लिओनार्डो डा व्हिन्ची

सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा एक थोर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होता हे किती जणांना माहीत असेल?
सर्वांत प्रसिद्ध असतील तर त्याची शास्त्रीय संशोधने! त्याच्या चित्रांच्या पसाऱ्यात, अनेक यंत्रांच्या, काही नुसत्या यंत्राच्या प्रयोगात्मक कल्पना तर काही पूर्णपणे विकसित केलेल्या यंत्रांचे आराखडे आणि नोंदी सापडतात. त्यात युद्धसामग्रीपासून ते पाणीपुरवठ्यापर्यंत सर्व प्रश्नांच्या कल्पना दिसतात. यावरून लिओनार्डोची कल्पनेची भरारी त्याच्या काळाच्या कितीतरी पुढे गेलेली होती असे दिसते. यांत हेलिकॉप्टर्स, रणगाडे, मोटारी, विमाने, सायकली, पॅराशूट्स, इ. जे शोध त्याच्या काळाच्या ५०० वर्षानंतर अस्तित्वात आले त्याच्या कल्पनांचे आराखडे सापडतात. परंतु या अभूतपूर्व कल्पना लिओनार्डोने वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न केला असावा असेही दिसत नाही. ज्यांच्या हाती या नोंदी लागल्या त्या कोणीही या कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला असे वाटत नाही. तेच त्याच्या शास्त्रीय लिखाणासंबंधी पण घडले आहे.

त्याचे लिखाण हे आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे उलट्या बाजूने असल्यामुळे त्याला डाव्या हाताने लिहिणे सोपे जात असावे. परंतु त्यामुळे ते सहजासहजी उलगडणे कठीण आहे. परंतु विद्वान अभ्यासूंनी केलेल्या लिओनार्डोच्या वैज्ञानिक लिखाणाच्या अभ्यासावरून दिसते की तो एक वैज्ञानिक मन आणि बुद्धी असलेला संशोधक म्हणून इतिहासात पुढे आलेला आहे. शरीरशास्त्र ते खगोलशास्त्र या विषयांच्या त्याच्या नोंदीवरून विज्ञानात आणि वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधनात तो त्याच्या काळापेक्षा कितीतही पुढे होता याची जाणीव होते. विशेषकरून त्याच्यानंतर ३०० वर्षानंतर म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवातीस ज्या विषयावर अनेक वाद उपस्थित केले गेले अशा भूगर्भशास्त्रातील, तळात असलेल्या गाळाचे (sediment), जमिनीच्या थरांचे (strata), जमिनीत सापडणाऱ्या प्राण्यांचे अथवा वनस्पतींचे अवशेषांचे (fossil), पृथ्वीचे वय इत्यादि विषयांची त्याने चर्चा केलेली दिसते. ‘प्रथमतः निरीक्षण’, हे त्याचे तत्त्व, अनेक शतकानंतर ‘वैज्ञानिक दृष्टिकोण’ हे जे तत्त्व दृढ व्हावयाचे होते त्याला झाकोळून टाकते.

