‘ईश्वरा’संबंधी माझे विचार

माझे विचार रूढ पद्धतीस अनुसरून नसून ते केवळ बुद्धीच्या दृष्टीचे आहेत. हा बुद्धिवादी ‘मी’ विश्वअहंकाराचा म्हणजे सत् चित् आनंदरूपी ‘ब्रह्मा’चाच एक लहानसा प्रतिसाद नव्हे काय?
ईश्वराची उत्पत्ती हे शब्द आस्तिक्यबुद्धीच्या माणसास विसंगत वाटतील; परंतु बुद्धिदृष्ट्या मानवी मनात ईश्वरासंबंधीच्या माणसास विसंगत वाटतील; परंतु बुद्धिदृष्ट्या मानवी मनात ईश्वरासंबंधीच्या कल्पना केव्हा व कशा उद्भवल्या असतील आणि त्यापुढे कसकशा परिणत होत गेल्या असतील, यांचे अनुमान ऐतिहासिकदृष्ट्या करता येण्यासारखे आहे.
मानवप्राणी या विश्वात नव्हता असाही पुष्कळ काळ गेला असेल आणि मानव नामशेष होऊनही हे विश्व अनंतकाल टिकू शकेल. तेव्हा मानवसापेक्ष असा हा ‘ईश्वर’ निसर्गाव्यतिरिक्त दुसरे काही असेल असे वाटत नाही. मनुष्येतर प्राण्यांत ईश्वरासंबंधी काही कल्पना असतील याचे अनुमान करण्यास जागा नाही. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी बुद्धिमान आहे. तसेच इतर प्राण्याप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथुन, आत्मसंरक्षणबुद्धी इ. मनोविकारही त्यास असतातच. परंतु इतर प्राण्यांपेक्षा याची बुद्धी वरचढ असल्यामुळे मानवात ‘जिज्ञासा’ ‘महत्त्वाकांक्षा’ ‘सुखप्राप्तीची हाव’ ‘अनुमान’ ‘तर्क’ इ. बुद्धीच्या शक्ती जास्त प्रबल असतात. मानव आपल्या बुद्धिबलावर इतर प्राण्यापेक्षा जास्त सुखी होण्याचा प्रयत्न करतो व त्यासाठी तो निसर्गशक्तीस व दुर्बल प्राण्यांनाही आपले सुख वाढविण्यास राबवून घेऊ शकतो. परंतु इतके असूनही मानवप्राणी पूर्ण सुखी होऊ शकत नाही कारण त्याचे परावलंबन, दुर्बलत्व व असहाय्यपण कायमच असते. मिळालेल्या सुखसोयीपेक्षा आणखी सुखसोयी वाढाव्यात अशीच आद्य मानवाचीसुद्धा इच्छा होतीच. तेव्हा जेआपणास मिळू शकत नाही, ते देणारा आपल्यापेक्षा समर्थ असा कोणी तरी आहे व आपण त्यास प्रसन्न करून त्याच्याकडून ते प्राप्त करून घेतले पाहिजे अशी सहजच आद्य मानवाने कल्पना केली असली पाहिजे. आणि साहजिकच तो जो कोणी आपल्यापेक्षा बलवान व सामर्थ्यशील आहे, त्यास आपल्याप्रमाणेच राग, लोभ, मान, अपमान इ. मनोविकार असले पाहिजेत, अशीही कल्पना केली गेली असलीपाहिजे. त्या बलवान शक्तीची आराधना करून तच्यास प्रसन्न करून त्याच्या वरदानाने आपम सुखी व्हावे, ही इच्छा मानवात प्रादुर्भूत झाली असली पाहिजे. या मानवी स्वभावांतून ‘ईश्वरा’ची कल्पना निघाली असावी. ‘सांख्यां’च्या भाषेत बोलावयाचे म्हणजे मनुष्य ‘पुरुष’ हाच पती आमि त्याचा स्वाव म्हणजे ‘प्रकृती’ ही पत्नी. या दंपत्यापासूनच आद्य मानवाने ‘ईश्वर’ उत्पन्न केला असे म्हणावयास काही हरकत नाही. आद्य मानवापासून आजच्या या विसाव्याशतकातील आस्तिक्यबुद्धीच्या माणसांतही ईश्वर म्हणजे आपल्यापेक्षा फार समर्थ, सर्व शकित्मान असा असून त्याच्या कृपाप्रसादानेच आपल्यांतील अपूर्णता नाहीशी होऊ शकेल, असा विश्वास व श्रद्धा दिसून येते.
