पत्रचर्चा

सुधाकर कलावडे, पुणे ४११ ००७
हिंदू धर्मानुसार विष्णूचे दहा अवतार मानले जातात. काहींच्या मते ३९ अवतार आहेत. लेखकाचे म्हणणे असे आहे की इतर कोणत्याही धर्मात मानवाचा उदय अथवा विकास उत्क्रांतीमुळे झाला याची पुसटशीसुद्धा कल्पना नाही. सर्व प्राणी, पक्षी व मानव ईश्वराने एका झटक्यात निर्माण केले असे यहुदी (ज्यू), ख्रिस्ती व इस्लाम धर्म मानतात. याला हिंदुधर्मही अपवाद नाही. हिंदुधर्मात ब्रह्मदेवाने हे जीव जगत् निर्माण केले आहे असे मानले जाते तर परमात्म्याने ब्रह्माला निर्माण केले आहे असे मानले जाते.
वेदकाळात तेहतीस [? सं.] देवता होत्या. त्यात विष्णू व शिव गौण देवता होत्या. शिव ही आर्येतर देवता होती त्यामुळे तिला आर्यभाषिकांत विशेष स्थान मिळाले नाही. विष्णूला महत्त्व देण्यासाठी ही अवतार कल्पना आली. शिवाचे अवतार मात्र नाहीत. बहुधा हे अवतार पुराणावर अधिक आधारित आहेत. विष्णु, मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन पुराणे अठरा पुराणांत प्रसिद्धच आहेत. गरुडपुराणही प्रसिद्ध आहे. ज्याचा समावेश गरुडावतार म्हणून दशावतारात लेखक करू इच्छितो. परशुराम, राम, श्रीकृष्ण यापैकी परशुरामावर दंतकथा आहेत तर राम व कृष्णांवर रामायण व महाभारत ही महाकाव्ये प्रख्यात आहेत. ही महाकाव्ये कल्पित आहेत तसेच यांचे नायक राम व कृष्ण ह्या कविकल्पना असून काल्पनिकच आहेत. या कल्पित देवतेचे अवतारही काल्पनिकच. त्यांत बुद्ध अवताराला हटवून गरुडावतार सामील करणे म्हणजे शून्यातून शून्य काढणे व एक शून्य जोडणे होय. हे अवतार सत्य नसून एक भ्रम आहे. तेव्हा भ्रमातून एक भ्रम काढणे व एक भ्रम जोडणे म्हणजे केवळ भ्रमच आहे. त्याचे वैज्ञानिक विश्लेषण कसे होणार ? वैज्ञानिक विश्लेषणाला वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करावा लागेल व अस्तित्वात असलेल्यांचेच वैज्ञानिक विश्लेषण होऊ शकते.
पुराणकथा या अतिशयोक्त, काल्पनिक व विसंगतीने भरलेल्या असतात. त्यांना प्रमाण मानता येत नाही. त्यांचे विश्लेषण हे वैज्ञानिक होऊ शकत नाही कारण तेथे सर्व कल्पनांचा खेळ आहे. विज्ञानात एक क्रम असतो. पण दशावतारात क्रम चुकलेला दिसतोय लेखक स्वतःच पक्षिविकासाच्या समावेशासाठी गरुडावताराचा समावेश करतो व बुद्धावताराला हटवून तर दशावताराची कल्पनाच मोडीत काढतो. गरुड हा विष्णूचा सेवक-वाहन आहे. सर्पनाश हे त्याचे लक्ष्य आहे. त्याला विष्णूचा अवतार म्हणता येणारच नाही. इथे एक प्रश्न उपस्थित होतो की डार्विनचा उत्क्रांतिवाद या दशावतारात बसवण्याचा अवैज्ञानिक खटाटोप कशासाठी? आपले पूर्वजच ज्ञानी होते, व त्यांना आधुनिक विज्ञानाचे शोध व तंत्रज्ञान पूर्वीच माहीत होते व त्यांनी ते वेद, संस्कृत ग्रंथांत बद्ध करून ठेवले हे सांगणे ही मोठी अंधश्रद्धा आहे. कल्की अवताराचेही भाकित केले आहे. पण विज्ञान अशी भाकिते, अंतःप्रेरणा, दैवी शक्ती, प्रतीके यांना मान्यता देत नाही. यासंबंधात हेलेच्या धूमकेतूविषयी जी अचूकता वर्ष, स्वरूप इत्यादी ती कल्कीच्या भाकितात दिसत नाही. वैज्ञानिक भाकिते अचूक व गणितावर आधारित असतात. कल्कीचे भाकीत कल्पनेवर आधारित आहे, ते सत्यात उतरणे शक्य नाही.