काही का कारणे असेनात पण लिओनार्डोने आपले विचार आपल्या मनातच ठेवलेले दिसतात. पण असेच जर करायचे असेल तर त्याने अनेक नोंदी नोंदवह्यांत का केल्या, हे अनाकलनीय आहे. अनेकांच्या मते त्याला या नोंदवह्या प्रकाशित कराव्यात असे वाटले असण्याची शक्यता आहे. आपल्या सूक्ष्मदृष्टीचा विज्ञानाच्या प्रगतीवर कुठलाही प्रभाव पडू नये याची त्याने पुरेपूर काळजी घेतली आणि आज तो केवळ एक नामवंत चित्रकार कलावंत म्हणून ओळखला जात आहे. त्याच्या कल्पना जर वेळीच प्रकाशात आल्या असत्या तर परिस्थिती किती वेगळी झाली असती याचा आपण फक्त अंदाजच करू शकतो. लिओनार्डोचा जन्म इ.स. (१५ एप्रिल) १४५२ मध्ये टस्कनमधील व्हिन्ची या लहानशा शहरात झाला. त्याची आई कॅटेरिना ही षोडषवर्षीय घरकाम करणारी युवती होती तर त्याचे वडील सर पिरो हे स्थानिक सॉलिसिटर होते. लिओनार्डोच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांनी अल्बेरा नावाच्या स्थानिक स्त्री धनवंतीशी केले तर कॅटेरिनाने ताबडतोब एका स्थानिक गवळ्याशी लग्न केले. त्याच्या संगोपनाची जबाबदारी वडील सर पियरोकडे आली. त्याचे वडील आणि सावत्र आई ह्यांना त्याच्याकडे लक्ष पुरविण्यास फुरसत नव्हती. त्यामुळे त्याचे संगोपन त्याचे आजी-आजोबा आणि चुलते फंसेन्को यांनी केले. लिओनार्डो हा नैसर्गिक देणगी असलेला बालक होता. गायन, सारंगीवादन, अश्वारोहण याकडे त्याचा स्वाभाविक कल होता. गणितामध्ये तर त्यास विशेष रुची होती. तो व्हिन्चीच्या आजूबाजूच्या परिसरात फिरताना वनस्पती, प्राणी यांची रेखाचित्रे, आज जी प्रसिद्ध आहेत, ती चितारण्यासाठी जवळ एक नोंदवही सदैव बाळगत असे.

एव्हाना लिओनार्डोच्या वडिलांना त्यांच्या मुलाच्या कलात्मक प्रतिभेची जाणीव झाली होती. त्यांनी लिओनार्डोला त्याकाळी फ्लोरेन्समध्ये प्रसिद्ध असलेल्या ॲन्ड्रीओ व्हेरोकियोकडे त्याच्या स्टुडिओमध्ये अभ्यासासाठी पाठविले. ॲन्ड्रीओ व्हेरोकियो हा त्या काळी युरोपमध्ये अत्यंत नामवंत असा मूर्तिकार, चित्रकार आणि अलंकार घडविण्यात निष्णात कलाकार होता. लिओनार्डो हा कुशाग्र बुद्धीचा आणि कुठलीही गोष्ट चटकन् आत्मसात करणारा होता. त्याने व्हेरोकियोचे कौशल्य इतक्या वेगाने आत्मसात केले की व्हेरोकियोला हताश होऊन आपल्या चित्रकलेचा त्याग करावा लागला. यावेळेला तो आखूड नाटकीय वस्त्रे-प्रावरणे आणि गुलाबी विजारी परिधान करू लागला. त्यामुळे लोकांनी त्याच्या रंगेलपणाबद्दल तर्कवितर्क सुरू केले. परंतु त्याला बायकांमध्ये रस नसावा असे त्यांच्या नोंदवहीतील नोंदींवरून दिसते. सत्य काही का असेना, आपल्या कल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि आपली कला विकसित करण्याकरिता भरपूर वेळ मिळाला एवढे मात्र खरे.
मिलानच्या वास्तव्याच्या काळात लिओनार्डो चित्रकारी, दरबारी उत्सव, शिल्पकला, तटबंदी, नाल्या, पाणीपुरवठा, आणि इतर तांत्रिक बाबींवर सल्ला देण्यातच व्यस्त राहिला. मिलानच्या वास्तव्यातील त्याचे सर्वांत मोठे कर्तृत्व म्हणजे त्याचे ‘लास्ट सपर’ हे चित्र. आज काहींच्या मते ते सर्वोत्कृष्ट चित्र आहे.