या ईश्वरास प्रसन्न करावयाचे म्हणजे, त्याची पूजा करून व स्तुतिस्तोत्रे गाऊन. ही साधनेच अवलंबिली पाहिजेत, यावरही या शतकातील श्रद्धावानांचा विश्वास आहे. आपण आहोत त्याच्यापेक्षा जास्त सुखी व्हावे व दृश्य प्रयत्नाने हे साध्य नसल्यामुळे अदृश्य ‘ईश’ शक्तीस स्तुतिस्तोत्राने प्रसन्न करून ते सुख मिळवावे, ही मानवाची इच्छा सदोदित राहणारी असल्यामुळे आस्तिक्यबुद्दी सदोदित राहणारी आहे यात संशय नाही. पण माणसाचे दौर्बल्य हे ईश्वराच्या जन्माचे खरे कारण आहे हाच सिद्धान्त निघतो. आपणापेक्षा सर्वशक्तिमान एक ‘ईश्वर’ आहे, असे मानल्यावर त्याच्या स्वरूपाबद्दलच्या काय काय कल्पना आहेत याचाही विचार केला पाहिजे. आद्य मानव ईश्वराचे स्वरूप अक्राळ विक्राळ असेच मानीत असला पाहिजे. निसर्गशक्ती, पर्जन्य, वादळ, वीज, सूर्य तेज, उंच उंच पर्वत व अफाट खवळणारा समुद्रहे जे पृथ्वीचे दृश्य स्वरूप यापेक्षाही यांना उत्पन्न करणारा भयंकर स्वरूपाची कोणी असला पाहिजे. असे वाटमए साहजिक आहे. वेदांत याच देवतांची वर्णने व स्तुतिस्तोत्रे दिसतात. पुढे पुढे ईश्वराचे स्वरूप मानवदेहधारी अशा स्वरूपाचे मानण्यात येऊ लागले. प्रत्येक दृश्य वस्तूस कारण सते, त्याचा कर्ता कोणी तरी असतो, तेव्हा ह्या दृश्य विश्वासा कर्ता असला पाहिजे व तो विराटस्वरूपी असला पाहिजे. ह्याप्रमाणे विराटस्वरूपाचा ईश्वर मानला गेला. मानवी प्राणी कळप करून राहणाऱ्या प्राण्यांपैकी अस्लयामुळे मानवी समाज अस्तित्तवात आले. समाजात शेकडा ९९ माणसे सामान्य बुद्धीची असतात व एखादा असामान्य बुद्धीच, तेजस्वी व कर्तबगार असतो. परिस्तितीने त्यास वारंवार यशही येते. अशा माणसात ईश्वरी अंश जास्त प्रमाणात आहे अथवा तो ईश्वराचा अर्धा किंवा पूर्ण अवतार आहे, असे मानणअयात येऊन ‘राम’, ‘कृष्ण’, ‘महादेव’, ‘विष्णू’ अशी ईश्वराची मानवदेहधारी स्वरूपे मानली जाऊ लागली व त्यांची पूजा-अर्चा होऊन स्तुतिस्तोत्रे गायली जाऊ लागली.
इतर धर्मांत धर्मप्रेषक अथवा पैंगबर असे ईश्वराचे दूत मानले गेले आहेत आमि त्यांचे पराक्रम गाणारी स्तुतिस्तोत्रे, यांचे ग्रंथ लिहिले गेले आहेत. ईशभक्तीने व ईश्वराच्या निदिध्यासाने ईश्वरदर्शन होते व तसे ते अनेकांना झालेले आहे, असेही सांगण्यात येते. परंतु यात गंमत ही आहे की जगातील आस्तिक्यबुद्धीचे श्रद्धावान भक्त ज्यांना ज्यांना ईशदर्शन झाले म्हणून सांगण्यात येते त्यांना एकाच स्वरूपाचे दर्शन झालेले नाही. कोणास ते शंखचक्रगदाधारी विष्णूचे झाले. कोणास महादेवाचे झाले. कोणास गणपती दिसला, कोणास दत्त दिसला, कोमास अष्टभुजा देवी दिसली. कोणास नुसते तेजच दिसले. तेव्हा प्रश्न आहा आहे की ईश्वराचे खरे स्वरूप कोणते? ही दर्शने खरी का मानसिक निदिध्यासाचे भ्रमात्मक भास खरे? दुसरेच जास्त संभवनीय आहे.
बुद्धिवादी विद्वानांचा एक पक्ष आहे. तो ईश्वराचे अस्तित्व मानतो. ह्या विराट विश्वाचा कर्ता असला पाहिजे. हे कार्यकारणसंबंध अबाधित असल्यामुळे मानावेच लागते; आमि या विश्वात सर्वत्र सुबद्धता व सुयंत्रितपणा आहे, तेव्हा ह्या विश्वकर्त्याने हे विश्व काही हेतुपूर्वकच केले असले पाहिजे. सप्टेंबर १९५८ च्या ‘नवभारत’ मासिकाच्या अंकांत श्री. श्रीनिवास दीक्षित ह्यांनी ‘आस्तिक्यवादा’वर एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी ‘ईश्वर म्हणजे मानवी जाणिवेहून अतिशय व्यापक पण माणसाच्या व इतर प्राणीमात्राच्या स्फुट जाणिवांना सामावून घेणारी जाणीव, अतवा त्या जाणिवेची कल्याणोन्मुख प्रवृत्ती’ अशी ईश्वराची कल्पना केली आहे. पण यास तरी आधार काय? मानवी जाणिवेपेक्षा विस्तृत अशी जाणीव विश्वाच्या बुडाशी आहे, हे तरी कसे सिद्ध होऊ शकते? आणखी त्यातही ती कल्याणोन्मुखी आहे, हा सिद्धान्त तरी कसा काढता येतो? ईश्वरदर्शनाच्या कथा असंख्य आहेत, व आस्तिक्यबुद्धी वाढून ईशभक्ती जगात फैलावी, त्या योगे समाजहितच होईल, या बुद्धीनेच त्या कथा रचलेल्या आहेत ; हे उघड दिसते. तात्पर्य, ईश्वर जसा कल्पिला तसे त्याचे स्वरूपही कल्पिले. त्याचे खरे स्वरूप काहीच सांगता येत नाही.
ईश्वराच्या स्वरूपाचा विचार झाला. आता त्याच्या सामर्थ्याचा विचार करू. या विश्वास निसर्गशक्तीचा प्रत्यय हरघडीस येतो. हा निसर्ग कोणी उत्पन्न केला हे सांगता येत नाही पण त्या निसर्गनियमाने हे विश्व चालू आहे. अर्थात ‘निसर्ग हेच ईश्वराचे स्वरूप. ईश्वरानेच निसर्ग व त्याचे नियम केले व त्यायोगे विश्वाचे रहाटगाडगे चालू झाले. असे मानणारे काही निवन आहेत. पण या विचौरसरणीतही ईश्वर व ईश्वरी सामर्थ्य सिद्ध होऊ शकत नाही. निसर्गनियम सुयंत्रित आहेत, आणि बहुशः ते प्राण्यांच्या उत्पत्तीस व वाढीस कारणीभूत होणारे आहेत; पण यात सुबुद्ध जाणिवेपेक्षा सुयंत्रितपणा अधिक आहे. हा सुयंत्रितपणा मेकॅनिकल आहे. मोठ्या गिरणीतील यंत्रे व चक्रे एकमेकात गुंतवून त्यायोगे कापसाचे सूत, सुताचे धागे, धाग्याचे वीण व पुढे कापड आपोआप निघते. जवळ जवळ या विश्वाची रचना अशीच आहे.
