नकोशी !

इ.स. २००५ च्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील गोष्ट. हॉस्पिटलच्या सभोवतालच्या परिसरात ताजुद्दीन बाबांच्या दर्यासमोर वार्षिक उरूस जोरात होता. आमच्या प्रादेशिक पातळीवरच्या ह्या शासकीय रुग्णालयात रोज सुमारे २०० ते २५० रुग्णांवर उपचार होतात. पण उरुसाच्या वेळी आमच्या परिसरातल्या एका शेडवजा इमारतीत जिला दर्गाह म्हणतात ह्या १५ दिवसांत रोज अक्षरशः हजारो भुते शांत करण्यात येत होती. बाबांच्या कृपेने चमत्कार घडून ती भुते झाडावरून वानर पळावेत तशी रुग्णांच्या अंगातून निघून जातात असा लक्षावधींचा विश्वास होता. ह्या यात्रावजा उरुसात रस्त्याच्या एका कडेला एक सावळीशी तिशी-बत्तीशीची मुलगी आपल्या दोन लहानग्यांना सांभाळत एक चहाचा ठेला चालवीत होती. ती चार-चौघीत उठून दिसणारी, तरतरीत नाकडोळ्यांची, लांबसडक केसांची मुलगी जाता-येता माझे लक्ष वेधून घेत होती. उरूस संपायच्या आधी तिच्याशी हितगुज करावे असा माझा रोज विचार चालत असे. तशात एक दिवस ती अचानक गायब झाली. शेजारच्या दुकानदाराने माझे आश्चर्य ओळखून दवाखान्याच्या दिशेला जाणाऱ्या वाटेकडे बोट दाखविले. माझी नजर तेथे तिला पाहताच जणू एकाच जागी थिजलीच. तिला स्वतःच्या देहाचे भान उरले नव्हते. लज्जा, संकोच आणि मर्यादा लयास गेल्या होत्या. तिचा आरडाओरडा बघून मी समजले की तिला वेडाचा झटका आलेला आहे. मी परिसरातल्या पोलिसचौकीवर जाऊन तिला उपचार देणे शक्य आहे हे समजावून दिले. आणि आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी ती मला दवाखान्यात भरती झालेली आढळली. सुरुवातीचे सोपस्कार झाल्यावर मी तिच्याशी गट्टी वाढवली आणि तिची जीवनयात्रा जाणून घेतली. उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथे तिचे घर होते. नवरा उत्तम सांपत्तिक स्थितीत होता. शिवाय त्याला सरकारी नोकरी होती. तिचे माहेर त्या मानाने गरिबीचे. दोन वडील भाऊ आणि एक मोठी शिवाय एक धाकटी बहीण आणि आई. भावंडांचा भाजीचा धंदा. म्हणून आधीची दोन लग्ने झालेल्या या घोडनवरदेवाशी तिचे लग्न लावून देण्यात आले. वयात १२ वर्षांचे अंतर. लग्नानंतर पहिल्याच बाळंतपणात तिला मनोविक्षिप्ती ह्या विकाराची बाधा झाली. सतत अपमानकारक वागणूक आणि न आवडत्या नवऱ्याकडून संतती ह्या कारणांमुळे बाळंतपणानंतर हा आजार होतो. त्यातून ती थोडीफार बरी होत नाही तोच दुसरे आणि लागोपाठ तिसरे बाळंतपण झाले. रोजच्या कटकटींनी कंटाळलेली ती सीता धाकट्या दोघांना घेऊन आईच्या आश्रयाला आली.
