आरक्षण! आणखी एक बाजू

आज आरक्षणाची गरज फक्त भारतालाच वाटते असे नाही तर ह्या जगातल्या पुष्कळ देशांना वाटते आणि त्यांनी तशी तरतूद आपआपल्या घटनेत केली आहे. कधी घटनेत नसली तरी त्यांच्या समाजाने ती मान्य केली आहे.
आरक्षणाची गरज का पडावी? ह्याचे कारण शोधल्यास आपणास असे लक्षात येईल की आपल्या देशात किंवा कोठेही पूर्वग्रहांच्या प्रभावामुळे ह्या समस्या निर्माण होत असतात. समाजातील उच्चनीचभाव मुख्यतः आपल्या मनावरच्या पूर्वसंस्कारांमुळेच निर्माण होतात.
मला येथे मुद्दा असा मांडायचा आहे की मनावरच्या संस्कारांमुळे फक्त जातिभेदच निर्माण झालेले नाहीत. आणखी अनेकानेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत. ज्यांना ह्या पंचमहाभूतात्मक सृष्टीमध्ये कसलाही आधार नाही अश्या कितीतरी गोष्टी आपण खऱ्या धरून चालतो. भुते-प्रेते, पिशाच्चे वगैरे गोष्टींचा ताबा आपल्या वर्तनावर आहे असेही आपण सर्वजण कालपर्यंत समजत होतो. त्यांना वश करण्यासाठी काय-काय करावे त्याचे विधी आपण निर्माण करून ठेवले आहेत. देवाच्या ताब्यातून तर कोणीच सुटलेले नाही असे म्हणता येईल.
खाजगी मालकीची संकल्पनासुद्धा पूर्णतया मानवनिर्मित आहे. मनःकल्पित आहे. तिला भौतिक जगामध्ये कोठलाही आधार नाही. आपण जो आपसातील व्यवहारासाठी पैसा वापरतो तो तरी खरा आहे काय? नाही. तीही केवळ मानवी संकल्पनाच आहे. स्पृश्यास्पृश्यभाव, पवित्रापवित्रभाव, वैधव्यविधुरत्वभाव, विवाहाचे माहात्म्य हे सगळे फक्त मानवाच्या मनातच नांदते. बाहेर भौतिक जगात त्यांना कोठेही स्थान नाही. परंतु हेच वास्तव जग आहे असे आपण मानून चालतो आणि त्यामुळे आपण माणसे श्रीमंत-गरीब, सख्खी-सावत्र, औरस-अनौरस, स्पृश्य-अस्पृश्य तसेच इतर अनेक जातींनी विभागलेली असतात असे समजतो, त्यांत भेदभाव करतो.
मला तर वाटते की आपण ह्या साऱ्या मनःकल्पितांना ‘माया’ समजून चालले पाहिजे. पण आमचे धर्मपंडित जे वास्तव आहे, जे भौतिक आहे, जे इंद्रियगोचर आहे त्याला ‘माया’ म्हणतात आणि जे मनोनिर्मित आहे आणि जे कोठेही नांदत आहे ह्याचा पुरावा नाही, त्याला ब्रह्म म्हणतात.
लोकांच्या ह्या सर्व भ्रामक कल्पनांमुळे (जातींमधल्या उच्चनीचभावामुळे) जो अन्याय घडला तो आरक्षणाच्या साह्याने दूर करून त्याचे परिमार्जन करण्याचा प्रयत्न होत असलेला जाणवतो परंतु हा सारा प्रयत्न ह्या सर्व हिंसेसाठी हिंसा करण्यासारखा आहे. Tit for tat (जशास तसे). अशाने आरक्षण अनंत काळपर्यंत पुढेही चालू राहील अशी शक्यता वाटते. हिंसा, द्वेष ह्यांचा जबाब पुन्हा हिंसेनेच किंवा द्वेषाने दिला गेला तर ह्या दुष्टचक्रातून आपण कधी बाहेर पडणार नाही. हिंसेचे मूळ कारण शोधून काढून ते दूर केल्याशिवाय तिचा अंत होणार नाही. एका जातीने दुसऱ्या जातीवर केलेला अन्याय कायमचा दूर व्हावा ह्यासाठी आरक्षणाचा उपाय पुरणार नाही हे मान्य करायला अडचण पडू नये. अन्याय कायमचा दूर करायचा असेल तर त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मनांमध्ये जातिभेद हटवावा लागेल. तेव्हा आपण आता जातिभेद नष्ट करण्यामागच्या दुर्दम्य अडचणींचा विचार पुढे करू.