आकाशाद्वायुः, वायोरग्नि, अग्नेरापः, अद्भूयः पृथिवी, पृथिव्या ओधधयः, ओषधिभ्योऽन्नं अन्नात्पुरुषः ।
याप्रमाणे आपोआप एकापासून एक स्वभावतःच उत्पन्न होतात वाढतात व पुढे कालेकरून नाश पावतात. विशिष्ट उष्णतेने व हवापाण्याने निरनिराळ्या वनस्पती जशा उत्पन्न होतात, वाढतात व नाश पावतात त्याचप्रमाणे मानवप्राणी उत्पन्न होतो, जिवंत राहतो, वाढतो व नाश पावतो. ठरलेया नियमाप्रमाणे घडत आहे. पण याला ईश्वरीशक्ती म्हणता येत नाही. कारण निसर्ग आणि ‘ईश्वर’ यांत भेद आहे. निसर्ग नियम ‘स्थितप्रज्ञा प्रमाणे असतात. त्यांच्याजवळ आपपरभाव नाही. उलट ‘ईश्वर’भक्तांचा त्राता, दुष्टांचा संहारकर्ता पापांच्या राशी नाहीशा करणारा व आर्तत्राण करणारा असा मानला गेला आहे.
वस्तुतः ‘परोपकार’, ‘त्याग’ प्राणिमात्राच्या उपयोगी पडणे इ. साधने ईश्वरास प्रसन्न करण्याची आहेत, तरी नाममहात्म्य, भक्ती, स्तुती यांनाच अत्यंत महत्त्व दिले गेले आहे आणि केवळ ‘रामनाम’ जपण्याने पापाच्या सहस्त्र राशी भस्म होऊन ईश्वर मनःकामना पूर्ण करतो, असे प्रतिपादन करणारे अनेक ग्रंथ आहेत. हे दाखविण्यासाठी योग्य अयोग्य, संभवनीय, असंभवनीय ; सुष्ट, दुष्ट, अशा असंख्य कथा समाजात प्रचलित आहेत. अग्नीची उष्णता, पाण्याचे प्रवाहित्व, वायूचा संचार, विद्युतचा प्रभाव, सूर्याचे तेज इ. इ. निसर्गस्वरूप ईश्वरदत्त मानण्यास अडचण ही की, हे सर्व निसर्गनियमाने बद्ध आहेत. हे नियम भक्तास वरदान देणअयासाठी ‘निसर्ग’ मोडूच शकत नाही आमि या पंचमहाभूतांच्या शक्तीही मर्यादित स्वरूपाच्या आहेत. म्हणून त्यास ईश्वराच्या अथवा ईश्वरदत्त म्हणता येणार नाही.
आम्ही मानव जो ईश्वरमानतो तो, तर सर्वशक्तिमान, कोणत्याच नियमाने बद्ध न झालेला, भक्तावर प्रेम करणारा, अभक्तास शासन करणारा, असा मानतो. निसर्गाजवळ हा विचार मुळीच नाही. निसर्ग काही नियमांनी बद्ध असल्यामुळे, निरपवाद त्याचे चमत्कार प्रत्यक्षात दिसू शकतात. काडी ओढल्याने अग्नी प्रसन्न होतो. रेडिओ लावल्याने हजारों मैलावरील ऐकू येऊ शकते, विमानाने आकाशात संचार करता येतो; आणि आता तर सूर्याच्या ग्रहमालेत मानवनिर्मित ग्रह संचारार्थ पाठविता येतात व हे सर्व चमत्कार शास्त्रज्ञानाने होतात. भक्तीने अथवा नाम जपण्याने होत नाहीत.
तेव्हा ईश्वर व ‘निसर्ग’ यांचे नाते जोडताच येत नाही. ईश्वरी चमत्कार हटकून होतील व ते प्रत्यक्ष सर्वांना दिसतील असे तर नाहीतच. निसर्गशक्तीचे ज्ञान होण्यास रसायनादी विज्ञानशास्त्रांचे अनेक ग्रंथ आहेत. त्यांचे ज्ञाते आहेत; परंतु ईश्वरज्ञान होण्यास निश्चित असा एकही ग्रंथ नाही व त्याचे ज्ञाते नुसत्या गूढ गोष्टी सांगतात. त्याचा प्रत्यय सर्वांना येणे शक्यच नाही.
माझ्या पाहण्यात खऱ्या खऱ्या श्रद्धायुक्त अंतःकरणाचे निस्सीम भक्त अनेक वर्षांच्या उपासनेनेही मनःकामना पूर्ण न झालेले असे अनेक आहेत. मग ईश्वरदर्शन तर दूरच राहिले ! ‘ईश्वरदर्शन होऊ शकत नाही’ हाच सिद्ध नियम सांगोवांगी ईश्वरदर्शन झालेल्यांच्या काही अपवादाने सिद्ध होतो. कारण उघडच आहे. ईश्वर असला तरी तो विशिष्ट स्वरूपाचा नाही. राहिले त्याचे ‘दया’, ‘दातृत्व’, ‘दमन’ इ. सामर्थ्य. तेही सर्वांच्या. प्रत्ययास हटकून येईल असे नाही.
