पत्रचर्चा

ह. आ. सारंग, प्लॉट नं. ३२, सुभाषनगर, ‘हॉटेल अश्वमेघ’च्या पाठीमागे, एम.आय.डी.सी. रोड, लातूर – ४१३ ५३१.
‘अभ्यासेंनि प्रगटावें’ या संपादकीयाद्वारे आपण वाचकांशी साधलेला सुसंवाद आवडला. त्यामुळे आ.सु. च्या मागील अंगावर प्रतिक्रिया द्यायला प्रोत्साहित झालो. ‘पत्रबोध’ हे नामकरण व त्याला दिलेली जास्तीची जागा या दोन्ही गोष्टी आवडल्या. आ.स्. मध्ये चुटके-विनोद असण्याची गरज नाही. त्यासाठी इतर माध्यमे आहेत. याबाबतीत पंकज कुरुलकरांशी सहमत व्हावेसे वाटते. आ.सु.चे स्वरूप अलीकडे बदलले आहे, हे खरेच. हा बदल आवश्यकच होता. विनोदाप्रमाणेच कामजीवनावरील तथ्यांनाही आ.सु.त जागा देण्याची गरज आहे, असे वाटत नाही. ‘सत्यज्ञान-तथ्यज्ञान’ अनेक विषयांचे असते. म्हणूनच विषयानुसार त्याची वर्गवारी करावी लागते. त्यातूनच विविध शास्त्रे उदयाला येतात. आपल्या मासिकाने काही सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसाराचे गुत्ते घेतलेले नाहीत. ‘कामजीवन’ हा महत्त्वाचा तसेच फार मोठा विषय आहे. आ.स्. त्याला न्याय देऊ शकणार नाही. त्याची गरजही नाही. आणि त्यावर एकमत होणेही कठीणच! राहुल पाटील त्या विषयाचे जाणकार आहेत म्हणून त्यांनी अज्ञानी लोकांना (त्यांच्या दृष्टीने) इतके तिखट प्रत्युत्तर द्यावे, हे काही पटले नाही. साध्या, सभ्य भाषेतही स्वमताचे मंडन करता आले असते. आ.सु.लाही हे शोभते, असे वाटत नाही. त्यांच्या तिखट लिखाणामुळे त्यांच्याबाबतीत काही लिहिण्याची भीती वाटते. तरी मी हिम्मत केलीच.

आता न्या. श्रीकृष्ण यांच्या विचारांबाबत
‘धर्मनिरपेक्षता’ या संकल्पनेचा अर्थ भारतीय संदर्भात वेगळा होणे स्वाभाविकच आहे. युरोपामध्ये प्रामुख्याने ‘ख्रिस्ती’ हा एकच धर्म होता. आणि अतीन्द्रियता, साक्षात्कार, दिव्यत्व या बाबी ख्रिस्ती धर्माच्या अविभाज्य भाग झाल्या होत्या. त्यामुळे अतीन्द्रिय किंवा साक्षात्कारमूलक किंवा दिव्य ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग म्हणजे ख्रिस्ती धर्म अशीच एकंदर भावना निर्माण झालेली होती. याच कारणाने अतीन्द्रियता आणि साक्षात्कारमूलक हा ज्याचा भाग आहे, त्या धर्माला विरोध किंवा त्याचे वर्जन असा अर्थ शर्लीश्ररी या शब्दाला प्राप्त झालेला होता. भारतामध्ये हिन्दू, इस्लाम, बौद्ध, जैन असे अनेक धर्म आहेत. राज्य हे अशा कोणत्याही धर्माच्या प्रभावाखाली असणे हे राष्ट्राच्या एकात्मतेसाठी हितकारक नव्हते. त्यामुळे ज्या राज्यात राज्यव्यवहार हा वरीलपैकी कोणत्याही धर्माच्या प्रभावापासून मुक्त व निरपेक्ष असतो व तो फक्त राजकीय तत्त्वाधारे चालतो ते राज्य म्हणजे ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ होय, अशी धर्मनिरपेक्ष राज्याची व्याख्या करणे व ती दृढ करणे भारतीय संदर्भात आवश्यक होते. न्या. बी.एन. श्रीकृष्ण यांच्या मते ‘भारतभूमीत धर्म ही संज्ञा सकलमंगलगुणनिधान किंवा शुभाची बीजभूत अशा अर्थाची असून ती उपासनासंप्रदायापुरती सीमित नाही.’ प्राचीन भारतीय वाययातूनही असाच अर्थ ध्वनित होतो, हे सत्य आहे. हिंदुधर्म किंवा सनातन धर्म या संज्ञेतील ‘धर्म’ हाच अर्थ प्रकट करतो. तथापि ख्रिस्ती वा इस्लाम यांच्या संसर्गाने हिंदूधर्म हा शब्दही एका विशिष्ट संस्कृतीच्या लोकांचा एक गट असाच अर्थ ध्वनित करू लागला आहे. त्यामुळे न्या. श्रीकृष्ण यांनी ‘धर्म’ या संज्ञेचा कितीही उदात्त अर्थ केला तरी त्याला काही अर्थ नाही.
