(ग) जातः एका राष्ट्रात दुसरे राष्ट्रः रक्तविहीन क्रांतीसाठी कृती

‘अखंड हिंदु समाज’ हा एक भ्रम असून त्यातील जात मात्र वास्तव आहे. हीच वास्तवता बिहार व उत्तर प्रदेश या राज्यांत प्रकर्षाने जाणवत आहे. राजकीय क्षेत्रात जातीचे प्राबल्य वाढत असून राजकीयरीत्या प्रतिनिधित्व नसलेल्या जाती समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला एकाकी पडत आहेत.
‘जात हेच राष्ट्र’ असे निःसंदिग्धपणे वक्तव्य करणारे, ‘ए नेशन विदिन नेशन’ या पुस्तकाचे लेखक, व्ही.टी.राजशेखर एका महत्त्वाच्या विषयाकडे वाचकांचे लक्ष वेधू इच्छितात. त्यांच्या मते जात हाच रक्तविहीन क्रांतीकडे घेऊन जाऊ शकणारा एकमेव मार्ग आहे. भारतीय मानववंशाच्या एका सर्वेक्षणाच्या अहवालानुसार आपल्या देशात सुमारे २८०० जाती व उपजाती आहेत. त्यांपैकी ४५० अनुसूचित जाती ४६१ अनुसूचित जमाती व ७६६ इतर मागासलेल्या जाती अशी आकडेवारी आहे. भारतीय उपखंडात जात ओळख (कास्ट आयडेंटिटी) नाही असे म्हणणे म्हणजे स्वतःशी प्रतारणा करत असल्यासारखे आहे.
लेखकाच्या मते जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु त्यासाठी जाती नष्ट करण्याची गरज नाही. ‘दलित’ ही संकल्पना फक्त एकाच जातीला उद्देशून नसून तो अनेक जातिसमूहवाचक असाच शब्द आहे. दलित समाजातील वैविध्याची ही निशाणी डॉ. आंबेडकरांच्या परिचयातली होती. ‘जात हे वास्तव असून, ती म्हणजे काहीतरी अमूर्त, नाकारण्याजोगी अशी संज्ञा नाही’ हेच सांगण्याचा प्रयत्न राजशेखर आपल्या या पुस्तकात करत आहेत. जात आरक्षणात राखीव जागांचे वाटप करताना दलित समाजातील उपजातींच्या टक्केवारीप्रमाणे महार, मांग, चांभार, वाल्मिकी यांच्यासाठी राखीव जागा ठरवाव्यात, अशी राजशेखर यांची आग्रही भूमिका आहे. असे करू लागल्यास दलित समाज एकोप्याने नांदू शकेल, एकमेकात सहकार वाढू शकेल, व शोषणाचा सामना करता येईल असे त्यांना वाटते. उच्चवर्णीयांचा जातनिर्मूलनाचा लढा हा त्यांचा डावपेचाचा भाग असून त्यांचा उद्देश ब्राह्मण्य टिकवण्यासाठी व त्याला सुदृढ करण्यासाठीच आहे, असे लेखकाला वाटते. जातिव्यवस्थेचे उच्चाटन व्हावे असे उच्चवर्णीयांना वाटत असल्यास अजूनही त्यांच्यातील रोटी-बेटी व्यवहार जातीच्या आधारावर का होत असतात? जात ही फक्त ग्रामीण भागांतच असून शहरी भागांत त्याचा मागमूसही नाही असे म्हणणाऱ्यांनी शहरातील उच्चभ्रू इंग्रजी नियतकालिकातील विवाहेच्छुकांच्या जाहिरातीवर नजर टाकावी. विवाहांच्या जाहिरातींत जातीलाच महत्त्व दिले जात आहे, हे नाकारता येत नाही. याउलट दलितांमधील जात ओळख दलितसमाजाच्या लढ्यांना बळकटी देऊ शकेल. कदाचित या मागासलेल्या समाजाला आणखी दुबळे करण्यासाठीच उच्चवर्णीय जातनिर्मूलनाची भाषा करत असावेत. कारण त्यांना जातिव्यवस्था आहे तशीच ठेवणे जास्त फायदेशीर व सोईस्कर ठरणार आहे.
जातनिर्मूलनाचा मुद्दा नेहमीच उच्चवर्णीयच उचलून धरत असतात. त्यांच्याच जातींनी अठरा पगड जाती निर्माण केल्या हे आता ते विसरू पाहात आहेत. मागासलेल्या जातीतील जात ओळख त्यांना अडचणीची ठरत असावी म्हणूनच हा आटापिटा आहे. त्यांच्या अस्तित्वावर कु-हाड ठरू शकेल अशी भीती त्यांना वाटत असावी. लोकशाहीतील राजकारण हा निव्वळ आकड्यांचा खेळ असल्यामुळे दलितांना आपले बहुमत सिद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. ‘मी जात मानत नाही’ असे म्हणणे सोपे असते. परंतु आपल्या जीवनातील प्रत्येक व्यवहारात धार्मिक रूढी-परंपरा पाळताना, जन्म, विवाह, मृत्यु इत्यादी प्रसंगी, सण, समारंभ, सत्कार सोहळा इत्यादी वेळी आपण आपल्या जात व्यवहाराचीच ढाल पुढे करत असतो. आपले हे व्यवहार जातिनिहाय होत असतात, याची पुसटशी कल्पनासुद्धा त्यावेळी आपल्याला नसते.
