श्रीकांत कारंजेकरः निर्वैर, निराग्रही, निःसंग

श्रीकांत कारंजेकरची माझी मैत्री चांगली एकोणतीस वर्षांपासून आहे. १९८२ च्या सप्टेंबरमध्ये मी वर्ध्याच्या ग्रामोपयोगी विज्ञान केंद्रात दाखल झालो, तेव्हा पहिली मैत्री श्रीकांतशीच झाली. नंतर माझ्या आग्रहावरून तारक काटेही तिथेच आला. श्रीकांत मी तारक असे अभेद्य त्रिकूट इतकी वर्षे होते, त्यामुळे आम्ही परस्परांना गृहीत धरायला सुरुवात केली होती. मी वर्धा सोडून मुंबईला गेलो; सव्वीस वर्षे तिथे राहिलो. वाशी असणारा माझा संपर्क काहीसा क्षीण झाला. पण आमच्या मैत्रीत कधीच अंतर पडले नाही. आत्ता-आत्ता मी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला, ‘धरामित्र’शी काही प्रमाणात बांधला गेलो, त्यापासून ते ‘आजचा सुधारक’च्या डार्विन विशेषांकाच्या आखणीपर्यंत प्रत्येक योजनेत श्रीकांतचा समावेश होता. तो तसा आपल्यासोबत असण्याची सवयच झाली होती. म्हणून त्याचे अवेळी, अचानक जाणे मनाला हादरवून गेले.
श्रीकांत तसा कोणत्याच चौकटीत न मावणारा माणूस होता. त्याने गांधीवादी संस्थांमध्ये काम केले, पण तो परंपरागत अर्थाने गांधीवादी कधीच नव्हता. ‘धरामित्र’च्या संचालकमंडळात असूनही तो कधीही ‘संस्थाचालक’ वाटला नाही. त्याची जडणघडण तेजतर्रार मार्क्सवाद्यांच्या अटीतटीच्या विचार-कलहात झाली होती; पण ‘वाद घालणे’, समोरच्याला ‘खाऊन’ टाकणे, मुद्दा ‘रेटणे’ यात त्याला अजिबात रस नव्हता. त्याचा भर नेत्रदीपक मांडणीपेक्षा विषयाचे अनेकविध कंगोरे, समस्येची व्यामिश्रता प्रकट करण्यावर असे. त्याचे वाचन अफाट होते. ‘सोशिओबायॉलॉजी’-पासून ‘पोस्टमॉडर्निझम’पर्यंत व सामाजिक आंदोलनांपासून ऊर्जेच्या प्रश्नापर्यंत अनेकविध बाबींच्या तात्त्विक चिंतनात त्याला रस व गती होती. पण त्याला जवळून ओळखणाऱ्या बहुतेकांना त्याच्या बौद्धिक झेपेची व व्यासंगाची कल्पनाही नव्हती. इतके त्याचे ‘विद्वान’ पण बिन-काचणारे होते.
निर्वैर, निराग्रही व निःसंग श्रीकांतला पुस्तकांचे व्यसन होते. तो माणसात वावरायचा, व्यावहारिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडायचा. मित्रांमध्ये रमायचा, मीना-सुकल्प व तो ह्यांचे उबदार, तिघांचेच असे विश्व होते. पण हे सारे असतानाही त्याचा पिंड तत्त्वचिंतकाचाच राहिला, मुळात तो कुठल्याही गुंत्यात गुंतला नाही, त्याचा पाय व स्वर नेहमी मोकळाच राहिला. त्याने आयुष्यात कोणाशी स्पर्धा केली नाही (मत्सर, द्वेष तर दूरच); तसेच (पुस्तक वगळता) असंग्रह हाच त्याचा बाणा होता. आपला मूळ स्वर ओळखणाऱ्या व आयुष्यभर त्या सुरात, तालात गात आपल्याच मस्तीत जगणाऱ्या मूठभर डोळस माणसांपैकी तो एक आगळावेगळा फकीर होता. आजच्या दिशाहीन गोंधळाकडून, मतमतांतराच्या गलबलाटाकडून उद्याच्या समाजाला आवश्यक वैचारिक शिदोरीचे संश्लेषण करणे हे त्याने स्वतःचे कार्य मानले होते व त्याच दिशेने गेली अनेक वर्षे तो कार्यरत होता. प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून मोकळे होऊन आपल्या आवडत्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची त्याची इच्छा फलद्रूप होण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे बीजरूपात किंवा रोपट्याच्या रूपात त्याने केलेली वैचारिक मांडणी डेरेदार वृक्षाप्रमाणे पूर्णांशाने करणे त्याला शक्य होईल ह्या प्रतीक्षेत आम्ही सारेजण होतो. जितक्या साधेपणाने, शांतपणाने, आवाज न करता तो जगला, त्याच शैलीत त्याने आयुष्य संपवले. त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार म्हातारपणाचे परावलंबित्व त्याच्याजवळ येण्यापूर्वीच मृत्यूने त्याला जवळ केले. त्याच्या निरागस विनोदबुद्धीला, सखोल व्यासंगाला, गंभीर चिकित्सक बुद्धीला आणि अतिशय विरळ माणूस पणाला सलाम! श्रीकांत कारंजेकर जन्म : ३ नोव्हेंबर १९५३, हिंगणघाट, जि. वर्धा मृत्यु : ८ ऑगस्ट २००८, वर्धा प्रकाशनेः १. वैश्विक जीवनाचा अर्थ, २. बायोगॅस तंत्रज्ञान ३. पर्यायी ऊर्जा विकास कार्यक्रम ४. समाजपरिवर्तनाची पुढील दिशा ५. धार्मिक श्रद्धा व निरीश्वरवाद एक मूल्यमापन [Promises of Renewable Energy d Future Direction of Social Change ही इंग्रजी भाषांतरेही प्रसिद्ध )
द्वारा श्री. चिंतामणी गद्रे, ५ बी/सनराईझ सोसायटी, म्हाडा, खडकपाडा, दिंडोशी, गोरेगाव (पू.), मुंबई ४०० ०९७.