आजची एक भूमिकन्या सीता

एका भारतात दोन-तीन, अनेक भारत आहेत. शहरी, शिकले सवरलेले, सुस्थित भारतीयांची जी समाजस्थिती दिसते, त्यांची जी संस्कृती पाहायला मिळते तिच्यावरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भागात जन्या रूढी, रीति-रिवाज टिकून आहेत. बायकांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या वैरिणी हे सत्य पदोपदी आढळते. तहत हेचा सासुरवास, हंडाबळी, बायको टाकून देणे, एकीच्या उरावर दुसरी आणून बसविणे असे अनेक प्रकार चालू असतात. बालविवाह होत आहेत ते तर टी.व्ही.वर दिसतात, पण टीव्हीवर न दिसणारे अनेक प्रकार आहेत. भूतपिशाच्चाची बाधा, भानामती, करणी, अंगात येणे असे अनेक प्रकार स्त्रीमनोरुग्णांचे आहेत. पीर अवलिया यांच्या मज़ारीवर गर्दी उसळणे चालूच आहे. नागपुरात उमरेडरोडवर ताजुद्दीन बाबा अवलिया यांची मज़ार आहे. तेथे दर गुरुवारी प्रचंड गर्दी उसळते. इतके दूर कशाला खुद्द विधानभवनाच्या मागे आणि सरकारी (अजब बंगला) म्युझियम समोर मिठानीम नावाचा दर्गा आहे. तेथे तुम्ही गुरुवारी गेलात तर अशिक्षित, अल्पशिक्षित प्राधान्याने मागासवर्गीय बांधवांची त्यांच्या मुलीबाळींची लेकीसुनांची ही गर्दी उसळलेली दिसते. ह्या भगतगणांमध्ये मुस्लिमेतर रुग्णच ९०% भरतील.
ताजुद्दीन बाबा अवलिया हे १९ व्या शतकातले मुस्लिम संत. मूळ कामठीचे. ब्रिटिशांच्या सैनिकीसेवेत होते. त्यांची वागणूक बेशिस्त आणि वृत्ती विदेही आढळल्यामुळे त्यांना नोकरीतून बर्खास्त केले गेले. गावातल्या बुजुर्गांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना नागपूरच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती केले. ते वारंवार वार्डमधून गायब होत आणि ह्या हॉस्पिटलच्या विस्तीर्ण परिसरात एका झाडाखाली येऊन बसत. कधी झाडाखाली दिसत तर कधी वार्डात दिसतात. यावरून अवलिया म्हणून त्यांची लवकरच कीर्ती झाली. त्यांच्या कृपाप्रसादासाठी इतर रुग्ण आणि गावातील काही धनिक हजेरी लावू लागले. त्यात रघुजी राजे भोसले घराण्यातील राजपुरुष होते. त्यांनी ताजुद्दीन बाबांसाठी आपल्या मालकीच्या जागेत गावाबाहेर दर्गा उभा केला. सध्या तेथे त्यांची समाधी आहे. स्वतंत्र मोठा ताजबाग निर्माण केला असला तरी सरकारी मनोरुग्णालयात जेथे बाबा बसत तेथे अजूनही वार्षिक उरूस भरतो. हा सुमारे दोन आठवडे चालतो. हरतहेच्या मनोविकृती बऱ्या होण्यासाठी लोक हे १५ दिवस तेथे हजेरी लावतात.
अशाच एका मनोरुग्ण महिलेची हकीकत नकोशी या लेखात आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून सीतेसारखेच तिला घराबाहेर काढले होते. आपल्या दोन बालकांना घेऊन ती एका भ्रमिष्टावस्थेत नागपूर स्टेशनवर उतरली. दोन दिवस भीक मागितली मग कोणीतरी तिला ताजबागेतील दर्यात नेले. यथावकाश ती मेण्टल हॉस्पिटलच्या उरुसात शरीक झाली. तेथे तिच्याकडे ‘नकोशी’च्या लेखिकेचे लक्ष गेले. पण लेखिका तिच्याशी बोलण्याआधीच ती तेथून गायब झाली. रामायणातला आणखी एक अध्याय घडला होता. तिला पळवून नेले गेले होते. तिची आणि तिच्या मुलांची ताटातूट झाली. पण योगायोगाने इस्पितळात पेशंट म्हणून तिला भरती केले असता लेखिकेने तिचे प्रकरण हाताळले. “”Use and throw” म्हणतात तशी ती नवऱ्याकडून आणि गावगुंडांकडून फेकली गेली. तरुण स्त्रीदेखील किती सहजासहजी नकोशी होते हे तिच्या उदाहरणाने दिसते. पण तिने सीतेसारखा निमूटपणाने अन्याय सहन केला नाही. अत्याचाराला तोंड दिले आणि सरकारी पुनर्वसन योजनांमध्ये निराधार महिला म्हणून लाभ घेण्याऐवजी आपल्या नवऱ्याशी संघर्ष करून स्वतःचा लग्नसिद्ध गृहिणीपदाचा हक्क बजावला. ह्याची हकीकत शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालयातील ज्या कार्यकर्तीने तिचे प्रकरण हाताळले तिच्याच शब्दांत नकोशी मध्ये सांगितली आहे. स्त्री-दुःखाच्या परंपरागत व जन्मसिद्ध अनंत परी असल्या तरी आधुनिक काळ हा त्यांच्यावर मात करण्याचा अनुकूल काळ आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. सुकर्ण : ९३२५४२३०१०