वेगळ्या वृत्तीचे न्यायमूर्ती

३ जुलाय २००८ पासून न्यायमूर्ती वि.म.तारकुंडे यांचे जन्मशताब्दीवर्ष सुरू झाले. त्यांची ओळख ‘रॅडिकल ह्यूमनिस्ट’ (मूलभूत मानवतावादी) अशी आहे. अर्थातच ते ‘नागरी स्वातंत्र्य लोकसंघटना’ (झणउङ, पीपल्स यूनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज) व ‘लोकशाहीवादी नागरिक’ (CFD, सिटिझन्स फॉर डेमॉक्रसी) या संघटनांचे सक्रिय नेते होते.
PUCL च्या मुखपत्राने न्यायमूर्ती तारकुंड्यांवर अनेकांचे लेख मागवून आपल्या ऑगस्ट २००८ च्या अंकात संकलित केले. त्यातील काही उताऱ्यांमधून तारकुंड्यांचे विचार आ.सु.च्या वाचकांपुढे मांडत आहोत.
… समाजात मूलभूत बदल व्हावे यासाठी लढणारा निर्भीड योद्धा. देवशास्त्रीय पोथ्या व राजकीय गूढविचारांच्या पलिकडे जाऊन मानवी हक्कांचा विचार करणारे ते विचारवंत होते. मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश, या नात्याने लोकांना अप्रिय अशी मते मांडणाऱ्याचे, तसे करण्याचे हक्क ते पुरस्कारत असत. त्यांचा मूलभूत मानवतावाद हा पंथ नसून माणसावरील दृढविश्वासावरून आलेला तो विचार होता.
[ न्यायमूर्ती व्ही.आर. कृष्ण अय्यर (सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश) यांच्या टिपणातून ]
ते गरीब घरातून आले होते. त्यांच्या वडिलांची आई पुण्यातील एका घरात स्वयंपाक करत असे. त्यांच्या वडिलांनी त्या काळी मॅट्रिक परीक्षेनंतर देता येत असलेली वकिलीची परीक्षा दिली होती. त्यांना सब-जजचे पद मिळाले होते, पण वर्षाभरातच राजीनामा देऊन ते वकिली करू लागले.
वि. म. तारकुंडे मॅट्रिक परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचा विषय शेती हा होता, कारण त्यांच्या मते दारिद्र्यनिर्मूलनाची सुरुवात तेथूनच होऊ शकते, कारण तो बहुसंख्यांचा पेशा आहे. त्यांच्या वडिलांचा सल्ला होता, की स्वतंत्रपणे लोकांसाठी काम करायचे असेल, तर वकील व्हावे. त्यानुसार त्यांनी सात वर्षे खेडेगावांत वकिली केली. ….
ते गांधींचे भक्त नव्हते, आणि त्यांना गांधीवाद आवडत नसे. नॉर्वेतील एक मानवतावादी नेते श्री. लेव्ही पँगेल एकदा भारतात आले होते. ते आंतरराष्ट्रीय मानवतावादी नैतिक संघटनांचे अध्यक्ष होते. त्यांनी तारकुंड्यांना त्यांची गांधींविषयी मते विचारली. तो संवाद असा
पँगेलः तुमचे काम गांधींपासून प्रेरणा घेऊन झालेले आहे का?
तारकुंडे: मुळीच नाही. १९२९ साली मी निरीश्वरवादी झालो तेव्हा माझा गांधींविषयीचा आदर संपला. मला त्यांचा कर्मठपणा रुचत नसे. पारंपरिक दृष्टिकोन व आधुनिक जगाबद्दल नावड, यांमुळे गांधी लोकप्रिय झाले. आधुनिक विज्ञान, आधुनिक उद्योग, येवढेच नव्हे तर आधुनिक वैद्यकालाही त्यांचा विरोध होता. ते ब्रह्मचर्य, ईश्वरनिष्ठा वगैरेंचा पुरस्कार करत. भारतीय राष्ट्रवादी चळवळीत त्यांचे योगदान ‘ऋण’ (negative) होते.