हा विचार साकल्याने करायचा आहे त्याची कोणती एकच बाजू किंवा एकच पैलू पाहायचा नाही त्यामुळे आपल्याला पुष्कळश्या आघाड्यांवर एकाच वेळी लढा द्यावा लागणार आहे. जातिभेद ही एक विषवल्ली आहे. आणि त्या विषवल्लीची मुळे आपल्या सर्वांच्या मनांत रुजून बसली आहेत. काही जातींना सरकारी किंवा अन्य नोकऱ्यांमध्ये आरक्षण देत राहिल्याने तिची, त्या वेलीची, थोडीशी पाने ओरबाडली जातील एवढेच तिचा मुळापासून नायनाट होणार नाही. कदाचित त्या मुळ्या अधिक खोल जातील.
जातिभेदाच्या विषवल्लीच्या दोन प्रमुख मुळ्या आहेत. पहिली आपपरभाव दुसरी उच्चनीचभाव. आपल्या मनात रुजलेल्या ह्या दोन मुळ्या नष्ट होणार नाहीत तोवर जातिभेदाची वेल फोफावणारच. मला यापुढे चर्चेसाठी काही मुद्दे मांडायचे आहेत. जातिभेद मनांतून नष्ट व्हावा ह्यासाठी, आपल्याला कोणकोणत्या आघाड्यांवर काम करावे लागेल हे मुद्दे चर्चेसाठी पुढे मांडलेले आहेत.
मुद्दा पहिलाः एक समीकरण मांडतो. जातिभेद = विषमता. विषमता = (समतेचा अभाव) शोषण. … जातिभेद = शोषण. हे शोषण नेहमीच वरिष्ठ जातींकडून कनिष्ठ जातींचे होते असे नाही. ते एकमेकांचे शोषण असते. अगदी साधे उदाहरण घ्यायचे झाले तर मालकीणच नेहमी मोलकरणीचे शोषण करते असे नाही. पण ते असो. शोषणामध्ये बहुधा श्रेष्ठकनिष्ठ-भाव अभिप्रेत आहे. म्हणून जातिभेद नष्ट करणे म्हणजे निरनिराळ्या जातींमधील श्रेष्ठकनिष्ठभाव नष्ट करणे होय. (येथे पुन्हा लक्षात ठेवले पाहिजे की हा मनांत मध्ये नांदतो. प्रत्यक्षात नसतो. जसे भूत फक्त लोकांच्या मनामध्ये असते प्रत्यक्षात नसते. जसा देव आम्हा सर्वांच्या मनांमध्ये असतो, प्रत्यक्षात नसतो तसेच.) हा मनातला श्रेष्ठकनिष्ठ भाव नष्ट करण्यासाठी काय करावे लागेल? आपणा सर्वांना आपआपली कामे स्वतःहून करावी लागतील. श्रेष्ठ किंवा वरिष्ठ माणसाने कनिष्ठ माणसांकडून कामे करवून घेतल्याशिवाय जर ती होणार नसतील तर जातिभेद नष्ट होणार नाही. जोपर्यंत वरिष्ठाने, राजाने किंवा देवाने दिलेल्या माराची भीती वाटल्यानेच मी काम करीत असेन तोपर्यन्त जातिभेद नष्ट व्हावा असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? ज्या दिवशी मी माझे काम आपणहून करीन त्या दिवशी जातिभेद नको असे मला म्हणता येईल. जातिभेद आणि तदन्तर्गत शोषण ही खरोखरच नष्ट व्हायची असतील तर मला माझे (कोणालाही आपले स्वतःचे) काम कोणत्याही पर्यवेक्षणाशिवाय (देखरेखीशिवाय) स्वेच्छेने (conscenciously) पूर्ण करता आले पाहिजे.
