स्वयंसेवी संस्थाः काही विचार

गेली तीस वर्षे मी स्वयंसेवी क्षेत्रात काढली, त्यातल्या शेवटच्या पाच वर्षांत फार उद्विग्नता वाट्याला आली आणि ‘अर्थ काय स्वयंसेवी संस्थांचा ह्या विश्वचक्रीं?’ असे वाटू लागले.
संपूर्णपणे पुन्हा पहिल्यापासून स्वच्छ, साधा आणि मोकळा विचार करावा असे जाणवू लागले. तसा विचार सुरू केला पण अजूनही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे ‘स्वयंसेवी संस्था : सद्यःस्थिती आणि आह्वाने’ ह्यावर काही लिहिण्याइतपत आपला विचार पूर्ण झालेला आहे, असे अगदी खरोखरच वाटत नाही. दिवसेंदिवस मी जसा जसा विचार करतो आहे आणि अनुभव करतो आहे, तेव्हा वाटते, काय ह्या स्वयंसेवी क्षेत्रांनी स्वतःची वाट लावून घेतली. समाजाला सतत जागे ठेवण्याचे आणि चाललेल्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे त्यांचे काम कुठे थांबले आणि का?
स्वयंसेवी संस्थांची आजची स्थिती कशी आहे, ह्यावर चर्चा करण्याची आज गरज नाही. ती चर्चा खूप झाली आहे आणि स्वयंसेवी संस्था आज स्वतःचे वेगळेपण संपूर्णपणे गमावून बसल्या आहेत ह्यात वाद नाही. त्यांत जिवंतपणा उरलेला नाही. जोम नाही. आवेश नाही. आकांक्षा नाही. नवे काहीही घडत नाही आणि त्यांत सर्वत्र सुमारांची सद्दी आणि भुरट्यांची चलती आहे. कामापेक्षा शब्दांवर भर आहे. अस्सल कामाऐवजी नक्कल रिपोर्टिंगचे दिवस आहेत. राजकीय पुढाऱ्यांसारखी घराणेशाही तिथे सजायला लागली आहे आणि एक काळ अंताकडे आला असा भास होतो आहे.
ज्या क्षेत्रात आपण लहानाचे मोठे झालो, ज्या कामावर, ज्या क्षेत्रावर आपण जिवापाड प्रेम केले, स्वप्ने पाहिली, त्याविषयी असे लिहिताना तीव्र वेदनाही होतात आणि आपले काम चुकले, कुठून चुकले हे मुळापासून बघावे असे वाटू लागले. अजून पूर्ण विचार झालेला नाही पण आज जे वाटते आहे, मनातले प्रश्न, विश्वास किंवा जी मते बनलेली आहेत ती फक्त आपल्यासमोर ठेवतो. काही तुटक मुद्दे
१. माणूस जेव्हापासून माणूस झाला तेव्हापासून स्वयंसेवी कामाची सुरुवात झाली. अगदी टोळीत होता तेव्हा किंवा नंतर वस्ती करून एकत्र राहिला तेव्हासुद्धा. त्या क्षेत्राची आवश्यकता मुळीच संपलेली नाही किंवा संपणार नाही. आज थोडा मंद काळ सुरू आहे, इतकेच. ह्यापुढेही त्याचे महत्त्व राहणार, किंबहुना वाढणार. ते कसे, ह्याचा मात्र अचूक वेध घ्यायला हवा.
२. स्वयंसेवी क्षेत्राने स्वतःला राजकारणापासून, राजकीय प्रक्रियांपासून जे संपूर्णपणे तोडून घेतले किंवा त्यात विलक्षण भूषण मानले, ती एक घोडचूक होती. त्यामुळे स्वार्थी, मतलबी राजकारण्यांचे फावले. स्वयंसेवी क्षेत्र फार ‘अभिजन’ बनत गेले आणि अभिजन तसेच मध्यमवर्गाचे सर्व गुणदोष त्याच्या माथी आले. आत्ताआत्ताच्या काळात ते फारच भित्रे मध्यमवर्गीय बनले आहे.
३. दुर्दैवाने संपूर्ण समाजावर छाप पडेल अशी ताकद किंवा तशी चुणूक स्वयंसेवी संस्थांनी गेल्या तीस वर्षांत दाखवलेली नाही. हा खूप मोठा काळ झाला. त्यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहावर प्रभाव पडेल असे संबंध ह्या क्षेत्राने बाह्य जगाशी प्रस्थापित केले पाहिजेत. त्यासाठी सुरक्षित आणि छान-सुंदर-पवित्र वातावरणातून बाहेर येण्याची गरज आहे. हात काळे, पाय मलिन करावेच लागतील. शासन, राजकीय पक्ष-संघटना, औद्योगिक संस्था ह्यांना भिडावे लागेल.
