सामाजिक समानता व सामाजिक न्याय

संपत्तिवाटप, संधी, वंश, जात, धर्म, उच्च-नीच फरक, इत्यादी विषयांतील विषमतेचे निर्मूलन करून कुठलाही भेदभाव नसलेल्या वर्गरहित समाजाकडे वाटचाल करणे सामाजिक समतेत अभिप्रेत आहे. सामाजिक न्याय आणि सामाजिक समता ह्या एकसारख्या असलेल्या संकल्पना आहेत.
काही जणांचे ऐषारामी जीवन व इतरांचे मात्र वंचित आयुष्य हे समानतावाद्यांना (egalitarians) पूर्णपणे अमान्य आहे. आयुष्याला आकार देणाऱ्या मूलभूत सोई-सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असायला हव्यात. माझा शेजारी उपाशी असताना, पुरणपोळीचे जेवण करण्याचा मला अजिबात हक्क नाही. वेगवेगळे सामाजिक स्तर असलेल्या पिरॉमिडसारख्या व एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या गटागटांत विखुरलेल्या समाजाऐवजी बंधुभाव असलेल्या एकसंध समाजाची अपेक्षा समानतावादी करत आहेत. सामान्यपणे देशांतर्गत व देशादेशांमधील उत्पन्नाच्या वाटपातील प्रचंड असमानतेला समानतावादी कायमचेच विरोध करत आले आहे. व यासाठी संपत्ती व उत्पन्नाच्या पुनर्वाटपाला पर्याय नाही, असे त्यांना वाटते. काही जणांच्या हातांतच आर्थिक सत्ता केन्द्रित होणे योग्य ठरणार नाही. योग्य रीतीच्या आर्थिक समतेत सर्वांना समान संधी, श्रमाला योग्य मोबदला, कामाच्या ठरावीक वेळा, इ. गोष्टी अंतर्भूत असतील. आर्थिक समतेव्यतिरिक्त इतर कुठल्याही समतेचे प्रकार केवळ औपचारिक व अवास्तव असतील.
असाहाय्य व दारिद्र्यास खितपत पडलेल्यांची उन्नती करण्यासाठी प्रयत्न करणे हेच सामाजिक समतेचे उद्दिष्ट आहे. जेव्हा पुरोगामी कार्यक्रमांमधून सामाजिक फायदे तळागाळातल्यापर्यंत पोचतील तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक-आर्थिक समता स्थापित होईल. सैद्धान्तिकतेतून वास्तवातील समानतेकडे, नकारात्मतेकडून सकारात्मक समानतेकडे व स्थितिशीलतेतून गतिमान समानतेकडे आपली वाटचाल होत राहील, असा विश्वास समानतावाद्यांना वाटत आहे.
कृष्णा गुप्ता व्याख्याता, राज्यशास्त्र, अलाहाबाद विद्यापीठ Social Equality and the Indian Constitution या पुस्तकातून