संपादकीय संवाद ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक,
स.न.वि.वि.
विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, क्वचित् लेखकही हा प्रश्न विचारत असतातच. कधी कधी तुम्ही समजता तो विवेकवादच नाही असे उद्गारही कोणी काढतात. “तुमच्या विवेकवादात भलेही ते बसत असेल, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग आहे.” म्हणूनही मतभेदांची वाट लावली जाते. ज्याला ग्यानबाचा विवेकवाद म्हणता येईल तो काय असेल बरे?
विवेकवाद ही नैतिक आचरणामागची विचारसरणी आहे, हे उघड आहे. आपण विवेकाने वागावे हे म्हणणे विवेकवाद आहे. विवेक म्हणजे भेद करण्याची शक्ती. सार-असार, सत्य-असत्य, सद्-असद् विवेक करून वागले पाहिजे. म्हणजे जे रूढीने आले तेच भले असे मानू नये. परंपरेची चिकित्सा करावी. ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ असे करू नये. धर्म-शास्त्र म्हणून जे चालत आले त्याचीही शहानिशा करावी. बुद्धी वापरावी. आंधळेपणाने, आपली वडिलोपार्जित विहीर आहे म्हणून खारट असले तरी तिचेच पाणी प्यावे असे बिनडोकपणे ठरवू नये.
जे सत्य नाही, ज्याला प्रमाण नाही, ते सत्य मानू नये. स्वीकारू नये. सत्यासत्याची खूण काय ? केवळ मनाची ग्वाही पुरे नाही. भूताची हवी. भूतमात्र म्हणजे उत्पन्न प्राणिजात, हा अर्थ जसा खरा तसा भूत म्हणजे अस्तित्वात आलेले हाही अर्थ आहे. भौतिक म्हणजे भूतविषयक. भूताचे. वास्तविक. काल्पनिकाच्या विरुद्ध. म्हणजे खरे. म्हणजेच तथ्य. यथाभूत-भौतिक असेल तसे तथा विधान असणे ह्यात तथात्व आहे. तथ्य आहे. वस्तुस्थितीशी जुळणे आहे. सत्-असत् हे भेद वागणुकीलाही लागू करतात. जे सत् वर्तन ते सद्वर्तन. जो सत् आचार तो सदाचार, साधु आचार! सदसद्विवेक करून वागावे. तसे वागण्याचा नियम करावा. हा विवेकवाद आहे. काय करावे, कसे वागावे हे नीतीचे नियम सांगतात. पण नीतिनियम आपल्या सत्य-असत्याच्या ज्ञानावर अवलंबून असतात. तव्य हे तथ्यावलंबी आहे. ( सहीं ळाश्रिळशी लरप) हा नीतिशास्त्राचा सिद्धान्त आहे. ‘तव्य’ हा प्रत्यय बंधकतेचा निदर्शक आहे. प्राप्तव्य, जे मिळविलेच पाहिजे ते. कर्तव्य, जे केलेच पाहिजे ते. अर्थात् ते शक्य असेल तरच ते करता येईल. दोनशे वर्षे जगणे हे शक्यच नसेल तर दोनशे वर्षे जगावे हे म्हणणे व्यर्थ आहे. सत्याचा सत्यज्ञानाचा, वर्तणुकीशी सदाचाराशी असा संबंध आहे. आधार-आधेय संबंध आहे.
आता, सगळे सत्य इंद्रियविज्ञानाने कळत नाही. मग अनुमान करावे. इंद्रियप्रत्यक्ष व अनुमान ही दोनच ज्ञानसाधने म्हणून स्वीकारणे ह्यात विवेक आहे. आप्तवचन, शब्दप्रामाण्य मानणे, पत्करणे हे विवेकवादात बसत नाही. आपल्याला हे कळते की, आपल्यास अनंत इच्छा असतात पण त्या सर्वांची पूर्ती शक्य नाही. म्हणून तारतम्य ठेवून इच्छा कराव्यात. अमर होणे अशक्य असेल पण चिरंजीव होणे शक्य आहे.