पँगेल: भारताला स्वातंत्र्य तर गांधीच्या नेतृत्वाखालील चळवळीनेच मिळाले ना?
तारकुंडेः ही एक मिथ्यकथा आहे. गांधींच्या नेतृत्वाखाली विकसित झालेली राष्ट्रवादी चळवळ कधीही एका मोठ्या साम्राज्यवादी सत्तेला उलथवू शकत नव्हती. त्यांची ऑगस्ट ‘४२ ची ‘चले जाव’ चळवळ नव्हेंबर ‘४२ पर्यंत शमली होती. दुसरे महायुद्ध व त्यामुळे घडलेले राजकीय व आर्थिक बदल, यांमुळे ब्रिटिश साम्राज्य संपले.
कॅगेल: म्हणजे तुमच्या लेखी गांधींच्या उदाहरणाला काहीच मूल्य नाही का?
तारकुंडे: गांधींचा मोठा गुण हा, की त्यांनी राजकारण कधीही नैतिकतेपासून विभक्त नसावे, हे ठसवले. त्यांनी राष्ट्रवादी चळवळीला सत्य आणि अहिंसा ही नीतितत्त्वे दिली. १९४६-४७ नंतर गांधींना राजकीय सत्तेशी घेणेदेणे नव्हते. त्यावेळी मला त्यांचे नीतिमान रूप उघड झाले. माझ्या मते त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष खऱ्या अर्थाने गौरवशाली (glorious) होते. …..
मे १९९६ द रॅडिकल घुमनिस्ट च्या संपादकीयात तारकुंड्यांनी लिहिले
“भारतात पक्षीय व्यवस्था जवळपास कोलमडली आहे. मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल आदर उरलेला नाही. काँग्रेस पक्ष सर्वांत भ्रष्ट वाटतो कारण तो सत्तेत सर्वाधिक काळ राहिलेला आहे. दुसरे म्हणजे, सर्वच पक्षांचे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकरण झाले आहे. प्रत्येकच पक्ष समाजविघातक व्यक्तींचा आधार घेतो, व त्यांना आधार देतो. “काँग्रेस पक्ष सर्वांत भ्रष्टही आहे, आणि सर्वांत अवसरवादीही. काही वेळा त्यांनी मुस्लिमांचे लाड केले आहेत, म्हणून भाजपचे नेते त्यांना छद्म-सेक्युलरिस्ट म्हणतात, ते खरेच आहे. पण इतर काही वेळा त्यांनी हिंदू सांप्रदायिकतेचे लाड केले आहेत, जो सेक्युलरवादाशी विश्वासघात आहे.
“जर काँग्रेसपाशी तत्त्वे नाही, तर भाजपाची तत्त्वे, लोकशाही व मानवतावादाला अत्यंत घातक आहेत….
“जरी (तिसरी) राष्ट्रीय आघाडी डाव्या दृष्टिकोनाची आहे, तरी ती बहुशः आपापल्या महत्त्वाकांक्षा एका ध्येयात विलीन करू न शकणाऱ्या राजकारण्यांची आघाडी आहे. एकूण राजकीय चित्र भकास व उदास आहे.’