नृसिंह हा अवतार कसा होऊ शकतो? हिंदू संस्कृतीप्रमाणे अन्य प्राचीन संस्कृतीतही स्त्रीमुख व अश्वधड अशा कल्पना केलेल्या आहेत. प्रत्यक्षात आजपर्यंत असा प्राणी भूतलावर जन्मलेला नाही अथवा अस्तित्वात नाही. या अस्तित्वहीन विचित्र प्राण्याला उत्क्रांतीत स्थान देणे म्हणजे मानवी बुद्धीचाच अपमान आहे. वराह हा मांसाहारी व शाकाहारी प्राणी आहे. त्यामुळे तो अवतारात कसा येतो! मुस्लिम तर वराहाला (डुकराला) अत्यंत निषिद्ध मानतात. कदाचित् काही प्राण्यांप्रमाणे वराह हा प्राणीही संक्रामक रोग फैलावणारा होता.
दशावतारांत वामन हा प्रथमतः मानवाकारात येतो. पण आधुनिक मानवाचा जन्म हा आफ्रिकेतील गवताळ प्रदेशात (savanna) एका निग्रो मातेच्या पोटी झाला. हे विज्ञानमान्य सत्य आहे. लेखकाचे विधान ‘मानवाला पाऊल ठेवण्यास पृथ्वीवर जागा उरली नव्हती’ हे भौगोलिक व मानवी उत्क्रांतीविषयी अज्ञान दाखवणारे विधान आहे. दुष्काळ, अतिवर्षा, यांनी पीडित तसेच सुखी जीवनासाठी व अन्नासाठी मानवसमूहांचे स्थलांतर होत होते.
परशुराम कथा ही दंतकथा आहे तर रामकथा ही विश्वव्यापी दंतकथा आहे. रामायण व महाभारत ही काल्पनिक आहेत, त्यात ऐतिहासिकता शोधू नये. त्यासंबंधात कोणताही वैज्ञानिक पुरावा आजपर्यंत सापडला नाही. या काव्यांचे नायक महापुरुष राम व श्रीकृष्ण हेही काल्पनिकच आहेत. त्यांनाही उत्क्रांतीत स्थान देणे अयोग्य आहे. मग प्रश्न असा आहे की आजही त्यांचे पूजन का होते? राम व कृष्ण हे कृषिसंस्कृती व पशुपालन या संस्कृतीचे प्रतीक आहेत. भारत हा आज अर्धा कृषिसंस्कृती, अर्धा औद्योगिक क्रांती व माहिती तंत्रज्ञान क्रांतीतील आहे. परंपरा व दृढ संस्कार यामुळे कृषिसंस्कृतीत रामकृष्ण हे पूजनीय आहेत व पुढेही दृढ श्रद्धेमुळे राहणार आहेत.
डार्विनने अनेक वर्षे प्रवास करून वनस्पती व प्राण्यांचे नमुने गोळा करून वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करीत अत्यंत परिश्रमाने निरीक्षण करीत उत्क्रांतीचा सिद्धान्त मांडला व त्याची तपासणी कोणालाही कोठेही केव्हाही करता येते. म्हणून डार्विनच्या सिद्धान्ताला जगभर मान्यता मिळाली. दशावताराची कल्पना फक्त भारतात व हिंदूधर्मीयांपर्यंत मर्यादित आहे. दशावताराची कल्पना कोणी एकाने अथवा विद्वत्समूहाने मांडलेली दिसत नाही. ती काळाच्या टप्प्याटप्प्याने मांडलेली दिसते.
