यात सर्वांना जातिनिरपेक्षपणे प्रवेश असला पाहिजे. आणखी एक विचार या बाबतीत लक्षात घ्यायला हवा. जात्यंताची आवाहने आजपर्यंत अनेकांनी केली. जी काही जातिबंधने सैल झाली आहेत आणि जे काही अस्पृश्यतानिवारण झाले आहे ते विचारवंतांच्या आवाहनामुळे किती आणि परिस्थितीच्या दडपणामुळे किती असा प्रश्न विचारता येईल आणि कदाचित् ‘बढेशी दडपणामुळे’ असे उत्तर येईल. माणसे सहसा बौद्धिक खातरजमा झाल्यामुळे एखादा आचार स्वीकारीत नाहीत तर परिस्थितीच्या रेट्यामुळे स्वीकारतात. भांडवलशाहीमुळे अशी बाह्य दडपणे निर्माण होतात. बौद्धिक युक्तिवाद या प्रक्रियेला अर्थातच पूरक ठरतो.
शेवटी आणखी एक मुद्दा. माझा वरचा लेख बह्वशी तार्किक पातळीवरचा आहे. त्याला जर व्यापक शास्त्रशुद्ध निरीक्षणांची व अभ्यासाची जोड मिळाली तर निष्कर्ष जास्त ठामपणे काढता येतील. ते काम कुणीतरी करावयास हवे आहे.
[आसु चे एक स्नेही जात व आरक्षण यावर एक विशेषांक घडवीत आहेत. विषमता, तिचे परिणाम, त्यात भांडवली अर्थव्यवस्थेचे योगदान, हेही तपासण्याचा विचार आहे. त्या दोन्ही अंकासाठी स. ह. देशपांड्यांना लेख मागूच, सं.]
स. ह. देशपांडे, सी-२८, गंगाविष्णुसंकुल, प्रतिज्ञा हॉल समोर, कर्वेनगर, पुणे ५२

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.