त्याचा सर्वांत वेळखाऊ प्रकल्प होता लुडोव्हिकोचा अश्वारूढ पुतळा. हा प्रकल्प म्हणजे लिओनार्डोच्या अनेक अतिरेकी महत्त्वाकांक्षी अपयशी प्रकल्पांपैकी एक मोठे अपयश होते. जेव्हा त्याची आणि जगप्रसिद्ध शिल्पकार मायकेल अँजेलो याची भेट झाली तेव्हा मायकेल अँजेलोने त्याची खूपच थट्टा केली. त्यामुळे लिओनार्डोने मायकेलला चित्रकलेचे आह्वान दिले. दोघांचेही लढाईच्या प्रसंगावर भित्तिचित्र रंगवण्याचे ठरले. लिओनार्डोने ‘बॅटल मॉफ अँजियारी (Anghiari)’चा देखावा रंगविण्यास सुरुवात केली तर मायकेल अँजेलोने ‘बॅटल ऑफ कॅसियारी’. दोघेही आपला प्रकल्प पुरा करू शकले नाहीत. परंतु ह्या प्रकल्पाच्या तयारीच्या काळात लिओनार्डोने शरीरशास्त्रावर संशोधन करण्यावर आपला बराच वेळ खर्च केला. तो फ्लोरेन्सच्या सँटामारिया नुवा हॉस्पिटलमध्ये जाऊन शरीरावरच्या जखमा तपासू लागला. प्रेतांची चिरफाडदेखील करू लागला. शरीरशास्त्रावरचे त्याचे हस्तलिखित प्रकाशित करण्याचा त्याचा विचार होता. पण तो विचार सिद्धीस जाऊ शकला नाही. राजकीय अस्थैर्यामुळे लिओनार्डो हा कधी फ्लॉरेन्स, कधी रोम, कधी व्हेनिस या शहरांमधून स्थलांतर करीत राहिला. एका शहरामध्ये तो एका वर्षापेक्षा जास्त कधी राहिला नाही. काही वर्षे तो निष्ठुर सीझर बोर्जियाच्या सेवेमध्ये राहिला. या सेवेमध्ये असतानाच तो सीझरच्या जमिनीचे अनेक प्रक्रियांनी सर्वेक्षण करीत होता, त्या आजच्या नकाशे तयार करण्याच्या प्रक्रियांच्या पूर्वसूरी आहेत. १५०३ मध्ये फ्लोरेन्सला कालव्याने समुद्राला जोडण्याच्या मार्गाचे सर्वेक्षण आणि नकाशे त्याने तयार करून दिले. सन १५०५ मध्ये त्याचा ‘बॅटल व अँजियारी’ आणि प्रसिद्ध चित्र ‘मोना लिसा’ मधील रस संपत चालला होता. त्यावेळेला त्याने पक्ष्यांच्या उडण्यावर पुस्तक प्रसिद्ध केले आणि नंतरच्या दोन वर्षात त्याची नोंदवही त्याने विमाने, हेलिकॉप्टर, पॅराशूट यांच्या कल्पनांनी भरून टाकली.
साठ वर्षांचा होईपर्यंत लिओनार्डोला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतर करण्यामुळे थकवा जाणवत चालला होता. सन १५१३ मध्ये रोममधील व्हॅटिकनमध्ये पोपने देऊ केलेली दोन खोल्यांची देणगी त्याने स्वीकारली. लिओनार्डो आपल्याला काहीतरी कामगिरी मिळेल या अपेक्षेने व्हॅटिकनमध्ये ३ वर्षे राहिला. परंतु प्रत्येक वेळेला कमिशन मायकेल अँजेलो आणि ब्रमॅट यांनाच मिळत असे. त्याने काही वेळ दृष्टीसंबंधी कोड्यांबद्दल आणि हवेत उडण्याबद्दल संशोधन करण्यात व्यतीत केला असावा. अखेरीस १५१६ इ.स. मध्ये फ्रान्स चा फ्रांकॉस याचे निमंत्रण स्वीकारून त्याने इटालीला रामराम ठोकला.

