हिंसेचे ‘डावे’ ‘उजवे’ पुजारी

स्वातंत्र्य प्राप्त करताना येथील राजकीय पक्ष व गटांनी विविध मार्ग चोखाळले. अहिंसक आंदोलनाद्वारे फार मोठ्या लोकसमुदायाने परकीयांविरुद्ध संघर्ष केला. साध्य-साधनशुचितेचा आग्रह धरत कोणतेही आंदोलन व कृती ही हिंसक होऊ नये कारण ती अंतिमतः अनैतिक असते असा या चळवळीचा आग्रह होता. कोणतेही आंदोलन कोणत्याही वेळेस भावनातिरेकामुळे निरपराध्यांच्या हत्येस कारणीभूत ठरू शकते हे लक्षात गेऊन, कोणताही संघर्ष हा व्यक्तीपेक्षा प्रवृत्तिविरुद्ध असावा कोणत्याही जिवाची हिंसा होऊ नये अशा भूमिकेतून हे अहिंसक आंदोलन सुरू होते. एकाबाजूला परकीयांचा विरोध तर दुसऱ्या बाजूला परकीयांचा सूड घेण्याच्या वृत्तीने बेभान झालेल्या स्वकीयांचा विरोध सहन करीत करीत हे अहिंसक आंदोलन सुरू राहिले. दुसऱ्या बाजूने तत्कालीन लोकसंख्येचा विचार केल्यास खूप क्रांतिकारकांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला. ते संख्येने थोडे होते. जो जो आमच्यावर अन्याय करतो त्याच्या विरुद्ध संघर्ष करावाच लागेल व वेळप्रसंगी क्रूर शोषकांविरुद्ध हिंसेचाही उपयोग करावाच लागेल अशी या क्रांतिकारकांची धारणा होती ! जगाच्या इतिहासाचा दाखला देत, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले असा प्रश्न ते विचारीत होते. अर्थात हिंसक कृती करीत असतानाही अत्याचार करणाऱ्या व्यक्तींनाच देहदंड मिळावा, आपल्या कृतीमुळे कोणाही निरपराध्याचा बळी जाऊ नये याची अत्यंत काळजी हे क्रांतिकारक घेत. जेव्हा जेव्हा क्रांतिकारकांच्या कृतीची परिणती निरपराधांच्या हत्येत झाली तेव्हा तेव्हा क्रांतिकारकांना अत्यंत दुःख झाले व पुढे कधीही असे होऊ नये याची त्यांनी आटोकाट काळजी घेतली असे इतिहास सांगतो. अत्याचारी परकीयांविरुद्ध लढताना स्वकीयांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घेतली जाई व तसे करणे हे नैतिक दृष्ट्या आवश्यक मानले जाई.

