धक्का देणारी विधाने

पूर्वीच्या काळी वंशावरून माणसांना कमी दर्जाचे ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. आजदेखील तसे अजून चालू असेल. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना मानवी व्यवहाराचे मानदंड म्हणून स्वीकारण्यात आले. कोणताही मानव-समूह समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना लायक आहे असे सिद्ध करण्यासाठी मग विविध देशांत राहणारे मानवसमूह हे बौद्धिक, वैचारिक व नैतिक क्षमतेच्या बाबतीत समान आहेत असे गृहीत धरण्यात आले. या गृहीत कृत्यालाच पुढे एक प्रकारचे नैतिक वलय प्राप्त झाले. खरे म्हणजे असे गृहीत धरण्याची काही आवश्यकता नव्हती. प्रत्येक माणूस-मग तो कोणत्याही वंशाचा, देशाचा असो, तो केवळ माणूस आहे म्हणूनच समता, स्वातंत्र्य व बंधुता यांना पात्र आहे या विधानाला कोणताही बाह्य आधार देण्याची आवश्यकता नाही. ते एक स्वयंस्पष्ट मूल्य आहे. तरीही हे आंतर वंशीय बौद्धिक समानतेचे गृहीतकृत्य मानण्यात आले, इतकेच नाही, तर त्याच्या भोवती एक पावित्र्याचे, नैतिकतेचे, मानवतेचे वलय निर्माण झाले. ही आंतर-वंशीय समानता गृहीत धरलेली आहे. ती शास्त्रीय संशोधनाने सत्य ठरलेली नाही, ही गोष्टच हळू हळू सर्वजण विसरून गेले. इतके विसरले, की त्याविषयी शंका व्यक्त करणे हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे असे धरून, नुकतेच वॅटसन नावाच्या शास्त्रज्ञाला शिक्षा करण्यात आली म्हणजे त्याला कामावरून कमी करण्यात आले!
हजारो वर्षे वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या वातावरणात, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वाढलेले मानवसमूह उत्क्रांत होत परस्परांपासून विविध रीत्या भिन्न होत जातात. शारीरिक दृष्ट्या वर्ण, उंची, चेहेऱ्याची ठेवण, केसांचे प्रकार यांमध्ये वांशिक फरक आहेत. शरीरांतर्गत क्रियांमध्ये (मेटॅबोलिझम्) फरक आहेत. मग मेंदूच्या क्रियांमध्ये ज्यांमध्ये विचार, भावना, बुद्धीचे विविध प्रकार, नियम पाळण्याची/मोडण्याची वृत्ती, सहकार्याने काम करण्याची वृत्ती, संस्था तयार करणे व नंतर चालवणे, समाज-व्यवहाराची मूल्ये निर्माण करणे, त्यांपैकी कोणती मूल्ये प्रधान मानावयाची ते ठरवणे व प्रत्यक्ष व्यवहारात स्वार्थ व मूल्ये यांची सांगड घालणे – इत्यादि इत्यादि अनेक गोष्टी येतात काहीच वांशिक व प्रादेशिक फरक असणार नाहीत असे मानणे म्हणजे एक प्रकारचा भोळसटपणा, एक प्रकारची अंधश्रद्धाच होय. उलट, असे फरक असणारच असे धरून चालणे सयुक्तिक आहे जोपर्यंत असे फरक नाहीतच असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाही तोपर्यंत तरी. अर्थात् या मेंदूच्या क्रियांचे मोजमाप करणे ही शास्त्राला देखील फार कठीण गोष्ट आहे. शिवाय असे फरक सापडले तरी ते आनुवंशिक (जेनेटिक) आहेत की गर्भावस्थेतील व नंतरच्या परिस्थितीमुळे निर्माण झाले आहेत (अॅक्वायर्ड) हे ठरवणे आणखीच अवघड आहे. जसे फरक आहे हे सिद्ध करणे अवघड आहे, तसेच फरक नाही हे देखील सिद्ध करणे अवघड आहे. अशावेळी “मेंदूच्या क्रियांमध्ये वांशिक व प्रादेशिक फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही’ हे विधान अधिक सयुक्तिक म्हणून स्वीकारार्ह वाटते. अशा फरकांना उच्च-नीच, चांगले-वाईट, पुढारलेले-मागासलेले अशी विशेषणे न लावणे ही मात्र आपली माणूस म्हणून नैतिक जबाबदारी आहे.
