आंबटशौकिनांसाठी ?

ही एक सत्यघटना आहे. स्थळ: पुण्यातल्या एका स्त्री-रोगतज्ज्ञाचा दवाखाना. वेळ: संध्याकाळची
… तो (आणि ती) दोघंही कनिष्ठ महाविद्यालयात शिकत होती… ओळखीतून सहवास.. प्रेम या पायऱ्या त्यांनी ओलांडल्या होत्या…. दरम्यान एक भलताच पेच उभा राहिला. आपल्याला दिवस गेले आहेत अशी या मुलीची समजूत झाली… आपला हा जीव संपवणं हाच एकमेव मार्ग असं मानण्यापर्यंत तिची मजल गेली. … डॉ. नी तिला एकच प्रश्न विचारला, “तुझा आणि त्याचा संबंध कधी आला होता?” तिला तो प्रश्न समजला नाही. अधिक फोड करून सांगताच ती तिरीमिरीनं म्हणाली, “हे काय भलतंच विचारणं डॉक्टर ? मी काय तुम्हाला तसली घाणेरडी मुलगी वाटते?…
“मग दिवस गेल्याचा संशय तुला कशावरून आला?” “दीड महिन्यात पाळी आलेली नाही. आणि गेले वर्षभर आम्ही रोज संध्याकाळी हॉटेलात जायचो, मी त्याचं उष्टं रोज खायची, त्यावरून…” सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजात इतकं अज्ञान असू शकतं. उष्टं खाल्ल्यानं दिवस राहतात असं एखादीला वाटू शकतं… याचा विचार केला की लैंगिक व्यवहारांची शास्त्रोक्त माहिती देण्याची गरज भासू लागते.
[डॉ. वैजयंती खानविलकर व मंगला गोडबोले ह्यांच्या वयात येताना या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून, साभार.]