डशर्लीश्ररी या शब्दाचा ‘सर्वधर्मसमभाव’ हा अर्थ करणेही योग्य वाटत नाही. राज्यव्यवहार करताना सर्व धर्मांना सारखेच दूर ठेवले पाहिजे. या अर्थाने मात्र हा शब्द योग्य ठरेल. परंतु सर्वच धर्मांना सारखाच आदर दाखविणे हे धर्मनिरपेक्ष राज्याला शक्य होणार नाही. कारण प्रत्येक धर्माची तत्त्वे व व्यवहार हे बऱ्याच वेळा परस्परविरोधी स्वरूपाचे असू शकतात.
याबाबत विनोबांचे वर्णनही निर्दोष ठरत नाही. त्यांनी ‘सर्वधर्मसमभाव’ या संकल्पनेची पहिली तीन लक्षणे ही धर्म म्हणजे विशिष्ट संप्रदाय असा अर्थ घेऊन केलेली आहेत. चौथ्या लक्षणातील ‘अधर्म’ म्हणजे काय ? हा प्रश्नच आहे. येथे ‘धर्म’ या शब्दाचा सदाचार, नीतिसंपन्नता असा अर्थ घेऊन त्याच्या उलट म्हणजे अधर्म असा अर्थ घ्यावा लागतो. याचा अर्थ विनोबांनी ‘धर्म’ या शब्दाचा एकसमान अर्थ घेतलेला नाही, कारण ‘सर्वधर्मसमभाव’ ही एक भोंगळ कल्पना आहे. राज्याला कोणत्याही धर्माविषयी खास किंवा समान आस्था बाळगता येत नाही. वेळ पडल्यास त्याविरुद्धही भूमिका घ्यावी लागते. थोडक्यात, ऐहिक दृष्टिकोनातून राज्यासाठी जे हितकारक आहे, मग ते धर्मानुसारी असो किंवा धर्मविरोधी असो, तेच करणे किंवा त्याप्रमाणे राज्यव्यवहार पार पाडणे, हेच धर्मनिरपेक्ष (secular state) राज्याकडून अपेक्षित आहे.
व्यक्तिगत व्यवहार हे धार्मिक स्वरूपाचे असू शकतात. त्याला ‘धर्मनिरपेक्ष’ राज्याचा विरोध असणार नाही. परंतु असे व्यवहारही सार्वजनिक हिताला बाधक ठरणार नाहीत, हे धर्मनिरपेक्ष राज्याला बघावेच लागते. धर्मनिरपेक्ष राज्यात व्यक्ती ही धार्मिक असू शकते. धर्मनिरपेक्ष राज्य हे व्यक्तिजीवनातील धर्माचे उच्चाटन करू इच्छित नाही. सार्वजनिक हिताला अविरोधी अशा धर्मपालनाला ते संरक्षणही देते. कोणत्याही धर्माच्या व्यक्तीला ते सर्व क्षेत्रांत समान संधी उपलब्ध करून देते. या विशिष्ट अर्थानेच धर्मनिरपेक्ष राज्य हे ‘सर्वधर्मसमभाव’ व्यक्त करते. व्यापक अर्थाने नव्हे.