फ्रान्समध्ये त्याने आपल्या नोंदवह्यांच्या कामाला प्रारंभ केला. नेमका ह्याच वेळेला त्यास पक्षाघाताचा सौम्यसा झटका आला आणि त्यांत त्याचा उजवा हात काहीसा लुळा पडला. त्यामुळे त्याच्या कामाची गती काहीशी मंदावली. सुदैवाने राजाला त्याच्याकडून मोठ्या कामाची अपेक्षा नव्हती. लिओनार्डोने फक्त नाटकाच्या आणि उत्सवाच्या योजना तयार करून देणे किंवा सिंहाच्या छातीतून भुईकमळाची फुले बाहेर काढणे अशा त-हेच्या यांत्रिक खेळण्याचे आराखडे तयार करणे एवढ्याच अपेक्षा होत्या. फ्रेंच राजा हा लिओनार्डोचा मनापासून चाहता होता. आणि लिओनार्डो आपल्याजवळ आहे ह्याचा त्याला मनापासून आनंद होता. परंतु या चांगल्या राजामुळे लिओनार्डोच्या कामात व्यत्ययही येत असे. कारण मनाला वाटेल तेव्हा लिओनार्डोच्या घराला आणि ॲम्बोइस (Amboise) राजवाड्याला जोडणाऱ्या भुयारातून राजा लिओनार्डोकडे केव्हाही येत असे.

२३ एप्रिल १५१९ मध्ये लिओनार्डो शांतपणे निधन पावला. सेंट फ्लोरेंटीनच्या चर्चमध्ये त्याचा दफनविधी करण्यात आला. हे चर्च फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात नष्ट झाले. त्यातच लिओनार्डोच्या अस्थिपण नष्ट झाल्या. लिओनार्डोचा युवा सोबती कॅन्सेस्को मेलझी दुःखात बुडून गेला. तसाच तो काही महिने तो लिओनार्डोच्या घरात राहिला. शेवटी तो लिओनार्डोची चीजवस्तू आणि नोंदवहीची १३००० पाने एका गाडीत घालून इटालीतील व्हेप्रियो (Vaprio) येथे परतला. मरेपर्यंत त्याने ती पाने सांभाळली. मरताना त्याने ती पाने आपला मुलगा ओरेझिओ (Orazio) याच्या सुपुर्द केली आणि नीट सांभाळण्याची सूचना केली. ओरेझियोला, लिओनार्डोच्या नोंदीमध्ये काही रस नव्हता. त्याने काही पाने माळ्यावरील कपाटात कोंबली तर काही वाटून टाकली. लवकरच ही बातमी सगळीकडे प्रसृत झाली. त्यामुळे खासगी संग्राहकांचा रोख व्हेप्रियोकडे वळला. काहींनी तुकडे घेतले तर काहींनी पाने फाडून लिओनार्डोच्या नोंदवह्या अस्ताव्यस्त करून टाकल्या. आज यांतील काही पाने खाजगी संग्राहकांजवळ तर काही निरनिराळ्या संग्रहालयांत वाटली गेलेली आहेत. यातील प्रसिद्ध ‘Codex Leicester’ हे चित्र प्रसिद्ध मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स् यांनी ३० दशलक्ष डॉलर्सला इ.स. १९९४ मध्ये विकत घेतले. मूळ पानांपैकी जवळजवळ अर्धी पाने नष्ट झाली.