४. स्वयंसेवी क्षेत्राचा अवकाश इतर क्षेत्रे काबीज करत आहेत. त्याला एकतर रोखायला हवे किंवा त्यावर उत्तर हवे. सध्या वर्तमानपत्रे स्वतःची फाऊंडेशन्स काढत आहेत. चॅनेल्स पैसे उभे करताहेत. त्यांनी खरे म्हणजे चांगले वर्तमानपत्र काढावे. ही सामाजिक कार्याची उठाठेव त्यांना का करावीशी वाटते? त्यांची प्रेरणा काय ? गंभीर सामाजिक काम की आपला धंदा ?
५. कॉर्पोरेट क्षेत्र सध्या सामाजिक कार्यात काही करू बघत आहे. भारतात तरी त्याचे स्वरूप अजून बाल्यावस्थेत आहे. सर्व कंपन्या काहीतरी ‘शो-पीस’ काम करण्याचे म्हणत आहेत. मात्र त्यातून काही चांगले प्रयोग पुढे येण्याची शक्यता आहे, त्यावर बारकाईने लक्ष ठेवायला हवे. अमेरिकेतील कंपन्या बिल गेटस्-वॉरन बफे ह्यांच्या नेतृत्वाखाली एक वेगळा पायंडा पाडतील. इ.स. २०५० मध्ये, “बिल गेटस् हा एक महान सामाजिक कार्यकर्ता होता. त्याने जगातले सार्वजनिक आरोग्य सुधारले आणि तो मायक्रोसॉफ्टचा संस्थापकही होता.’ असा उल्लेख शाळांच्या पाठ्यपुस्तकात असेल, ह्याकडे लक्ष ठेवायला हवे. ६. स्वयंसेवी संस्थांनी आपला पैसा, आपल्याला लागणारा पैसा स्वतःहून इथल्या नागरिकांकडून गोळा करायला हवा. तीच त्यांची आत्मिक ताकद आहे, तीच चिरंतन आहे. त्यानेच हे क्षेत्र व्यापक समाजाशी आपोआप जोडले जाईल. आज स्वयंसेवी क्षेत्र पूर्णपणे ‘स्पॉन्सर्ड’ आहे, अवलंबून आहे. फंडिंग एजन्सीजच्या लहरीवर आशा ठेवून आहे. ही एक प्रकारची गुलामी आहे. ह्या गुलामीतून हे क्षेत्र मुक्त करायला हवे. जे स्वतःच अवलंबून आहे ते काय दिवे लावणार ?
७. गेल्या दहा-वीस वर्षांत परदेशी संस्थांनी वाईट धुमाकूळ घालून सांस्कृतिक नासधूस केली आहे. ह्यातल्या कित्येकांचे व्यवहार संशयास्पद आहेत. त्यांचे सर्व अधिकारी बहुसंख्येने ख्रिश्चन, फक्त इंग्लिश बोलणारे आणि भारतीय असले तरी इथल्या परिस्थितीची बिलकुल जाणीव नसणारे असे आहेत. त्यांच्या एखाद्या चिमुरड्या प्रकल्प अधिकाऱ्यांसमोर मग चाळीस-चाळीस वर्षे काम करणारे कार्यकर्ते निमूटपणे उभे राहतात. हे थांबले पाहिजे. स्वयंसेवी क्षेत्राची आम भाषा सध्या इंग्रजी आहे. काम मराठी माणसासाठी, काम करणारे मराठी कार्यकर्ते, जमले की बोलतात इंग्रजीमध्ये संस्थांची नावे इंग्रजी भाषा इंग्रजी रिपोर्ट इंग्रजीत. प्रकल्प-प्रस्ताव इंग्रजीत निधीसुद्धा इंग्रजी, अमेरिकन किंवा डच, स्वीडिश. हेदेखील बदलायला हवे. स्वयंसेवी क्षेत्रातील बहुसंख्य ज्ञाननिर्मिती इंग्रजीत होते आणि इंग्रजीतच राहते. सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ते ज्ञान पोचत नाही. हे बदलायला हवे.
‘मैत्री’, कपिल टॉवर्स, सी. विंग, दुसरा मजला, डॉ. आंबेडकर मार्ग,
आर.टी.ओ. ऑफिसजवळ, पुणे ४११ ००१.