न्या. श्रीकृष्ण यांच्या मते धर्मात न्याय, नीती, सदाचार, सुसंघात, सदसद्विवेक अशा तत्त्वांचा अंतर्भाव होतो. आणि या मूल्यांनी विवर्जित अशी राज्ययंत्रणा असणे ही कल्पनाच मनाला सहन होणारी नाही. असे मत व्यक्त करताना न्या. श्रीकृष्ण यांनी धर्म आणि न्याय-नीती यांनी युक्त जीवन यांच्यामध्ये एकरूपता मानलेली आहे. प्रत्यक्षात असे मानण्याची गरज नाही. धर्माच्या बाहेरही या मूल्यांना स्थान आहेच. त्यांचा आधार धर्मात शोधण्यापेक्षा विवेकवादात शोधणे अधिक योग्य आहे. कारण प्रत्येक धर्मीयांच्या मतानुसार या मूल्यांचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो व त्यातून संघर्षही निर्माण होऊ शकतो. ही मूल्ये म्हणजेच धर्म आणि धर्माहून या मूल्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही, असे मानणे योग्य नाही. म्हणूनच ‘धर्मनिरपेक्ष’ राज्य म्हणजे या मूल्यांनी विवर्जित राज्य, अशी कल्पना करण्याची जरुरी नाही, हे स्पष्टपणे म्हणावेसे वाटते. वरील विवेचनावरून भारतीय संदर्भात “शर्लीश्ररी’ या संज्ञेचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष राज्य’ असाच घेणे योग्य आहे आणि त्यातील धर्म या शब्दाचा अर्थ सामान्य माणूस मानतो त्याप्रमाणे हिंदू, इस्लाम, ख्रिस्ती अशा सामाजिक संस्थांकडेच बोट दाखवितो. नेहरूंची धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना वरील अर्थाशीच सुसंगत आहे.
न्या. श्रीकृष्ण यांच्या धर्मनिरपेक्ष राज्याच्या अवश्यंभावी घटकांत मी पुढीलप्रमाणे बदल करू इच्छितो. (त्यांची क्षमा मागून) १) धर्माच्या बाबतीत सर्व नागरिकांना सार्वजनिक हिताच्या चौकटीत सदसद्विवेकाने वागण्याचे स्वातंत्र्य असण्याची हमी राज्याने देणे. २) धर्माच्या आधारावर व्यक्ती-व्यक्तींमध्ये भेदभाव न करणे हे जशास तसे मान्य. ३) राज्याच्या किंवा सार्वजनिक हिताच्या अविरोधी असलेल्या धार्मिक बाबींमध्ये राज्याचा काहीही संबंध नसणे.
न्या. श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे भारतातही खऱ्या अर्थाने समन्वयवाद नव्हताच. जैन-बौद्धांचा छळ हे ऐतिहासिक सत्य आपल्या नजरेआड करण्यात अर्थ नाही. चार्वाकांच्या छळाचा इतिहास महाभारतकाळापासून सांगता येतो.
डॉ. र.वि. पंडित यांचा ‘दशावतारांचे पुनरवलोकन’ हा लेख वैज्ञानिक सत्याची प्रतिष्ठा मानणाऱ्या धार्मिक/धर्माभिमानी लोकांची प्रातिनिधिक प्रतिक्रिया होय. डार्विनचा सिद्धान्त हा बहुतेकांना मान्य आहे. आमच्या धर्मातही ही कल्पना आहे, असे मानणे आता धार्मिक लोकांनाही आपल्या धर्माच्या किंवा संस्कृतीच्या प्रतिष्ठेसाठी आवश्यक वाटू लागले आहे. डार्विनचा उत्क्रांतिवाद प्रसिद्ध होण्यापूर्वी कोणत्याही धार्मिक किंवा धर्माभिमानी व्यक्तीने दशावताराचा हा अर्थ लावलेला नाही. डॉ. पंडित यांचा सदर लेख हा पश्चात्बुद्धीचे एक उदाहरण आहे, असे म्हणणे भाग आहे.