बाबरी मशिदीचा विध्वंस एका अर्थाने मुस्लिमविरोधापेक्षा मंडल आयोगानंतर दलित व मागासवर्गीयांच्याबद्दल उच्चवर्णीयांच्या मनात धुमसत असलेल्या विरोधाची उघड उघड हिंस्र प्रतिक्रिया होती, असे लेखकाला वाटते. त्यातून आपापल्या जातीचा सार्थ अभिमान बाळगणाचा दलित-मागासलेल्या बहुजन समाजाला त्यांची जागा दाखवण्याचा उच्चवर्णीयांचा हा अट्टाहास होता. खरे पाहता हिंदुत्ववादी भाजपाचा हा आक्रमक पवित्रा आपल्या देशाला फॅसिस्ट मार्गावर नेणारा होता. उत्तर भारतातील दलित-मागासलेले बहुजन-मुस्लिम, समाजाने त्यांना नामोहरम केल्यामुळेच अजूनही आपण सर्व लोकशाही व्यवस्था राबवू शकतो, हे विसरता येणार नाही. हिंदुत्ववादी शक्तींना सत्तेच्या बाहेर ठेवण्यात याच मागासलेल्या समाजाने प्रामुख्याने पुढाकार घेतला होता, हे विशेष.
‘उच्चवर्णीयांचे डावपेच नेहमीच अहिंसकरीत्या चालवलेली हिंसा असते’ (The Brahmanical manipulation is non-violently violent) असा राजशेखर यांचा कयास आहे. दलित व मागासलेल्या जातींना स्वतःबद्दल घृणा वाटावी हाच या उच्चवर्णीयांचा व ‘ब्राह्मणी हिंसे’चा एकमेव उद्देश असतो. ज्या समाजात अशा प्रकारचा न्यूनगंड असेल तो समाज कसा काय उत्कर्ष साधू शकेल? याचबरोबर दलित व मागासलेल्या बहुजनसमाजामध्ये अनेक अंतर्विरोधाच्या बाबी आहेत, त्यामुळे ते कधीच मुख्य प्रवाहात सामील होणार नाहीत, असा मुद्दाही उच्चवर्णीय नेहमीच उपस्थित करत असतात. परंतु अशा प्रकारचे अंतर्विरोध केवळ दलित व मागासलेल्या बहुजन समाजातच नव्हे तर ब्राह्मण, ठाकुर, कायस्थ वा बनिया अशा उच्चजातींतसुद्धा आहेत. आपल्या स्वतःतील वैगुण्य विसरून दुसऱ्यांच्यातील अंतर्विरोधाला मात्र जास्त खुबीने उच्चवर्णीय वापरून घेत असतात.
मुळातच ‘हिंदू’ हा धर्म नसून एक राजकीय सिद्धान्त आहे असे लेखकाला वाटते. अनेकांना ‘हिंदुत्व’ व ‘हिंदुधर्म’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत असे वाटत आले आहे. हिंदुत्व ही सावरकरांच्या डोक्यातून निघालेली रम्य कल्पना असून हिंदुधर्म मात्र आत्यंतिक सहिष्णु बहुजनहितकारी असा एकमेव धर्म आहे, असा अनेक उच्चविद्याविभूषितांचा (गैर)समज आहे. ऐतिहासिकरीत्या हे विधान अत्यंत चुकीचे असून त्याची अनेक कारणे आहेत. मुळातच ‘हिंदू’ हा शब्दप्रयोग प्रथम आपल्या देशावर हल्ला करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी केला. या धर्माचे पूर्वीचे नाव वर्णाश्रमधर्म असून हा धर्म जात व रंग (वर्ण!) यांवर भर देणारा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनातील अनेक संदर्भ देत राजशेखर यांनी हा धर्म खऱ्या अर्थाने धर्म नसून एक राजकीय सिद्धान्त आहे अशी मांडणी केली आहे. जातिव्यवस्था-उच्चाटनासाठी नेमके काय करावे? तात्त्विक चिंतनात मग्न असलेले तज्ज्ञ शिक्षण, शहरीकरण/औद्योगिकीकरण आणि आंतरजातीय विवाह, अशी साधी, सोपी मांडणी करतात. लेखक याच्याशी सहमत नाही. लेखकाला मागासलेल्यांना आहे तेथेच ठेवण्याचे एक राजकीय हत्यार म्हणून शिक्षणाचा वापर केला जात आहे असे वाटते. जात ही फक्त खेड्यांतच नसून शहरातसुद्धा त्याचा प्रभाव जाणवण्याइतपत आहे, असे त्याचे स्पष्ट मत आहे. आंतरजातीय विवाह मोठ्या संख्येने अजूनही होत नाहीत, ही त्याची खंत आहे. जे तुरळक आंतरजातीय विवाह होत असतात त्यांमागे आर्थिक व्यवहाराचाच भाग जास्त असतो. ब्राह्मण मुलीचा विवाह दलित सरकारी अधिकारी किंवा राजकीय नेता असेल तरच होऊ शकतो. याला खऱ्या अर्थाने