पुढे त्यांनी लिहिले “आणखी एक विकासाचा मुद्दा आहे तो २४ एप्रिल १९९३ ला लागू झालेल्या ७३ व्या घटनादुरुस्तीचा. या नव्या नियमांनुसार ग्रामपंचायती व नगरपालिकांच्या वॉर्ड-समित्यांचे पुनर्गठन झाले. जर चांगल्या रीतीने चाललेल्या छ.ऋज.ी नी आपले कार्यक्षेत्र वाढवले, तर ग्रामपंचायती व वॉर्ड-समित्या जास्त मूलभूत व जास्त लोकशाहीनुरूप कामे करतील, असे पाहता येईल. यामुळे पुढे या संस्था खऱ्या अर्थाने लोकांचे प्रतिनिधित्व करू लागतील अगदी वंचित समाजगटांचेही. एम.एन.रॉय आणि जयप्रकाश नारायण यांच्या मनांत असलेल्या लोकसमित्या उभ्या राहतील. खऱ्या अर्थाने लोकराज्य उभे राहील….. या समित्यांमधून राज्य व केंद्रीय विधिमंडळांच्या निवडणुकांना मदत होईल. प्रत्येक मतदारसंघासाठी समित्यांमधील एकेका प्रतिनिधींची लोकसमिती घडवून नैतिकदृष्ट्या भरवशाचे व कामे करणारे उमेदवार निवडता येतील. या समित्यांना आपापल्या मतदारसंघाच्या आमदार-खासदारांना (नीट काम न केल्यास) माघारी बोलावण्याचा अधिकार असेल.”
कॅगेल-तारकुंडे संवाद व नंतरची अवतरणे आहेत रविकिरण जैन (विद्यमान उपाध्यक्ष, झणउङ) यांच्या लेखातून घेतलेली, पण जैन यांना तारकुंड्यांची सर्वच मते पटत, असे मात्र नाही. पुढे जैन लिहितात
“तारकुंड्यांबद्दल पूर्णपणे आदर बाळगूनही मी काही मतभेद नोंदू इच्छितो. बहुराष्ट्रीय कंपन्यांना अनिर्बंधपणे भारतात प्रवेश देण्याबद्दल ते म्हणत ‘‘परकीय भांडवलाला किती प्रमाणात भारतात येऊ द्यावे यावर काही वाद उद्भवला आहे. अनेक डाव्या विचारांचे लोक म्हणतात, की ज्या क्षेत्रांमध्ये भारतीय भांडवल शिरण्यास उत्सुक नाही, तेथे परकीय भांडवल येऊ द्यावे जसे, पायाभूत सेवासुविधा, ज्यात ऊर्जा व संदेशवहनही आले. पण या लोकांना उपभोग्यवस्तूंच्या उत्पादनात परके भांडवल नको, कारण तेथे भारतीय भांडवल उपभोक्त्यांच्या गरजा पुरवायला समर्थ आहे. शीतपेये व बटाट्याच्या चिप्स, यांमध्ये परके नको. वरकरणी हा युक्तिवाद आकर्षक वाटत असला तरी तो भ्रामक आहे. या (उपभोक्ता) क्षेत्रांतही चांगले उत्पादन व व्यवस्थापन तंत्रज्ञान आले, तर भारतीय उत्पादक व उपभोक्त्यांचे भलेच होईल. ‘शीतपेये-चिप्स परकीय भांडवलाने भारतात का बनवू नये?’ या प्रश्नाला ‘त्याला बंदी का असावी?’ असा प्रतिप्रश्नही उभा करता येईल. परकीय भांडवलावर आधारित उद्योगांचा नफा देशाबाहेर जातो, हे खरे आहे. पण भारतीय निर्यातीने समतोल राखता येईल.”
या मताच्या योग्यायोग्यतेवर वाद घालण्याची ही जागा नाही, पण माझा मुद्दा असा, की उपभोग्य वस्तूंसाठीही परके भांडवल येऊ देण्याने विकासाच्या मूलभूत हक्कावर गदा येते, व आपल्या सार्वभौमत्वाला इजा पोचते.
[ एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतरच्या ‘गौरव’ लेखात मतभेदही नोंदणे, याने औचित्यभंग होत नाही, हे वि.म. तारकुंड्यांनाही पटले असते, असे त्यांच्या विचार मांडण्याच्या शैलीवरून वाटते. ते विवेकी मानायला हवे.
वरील मजकूर ताहेरभाई पूनावालांच्या नजरेस आला. ते तारकुंड्यांचे स्नेही होते व झणउङ मध्ये त्यांनी अनेक पदे सांभाळली आहेत.]