डार्विनचा सिद्धान्त आपल्या पूर्वजांना २००० वर्षांपूर्वी माहिती होता हे म्हणणे रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेख आहे म्हणून आमच्या पूर्वजांना विमानविद्येचे ज्ञान होते असे म्हणण्यासारखे आहे. ही प्राचीन गौरवाची अहंमन्यता सोडणे श्रेयस्कर होईल.
टिपः * या विधानाबाबतचे लेख खूप मोठे आहेत, तेव्हा त्यांची प्रकाशनविषयी माहिती दिली आहे.
* या विधानांचा सविस्तर ऊहापोह खालील लेखांत मी केलेला आहे. जिज्ञासूंनी अवश्य वाचावेत. १) रामकथाः एक विश्वव्यापी दंतकथा : लोकसत्ता (लोकमुद्रा) रविवार २५ फेब्रु.२००४ २) कुरूंची वंशावळ: (रामायण-महाभारत कल्पित काव्ये) लोकसत्ता (लोकमुद्रा) रविवार ८ मे २००५ ३) वेदांतील विज्ञानः हा तर वायफळांचा मळाः किर्लोस्कर जुलै २००७ ४) अध्यात्माचे मायाजाल: किस्त्रीम दिवाळी अंक २००७ ५) आर्यांचे मूलस्थान मध्य आशियाः किर्लोस्कर जानेवारी २००७ ]

मधु तळवलकर, मधुबन अपार्टमेंट्स्, ३६, उजवी भुसारी कॉलनी, पौड रोड, पुणे ४११ ०३८
डिसेंबर २००७ च्या अंकातील श्री ह. आ. सारंग यांच्या लेखात, विवेकवादाला एवढे नक्की साधेल अतिशय चांगल्या प्रकारचे विश्लेषण वाचायला मिळाले. विवेकवादी मंडळींना खूप काम करावे लागेल. आजच बातमी वाचली की, जगातील एक मोठ्या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नागपूरच्या उपक्रमशील व्यक्तीची निवड झाली आणि ही उद्योगशील व्यक्ती शेगावच्या गजानन महाराजांची भक्त आहे. भारताच्या सध्याच्या राष्ट्रपतीही धार्मिक वृत्तीच्या आहेत. बहुतेक सर्वच राजकीय आणि उद्योगशील व्यक्तींना धर्माचा आधार घ्यावा लागतो.
मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्या कामासाठी उत्तर भारतातील ग्रामीण भागात हिंडताना असे दिसले की सर्वसामान्य माणसांवर धर्माचा पगडा जबरदस्त आहे. मुलांच्या एका मेळाव्यात गोष्टीच्या माध्यमातून बोलताना मी मुलांना सांगितले की, ‘आजपासून आपण ठरवू या की खोटे कधीच बोलायचे नाही व आपण उद्या तशी शपथ घेऊ या’. त्मच्या आई-वडिलांबरोबर घरी गेल्यावर चर्चा करा. या विधानावर तेथील उपस्थित नागरिकांची उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळाली. मुलांपेक्षा तेच अस्वस्थ होते. दुसऱ्या दिवशी शपथ देण्याचे मी टाळले. कार्यक्रम संपल्यावर हे काम मी न केल्याबद्दल सर्वजण खूष होते. महाराष्ट्रातही संकष्टी चतुर्थी आणि तत्सम कर्मकांड करणारांची संख्या अशिक्षितांत आहेच पण सुशिक्षितांतही वाढत आहे. विवेकवादाला प्रोत्साहित करणे एवढेच आपल्या हातात आहे.

