पुस्तक परीक्षण – कोऽहम्

कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती कथा सांगत नाहीत, विचारात गुरफटत नेतात अन् शेवटी अशा बिंदूवर आणून सोडतात की तुम्हीच तुमचा निर्णय घ्यायला मोकळे असता.

सुरेश द्वादशीवारांची कोऽहम् ही लघुकादंबरी तशी आहे. आत्मशोध हा तिचा विषय आहे. मी कोण आहे, कः अहम् कोऽहम् हा तिचा मूळारंभ आहे. याज्ञवल्क्याने म्हटले होते, पतीसाठी पती प्रिय नसतो, स्वतःसाठी तो प्रिय असतो. पत्नी, पुत्र, कोणीच त्यांच्या त्यांच्यासाठी आपल्याला हवे आहेत असे नसते सर्व काही आत्मार्थे हवे असतात म्हणून हे मैत्रेयी, आत्मा कोण आहे, तो पाहा, तो श्रवण कर, त्याचा विचार कर, तो जाण. कोऽहम् चा नायक राजशेखर स्वतः, स्वतःच्या आत्म्याच्या शोधात आहे. कोऽहम् ची रूपसुंदर नायिका इला ही स्वतःच्या शोधात भटकत असता राजशेखरला भेटते, त्याचे भाषण ऐकते त्याच्याकडून आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल या आशेने त्याच्या आश्रमात निवासाला येते. तिला आपली अन्तेवासी म्हणून राहू द्यावे का, लोकापवादाची पर्वा न केली तरी आपले मन आपल्या ताब्यात राहील का ? अन् समजा ते न राहिले तरी त्याला भिणे अभयसाधकाला साजेसे होईल का? ह्या प्रश्नापाशी राजशेखर येऊन ठेपला आहे.

कादंबरी बंगालमधल्या कालीमठात सुरू होते. स्वामी विवेकानंद कालीमातेच्या पुजाऱ्याला भेटायला जातात अन् बदलून जातात. त्यांच्या थेट प्रश्नाला तितकेच थेट उत्तर रामकृष्ण देतात. ईश्वर दाखवतो म्हणतात. अन् हळूहळू, स्वतःच आपले उत्तर शोधायला त्याला समर्थ करतात. हे सगळे राजशेखरच्या बाबतीत घडते. तोही पश्चिम दिग्विजय करतो. भागिनी निवेदितेप्रमाणे इला स्वामी राजशेखरच्याकडून आत्मबोध करून घ्यायला भारतवासी आश्रमवासी होऊ इच्छिते ही साम्यस्थळे आहेत; पण ती वरवरची आहेत. तसेच तुम्हाला जागोजागी जे कृष्णमूर्ती, रजनीश, अरविंद, चिन्मयानंद ह्यांची आठवण येऊ शकते. पण कोऽहम् आणखी काही सांगते. खूप काही सांगते. खूप काही प्रश्न उपस्थित करते. त्यात तिचे वेगळेपण आहे. अद्वैत वैदान्त सांगणाऱ्या शंकराचार्यांनंतर भारतात तत्त्वशोध संपला का? गेली बाराशे वर्षे भारतात तत्त्वज्ञान कुठे लोपले ? श्रद्धाशरण न होता प्रज्ञाशरण होणे आम्हा भारतीयांना का जमले नाही. प्रज्ञाशरण चार्वाकांचा आवाज आम्ही इतका कसा दडपला ? बौद्ध, जैन दर्शने परागंदा तरी झाली किंवा नाममात्र तरी राहिली असे का? धर्म समाजपरिवर्तनासाठी वापरता येतो का? गांधीबाबा, बाबासाहेब आंबेडकरांनी आपापल्या कृतींनी उत्तरे दिली आहेत. भुकेल्याला धर्म सांगणे त्याचा अपमान आहे, कौर्य आहे हे विवेकानंद म्हणतात त्याचा अर्थ काय ? असे अनेक प्रश्न कादंबरीकार उपस्थित करतात. तुम्हाला जागोजागी निरुत्तर करतात. आपल्या बुद्धीला पटल्यावाचून कशाचा स्वीकार करू नको ही शिकवण देणारी अशिक्षित आई आणि प्रज्ञाशरण चार्वाकांच्या लोकायत दर्शनांचे धडे देणारे हरिप्रसाद चट्टोपाध्याय एकीकडे तर शब्दार्थ कळल्याने गीतार्थ कळत नसतो. प्रतिकूल परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर पडायला अनुकूल अर्थ काढता येणे, काढून दाखवणे हे आपल्या परंपरेतील आचार्यांनी केले. त्यांच्यातले खरे कोण खोटे कोण असा प्रश्न व्यर्थ आहे. हे सांगणारे कालीमठातले स्वामी ! त्यांच्या शिकवणूकीतले नेमके तात्पर्य राजशेखरला निवडायचे आहे.

