सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळाः भाग-१

एक राजकीय आदर्श

‘सार्वभौमता’ ह्या संकल्पनेसारखी ‘सेक्युलॅरिझम’ची एक संकल्पना म्हणून ओळख सहज पटते पण तिची व्याख्या दुष्कर आहे. समाजशास्त्राच्या व राज्यशास्त्राच्या पंडितांत बौद्धिक व्यवहारात ह्या संज्ञेचा सर्रास प्रयोग होत असला तरी ह्या संकल्पनेतला नेमका व्यवच्छेदक अंश कोणता ह्याबद्दल मतभेद आहेत. भिन्न काळी भिन्न देशांत ‘सेक्युलर’ किंवा ‘सेक्युलॅरिझम’ ह्या संज्ञा समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक आशयांनी परिप्लुत झालेल्या आहेत.
“अतीन्द्रिय आणि साक्षात्कारमूलक पूर्वगृहीतांचे ज्यांमधून निर्मूलन केलेले आहे असा स्वयंशासित ज्ञानप्रदेश म्हणजे सेक्युलॅरिझम” अशी व्याख्या करण्यात आली आहे. सामाजिक शास्त्रांच्या (Encyeclopaedia of Social Sciences) ज्ञानकोशातून घेतलेली ही व्याख्यासुद्धा वर्जनात्मक (restrictive) आहे. तिच्यात प्रबोधनोत्तरकाली युरोपात प्रचलित झालेले शब्दप्रयोग आलेले आहेत. युरोपीय भाषांमध्ये धार्मिकतेचे निराकरण (secularisation) हा शब्दप्रयोग इ.स.१६४८ च्या वेस्ट फालियाच्या शांतितहाचे वेळी प्रथम वापरला गेला. तेथे पूर्वी ‘देवस्वम्’ (धर्मसंस्थां)च्या मालकीच्या असलेल्या प्रदेशांवरील हक्क लौकिक राजसत्तांकडे हस्तांतरित केला गेला तेव्हा! ‘दिव्य’ (sacred) ची प्रतियोगी म्हणून ‘लौकिक’ (secularis) ही संज्ञा आधीच प्रचलित होती. तिच्यातून एक प्रकारचा वेगळेपणा, भौतिकापासून-भिन्न म्हणजे ख्रिश्चन, असा वेगळेपणा निर्देशित होत होता. मुळात पूजा-उपासना-तंत्राविषयीचे जे सिद्धान्त त्यांच्या संदर्भात ही संज्ञा आली असली तरी तिला पुढे विसाव्या शतकात अधिकाधिक लौकिक भावार्थ (connotation) लाभला. धर्माच्या विश्वकोशात (Encyclopaedia of Religion) म्हटले आहे की “सेक्युलॅरिझम ही एक जीवनप्रणाली आहे. तिचे पाईक बुद्ध्या जे जे दिव्य, अतीत म्हणविले जाते त्याची सर्व रूपे आणि त्यांनी निबद्ध सर्व आचार-विधि-विधांचा अव्हेर करतात. ती व्यक्तिगत नीतिमत्ता आणि सार्वजनिक लोकयात्रा यांचा आधार म्हणून एक तर धर्मातीत नाहीतर धर्मविरोधी तत्त्वांचा अवलंब करते.”