क्रांतिकारकांच्या त्यागाची, ध्येयवादाची परंपरा व वारसा फक्त आम्हीच चालवीत आहोत, असा दावा स्वातंत्र्योत्तर काळात डावे व उजवे सतत करीत आलेले आहेत. हे डावे व उजवे अभेद्य संघटना निर्माण करण्यात वाकबगार आहेत. नेत्यांच्या आदेशानुसार, सदसद्विवेकबुद्धी बाजूला ठेवून कार्य करायला तयार असणारे हजारो अनुयायी या पक्षांनी ‘तयार’ केले आहेत. ध्येयपूर्तीसाठी सर्व प्रकारच्या मार्गांचा वापर करणे हे योग्यच असते असे हे पक्ष सांगत असतात. आपला पक्ष सत्तेत असला तर शासकीय यंत्रणेद्वारे व आपल्या विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांकडून आपल्या पक्षाचा अजेंडा साधनशुचिता न बाळगता कसा राबवायचा याची अत्यंत काटेकोर योजना करण्यात व राबवण्यात हे पक्ष वाकबगार आहेत. जगाचे कल्याण कशात आहे हे आम्हालाच कळलेले आहे व इतिहासाची गती आम्हाला आमच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानामुळे आधीच माहीत आहे असा या सर्वांचा दावा असतो. जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे एखाद्या विशिष्ट विचारवंताच्या तत्त्वज्ञानात आहेत असा श्रद्धेच्या जवळ जाणारा विश्वास हा या पक्षांचा मुख्य आधार असतो. संघटनेतील नेते हे थोर विचारवंत व महान असल्यामुळे ते योग्यच निर्णय घेणार, व त्यातच सर्वांचे भले होणार या असीम श्रद्धाभावातून कार्यरत असलेले हजारो पक्षकार्यकर्ते या डाव्या उजव्या पक्षांजवळ आहेत. पक्षादेश किंवा संघटनेचा आदेश शिरोधार्य मानून सर्व प्रकारच्या मार्गांचा वापर करणे योग्य होय असे या सर्वांचे म्हणणे असते व त्यादृष्टीने कृती करायलाही या गटांची केव्हाही तयारी असते. ध्येयपूर्तीसाठी व विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी हिंसा करण्यात काहीही गैर नाही व वेळप्रसंगी तोच एकमेव पर्याय असतो अशी या गटांची भूमिका असते. यात डावे व उजवे यांच्या कार्यपद्धतीत फरक नसतो. थोडक्यात अत्यंत संघटितपणे व तत्त्वज्ञानाची भाषा करीत चालवलेला दहशतवाद असे या गटांच्या पक्षांच्या कार्याचे स्वरूप आहे. सूड घेणे, कोणी आपल्या मार्गात आडवे येत आहेत असा नसता समज झाला तरीही त्यांना संपविणे, जेवढे क्रौर्य करून जेवढी जास्त दहशत पसरविता येईल तेवढी ती पसरविणे, बहसंख्येने असलेल्या निरपराध दुर्बल नागरिकांना वेठीस धरून त्यांची लूट करून आपल्या कार्यासाठी पैसा गोळा करणे, गैरसमजांना खतपाणी घालून वावड्या पिकविणे हे या संघटित गटांना योग्य वाटते. अनुयायांच्या आपल्यावरील श्रद्धेचा वापर करून त्यांच्याकडून आपला कार्यक्रम राबवून घ्यायचा ही या गटांची कार्यपद्धती आहे. या पक्षांजवळ जेव्हा सत्ता असते तेव्हा तर कोणतीही साधनशुचिता बाळगणे त्यांना अनावश्यक वाटते. यामुळे काय काय होऊ शकते याचे दुःखदायी प्रत्यंतर नागरिकांना गेल्या काही वर्षांत वारंवार येऊ लागले आहे.

आता गेल्या काही वर्षांतील क्रांतिकारकांच्या या तथाकथित डाव्या उजव्या समर्थकांचे वर्तन मात्र क्रांतिकारकांचे ते खरे वारसदार नाहीत असेच दाखविणारे होत आहे. गेल्या काही महिन्यांत पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेल्या क्रांतिकारकांच्या समर्थकांचे नंदीग्राममधील वर्तन म्हणजे कोणतीही साधनशुचिता न बाळगता हिंसेचे खुलेआम समर्थन करण्याचा प्रकार होता. भांडवलशारी विरोधी भूमिका घेणाऱ्या भगतसिंहाचे कौतुक करणारे हे पक्ष कार्यकर्ते भांडवलदारांसाठी गरीब कष्टकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने मिळविण्यासाठी कटिबद्ध झालेले आहेत. सेझ (डएन) कसे उपयुक्त आहे हे ते सांगू लागले आहेत. निरपराध्यांचे शिरकाण झाले तरी चालेल पण सर्व उपायांचा अवलंब करून शासनाची योजना राबविली गेलीच पाहिजे अशा भूमिकेतून पक्षकार्यकर्ते संपूर्ण शासकीय यंत्रणा वापरीत आहेत. हे सारे विरोधी पक्षांमुळे हे घडले आहे असे म्हणत त्यांनी हिंसाचार सुरूच ठेवला आहे. हजारो नागरिकांना बेघर होण्यास व निराश्रितांच्या शिबिरात जाऊन राहण्याची वेळ, सर्वहारा समाजाच्या बाजूने तोंडपाटिलकी करणाऱ्या क्रांतिकारकांच्या पक्षाने आणली आहे. नाहीरेंच्या बाजूने बोलणारे हे आजचे तथाकथित क्रांतिकारक त्या नाहीरेंच्याच जिवावर उठले आहेत.