लिओनार्डोची उडणारी यंत्रे
लिओनार्डोच्या नोंदवहीत निरनिराळ्या शोधांच्या आश्चर्यकारक नोंदी आढळतात. जसे घड्याळ, मुद्रणयंत्रे, छिद्र पाडण्याची यंत्रे, बोटी, डायव्हिंग सूटस्, मोटारी आणि रणगाडे. यांत सर्वांत आश्चर्यकारक म्हणजे उडणारी यंत्रे. लिओनार्डोच्या मताने माणसांची आणि प्राण्यांची शरीरे ही एक प्रकारची सेंद्रिय यंत्रेच होत. हा त्याचा विचार त्याच्या शरीरशास्त्रासंबंधी आणि इतर अनेक संशोधनाच्या मुळाशी असावा. पक्ष्यांच्या उडण्याच्या निरीक्षणामुळेच उडणारी यंत्रे प्रत्यक्षात येऊ शकतात ही त्याची धारणा असावी. ‘पक्षी हे निसर्गनियमाप्रमाणे उडणारे उपकरण आहे आणि त्यामुळे माणूस तसे उपकरण तयार करू शकतो.’ अशी नोंद त्याच्या नोंदवहीत आढळते. उडत्या यंत्राचे त्याचे पहिले आराखडे, फडफडणाऱ्या पंखांच्या यंत्रांचे होते. ती ऑमिथॉप्टर्स  (Omithopters) म्हणून ओळखली जात. सन् १४८७ मध्ये त्याने ऑमिथॉप्टरचा आराखडा तयार केला, त्यामध्ये वैमानिक एका चौकटीवर पडून आणि रिकाबीसारख्या असणाऱ्या पॅडलमध्ये पाय अडकवून पॅडलची हालचाल करून पंखांची फडफड करू शकेल अशी योजना होती. आणखी काही वर्षांनंतर त्याने ऑमिथॉप्टरचा आणखी एक आराखडा तयार केला. ती आणखी एक प्रगत कल्पना होती. यांत ऑमिथॉफ्टर सुकाणू आणि उंचावर उडविण्याची यंत्रणा (Elevator) होती. ज्यामुळे वैमानिक उडणाऱ्या यंत्रावर ताबा ठेवू शकेल अशी.

माणसांच्या स्नायूंची शक्ती ही पुरेशी नसल्यामुळे ऑमिथॉप्टर्स हे कधीही प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत याची जाणीव लिओनार्डोला झाली असावी. आणि म्हणूनच त्याने फडफडणाऱ्या पंखाची कल्पना सोडून दिली आणि त्याने ग्लायडरवर काम सुरू केले. पंख आणि खाली हवेचा प्रवाह, (ओघ) यांचा अभ्यास करण्यासाठी त्याने पक्षी आणि खाली पडणारी पाने याचे निरीक्षण सुरू केले. आणि त्यातूनच वाऱ्याची गती मापन करणाऱ्या पहिल्या ‘ॲनेमोमीटर’ (anemometer)चा शोध लागला. मृत्यूच्या १० वर्षे अगोदर लिओनार्डोने ज्याला योग्य अशी नियंत्रणपद्धती (लेपीश्र शा) होती अशा ग्लायडरचा आराखडा तयार केला. त्याने नोंदवहीत नोंद केली ‘हा माणूस आपल्या उजव्या बाजूला उडेल, जर त्याने आपला उजवा हात खाली वाकवला आणि डावा हात पसरला तर, त्याच पद्धतीने तो उजव्या बाजूने डाव्या बाजूला वळेल. याच आराखड्याबरहुकूम विशेषज्ञांनी लिओनार्डोला उपलब्ध होऊ शकले असते असे साहित्य वापरून यंत्रे बनविली तर ही सामग्री वापरून ही यंत्रे केवळ उडूच शकत नाही तर त्यांवर नियंत्रण ठेवता येऊ शकते हेही लिओनार्डोच्या वेळेलाच सिद्ध झाले असते. पण हे साध्य होण्याकरिता १९०३ सालापर्यंत राईट बंधूच्या पहिल्या उड्डाणापर्यंत वाट पाहावी लागली. त्याला ही जाणीव झाली की केवळ पंखांनी उडणे हा काही एकमेव मार्ग नाही. त्याने पंखाच्या तळाशी माणसे बसून हवेत सरळ उडणाऱ्या हेलिकॉप्टरचा आराखडा तयार केला. आजच्या हेलिकॉप्टरप्रमाणे त्यात ‘रोटर ब्लेड्स’ न वापरता ‘स्पायरल स्क्रू’च्या साह्याने विमान वर उडू शकेल. रोटर असलेली खेळण्यातील हेलिकॉप्टरे अनेक शतके उपलब्ध होती. परंतु लिओनार्डो हा गेल्या ५०० वर्षांत पहिला आणि शेवटचा शास्त्रज्ञ होता की ज्याने माणसे हवेत उडण्याच्या यंत्राचा आराखडा तयार केला होता. लिओनार्डोला जाणीव झाली होती की हवेत असे पदार्थ असतात की जे बाक दिलेल्या आकारांना आधार देऊ शकतात. त्याने एक वल्ह्यांसहित बोटीचा आराखडा तयार केला ज्यामुळे वल्ह्याच्या साह्याने वैमानिक हवेत वारे वल्हवू शकेल. परंतु अशा त-हेचे यंत्र हे यशस्वी होऊ शकणारच नव्हते त्यामुळे अनेक शतकानंतर विमानाचा पंखा (प्रॉपेलर्स), आणि रोटर्सचे तत्त्व अस्तित्वात आले.