मुद्दा दुसराः विषमता नष्ट करणे म्हणजे समता आणणे आणि समता आणणे म्हणजे माणसाने माणसाशी बरोबरीने, विश्वासाने वागणे. माझ्या मनात उद्या माझे कसे होईल. मला जेवायला मिळेल की नाही ह्याची सतत चिंता असते. आम्हा सर्वांच्या म्हणजे कमीतकमी भारतीयांच्या वर्तनाचा आधार (पाया) आमच्या मनांमधील असुरक्षितता आहे. माझ्या विपत्तीच्या वेळी माझा शेजारी, माझा नातेवाईक, हे मला मदत करतील की नाही अशी शंका माझ्या मनात सतत जागृत असते. माझ्या शेजाऱ्याच्या चांगुलपणावर माझा जेवढा विश्वास असतो त्यापेक्षा माझ्याजवळच्या पैशाच्या लोभाने माझा शेजारीच काय माझे काम करायला कोणी दुसराही माणूस धावून येईल. ह्या गोष्टीवर माझा भरवसा अधिक असतो. त्यामुळे मी माणसापेक्षा पैशावर अधिक प्रेम करतो. त्यावर जास्त विश्वास ठेवतो आणि तो म्हणजे पैसा भल्याबुऱ्या मार्गाने जमवितो. (विषमतेवर विश्वास ठेवल्याशिवाय, कपट केल्याशिवाय, शोषण केल्याशिवाय, पैसे जमत नाहीत.) माणुसकी पैशापेक्षा कनिष्ठ मानतो म्हणून पैशाला कमी लेखल्याशिवाय जातिभेद नष्ट होणार नाही. येथे पुन्हा एका गोष्टीचे स्मरण करून देणे अप्रस्तुत होणार नाही. ती गोष्ट अशी की जातीचे अस्तित्व किंवा पैशाचे अस्तित्व आपल्या मनाच्या बाहेर नाही. तो आम्हाला होणारा वास्तवाचा आभास आहे. हा आभास सर्व लोकांच्या मनामध्ये समान असल्यामुळे आम्हाला त्या वास्तव आहेत असे वाटते. पूर्वी आम्ही सारेच भुताखेतांना खरे मानून चाललो होतो. आज तसे मानून चालत नाही. आम्हाला मनांतील जातिभेदाला, औरस-अनौरसपणाला आणि पैशालाही हटवावे लागणार आहे. कोणाला नोकरी असो की नसो, सर्वांचे उत्पन्न फार कमी जास्त नको. बेरोजगाराला पुरेसा भत्ता देऊन त्याचे राहणीमान वाढवावे लागेल. राहणीमानात समता आणावी लागेल.
मुद्दा तिसराः आपल्यामधला जातिभेद आपल्या मनोरचनेमुळे झाला आहे. ही मनोरचना आपल्या कुटुंबात घडली आहे. जातिभेदाची मुळे आमच्या सर्वांच्या कुटुंबरचनेत आहेत म्हणून कटंबव्यवस्था बदलल्याशिवाय आमच्या मनातला जातिभेद नष्ट होणार नाही. किंवा असे म्हणया की जातिभेद नष्ट करण्यासाठी कटंबरचना बदलण्याची फार मोठी मदत होणार आहे.
आम्हाला फक्त रक्ताचे नाते समजते. ज्याच्याशी रक्ताचे नाते नाही असे, म्हणजे सावत्र मूल बहुधा कोणत्याही आईला आपल्या घरात नकोसे असते. ते घरातून निघून जावो मग ते तिकडे मेले तरी चालेल असे तिला वाटते. पुरुष पुनर्विवाहाची जाहिरात देताना विधवा किंवा घटस्फोटिता निरपत्य पाहिजे अशी अट पुष्कळदा घालतो. असे होण्याचे कारण असे असावे की आपल्याला रक्ताच्या नात्यातील व्यक्तींची सुखदुःखे कल्पनेने थोडीफार जाणता येतात (सावत्र मुलाशी आपले रक्ताचे नाते नसते.) मुलीच्या दुःखाने जसे आईचे मन कळवळते तसे सुनेच्या दुःखाने सासूचे मन कळवळत नाही. सुनेच्या वेदना सासूच्या मनाला स्पर्शच करीत नाहीत. तिच्या हृदयापर्यंत पोहचतच नाही. त्या पोहचल्या असत्या तर वर्तमानपत्रात आपल्याला आज ज्या बातम्या वाचायला मिळतात त्या वाचायला मिळाल्या नसत्या. कुटुंबीयांचीच दुःखे जेथे आज आपल्या मनाला झोंबत नाहीत तेथे अन्यजातीयांची, अन्य धर्मीयांची, सवर्णांना दलितांची कोठून झोंबणार? आमच्या स्वार्थामध्ये आम्ही जोवर फक्त आमच्या कुटुंबीयांना नातेवाईकांना आणि हद्द म्हणजे जातवाल्यांना सामील करू शकतो तोवर आमच्या मनातला जातिभेद नष्ट होणे अशक्य आहे. आपला स्वार्थ जास्तीतजास्त जातवाल्यापर्यंतच पोहचू शकतो कारण जातवाला आपला दूरचा नातेवाईक असतो किंवा पुढेमागे होऊ शकतो. हे जाणून आपली मनोरचना ज्या कुटुंबात घडली आहे त्या कुटुंबाची फेररचना केल्याशिवाय आपल्या मनातला जातिभेद जाणार नाही.
