श्रद्धा धार्मिकांचा प्लॅसिबो

श्रद्धेचा रिमोट वापरून एक बारीकसा खडासुद्धा आपोआप एक सेंटिमीटरसुद्धा पुढे सरकता येणार नाही. पण श्रद्धा असल्यास डोंगरसुद्धा चालत येऊ शकतो असी बढाई मारणारे भरपूर जण आहेत. श्रद्धेमुळे काही नाट्यपूर्ण घटना घडतात असे छातीठोकपणे सांगणारे अनेक लोक आपल्याला नेहमी भेटत असतात. गंगेचे पाणी पिण्यामुळे अनेक दुर्धर रोग बरे झाले आहेत, असे सांगणारे लोक आपल्याला नक्कीच भेटले असतील. पार्वतीमाने पोटावर हात फिरवल्यानंतर बाईची पाळी चुकली, व पोट दिसण्याइतपत पुढे आले, असे सांगणाऱ्या शेकडो बायका महाराष्ट्र गुजरात येथे सापडतील. शेवटी पोटात मूल नव्हतेच हा भाग वेगळा. अर्धांगवायूच्या झटक्यामुळे एखादा अवयव निकामी झाला तरी ईश्वरावरील (किंवा बुवा-महाराज यांच्यावरील!) श्रद्धेमुळे ते अवयव नीटपणे काम करत आहे असे सांगणाऱ्याकडे बघितल्यावर आपण थक्क होतो. कारण अवयव निकामी झालेला आहे हे उघड्या डोळांना स्वच्छपणे दिसत असते.
सश्रद्धांचा मेंदू कसा काम करतो? हा एक संशोधनाचा विषय आहे. मेंदूतील एक बारीकशी हालचाल चयापचय क्रियेत एवढा मोठा बदल कसा काय घडवू शकते? ज्ञानेंद्रियांच्या अनुभवांच्या विरुद्ध टोकाच्या गो टीवर आपले मन कसे काय विश्वास ठेऊ शकते?श्रद्धेला जैविक आधार असू शकेल का? असे अनेक प्रश्न आपण श्रद्धेच्या संदर्भात विचारू शकतो. ‘श्रद्धेतील विसंगती’ या विषयावर संशोधन करणारे कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. व्ही. रामचंद्रन यांच्या मते श्रद्धेचा संपूर्ण व्यवहार आह्वानात्मक असूनसुद्धा त्याचा नीटपणे अभ्यास झालेला नाही. श्रद्धेबद्दल कुणालाही काहीही कल्पना नाही. काही वैज्ञानिक मात्र अलिकडे श्रद्धेचा गंभीरपणे अभ्यास करत आहेत. याविषयी दोन प्रमुख विचारप्रवाह आहेत. ढोबळमानाने श्रद्धा विवेक व बुद्धिमत्ता यांच्या मिश्रणातून तयार झालेला व्यवहार आहे. असे काही अभ्यासकांना वाटते. परंतु इतर काहींना श्रद्धा पूर्णपणे भावनात्मक व्यवहार असून त्यात उत्स्फूर्ततेचाच भाग जास्त आहे असे वाटते.
श्रद्धेच्या जैविक मूळ कारणावर बोट ठेवणे वाटते तितके सोपे नाही. ईश्वरावरील श्रद्धेमुळे शारीरिक रोग बरा होऊ शकतो अशा दाव्याचा वैज्ञानिकरीत्या अभ्यास करणए फार अवघड आहे. परंतु एक पर्याय आजकाल उपलब्ध आहे. अभ्यासकांच्या मते वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेचे स्वरूप ईश्वरावरील श्रद्धेशी मिळतेजुळते आहे. आणि वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेच्या तथाकथित परिणामांची नियंत्रित चाचमी घेणे तुलनेने सोपे आहे. ताणतणावावरील गोळ्यांच्यातील ऐंशी टक्के परिणाम त्या गोळ्यांवरील श्रद्धेमुळे होतो व इतर वीस टक्के परिणाम गोळ्यांच्या रासायनिक परिणामामुळे. पर्यायी उपचार पद्धतीच्या बाबतीत तर परिणामातील श्रद्धेचा वाटा याच्यापेक्षाही खूप खूप जास्त असणार. अक्युपंक्चरच्या उपचारपद्धतीत पोटदुखीसाठी शरीरातील कुठच्याही भागात सुई टोचली तरी चालेल. पोटदुखी गायब! अशा प्रकारच्या श्रद्धेशी निगडित उपचाराच्या परिणामाला ‘प्लॅसिबो इफेक्ट’ म्हणून ओळखले जाते. आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धतीत प्लॅसिबोचा फार मोठा सहभाग आहे. त्यामुळे श्रद्धेचे वैज्ञानिक स्वरूप तपासण्यासाठई प्लॅसिबोच्या परिणामाचा अभ्यास पुरेसा ठरू शकेल, असे अभ्यासकांना वाटते.