सेक्युलॅरिझम ह्या संकल्पनेचा जन्म आणि तिचा विकास पाश्चात्त्य जगतातला आहे. तिला समानार्थी भारतीय शब्द प्रायः नाही. एकाही भारतीय भाषेत नाही. संस्कृतात नाही आणि भारतीय उपखंडातल्या कोणत्याही भाषेत सेक्युलॅरिझमच्या पाश्चात्त्य अवधारणेशी तंतोतंत जुळणारा शब्द आढळत नाही. काही शासकीय परिघांमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ ही संज्ञा बिनधोकपणे वापरली जाते पण मूलसंकल्पनावाचक म्हणून तो शब्द असाधु आहे. (conceptually incorrect) आहे. अर्थवाहकतेच्या दृष्टीने दिशाभूल करणारा आहे. भरतभूमीत धर्म ही संज्ञा सकलमंगलगुणनिधान किंवा शुभाची बीजभूत अशा अर्थाची असून ती उपासना संप्रदायापुरती (रिलिजन) सीमित नाही. पश्चिमेत मात्र तो शब्द तसा आहे. धर्म आपल्या कक्षेत साधु-असाधु, न्याय, नीती, सदाचार, सुसंघात (good order) आणि सदसद्विवेक अशा आणखी कितीतरी तत्त्वांचा अंतर्भाव करतो. ह्या सगळ्या मानवतारक्षक मूलभूत मूल्यांनी विवर्जित अशी राज्ययंत्रणा असणे ही कल्पनाच मनाला सहन होणारी नाही.
भारतीयांचा धर्म तर त्यांच्या रोमारोमांत भिनलेला, अंतरंगांशी एकरूप झालेला आहे. पाळण्यापासून अंतकाळापर्यंत त्यांचे जीवन धर्मात घोळलेले आहे. पाश्चात्त्य सेक्युलॅरिझमचे अंतरंग म्हणा किंवा त्याचा आशय म्हणा उदारमतवादाकडे झुकाव असणे असा असेल, आणि आपले उपासना-संप्रदाय दुसऱ्यांवर न लादणे (सक्तीने म्हणा किंवा सामोपचाराने म्हणा) असे असेल तर तो सेक्युलॅरिझम आमच्या ओळखीचा आहे. त्याचे ईषद्दर्शन (glimpses) वारंवार आपल्याला समग्र भारतीय इतिहासात होते. सनातन धर्माचा (ही संज्ञा मी ‘हिंदु-धर्म’ ह्या शब्दाऐवजी पसंत करतो.) सर्वत्र जयजयकार चालू असतानादेखील त्याच्या मुख्य स्राशी विसंवादी असलेली प्रमेये ना मुळातच खुडली गेली ना द्वेषाने दडपली गेली. उलट उत्साहाने धर्मविवाद करून प्रतिवादी तत्त्वे आणि विरोधी विचारसरणीवर बौद्धिक विजय संपादण्याचे प्रयत्न झाले. वाद-विवाद समर्श (dialectic) ह्यांचा अवलंब केला गेला. भारतीय तत्त्वचिंतकांनी प्रस्थापित-विरोधी, विद्रोही विचारधारांचे तेवढ्याच सहजपणे स्वागत केले, चार्वाक, बौद्ध आणि जैन मत-पंथ देखील मान्यताप्राप्त तत्त्वदर्शने म्हणून प्रतिष्ठा पावली.
भारतीय तत्त्वदर्शनांचा इतिहास ह्याचा साक्षी आहे की आपाततः निषेध-प्रतिषेधाचे प्राबल्य दिसत असले तरी विचारवंत समन्वयवादी राहिले. ज्ञान आणि कर्म, साकार आणि निराकार अशा कित्येक संघर्षप्रणाली भारतीय तत्त्वविमर्शाच्या विशाल छत्रच्छायेत बहरल्या. ही समन्वयवादी वृत्ती आणि सामावून घेण्याची आकांक्षा आणि असा आग्रह ह्यांतून सेक्युलॅरिझमचा भारतीय तोंडवळा आकाराला आला. भारतीय माणसाला सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मापासून कायमची फारकत असे कधीच वाटले नाही. त्याला धर्म ही सदैव वांछनीय-गोष्ट (पुरुषार्थ) वाटली आहे. तिच्या प्राप्तिद्वारे त्याला जीवनाची परिपूर्णता साधायची असते. व्यक्तिशः तद्वत् सगूहशः !