लिओनार्डोचे शरीरशास्त्र
लिओनार्डोच्या शरीरशास्त्राच्या अभ्यासाचा विज्ञानावर कायमचा ठसा उमटला आहे. दुसऱ्या शतकातील वैद्य गॅलनपासून अनेक वैद्य माणसाच्या शरीरासंबंधी ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करीत होते, लिओनार्डो प्रेतांची चिरफाड करून स्वतः त्याचा अभ्यास करीत होता. हे करणारा तो एकटाच नव्हता तर प्रत्येक कलावंताला आपले शरीरशास्त्र माहीत असायलाच हवे अशी कलावंतांकडून अपेक्षा होती. त्यावेळेला लिओनार्डो फ्लॉरेन्समध्ये असताना अँटोनियो बेनिव्हीनी (Benivieni) या फ्लोरेन्समधील कलावंतांने स्वतः केलेल्या (प्रेतांच्या) चिरफाडीवर प्रबंध लिहिला.
पण लिओनार्डोने त्याच्याही पुढे जाऊन जवळजवळ ३० प्रेतांची चिरफाड करून आणि विविध प्रयोगकरून शरीरातील भाग कसे काम करतात याचे पृथक्करण केले. त्याने अस्वले, गायी, बेडूक, माकडे आणि पक्षी यांचीसुद्धा चिरफाड करून त्यांचे मानवी शरीराशी काय साधर्म्य आहे याचादेखील अभ्यास केला. चित्रीकरणातील लिओनार्डोचे उत्कृष्ट कौशल्य आणि अचूकपणा आणि तंतोतंतपणा याविषयी याची कळकळ यामुळे त्याच्या शरीरशास्त्रावरील चित्रे जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहेत. शरीरातील वेगवेगळ्या थरांच्या चित्रीकरणात त्याने आडव्या छेदाचे (Cross section) जे तंत्र वापरले ते आजही उपयोगात आणले जाते. त्याने स्नायू, अवयव यांच्या विविध कोनातून दिसणाऱ्या रचनेचे जे तंत्र विकसित केले ते नंतर संगणक युगातच अस्तित्वात आले.
लिओनार्डोचा जिव्हाळ्याचा विषय होता ‘डोळा’. डोळा आणि मेंदू हे एकत्र कसे काम करतात हे पाहण्याचे त्याला विशेष आकर्षण होते. ‘ऑप्टिक नर्व्ह’ डोळ्याच्या मागून निघून मेंदूशी कशी संलग्न होते हे पाहणारा तो बहुधा पहिला शरीरशास्त्रज्ञ असावा. शरीरातील शिरा (nerves) या स्नायूंना कश्या जोडलेल्या असतात ह्याचे निरीक्षण करणारादेखील तोच पहिला शरीरशास्त्रज्ञ असावा. अशा त-हेची कल्पना गॅलनच्या शरीरशास्त्रात अंतर्भूत नव्हती. त्याच्या स्नायूंच्या अभ्यासात कल्पकता आणि वैज्ञानिक विश्लेषणात त्याची कलात्मकता ही दृष्टोत्पत्तीस येते. स्नायूंच्या निरनिराळ्या दिशांनी केलेल्या हालचालींनी काय होते याचे निरीक्षण त्याने चेहऱ्यावर रागाची छटा कशी उमटते किंवा हसू कसे फुलते याचा आणि इतर बाबींचा अभ्यासही त्याचा होता. मोना लिसा ‘लास्ट सपर’ प्रमाणे ‘मोना लिसा’ हे देखील लिओनार्डोचे प्रसिद्ध चित्र. अलिकडे मोना लिसा या त्याच्या चित्रावर बरेचसे संशोधन झाले आहे. आणि या संशोधनाचा निष्कर्षही मोठा रंजक आहे.