ढोबळपणे प्लॅसिबो इफेक्ट म्हणजे वैद्यकीय उपचारंवरील श्रद्धेमुळे होणारे जैविक परिणाम. प्लॅसिबोचा खराखुरा परिणाम होऊ शकतो व रोगोपचार पद्धतीतील ती एक प्रबळ शक्ती आहे, हे मान्य करायलाच हवे. परंतु प्लॅसिबो कशा प्रकारे काम करतो, हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे. यासाठई एका संशोधकाने प्रत्यक्ष प्रयोग करण्याचे ठरवले. त्याने सुदृढ, निरोगी अशा चौदा युवकांची निवड करून त्यांना दाढदुखी होण्यासाठी काही गोळ्या दिल्या. त्यानंतर ही दाढदुखी कमी होण्यासाठी इंजेक्शन देत असताना ‘या इंजेक्शनमुळे दाढदुखी थांबेल किंवा कदाचित थांबणारही नाही’ असे रुग्णांना सांगितले. इंजेक्शनच्या सिरिंजमध्ये फक्त सलाइनचे पाणी होते. तरीसुद्धा बहुतेकांनी इंजेक्शनमुळे गुण आला म्हणून सांगू लागले. संशोधकांनी त्यांच्या मेंदूची झएढ चाचणी घेतल्यावर चाचमीत त्यांच्या मेंदूत नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात एंडॉर्फिनचा स्राव झाला होता, हे लक्षात आले. एंडॉर्फिनमुळे त्यांना कमी प्रमाणात वेदना जाणवत असाव्या. हाच धागा पकडून संशोधकांनी प्लॅसिबो उपचार घेणाऱ्यांच्या व न घेणाऱ्यांच्या मेंदूतील बदलांची चाचणी घेतली. प्लॅसिबोचा परिणाम झालेल्यांच्या मेंदूत एंडॉर्फिनचा स्राव जास्त प्रमाणात झाला होता. एवढेच नव्हे तर एंडॉर्फिन मेंदूतील वेदनेचा अनुभव दर्शविणारा, वेदनेच्या तीव्रतेचा माहिती देणारा व शरीराच्या कुठल्या भागात वेदना होत आहे याची जाणीव देणाऱ्या भागातसुद्धा पसरलेला होता. इंजेक्शनच्या सकारात्मक परिणामाविषयी ज्यांचा विश्वास होता, त्यांच्या मेंदूत एंडॉर्फिनचा स्राव जास्त प्रमाणात आढळला.
यावरून आपल्याला जे अपेक्षित आहे ते घडून येण्यासाठी जाणिवेच्या पातळीवरून या प्रक्रिया घडत असाव्यात असा अंदाज बांधता येईल. यद्वासुद्धा जाणीवपूर्वक व बुद्धिपुरस्सर घडत असलेली अशी प्रक्रिया आहे व ती आपल्या इच्छेला पूरक म्हणून कार्य करत असावे. आपल्याला नेमके काय हवे याची संपूर्ण जाणीव असेल तरच यद्वा (व प्लॅसिबो) परिणामकारकरीत्या कार्य करू शकतात. रुग्णाला अज्ञानात ठेवून प्लॅसिबोचा प्रयोग केल्यास कधीच गुण येत नाही. तुमचे परिचित तुम्हाला बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत हे तुम्हाला माहित असेल तरच तुम्हाला बरे वाटेल. तुम्हाला नकळत कितीही लोकांनी प्रार्थना केली तरी ते व्यर्थ ठरेल.