“मेंदूच्या क्रियांमध्ये वांशिक व प्रादेशिक फरक असण्याची शक्यता नाकारता येत नाही’ हे विधान जर आपण सयुक्तिक म्हणून स्वीकारले तर वॅटसन या शास्त्रज्ञाने “आफ्रिकेतील माणसांची सर्वसाधारण बुद्धिमत्ता अँग्लो सॅकसन माणसापेक्षा कमी असते असे माझे निरीक्षण आहे’ असे जे विधान केले आहे ते फार गर्हणीय, अनैतिक व मानवी मूल्यांना पायदळी तुडवणारे असे मानण्याचे कारण दिसत नाही. त्याबद्दल गदारोळ उठवून, त्याला (वॅटसनला) कामावरून काढून टाकणे म्हणजे न केलेल्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होय. अशा प्रकारची आपली मते व निरीक्षणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे, वॅटसन सारख्या शास्त्रज्ञाला तर हवेच हवे. या स्वातंत्र्यावर बंधन घालून मुस्कटदाबी करून, सत्यशोधनास काही मदत होत नाही, किंवा सर्व वंशांची बुद्धिमत्ता समान असते असेही सिद्ध होत नाही.
एखाद्या मानव-समूहाला हजारो वर्षे विशिष्ट परिस्थितीत रहायला लागले, तर त्या समूहाची उत्क्रांती विशिष्ट रीतीने होऊन त्यामुळे त्या समूहाची सर्वसाधारण बुद्धी-पातळी वाढते हे अस्कनाझी ज्यूंच्या बाबतीत सिद्ध निरीक्षण आहे. युरोपातील (अस्कनाझी) ज्यूंना हजारपेक्षा जास्त वर्षे बरेच धंदे, व्यवसाय करायला बंदी होती. सावकारी (बँकिंग) व व्यापार हे दोनच व्यवसाय त्यांना प्रामुख्याने खुले होते. या व्यवसायांमध्ये (शेतीच्या तुलनेत) बुद्धीची जरुरी जास्त असते. त्यामुळे हशार ज्यू अधिक श्रीमंत झाले, त्यांना अधिक मुले झाली व अधिक जगली, हशार नसलेले ज्यू या सर्व बाबतींत मागे पडले, व त्यामुळे हशार ज्यूंची संख्या वाढत गेली, कमी बुद्धीच्या ज्यूंची संख्या कमी होत गेली. असे अनेक पिढ्या झाल्यामुळे आज सर्वसाधारण ज्यूंचा बुद्ध्यंक इतर युरोपियन माणसांपेक्षा १०-२० अंकांनी जास्त आहे. बुद्धिमत्तेच्या जीनला जोड्न असलेले शरीरक्रिया नियंत्रित करणारे जीन देखील ज्यूंमध्ये जास्त प्रमाणात असल्याने जन्मजात शरीरक्रियातील दोषांमुळे उद्भवणारे आनुवंशिक रोग देखील ज्यूंमध्ये सापडतात. हे आनुवंशिक रोग जवळ जवळ फक्त अस्कनाझी ज्यूंमध्येच सापडत असल्याने, ज्यूंची वाढीव बुद्धिमत्ता जीन्सच्या निवडीमुळे आली आहे याला दुजोरा मिळतो आहे. जगाच्या लोकसंख्येत ज्य् अत्यंत अल्पसंख्य असले तरी नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्यांमध्ये मात्र ज्यू मोठ्या संख्येने आहेत. भारतीय ज्यूंना या अशा प्रकारच्या भेदभावाला तोंड द्यावे न लागल्याने, त्यांची बुद्धिमत्ता मात्र सर्वसाधारण भारतीय माणसाएवढीच राहिली! फक्त दोन हजार वर्षामध्ये जर एवढा फरक बुद्धिमत्तेत दोन समाजांमध्ये फक्त धंद्यातील निवडीमुळे पडू शकतो, तर आफ्रिकी व युरोपीय लोकसमूहांमध्ये त्यापेक्षा जास्तच पडू शकेल. हे समूह विभक्त होऊन जवळपास चाळीस हजार वर्षे झाली असा अंदाज आहे. नंतरची त्यांची वाटचाल हवामान, व्यवसाय, स्पर्धा, संपर्क, शिक्षण, धर्म या सर्वच बाबतींत अत्यंत भिन्न प्रकारे झाली. युरोप अमेरिकेतील परिस्थिती बद्धीच्या निवडीसाठी पोषक होती व आफ्रिकेतील परिस्थिती बुद्धीची फारशी गरज नसलेली, व म्हणून अधिक बुद्धिमान व्यक्तींना जगण्यात व पुनरुत्पादनांत फारसा फायदा न देणारी होती असे विधान केले तर फार चूक ठरू नये. अशा भिन्न परिस्थितीत ४०,००० वर्षांत या दोन समाजांच्या बौद्धिक साधारण पातळीत काहीच फरक पडणार नाही हे संभवनीय नाही.