देशातील राजकीय चळवळी, ज्यांचे पर्यवसान देशांच्या फाळणीत झाले, त्यांच्या आघात-प्रत्याघातांचे कधी न बुजणारे घाव देशाची घटना बनविणाऱ्यांवर झाले. गांधीजी अन् नेहरू जे भारतीय राजकारणाच्या कुरुक्षेत्रावर एखाद्या अधिनायकाच्या तोलाने वावरले ह्यांनी भारतातील राजकीय तद्वत सामाजिक विचार-विमर्शाला गती दिली, आपल्या उच्च आध्यात्मिक पातळीला साजेशी गांधीजींनी भूमिका घेतली की, सेक्युलॅरिझम म्हणजे सर्वधर्मसमभाव अर्थात सर्वधर्मांप्रति समान आदर.
जवाहरलाल नेहरू स्वयंघोषित अज्ञेयवादी, त्यांनी उत्साहभराने ही संकल्पनात्मक दिशा घेतली आणि वाटचाल सुरू केली. वास्तविक ही (भारतीय) सेक्युलॅरिझमची संकल्पना आकार-विस्तारबळाने तिच्या युरोपीय भावंडांपेक्षा वेगळी होती. योपीय इतिहासाचे सूक्ष्म अभ्यासक ह्या नात्याने नेहरू राज्यशासन आणि धर्मसंप्रदाय ह्यांच्या सायुज्यतेच्या दुष्परिणामांशी चांगलेच अवगत होते. त्यांच्या आकलनातले सेक्युलर राज्य म्हणजे ‘धर्म जेथे उपहासविषय असतो’ ते खासच नव्हते. त्यांना अभिप्रेत होते धर्माचे नि विवेकाचे स्वातंत्र्य त्यात अर्थात् धर्माला नाकारणाऱ्यांचेही स्वातंत्र्य आले. मात्र हे स्वातंत्र्य घेणाऱ्यांनी राज्यसंकल्पनेच्या मूलभूत धारणांमध्ये लुडबूड करता नये. हा उघडच अविचल चिरंतनाला भंगुर भवतालाशी जोडण्याचा, आदर्शाला व्यवहाराची सांगड घालण्याचा यत्न होता. हे विसंवादींना संवादी बनविण्याचे काम होते.
बहुधर्मी समाजात, राजकीय मूल्य म्हणून सेक्युलॅरिझमचा अवलंब करणे ही व्यावहारिक गरजेपोटी दिली गेलेली एक सवलत होती. (फाळणीच्या) तात्कालिक परिस्थितीने बावरलेल्या बहुसंख्य आणि अल्पसंख्य गटांना भयाने घेरले असताना दोघांनाही दिलासा देणारी समानतादर्शक पूर्वगृहीते आश्वासक शब्दांत मांडणे गरजेचे होते. ह्या सत्त्वपरीक्षेच्या काळात भारतीय तोंडवळा असलेला सेक्युलॅरिझम जन्माला आला. तो समोर उभ्या ठाकलेल्या आह्वानांना दिला गेलेला भारतीय प्रतिसाद होता. त्याचे वर्णन स्वतःचा वेगळेपणा जपणाऱ्या गटांना विवेकाधिष्ठित लोकशाहीत परिवर्तित होताना लाभलेला सहजीवनाचा तोंडवळा असे केले गेले.
स्वातंत्र्योत्तर भारतात, “राजनीती आणि शिक्षण ह्या गोष्टी धर्मापासून दूर राखल्या जाव्यात’ अशी जवाहरलाल नेहरूंची सेक्युलॅरिझमची जाण होती. तसेच धर्म ही व्यक्तीची खाजगी बाब असावी, हे त्यांचे मत, प्रभावी बनले. त्याचा स्वाभाविक उपसिद्धान्त असा की ‘सर्व धर्मांना सारखाच आदर दिला जावा आणि कोणत्याही धर्माच्या अनुयायाला समान संधी मिळावी.’ बहधर्मीय व बहविध जातींत वाटलेल्या समाजाला सेक्युलॅरिझम ही आपल्या जीवनयात्रेस्तव एक नितान्त गरजेची गोष्ट आहे. जर विभिन्न गटांचा संघात जे गट परस्परांशी कमीत कमी संबंधात येणारे आहेत, परस्पर किमान विश्वासाच्या बळावर एकत्र राहणारे आहेत अशांचा संघात सक्षम व्हायचा असेल तर त्यांच्यात वाजवी समानता समानाधिकाराची चौकट असणारी राजकीय व्यवस्था उदयाला येणे अवश्य आहे.