अशोक वलवे, नाशिक ४२२ ००९
आसु च्या ऑक्टोबर ०७ च्या अंकातील राहुल पाटील यांचे पत्रोत्तर वाचले. त्यात “तुम्हाला माहीत आहे का?’ या आशयाखाली त्यांनी त्यांच्या ज्ञानावर आधारित शास्त्रीय माहिती दिली. ती योग्य की अयोग्य त्यापेक्षा ती वाचकापुढे आली ही चांगली गोष्ट. आ.सु.ने याबाबत काही शास्त्रीय माहिती समाजापुढे प्रसिद्ध करणे योग्य होईल. असे वाटते. कोणत्याही लिखाणाला व्यक्तिगत आवडी-निवडीने विरोधापेक्षा शास्त्रीय दृष्टिकोण ह्यावर भाष्य महत्त्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत शास्त्रीय माहिती समोर यावी. अशी अपेक्षा. र. वि. पंडित, १०२ उत्कर्ष-रजनीगंधा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-४४० ०१०. दूरभाषः ०७१२-२५२८०२१
आसु च्या संपादकांनी रामसेतुप्रकरणी निर्भीड स्पष्ट मत नमूद न करता आपली जबाबदारी टाळली आहे अशी श्री. आचार्यांची तक्रार आहे. यापूर्वी या मासिकात रामसेतूविषयी काय चर्चा झाली हे मला माहीत नाही. परंतु या विषयावर माझे काय मत आहे हे लिहिण्याचा मोह मला टाळता येत नाही.
रामायणाचा मूळ स्रोत म्हणजे अर्थातच वाल्मिकी या नावाच्या व्यक्तीने ; प्राकृत, मागधी, पैशात्री, महाराष्ट्री ह्यांसारख्या बोलभाषांवर पाणिनीने संस्कार करून सिद्ध झालेल्या संस्कृत भाषेत आणि नागरी लिपीत (पूर्वी ब्राह्मी होती, अशोकाच्या वेळी) ख्रिस्तपूर्व जेमतेम ४००-३०० वर्षे आधी लिहून काढलेले रामायण हे महाकाव्य होय.
राम नावाचा एक राजपुत्र काही हजार वर्षांपूर्वी (ख्रिस्तपूर्व २००० ते ७००० वर्षे; give or take) होऊन गेला. त्याच्या जीवनावरील लोककथा प्रचलित होत्या त्या वाल्मीकीने छंदोबद्ध केल्या. हे जे महाकाव्य लिहिले गेले त्यात इतिहास कमी व ललितच अधिक होते. मूळ वाल्मीकिलिखित संहितेमध्ये नंतरच्या लोकांनी भरपूर कथा घुसडून २४ हजार श्लोकांचे हल्लीचे रामायण तयार झाले आहे.
वाल्मीकि रामायणातील युद्धकांडाच्या २२ व्या सर्गातील ५१ ते ७४ या श्लोकांमध्ये राम-सेतूसंबंधी वर्णन आहे. त्यात विश्वकर्म्याचा पुत्र नल हा सुग्रीवाच्या सैन्यात स्थपती होता. त्याने १०० योजने लांब व १० योजने रुंद असा पूल समुद्रात अवघ्या ५ दिवसांत बांधून काढला असे लिहिले आहे. हा पूल पर्वत, शिलाखंड, वृक्षांची खोडे, फांद्या वापरून तयार केला. मोठे प्रस्तर यन्त्राद्वारे ओढून आणले व लाकूड व गवताचे तरते तात्पुते पूलही बांधले. हा १०० योजने लांब पूल केवळ ५ दिवसात प्रत्येक दिवशी अनुक्रमे १४ + २० + २१ + २२ + २३ = १०० असा बांधल्याचे वर्णन आहे.