कोणत्याही तत्त्वज्ञानाने मग ते धार्मिक असो, राजकीय असो वा सामाजिक असो विचार, विज्ञान, कला, वायय यांच्यावर व त्यांच्या प्रकटीकरणावर बंधन आणू नये.
भारतात नुकतेच तसे झाले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी “रामसेतू माणसाने बांधल्याचे भौतिक व ऐतिहासिक पुराव्यांवर दिसत नाही; तसेच राम, सीता वगैरे प्रत्यक्ष होऊन गेले याचे ऐतिहासिक पुरावे सापडत नाहीत’ अशा आशयाचे शपथपत्र कोर्टात दाखल केले. या विधानांमध्ये मला तरी काही असत्य दिसत नाही की मुद्दाम काही खोडसाळपणा केला असेही दिसत नाही. सत्ताधारी पक्षाला ही शपथपत्रे राजकीयदृष्ट्या गैरसोयीची वाटली हे खरे. पण त्याबद्दल या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची शिक्षा करणे योग्य वाटत नाही. (हे शास्त्रज्ञ सोडून इतर शासकीय अधिकाऱ्यांवर त्यांनी ही कामगिरी सोपवली असती तर त्यांनी कदाचित् राम-सीतेचे अस्तित्व सिद्ध करणारा पुरावा निर्माण केला असता, रामाचा जन्मदाखला व राम-सीतेच्या लग्नाचा दाखला आणला असता!) या शास्त्रज्ञांना गैरसोयीचे सत्य सांगण्याबद्दल शिक्षा झाल्यानंतर यानंतरचे शास्त्रज्ञ धडा घेतील व राजकारण्यांना विचारून सोयीची सत्ये निर्माण करतील, योग्य असा पुरावा निर्माण करतील. अखेरीस ते सरकारी नोकर आहेत, सरकारचे अन्न खात आहेत, नाही का?
आपल्याला काय हवे आहे ? सोयीची सत्ये का निखळ सत्ये? निखळ सत्ये हवी असल्यास शास्त्रज्ञ, कलावंत, विचारवंत व सागान्य नागरिक यांच्या अभिव्यक्ति रवातंत्र्याचे आपण निश्चयाने रक्षण करायला हवे. त्यासाठी आपल्याला पवित्र वाटणाऱ्या गोष्टींबद्दल आपण हळवेपणा बाळगता कामा नये. त्या गोष्टींना पवित्र न मानणाऱ्या व्यक्तींनी जर त्या आपल्या दृष्टीने पवित्र असणाऱ्या ग्रंथ, मूर्ती, वास्तू किंवा तत्त्वे यांच्याबद्दल अनादर व्यक्त केला, तर आपण दुखावून जाऊन हिंसा, घातपात किंवा अन्याय करता कामा नये जरी आपण बहुसंख्य/अल्पसंख्य असलो तरी, असा लेखी किंवा तोंडी अनादर व्यक्त करणे हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भाग आहे असे आपण मनापासून मान्य केले पाहिजे.
२५, नागाळा पार्क, कोल्हापूर.६१६ ००३. फोन : ०२३१-२६५६६४७