मानवी लैंगिक जीवन – समज/गैरसमज

(१) पुरुषांच्या लैंगिक समस्या कोणकोणत्या असतात ?
अविवाहित/विवाहित पुरुषांमध्ये जवळ जवळ सर्वच लैंगिक समस्या थोड्या प्रमाणात कधी ना कधी तरी अनुभवास येतात. त्यांमध्ये नपुंसकत्व, शीघ्रवीर्यपतन, विलंबित वीर्यपतन, कामपूर्तीचा अभाव, कामपूर्ती उशीरा होणे, कामवासना अति वाढणे, कामवासना कमी होणे, वेदनायुक्त संभोग ह्या समस्या असतात. त्यांतील काही समस्या परिस्थितीनुरूप असतात, इतर शारीरिक व मानसिक कारणांनी लैंगिक समस्या निर्माण होतात. ह्याची सविस्तर माहिती टप्प्याटप्प्याने आपण पुढे पाहणार आहोत.
पुरुषांच्या गैरसमजामुळे ते घाबरतात व समस्या स्वतः निर्माण करतात, त्यात, हस्तमैथुन वाईट असते, स्वप्नातील वीर्यपतन (चुकीचा शब्दप्रयोग स्वप्नदोष) वाईट असते, अति हस्तमैथुनाने वीर्य पातळ होते, शिश्न वाकडे होते, नपुंसकत्व येते, पिता बनू शकत नाही, शीघ्रवीर्यपतन होते, वजन कमी होते. शिश्न लहान होते. ह्या सर्व समस्यांनी पुन्हा भीतीमुळे लैंगिक समस्या निर्माण होतात. जोपर्यंत शास्त्रीय माहिती तज्ज्ञांकडून मिळत नाही. तोपर्यंत लैंगिक समस्या भीती पुनः लैंगिक समस्या, असे प्रकार चालूच राहतात.
(२) स्त्रियांच्या लैंगिक समस्या कोणकोणत्या असतात ?
स्त्रियांमध्ये कामपूर्तीचा अभाव, वेदनायुक्त संभोग, कामपूर्तीला वेळ लागणे, कामवासना नसणे, अति कामवासना असणे, संभोग यशस्वी न होणे, योनिद्वाराचे तीव्र आकुंचन होणे (योनीआकर्ष) या समस्या असतात.
इथे बऱ्याच वेळा वयस्कर पुरुषांचे म्हणणे असते की पत्नी काही बोलत नाही, जे हवे ते मला देते, तिची काही कुरकुर नाही. म्हणजे ती संभोगात आनंदी आहे. प्रत्यक्षात मागच्या पिढीतील लोकांना लाजेखातर व धर्म-संस्कृतीच्या चुकीच्या पगड्यामुळे ‘अंधारातच संभोग’ करणे योग्य वाटत असे. अजूनही काहींना हेच वाटते. अशा पिढीतील स्त्रियांना त्यांचे लैंगिक जीवन विचारले असता त्यांच्या पतीचे ‘भ्रमाचे भोपळे’ चुटकीसरशी फुटायला लागतात. जे पुरुष अजून भ्रमात आहेत ते शास्त्रीय लैंगिक शिक्षण, कामजीवन, कामुक चित्रपट यांवर वाचकांच्या पत्रातून, वृत्तपत्रांतून टीका (बिनबुडाच्या) करीत असतात.
स्त्रियांच्या लैंगिक समस्या निर्माण होण्याला पुरुषप्रधान संस्कृती व ‘धर्म(??)’ कारणीभूत आहे. ह्या दोघांनीच स्त्रीचे ‘स्वातंत्र्य’ हिरावून घेतले. यावर सविस्तर लेखन आपण पुढे पाहणार आहोत.
आकांक्षा प्लाट नं. १, न्यू मोरे कॉलनी, संभाजीनगर, कोल्हापूर ४१६ ००७ सुकर्ण : ९८२२५३४७५४
e_mail : drahul2000@yahoo.com