कोऽहम् चे उत्तर ‘अहं ब्रह्मास्मि’ असे पठण केल्याने मिळत नसते. कळत नसते. माझ्या मीपणाचे, अहंकाराचे विसर्जन सोपे नसते. त्याला एखादाच प्राकृत तुकाराम ‘आपुले मरण पाहिलें म्यां डोळां’ अशा सोप्या अर्थवाही शब्दात ग्रथित करतो. ते त्याचे मर्म असते. वेदान्ताची अद्वैती, द्वैती, विशिष्टाद्वैती, शुद्धाद्वैती मांडणी सांप्रदायिक आहे. एकाने दुसऱ्यावर मात करण्यासाठी ती केली आहे. शाक्त-तांत्रिक, वामाचारी, कापालिक बीभत्सतेकडे नेणारे आहेत. इष्ट-अनिष्ट, युक्त-अयुक्त, शुद्ध-अशुद्ध, सुंदर-असुंदर हे भेद नाकारायचे का? तर आम्ही करतो तसे करा. उगाच नावे का ठेवता? हे त्यांचे म्हणणे स्वैराचाराचे समर्थन आहे. ह्या विचारसरणी बुद्धिभेदी आहेत. कोणत्याही एका धर्माचा आणि परंपरेचा गौरव करण्याचे नाकारून आपले जे अंगीकृत कार्य मनुष्यधर्माचा उद्घोष, शाश्वताचा शोध घेणे हे सोडायचे नाही. अशा निष्कर्षाला राजशेखर येतो. आपल्या बुद्धिबळावर, मनाच्या सुदृढतेवर त्याचा विश्वास अविचल आहे. मातेने आणि स्वामींनी दिलेले संस्काराचे पाथेय आपल्याला विजयी करेल. आणि,मी माणूस आहे !

माझ्यातले माणूसपण जिंकले तरी लांछन ठरणार नाही. अखेर माणूसच ईश्वराला अन् मूल्यांना जन्म देतो ना? अश्या आशावादी सुराने कादंबरीचा शेवट होतो. तत्त्वजिज्ञासा, मनुष्याणां सहस्रेषु एखाद्यालाच करायची प्रेरणा होते. त्या प्रेरितांपैकी एखादाच तिचा पाठपुरावा करतो हे सामाजिक वास्तव आहे. असे असता कोऽहम् ही कादंबरी पर्व, पानिपत किंवा सिंहासन सारख्या पौराणिक, ऐतिहासिक किंवा राजकीय कादंबऱ्यांसारखी सर्वप्रिय होईल अशी अपेक्षा कशी करता येईल? परंतु ह्यामुळे त्या प्रश्नाचे आणि विषयाचे चिरंतनत्व आणि परिश्रमाचे आणि अध्ययनाचे दाय यांचे मोल कसे कमी होईल?

कोऽहम्
लेखक: सुरेश द्वादशीवार, पृष्ठे : १८६ मूल्य १५० रु., विद्या विकास पब्लिशर्स प्रा. लि., नागपूर-१२.
१६, शांतिविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर -४४० ००१. (फोन ९३२५४२३०१०)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.