इंद्रियांच्या अनुभवांचासुद्धा श्रद्धेत प्रमुख सहभाग असतो. कारण आपण करत असलेली अपेक्षा कुठूनही उद्भवू शकते. पार्किन्सनच्या रुग्णांना प्लॅसिबोच्या उपचारानंतर बरे वाटू लागते. चाचणीत त्यांच्या मेंदूत नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात शरीराच्या हालचाली करणअयास उत्तेजन देण्याचे कार्य करणाऱ्या डोपामाइनचा स्राव झालेला आढळला. अशा प्रकारे प्रमाणातील वाढ केवळ औषधांच्या सेवनामुळे होते. औषधाचे काम प्लॅसिबो करत होता. पार्किन्सनच्या रुग्णांना प्लॅसिबो म्हणून दिलेल्या गोळ्या/इंजेक्शनमुळे त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. गंमत म्हणजे दुर्धर रोगांनी जर्जरित झालेल्या व औषधोपचारांच्या सकारात्मक परिणामांची आशा सोडलेल्या रुग्णांवर प्लॅसिबोचा कितीही उपचार केला तरी त्यांच्या अवस्थेत काहीही फरक पडत नाही. अल्झामादूरच्या रुग्णांच्यात जाणिवांचा अभाव असतो. त्यामुळे त्यांच्यावरील प्लॅसिबो उपचार निरर्थक ठरतो, कारण त्यांच्या अपेक्षाच कुंठित झालेल्या असतात. त्याचप्रमाणे अक्युपंक्चरचा परिणाम लहान मुलांवर होत नाही कारण रोगोपचाराच्या प्रक्रियेची त्यांना जाणीव नसते, त्यांच्यात अपेक्षा नसतात.
अनुभव व अपेक्षा प्लॅसिबोत हातात हात घालून कार्य करतात. वैद्यकीय उपचारावरील अढळ श्रद्धा उपचारप्रक्रियेत महत्त्वाची ठरते. धार्मिक श्रद्धेच्या संदर्भात धर्माबद्दलच्या इच्छा आकांक्षा व अनुभव फार महत्त्वाच्या ठरतात. अशा अनेक प्रकारच्या श्रद्धा कायम कोरल्यासारख्या आपल्यात घर करून बसलेल्या असतात. कितीही पुरावे दिले तरी त्यात बदल होत नाही. आपण आपल्या श्रद्धेशी घट्ट टिकटून बसतो. बदल करण्यास नाकारल्यामुळे नुकसान होत असते. डॉ. रामचंद्रन वैद्यकशास्त्रावरील श्रद्धेमुळे उद्भवलेला वैविध्यपूर्ण परिस्थितीवर संशोधन करत आहेत व त्यातूनच श्रद्धेचे स्वरूप उघड करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अर्धांगवायूचाच एक प्रकार असलेल्या अॅनोग्नोसियाच्या रुग्णांच्या एका गटाचा अभ्यास डॉ. रामचंद्रन करत असताना त्यातील काही रुग्ण आपल्या शरीरातील अवयव निकामी झाले नाहीत अशी समजूत करून घेतलेले होते. त्यापैकी एका रुग्णाला डॉक्टरांनी “मी तुला भूल येण्याचे इंजेक्शन देतो. काही काळ तुझा हात बधिर होईल.’ असे म्हणत निकामी झालेल्या हाताला सलाइनच्या पाण्याचे इंजेक्शन दिले, तो रुग्ण खरोखरच हात बधिर झाला आहे असे म्हणू लागला. इंजेक्शनचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी त्याच्या निरोगी हाताला सलाइनचे इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाने भूल काम करत नाही म्हणून प्रतिक्रिया व्यक्त केली. हे रुग्ण आपल्या निकाम्या हाताकडे एकाग्र चित्ताने बघत बसत असत व तो हात काम करतो यावर त्यांचा विश्वास होता. या रुग्णांना हात हलवण्यास सांगितल्यास सांधेदुखी, स्नायूतबिघाड अशी कारणे देत हात हलवण्यास नकार देत होते. ज्यांच्या उजव्या मेंदूत बिघाड आहे त्यांच्यातच हा प्रकार आढळला. डाव्या मेंदूत बिघाड झालेलयांना मात्र आपण अर्धांगवायूचे रुग्ण आहोत याची जाणीव होती. उजव्या मेंदूतील बिघाडामुळे प्रश्न विचारण्याची क्षमताच रुग्ण हरवून बसतो. प्रत्यक्ष पुराव्यावर विश्वास ठेवायलाही तो तयार होत नाही.