ईश्वरी चमत्कार म्हणजे निसर्गनियमाविरुद्ध घडून आलेल्या गोष्टी. अग्नी जाळतो, पण सीताशुद्धीच्यावेळेस त्याने तो आपला धर्म सोडला. पाणी बुडविते, पण प्रल्हादाच्या वेळेस त्याने तो आपला धर्म सोडला. अशा भक्तांच्या पुष्कळ गोष्टी वर्णिल्या आहेत. त्या वाच्यार्थाने खऱ्या, का लक्ष्यार्थाने खऱ्या, याचे तारतम्य न राहून ईश्वरी चमत्कार वर्णन करण्यासाठी त्या वाच्यार्थानेच खऱ्या, असे आग्रहाने प्रतिपादण्यात येते. पण याचा अनुभव मात्र येत नाही.
निसर्गनियम ईश्वरानेच केले असे घटकाभर मानले तरी आपणच केलेले कायदे भक्तांसाठी का मोडावेत? भक्तांसाठी रदबदली करणारा ईश्वर खात्रीने मानवाने आपल्याप्रमाणे घडविला आहे. ‘जसे लोक तसे त्यांचे देव’ हे जगात दिसतेच. इतर प्राण्यांप्रमाणेच मनुष्य हाही एक प्राणी आहे आणि मनुष्यातील एखादा मोठई तपश्चर्या करणारा असला, तरी त्या एका व्यक्तीसाठी ईश्वर विश्वकल्याणाच्या दृष्टीने ज्या घडामोडी करतो, त्यात या भक्तालाच त्याने का महत्त्व द्यावे व निसर्गनियम मोडावेत? मानवी मनाच्या संकुचित विचाराने त्याला व्यक्तिविषयक सुखदुःखांना विश्वकल्याणाच्या दृष्टीने काही महत्त्व आहे काय?उदाहरणार्थ असे समजू- समुद्रातील बोटीमध्ये काही कारणाने बोटीत ओझे वाढून बोट बुडण्याचा प्रसंग आला तर बरीचशी माणसे वाचवण्यासाठी, काही माणसे समुद्रात बुडविणे अवश्य होते.
‘राया! कुलार्थ पुरुष ग्रामार्थ कुल, ग्रामही देशार्थ’ याप्रमाणे मोठ्या स्वार्थासाठी लहानसा स्वार्थ सोडावा लागतो. विश्वनियंत्रणाच्या दृष्टीने एका व्यक्तीसाठी, मग तो महान भक्त असला तरी, ईश्वरी शक्तीने आपले नियम का मोडावेत?
तात्पर्य, ईश्वरीसामर्थ्य म्हणून मानवी मनाने ज्या कल्पना करून घेतल्या आहेत, त्या सर्व त्याने आपल्या व्यक्तिविषयक सुखदुःखाच्या दृष्टीने एका व्यक्तीसाठई, मग तो महान भक्त असला तरी, ईश्वरी शक्तीने आपले नियम का मोडावेत?
तात्पर्य, ईश्वरीसामर्थ्य म्हणून मानवी मनाने ज्या कल्पना करून घेतल्या आहेत, त्या सर्व त्याने आपल्या व्यक्तिविषयक सुखदुःखाच्या दृष्टीने केलेल्या आहेत. त्या सामर्थ्यांचा प्रत्यक्ष पुरावा नाही.
चिकित्साबुद्धीच्या दृष्टिीकोणातून सत्याचा वाली, भक्तांना संतुष्ट करणारा व दुष्टांना शासन करणारा असा ईश्वर प्रत्यक्ष सिद्ध होत नसला तरी १००० माणसांतील ९९९ लोक ईश्वराचे अस्तित्व मानतात, व त्यास कर्तुमकर्तु अन्यथा कर्तुम असा समर्थ मानतात. आद्य मानवापासून मानीत आले आहेत आणि पुढेही मानतील, यात मला संशय वाटत नाही. विज्ञानशास्त्रांची कितीही प्रगती झाली तरी मानवजातीच्या अंतापर्यंत बहूजनसंख्येच्या मनातील आस्तिक्यबुद्धी व ईश्वरी सामर्थ्याच्या कल्पना नाहीशा होणाऱ्या नाहीत.
मानव अनंत कालपर्यंत अपूर्णच राहणार. कशासंबंधी तरी तो असहाय्य व दुर्बल असणार आमि कितीही सुखे त्यास प्राप्त झाली तरी त्यास आणखी काही तरी पाहिजेच असणार व ते प्रयत्नसाध्य नसणार. अशा मनःस्थितीत आशादायी दिलासा, मग तो काल्पनिक का असेना, त्यास हवा असतो. या ईश्वरीशक्ती आपण प्रसन्न करून घेऊ व त्यापासून आपली मनःकामना पूर्ण होईल अशी उमेद देणारी ईश्वरी कल्पना आहे. अशा ह्या खुंटीवर आवलल्या चिंतेचा भार टाकण्याने मानवी मनास थोडी विश्रांती मिळते. त्याचे मन आशायुक्त होते व त्यामुळे पुढे प्रयत्न करण्याचे सुचते.
तेव्हा आस्तिक्यबुद्धीचा हा मोठा फायदा आहे. हे साधन तो गमावणार नाही. त्याचा प्रत्यक्ष अनुभव येवो अथवा न येवो. काल अनंत असल्यामुळे ‘ईश्वर’ आपणाकडे केव्हा ना केव्हा तरी पाहील, हा मानसिक दिलासा मोलाचा आहे. शिवाय सामुदायिक ईश्वरोपासनेने समाजाचे एकीकरण होते. ईशभयाने व ईशकृपेच्या आशेने समाजातील व्यक्ती सन्मार्गवर्ती होऊ शकतात. निदान पूर्वीच्या शतकांत तशा त्या होत्या. समाजधारमएस ‘धर्मा’ ची आवश्यकता असते (जेथे धर्म नाही तेथे कोणचा तरी ‘ईझम’ हे कार्य करू शकतो.) आम्ही भारतवासी धर्मास सोडण्यास आणखी काही शतके तरी तयार होणार नाही.