वाल्मीकिरामायणातील “योजन’ हे अंतर नेमके किती होते याबद्दल काहीच निश्चित करता येत नाही. परंतु अरण्यकांड व किष्किंधाकांड ह्यांतील प्रवासवर्णनावरून, सशक्त व्यक्ती १ दिवसात जेवढे अंतर विनासायास चालून जाऊ शकते ते अंतर म्हणजे १ योजन असा अदमास करता येतो. सशक्त व्यक्ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्य शारीरिक व्यवहार सांभाळून १५ ते २५ किलोमीटर चालू शकते, याची सरासरी म्हणजे १ योजन म्हणजे २० किलोमीटर (८ कोस) असे प्रमाण धरता येते. असे धरले तर भारताच्या धनुषकोडी येथील भूमीच्या टोकापासून श्रीलंकेच्या तलाई-मन्नार या स्थानामधील अंतर १०० योजने अर्थात २००० किलोमीटर भरते काय ? मुळीच नाही. कारण आज या दोन स्थानांमधील अंतर केवळ १४.५ कि.मी. आहे असे त्या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय सैनिक अधिकाऱ्याने सांगितले आहे. म्हणजेच रामायणातील अंतरांचा उल्लेख हा सर्वस्वी चुकीचा आहे.
प्रत्यक्षात भारत व श्रीलंकेला जोडणारा, आज अॅडम्स ब्रिज या नावाने ओळखला जाणारा खडकाळ पट्टा, भूस्तरावरील चलनवलनामुळे भारताचे दक्षिण टोक भारताच्या मुख्य भूमीपासून विलग होऊन एक बेट म्हणून वेगळे झाले तेव्हापासूनच अस्तित्वात आहे. हा खडकांचा दांडा अनेक ठिकाणी आजही पाण्याच्या पातळीच्या वर असून काही ठिकाणी पाण्याखाली जेमतेम मीटर दोन मीटर खाली आहे. त्यामुळे या दांड्याच्या उत्तरेकडील पाल्क समुद्रातून दक्षिणेच्या मान्नारच्या आखातात फक्त हलक्या नावा (ज्यांचा वीरषीं एक मीटर असतो) अथवा भारतीय सेनेच्या खझघ ने वापरलेल्या केशीलीरषीं सारख्या नौकाच चालू शकतात. गेल्या दहा हजार वर्षांत पृथ्वीवरील समुद्रपातळी वर्धिष्णुच आहे. त्यामुळे रामायणकाळी हा खडकाळ दांडा अधिकच उघडा असला पाहिजे. मात्र या दांड्यात काही ठिकाणी खिंडी असतील अथवा पृष्ठभाग फारच उंचनिंच असेल तेथे नलाने दगड, धोंडे, मुरूम, लाकडी ओंडके टाकून या दांड्याचा पृष्ठभाग समतल करून घेतला असणार. त्यामुळेच रामाच्या सहाय्यक सेनेतील इंजिनियर्स व सॅपर्स यांनी ५ दिवसांत सगळा १५-२० किलोमिटरचा हा पूल दुरुस्त व वाहतूकयोग्य बनवून घेतला हे सत्य विवेकी विचाराने पटण्यासारखे आहे.
या संदर्भात आणखी एका मुद्द्याचा विचार करणे आवश्यक आहे. तो म्हणजे लंकाधिपतीचे मांडलिक राजे विराध, खर, दूषण, मारिच, बाली वगैरे पार उत्तरेला विंध्य पर्वतापर्यंत पसरलेले होते. त्यांच्यात व लंकाधिपतीत सतत वाहतूक व दळणवळण होते. ही वाहतूक आता ज्यास अॅडम्स ब्रिज म्हणतात त्या सेतूवरूनच होत असे. रावण पंचवटीपर्यंत आपल्या रथातून आला व सीतेला उचलून रथावर घालून लंकेला गेला, तोसुद्धा याच सेतूवरून. यावरून अॅडम्स ब्रिज अथवा रामायणात रामाने बांधवून घेतलेला सेतू ज्यास म्हणतात तो भारत व श्रीलंका यांना जोडणारा दुवा हा नैसर्गिक आहे हे सिद्ध होते. तो रामाने बांधला म्हणून पवित्र झाला असे मानणे हे धार्मिक अंधश्रद्धेचे द्योतक आहे !