आपली जमीन देण्यास तयार नसणाऱ्या गरिबांना कोणतीही मदत मिळणार नाही याची काळजी घेतली जात आहे. न्यायालयाने या गरिबांच्या बाजूने मत दिल्यावर तर न्यायालयावरही टीका करायला हे डावे पुढे आले. नाहीरेंच्या बाजूने हस्तक्षेप करण्यास केंद्रसरकारच्या निमलष्करी दलांसकट कोणीही जाऊ शकणार नाही याचा पुरेपूर बंदोबस्त या कार्यकर्त्यांनी व शासनाने केला आहे.

गुजराथमध्ये उजव्यांनी केलेले अत्याचार व निरपराधांचे शिरकाण गेल्या काही वर्षांत बघायला मिळाले. सूड घेण्याच्या भूमिकेतून झालेला हिंसाचार ही नैसर्गिक प्रतिक्रिया होती असे नंतरच्या हिंसाचाराचे निर्लज्जपणे समर्थन करण्याचाही प्रकार झाला. लहान मुले, निरपराध व गर्भवती स्त्रिया या अत्याचाराच्या बळी ठरल्या. अत्याचार करणाऱ्यांनी हा अत्याचार आपला पराक्रम म्हणून सांगायलाही कमी केले नाही. दंगलग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात अक्षम्य दिरंगाई व होताहोईतो दुर्लक्ष केले. कोणीतरी केलेल्या कृष्णकृत्यांचा सूड म्हणून निरपराध्यांचा छळ केला गेला. गुजराथमधील हत्याकांड असो की नंदिग्राममधील छळ व अत्याचार असो, ते करणारे दोन्ही पक्ष या हिंसाचाराचा निषेधही करीत नाहीत उलट समर्थन करू लागतात हे अनुभवायला मिळाले. कार्यकर्त्यांनी केलेले अत्याचार असोत की पोलिसांनी केलेली एनकाउंटर्स असोत ते सारे न्याय्य ठरविण्यापर्यंत संविधानाप्रती शपथ घेऊन सत्तारूढ झालेल्या मुख्यमंत्र्याच्या पदावर आरूढ असलेल्या व्यक्तींची मजल जावी हे आजचे भीषण वास्तव आहे. आजतागायत नक्षलवादी वगळता राजकीय नेते हिंसाचाराचे सरसकट समर्थन करताना दिसत नसत. जाहीरपणे तरी सत्तारूढ पक्षातील नेते हिंसाचाराचा निषेध करीत पण आता तर खुलेआम समर्थन करण्यापर्यंत राजकीय नेत्यांनी हिंसेला अधिमान्यता देण्यास सुरुवात केली आहे. निरपराधांच्या, गरिबांच्या स्त्रिया व लहान मुलांच्या हत्या करण्याची लाज वाटेनाशी झाली आहे. राज्यव्यवस्थेवरील हे सर्वांत मोठे संकट मानले पाहिजे.