शिवाय उपासनेचे प्रकारही फार सुखावह असतात. उपास्य देवताची मूर्ती उच्च स्थानापन्न करून त्यापुढे नाना द्रव्यांचा सुगंध दरवळून, निरनिराळ्या तेजाचे दीप लावून व नाना प्रकारच्या पक्वान्नांचा नैवेद्य दाखवून, संस्कृत नादमधुर शब्दांची स्तुतिस्तोत्रे गावून, भजनाचा कल्लोळ माजवून, पुढे भोजनाच पंक्तीच्या पंक्ती उढत असतात. ह्या सर्व सुखसोहळ्याने आस्तिक्यबुद्धी सुखदायक का वाटू नये? पापाच्याराशी जेथे एक ‘नाम’ घेण्याने भस्म होतात तेथे पापाची भीती तरी कशाला राहील? असे आस्तिक्यबुद्धीचे आणखीही फायदे आहेत.
परंतु हे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आणि मला वाटते आमच्या राष्ट्राने हे तोटे ज्या सहनशीलपणाने सोसले आहेत तसे ते अन्यकोणत्याही राष्ट्राने सोसले नसतील. आस्तिक्यबुद्धीचा अनिवार्य परिणाम देववादी व दैववादी होणे, प्रयत्नाला गौण स्थान देणे, मनुष्यबुद्धी प्रयत्नावाचून राहू शकत नसली तरी, दैववाद बहलवत्तर असल्यामुळे प्रयत्न नेहमी हळुवारच होत असले पाहिजेत. ईश्वरी सामर्थ्याच्या प्रभावाने जिज्ञासाबुद्धी बहुधा मारलीच जाते. तशी ती आमच्यात तीव्रतेने कधीच नव्हती, त्याची साक्ष आमचा इतिहासच देत आहे. जिज्ञासा नाही, तेव्हा प्रयत्नही नाही. आणि असलाच तर आराधनेचाच. अद्यापही थापाडे गोसावी, बैरागी आम्हांपैकी चांगल्या सुशिक्षित लोकांस फसवितात. “नवसाने ईश्वर पावतो” ह्या कल्पनेने मानवाने आपला स्वभाव ईश्वरावर लादलेला स्पष्टच दिसतो. फलज्योतिषावरील विश्वासुद्धा ईश्वरी आस्तिक्यबुद्धीचीच एक विकृत संतती आहे. महाराष्ट्रीय एरव्ही इतरांपेक्षा आपणांस बुद्धिमान समजतो परंतु मुलांमुलींची लग्ने जुळविण्याच्या वेळी कुंडलीची जी अर्थशून्य वाटाघाट करतो, मराठी नियतकालिकांची विक्री त्यांत प्रसिद्ध होणाऱ्या राशिभविष्यांच्या गप्पांवर अवलंबून असलेली जी दिसते, त्याकडे पाहिले म्हणजे या बुद्धिवानांचा बुद्धिवाद काय किमतीचा आहे हेही कळून येते. प्रत्येक कार्यास ‘कारण’ हे असलेच पाहिजे. या नियमाप्रमाणे या विराट सृष्टीस गडवून आणणारा कोणी तरी असलाच पाहिजे आणि तो मनुष्याप्रमाणेच. कुंभार ज्याप्रमाणे मडकी घडवितो तशी ही सृष्टी घडवली जात असली पाहिजे, अशी एक भाबडी कल्पना सर्वसामान्य लोकांत पसरलेली आहे. निसर्गशक्ती हुबेहूब यांत्रिक शक्तीप्रमाणे आहे. यंत्राला सद्सद्विवेकबुद्धी नाही. निसर्गालाही ती असलेली दिसत नाही. यंत्रात यंत्राची चक्रे, आरे, पट्टे, लिव्हर. इ. जसे मनुष्याने जोडले असतील तसे ते यंत्र फिरते व पदार्थ उत्पन्न करते. निसर्गातही ‘पदार्थविज्ञान’ व ‘रसायन’ या शास्त्रांच्या नियमांप्रमाणे सृष्टीतील ‘वनस्पती’ व ‘प्राणी’ उत्पन्न होतात, वाढतात, विकास पावतात व शेवटी नाशही पावतात. निसर्गात सुसूत्रता असेल, नियमाप्रमाणे विकासही होत असेल, परंतु त्यात सदसद्विवेकबुद्धी नाही. “ीळीरश्रष हिश षळींशीं’ जे योग्य असेल तेच निसर्गात उत्पन्न होते, व टिकते. परंतु ‘योग्य’ याचा अर्थ ‘बलवान’, ‘सदाचारी’, ‘धर्मनिष्ठ’ असा नव्हे. या सृष्टीत सर्वच काही सुंदर नाही, व जे सद्गुणी, श्रद्धावान, धार्मिक यांचाच जय होतो असेही नाही. मात्र जो शारीराने व बुद्धीने ‘बलवान’, असेल त्यांचा मात्र जय अव्याहत दिसतो. जगात सौंदर्याप्रमाणेच कुरूपताही आहे. ‘बुद्धी’प्रमाणेच निर्बुद्धताही दिसते. ‘वैषम्य’ व नैपुण्यही दिसते. अर्थात् ‘सत्य’ व ‘न्याय’ सर्वत्र अबाधित दिसत नाही. ‘सद्गुणाचाच कैवारी असा नाही. आणि कल्पित ‘ईश्वर’ ही सद्गुणाचा कैवार अबाधितपणे दाखवीत नाही!