विजय वर्षा, चार्वाक, अमृत कॉलनी, भू-विकास बँकेमागे, करंजे, सातारा ४१५ ००१. भ्रमणभाष : ९९२१५७३२०२ लैंगिकता पवित्रच आहे !
‘लैंगिकता’ हा शब्द उच्चारताच काहीतरी अपवित्र शब्द कानावर पडला की काय, असा समज करून घेणारे अनेक संस्कृतिरक्षक समाजात दिसतात. परंतु लैंगिकता हीच खरी पवित्र आहे. म्हणूनच पवित्र समजल्या जाणाऱ्या धार्मिक ठिकाणी ती दिसून येते. मोठमोठी देवालये, शिल्पे, बौद्ध स्तूप, विहार इत्यादि धार्मिक ठिकाणांचे निरीक्षण केल्यास लैंगिकतेला अशा ठिकाणी पवित्र स्थान दिल्याचे दिसून येते. अजंठा, वेरूळ येथील लेणी व शिल्पामध्ये स्त्रियांची चितारलेली चित्रे शंगारिक आहेत. त्यामुळे लैंगिकतेला पवित्र व सामाजिक स्थान प्राप्त करून देण्याचा त्याकाळी एक प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. खजुराहो येथील कामसूत्रावर आधारित कामक्रीडा दर्शविणारी शिल्पे लैंगिकतेला सन्मानच देतात. खेडेगावांत अगदी सातारा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या महादेव-मंदिरात प्रवेशद्वाराच्या भिंतीवर कामक्रीडेची शिल्पे आजही दिसून येतात. म्हणजे खेडोपाडी पूर्वीच्या काळी धार्मिक विचारवंतांनी लैंगिकतेला धार्मिक सभ्यता मिळवून दिली होती. त्यामुळेच प्रजोत्पादन करणे हे पवित्र काम आहे. हे त्यातून स्पष्ट दिसते.
आता ‘शंकर’ या महादेवाची पिंड आपण पाहिली असता स्पष्टपणे स्त्रीयोनीचा आकार व पुरुषलिंग यांचे समागम दृश्य दिसून येते. त्यातच पिंडीवर होणारा अखंड अभिषेक हा प्रजोत्पादनासाठी अखंड ‘वीर्य’ निर्मितीचा संदेश देणारा आहे, हे स्पष्ट होते. शिवाच्या या पिंडीला शिवलिंग असेही म्हटले जाते. म्हणूनच महादेव मंदिरात मूर्तीऐवजी ‘लिंग’ दर्शविणारी पिंडच असते. तसेच जंगम लिंगायत समाजात आजही गळ्यात ताईत बांधल्यासारखे छोटे शिवलिंग बांधल्याचे दिसून येते. शिवलिंगाला म्हणजेच पिंडीला पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही. यारूनच तो पिंडीचा आकार पूर्णपणे स्त्री-योनी दर्शविणारा आहे हे स्पष्ट होते.
आता ॐ या एकाक्षरी शब्दाविषयी विचार केला तरी तो स्त्री-पुरुष समागमाचेच चित्र आपल्या डोळ्यांपुढे उभे करतो. िहे निराधार व शंकास्पद आहे सें. म्हणजेच धार्मिकदृष्ट्या लैंगिकता ही पवित्रच आहे हे यावरून स्पष्ट होते. या पवित्र लैंगिकतेचा विचार मागे पडून लैंगिकता अपवित्र केव्हा झाली, याचा विचार करता माणूस प्रगत झाला तसा त्याची सर्वांगीण प्रगती होण्याऐवजी भौतिक प्रगती झटपट झाली. माणूस जमिनीवरून आकाशात झेपावला. भटकंती करणारा माणूस स्थिर व ऐषारामी जीवन जगू लागला. दूरदर्शन, चित्रपट व जाहिराती यांनी लैंगिकतेचे विकृत चित्रण समाजापुढे ठेवले. त्यातूनच तरुण पिढीत लैंगिकतेची विकृती फोफावली. म्हणूनच एकतर्फी प्रेमातून अनेक गुन्हे घडतात. अल्पवयातच मुलीच्यात शारीरिक आकर्षण निर्माण होऊन बलात्कार व इतर लैंगिकतेचे गुन्हे समाजात घडतात.