हे कुटुंब कसे असेल? हे बहुपतिपत्नीक असायला हवे. तसे ते असले तरच मनात बदल घडवून आणणे, सर्वांनी मिळून सर्वांचे प्रश्न सोडविणे शक्य होईल. पण हे आज शक्य होत नाही ह्याचे कारण आपल्या मनावरचे दृढ संस्कार. या कुटुंबरचनेचा विस्तार अन्यत्र करू. मुद्दा चवथाः जातिभेद नष्ट व्हावयाचा म्हणजे माणसामाणसांतील दऱ्यांमध्ये समानता यावी. दोन माणसांमध्ये वास्तविक समानता नसली तरी त्यांचा दर्जा समान व्हावा. त्यांच्यामधला उच्चनीच भाव नष्ट व्हावा. सगळ्या काळ्या लोकांना पांढरा रंग फासून त्यांना आपल्याला गोरे करायचे नाही. अशी कृत्रिम समानता आणायची नाही. तर सामाजिक दामध्ये काळेगोरे सारखे करायचे. आज असे दिसते की दामधील समानता आमच्या कौटुंबिक नात्यांतच नाही. तर मग ती सामाजिक नात्यांमध्ये कुठून येणार? बहुतेक घरांमधली प्रत्येक स्त्री स्वतःला राणी समजते व दुसरीला दासी. कोणत्याही कारणामुळे तिला राणी होता आले नाही, ती राणी राहिली नाही तर तिला दासी व्हावे लागेल या भीतीत ती सतत वावरत असते. त्यामुळे एका घरात दोन स्त्रिया बरोबरीच्या नात्याने कधीच राहत नाही. (याला नियमाला क्वचित काही अपवाद असणारच.) आपल्याकडे ‘चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे’ अश्या काही म्हणीच आहेत. आपल्या मनामध्ये विषमता इतकी भिनली आहे की जावा जावा किंवा सवती एकमेकींचा हेवा करीत असतात. पूर्वी एकत्र कुटुंबामध्ये निदान एकमेकींविषयी सहिष्णुता असे पण आज विभक्त कुटुंबांमध्ये ती सहिष्णुता नष्टप्राय झाली आहे. त्यामुळे म्हाताऱ्या मंडळींना वृद्धाश्रमात पाठविण्याची पाळी आली आहे. पण सहिष्णुता म्हणजे खरी समता नव्हे. खरी समता पूर्वी कधी नव्हती आणि आजही नाही. समता हवी असे म्हटल्याबरोबर जी स्थिती पूर्वी अनेक शतकांत नव्हती अशी सामान्य स्थिती निर्माण करायची आहे याचे भान आपणास आले पाहिजे. जातिभेद नष्ट करणे म्हणजे घराघरांतून चालत आलेले सनातन संघर्ष नष्ट करणे. मनामध्ये इतका मोठा फरक घडविण्यासाठी बाह्य साधनांचीही गरज पडणार आहे. मुद्दा पाचवाः पुढचे मुद्दे हे आतापर्यंतच्या मुद्द्यांच्या विशदीकरणाचे आहेत. आम्हाला आमच्या कुटुंबीयात पितृसत्ता (Patriarchy) पाहिजे असते. वयाने सर्वांत मोठ्या असलेल्या पुरुषाला इतरांवर सत्ता गाजवायची असते. येथे श्रेष्ठकनिष्ठभाव गृहीतच धरलेला आहे. कुटुंबप्रमुख आजवर निरंकुशपणे सत्ता वापरत आला आहे. कुटुंबातले सर्व महत्त्वाचे निर्णय तो एकटा घेत असतो. तेथे लोकशाही चालत नाही.