‘दया’, धर्म, सत्य, अहिंसा, वात्सल्य, ‘प्रेम’, भक्ती, परोपकार, नीती इ.इ. ज्या सद्भावना मानवाच्या मनात उत्पन्न झाल्या आहेत, त्यास कारण मानवप्राणी कळप करून राहणाऱ्या प्राण्याप्रमाणे असल्यामुळे, तो समाज करून राहतो; आणि त्यात कुटुंबसंस्था व समाजबंधने उत्पन्न झाली झाली असल्यामुळे मानवप्राण्यात ह्या सदसद्भावना उत्पन्न झाल्या. व त्याच त्याने आपल्या कल्पित ईश्वरातही असल्या पाहिजेत असे मानले आणि तसा अनुभव येत नसला तरीही ईश्वरास दोष न देता ‘कर्मविपाक’ इ. अनुमानाच्या कल्पनेने मनुष्य आपल्या दैवासच दोष देतो व ईश्वराचे महत्त्व कायम ठेवतो.
‘यतो धर्मस्ततो जयः’ या वाक्याने समादन होत असले, तरी असा हमखास अनुभव नाही! उलट ‘यः बलवान स विजयी’ हा अनुभव मात्र हमखास येतो. त्याचप्रमाणे ‘आत्म्या’चे अविनाशत्वही प्रत्ययास येणारे नाही. आईबापांच्या शरीरादी आकाराप्रमाणे संततीचा शरीराकार, रंग, रूप इ. दिसते, त्याचप्रमाणे मानवबुद्धीचे गुणही संततीत उतरलेले दिसतील. पण या शिवाय आत्म्याचा, अथवा जीवाचा पुनर्जन्म प्रत्ययास येत नाही. पूर्वजन्मही प्रत्ययास येत नाही. या अनुमानजन्य समजुती आहेत. ही दृश्य सृष्टी कोणीतरी मुद्दाम घडवून आणली असे नसून वनस्पती व प्राणी या सृष्टीतील ‘वाढ’ व विकास उत्क्रांती तत्त्वांना धरून आपोआप झालेली आहे, व आपोआप विनाशही ठरलेला आहे. त्यात सदसद्विवेकबुद्धीचा लवलेशही दिसून येत नाही म्हणूनच त्यास कोणी ईश्वरासारखा कर्ता असावा असे म्हणता येत नाही. मग तो दयाळू, न्यायी, पापहरण करणारा, भक्तवत्सल, असा तर नाहीच नाही.
४८-४९ लक्ष्मी पार्क को.ऑ.हौ.सो., नवी पेठ, पुणे ४११ ०३०.

कम्फर्ट झोन
आजचा सुधारक चा वाचक-लेखक मुख्यतः शहरी, मध्यमवर्गी, मध्य व उच्चवर्णी, वयाने व अनुभवाने प्रौढ आणि परिपक्व असा आहे. एकूण मराठी मध्यमवर्गापासून आसु च्या वाचक लेखकाचे वेगळेपण कशात आहे, याबद्दलचा माझा अंदाज असा पु. ल. देशपांड्यांच्या प्रवासवर्णनांवर न थांबता तो पी. साईनाथांच्या एव्हरीबडी लव्हज अ गुड ड्राउट (मराठीत दुष्काळ आवडे सर्वांना, अनुवाद : हेमंत कर्णिक) या पुस्तकापर्यंत पोहोचतो.
हम आपके है कौन?या चित्रपटापेक्षा त्याला हजारों ख्वाहिशें ऐसी हा चित्रपट महत्त्वाचा वाटतो. लता मंगशकरांचे विचार ऐकण्यापेक्षा त्याला मेधा पाटकरांचे विचार ऐकायला आवडते. भा. रा. तांब्यांपेक्षा केशवसुत आणि मंगेश पाडगावकरांपेक्षा नारायण सुर्वे हे त्याला महत्त्वाचे वाटतात. जरी वर सर्व उल्लेख पुल्लिंगी असले तरी तो भाविक उपचार आहे, आणि उल्लेख स्त्रीलिंगी असणेही तितकेच ग्राह्य आहे, हे त्याला पटते. इत्यादी.
वरील सर्व उदाहरणांमध्ये पहिल्या पर्यायाबद्दल अनादराची भावना नसून दुसऱ्या पर्यायापर्यंत पोचण्याची वृत्ती ठसवायचाच हेतू आहे. त्या वृत्तीत सामाजिक, सामूहिक व्यवहाराला महत्त्व आहे. आजूबाजूचे भौतिक-ऐहिक जग महत्त्वाचे मानणे आहे. समाजव्यवहारात ताणतणाव कमी असावेत, अन्याय्य अंगे नसावीत, अशी इच्छा आहे. आणि या सगळ्या क्रियांमागची यंत्रणा समजून घेऊन ती समज परिस्थिती सुधारण्यासाठी वापरायची इच्छा आहे. आहे ते योग्यच, आहे ते इष्टच, त्यात आपण काय करणार?अशी ही वृत्ती नाही. मी सुखात आहे, मला समाधान आहे, या सुखसमाधानाच्या कोशाबाहेर मी कशाला पडायचे? हेही मान्य नाही. आजच्या एका समर्पक इंग्रजी शब्दप्रयोगातून सांगायचे तर, आजच्या सुधारक चा वाचक आपल्या कम्फर्ट झोनबाहेर पडायला तयार, नव्हे, उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ (डीशीश थरींसह) याने आपल्या आत्मचरित्राला नाव दिले, आऊट ऑफ माय कम्फर्ट झोन. तो अत्यंत यशस्वी क्रिकेटपटुही होता आमि कोलकात्यातील एका अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्थेचा तो आश्रयदाताही आहे. बरे, तो केवळ पैसे देण्यावर न थांबता व्यवस्थापनात व मुलांसोबत वेळही घालवतो. वॉच्या मते आपल्या कम्फर्ट झोनबाहेर प्रयत्नपूर्वक न पडल्यास हातून काहीही महत्त्वाचे काम होत नाही, मग ते क्रीडामैदानावर असो की त्याबाहेर. अशा वृत्तीचे लोक जगभर असणार, आणि त्यांपैकी काही मराठी माणसे आसु सोबत आहेत. सध्याच्या स्थितीबद्दल असमाधान आणि म्हणून परिस्थिती बदलायची इच्छा व प्रयत्न सगळीकडेच दिसतात, आणि त्यांपैकी मराठी प्रयत्नांना बळ पुरवायचा आसु चा प्रयत्न असतो.