शाळा, कॉलेजमधून ‘लैंगिक’ शिक्षण जास्त घोळ न घालता सरकारने सक्तीने सुरू करावे. तसेच पालकांनीही लैंगिकतेला पवित्र समजून लैंगिक विषयावरील तज्ज्ञांची पुस्तके मुलांना वाचावयास द्यावीत. पालकांनी पाल्यांच्या लैंगिक समस्या सोडविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रयत्न करावा, लैंगिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
आवाहन
पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये दान किंवा लहरीळी आणि पैसे देणे हे एक सामाजिक कर्तव्य मानले जाते. परंतु आपल्याकडे कोणतेही चांगले कार्य करण्यासाठी निधिसंकलन करणाऱ्या माणसाकडे थोड्याशा निराळ्या नजरेनेच बघितले जाते. Harvard व उरालीळवसश विद्यापीठांच्या MBA Programme मध्ये Fundraising च्या Theory व Practical साठी विशिष्ट गुण राखून ठेवले जातात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना निधिसंकलनासाठी विशिष्ट उद्दिष्टे ठरवून दिली जातात. आपल्याकडे मुख्यतः देवधर्मासाठीच दान केले जाते कारण इतरत्र केलेल्या दानाचे फळ किती मिळेल याबद्दल साशंकता असते. किंबहुना देवाला दिलेल्या पैशांमागे ‘पाचाचे पंचवीस करा’ अशीच प्रार्थना असते. म्हणजे ते दान सहेतुक किंवा अपेक्षा ठेवून केलेले दान ठरते. परंतु ज्या समाजात आपण जगतो, त्या समाजाचे ऋण म्हणून कमाईचा काही हिस्सा दान करावा, असा आदेश चाणक्यापासून बुद्धांपर्यंत सगळ्यांनीच दिला आहे. असो.
Grassroot Networks व Global Hindu Foundation (प्रस्तावित) या संघटनांच्या वतीने Students Welfare Foundation या संस्थेच्या सहकार्याने काही उपक्रम हाती घेतले आहेत. या संदर्भात सूचना, प्रतिक्रिया, निधिसंकलन तसेच यांपैकी काही projects एखादी सामाजिक संस्था स्वतःच्या वतीने राबवणार असेल, तर, तसेच एखाद्या वैयक्तिक स्वरूपात जबाबदारी स्वीकारणार असेल तर त्यांनी खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा
१) मंदार कात्रे चोखणे, पाली, रत्नागिरी ४१५ ८०३. फोन ९२७०४८५०९१, ९८६९९६९३२० email_grassrot.networks@gmail.com
२) निलेश आंबेरकर द्वारा शाईशांती कन्स्ट्रक्शन्स, पाली, रत्नागिरी. फोन ९९६०६९९५०४ email_swf2004@rediffmail.com
[यानंतर अनेक शिक्षणविषयक व इतर योजनांची यादी आहे, जी इच्छुकांनी वरील पत्त्यांवरून मिळवावी. सोबतच प्रस्तावित फाऊंडेशनमधली ‘हिंदू’ या शब्दाबद्दल सावधगिरीचाही इशारा आम्ही देतो! सं.]
[वरील आवाहनकर्त्यांनी आमचे वाचक-लेखक डॉ. र. वि. पंडित ह्यांच्याशीही संपर्क साधला. त्या प्रत्राबाबत र. वि. पंडित लिहितात आ.सु.मध्ये या व्यक्तीचे आवाहन छापले गेले तरी त्याचेशी माझा मुळीच संबंध नसून स्पष्ट विरोध आहे याची कृपया नोंद घ्यावी. र. वि. पंडित ]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.