एकदा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेल्याची घटना घडलेली वाचून वाचकाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. २२ ऑगस्ट १९११ रोजी पॅरिसमधील लुव्ह (Louvre) या संग्रहालयामधील भिंतीवर ज्या जागेवर हे चित्र लावले होते ती जागा रिकामी पाहून म्युझियमचा सहायक व्यवस्थापक (Asstt. curator) भीतीने थिजून गेला. ‘ला जियोकोंडा मोना लिसा’ ह्या नावाने परिचित असलेले हे चित्र भिंतीवरून गायब झाले होते. बेनेडिटने थोडाही वेळ न गमावता पोलिसांना फोन केला. १५ मिनिटाच्या आंत १०० पोलीस लुब्ह संग्रहालयात दाखल झाले. पोलीस दाखल होण्याच्या आधी चित्र इमारतीत असेल असे वाटले होते. पण एका पोलिसाला जिन्यावर जड सोन्याची चौकट (frame) सापडली. पण चौकटीतील लिओनार्डो डा व्हिन्चीने लाकडी चित्रफलकावर रंगवलेले ३० इंच बाय २१ इंच आकाराचे मोना लिसाचे चित्र मोठ्या शिताफीने आणि कौशल्याने काढून घेतले होते. चोरीला गेल्यापासून दोन वर्षेपर्यंत चित्राचा सुगावा लागला नाही. नंतर नोव्हेंबर १९१३ मध्ये फ्लोरेन्सच्या आलफ्रेडो गेरी ह्या कलावस्तूंच्या व्यापाऱ्याला एक पत्र मिळाले. पत्राची सुरुवात होती ‘मी मोना लिसाचे चित्र चोरले आहे.’ पत्राच्या शेवटी लिओनार्ड अशी सही होती. लिओनार्ड हे इटालीतील एक चित्रकार आणि सजावटकार व्हिसेंझो पेरुगिया याचे टोपणनाव होते. हा लुव्हच्या संग्रहालयात १९१० मध्ये असलेल्या चार कामगारांपैकी एक होता. त्यानेच मोनालिसाच्या चित्राची पुन्हा चौकट बनविली होती. ११ डिसेंबर १९१३ ला गेरी पेरुगियाच्या एका स्वस्त असलेल्या हॉटेलच्या खोलीमध्ये पोहोचला. तिथे पेरुगियाने त्याच्या बिछान्याखाली असलेली एक टंक समोर ओढली. त्याच्या खाली असलेला कृत्रिम तळ उघडला. त्यातून त्याने लाल रेशमी कापडाने आच्छादलेली वस्तू बाहेर काढली आणि बिछान्यावर ठेवून रेशमी कापडातून ‘मोना लिसा’ बाहेर काढली. त्यानंतर ते चित्र व्यवस्थितपणे लुव्हच्या संग्रहालयाला परत करण्यात आले. पेरुगियाला अटक करण्यात आली. जून १९१४ मध्ये पेरुगियाने फ्लोरेन्समध्ये आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याबद्दल त्याला १ वर्ष १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली परंतु अपिलात ती सात महिन्यांची करण्यात आली नंतर पहिल्या महायुद्धात सेवा करून तो पॅरिसला परतला. तेथे त्याने नंतर सजावटीला लागणाऱ्या रंगाचे दुकान काढले. ‘मोना लिसाच्या जगप्रसिद्ध चित्रावर बरेचसे संशोधन होऊन त्यातून जे निष्कर्ष काढण्यात आले आहेत ते अतिशय रंजक आहेत. बऱ्याचशा लोकांच्या मताने ते चित्र फ्लोरेटिनचे धनिक व्यापारी फंसेन्स्को डेल गियोकोंडो ह्यांच्या पत्नीचे आहे.