मग दीर्घायुष्य चिंतावे. इहलोक दिसतो. अनुभवास येतो. परलोक अज्ञेय आहे. म्हणून ध्रुव सोडून अध्रुवाच्या मागे जाऊ नये. इहलोकाची मर्यादा स्वीकारावी. मला सुखाची इच्छा होते तशी इतरांनाही होते म्हणून सर्वांचा सुखाचा अधिकार मान्य करावा. स्वतःच्या बाबतीत इतरांशी पक्षपात करू नये.
प्रत्येकाला सुख संपादण्याचा अधिकार आहे तसा त्यासाठी प्रयत्न करण्याचीही मोकळीक त्याला आहे. त्याला, मला सर्वांना स्वातंत्र्य आहे. एकमेकांच्या स्वातंत्र्याला बाधा न आणता आपण आपले स्वातंत्र्य उपभोगावे.
इहलोकाच्या कक्षेत, समता, स्वातंत्र्य, न्यायबुद्धी ठेवून जीवन जगावे. हा ग्यानबाचा विवेकवाद आहे. स्वातंत्र्य-चळवळीत पडलेल्यांचे दोन वर्ग होते. एक जहाल, दुसरा मवाळ. विवेकी चळवळ्यांचेही दोन वर्ग पडतात. उग्र व अनुग्र. उग्र विवेकवादात तडजोड नाही. अपवाद नाही. मार्दव नाही. म्हणजे असे;
देहाव्यतिरिक्त मी, म्हणजे माझा आत्मा, नाही. असल्याचे प्रमाण मिळत नाही. अर्थात् प्रत्यक्ष वा अनुमानाने. म्हणून देहभिन्न आत्मा नाही. मरणोत्तर त्याला अस्तित्व नाही. इहलोकाच्या बाहेर परलोक स्वर्ग नाही. त्याला प्रमाण नाही. जन्ममृत्यु नसलेली अवस्था, आत्म्याचा मोक्ष, मुक्तावस्था ह्या सगळ्या कल्पना आहेत. खऱ्या गोष्टी नाहीत.
जगताचा कोणी नियन्ता नाही. निर्माता नाही. नीति-अनीतीचा रक्षक, पापपुण्याचा निवाडा करणारा न्यायाधीश आणि फळे देणारा सर्वशक्तिमान आत्मा परम आत्मा असा कोणी नाही. असल्याचे प्रमाण नाही. परमात्माप्राप्तीचा मार्ग म्हणतात तो धर्म, तर स्वार्थपूर्तीचा एक प्रकार दिसतो. मी तुला नवस बोलतो, अमुक प्रकारे पूजा अर्चा, स्तुति-प्रशंसा करतो. तू प्रसन्न हो. मला हा-हा मोबदला दे. तुझी कृपा असू दे. मी तुझा प्रशंसक आहे. भक्त आहे. एवढ्याचसाठी तू मला मदत कर. माझे भले कर. हे म्हणणे ज्या धर्माला मान्य आहे तो देवाणघेवाण करणारा धर्म विवेकात बसत नाही. सकाम भक्ती ही वाणिज्यवृत्ती आहे. त्यात काय धार्मिक आहे ? काय नैतिक आहे? असा पक्ष उग्र विवेकवादाचा आहे. ह्या पक्षाचे आहे तसे वागणे कर्मठ-विवेकवादी होईल. त्याला मोठे मनोधैर्य लागते. नीति सदाचार हा आपला आपणच भला आहे. (तशि ळी ळीी पशुरीव). त्याच्या पालनाने दुसरे काही मिळते किंवा मिळवावे असे नाही.