आणि त्यामुळे माणसे सामान्यतः श्रद्धाळू असतात हे तथ्य आम्ही “मग काही करायची गरजच नाही”, अशा भूमिकेकडे जाणारे-नेणारे मानत नाही. पण सोबतच श्रद्धाविरोधावरच लक्ष केंद्रित करणे एका नव्या कम्फर्ट झोनमध्येही आपल्याला अडकवू शकते, असे आम्हाला वाटते. हे मुद्दाम नोंदायचे कारण म्हणजे एका नुकत्याच आलेल्या पत्रामध्ये आम्ही आगरकर, फुले, आंबेडकर, गाडगेमहाराज अशांचेच विचार पुन्हापुन्हा मांडावे, अशी सूचना केलेली आहे. आमच्या मते आम्ही असे करणे हे नव्या कम्फर्ट झोनमध्ये रुजणे ठरेल.
यात पूर्वीच्या सुधारकांचे दैवतीकरण होते. जिथे विवेकवादी भूमिकेतून आम्ही बाबावाक्य हे प्रमाण मानत नाही, तेथे पुन्हापुन्हा पूर्वीच्या सुधारकांचे विचार कसे मांडावे?त्यांच्या काळच्या स्थितीतली अनिष्ट अंगे आजही अनिष्टच आहेत. सोबतच नवी अनिष्ट अंगे उपजत आहेत. नव्याजुन्या अनिष्ठ अंगांचे अग्रक्रम आमच्या मते बदलत आहेत. तेव्हा “पूर्वज वदले त्यां गमले ते। ऐका खुशाल सादर चित्ते । परंतु सरका निशंक पुढते। निरोप त्यांचा ध्यानी घेऊनि ।’ असे करणेच इष्ट आहे. त्यांचे निरोपच पुन्हापुन्हा एकमेकांना सांगणे, हा बाटलेल्यांना बाटवण्याचा प्रकार आम्ही करणार नाही. विशिष्ट स्थितींना लागू पडणारे माजी सुधारकांचे “निरोप’ आम्ही वेळोवेळी पुन्हा मांडतो आणि हे पुरे आहे.
वर्षाला पाचशे शहात्तर पाने असा आसु चा आकार आहे. सुरुवातीस चारशे रुपये देऊन आजीव वर्गणीदार झालेल्यांच्या वर्गणीतून छत्तीस रुपये कमाल व्याज आम्हाला मिळते. टपाल टिकिटे व लिफाफे यांत वर्षाकाठी नऊ रुपये जातात. उरलेल्या सत्तावीस रुपयांचा हिशोब मजकुराच्या पानामागे पाच पैशांपेक्षा कमी आहे, तोही घरपोच. सध्याच्या मराठी पुस्तकांच्या तुलनेत हे एक-पंधरांश किंवा कमी आहे. अशावेळी आगरकर फुले आंबेडकरादींचे साहित्य ‘मालिकाबद्ध’ करणे आम्हाला झेपणारे नाही. कोणत्याही प्रकारचा मिंधेपणा येता कामा नये, या आमच्या संस्थापक संपादकांच्या आदेशाशी आम्ही पूर्णतया सहमत आहोत. त्यामुळे “अमके छापा, मी खर्च देतो.”, असल्या निरोपांना आम्ही किंमत देत नाही भलेही हा कोणाला उद्दामपणा वाटो.
आज नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढलेला आहे. ‘लेकुरे उदंड जाली। अन्न खाया मिळेना’ अशी स्थिती आहे. सोबतच अन्न पुरवणारे हलाखीत आहेत. विषमता निर्लज्जपणे वाढते आहे. उद्योजकांचे आठ हजार कोटींचे महाल, वातानुकूलित मॉल मल्टिप्लेक्सेस यांच्या बातम्या वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठांवरून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आणि दलितांवरील अत्याचारांना हटवत आहेत.
निसर्गाला तोंड देण्याचा विज्ञानाच्या वाढीव व विवेकी वापरापेक्षा चांगला मार्ग नाही. शिक्षणाचा दर्जा व व्याप्ती सुधारल्याखेरीज वाढीव विज्ञानवापर शक्य नाही. स्वातंत्र्यापासूनच्या साठेक वर्षांमध्ये आयुर्मान दुप्पट झाले आहे, पण आरोग्यव्यवस्था अपुरी पडते आहे. महाराष्ट्रात पन्नास टक्के माणसे नागर, शहरी झाली आहेत; त्यामुळे नागरीकरणाचे प्रश्न आज ‘मूठभरांचे’ उरलेले नाहीत. दुसरीकडे शेतीचे प्रश्न तीव्रतर, तीव्रतम होत आहेत. या साऱ्यांची दखल आमचे विशेषांक घेत आहेत घेत राहतील. ते सोडून श्रद्धेचे उच्चाटन/निरीश्वरवाद या सम्फर्ट झोनमध्ये अडकून राहणे आम्हाला मान्य नाही.