धर्म हे जेथे दैनंदिन जिणे आहे, ते एखादे समाज-शास्त्रीय नाट्यमय रूपांतरण (dramatization) नव्हे तेथे सेक्युलॅरिझमचे तत्त्व आणि धर्मनिष्ठा ह्यांच्यात अंगभूत (रचनात्मक) वेगळेपण असते असे न मानता ती अशी व्यवस्था मानणे की जिच्यात विभिन्न गटसमूहांची ओळख कायम राखली जाऊन ते यदृच्छेने (contingently) धार्मिक असतात आणि तिच्यात सर्व गट समानतेचा लाभ घेतात. हा झाला गांधीप्रणीत सेक्युलॅरिझम. प्रत्यक्षात भारतीय सेक्युलॅरिझमला हा जो व्यावहारिक तोंडवळा लाभला आहे धार्मिक वर्गवारीचे राजकारणातून समूळ उच्चाटन होणे नव्हे तर राजकीय चौकटीत धार्मिक समभाव स्थापणे हा ह्यातून गांधीजींचे चातुर्य दिसून येते.
विनोबाजी आपले समकालीन श्रेष्ठ विचारवंत ते सेक्युलॅरिझम अर्थात् सर्वधर्मसमभावाचे वर्णन असे करतात:
“मी मानतो की सर्वधर्मसमभावाची चार अवच्छेदक लक्षणे आहेत, पहिले स्वधर्माप्रति पूर्ण आस्था, दुसरे सर्वधर्माप्रति आदरभाव, तिसरे स्वधर्माच्या सुधारणेची तयारी आणि चवथे आधीच्या तिहींपासून निष्पन्न होणारे म्हणजे अधर्माला विरोध. जेव्हा हे सर्व अवच्छेदक घटक एकत्र येतात तेव्हा सर्वधर्मसमभाव येतो.”
पूर्वपंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी हे सार्वजनिकरीत्या जाहीर केले होते की, धर्मनिरपेक्षता हे जे सेक्युलॅरिझमचे हिंदी समानार्थक पद ज्याचा वाच्यार्थ होतो धर्माच्या बाबतीत उदासीनता अथवा धार्मिक अलिप्तता तो काटेकोर नाही किंवा बिनचूक नाही. त्या म्हणाल्या की भारतीय सेक्युलॅरिझम हा सर्वधर्माबद्दल सारखीच आस्था बाळगणे ह्यात आहे. संक्षेपाने सांगायचे तर, सेक्युलर राज्याचे अवश्यंभावी घटक म्हणजे पुढील गोष्टी : १) धर्माच्या बाबतीत सर्व नागरिकांना सदसद्विवेकाने वागण्याचे स्वातंत्र्य असल्याची हमी राज्याने देणे. २) धर्माच्या आधारावर व्यक्ती-व्यक्तींमध्ये भेदभाव न करणे. ह्याचा अर्थ असा की कायद्यासमोर सर्व समान आहेत. सर्व अधिकारपदे सर्वांना सारखीच मोकळी आहेत. ३) धर्माच्या बाबींमध्ये राज्याचा काहीही संबंध नसणे अर्थात् त्याने धार्मिक बाबीत लुडबूड न करणे. (अपूर्ण)
[ भवन्स जर्नल, मुंबई ह्यांच्या सौजन्याने (नोव्हेंबर १५, २००७ च्या अंकातील Indian Secularism — APolitical Ideal ह्या लेखाचा अनुवाद)]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.