आंतरजातीय विवाह असे म्हणता येणार नाही. स्थानिक व ग्रामीण पातळीवर ठरवून असे विवाह सहसा होत नाहीत. शहरीकरण व/वा औद्योगिकीकरणामुळे मागासलेल्यांच्या परिस्थितीत फार फरक पडला नाही हे अनेकांना जाणवत नाही. दलितांना व मागासलेल्यांना या प्रक्रिया फार आशादायक ठरल्या नाहीत. शहरीकरणाने झोपडपट्ट्यांची उभारणी केली व झोपडपट्टीत दलित व मागासलेल्यांना निकृष्ट प्रतीचे जीवन जगण्यास भाग पाडले. इतर अनेक देशांत शहरीकरणामुळे वंशवाद जवळजवळ संपुष्टात येऊ शकला. भारतात मात्र उलटी परिस्थिती आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मार्क्सला प्रेरित असलेल्या वर्गीय लढ्याच्या स्वरूपाला भारताच्या संदर्भात थोडेसे बदलून जातीशी जोडून घ्यावे लागेल.
जात ओळखीवर भर देत असताना लेखकाने आंबेडकरवाद्यांना आपल्या संकुचित मानसिकतेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. आंबेडकरांना स्वतःच्या महार जातीचा अभिमान होता. तरीसुद्धा त्यांनी इतर सर्व मागासलेल्या व दबावाखाली असलेल्या समाजासाठी लढा दिला होता. फक्त महारांच्यासाठीच त्यांनी लढा दिला असे कुणी म्हणू शकेल का? या भूमीवरील प्रत्येक जात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी जिवाचे रान करत आहे. लढा न दिल्यास नामशेष होण्याची भीती आहे. जातीची ओळख किंवा जातीचा अभिमान दलित व इतर मागासलेल्या समाजात फूट पाडण्यासाठी नसून त्यांची एकी टिकवण्यासाठी आहे. त्यासाठी लेखक जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणशीर प्रतिनिधित्वाचा पुरस्कार करत आहे. या देशातील प्रत्येक जाती-उपजातीला स्वतःचा इतिहास आहे व हा इतिहास मानवी मूल्यांचे संवर्धन करणारा आहे. बाबासाहेबांच्या मते कुठलाही समाज एकाकी राहून, आपला पूर्वेतिहास विसरून प्रगती करू शकत नही.
लेखकाच्या मते धर्म हा कधीही बंधुभाव निर्माण करू शकणार नाही. ख्रिश्चन धर्मांतरित दलित हे दलितच राहिले. उच्चवर्णीयांच्या चर्चमध्ये त्यांना प्रवेश नाही. त्यांची विवाहपद्धती जातीवरच आधारलेली असते. इस्लामसुद्धा बंधुत्वाची भावना निर्माण करू शकला नाही. बंगाली मुस्लिम पंजाबी मुस्लिमावर सहजासहजी विश्वास ठेवणार नाही.
राजशेखर यांचे हे पुस्तक जातव्यवस्थेच्या उच्चाटनाची चर्चा पुढे नेण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. जातीबद्दलच्या अनेक भ्रामक व अवास्तव कल्पनांचा पर्दाफाश त्यांनी केला आहे. त्यांच्या मते ही फक्त सुरुवात आहे. फार लांबचा पल्ला गाठायचा आहे. ‘जात हेच राष्ट्र’ असे वाचताना कदाचित लेखक प्रखर ‘जातीयवादी’ आहे असेच वाटण्याची शक्यता आहे. परंतु पुस्तक वाचताना त्यातील मांडणी आपल्याला पुनर्विचार करण्यास भाग पाडते.
जात लोकशाहीला पूरक कशी ठरेल वा जातीतील अनिष्ट रूढी-परंपरांना छेद देण्यासाठी नेमके काय करायला हवे, किंवा ब्राह्मण्याच्या जाचातून सुटका होण्यासाठी कुठली पावले उचलावीत इत्यादी अनेक प्रश्न आपण या संदर्भात उपस्थित करू शकतो. कदाचित याची उत्तरे आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी पुस्तकात शोधावी लागतील.
Caste A Nation Within The Nation : A Recipe for Bloodless Revolution V. T. Rajshekhar.) Books for Change, Banglore. Price : Rs. 140/- Pages : 120. [संदर्भ: Dalit Voice, July 16-31, 2007 ] ८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सोसायटी, पाषाण-सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१.