नवी कुटुंबरचना आजवरच्या कुटुंबांपेक्षा वेगळी असली तरच ती परिणामकारक होऊ शकते. आतापर्यंतची कुटुंबे एकचालकावर्ती होती. गेल्या शतकामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढल्यानंतर ती कुटुंबे पुरुषप्रधान न राहता उभयसत्ताक (डेमोक्रेटिक) होतील अशी आशा केली होती. पण आम्ही आमच्या पूर्वसंस्कारांतून बाहेर पडू न शकल्यामुळे ती एक-पालकत्वाकडे झुकली. जेथे पुरुष कुटुंबप्रमुख नसेल तेथे स्त्री कुटुंबप्रमुख झाली. आणि आता तर पुष्कळशी कुटुंबे विघटनाच्या मार्गावर आहेत. परंतु ह्या विषयाचा विस्तार येथे करण्याऐवजी त्यावर स्वतंत्र लेख लिहिणे इष्ट होईल. मुद्दा सहावाः समता बरोबर समान वाटप. शेअरिंगसाठी मराठी शब्द तूर्त ध्यानात येत नसल्याने येथे तोच वापरला आहे. शेअरिंगमध्ये सामाईकपणा अध्याहृत आहे. जे माझे तेच दुसऱ्याचे, जे दुसऱ्याचे त्यावर माझाही तितकाच हक्क आहे असा विचार मला शेअरिंग मध्ये अभिप्रेत आहे.
शेअरिंग केल्याशिवाय इक्वालिटी (equality) ला काहीच अर्थ नाही. जितकी समता जास्त तितके शेअरिंग जास्त. समता वाढवणे म्हणजे आपपरभाव कमीकमी करीत नेणे. पराकोटीची समता म्हणजे आपपरभावाचा पूर्ण अभाव म्हणजेच मत्सराचा, असूयेचा अभाव. आज आमचे पूर्ण जीवन ह्या असूयाभावाने बरबटलेले आहे. त्यांतल्या त्यात भारतीयांचे जास्त. ही असूया किंवा हा मत्सर नेहमी आतल्याआत पडद्याआड काम करीत असला तरी आपले डोके आर्थिक बाबींमध्ये आणि स्त्रीपुरुषसंबंधांमध्ये वर काढीत असतो. दुसरी व्यक्ती पुढेमागे डोईजड होईल ह्या भीतीने तिचे मन आधीच खच्ची करीत असतो. दुसऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये ती हीन असल्याचे (जन्मापासूनच) विचार रुजवावे लागतात. काही लोकांना ते जन्मतःच हीन आहेत असे वाटत राहावे यासाठी तुम्ही अपंक्त, तुम्हाला वेदाध्ययनाचा अधिकार नाही असे बजावावे लागते, इतकेच नव्हे तर काहींना अस्पृश्य लेखावे लागते. स्त्रीला तिच्या पाळीच्या दिवसांत दूर बसवावे लागते. त्या काळात तिचा विटाळ मानावा लागतो. आम्हाला जात-पात खरोखर नष्ट करायची असेल, ही विषवल्ली ठेचायची असेल तर स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात बरोबरीने वागवावे लागेल. त्यांना पुष्कळ क्षेत्रांत हक्क आणि अधिकार द्यावे लागतील. समता आणि सहिष्णुता यांत फरक आहे. समता जर खरोखरच आली म्हणजे आम्हाला मानवी मनाला विषमतेच्या चिखलातून बाहेर ओढून काढता आले तर बंधुभाव आणि स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज राहणार नाही…
आज आमच्या समाजात बंधु-भावाचा पूर्ण अभाव आहे. एकमेकांच्या मदतीसाठी आम्ही फार क्वचित एकत्र येतो. दुसऱ्या कोणाच्या विरोधात तेवढे आम्हाला एकत्र येता येते. धरणांमुळे विस्थापित होणाऱ्या लोकांना साह्य करण्यासाठी, त्यांना आपल्यांत सामावून घेण्यासाठी आम्हाला एकत्र येता येत नाही. आम्हाला फक्त सरकारच्या विरोधात, मोठी धरणे नकोत एवढे सांगण्यासाठी एकत्र येता येते.