तेथेही भाऊ-भावजयांनी तिची डाळ शिजू दिली नाही. मग मोठ्या मुलीला नवऱ्याकडे ठेवून दोन लहान मुलांसह अर्धवट भ्रमित अवस्थेत ती निघाली. नागपूर स्टेशनवर कोठेतरी उतरायचे म्हणून उतरली. तेथे तिला कोणाचाच आधार नव्हता. दोन दिवस भीक मागत स्टेशनवर कसेतरी काढले. कोणीतरी तिला ताजुद्दीन बाबांच्या दर्यावर मोठ्या ताजबागेत नेऊन घातले. तेथे तिच्यासारख्या घरादारांना मुकलेल्या बऱ्याच स्त्रिया हिंडत असतात. त्यातल्या धडधाकट स्त्रियांना धंद्याला लावण्याकरिता सावज म्हणून काही लोक टेहेळणी करत असतात. ताजबागेत चहाची टपरी चालवणाऱ्या एका प्रौढ मुस्लिम स्त्रीने तिला आपल्या जवळ त्याच उद्देशाने ठेवून घेतले. घरी नेऊन नीटनेटके करून तिला धंद्याला लावण्याचा प्रयत्न केला. ह्या सीतेने मात्र मला सोड. मी धुणीभांडी किंवा दुसरे कोणतेही काम गुलामासारखे करीन परंतु मुलांसाठी मला धंद्याला न लावता आधार दे अशी विनंती केली. त्या मावशीला तिची दया आली आणि घरकामासोबत ताजबागेत आपल्या बरोबर चहाच्या टपरीवर तिला मदतीला घेतले. सालाना आमच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये मोठा उरुस भरत असतो. त्या ठिकाणी तिला चहाचा स्वतंत्र ठेला लावून दिला. अशी सुमारे चार वर्षे गेली. त्यातल्या एका पंधरवड्यात ती माझ्या दृष्टीस पडली.
तिची ही हकीकत लक्षात आल्यावर तिचे अपहरण आणि इस्पितळात भरती होणे या दुसऱ्या अपघाताची माहिती मला मिळाली. एके दिवशी संध्याकाळी उरुसातील काम आटोपल्यावर ती घरी निघाली असता तिच्यावर पाळत ठेवणाऱ्या गुंडांनी आपण ऑटोवाले आहोत असे भासवून तिला घरी सोडण्याकरिता रिक्षात घेतले. प्रत्यक्षात वेगळ्याच दिशेने काही अंतर नेल्यावर तिच्या मुलांना एके ठिकाणी उतरवून तिला त्यांनी पळवून नेले. त्यांच्या वासनातृप्तीनंतर सुटका झाल्यावर तिच्या वेडाने उचल खाल्ली आणि सवयीने ती मेंटल हॉस्पिटलमध्ये चालत आली.
ह्यानंतर तिच्याशी समुपदेशन आणि रचनात्मक प्रत्यक्षालाप ह्यांद्वारे उपचार चालू केले. तिच्या केसमध्ये मला दोन आह्वाने दिसत होती. (१) तिचे पुनर्वसन, व (२) तिच्या मुलांचा शोध आणि तिची पुनर्भेट. मानसिक स्थिती बऱ्यापैकी निवळल्यावर मी तिच्या मुलांचा शोध घेणे सुरू केले. तिच्या बोलण्यातील संदर्भावरून आठ क्रमांकाच्या नाक्याकडे एक दर्गा होता तिकडे तिला नेले होते हे लक्षात आले होते. मुलांना त्या दर्यात ठेवल्यानंतर तिला काहीच आठवत नव्हते म्हणून मी दवाखान्याची गाडी नेऊन तेथे तपास करायचे ठरविले. नाका क्रमांक ८ म्हणजे वाडीनाका ही माहिती मला महानगरपालिकेकडून मिळाली होती. आम्ही दर्यापर्यंत पोहचताच तिचा विचारप्रवाह थांबला. दर्याच्या आजूबाजूला एक दोन फार्महाऊस होते. तेथील चौकीदारांकडून तिच्या मुलांबद्दल माहिती घेतली. वाडी पोलीस स्टेशनमध्ये तपास केला. पण निराश होऊन परतावे