जात व आरक्षण विशेषांकाचा वेगळा उल्लेख आवश्यक आहे. अंधश्रद्धा केवळ देवाधर्माविषयीच नसतात. आज जातपातीवर आधारित विषमता कमी झाली आहे, उच्चवर्णीयांच्या हातात देश असताना उच्च गुणवत्तेने तो चालवला जात होता, आरक्षण वगैरे मार्गांनी आजवरच्या वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात न आणण्यामागे गुणवत्तेबाबतची निष्ठाच महत्त्वाची आहे अनेक अंधश्रद्धा. आणि या अंधश्रद्धांना धक्का न लावता आपल्या पूर्वग्रहांच्या कम्फर्ट झोनमध्य लोळणेच श्रेयस्कर, असे मानणारे कमी नाहीत आसु च्या वाचकांमध्येही कमी नाहीत. त्यांना त्यांच्या सुखशांतीच्या झोनमधून बाहेर काढणे आवश्यक होते, असे आमचे मत. “चावून चोथा झालेला विषय म्हणाऱ्यांना न धावताच’ घडलेल्या पूर्वग्रहांचा चोथा दाखवून देणे गरजेचे होते.
पण जातीय विषमता हटवायचा आरक्षण हा आदर्श मार्ग नाही तो तात्कालिक दिलासा देणारा व्यवहारी मार्ग आहे, हे दिवाकर मोहनींनी (मे २००८ च्या अंकात) दाखवून दिले. हेही गरजेचेच आहे. सोबतच मोहनींनी मूलभूत अंधश्रद्धांची एक यादी दिली, तेही गरजेचे होते. मुळात जातींनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा व चालीरीती जपणे वाईट नसून चांगलेच आहे. त्यात येणारा उच्चनीचतेचा भाव मात्र अत्यंत आश्रेपार्ह आहे. अशा अनेक बाबींवरील चर्चेला तोंड फोडायला हा अंक घडवला गेला.
भाषा व निवयांबाबतही थोडाफार कम्फर्ट झोन प्रकार दिसतो. काटेकोर परिभाषेवर आग्रह धरला तर तो दुर्बोध माणुसघाणेपणा ; आणि जास्त स्पष्ट व सोप्या रूपात त्या संकल्पना सांगायचा प्रयतन केला तर “तुम्ही स्वतःला पंतोजी आणि आम्हाला ढ समजता का?”! याविषयी किस्सा आठवतो तो पु. ल. देशपांड्यांच्या शाळकरी लहानपणाचा. एका ज्येष्ठवरिष्ठ नेत्याच्या भाषणानंतर पुलंनी “अमुक विषयावर तुमचे मत काय?”, अशा अर्थाचा प्रश्न विचारला. नेते म्हणाले, “बाळ, वयाला साजेलसे प्रश्न विचार!” पुलंनी तात्काळ “सध्या पुण्यात अंजिरे काय भावाने मिळतात?’, असा प्रश्न केला! उथळपणाच्या, वृत्तपत्री पातळीच्या कम्फर्ट झोनबाहेर पडायला जरा-तरी ‘पोरवयाला न शोभेलशी’ भाषा आवश्यकच असते. आणि पारिभाषिक शब्द प्रथम वापरताना तो शक्यतो स्पष्टपणे, जमल्यास उदाहरणे देत समजावून देणे आवश्य असते. ही पथ्ये एखादा लेखक (ज्यात संपादकही आले) पाळत असला, तर त्याच्यावर टीका करणेही कम्फर्ट झोनमध्ये अडकणेच ठरते.
चळवळीत न पडता नुसतेच लेक प्रसृत करणे, हाही कम्फर्ट झोन आहे का? मला तसे वाटत नाही. आगरकरांचा सुधारक हा लोकाग्रणीं मध्ये मतपरिवर्तन व्हावे या हेतूने काढला व चालवला गेला. लोकाग्रणी म्हणजे आज ज्यांना ओपिनियन मेकर्स म्हणतात असे लोक. हे मध्यमवर्गीच असतात, पण कम्फर्ट झोनबाहेर पडायला तयार असतात. लोक अशा लोकाग्रणींचे ऐकून घेतात, भलेही त्यांचे मतपरिवर्तन लवकर न होवो. पुरेसे लोकाग्रणी, पुरेशा लोकांशी नव्या विचारांबद्दल बोलत राहिले, तर कधीकधी मतपरिवर्तन होतेही. अशा प्रक्रियेला चालना देणे, बळ पुरवणे, हा सुधारक चा हेतू होता, तसाच आजचा सुधारक चाही आहे. त्यातली चर्चा चळवळीच्या पातळीवर गेली नाही तरीही ती कमीजास्त सक्षम, कमीजास्त परिणामकारक अशी भाषिक कृतीच असते. चळवळींना तात्त्विक बैठक पुरवणे प्रत्यक्ष चळवळीत उतरण्याला पूरक असते. त्यामुळे ते महत्त्वाने कमी ठरत नाही. आजचा सुधारक चे काम विचारांच्या आणि ज्ञानाच्या पातळीवरच आहे, याची आम्ही लाज बाळगायचे कारण आम्हाला तरी दिसत नाही.
आजचा सुधारक च्या व्यवहाराबद्दल फार दिवसांनी लिहावे लागत आहे, पण आसु ने नवे विषय, नवे विचारवंत टाळावे अशा अर्थाची एक पत्रमालिका संपादक व काही विश्वस्तांना लिहिली गेली. एका विश्वस्तांचे उत्तर पत्रसंवादात आहे. औपचारिक उत्तर हे संपादकीय पुरवेल तरी ते पुरणार नाहीच!