प्रत्येक नागरिकांच्या जीविताची हमी, दुर्बल घटकातील नागरिकांना विशेष संरक्षण व साहाय्य, स्त्रियांचे व मुलांचे हिंसेपासून संरक्षण ही न्याय्य समाजाच्या उभारणीतील मूलभूत गरज आहे. भारतीय संविधानाने ही हगी नागरिकांना दिलेली आहे. कायद्याचे राज्य, कल्याणकारी शासन, संवैधानिक गार्गांनीच प्रश्नाची सोडवणूक करण्याची राज्यकर्त्यांवर टाकलेली जबाबदारी या लोकशाही राज्यव्यवस्थेतील गूलभूत बाबी असतात. या सर्व बाबींना निकालात काढण्यात राज्यकर्तेच पुढाकार घेत आहेत, ही अत्यंत धोकादायक अशी बाब आहे. या सर्व प्रकाराला विरोध करण्याची क्षमता अन्य कोणत्याच पक्षात नाही आणि असली तरीही त्या पक्षांचीही भांडवलशाही बद्दलची किंवा जमातवादाबद्दलची भूमिका समानच आहे. फरक असेलच तर भांडवलशाही कोणत्या पद्धतीने आणायची याबद्दल असेल किंवा कोणत्या जमातवाद्यांचे म्हणजे मुस्लिम जमातवाद्यांचे की हिंदू जमातवाद्यांचे समर्थन मिळवायचे याबद्दलच्या भूमिकेबद्दल असणार! ही परिस्थिती कशी बदलायची हाच आजचा कळीचा प्रश्न आहे.

नागरी समाजाची आजकाल सर्वत्र चर्चा आहे. आपल्या देशात एका अर्थाने असा समाज निर्माण झाला असला तरीही सामाजिक बांधीलकी मानून कार्यशील होणारे या समाजातील लोक किती हाही प्रश्नच आहे. सार्वजनिक लोकसेवेचे कार्य करायला या वर्गाला वेळ नाही कारण नव्या भांडवलशाही व्यवस्थेत या वर्गाजवळ कधी नव्हे तो बक्कळ पैसा आला आहे. या पैशाचा उपयोग करून जेवढा म्हणून उपभोग घेता येईल तेवढा तो घ्यायचा व तथाकथित सर्व सुखे प्राप्त कशी करायची या विवंचनेत हा वर्ग आहे! या वर्गाला आपले व्यक्तिगत कल्याणच फक्त महत्त्वाचे वाटू लागले आहे. या वर्गातील वकिलांनी हे प्रश्न लावून धरावेत असे म्हटले कारण या वर्गातील वकिलांनीच अशी आंदोलने चालविण्यास पुढाकार घेतला होता हे लक्षात घेऊन तर त्यांना या उद्योगात पैसे मिळणार नसल्यामुळे त्यांना अशा उपक्रमात रस नसतो. मग ते कधी आणि केव्हा लढणार ? प्राध्यापक विचारवंत यांनी पुढाकार घ्यावा असे म्हटले तर मुळातच सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छा असणारे किती असणार हा प्रश्न तेथेही आहे कारण त्यांनाही नव्या पैशाच्या संस्कृतीने पुरेसे प्रभावित केले आहे. या परिस्थितीत राज्यसंस्थेद्वारे राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या या नव्या दहशतवादाचा सामना करायचा तरी कसा?

हिंसेचे समर्थन करण्याची संस्कृती व तत्त्वज्ञान हे समाजाला राज्यकर्त्यांना कोठे घेऊन जाते हे सांगण्याचा गांधींजींनी आयुष्यभर प्रयत्न करूनही आज बरोबर त्याच हिंसेच्या संस्कृतीचे पुजारी बळावत आहेत. अपरिहार्य म्हणून हिंसेचा उपयोग करण्याऐवजी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून हिंसेचा उपयोग सुरू झाला आहे. हे असे करावेच लागते असे हिंसक कृत्याचे समर्थनही केले जाते. याचा परिणाम असुरक्षितता, असहिष्णुता वाढण्यात होत आहे. बळी तो कान पिळी अशा रानटी अवस्थेकडे नेणारी ही वाटचाल आहे. विचारधारा या समाजाच्या आधुनिकीकरणाचे कार्य करतात असे मानले जाते. विचारधारा नवे विचार, नवा दृष्टिकोण देतात व म्हणूनच त्या समाजाच्या आधुनिकीकरणाचे कार्य करतात असे मानले जाते. डावे उजवे सध्या ज्या विचारधारेकडे समाजाला नेत आहेत ते बघून त्यांचे कार्य हे आधुनिकीकरणाचे नसून समाजाला रानटी अवस्थेकडे नेण्याचे आहे असे म्हणावेसे वाटते. अर्थात ही अवस्था येण्यास या विचारधारांचे व राजकीय पक्षांचे अनुयायीही तेवढेच जबाबदार आहेत.