तुम्ही सर्व मानव समान मानत असल्यामुळे स्वजन व परजन, स्वदेश व परदेश, स्वकीय व परकीय असे भेदभावमूलक वागणे विवेकवादी नीतीत बसणार नाही. भक्तीला विवेकवादात वाव नाही. देवभक्तीला नाही की देशभक्तीला नाही. भक्ती हे मूल्यच नाही. आता व्यवहारात इतके कडक वागणे सगळ्यांना अगदी विवेकवाद्यांनाही साधते असे नाही. स्वदेश, स्वभाषा, स्वजन हे भेद करून वागावे लागते, वाटते. ईश्वरावर विश्वास नाही पण घरी जेव्हा पूजा अर्चा होते तेव्हा जो टाळ्या वाजवतो, आरती म्हणतो असा विवेकवादी असू शकतो काय ? कुटुंबात इतरांनाही आपल्या इतकाच अधिकार असेल, मतस्वातंत्र्य असेल तर तुम्ही कर्ते आहात, वडील आहात म्हणूनच त्यांचेवर तुमची मते लादू शकत नाही हे खरे. आणि घरचे जुने रीति-रिवाज, सण-वार, नवरात्रे-पारायणे ही थांबवू शकत नाही हेही खरे, पण त्यांच्यात सामील न होणे तुम्हाला शक्य आहे. तेही तुम्ही भिडेखातर करत नाही. मनापासून नसेल पण उपचारादाखल त्यात सामील होताना दिसता, तर अशा विवेकवाद्यास आपण काय नाव द्यावे? अनुग्र विवेकवादी, मवाळ सुधारक ?
टिळक-आगरकर, ह्यांचे समकालीन ज्येष्ठ सुधारक न्यायमूर्ती रानडे विधवा-विवाहाचे पुरस्कर्ते होते. स्वतःवर वेळ आली तेव्हा त्यांनी ३५ वर्षांचे बिजवर असून ११ वर्षांच्या कुमारिकेशी लग्न लावले. वडिलांची आज्ञा मोडू नये, त्यांना दुखवू नये म्हणून! त्यांना आणि त्यांच्यासारख्या नवमतवाद्यांना बोलके सुधारक, परस्पर सुधारक म्हणून निंदा सहन करावी लागली हा इतिहास आहे.
लग्नकार्य ही घरगुती बाब आहे. ज्याची त्याने ती साधेपणाने पार पाडावी असे मत असणारा सुधारक ज्या लग्नात थाट-माट, उधळपट्टी आहे तेथे हजेरी लावतो. ती त्याने लावावी की नाही? सामाजिक शिष्टाचार म्हणून सामील व्हावे की बहिष्कार करावा ? स्वतःच्या मुलाबाळांच्या लग्नकार्यात शेकडो हजारो आमंत्रितांच्या मेजवान्या उठवाव्यात हे विवेकवादात बसते का ? सुधारकी साधेपणाच्या पुरस्कारात बसते का? ‘नाही’ हे सत्वर उत्तर उग्र विवेकवादी देईल. अनुग्र म्हणेल ह्या सुधारकाचा उद्योग-व्यवसाय असा आहे की त्याचा हजारो लहानमोठ्यांशी नित्यसंबंध येतो. त्यांच्या कार्यप्रसंगात ह्याला जावे लागते. त्यामुळे आपल्या घरच्या कार्यात त्याला इतरांना बोलवावेच लागते. म्हणून त्याचे वागणे क्षम्य समजावे. कारण त्याची वृत्ती पूर्णपणे विवेकवादी आहे. खुद्द आगरकर वडील असेतोवर गंध लावीत. सन्ध्यावंदन करून ब्राह्मणधर्म पाळीत, पाळताना दिसत.
निष्कर्ष हा की विवेकवाद हा एक मार्ग आहे. त्यावर वाटचाल करून काही पुष्कळ पुढे गेलेले असतील. काही चार पावले चालले असतील. मनोमन पटलेले तसेच जीवनात आणण्याचा, आचरण्याचा प्रयत्नही त्या त्या प्रमाणात प्रशंसनीय म्हणावा लागेल.
‘आपण विवेकाच्या वाटेवर एकतरी पाऊल टाकले आहे का ? हा खरा प्रश्न आहे. कळावे, लोभ असावा हे विनंती.
ता.क.: पुढील अंकापासून ह्या जागी आपली भेट होणार नाही. कळावे.
आपला
प्र.ब.कुळकर्णी