लागले. एके दिवशी अचानक वाडी पोलिसांचा फोन आला. आम्ही वर्णन केलेली मुले त्यांनी “चाईल्ड लाईनवाल्याकडे दिली होती.” मग मी त्यांच्याशी संपर्क केला. दोन दिवसांच्या आत समजले की ती मुले कामठी येथे कनिष्ठ बालगृहात ठेवली होती. दरम्यान रुग्ण सीतेला ‘समुपदेशन सपोर्टिव्ह थेरपी’ चालूच होती. तिने सांगितलेली ओळख आणि कामठीच्या बालगृहातील मुले यांची सांगड जमली होती परंतु तिची आणि मुलांची दृष्टादृष्ट होऊन ओळख पटणे आवश्यक होते. ती मुले तिचीच आहेत ह्याची खात्री पटवणे कायदेशीरदृष्ट्या त्यांना तिच्या स्वाधीन करण्यासाठी आवश्यक होते. आम्ही कामठीतील ‘ड्रॅगेन पॅलेस’ ह्या ठिकाणी रुग्णांची एक सहल आयोजित केली. तेथून सहज म्हणून तिला कनिष्ठ बालगृहात नेले. तेथे बालगृहाच्या सेवकांनी दोन मुलांना समोर आणले मात्र, आतापर्यंत शिळेसारखी निःस्तब्ध असलेली सीता एकदम जिवंत झाली. रडू लागली. मुले मात्र भेदरलेली आणि आई समोर दिसते हे, जणू सत्य असू शकत नाही असे समजून निश्चल उभी होती. माझी खात्री पटली पण तेवढ्याने भागणार नव्हते. बालन्यायालयासमोर वैद्यकीय पुरावे हवे होते. म्हणून आम्ही ‘जेनेटिक टेस्टिंग’ व इतर वैद्यकीय तपासण्या केल्या व तिच्या मातृत्वाचा विजय झाला. आता सीताचे मानसिक संतुलन ठीक होईपर्यंत मुलांना कनिष्ठ बालगृहात ठेवणे आवश्यक होते आणि सोईचे होते. सीता झपाट्याने सुधारू लागली. सकारात्मक उमेद माणसाला जगण्याचे बळ देते. आता ती घरी जाऊ शकत होती. मुलांसहित पुनर्वसित करणे हे आह्वान आता उरले होते.
सीतेसारख्या निराधार स्त्रियांसाठी शासनाच्या काही संस्था आहेत. परंतु आश्चर्य म्हणजे तिला अशा ठिकाणी जायचे नव्हते. पहिली दोन लग्ने झालेला आणि तिच्याशी लग्न करून तिला घराबाहेर काढणारा नवरा ह्याला त्याच्या जबाबदारीतून का सोडायचे हा तिचा सवाल होता. तेव्हा तिला तिच्या हक्काच्या घरी कायदेशीरपणे प्रस्थापित करण्यासाठी तिच्या पतीशी पत्रव्यवहार सुरू झाला. सरकारी रजिस्टर्ड पत्र तिच्या पतीला व आईला गेले. पोचपावती आली. ह्या व्यक्ती अस्तित्वात आहेत व पत्ता खरा आहे हे सिद्ध झाले. पण कोणीही भेटीला आले नाही. निदान आई भेटीला येईल ही अपेक्षा होती. तीही फोल ठरली. असा एक महिना गेला.
दसरा मार्ग, गोरखपूरच्या एस.पी.ला पत्र गेले. उत्तर मिळाले नाही. मग नागपूर येथील पोलीस कंट्रोलच्या माध्यमातून गोरखपूरच्या एस.पी. साहेबांचा फोन नंबर घेतला व त्यांना केस समजावून सांगितली आणि त्यांनी नुसतेच मदतीचे आश्वासन दिले नाही, तर त्या दिवशी सायंकाळी फोन करून माहिती दिली की, त्यांनी तिच्या नातेवाईकांना पोलीस मुख्यालयात बोलावून तंबी दिली. ते रुग्णाचा स्वीकार करायला तयार आहेत पण तिचा पती नाही म्हणतो. आता त्याने चौथे लग्न केले आहे. त्यामुळे तिला तिच्या माहेरी पाठविता येईल, अशीही माहिती होती.