रविन लक्ष्मण थत्ते, ४६-शिरीष, १८७, वीर सावरकर मार्ग, मुंबई ४०० ०१६.
दूरभाष : ०२२-२४४६ २६९८
तुमचे (आपले) नियतकालिक लोकाभिमुख होऊ लागले आहे असे म्हणण्यास आता वाव आहे. ही गोष्ट चांगली की वाईट हा प्रश्न अलाहिदा. माझे विधान सावध आहे, अनुभूतिजन्य असले तरी. हा फरक गेल्या काही महिन्यांतला असावा. एका अंकातले विनोद बघून मीही थोडा स्तिमित झालो होतो. दशावतारांवरचा लेख संग्राह्य आहे. इतर ठिकाणी छापलेल्या प्रतिक्रिया सडेतोड आहेत. मी आजचा सुधारक घ्यायला सुरुवात करून दोन वर्षे जेमतेम झाली असतील पण पहिल्या वर्षातले अंक वाचताना कोणीतरी पंतोजी एखाद्या विद्यार्थ्याला शिकवतो आणि तो ‘ढ’ मी आहे असा माहोल निर्माण होत असे. आम्हा विवेकवाद्यांपुढे (किंवा आमच्या मानाने) हे जग किती मूर्ख आहे आणि ह्या जगाचे, विशेषतः भारताचे (आणि अति सूक्ष्मपणे ह्या हिंदूंचे) करायचे तरी काय ? असा एक अभिनिवेश प्रकट होत असे. आणि ह्या सर्वांना अर्थात डावेपणाची झालर असे. हे सगळे थोडेफार बदलते आहे असे वाटावे इतका पुरावा मला दिसू लागला आहे. हा बदल स्तुत्य की नाही ह्या प्रश्नाचे उत्तर पुढीलप्रमाणे मनुष्यजात सकळ/स्वभावतः भजनशील अशी ज्ञानेश्वरांची उक्ति आहे. माणूस भजनशील तर खराच पण तो भोगशीलही आहे हेही ध्यानात घ्यायला हवे. ज्या तडफेने आजचा सुधारक उपेक्षित आणि दुर्लक्षित जनतेबद्दल अर्थशास्त्राच्या दृष्टिकोणातून लिहितो ती तडफ कौतुकास्पद तसेच वैज्ञानिक व इतर विवेकाबद्दलही आजचा सुधारक उत्तम प्रचार करत आला असणार. मी तेव्हा वाचक नव्हतो. पण हाच उपेक्षित समाज ह्या प्रचारामुळे जेव्हा तरंगत वरती सरकतो तेव्हा ‘येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे त्यांची भजन आणि भोगशीलता अधिक प्रखर आणि बटबटीत स्वरूपात दृष्टीस पडते, हा माझा सार्वजनिक जीवनातला अनुभव आहे. हा अनुभव ह्या पूर्वीच्या उपेक्षित जनतेला दूषणे देण्यासाठी येथे नमूद केलेला नाही. श्रद्धा आणि भोग आर्थिक स्तर आणि स्वातंत्र्य वाढल्यावर जास्त बटबटीत आणि भपकेबाज होतात एवढाच त्याचा अर्थ आहे. समाजाचे वैचारिक उत्थापन जर करायचे असेल तर प्राध्यापकी थाटातले क्लिष्ट लेख माझ्यासारख्या उच्चविद्याविभूषित आणि सन्मानित माणसाला जड जातात तर इतरांचे काय असा प्रश्न मला पडत असे. हल्लीचा अंक वाचून जरा बरे वाटले एवढेच नव्हे तर प्रबोधनही झाले. संपादकीय मंडळावर केलेले प्रहार तुम्ही खिलाडूपणे छापलेत ह्याबद्दलही अभिनंदन. आगरकरच नव्हे तर दि.य.देशपांडे आपली दैवतेच(!) क्षमा करा, आपली श्रद्धास्थाने (क्षमा करा) आपले आदर्शच (आता ठीक झाले). पण भजनशीलता आणि भोगशीलता गृहीत धरून समाजाला चुचकारत योग्य मार्गावर कसे आणायचे ह्याचा ह्या दोघांनी विचार केला होता का असा थोडा उद्धट प्रश्न मी विचारू इच्छितो.