आपले नेते, आपले पक्ष, आपली विचारधारा ही योग्यच आहे ती पूर्णतः आदर्श आहे या गैरसमजातून हे अनुयायी वागत असतात. आपल्या विचारधारेतील उणिवा लक्षात घेणे, इतर विचारांची सहिष्णुतेने दखल घेणे, जे अयोग्य आहे ते स्पष्टपणे सांगणे, आपले नेतेही शेवटी माणसेच आहेत व त्यामुळे स्खलनशील असणार हे गृहीत धरून त्यांच्याही निर्णयांची विचारांची व नेतृत्वाची सतत चिकित्सा करीत राहणे व त्यांच्याप्रती आपली विवेकबुद्धी गहाण न ठेवणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांने करणे अपेक्षित आहे. डावे उजवे राजकीय पक्ष, आपल्या कार्यकर्त्यांना हे स्वातंत्र्य देत नाहीत कारण त्यांना मुकाटपणे आदेशांचे पालन करणारे, आदेशांची अंमलबजावणी सर्व त्रास सोसून करणारे, प्रश्न न विचारता वागणारे अनुयायी हवे असतात. तसे डोके गहाण ठेवणारे अनुयायी कसे मिळतील हेच उजवे राजकीय पक्ष व संघटना बघत असतात. विचार करण्याचे वावडे असेलेल असे अनुयायी मिळवणे आणि त्यांच्यात पुरेशी आज्ञाधारकता निर्माण करणे हेच राजकीय पक्षांचे आज काम झालेले आहे. कोणतातरी काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याची सतत भीती दाखवल्याने कार्यकर्त्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण केली की तेही त्या शत्रूविरुद्ध लढायला तयार होतात. मग फक्त शत्रू कोण हे सांगणेच तेवढे बाकी राहते!

सूड, क्रौर्य, हिंसा व असहिष्णुता जोपासणे व त्यातून जनसामान्यांचा बळी घेणे हे या विचारधारांच्या अनुयायांचे एकमेव कार्य होत आहे व हीच खरी शोकांतिका आहे. आजचे डावे उजवे राजकीय पक्ष नेमके हेच करीत आहेत. ज्यांनी समाजाचे प्रबोधन करायचे, ज्यांनी जनसामान्यांच्या शोषितांच्या मदतीला जायचे तेच आज संघटितपणे बरोबर उलटेच कार्य करीत आहेत. लोकशाही सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, स्वातंत्र्य-समता-बंधुता यांवर आधारित समाज घडविण्याचे कार्य यामुळे अधिकच मागे पडते आहे. असे असले तरीही समाजाच्या आमूलाग्र परिवर्तनाची प्रक्रिया अहिंसक मार्गाने पुढे नेण्यासाठी खऱ्या नागरी समाजाच्या बांधणीची गरज आहे. असहिष्णुतेच्या वातावरणात ते कसे करायचे हेच आपल्यासमोरचे आह्वान आहे.

निर्मल अपार्टमेंटस्, हितवाद प्रेसमागे, दुसरी गल्ली, धंतोली, नागपूर सुकर्ण : ९८२२७०३०१९