श्रद्धेतील विसंगती अॅनोरेसिया व बहायपोलार डिसऑर्डर (कधी उन्माद तर कधी औदासिन्य) मुळे उद्भवणअयाची शक्यता असते. अॅमनोरेक्सियाग्रस्त रोगी स्वतः हडकुळा असूनसुद्धा आरश्यात बघत असताना आपण फार लठ्ठ आहोत असे समजतो. बायपोलार डिसऑर्डरचा रुग्ण आपल्याच नादात असतो. कधी स्वतःला ‘ग्रेट’ तर कधी ‘कचरा’ असे समजत असतो. त्याचा स्वतःवर विश्वास नसतो. सामान्यपणे अशा प्रकारचे आजार भावनेतील विकारांमुळे होतात. श्रद्धेतील विसंगतीसुद्धा अशा आजारांचे कारण असू शकते.
काही वैज्ञानिकांच्या मते श्रद्धा ईश्वरावर की वैद्यकीय उपचारावर हे गौण आहे ही एक भावनिक स्थिती असते. ज्या प्रकारे सुख, समाधान, आनंद मेंदूतील रासायनिक स्रावांना कारणीभूत होऊ शकतात तसाच प्रकार श्रद्धेच्या बाबतीतही होतो. श्रद्धा ही मेंदूच्या सामान्य स्थितीत बदल घडवून आणते. भावनेच्या स्थितीतील मेंदूतील डोपामाइन व सेरोटोनिनच श्रद्धेच्या स्थितीतली काम करत असतात. आध्यात्मिकतेच्या आहारी पडलेल्यांच्यासुद्धा या न्यूरोट्रान्समिटरचाच सहभाग असतो.
एका वेगळ्या अभ्यासामध्ये जितक्या जास्त प्रमाणात दुखणे तितक्या तीव्रतेने प्लॅसिबो गुण देतो. जेव्हा जास्त दुखत असते तेव्हाच वेदनेपासून मुक्त होण्याची इच्छा तीव्र होते आणि अशा प्रसंगात प्लॅसिबोचा आधार मिळत असल्यास इच्छा पूर्ण होते, कारण प्लॅसिबोमुळे मेंदूत होत असलेला एंडोर्फिनचा स्राव वेदना कमी करणाऱ्या मेंदूच्या संवेदनशील भागात पसरतो व वेदनेतून मुक्तता मिळते.
धार्मिक श्रद्धांच्या बाबतीतही कदाचित असेच घडत असावे.
श्रद्धा ही एक जैविक दृष्यघटना असून त्यामुळे मेंदूत होत असलेल्या बदलांचे मोजमाप शक्य आहे. आयुष्यातील उद्दिष्टपूर्तीसाठी गरजेच्या असलेल्या आत्मविश्वासात श्रद्धेमुळे कदाचित वाढ होत असेल. श्रद्धेतून आत्मविश्वास की आत्मविश्वासातून श्रद्धा हा प्रश्न बाजूला ठेवला तरी माणूस श्रद्धेच्या मागे एवढा का धावत आहे याचे चित्र स्पष्ट होत जात आहे, हे मात्र खरे.
८, लिली अपार्टमेंटस्, वरदायिनी सह.गृह., पाषाण सूस रोड, पाषाण, पुणे ४११ ०२१