अमेरिकन संगणकतज्ज्ञ कलाकार लिलियन श्वार्टस् आणि आणि मॉडरले हास्पिटलचे रजिस्ट्रार डॉ. डिग्बी क्लेस्टेड यांचे मत काही वेगळेच आहे. त्यांच्या मतानुसार चित्रातील चेहरा हा काही आगळाच संदेश देऊन जातो. हे चित्र लिओनार्डो डा व्हिन्चीच्या चेहऱ्याचे आरशातील प्रतिबिंब असावे. लिओनार्डोच्या नोंदवहीतील नोंदी या आरश्यातील प्रतिबिंबाप्रमाणे आहेत हे जरी खरे असले तरी अशा त-हेने त्याने स्वतःचे स्त्रीवेषधारी चित्र चितारावे हा लोकांना धक्काच होता. खरा धक्का तर पुढेच होता. सन १९११ मध्ये हे चित्र लुव्हच्या संग्रहालयातून चोरीला गेलेले जेव्हा परत मिळाले तेव्हा त्याच्या अस्सलपणाची शहानिशा करण्यासाठी त्याची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. क्ष किरण चाचणीने त्याच्या खरेपणाबद्दल ग्वाही दिली पण त्या चाचणीतून आणखी एक गोष्ट निदर्शनास आली. ती ही की मोना लिसाला एके वेळी दाढी होती आणि ती नंतर रंगाने मिटवून टाकण्यात आली होती. मोना लिसा हे चित्र जर लिओनार्डोची स्वतःची प्रतिमा असेल तर लिओनार्डो हा समजला जातो त्यापेक्षाही असामान्य असला पाहिजे. मिडलसेक्स येथील ॲशफोर्ड हॉस्पिटलमधील सल्लागार डॉ. केनेथ कील यांचे मते मोना लिसाचे उल्हासी स्मित, तिचा युवा चेहरा, तिचे किंचित स्थूल, पण बांधेसूद शरीर आणि ज्या अर्थी तिचा लांब झगा तिच्या मांड्यांच्या खाली लोंबलेला आहे त्या अर्थी चित्रांत चितारलेली स्त्री गर्भवती असावी.

गर्भवती असो किंवा नसो पण प्रतिमा तयार करताना तिची किंवा (त्याची?) तब्येत फारशी चांगली नसावी. तिचे मोहक स्मित हे डॉ. केनेथ आर्डर यांच्या मते एक प्रकारच्या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा (facial palsy) परिणाम असावा. याहीपेक्षा दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिच्या कोपऱ्यात बाकदार झालेल्या ओठांमुळे तिला पुढचे दात नसावेत. डॉ. नाकामुरा या जपानी हृद्रोगतज्ज्ञाच्या मते तिच्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यात असलेल्या पिवळ्या रंगाच्या छटेमुळे प्रतिमेमध्ये असलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलची मात्रा बऱ्याच मोठ्या प्रमाणात असावी. तिला त्या काळच्या आरोग्याला अहितकारक वाटणाऱ्या अन्नामुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येऊन गेला असावा.
मोना लिसाच्या सुंदर चित्राची ही चिरफाड! तिच्याबद्दल आणखी काय म्हणावे! लिओनार्डोचा आत्मा काय म्हणत असेल!

[लेखक नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र-सांस्कृतिक केंद्राचे संचालक या पदावरून निवृत्त झाले आहेत.]
दूरध्वनी क्रमांक : ०२५९-६५१६८०६

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.