केशवराव जोशी, तत्त्वबोध, माथेरान रोड, हायवे, नेरळ (जि. रायगड) ४१० १०१.
गुजरातमधील डिसेंबर २००७ च्या निवडणूक-निकालांचे काँग्रेसने विश्लेषण करण्यास सुरुवात केली आहे. परंतु एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे काँग्रेस नेतृत्व डोळेझाक करीत आहे. अफझल गुरु याच्या फाशीच्या शिक्षेवरील दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे महिनोन् महिने प्रलंबित का ठेवला आहे ? या प्रश्नावर काँग्रेस कायम निरुत्तर झाली आहे. “मुसलमान धर्मीय गुन्हेगारास फाशी दिली गेली तर त्या धर्मीयांच्या मतांना काँग्रेसला मुकावे लागेल” या भीतीपोटी काँग्रेसच्या राज्यात जाणूनबुजून ही बाब प्रलंबित ठेवण्यात आली आहे. या भावनेला केवळ हिंदुत्ववाद्यांच्याच मनात खतपाणी मिळते असे नाही. धर्मांध नसलेलेसुद्धा काँग्रेसपासून दुरावतात.
टाईम्स दि. १३.०२.१९९८ मधील आकडेवारीनुसार लोकसभेच्या एकूण ५२४ पैकी फक्त ७० जागांचे निकाल मुसलमानांच्या मतदानामुळे फिरू शकतात, कारण तेथेच त्यांचे लोकसंख्येतील प्रमाण २०% टक्क्यांपेक्षा अधिक आहे. धर्मनिरपेक्ष पक्षांनी धार्मिक भावनांच्या पलिकडे जाऊन काम केले पाहिजे. एवढेच नव्हे तर जागांचे राजकारण करणाऱ्या पक्षांनीसुद्धा मुसलमानांचा अनुनय करणे किंवा अशी प्रतिमा उभी राहू देणे धोक्याचे आहे हे काँग्रेसने आणि इतर धर्मनिरपेक्ष पक्षांनी लक्षात घ्यावे.

रवीन्द्र खडपेकर, २०, पार्वती, पाटीलवाडी, सिद्धेश्वर तलाव, ठाणे ४०० ६०१
गंभीर मासिकाला विनोदाचे वावडे असावे हे मला पटत नाही. आपल्या मासिकातले विनोद मला आवडले. मला तर वाटते आ.सु.ने आणखी हलके-फुलके व्हावे. चित्रेही छापायला सुरुवात करावी. आ.सु.तील लिखाण लोकाभिमुख झाले की मी व माझ्यासारखे आपोआपच आपले वर्गणीदार होतील. खरे तर मला पुन्हा नव्याने व्हायचेच आहे. आ.सु. थोडा समजेल असा होण्याची वाट पहातोय.
अंधश्रद्धा हा शब्दप्रयोगच चुकीचा असे वाचण्यात आले. अंधविश्वास हा बरोबर. श्रद्धा हा शब्द ‘सत्+धा’ असा आलाय. सत्य धारणा ती श्रद्धा. मग ती आंधळी असेलच कशी? तेव्हा अंधश्रद्धा अस्तित्वात असू शकत नाही. अंधविश्वास असू शकतो. मी असे मानतो की व्यवहारात श्रद्धा म्हणजे आशावाद.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.