आपले लोक धरणाच्या पाण्याखाली बुडून मरायला तयार असतात. शहीद व्हायला तयार असतात. पण आम्ही सगळे मिळून आमच्या समस्या सोडवायला एकत्र येत नाही. सार्वजनिक वाहनव्यवस्था आम्ही सर्वांनी नीट वापरली तर आपले वाहतुकीचे सर्व प्रश्न सहज सुटतील. पूर्ण समाजाला हव्या असलेल्या शाळा आणि महाविद्यालये आपण सारे मिळून सुरू करू शकलो आणि ह्या संस्था कोणा एका व्यक्तीच्या लाभासाठी न चालवता देशातल्या सगळ्या समाजासाठी चालवू शकलो (जे अगदी सहज शक्य आहे) तर देशाच्या पुष्कळ समस्या दूर होतील. असे ऐकतो की युरोपात असे काही देश आहेत की जेथे वर्षभरात कधीच भाववाढ होत नाही. त्यामुळे कोणीही उद्या माझे कसे होईल ह्या भीतीतून शिल्लक टाकत नाही. सगळे नागरिक म्हातारपणीसुद्धा एकमेकांची काळजी घेतात म्हणून विमा उतरविण्याचा विचार करीत नाहीत.
आमच्या विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी उच्चांक गाठला आहे त्याचे एकमेव कारण आमच्यात बंधुभाव शून्य आहे नव्हे तर तो ‘उणे’ (–) आहे हे आहे. आम्ही फक्त बंधुभावशून्य आहोत असे नाही तर आम्हाला एकमेकांविषयी सहानुभूतीही नाही. आमच्या मनांतली जात देशाटन केल्यानंतर, पंडितमैत्री केल्यानंतर, शास्त्रग्रंथविलोकन केल्यानंतरही जात नाही हे नुकत्याच झालेल्या चित्पावनांच्या भव्य संमेलनामुळे सिद्ध झालेले आहे. सामाजिक सुधारणांमध्ये अग्रणी असलेल्या, सुधारणेचा पाया रचणाऱ्या समुदायाची ही तन्हा, तर इतरांत, ज्यांच्या ठिकाणी शिक्षणाची सुरुवात जेमतेम गेल्या पन्नास वर्षांपूर्वी झालेली आहे त्यांना आम्ही काय नावे ठेवणार त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार!
आमच्या भारतीय समाजाचा स्वभावविशेष दुसऱ्याचा विचार न करण्याचा आहे. म्हणजेच फक्त आपल्यापुरते पाहण्याचा आहे. आमचे व्यापारी उंगली टेढ़ी किये बिना घी नहीं निकलता। ह्या सिद्धान्तावर विश्वास ठेवणारे आहेत. मग तो व्यापार आमच्या रोजच्या गरजेचा म्हणजे भाजीपाल्याचा किंवा रॉकेलचा का असेना? कृत्रिम दूध तयार करण्याच्या युक्त्या भारतीयांव्यतिरिक्त आणखी कुणाला सुचल्या आहेत असे ऐकिवात नाही. पदोपदी दुसऱ्याची फसवणूक करणे हा आपला बाणा आहे. ही अशी परिस्थिती असल्याने ह्यानंतर आमच्या मनातील जातिवादावर आधारलेल्या भेदभावाचे ज्यामुळे दृढीकरण होईल असे एकही पाऊल ज्यांना सगळ्यांचे भले हवे आहे अशा लोकांनी उचलणे योग्य होणार नाही.
आम्ही आमच्या मनावरील पूर्वसंस्कारांच्या प्रभावामुळे जातिभेद आणि अंधश्रद्धा ह्यांतील साम्य ओळखु शकलेलो नाही. दोन्ही आमच्या मनांत वसलेल्या असतात, बाहेर नाही. जोपर्यन्त आपण आरक्षणामुळे आमचे प्रश्न सुटतील, आमच्यावर पूर्वी झालेल्या अन्यायाचे निर्मूलन होईल असे समजत राहू तोपर्यन्त जातिभेद आणि विषमता ही दोन्ही नष्ट होणार नाहीत. आम्हाला पुष्कळ निरनिराळ्या उपाययोजना करायला हव्यात. आरक्षणापर्यंतच थांबून चालणार नाही.
मोहनी भवन, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर-४४० ०१०