मी सीताला हे वर्तमान सांगितले. परंतु तिचा प्रतिसाद थंड. आपले काही चुकले की काय असे मला वाटले. माझे मौन पाहून ती म्हणाली, “मॅडम ऐसे कैसे वो दुसरी शादी कर सकता है ? उसने मुझे तलाक़ थोडी दिया है? और उसके बच्चे मेरे पास हैं। मैं नहीं माँ के घर जाऊंगी । वहाँसे मुझे भाई हकाल देंगे । उससे बेहतर यह है कि मैं यहीं पागलखाने में रहँ ।” मी तिची तात्पुरती समजूत काढली आणि तिची केस महिला सेल मध्ये रजिस्टर करायचे ठरविले. दर महिन्याला भरणाऱ्या अभ्यागत मंडळापुढे मी तिची केस मांडली. मा. जिल्हा सत्र न्यायाधीशांनी सर्व पुरावे तपासून सीताशी चर्चा करून तिला सोडण्याचे आदेश दिले. स्त्री-पोलीस बंदोबस्तात तिला घरी पाठविण्याचे ठरले. परंतु नवऱ्याच्या घरी पुनर्वसन करणे ही बिकट प्रक्रिया होती. मी तिची केस विधि-प्राधिकरण येथे नेऊन त्यांच्यामार्फत तिच्या पतीला नोटीस पाठविली. गोरखपूर येथील विधि-प्राधिकरण बँचकरिताही एक पत्र गेले. महिला आधार केंद्राकडून तिच्या पतीचे दुसरे लग्न बेकायदेशीर कसे आहे, त्यामुळे त्याची सरकारी नोकरी कशी धोक्यात येऊ शकते याचा स्पष्ट उल्लेख होता. माननीय वैद्यकीय अधीक्षकांनी तिच्या संलित मनाचा दाखला व दस्तावेज बालन्यायालयाकडून तिच्या मुलांना तिच्या स्वाधीन करण्याचे आदेश ही कागदपत्रे दिली.
याप्रमाणे तब्बल सहा महिन्यांचे मनोरुग्णालयातील वास्तव्य संपवून सीता तिच्या कुटुंबात जाण्याकरिता तयार झाली. आमच्या मनोरुग्णालयातील स्त्री-विभागाचे नाव ‘माहेर’ असे आहे. या माहेराकडून खणा-नारळाने ओटी भरून मी तिची पाठवणी केली. येताना आणि भरती होताना अनाम असलेली सीता जाताना सीता रामप्रकाश यादव बनून गेली.
काही दिवसांनी सीतेचा फोन आला. आवाजावरून ती खूप आनंदी वाटली. नवऱ्याच्या मदतीने तिने भाजीचा व्यवसाय सुरू केला. आता ती स्वतःच्या पायावर उभी राहून जगते आहे. नियमित औषधोपचार चालू आहेत. तिने नवऱ्याच्या घरात आपली हक्काची जागा मिळविली आहे. कायदेशीर बाबी सोडा, तिच्या नवऱ्याचे हृदयपरिवर्तन जे झाले त्यामागे त्याच्या आईचा हात होता. तिला आपल्या संपत्तीला वारस हवा होता. त्याच्या आधीच्या दोन आणि चौथ्या बायकोलाही मूलबाळ झाले नाही. म्हणून तिच्या सासूने तिला तिच्या घरात पुनःस्थापित केले ही अंदरकी बात होती.
मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, प्रादेशिक मनोरुग्णालय, छिंदवाडा रोड, नागपूर. दूरध्वनी : ०७१२-२५४८९७२, सुकर्ण : ९३७११११३१६